सोमवार, ३१ मे, २०१०



बरेच दिवस लिहिन लिहिन म्हणता म्हणता ह्या चित्रपटावर लिहायचा आज मुहुर्त उजाडला. शुक्रवारी काहीच काम धाम नसल्याने ट्वायालईट चौथ्यांदा बघितला, चित्रपटाचा फारच परिणाम पुन्हा एकदा मनावर झाल्याने शनिवारी देखील परत बघितला आणी काल चक्क रात्री जागुन पुन्हा एकदा स्टार मुव्हिजवर बघितला.

येवढे आहे तरी काय ह्या चित्रपटात ? ह्यात आहे एक अनोखी प्रेम कहाणी. चित्रपटातील एका दृष्यात म्हणल्याप्रमाणे जणु काही शेळी आणी सिंहाची प्रेमकाहाणी.



इसाबेला स्वान (पण हिला मात्र आपली ओळख फक्त बेला अशी करुन द्यायला आवडते) हि एक १७ वर्षाची अल्लड तरुणी. तीच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा थोडीशी वेगळी, एकटे राहायला आवडणारी, थोडिशी अबोल, लाजरी-बुजरी, गर्दी टाळणारी तरुणी. फिनिक्स सारख्या स्वच्छ सुर्यप्रकाशातल्या शहरात आपल्या आईजवळ वाढलेली बेला, आईने वडिलांशी घटस्फोट घेउन एका बेसबॉल प्लेयरशी लग्न केल्यानंतर पुन्हा एकदा आपले वडिल चार्ली स्वान ह्यांच्याकडे वॉशींग्टनच्या फोर्क्स शहरात राहायला येते. फोर्क्स हे तसे लहानसे आणी पावसाळी शहर. बेलाचे वडील चार्ली हे तिथले पोलिस अधीकारी.

नविन शाळेतील मुले मुली ह्या अल्लड सुंदर बेलाशी दोती करण्यासाठी खुप उत्सुक आहेत पण बेला अजुनही आपल्याच एकट्या जगात गुरफटलेली आहे. नाही म्हणायला आल्या आल्या तीची गाठ फोर्क्स मधले जुने रहिवासी आणी वडिलांचे मित्र असलेल्या बिली आणी त्यांचा तीच्याच वयाचा मुलगा जेकब ह्यांच्याशी पुन्हा एकदा पडते. लहानपणी एकत्र घालवलेले दिवस दोघेही अजुन विसरलेले नाहीत.

हळुहळु शाळेतल्या एका छोट्याश्या ग्रुपमध्ये बेल रमुन जाते. तीचे मित्र देखील तिच्यासारखेच सरळमार्गी. ह्या मित्रांबरोबर एकदा कँटीनमध्ये बसलेली असताना बेलाची नजर एडवर्ड कलिन आणी त्याच्या कुटुंबातील इतर मुलांवर जाते. कलिन कुटुंबिय हे सतत एकत्र राहणारे व इतर विद्यार्थांपासून कायम चार हात दुर राहणारे आहे हि नविन माहिती तीला मित्र मैत्रीणींकडून समजते. एडवर्ड कलिन ह्या देखण्या आणी रुबबदार तरुणाकडे ती पाहाताचक्षणी आकर्षीत होते.



शास्त्राच्या पहिल्याच तासाला बेलाची जागा एडवर्डच्या शेजारीच येते. एडवर्ड मात्र बेलाला पाहिल्याबरोब्बर अस्वस्थ वाटायला लागतो. काही वेळातच तो एखादी दुर्गंधी येत असल्यासारखा चेहरा आणी नाक आक्रसायला लागतो. तास संपता संपता तो पटकन उठुन बाहेर देखील पडतो, इकडे बेला मात्र स्वतःच त्या दुर्गंधीचे मुळ असल्यासारखी अस्वस्थ होते. वर्गाबाहेर पडताना बेलाला एडवर्ड आपला क्लास चेंज करता येईल का ह्याची चौकशी करताना दिसतो आणी तीच्या रागात अजुनच भर पडते.

एडवर्ड येवढ्या कटुपणाने वागुन देखील बेला मात्र त्याच्याच विचारत अजुनच गुरफटली जायला लागते. त्यांतर काही दिवस बेलाला एडवर्डचे दर्शनच घडत नाही आणी एक दिवस तो अचानक वर्गात तिच्या आधी उपस्थीत असतो. ह्यावेळी मात्र एडवर्ड स्वतःहुन आपली ओळख करुन देतो आणी अगदी छान वागतो. पण त्या छान वागणुकीतही बेलाला एक गुढ डूब जाणवतच राहते. एक दिवशी बर्‍याच दुर उभा रहुन बेलाचे निरिक्षण करणार्‍या एडवर्डकडे बेला टक लावुन पाहात असतानच तिच्या मित्राचा गाडीवरचा ताबा सुटतो आणी त्याची गाडी भरधाव वेगाने बेलाच्या दिशेने यायला लागते. त्याची गाडी आणी स्वतःच्या गाडी मध्ये बेला चिरडणार येवढ्यात अचानक एडवर्ड क्षणार्धात तीथे अवतरतो आणी एका हाताने तो गाडी थांबवुन बेलाच जिव वाचवतो. त्याचा वेग आणी ताकद बघुन बेला आश्चर्यचकीतच होते.



एडवर्डकडून अर्थातच ह्या सगळ्याचा काहीच खुलासा तीला मिळत नाही. पण आता एडवर्ड कायम संकटात सापडलेल्या बेलाच्या सुटकेसाठी क्षणार्धात हजर व्हायला सुरुवात होते. कलिन्स कुटुंबाविषयी नाना अफवा कानावर पडतच असतात आणी कायम थंडगार शरीर असलेल्या, आपोआप डोळ्याचा रंग बदल जाणार्‍या एडवर्ड विषयीचे गुढ वाढतच असते. पुस्तके आणी इंटरनेटच्या मध्यमातुन कलिन्स कुटुंबीय, एडवर्डच्या शारीरीक अवस्था, सवयी ह्याची माहिती काढण्याचा बेला प्रयत्न करते. बेलाच्या प्रयत्नांना यश येते पण मिळालेल्या यशाने आनंद होण्याऐवजी बेलाला धक्काच बसतो. एडवर्ड हा कोणी सामान्य तरुण नसुन तो एक व्हँपायर आहे हे बेलाच्या लक्षात येते.

बेलाने मिळवलेल्या माहितीला एडवर्ड दुजोराच देतो आणी पहिल्यांदाच बेलाला आपले खरे स्वरुप दाखवतो. एडवर्ड आणी त्याचे कुटुंब हे काहीशे वेगळ्या प्रकारचे व्हँपायर्स असतत. मानवां ऐवजी जंगली जनावरांच्या रक्तावर ते आपली तहान भागवत असतात. एडवर्ड स्वतःची ओळख शाकाहारी व्हँपायर अशी करुन देतो. येवढे सगळे कळुनही बेला घाबरली नसुन उलट आपल्या अधिक जवळ आलेली बघुन एडवर्ड आश्चर्यचकीत होतो. तो तीला आपल्यापासून दुर राहण्याचा सल्ला देतो. तीच्या मानवी गंधापासून तो स्वतःला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. बेला मात्र आपल्या प्रेमावर ठाम असते. शेवटी एडवर्डला तीच्या प्रेमाचा स्विकार करायलाच लागतो.



एडवर्ड आता बेलाची आपल्या कुटुंबीयांशी देखील ओळख करुन देतो. त्याचे कुटुंबीय देखील बेलाचा आनंदाने स्विकार करतात. पण त्याच बरोबरीने त्यांचे सत्य उघड झाले तर काय हल्लकल्लोळ माजेल ह्याची देखील बेलाला जाणीव करुन देतात. बेलाच्या जीवनात पुन्हा एकदा आनंद भरुन जातो.



एक दिवशी एडवर्ड बेलाला आपल्या कुटुंबीयांसमावेत बेसबॉल खेलण्यासाठीघेउन जातो आणे तिथेच ह्या दोघांच्या जीवनाला एक अनपेक्षीत वळण लागते. त्या ठिकाणी त्यांची गाठ एका मानवी रक्ताने तहान भागवणार्‍या दुसर्‍या व्हँपायर कुटुंबाशी पडते. ह्या कुटुंबातील जेम्स आता बेलाच्या मानवी गंधाने वेडापीसा होतो आणी तीच्या रक्तासाठी तिच्या जीवावर उठतो.



कुटुंबातल्याच एक मानलेल्या बेलाच्या जीवाची जबाबदारी आता संपुर्ण कलिन्स कुटुंब उचलते आणी जेम्सला संपवायचा निर्णय घेते. पुढे जे काय घडते त्याचा अनुभव प्रत्यक्षात घेण्यातच खरी मजा आणी उत्कंठा आहे.


एकुणच अजब म्हणावी अशी हि प्रेमकाहाणी प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायलाच हवी.

स्टेफनी मेयर ह्या लेकीखेच्या कादंबरीवर आधारलेला हा चित्रपट. ह्याच कथाकथानचे पुढचे भाग तीने 'न्यू मून', 'एक्लिप्स' आणि 'ब्रेकिंग डॉन' ह्या नावानी लिहिले आहेत. ह्यातील 'न्यू मून' हय पुढील भागावरील चित्रपट अर्थातच 'ट्वायलाईट भाग २ न्यू मून' देखील प्रदर्शीत झाला आहे. बेल आणी एडवर्डच्या जीवनात आलेले नविन वादळ त्यात चित्रीत करण्यात आले आहे. ह्या भगाविषयी लवकरच लिहितो.



बुधवार, ५ मे, २०१०

तुकडा तुकडा चंद्र...

"संग्राम, अरे आवरले का नाही?" आईचा नुसता धोशा चालु होता कधीपासून. आमच्या मतोश्रींच्या आनंदाला आज काही पारावारच उरला नव्हता!

आज कुलकर्ण्यांकडची मंडळी येणार होती. बरोब्बर ! अहो कांदापोहे कार्यक्रम... दुसरं काय? एका लग्नाळू, उत्तम स्थितीतल्या मुलाच्या आईच्या उत्साहाला उधाण येईल असं दुसरं काय कारण असू शकतं?

मला स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी चालु करुन आता जवळजवळ २ वर्षे होत आली होती, जमही व्यवस्थीत बसला होता. सगळे व्यवस्थीत असुनही मी तसा लग्नाला थोडीशी टाळाटाळच करत होतो. पहिल्यापासूनच आपण बरे आणि आपला अभ्यास बरा हेच माझे ध्येय असायचे. इंजिनीअरींगला आल्यावरच थोडीफार काय मस्ती केली असेल तेवढीच. पण तेंव्हाही आमची स्वारी मुलींपासून फटकूनच असायची. पण ३ महिन्यांपुर्वी बाबांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला आणि माझी जबाबदारी एकदम वाढल्यासारखी मला वाटायला लागली. जे काय थोडेफार बालीशपण अंगात उरले होते ते संपुन गेले. ह्याच जबाबदारीची पहिली पायरी म्हणजे आता घरात आईच्या जोडीला बायकोला घेउन येणे.

आई बहुतेक माझ्या होकाराचीच वाट पहात असावी. आणि ४ दिवसाच्या आतच एका रविवारी, माझ्या समोर दहा-पंधरा मुलींचे फोटो हजर करण्यात आले. आसावरीचा फोटो बघताच मला ती एकदम पसंत पडून गेली. "अगर कोई है तो वो यही है... यही है" अशी काय ती अवस्था झाली. माझ्या रुकारानंतर मग आसावरीच्या स्थळाबद्दल अधिक माहिती काढुन आई बाबांनी हि आजची बैठक ठरवली होती.

साधारण ४-३० च्या सुमारास कुलकर्णी कुटुंबीयांचे आगमन झाले. पहिली ५/१० मिनीटे एकमेकांची ओळख आणि दोघांना जोडणारी कॉमन ओळख ह्यांच्या माहितीची देवाण घेवाण झाली. आसावरी आर्टस पुर्ण करुन सध्या फॅशन डिझायनींग पुर्ण करत होती, तिची लहान बहिण सायन्सच्या पहिल्या वर्षात शिकत होती. वडील नुकतेच किर्लोस्कर मधुन चांगल्या पदावरुन निवृत्त झाले होते तर आई गृहीणी होती. एकुण पहिल्या भेटीत तरी आसावरीत नाकारण्यासारखे काहीच वाटत नव्हते. आसावरी थोडीशी अबोल वाटली, बहुतेक तीचा हा माझ्यासारखाच पहिला कार्यक्रम असावा.

एकमेकांची चौकशी झाली. आमच्या दोघांच्या आवडी निवडी बर्‍याचशा जुळणार्‍याच निघाल्या. आसावरीचे आई वडिल देखील एकुणात खुषच दिसत होते. आमचे माता पिता तर अमुल्य ठेवा गवसल्या सारखेच वागत होते. काही वेळातच आम्हाला दोघांना सोडून सर्व मंडळी बाग बघायला म्हणुन बाहेर गेली. दोन-पाच मिनिटांनी धिर करुन मी बोलायला सुरुवात केली. आसावरी "हो - नाही" एवढे मोजकेच बोलत होती. मोरपंखी साडीत ती खरच खुप सुंदर दिसत होती. येवढी सुंदर मुलगी 'अ‍ॅरेंज्ड मॅरेजच्या' स्टेजपर्यंत पोचलीच कशी ह्याचेच आश्चर्य वाटले मला.

तीने स्वतःहुन काहीच विचारले नाही, फक्त "कायमचे ह्याच देशात राहणार का परदेशी जायचा विचार आहे?" एवढा एकच प्रश्न तीने मला विचारला.

कुलकर्ण्यांची मंडळी गेल्यानंतर आमची घरगुती बैठक बसली. आम्हा सर्वांनाच आसावरी खुप आवडून गेली होती. सर्वांची पसंती जुळल्यावर साधारण एक तासाने बाबांनी फोन करुन आसावरी पसंत पडल्याचे कळवुन टाकले. गंमत म्हणजे लगोलग कुलकर्ण्यांनी देखील त्यांची पसंती कळवुन टाकली. लवकरात लवकर पुन्हा एकदा भेटुन साखरपुड्याची तारीख काढण्याचे देखील निश्चीत झाले. मला तर स्वर्ग २ बोटे उरला होता. मला माझ्या भाग्याचा हेवाच वाटत होता. काही दिवसांनी दोन्ही घरच्या परवानगीने साखपुड्याची तयारी, एकमेकांचे स्वभाव जाणुन घेणे अशा वेगवेगळ्या कारणांखाली माझे व आसावरीचे एकत्र फिरणे सुरु झाले.

आसावरी बरोबर मी २/४ नाटके, सिनेमे पाहिले, एक दोनदा प्रदर्शनांना देखील जाउन आलो. पण खरे सांगायचे तर आसावरी मला एकुणच ह्या ठरलेल्या लग्नाने खुष आहे असे अजिबात जाणवत नव्हते. ती सतत अबोल, स्वतःच्या एका वेगळ्याच कोषात गुरफटलेली असायची. 'हो - नाही' ह्या पलिकडे सहसा तीची उत्तरे जायचीच नाहीत, कुठलाच आनंदत ती मनसोक्त उपभोगताना दिसत न्हवती. तिचे एकुणच वागणे मला खटकत होते. "काही काही मुली थोड्या बुजर्‍याच असतात, होईल सगळे व्यवस्थीत एकदा ती रुळली की" अशा आई बाबांच्या समजुतीने मला समाधान मिळत नव्हते. शेवटी धीर करुन मी एकदा आसावरीच्या घरी फोन करुन काकांना भेट घेण्याची विनंती केली. दुसर्‍या दिवशी माझ्या ऑफिसात येउन मला भेटायचे त्यांनी कबुल केले.

साधारण ४ च्या सुमारास काका हजर झाले. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यावर मी मला खटकत असलेली गोष्ट त्यांच्यापाशी बोलुन मोकळा झालो. काकांच्या चेहर्‍यावर आल्यापासूनच ताण स्पष्ट जाणवत होता. माझ्या प्रश्नानंतर तो एकदम वाढल्यासारखे मला वाटून गेले पण क्षणार्धात पुन्हा त्यांचा चेहरा मावळला. आता काय ऐकायला मिळतय म्हणुन जीवाचे कान करुन बसलो होतो..

"संग्राम राव, खरे सांगायचे तर आसावरीला हे लग्न करायचेच नव्हते. तीला अजुन शिकायचे होते. पण आमच्या हट्टापुढे तीचे काहीच चालले नाही. निदान मुलं बघायला तर सुरुवात करु, लगेच काय कोण तुला माळ घालायला धावत येणार नाहीये ! तोवर शिकत रहा की तु.. असे सांगुन आम्ही तीला तयार केली. पाठची एक बहिण अजुन लग्नाची आहे हो तीच्या. आणि मनासारखा हौशी नवरा मिळाला तर तीचे शिक्षण सासरी जाउन पण सुरु राहिलच की, असे मनात वाटत होते."

माझ्या मनावरचा ताण आता एकदम हलका झाला होता, चेहर्‍यावर एक स्मित झळकायला लागले होते.

"काय हे काका? अहो मग त्याचे एवढे टेंशन घ्यायला काय झाले तीला? अहो माझ्यापाशी मनमोकळेपणानी का बोलली नाही ती? शिकायची इच्छा आहे तर शिकु दे की हवे तेवढे. आत्ताच माझे वडील मोठ्या आजारातुन उठले आहेत, त्यांची तब्येत जरा बरी होउ दे मग अगदी दिवसभर अभ्यासात बुडून राहिली तरी माझी हरकत नाही."

घाई गडबडीत एकदाचा साखरपुड्याचा दिवस येउन ठेपला. गेले १५ दिवस खरेदीसाठी आसावरी, तीची आई आणि आमच्या मातोश्रीच एकत्र फिरत होत्या. त्यामुळे आमचे भेटणे मुश्किलच झाले होते. पण एकुणच दोन्ही घरात पहिलेच कार्य असल्याने उत्साहाला चांगलेच उधाण आलेले होते. उद्या दुपारी ५ वाजता मी आणि आसवरी एका नविन आयुष्याच्या सुरुवातीचे पहिले पाऊल टाकणार होतो.

दुसर्‍या दिवशी आईचा उत्साह तर अगदी ओसंडून चालल होता, माझी देखील अवस्था काही वेगळी नव्हतीच. सगळे ह्याच गडबडीत असताना अचानक दुपारी १ च्या सुमाराला आसावरीच्या बाबांचा फोन आला. त्यांनी मला तातडीने त्यांच्या घरी भेटायला बोलावले होते, तेही एकट्याला. काहीबाही कारणे देऊन मी स्वतःची सुटका करुन घेतली आणि आसावरीच्या घरी हजर झालो. हॉल मध्येच काका एका आरामखुर्चीत डोळे मिटुन पडले होते. जणु अचानक २० वर्षांनी त्यांचे वय वाढल्यासारखे ते खचलेले दिसत होते.

"काका..." मी अगदी हळूच हाक मारली.

काकांनी डोळे उघडून माझ्याकडे पाहिले. संपुर्ण विश्वाची अगतिकता त्या डोळ्यात एकटवल्यासारखी मला वाटून गेली. काकांच्या समोरच्या खुर्चीत मी बसलो.

"आसावरी कुठे आहे?" ह्या माझ्या प्रश्नावर काकांनी आतल्या खोलीकडे बघुन मान उडवली.

"पण तुम्ही तीला आत्ता न भेटलात तरच बरे होईल संग्राम राव!"

" काका?"

"आमचेच नाणे खोटे, त्याला तुम्ही तरी काय करणार? एवढे समजावले, हाता पाया पडलो पण हिलाच दलदलीतुन पाय बाहेर काढायचा नाही, त्याला कोण काय करणार?"

"काका, काय झाले आहे नीट सांगाल क?"

"आसावरीने आत्महत्येचा प्रयत्न केला सकाळी!"

"क्काय्य्य?"

"कुठल्या तोंडानी बोलु संग्राम राव? शिकायच्या वयात प्रेम करायला लागली म्हणे कार्टी. बरं पोरगा बघितला तो ही परजातीतला. ना धड नोकरी ना बापाचा पत्ता! पोराला भेटायला बोलावले तर तो मला न भेटताच परस्पर शहर सोडून पळून गेला. खुप तपास केला पण काही कळू शकले नाही, हिच्या हातापाया पडलो, शेवटी हिच्या आईने जीव द्यायची धमकी दिली तेंव्हा त्या पोराला विसरुन ही मुले बघण्यासाठी तयार झाली. काय करु हो? अजुन एक मुलगी आहे पदरात. तुमचे लग्न ठरले आणि तो मुलगा दत्त म्हणुन दारात हजर! आई वारली म्हणुन वाराणसीला गेला होता."

"बरं मग?"

"प्रत्यक्षात पोरगा भेटला तेंव्हा त्याच्या सच्चेपणाची जाणिव झाली, आसावरीसाठी म्हणुन आईचा बारावा सोडून धावत आला होता. पण मी बांधलो गेलो होतो. मी त्याच्यापुढे सर्व परिस्थिती स्पष्ट करुन त्याला नकार दिला. तो रडला, पाया पडला पण मी दाद दिली नाही. तर आज पोरीने हे असे...." बोलता बोलता कुलकर्ण्यांना रडू कोसळले.

"संग्रामराव, एक अभागी बाप म्हणून मी तुमच्यापुढे हात जोडतो, तुम्ही ह्या लग्नाला नकार द्या! आसावरी त्याच्याशिवाय नाही जगु शकणार. ह्या लग्नाने तुम्ही दोघंही सुखी नाही होउ शकणार, ऐका माझे."

"म्हणजे तुमच्या मुलीच्या सुखासाठी मी माझ्या सुखांना आग लावु असेच ना? हा काय तुम्हाला हिंदी सिनेमा वाटला कुलकर्णी? पोरीच्या पवित्र प्रेमाचा साक्षात्कार झाल्याबरोबर तुम्ही तीचा हात माझ्या हातातुन सोडवुन दुसर्‍याच्या हातात द्यायला निघालात? हे लग्न मोडल्याने ती सुखी होईल सुद्धा, पण माझे काय? मी रंगवलेल्या स्वप्नांचे काय? ह्या प्रसंगाला माझे आजारातुन उठलेले वडिल आणि तुमच्या मुलीच्या गृहप्रवेशाकडे डोळे लावुन बसलेली माझी आई कसे सामोरे जाणार कुलकर्णी? काय तोंड दाखवणार ते लोकांना आणि काय उत्तरे देणार चौकशांना?"

"संग्राम राव ..."

"तुम्ही मला फसवलंत कुलकर्णी ! मी तुम्हाला आसावरीच्या नाराजीचे कारण स्पष्ट विचारले होते, तुम्ही माझ्याशी खोटे बोललात. तुम्ही आणि तुमची मुलगी दोघे माझ्याशी खेळलात! हे लग्न करुन मी सुखी होणार नाही हे जेवढे खरे आहे तेवढेच हे लग्न मोडल्याने माझे आयुष्य उध्वस्त होणार आहे, हे देखील खरे आहे. मग काहीही घडले तरी मला शिक्षाच मिळणार असेल, तर ती मी एकट्याने का भोगायची कुलकर्णी? हे लग्न होणार कुलकर्णी, आज संध्याकाळी साखरपुडा आणि त्यानंतर दोन दिवसात हे लग्न लागेल. तयारीला लागा..."

कुलकर्ण्यांच्या घरातुन रागारागाने मी बाहेर पडलो खरा पण पुढचा एक तास मी कुठल्या रस्त्याने आणी का फिरत आहे तेच माझ्या लक्षात येत न्हवते. शेवटी एका गाडीला टेकुन १० मिनीटं शांतपणे उभा राहिलो. मागल्या काही वेळात घडलेल्या घटनांची मनात पुन्हा एकदा उजळणी झाली. माझा संताप अजुनही कमी झालेला न्हवताच, तसाच मी घराच्या दिशेन निघालो.

घरात पोचलो आणी बघतो तर समोरच आसावरीची धाकटी बहिण अनघा बसली होती, तीच्याच शेजारी डोळ्याला पदर लावुन आई देखील माझीच वाट पाहात बसली असावी. अनघाला एकदम माझ्या घरात पाहुन मी आश्चर्यचकीतच झालो. बहुदा आईला तीने घडलेला सर्व प्रकार सांगीतला असावा. मी पटकन आतमध्ये बाबांच्या खोलीकडे वळून पाहिले. "आत्ताच आत गेलेत ते" आई म्हणाली. म्हणजे नक्की काय घडले आहे, ते दोघांनाही कळले होते तर.

"मला तुमच्याशी थोडे बोलायचे होते" अनघा अस्पष्ट स्वरात म्हणाली. आई समजुतदारपणे उठुन बाबांच्या खोलीत निघुन गेली.

"आता बोलण्यासारखे काही उरले आहे?"

"तुमची अवस्था काय झाली असेल हे मी समजु शकते. पण ह्या लग्नामुळे तुमच्या दोघांचेच नाही तर ताईचे ज्या मुलावर प्रेम आहे त्याचे, माझ्या आई बाबांचे, तुमच्या घरच्यांचे सर्वांचेच आयुष्य दु:खाच्या खाईत लोटले जाणार आहे. तुम्ही हे का लक्षात घेत नाहिये ? आपली मुले एकमेकांना शिक्षा देण्यासाठी एकत्र नांदत आहेत हे बघुन कोणते आई वडील सुखी होतील ?"

"माझा निर्णय मी घेतलाया अनघा, आणी तो बदलणे शक्य नाही !"

"मी तुमचा निर्णय बदला म्हणुन सांगायला आलेच नाहिये ! फक्त त्यात थोडा बदल करा अशी विनंती करायला आलीये."

"म्हणजे ??"

"तुम्ही घेतलेला निर्णय म्हणजे, ताई आणी बाबांनी तुमची जी फसवणुक केली त्याचा घेतलेला बदलाच आहे ना ? मी बरोबर बोलते आहे ना ? तुम्हाला त्यांना शिक्षाच द्यायची आहे ना, मग ती मला द्या ! मी तुमच्याशी लग्नाला तयार आहे. आपल्या लग्नामुळे हे सर्वच प्रश्न सहजपणे सुटतील, नाही ? तुमच्या आई वडलांवर देखील दु:खाचा डोंगर कोसळणार नाही आणी तुम्हाला देखील आमच्या घरच्यांना शिक्षा दिल्याचे समाधान मिळेल..."

"अनघा, तु काय बोलतीयेस तुला कळतय ??"

"मी पुर्ण विचार केलाय संग्राम. मी तुम्हाला वचन देते तुमची बायको म्हणुन मी कुठेही कमी पडणार नाही. एक सुन म्हणुन देखील मी माझ्या कुठल्याही कर्तव्यात कमी पडणार नाही. फक्त मला माझ्या ताईच्या सुखाचे दान द्या. मी हात जोडते तुमच्यापुढे..."

मी सुन्न होऊन तिच्याकडे पाहातच राहिलो. अरे आत्ता आत्ता स्त्रीत्वाची जाणीव व्हायला लागलेली हि मुलगी येवढा परिपुर्ण विचार कसा काय करु शकते ? दुसर्‍या कोणाच्या सुखासाठी माणुस येवढा त्याग करायला तयारच कसा होऊ शकतो ? अनघाच्या विचारांपुढे मला मी फारच खुजा वाटू लागलो.

"अनघा, माझ्याबद्दल तुझे काय मत झाले आहे ते मला खरच माहित नाही. तु म्हणतीस तसे मी माझ्याबरोबरच सगळ्यांनाच शिक्षा द्यायला निघालो होतो हे मात्र खरे आहे. मी फार मोठी चूक करत होतो हे मला मान्य आहे. मी संतापी आहे पण राक्षस नाहिये ग. माझ्या समाधानासाठी तुझ्या ताईचे अथवा तुझे आयुष्य असे फरफटवण्याचा मला काय अधिकार ? जा अनघा.. तुझ्या ताईचे लग्न तीच्या आवडीच्या मुलाशीच होईल, हा माझा शब्द आहे. तुझ्या ताईच्या नक्कीच नाही पण तुझ्या लग्नात मात्र मी यायचा नक्की प्रयत्न करीन, येवढ्या विचारी मुलीने निवडलेल्या नवर्‍याला भेटायला मला नक्की आवडेल."

अनघा गेल्यानंतर आईच्या चेहर्‍यावरचे समाधानचे हसु मला बरेच काही सांगुन गेले. त्या दिवसानंतर माझे नेहमीचे आयुष्य पुन्हा चालु करायला मल थोडे जडच गेले पण काळ हा सर्व रोगांवरचा रामबाण उपाय आहे आहे हेच खरे. हळुहळु मी स्वतःला सावरायला लागलो, आई बाबांनी हे नक्की मनाला लावून घेतले असणार पण वरवर तरी ते तसे काही दाखवत न्हवते. त्या घटनेपासून आमच्या घरात 'माझे लग्न' हा विषय मात्र बंदच झाला. आत्ता आत्ता सावरायला लागलेल्या मला पुन्हा डिचवायचा प्रयत्न घरच्यांनी देखील केला नाही हे मात्र खरे.

काही काही माणसांच्या आयुष्यात जखमा भरुन येण्याचा योग नसतोच, आणी तो ओढुन ताणुन आणताही येत नाही. आसावरी प्रकरणामुळे झालेली जखम हळुहळु भरत आली असतानाच दोन वर्षात आसावरी नावाचे वादळ पुन्हा एकद माझ्या आयुष्यात प्रवेशकर्ते झाले....

आमच्या कंपनीतर्फे फॅशन डिझायनींगच्या कामात मदत करु शकणारे नविन सॉफ्टवेअर विकसीत करण्याचे प्रयत्न चालु होते. त्या संदर्भातच काही नविन उमेदवारांची भरती आवश्यक होती. इंटरव्ह्युजच्या दिवशी मी नेहमीसारखाच माझ्या केबिन मध्ये निघालो होतो आणी अचानक रिसेप्शन शेजारी जमा झालेल्या उमेदवारांमध्ये एकदम गोंधळ चालु झालेला दिसला. मुलाखती साठी आलेली कोणी एक मुलगी चक्कर येउन पडली होती. तीला थोडा मोकळा वारा मिळावा म्हणुन आसपासची गर्दी दुर झाली आणी मला तिचा चेहरा दिसला.

"आसावरी.." मी झटकन पुढे झालो.

"सर तुम्ही ह्यांना ओळखता ??"

"अं ? हो म्हणजे.. माझ्या वडिलांच्या मित्राची मुलगी आहे ही"

रिसेप्शनिस्टच्या मदतीने मी आसावरीला माझ्या केबीनमध्ये आणून बसवले. पाणी वगैरे पिल्यानंतर आसावरी थोडी सावरल्यासारखी वाटायला लागली. माझी नजर चुकवत ती मान खाली घाललुन बसली होती. दोन वर्षापुर्वीची रसरसलेली, सौंदर्यावान आसावरी जणु कुठेतरी हरवुन गेली होती. माझ्यापुढे बसली होती एक खंगलेली, अकाली वयात आलेली प्रौढ स्त्री.

"आसावरी, यु ओके ?"

"बरं वाटतय आता. मी निघते.."

"थांब मी कोणाला तरी तुला सोडायला सांगतो घरापर्यंत. एकटी नको जाऊस."

"थँक्स. पण खरच त्याची आवश्यकता नाही, मी जाईन व्यवस्थीत."

"इंटरव्ह्यु साठी आली होतीस?"

"हो. पण तुम्हाला बघितले आणी एकदम मी कुठल्या कंपनीत आले आहे ते ध्यानात आले. उठुन निघालेच होते, तेवढ्यात हे असे..."

आसावरी बोलत असताना मी लक्षपुर्वक तिच्याकडे बघत होतो. आसावरी बर्‍याच कठिण प्रसंगातुन गेली होती हे तिचा चेहराच बोलत होता. सर्वात डाचणारी गोष्ट म्हणजे गळ्यात मंगळसुत्र दिसत न्हवते.

"मी माझ्या कंपनीतील लोकांना गुलांमांसारखे राबवुन घेतो असे कानावर आलेले दिसते आहे तुझ्या" मी हसत हसत म्हणालो.

आसावरी माफक हसली पण बोलली काहीच नाही.

"आसावरी, माझे वैयक्तिक आयुष्य आणी व्यवसाय ह्यात मी कधिच गल्लत करत नाही. तुझ्या माझ्यात जे काही घडले तो एक भूतकाळ होता. त्या सर्व घटनेबद्दल माझ्या मनात आता काहीच रोष नाही, विश्वास ठेव. तु निर्धास्त मनानी मुलाखत दे."

आसावरी माझ्याकडे बघुन कृतज्ञतेनी हसली. आसावरी बाहेर जाताच मी आसावरीचा बायोडेटा मागवुन घेतला. मॅरिटल स्टेटस मधले 'विडो' बरेच काही सांगुन गेले. खरेतर मी अस्वस्थ झालो होतो, आपण नक्की काय केले पाहिजे हे न कळुन गोंधळलो होतो. आसावरीला मदत करावी असे राहून राहून वाटत होते, तर दुसर्‍या बाजुला तीला पाहिल्या पासून जुनी जखम पुन्हा ठसठसायला लागली होती. शेवटी नेहमीप्रमाणेच हृदयाने बुद्धीवर मात केली आणी मी आसावरीची नोकरी पक्की केली.

नव्या तंत्रज्ञानाशी जुळवुन घ्यायला आसावरीला थोडा वेळ लागला पण लवकरच ती रुळुन गेली. माझी निवड चुकली न्हवती हे तिच्या कामाच्या प्रगतीवरुन लक्षात येतच होते. ऑफिसमध्ये जाता येता आसावरी बर्‍याचदा समोर यायची एक छोटेसे हास्य किंवा गुड मॉर्नींग , इव्हिनींग येवढी देवाण घेवाण होउन आम्ही पुन्हा आपापल्या जगात मागे फिरायचो.

"सर तुम्हाला भेटायला कुणी मिसेस अनघा आल्या आहेत " फोनवरुन रिसेप्शनिस्ट सांगत होती.

"मी ओळखतो त्यांना ? काय संदर्भात भेटायचे आहे ?"

"सर त्या तसे काही बोलल्या नाहीत, फक्त म्हणाल्या सरांना सांगा अनघा कुलकर्णी आल्या आहेत."

"आत पाठवुन दे त्यांना" मी शक्यतो आवाजातला उत्साह लपवत म्हणालो.

काही क्षणातच केबीनचे दार उघडून अनघा आत आली. दोन वर्षात तीच्या सौंदर्याला एक वेगळीच झळाली आली होती, बुद्धीमत्तेचे तेज देखील चांगलेच डोकावत होते.

"या ! एकदम मिसेस वगैरे ??"

""हो मग. तुम्ही नकार दिला म्हणुन काय कोणी लग्नच करणार न्हवते का काय माझ्याशी ??" अनघा खदखदुन हसत म्हणाली. मी सुद्धा खुप दिवसांनी खळखळून हसलो, खुप बरे वाटले.

"आज एकदम इकडे स्वारी ?"

"खरतर खुप आधीच येणार होते, तुमचे मनापासून आभार मानायला."

मी सर्व समजल्यासारखी मान डोलावली. अनघाशी बोलता बोलता मी आसावरी विषयी शक्यतो सर्व जाणून घ्यायचा प्रयत्न केला. लग्ना नंतर एका वर्षातच आसावरी एका गोंडस मुलाची आई झाली होती, आसावरीचा नवरा देखील चांगल्या कंपनीत नोकरीला लागला होता. असाच एकदा ऑफिसच्या सहकार्‍यांबरोबर ट्रिपला म्हणुन गोव्याला गेला आणी परत आला तो त्याचा निष्प्राण देहच. सासरचा काहीच आधार नसलेली आसावरी आता माहेरी परत आली होती. ह्या धक्क्याने आसावरीच्या वडिलांनी हायच खाल्ली, थोड्याच दिवसात त्यांचेही निधन झाले. आसावरीचे दुर्दैवाचे दशावतार चालु झाले होते, अनघा होईल ती मदत करतच होती.

काळ हळुहळु पुढे सरकत होता, वर्षभरात आसावरी आता चांगलीच तयार झाली होती. ऑफिसचे बरेचसे काम तिच्यावर सोपवुन मी निर्धास्त राहायला लागलो होतो. मधल्या काळात मी कधी अनघाच्या नवर्‍याच्या प्रमोशनची पार्टी तर कधी आसावरीचा मुलगा चिन्मयच्या वाढदिवसची पार्टी अशा ह्या ना त्या कारणाने आसावरीच्या वर्तुळात प्रवेशकर्ता झालोच होतो. ऑफिस बरोबरच अध्ये मध्ये घरच्या अडचणी देखील डिस्कस करायला लागलो होतो. एक वेगळ्याच प्रकारच्या नात्यात आम्ही गुरफटत चाललो आहोत असे मला राहुन राहुन वाटत होते. मनाला हे सगळे सुखावणारे वाटत होते हे का नाकारावे ?

असाच एक दिवस घरी आलो तर समोर अनघा बसलेली. तीन वर्षापुर्वीचा प्रसंग झटकना माझ्या डोळ्यासमोरुन तरळून गेला आणी मी उगाचच अस्वस्थ झालो. तेवढ्यात आई देखील बाहेर आली. आईच्या चेहर्‍यावर बर्‍याच दिवसांनी एक आनंदाची झालर पाहायला मिळत होती. फ्रेश होउन मी बाहेर आलो. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्यानंतर अनघा खुबीने मुळ विषयाकडे वळली.

"संग्राम, तुम्हाला आठवत असेल ३ वर्षापुर्वी मी इथेच तुमच्याकडे माझ्या ताईचे सुख मागायला आले होते."

मी कसनुसा हसलो.

"आज मी पुन्हा त्याचसाठी तुम्हाला विनंती करायला आले आहे. तुम्ही कदाचीत मला स्वार्थी म्हणाल, लोभी समजाल. मी ते नाकारणार देखील नाही. संग्राम.. माझ्या ताईशी लग्न कराला ? तीला पुन्हा एकदा मायेच्या घरट्याचा आधार द्याल ??"

"अनघा.. असे एकदम... मला थोडा वेळ दे. मला एकदा आसावरीशी बोलु दे, मला तीचे मन जाणुन घेउ दे. प्रामाणीकपणे सांगायचे तर हे असे कधी ना कधी घडणार मला वाटतच होते, रादर असे घडावे असेही वाटत होते. पण अचानक ती वेळ अशी समोर येईल असे वाटले न्हवते."

"हरकत नाही, मी काका काकुंशी पण बोलले, त्यांची काहीच हरकत नाहीये. उद्या अनासाये रविवारच आहे. तुम्ही आमच्या घरीच का येत नाही ? मी ह्यांना पाठवुन ताईला देखील माझ्याकडेच बोलावुन घेते."

"तुम्ही लोकं ठरवाल तसे..."
.
.
.
.
.
.
.
.
"डॉक्टर आसावरी कशी आहे ? आणी अनघाचे मिस्टर ??"

"आय एक सॉरी संग्राम ! अपघात येवढा भिषण होता की दोघेही जागीच ठार झालेत...."

ताईचे घरटे बसवता बसवता अनघा स्वतःचे आकाशच हरवुन बसली होती. मी मटकन खुर्चीतच कोसळलो.
.
.
.
.
.
"उद्या मी येऊ शकणार नाही, वर्षश्राध्द आहे ना."

"अं ? हो आहे लक्षात माझ्या. मी पण येउन जाईन नमस्काराला."

मान डोलावुन अनघा केबिन मधुन बाहेर पडली. मी विमनस्कपणे डोळे बंद करुन मागे रेललो.... वर्ष झाले त्या दुर्दैवी घटनेला ! चित्रात रंग भरता भरता जणु नियंत्याने अचानक सगळे रंगच चित्रावर भिरकाटुन दिले. आसावरीची जागा आता अनघाने घेतली होती, चुनुच्या आयुष्यातली आणी माझ्या कंपनीतली देखील.

"संग्राम, अनघाशी बोललास ??"

"नाही आई ! आणी बोलणारही नाही. जे चालु आहे ते तसेच सुरळीत चालु दे... पुन्हा एकदा पोर्णिमेच्या प्रकाशाचा हट्ट धरुन मला आता चंद्रकोरीच्या प्रकाशाला गमवायचे नाहिये.

(समाप्त)