गुरुवार, २३ सप्टेंबर, २०१०

मनस्वी

"आली साली रांड !" केतन 'किव्हाजच्या' दाराकडे बघत फाडकन म्हणाला आणी माझी मान पण आपसुकच दाराकडे वळली. दारातुन २४/२५ वर्षाची मुलगी सुहास्य वदनाने आत येत होती. अगदी अप्रतिम सौंदर्यवती वगैरे म्हणता येणार नाही पण आकर्षक नक्कीच होती मुख्य म्हणजे मस्त 'फॉर्म' राखुन होती.

केत्या भाड्या, एखादी मुलगी जोवर सिंगल असते तोवर तुझ्यासाठी ती अप्सरा असते. एकदा ती दुसर्‍या कोणाला पटली किंवा तुला अप्राप्य आहे हे तुला कळले की तुझ्यासाठी ती लगेच वेश्या कॅटेगरीत मोडायला सुरुवात होते, नाही ? मी वैतागुन म्हणालो.

"हाड बे ! तसले काही नाही. हि साली पोरगी 'तसलीच' आहे. रात्रीला ५०००/- घेते मोजुन. "

"काय बोलतो ? मग तुला काय कमी आहे साल्या ? जा की घेउन तिला, निदान तुझे हे असले शब्द तरी आम्हाला चार लोकात ऐकावे लागणार नाहीत." मी एक फुकटचा सल्ला देउन मोकळा झालो.

"गेलो असतो रे घेउन सालीला. पण साली आहे तर वेश्या, पण माज किती. मला म्हणते जो मला आवडतो त्यालाच मी 'हो' म्हणते. "

मी खदखदुन हसलो. "च्यायला केत्या काही पण फेकत जाउ नकोस भाड्या."

"परी, अरे खरच सांगतोय साल्या. कधितरी विश्वास ठेवा आमच्यावर." केतन येवढे बोलत असतानाच ती पोरगी आमच्या टेबलाजवळ येउन उभी राहिली.

"हॅलो" केतन अगदी जमेल तेवढ्या गोड आवाजात म्हणाला.

"हाय केतन. अरे ॠत्विकला बघितलेस का रे कुठे ? मला इथे ये म्हणाला आणि कुठे गायबलाय काय माहित ?" ती पोरगी गोड आवाजात म्हणाली.

"नाही ग, मला येउन अर्धा तास झाला. मला तरी दिसला नाही कुठेच. तु बस की तो येईपर्यंत." ती पण सहजपणे आम्हाला जॉईन झाली.

"हा माझा मित्र परी, म्हणजे प्रसाद पण आम्ही सगळे त्याला गेल्या महिन्यापासून परीच म्हणायलो लागलोय. आणि हि मनस्वी."

"स्त्री पर्‍या खुप बघितल्या होत्या, आज पुरुष परी पण बघायला मिळाली" असे म्हणत मनस्वी खळखळुन हसली.

काही वेळातच आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. मला तरी गप्पा मारताना किंवा एकुणच तिच्या वागण्या बोलण्यावरुन ती 'त्या' टायपातली असेल असे चुकुन पण वाटले नाही. पण केतननी डोक्यात सोडलेला भुंगा पण हलता हलत न्हवता.

"तुझा सायबर कॅफे आहे हे ऐकुन भारी गंमत वाटली. आज बर्‍याच दिवसांनी कुठल्यातरी वेगळ्या धंद्यातल्या माणसाशी ओळख झाली. नाहीतर माझे बरेचशे मित्र मैत्रिणी म्हणजे आयटी नाहितर दुसरी कुठलतरी नोकरी पण नोकरदारच, नाहितर मग वडिलोपार्जीत व्यवसाय" मनस्वी सहजपणे म्हणाली, पण बहुदा हा आपल्याला मारलेल टोमणा आहे असे वाटुन केतन ताडकन उभा राहिला. "मी आलोच जरा एक फोन करुन" येवढे बोलुन बाहेर देखील पडला.

"परी, तु फक्त कॅफेच बघतोस का अजुन काही सर्विसींग वगैरेपण करतोस ?"

"मी हार्डवेअर, सॉफ्टवेअर सपोर्ट सुद्धा देतो. जुन्या किंवा नविन पीसी मध्ये सुद्धा डिल करतो."

"ग्रेट ! मला तुझे कार्ड मिळेल का ? भवतेक ह्या १०/१२ दिवसात माझा नविन लॅपटॉप घ्यायचा प्लॅन आहे."

"कार्ड वगैरे नाही छापलेली पण माझा नंबर देतो, नोट डाउन करुन घेणार ?" मी सहजपणे विचारले. ह्यावर मनस्वीने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिले ती मी आयुष्यात विसरु शकणार नाही.

"काय झाले ?" मी पटकन विचारले.

"नाही.. तु केतनचा मित्र, म्हणजे मी कोण आहे काय करते हे तुझ्यापर्यंत नक्कीच आले असणार. असे असताना तु चक्क मला नंबर नोटडाउन करायला सांगतोयस ? मला वाटले होते तु माझा नंबर विचारशील आणि मिसकॉल देतो म्हणशील" मनस्वी डोळा मारत म्हणाली.

आता खदखदुन हसायची पाळी माझी होती. "च्यायला ! तुला जे सुचले, ते मला का नाही सुचले ग ?"

तेवढ्यात एका हँडसम तरुणानी टेबलापाशी धाव घेतली आणि गडबडीने माझा नंबर लिहुन घेउन मनस्वी त्याच्याबरोबर पसार झाली. काही वेळातच आमच्या केतनरावांचे आगमन झाले.

"गेली का रांड ? एकदा 'येती का' म्हणुन काय विचारले तर लगेच चान्स मिळाल्यावर साली टोमणे मारायला लागली !"

"सोड ना केत्या. उलट तुझ्याशी किती चांगली वागली ती. आपल्या टेबलाला जॉईन झाली. आणि खरे सांगु मला तरी ती मुलगी 'तसली' वाटली नाही बॉस. उलट वागण्या बोलण्यावरुन तर चांगल्या सुसंस्कृत घरातलीच वाटली."

"वाटली म्हणजे ? अबे बम्मन, तुमची जातवालीच आहे ती. बाप चांगला बँकेत ऑफिसर आहे तीचा आणि बहिण फर्स्ट इयरला आहे. हि स्वतः इथे पुण्यात फॅशन डिझायनींगचा कोर्स करत आहे."

"काय बोलतो ? अरे येवढे सगळे चांगले आहे, मग असे कशाला करेल ती ?"

"खाज ! एकच शब्द. वर पैसे मिळतात आणि बाकीचा खर्च परस्पर निघतो तो वेगळाच. डहाणुकर सारख्या एरियात पोरगी फ्लॅट घेउन एकटी राहते, आता बोल."

मी आपली नुसती मान डोलावली आणि गप्प बसुन राहिलो....

पुढचे चार दिवस कधीही फोनची रींग वाजली कि मला तो मनस्वीचा फोन आहे असेच वाटायचे. काय असेल ते असो त्या पोरीने मला भुरळ पाडली होती हे नक्की. चार पाच दिवस विविध कल्पनात रमण्यात गेले पण फोन काही आला नाही. हळुहळु मग तो विषय मागे पडत गेला. अध्ये मध्ये कधितरी मनस्वी आठवुन जायची पण तेवढ्यापुरतीच. एक दिवशी अचानक सकाळी फोन वाजला. अनक्नोन नंबर असल्याने मी पण बहुदा एयरटेलवाल्यांचा असणार ह्या वैतागानेच 'हॅलो' केले.

"हाय परी" पलिकडून एकदम उत्साहाने खळखळणारा आवाज आला.

"कोण बोलतय?" च्यायला मला परी म्हणुन हाक मारणारी कोण मुलगी आहे ? का मिपावरुन कोणाचा फोन आहे ? मी जरा गोंधळलो.

"अरे मी बोलतीये मनस्वी. विसरलास ?"

"नाही नाही. एकदम नंबर अनोळखी असल्याने गडबडलो होतो. बोला ना.. काय म्हणताय ?"

"मी एकटीच बोलतीये रे. त्यामुळे 'बोल' 'काय म्हणतीयेस' असे म्हणलास तर अजुन ऐकायला बरे वाटेल."

"हा हा हा.. ओक्के ग बोल काय म्हणतेस ?"

"अरे तुला युनीपुणे च्या साईटवरुन एक्स्टर्नल अ‍ॅडमीशनच्या फॉर्मची प्रिंट कशी काढायची माहिती आहे का ? मी आले तिकडे तर काढुन देउ शकशील का ?"

"हो जमेल की, फक्त दुसर्‍या कोणाचा फॉर्म असेल तर त्याचा आयडी आणि पासवर्ड घेउन ये. किंवा PNR नंबर."

"चालेल, मी येते थोड्या वेळात."

तेच लोभसवाणे हास्य चेहर्‍यावर घेउन साधारण चारच्या सुमारास मनस्वी हजर झाली. तीचे काम करुन देत असताना इकडच्या तिकडच्या चार गोष्टी झाल्यावर मनस्वी पटकन म्हणाली "मध्ये मला पण ऑर्कुट, फेसबुकवर बसायची सवय लागली होती. मस्त रंगुन जायचे मी पण. पण भवतेक नशीबत त्याचे सुख जास्ती दिवस न्हवते."

"का ग ? हॅक वगैरे झाले का काय अकाउंट?" मी गमतीने विचारले.

"नाही रे ! काही मित्र मैत्रिणी अ‍ॅड केले होते. खरे तर मित्रच जास्ती होते. काही दिवसांनी स्क्रॅपबुक आणि वॉलवर सरळ माझ्यासाठी रात्रीच्या चौकशा चालु झाल्या. मागचे संदर्भ द्यायला सुरुवात झाली. माझे मनच उडाले. सरळ दोन्ही अकाउंट उडवुन मोकळी झाले. फेक नाव आणि फोटो टाकुन बसणे मला तर कधीच जमणार नाही.

मला काय बोलावे तेच पटकन कळेना. मी नुसताच तिच्याकडे पाहात राहिलो.

"चल रे पळते मी आता. नजर लावशील नाहीतर मला" मनस्वी गंमतीने म्हणाली आणि पैसे चुकते करुन गेली सुद्धा. पुढे काही दिवस ही भेट मला आठवणी काढत राहायला पुरुन उरली. महिन्यानंतर अचानक एक दिवशी मनस्वी एका मैत्रीणीला घेउन कॅफेत हजर.

"मालक आहेत कॅफेचे?"

"या या. अलभ्य लाभ. आज इकडे कशी काय वाट चुकलात ?"

"अर्रे वा रे ! तु कधी मला बोलावलेस का आग्रहानी कॅफेत ? मग आमंत्रणाशीवाय कसे यायचे ? बर ते जाउ दे, हि माझी मैत्रीण सुमित्रा, आणि सुमित्रा हा आमचा परी. तुझ्या फोर्मचे प्रिंट आउटस काढायला ह्यानीच मदत केली होती."

"थॅन्क्स हा. मला जरा हॉस्पीटलची गडबड होती, त्यामुळे काय करावे कळत न्हवते. मनस्वी म्हणाली तुमच्याकडे भवतेक काम होईल. मग तीनेच सगळे जमवले."

थोड्यावेळ गप्पा मारुन दोघी जायला निघाल्या. ह्यावेळी मात्र मी धाडस करायचे ठरवले. "थांबा की जरावेळ अजुन. महत्वाचे काम नाही ना काही ?"

"मला तरी नाहिये, पण सुमीला हॉस्पीटलला जायचे आहे."

"तु थांब की मग, मी जाते. नाहितरी मी रिक्षाने एकटीच जाणार होते." सुमित्रा म्हणाली.

"नको एकटी नको जाउन बाई. परी मी हिला पूना हॉस्पीटलाला सोडून परत येते रे" येवढे वाक्य घाईघाईत पुर्ण करत मनस्वी मैत्रिणीला घेउन बाहेर सुद्धा पडली आणि अर्ध्या तासात पुन्हा कॅफेत हजर सुद्धा झाली."

"काय ग बाहेर बसुयात का ? म्हणजे कस्टमरला त्रास नको. मी खुर्ची घेतो थांब."

"गप्प रे ! मी काया राणी व्हिक्टोरीया आहे का ? बसु की मस्त बाहेर पायर्‍यांवर. "

"मनस्वी, तु आणि मी असे माझ्या कॅफेच्या पायर्‍यांवर बसुन गप्पा वगैरे मारु असे मला कधीच वाटले न्हवते बघ."

"मलापण न्हवते वाटले. मला गप्पा मारायला म्हणुन कोणी कधीच आमंत्रण देत नाही परी." मनस्वी थंडपणे म्हणाली. तिचा तो स्वर मला कुठेतरी आतमध्ये कच्चकन टोचला.

"पण हा रस्ता तुच निवडलास ना ? मग आता तक्रार कसली ?"

"छे रे ! तक्रार नाही. एक आपले फक्त मनात आले ते तुझ्यापाशी बोलले येवढेच. का बोलले माहित नाही. पण काय रे परी, मला पहिल्यांदा बघितल्यावर तुझ्या भावना काय होत्या ?"

"खरे सांगु ? तुला बघायच्या आधीच तुझ्या विषयीची माहिती मला मिळाली होती, त्यानंतर मी मान वळवुन तुझ्याकडे बघितले. पण तु जेंव्हा माझ्या शेजारच्या खुर्चीवर येउन बसलीसना तेंव्हा मला अगदी एखादी इच्छाधारी मांजर वगैरे शेजारी येउन बसल्यासारखे वाटले. तुझे घारे डोळे, छोटी नाक, गोल चेहरा..."

मनस्वी पुन्हा एकदा खळखळुन हसली आणि ह्यावेळी तीने चक्क माझ्या खांद्यावर डोके देखील आपटले. मनस्वी अशी खळखळुन हसलीना की तीचे मोत्यासारखे दात खुप छान दिसायचे.

त्या दिवशी मी आणि मनस्वीनी अगदी दोन तीन तास मनमुराद गप्पा मारल्या. अगदी राज ठाकरे, मराठीच आवड इथपासून ते कधीकाळी एका रात्रीसाठी तिच्या आयुष्यात येउन गेलेल्या नमुन्यांपर्यंत. ह्या भेटीनंतर मनस्वी मला अधिकच भावली, आवडली..आपलीशी वाटली.

मनस्वीला फोन करावा, खुप गप्पा माराव्यात. तिच्याविषयी अधिक जाणुन घ्यावे असे खुप वाटत होते, पण धिर झाला नाही हेच खरे. खरे तर मला उगाच कोणाच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसायला आवडत नाही, आणि कोणी माझ्या आयुष्यात खुपसलेले आवडत नाही. त्यामुळे देखील असेल पण मी पुढे पाऊल टाकले नाही येवढे मात्र खरे. आणि ती जे काही करत होती ते तिच्या मनानी, अक्कल हुषारीने करत होती. त्या विषयी काही बोलायचा, ते योग्य-अयोग्य ठरवयाचा मला काय अधिकार ? आणि मुख्य म्हणजे ती जे काही करत आहे, ते योग्य का अयोग्य हे ठरवायची माझी पात्रता होती का ? कधीतरी मनस्वीच्या बेडरुम मध्ये मी स्वतःला कल्पिले न्हवते का ? मनोरथे रचली न्हवती का ?

पुढच्याच आठवड्यात सकाळी सकाळी मला मनस्वीचा फोन आला. "काय रे कुठे आहेस? आज काय कॅफे उघडायचा नाही का ?"

"अग कॅफेतच निघालोय, एका मित्राकडे दुरुस्ती करत बसलो होतो. आलोच १५/२० मिनिटात."

"लवकर ये माकडा, मी गेली १० मिनिटे तुझ्या कॅफे बाहेर उभी आहे. आता तु येईपर्यंत मी समोर बसते पार्लरमध्ये. ते बिल तु फाड."

थोड्याच वेळात कॅफेत पोचलो तर हि बया मस्तपैकी पाय वगैरे पसरुन पायर्‍यांवर बसलेली. "कसली आळशी लोकं आहात रे तुम्ही ? एक दुकान उघडे नाही तुमच्या सोसायटीतले."

"आता आलोय ना बये ? उघडतो, थांब."

"नाही नाही, थांब जरा. मला एक सांग, तुझा कॅफे एक दिवसासाठी भाड्याने घ्यायचा असेल तर किती खर्च येईल ? आणि मी सिरीयसली विचारते आहे."

"एकदम सगळा कॅफे ? मी ह्या एम. आर. लोकांना वगैरे हवा असेल १२ ते ५ तर सरळ ६ पीसीचे ६००/- रुपये लावुन मोकळा होतो बघ. आता तु आहेस म्हणुन ५००/- दे."

"आणि कॅफेचा मालक पण हवा असेल तर ?"

"तो कॅफे बरोबर फ्री येतो" मी डोळा मरत म्हणालो.

"डन तर मग ! हे पाचशे घे, आणि सायकल लावुन ये. आपल्याला बाहेर जायचे आहे दिवसभरासाठी."

"माझे आई, धंद्याला काडी लावुन तुझ्याबरोबर हिंडु ?"

"कॅफे मी आज भाड्याने घेतला आहे, त्यामुळे तो बंद ठेवावा का चालु हे मी ठरवणार आहे परी. मालकाचे काय करायचे हे पण मीच ठवणार. तेंव्हा सायकल लावुन या आणि चला . तुला माझ्याबरोबर फिरायची लाज नाही ना वाटणार ?"

"मला का लाज वाटावी ? पण तु तुझे बघ, नाहितर उद्या लोक म्हणायचे आजकाल मनस्वीला काही चॉईसच उरला नाहिये."

"अरे आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे परवा. म्हणुन उद्या मिरजला जायचे म्हणतीये. त्यांच्यासाठी काहितरी खरेदी करावीशी वाटली. आणि खरे सांगु का मी आधी सुमीलाच फोन केला होता पण ती येउ शकत नाही म्हणल्यावर मला सगळ्यात आधी तुझीच आठवण झाली, मग सरळ तुझ्याकडे आले."

मी एक समजुतदार स्माईल देउन मोकळा झालो. त्या दिवशी मनस्वी माझ्याबरोबर अगदी मनमुराद भटकली. तिच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलु मला बघायला अनुभवायला मिळाले. परफेक्ट वुमन.. माझ्या दृष्टीने तरी.

रात्रीचे जेवण केल्यावर मनस्वीने मला मोकळे केले. रात्रही बरीच झाली होती त्यामुळे मी सहजपणे 'घरी सोडु का ?' म्हणुन विचारुन गेलो. आणि अचानक मला त्या प्रश्नातला दुसरा अर्थ समजला आणि मी चपापलो. मनस्वी मात्र नेहमीप्रमाणेच हसर्‍या चेहर्‍यानी माझ्याकडे बघायला लागली.

"येतोस सोडायला ? आणि मी थांब म्हणाले तर ?" डोळे मिचकावत मनस्वी विचारत होती.

"थांबीन सुद्धा.. काय सांगता येत नाही."

"आणि काय करणार थांबुन ?"

"खरच माहीत नाही. प्रामाणीकपणे सांगायचे तर स्वतःचीच खात्री नाही. तुला पहिल्यांदा बघितले आणि तुझ्याविषयी कळले त्यानंतर तुझे, खरेतर तुझ्या शरीरीचे मला आकर्षण नक्की वाटत होते. आत्ता देखील वाटते, नाही असे नाही. पण आता कुठेतरी मला शरीरामागची मनस्वी देखील थोडीफार कळाली आहे. आणि मला ती जास्त आवडायला लागली आहे."

"परी साला तु एकदम चालु माणूस आहेस रे ! एखाद दिवशी ह्या अशा तुझ्या गोड वागण्याने तु माझे पाच हजार बूडवणार बघ" येवढे बोलुन मनस्वीचे ते खळखळुन हास्य पुन्हा बाहेर पडले. त्या रात्री मी तीला खरच घरी सोडले. तीने अगदी उत्साहाने फिरुन तीचा फ्लॅट मला दाखवला. बेडरुम दाखवायला ती विसरली आणि 'कुठे आहे' विचारायला मी विसरलो. निघताना मनस्वी मला खाली रिक्षास्टॅंडपर्यंत सोडायल आली. "मनस्वी, मी आज जर थांबतो म्हणालो असतो तर ?"

"परी, तु मध्ये ट्वायलाईटचे परिक्षण लिहिणार होतास ना रे ? काय झाले त्याचे ?" मनस्वीची विषय बदलायची पद्धत नकळत माझ्या चेहर्‍यावर लहानसे हास्य आणुन गेली असावी. काही काही प्रश्न अनुत्तरीत राहिलेलेच कदाचीत जास्त समाधान देउन जातात.

त्यानंतर अध्ये मध्ये मनस्वीचा फोन यायचा आम्ही खुप गप्पा देखील मारायचो, कधीतरी कॅफेत येउन भेटुन देखील जायची. आणि मग एक दिवस अचानक ती गयब झाली. दोन महिने उलटुन गेले तरी फोन नाही, भेट नाही. शेवटी कधी नाही ते मीच तिला फोन लावला. 'नंबर नॉट इन सर्विस' ऐकुन कान तृप्त करुन घेतले. एकदा धिर करुन तीच्या फ्लॅटवर पण चक्कर मारुन आलो पण विशेष काही माहिती मिळाली नाही. फक्त दोन महिन्यांपुर्वी ती अचानक जागा सोडून निघुन गेली येवढेच कळाले.

पुढे अनेक दिवस मनस्वी ह्या एकाच विषायाने माझे दिवसभरातले विचार व्यापलेले असायचे. हळुहळु ते देखील मागे पडत गेले.. धुसर होत गेले. परव अचानक फोन वाजला, अनक्नोन नंबर बघुन मी नेहमीच्याच अनुत्साहाने 'हॅलो' म्हणालो आणि पलिकडून कोणाचे तरी 'म्यॉव' कानावर पडले. "कोण बोलतय ?" मी प्रचंड वैतागुन म्हणालो.

"आता तुला 'म्यॉव' कोण म्हणुन दाखवणार आहे माकडा ? मी बोलतीये इच्छाधारी मांजर" आणि पाठोपाठ तोच खळखळुन हसण्याचा आवाज...मला क्षणभर कानावर विश्वासच बसेना.

"अग कुठे आहेस कुठे बै तु ?"

"बॅक टू पुणे. बर एक सांग आता आईची तब्येत कशी आहे ?"

"अग तुला कसे कळाले ? आईची तब्येत बरी आहे आता. भवतेक दोन-चार दिवसात सोडतील घरी."

"अरे कॅफेवर आले होते, तिथे समजले. बर ऐक मी तुझ्या खात्यात ५०,०००/- भरले आहेत. आणि ते मी माझ्या आईला गरज लागली तर म्हणुन देउन ठेवले आहेत. तु 'ऐसे पाप की कमाई नही चाहिये' वगैरे डायलॉग मारणास नाहीस ह्याची गॅरेंटी आहेच म्हणा. आणि माजोरडेपणाने ते वापरले नाहीस तर तर आई घरी आली की माझ्या पैशात १११/- रुपये अजुन घालुन परत माझ्या खात्यात जमा करुन टाक."

"मनस्वी.. अग हे सगळे कशासाठी ?"

"काय रे परी, तु शेवटी 'द अंग्रेज' वर लिहिलेस का नाही ?"

(समाप्त)


बुधवार, १५ सप्टेंबर, २०१०

द अंग्रेज



परवा गणपाचे हैद्राबादी वाचले आणि सगळ्यात पहिल्यांदा आठवण झाली ती 'द अंग्रेज' ह्या तुफान विनोदी हिंग्लिश चित्रपटाची. 'बॉम्बे बॉईज' वगैरे चित्रपटानी पहिल्यांदा मल्टिप्लेक्स चित्रपटांची लाट आणली, त्याच लाटेतला हा एक नितांत सुंदर विनोदी चित्रपट. चित्रपटाचे अजुन एक वैशीष्ठ्य म्हणजे हिंग्लिश चित्रपट असुनही हा चित्रपट कौटुंबीक करमणुक करणारा आहे. कुठेही अश्लील दृष्यांचा, द्विअर्थी संवाद, शिव्या ह्यांच्या भडिमार नाही. नवा दिग्दर्शक, सर्व चेहरे फ्रेश आणि नविन पण चित्रपटाचा दर्जा नक्कीच उच्च करमणुक करणारा आहे. करमणुकप्रधान चित्रपट म्हणुन ह्याच्याकडे नक्की बोट दाखवता येईल.

चित्रपटाची कथा घडते ती हैद्राबादमध्ये. त्यामुळे टिपिकल हैद्राबादी बोलीचा चित्रपटात पुर्ण वापर झाला आहे. त्यातल्या त्यात सलिम फेकु आणि जहांगीर ह्या दोन नमुन्यांसाठी आणि त्यांच्या हैद्राबादी बोली साठी हा चित्रपट बघितलाच पाहिजे. दोघेही कलाकार तसे तुलनेने नविन असुनही त्यांनी चित्रपटभर हास्याचा नुसता धबधबा उडवुन दिला आहे.


प्रणय आणि रोचक हे दोन NRI भारतात आपल्या मित्राच्या कंपनीत काम करण्यासाठी म्हणुन हजर होतात आणि इथुनच चित्रपटाला सुरुवात होते. हैद्राबादमध्ये त्यांचा लोकल गाईड म्हणुन मिळतो तो त्यांचा ऑफिसचा सहकारी प्रसाद. प्रसाद ह्या दोघांनाही शहर दाखवत असतानाच त्यांची गाठ पडते ते तो ओल्ड सिटी चारमिनार जवळील इस्माईल भाई आणि त्याच्या गँगशी. इस्माईल भाई हा चारमिनारचा सो-कॉल्ड फेमस व्यापारी आणि गँगचा खर्च चालवणारा माणुस. त्याच्या गँगमध्ये जहांगीर, सलिम फेकु, गफुर आणि चौस सारखे नमुने भरलेले असतात. जहांगीर स्वतःला कायम फार मोठा भाई असल्याचे दाखवत असतो तर सलिम फेकुला सतत बोलबच्चन करण्यातुन फुरसत मिळत नसते. जोडीला त्यांचे टिपिकल हैद्राबादी आहेच. ह्या गँगचा दिवसच सकाळी चहाच्या हॉटेलत एकत्र बसुन एकमेकांना थापा ठोकत सुरु होत असतो.



ह्याच हॉटेलात चहा प्यायला आलेल्या रोचक, प्रणय आणि प्रसादची फोटु काढण्यावरुन इस्माईलभाईच्या गँगशी खरखर होते. झटापटीत आपला कॅमेरा परत मिळवायच्या प्रयत्नात रोचकच्या हातुन इस्माईलभाईचा शर्ट फाटतो आणि सगळी गॅंग तिघांच्या मागे लागते. तिघेही पळुन जाण्यात यशस्वी होतात पण इकडे आपली इज्जत पुर्णपणे मातीत गेल्याचे इस्माईलभाई ठरवुन टाकतो. आणी प्रणय आणि रोचकचा म्हणजे इस्माईल गँगच्या भाषेत 'अंग्रेजांचा' बदला घ्यायचा निश्चय सगळे पक्का करतात. ह्यानंतर चालु होतो तो तो अंग्रेजांचा पत्ता मिळवण्याचा आणि बदला घेण्याचा एकेक विनोदी प्लॅन. हे प्लॅन आणि ते प्रत्यक्षात उतरताना होणार्‍या गमती जमती हा भाग चित्रपटातच पाहिला पाहिजे. तो नुसता वर्णन करण्यात गंमत नाही. त्यातल्या त्यात अंग्रेजांच्या बंजारा हिल वरील घराचा पत्ता मिळाल्यावर तिथे जाउन ह्या गँगने त्यांचा शोध घ्यायचा केलेला प्रयत्न म्हणजे कहर आहे.

ह्या कथेला दोन उपकथाकथनांची जोड पण आहे. एक म्हणजे प्रणय आणि रोचकच्या ऑफिसमधीच प्रेमप्रकरणाची आणि दुसरी प्रणयचे घर सांभाळणारा आणि गँगस्टर मामाच्य मदतीने प्रणयचे अपहरण करुन डॉलरमध्ये खंडणी उकळु पाहणार्‍या प्रणयच्या भावाची रमेशची. प्रणय आणि रोचकमध्ये सगळ्यात आधी ऑफिसमधली सौम्याला पटवण्यासाठी होणार्‍या चढाओढीचे चित्रण देखील मस्तच. हि सौम्या म्हणजे एक चालता बोलता बाँबच दिसली आहे. टिपिकल हैद्राबादी तिखट फुड आणि त्याने दोन्ही NRI च्या उडवलेल्या गमती पण झकासच.

सर्व कलाकार नविन असुनही अभिनयात कुठेही कमी पडत नाहीत. मग तो मामा आणि त्याची अर्धवट डोक्याच्या माणसांची गँग असो नाहितर प्रणय, रोचकच्या ऑफिसमधली टिपिकल जुन्या विचारांची आणि NRI तरुण भारतीय मुलींना कसे फसवतात ह्याचीच कायम चर्चा करणारी लक्ष्मी असो. ह्याच चित्रपटाचा पुढचा भाग हैद्राबादी नवाब ह्या नावाने हजर झाला. पण त्या विषयी पुन्हा कधीतरी. सध्या तरी तुम्ही ह्या चित्रपटाचा लुत्फ उठवायला विसरु नका.

ह्या चित्रपटातील काही मजेशीर दॄष्ये गुगल व्हिडिओवर देखील बघता येतील :-

http://video.google.com/videoplay?docid=3836676690364677452#




मंगळवार, ७ सप्टेंबर, २०१०

हॅकर्स अंडरग्राउंड - ४

ऑफिसमधुन बाहेर पडत असतानाच समोरच्या व्हॅनमधुन सुटलेल्या गोळ्यांनी ग्रॅनी आणि बुलडॉगचा वेध घेतला तर माझ्या छातीत आणि हातात चार गोळ्या शिरल्या. स्कॉर्पिअन मागे राहिल्याने तर 'द विच' ऑफिसमध्ये असल्याने ह्यातुन बचावले होते. आता माझा जन्म आणि मृत्युच्या सि-सॉ वरचा खेळ सुरु झाला होता....

हे असले प्रकार मी चित्रपटात अनेकदा बघितले होते, कथा कादंबर्‍यात देखील वाचले होते. पण ते किती तकलादु होते हे जेंव्हा प्रसंग प्रत्यक्ष माझ्या बाबतीत घडला तेंव्हा माझ्या लक्षात आले. नक्की काय घडले आहे किंवा घडत आहे ह्याच अंदाज येईतो हल्लेखोर आपले काम करुन पसार देखील झाले होते.

जेंव्हा शुद्ध आली तेंव्हा मी हॉस्पीटलमध्ये होतो. चित्रपटात दाखवतात तसे आजुबाजुला नर्स वगैरे पण कोण न्हवती. मी तसाच पडून राहिलो, मात्र काही वेळातच एका नर्सचे दर्शन झाले. ति मला शुद्धीवर आलेले बघुन बाहेर धावली, काही वेळातच तिच्याबरोबर दोन डॉक्टरांचे आगमन झाले. माझ्या वेगवेगळ्या तपासण्या करत त्यांची पल्स रेट, वाउंडस अशी मला न कळणारी अगम्य चर्चा चालु होती. काही मिनिटांनी मला एक इंजेक्शन देण्यात आले आणि मला पुन्हा ग्लानी आली.

दुसर्‍यांदा जेंव्हा डोळे उघडले तेंव्हा मात्र मला बरेच तरतरीत वाटत होते. मुख्य म्हणजे स्कॉर्पिअनचे प्रसन्न दर्शन घडले. मला शुद्धीवर आलेले बघुन त्यानी माझा हात हातात घेउन हलकेच थोपटले. पुढचे काही दिवस स्कॉर्पिअन रोजच हजेरी लावत होता. ह्या काळात पोलिस देखील दोन वेळा येउन माझी तपासणी करुन गेले, बरेचसे उलटे सुलटे प्रश्न विचारुन गेले. मात्र मला खरच ह्या संबंधात काही माहिते नसल्याची त्यांची एकुण खात्री पटल्याचे दिसले. मात्र हि खात्री 'पटवली' गेल्याचे मला मागाहुन कळले. दरोडा टाकायच्या हेतुने आलेल्या गुन्हेगारांकडुन चुकीने आमच्या व्हॅनवर व व्हॅनजवळ हजर असलेल्या लोकांवर गोळीबार झाल्याचा रिपोर्ट बनवला गेला.

माझ्या जखमा आता बर्‍याच भरत आलेल्या होत्या. काही दिवसातच मला सुट्टी मिळण्याची चिन्हे दिसायला लागले होती. चार-पाच दिवसात स्वतः 'द विच' येउन मला येउन मला भेटणार असल्याचे स्कॉर्पिअनने मला सांगीतले होतेच, त्यामुळे मी तसा निवांतच होतो. दिवसभर आराम करणे, डॉक्टरांच्या परवानगीने काही काळ लॅपटॉपवरुन आंतरजालावर भ्रमण करणे, टिव्हीची मजा लुटणे असा माझा दिनक्रम चालु होता. एक दिवशी असाच न्युज साईटसवर चक्कर मारत असताना एका बातमीने माझे खास लक्ष वेधुन घेतले. अमेरीकेचा एक उपग्रह निकामी झाला होता आणि कदाचीत हा भरकटलेला उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत शिरण्याची शक्यता निर्माण झाली होती. ह्या विषयावर पत्रकारांशी बोलताना संरक्षण खात्याच्या सचिवांनी "वेळ पडल्यास अवकाशातच हा उपग्रह नष्ट करण्याची अमेरीकेने तयारी केलेली आहे" असे विधान केले होते. हे विधान वाचले आणि माझ्या मेंदुत क्षणार्धात अनेक दिवे पेटले. जर अमेरीका हा उपग्रह अवकाशात नष्ट करु शकत असेल तर ह्याचा अर्थ एकच होतो की अमेरीकेकडे निदान एका ठरावीक अंतरावर का होईना पण कार्य करणारे सॅटेलाईट डिस्ट्रॉयर उपलब्ध आहे. अर्रे मग आम्ही नक्की कुठल्या माहितीसाठी हेरगिरी करत आहोत ??

तसेही शस्त्र, मिसाईल वगैरे संबंधातले माझे ज्ञान फारच तोडके होते. पण जर सॅटेलाईट आकाशातच नष्ट करायचे असेल तर एकमेव उपाय हा सॅटेलाईट डिस्ट्रॉयर वापरणे हाच असणार ह्याबद्दल मला शंकाच न्हवती. पण माझी शंका बोलुन कुणाला दाखवणार ? त्या झालेल्या हल्ल्यानंतर 'द विच' अथवा 'स्कॉर्पिअन' वर किती विश्वास टाकावा ह्याबद्दल मला नक्की अंदाज येत न्हवता. आणि झालेल्या हल्ल्यानंतर हे प्रकरण वाटते तेवढे सोपे नाही ह्याचा मला अंदाज आलेला होता. ज्याअर्थी आमच्यावर अगदी व्यवस्थीत प्लॅनींग करुन हल्ला झाला होता त्याचा अर्थ एकच होता की आमचे मुखवटे आता आमचे संरक्षण करण्यास अपुरे होते. आमची खरी ओळख शत्रुला नक्कीच होती. आणि ह्या सगळ्यातुन सुखरुप बाहेर पडण्याचा एकच मार्ग मला दिसत होता आणि तो म्हणजे ह्या प्रकरणाच्या मुळाशी जाणे.

'द विच' ची भेट होईपर्यंत मी मला शक्य झाली तेवढी मला ह्यासंबंधात हवी असलेली माहिती नेटवरुन गोळा केली. विशेष असे काही हाताला लागले नाही, पण नक्की कुठल्या मार्गाने तपास करावा ह्याचा अंदाज मात्र बांधता आला. २/३ दिवसातच 'द विच' चे आगमन झाले. ह्या सर्वच विषया संबंधित कुठलीही चर्चा हॉस्पिटल मध्ये करणे तिने आणि त्या आधी स्कॉर्पिअनने देखील टाळलेच. मी देखील शहाण्या माणसासारखे इकडचे तिकडचे विषय बोलत राहिलो. दोनच दिवसात मल डिस्चार्ज मिळणार असल्याचे मला 'द विच' कडून कळले. त्यानंतर १५ दिवस मला दिल्लीला राहुन पुढील व्यवस्था होताच आधी अमेरीकेच्य मोंटाना प्रांतात हलवण्यात येणार होते आणि त्यानंतर फ्लोरीडाच्या सुसज्ज इंटरनेट लॅब मध्ये आमचे काम चालु होणार होते. ह्याचाच अर्थ माझ्याकडे फक्त १५/२० दिवसच उरले होते.

दोनच दिवसात हॉस्पीटलचे सर्व सोपस्कार पार पडले. पोलीसांच्या ताब्यात असलेले आमचे पासपोर्टस आठवड्या भरात परत मिळण्याची शक्यता होती. एकुणच दिल्लीला पोचेपर्यंतचे ते चार पाच दिवस फार धावपळीचे गेले. दिल्लीत बस्तान बसेतो अजुन दोन दिवस फुकट गेल्याने मी आजुनच वैतगलो. शेवटी 'ह्या हल्ल्यामागे माफिया होते' असा छानसा बाँब टाकुन माझा निरोप घेउन 'द विच' गेली आणि मी जोमाने माहिती मिळवण्याच्या मागे धावलो. सर्वात आधी चार विमान कंपन्यांच्या साईटस हॅक करुन त्यांची प्रवासी यादी तपासण्यात माझे दोन दिवस खर्ची पडले. पण 'द विच' आणि स्कॉर्पिअन त्यांच्या खर्‍या अथवा खोट्या कोणत्याच पासपोर्टनी कुठे जाउन आल्याची नोंद मला कुठे आढळली नाही. ह्या नंतरचा सर्वात महत्वाचे काम होते ते म्हणजे आम्ही नक्की कुठली माहिती मिळवण्याच्या मागे आहोत ह्याचा शोध घेणे. आणि त्यासाठी मला अमेरीकेच्या संरक्षण खात्याचा सुरक्षित डाटाबेस मध्ये शिरणे आवश्यक होते. कधीकाळी ग्रॅनीने FBI च्या सर्वर्समध्ये शिरताना वापरलेले ज्ञान आता मला कितपत उपयोगी पडेल ह्याचीच मला फिकीर होती.

कुठल्याही डाटाबेसमध्ये शिरण्याबरोबर त्याचा पासवर्ड तुमच्याकडे असणे हि सर्वात आवश्यक गोष्ट. आता हा पासवर्ड अनधिकृतपणे मिळवण्याचे मार्ग म्हणजे एकतर पासवर्ड हॅक करणे किंवा तो क्रॅक करणे. खरेतर हॅकींग असो वा क्रॅकींग दोन्हीचा उद्देश एकच आणि तो म्हणजे गुप्त माहिती मिळवणे. पासवर्ड हॅक अथवा क्रॅक करण्याचे काही महत्वाचे रस्ते आहेत :-

१) फोन करुन संबंधित व्यक्तीला ' मी अमुक तमुक बँकेतुन अथवा तुमच्याच कंपनीच्या आय टी डिपार्टमेंटमधुन बोलत आहे. सध्या आम्ही काही महत्वाचे अपडेटस तुमच्या सिस्टीमवर इंस्टॉल करत आहे पण त्यात थोडी अडचण येत आहे तेंव्हा तुमच्या मदतीची गरज आहे." असे सांगुन त्याच्या फुटकळ माहिती बरोबरच हळूच पासवर्ड काढुन घेणे.

२) फिशींग पेज, बग,कि-लॉगरच्या सह्हायाने पासवर्ड मिळवणे.

३) शोल्डर सर्फिंग :- संबंधीत व्यक्तीच्या खांद्यावरुन तो काय पासवर्ड टाईप करतोय हे पाहणे, अथवा जर तुम्ही किबोर्ड अथवा टायपींग एक्सपर्ट असाल तर कि-स्ट्रोक्स वरुन टाईप होत असलेला पासवर्ड ओळखणे.

४) गेसिंग :- ज्याचा पासवर्ड हॅक करायचा असेल त्याच्या संबंधीत वैयक्तीक माहिती मिळवुन त्याच्या पासवर्डचा अंदाज बांधणे. उदा:- आवडता चित्रपट, मोबाईल नंबर, जन्मतारीख, कुत्र्याचे नाव, मैत्रीणीचे/ मित्राचे नाव इ.

५) डीक्शनरी अ‍ॅटेक :- ह्यात FTP सर्व्हरच्या 'पासवर्ड डाटाबेस' अगेंस्ट डिक्शनरी मध्ये असणारे सर्व उपलब्ध शब्द वापरुन बघायचे. कधीकाळी हि प्रचंड वेळखाउ प्रक्रिया होती पण आता नाही. 'ब्रुटस रिमोट पासवर्ड' सारखी सॉफ्टवेअर्स आता तुमचे काम अधिक हलके बनवु लागली आहेत.

६) ब्रुट फोर्स अ‍ॅटेक :- ह्या मध्ये जगातील सर्व शक्य असलेल्या अक्षरांची आणि अंकाची उलटापालट होत राहते जोवर तुम्हाला योग्य पासवर्ड सापडत नाही तोवर. ह्याचा स्पिड मात्र तुम्ही जे सॉफ्टवेअर वापराल ते आणि संगणकाच्या स्पिडवर अवलंबुन असतो. त्यामुळे ह्याला प्रचंड वेळ द्यावा लागतो.

७) रेनबो टेबल :- ह्यामध्ये अक्षरांची जेव्हढी काँबीनेशन्स उपलब्ध आहेत त्या सगळ्यांच्या हॅश-व्हॅल्युजची एक मोठी लिस्टच तयार असते.

ह्या सगळ्याच्या जोडीला ग्रॅनीचा तिने माझ्याशी शेअर केलेला अनुभव माझ्या पाठिशी होताच. मनोमन ग्रॅनीचे आभार मानत मी माझ्या मोहिमेला सज्ज झालो.


(क्रमशः)


बुधवार, १ सप्टेंबर, २०१०

हॅकर्स अंडरग्राउंड - ३

संध्याकाळच्या सुमाराला आमचा खरेतर आमची चौथी सहकारी हजर झाली आणि तिला बघुन मला धक्काच बसला. गेले १५ वर्षे हॅकर्सच्या विश्वात जिचे नाव आदरानी आणि एक प्रकारच्या दरार्‍यानी घेतले जात असे ती 'ग्रॅनी' आमची सहकारी म्हणुन हजर झाली होती. 'ग्रॅनी' म्हणजे खरच ग्रॅनी होती, तिचे वय साधारण ६० च्या आसपास होते पण वागणे, बोलणे, सर्वांच्यात सहजरीत्या मिसळणे अगदी १८ वर्षाच्या मुलीला लाजवण्यासारखे होते. आल्या आल्याच ग्रॅनीने फ्लॅटचा आणि आमचा ताबा घेउन टाकला. ग्रॅनीशी तासभरच गप्पा मारल्या आम्ही सर्वांनी पण त्यामुळे आम्ही खुपच रिलॅक्स झालो आणि मुख्य म्हणजे 'द विच' ह्या भेटीसाठी अगदी तय्यार झालो.

साधारण आठच्या सुमाराला आम्हाला आमच्या मुंबईतल्या ऑफीसच्या जागेवर नेण्यात आले. टेंशन बर्‍यापैकी उतरलेले असल्याने 'द विच' बरोबरची भेट अगदी मनमोकळी आणि सहजपणे पार पडली. खुप शंका अशा काही न्हवत्याच पण ज्या काही थोड्याफार लहान मोठ्या शंका होत्या त्या तीने सहजपणे सोडवुन दिल्या. मुख्य म्हणजे 'द विच' च्या खालोखाल ग्रॅनीकडे अधिकार देण्यात आले. आणि ह्यापुढे कुठल्याही कामासाठी थेट 'द विच' कडे न जाता ग्रॅनी थ्रु ते काम तिथे जाईल हे ठरले.

साधारण आठवड्याभरातच आम्ही अगदी रुळुन गेलो. मुख्य म्हणजे ग्रॅनी सोबत असल्याने फ्लॅटवरची दारु, धिंगाणे अगदी लिमिटमध्येच होते. ह्या आठवड्याभरात कामाची पुर्ण रुपरेषा ठरवण्यात आली. आमचे पहिले टार्गेट रशियाच्या संरक्षण खात्यातील एका मोठ्या पदावरचा अधिकारी 'कार्पोल' हा होता. ऑपरेशन सॅटेलाईट डिस्ट्रॉयरची माहिती, संशोधनाची ठिकाणे ह्या सर्वांवर देखरेख ठेवणारे जे काही मोजके रशियन अधिकारी होते त्यात कार्पोलचा देखील सहभाग होता. कार्पोल सध्यातरी फक्त ३ महत्वाचे संगणक (स्वतःचा लॅपटॉप, त्याच्या केबीनमधील लॅपटॉप आणि जेथे मुळ संशोधन चालु होते त्या ३ लॅबपैकी एका लॅबमधील ज्युपिटर सर्व्हरला त्याला अ‍ॅसेस होता)हाताळत होता. कार्पोल स्वतःच्या वैयक्तिक वापराच्या लॅपटॉपमध्ये काही महत्वाची माहिती जतन करुन ठेवण्यायेवढा मुर्ख नक्कीच वाटत न्हवता, पण सध्यातरी त्याचा वैयक्तीक लॅपटॉप हे सर्वात सॉफ्ट टार्गेट असल्याने त्याच्यापासूनच सुरुवात करण्याचे आम्ही नक्की केले. ह्या लॅपटॉपसाठीचा बग बनवण्याचे काम स्कॉर्पीअन व माझ्याकडे सोपवण्यात आले तर हा बग इनप्लँट करण्याचे काम ग्रॅनी कडे सोपवण्यात आले. बुलडॉग गरज पडल्यास फिशींग पेज अथवा फेक वेब कॅमची तयारी करत होता. एकुण काय तर आता खेळाला चांगलाच रंग भरायला लागला होता.

२२ दिवस आम्ही अक्षरश: राब राब राबलो, वेळेला एकेक पिझ्झावर दिवस काढले पण शेवटी झोन अर्लाम, इनबिल्ट फारवॉलवाले अँटिव्हायरस ह्या सर्वांच्या तडाख्यातुन सुटणारा कि-लॉगर आम्ही तयार करण्यात यशस्वी झालोच. (कि-लॉगर नक्की कसे काम करतो हे बर्‍याच जणांना ठाउक नसेल, त्याची माहिती इथे मिळु शकेल :- http://en.wikipedia.org/wiki/Keystroke_logging) किबोर्ड हॅक करण्यासाठी जो एक अतिशय साधा कोड खरेतर व्हायरस मी कधीकाळी तयार केला होता त्यात काही चेंजेस करुन आम्हाला हा लॉगर बनवता आला.
Code:
Set wshShell =*******("WScript.Shell")
do
wscript.sleep 100
wshshell.sendkeys "You are a fool."
****
हा कोड .VBS फाईल म्हणुन सेव्ह करुन एकदा एखाद्या संगणकावर लोड केला की तुम्ही कि-बोर्ड वरच्या कुठल्याही किज दाबल्यात तरी "You are a fool" हेच वाक्य उमटत जाते.
(हा कोड पुर्ण नसून महत्वाच्या ठिकाणच्या कमांडसच्या जागी **** चा वापर केलेला आहे, तरी उगाच वापरुन बघायचा प्रयत्न करु नये)

आम्ही आमचे काम पुर्ण केले होते, आता पुढचे लक्ष्य ग्रॅनी आणि द विच ला साधायचे होते. कार्पोलची संपुर्ण माहिती आमच्याकडे येउन पोचलीच होती. डेटिंग साईटसला सतत भेट देण्याची त्याची सवय हि आमच्यासाठी सुवर्णसंधी आहे हे आमच्या लक्षात आलेले होतेच. त्याच्या ह्याच सवयीचा फायदा उचलायचे आम्ही ठरवले आणि पुढच्या तयारीला लागलो. सगळ्यात आधी डेटिंग साईटवर रोझी ह्या मुलीच्या नावाने एक प्रोफाईल बनवण्यात आले. बुलडॉगनी फेक वेबकॅम तयार ठेवले होतेच आणि गरज लागली तर ह्या महाभागानी डेटिंग साईटचे फिशिंग पेज देखील बनवुन ठेवलेले होतेच. अगदीच गरज लागली आणि कार्पोलला फोन करुन भुलवावे लागले तर त्या तयारीसाठी म्हणुन कॉलींग-कार्डस देखील हजर झाली होती. आता फक्त मासा गळाला लागायची वाट बघत आम्ही गळ टाकुन बसलो होतो.

आम्हाला फार दिवस वाट पहावी लागली नाही, बरोब्बर सहाव्या दिवशी म्हणजे शनीवारी कार्पोल साहेबांनी रोझीच्या प्रोफाईलला व्हिजिट दिली आणि रविवारी दुपारी लाईव्ह वेबकॅमचा अ‍ॅसेस मागण्यासाठी पिंग केले. आता खर्‍या खेळाला सुरुवात झाली होती. कुठलिही शंका कार्पोलला न येउ देता हा खेळ रंगवायला लागणार होता. आपण संरक्षण खात्यातील एका हुषार अधिकार्‍याबरोबर भिडत आहोत हे लक्षात ठेवावे लागणारच होते. पहिल्या दिवशी थोडेफार कॅम बघणे आणि हाय-हॅलो मध्ये उरकले. दोन दिवसांनी कार्पोल साहेब पुन्हा ऑनलाईन अवतिर्ण झाले. ह्या वेळी मात्र गाडी आवडी-निवडी, साथीदार, सेक्स इत्यादीपर्यंत पुढे गेली. थोडेफार फ्लर्टिंग देखील करुन झाले. चारच दिवसात कार्पोल साहेबांनी रोझीकडे तिचे 'तसले' फोटो आहेत का ह्याची विचारणा केली आणि हो-नाही करत रोझीने आपला फोटो मेसेंजर-थ्रु कार्पोलला पाठवला. कार्पोलने अँटिव्हायरसचा ग्रीन सिग्नल मिळताच फोटो डाउनलोड केला आणि... संपला कार्पोलचा खेळ संपला.

हा फोटो म्हणजे खरेतर आम्ही तयार केलेला बग होता जो .jpeg एक्स्टेंशन मध्ये सेव्ह केलेला होता. हा बग तुम्ही फोटो म्हणुन डाउनलोड करुन घेतल्याबरोब्बर तुम्ही मेसेंजरवरुन डिसकनेक्ट होता. पुन्हा जेंव्हा तुम्ही रि लॉग-ईन होता तेंव्हा तुम्ही टाईप केलेला पासवर्ड हळूच आमच्या सर्व्हरच्या paasword.txt मध्ये येउन जमा होतो. याहु वरुन फोटो न आल्याने मग कार्पोलने AOL / MSN सुद्धा ट्राय केले आणि आमची चांदीच झाली. आनंदाचा बहर ओसरताच ग्रॅनीने 'द विच' ला काँटेक्ट केले. ताबडतोब तिथे येण्यासाठी निघत असल्याचे सांगत 'द विच' ने फोन ठेवुन दिला. आमच्या इतक्या दिवसाच्या परिश्रमाला आज यश आले होते. आज ग्रॅनीने स्वतः पुढे होउन सर्वांना फ्रिजमधले बिअरचे टिन वाटले. आम्ही सर्वजण सळसळत्या उत्साहात 'द विच' ची वाट बघु लागलो...

'द विच' आली तिच मुळी पडलेला चेहरा घेउन, तिच्या चेहर्‍यावर प्रचंड टेंशन आहे हे दुरुन देखील जाणवत होते. तीने आल्या आल्याच आम्हाला धक्का दिला. हॅकर्स अंडरग्राउंडच्या मेन ऑफीसमधील ४ संगणक कोणीतरी हॅक करुन आतली सगळी माहिती पळवली होती. मी आणि स्कॉर्पिअननी लंपास केलेले पैसे सुद्धा खात्यातुन दुसरीकडे वळवण्यात आले होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आमच्या प्लॅनशी संबंधीत माहिती देखील नष्ट करण्यात आली होती. आता घाई करणे महत्वाचे होते. आम्ही ताबडतोब कर्पोलच्या सर्व इ-मेल खात्यांमध्ये शिरण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली. मात्र आमच्यासाठी जबरदस्त धक्का म्हणजे आमच्याकडे येउन पोचलेल्या पासवर्डपैकी फक्त एक पासवर्ड बरोबर ठरला, पण त्या खात्यात देखील कार्पोलला डेटिंग साईटस वरुन आलेल्या अपडेट इ-मेल्स शिवाय काही हाताला लागले नाही. आम्ही सारेच सुन्न झालो. काय बोलावे हेच सुचेनासे झाले. अहोरात्र केलेल्या कष्टांवर एका क्षणात पाणी पडले होते.

"आपल्यामध्ये कोणीतरी एक बास्टर्ड हॅकर्स पॅरेडाइजसाठी काम करणारा डबल एजंट आहे" ग्रॅनी ताडकन बोलली. मान डोलवण्याशीवाय इतर कोणीच काही करु शकले नाही. सगळेच एकमेकांकडे संशयी डोळ्यांनी बघायला लागले.

"पण ग्रॅनी, हेड ऑफिसमधला देखील कोणी एक फितुर असु शकतो ना? आपले रोजचे अपडेटस आपण लहान मोठ्या माहितीसह तिथे जमा करत होतो !" मी माझी शंका बोलुन दाखवली. ह्यापुढे कुठलीच माहिती सुरक्षीत नाही, फार जपुन पावले टाकावी लागणार आहेत हे आमच्या लक्षात आले.

ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लागेपर्यंत फ्लॅट मधुन बाहेर न पडणे आणि आपापले सेलफोन्स ऑफिस जमा करणे ह्या सुचनांचे पालन करत आम्ही ऑफिस मधुन बाहेर पडलो. ह्यापुढे कुठलीच माहिती सुरक्षीत नाही हे आमच्या मेंदूत शिरले होतेच मात्र माहिती प्रमाणेच मुखवट्याआडुन बाहेर आलेले हॅकर्स देखील सुरक्षीत नाहीत हे आमच्या लक्षात यायला फार उशीर झाला होता. ऑफिसमधुन बाहेर पडत असतानाच समोरच्या व्हॅनमधुन सुटलेल्या गोळ्यांनी ग्रॅनी आणि बुलडॉगचा वेध घेतला तर माझ्या छातीत आणि हातात चार गोळ्या शिरल्या. स्कॉर्पिअन मागे राहिल्याने तर 'द विच' ऑफिसमध्ये असल्याने ह्यातुन बचावले होते. आता माझा जन्म आणि मृत्युच्या सि-सॉ वरचा खेळ सुरु झाला होता....

(क्रमशः)