रविवार, १ ऑक्टोबर, २०१७

सुत्रबध्द

जयराज तसा गावातला एक तालेवार आणि मातब्बर असामी. जमीन, जुमला तर बापजाद्यांपासून चालत आलेला होताच; पण स्वत:च्या कष्टाने देखील जयराजने त्यात प्रचंड भर घातलेली होती. उपसरपंच पद, डेअरी आणि कारखान्याच्या संचालक मंडळावरती हजेरी असा कोणाचीही दृष्ट लागेल असाच त्याचा प्रवास सुरू होता. लग्न वगैरेच्या भानगडीत जयराज चाळीशी आली तरी पडलेला नव्हता. घरी लहान भाऊ राजाराम सोडला तर तर असे कोणी नातेवाईक देखील नव्हते. राजाराम तर भावाच्या नुसत्या गाडीच्या आवाजाने देखील चळचळा कापणार. दारूचे व्यसन नव्हते पण पीत नव्हता असेही नाही. पण प्रचंड पैसा आणि मरातब बरोबर हातात हात घालून जी व्यसने येतात त्या पासून मात्र तो कटाक्षाने दूरच होता. नाही म्हणायला जयराजला एक विलक्षण छंद होता; जगभरातल्या विचित्र वस्तू गोळा करण्याचा. विशेषत: जुनी हस्तलिखिते, पोथ्या, जादूचे सामान, दिवे, मुरत्या आण काय काय... जादू, काळी दुनिया ह्याचे त्याला लहानपणापासूनच एक सुप्त आकर्षण होते.

तालुक्याची जत्रा हे तर जयराजचे प्रमुख आकर्षण असायचे. पलीकडच्या रानातून विविध मणी, शंख, चित्र विचित्र हत्यारे, मुखवटे, कसल्या कसल्या बरण्या, कागदावरची-कापडावरची पुरातन नक्षी विकायला घेऊन येणार्या भिल्लांची तो चातकाप्रमाणे वाट बघत असायचा. ह्या वस्तूंचे मूल्य काय, त्यांचा उगम इत्यादीचा भले जयराजचा अभ्यास शून्य असेल पण आकर्षण मात्र वेड म्हणावे इतके होते. कधी कधी तर कवडीमोलाच्या वस्तू हे भिल्ल त्याला अव्वाच्या सव्वा भावात देऊन जायचे, मात्र जयराजला त्याची खंत ना खेद. त्याच्या ह्या वेडाची गावत देखील कायम चर्चा रंगत असे. अर्थात हे वेड जोवर वैयक्तिक होते आणि गावाला त्यातून इजा नव्हती तोवर गावाला देखील त्याची काळजी करण्याचे कारण नव्हते.

 जयराज जत्रेत शिरला आणि सरळ भिल्लांच्या तंबूकडे निघाला. नेहमीचेच चेहरे न्याहाळत बसण्यापेक्षा त्याने सरळ त्यांनी आणलेल्या वस्तूंकडे मोर्चा वळवला. नेहमीचेच खापराचे तुकडे, फुटक्या मूर्ती, हाडं आणि मणी. मात्र जयराज येताच भिल्लांच्या समूहात झालेली चुळबूळ आणि कानगप्पा त्याच्या नजरेतून सुटल्या नव्हत्या. त्याने भेदकपणे मांगीकडे रोखून पहिले आणि मांगी सटपटला. जयराजची नजर चुकवत तो चुळबुळू लागला. शेवटी हो नाही करत त्याने चार दिवसांपूर्वी अंगाराला जंगलात सापडलेल्या विचित्र दगडाची आणि त्यावरच्या अक्षरांची माहिती दिली आणि जयराज सरळ भिल्ल वस्तीकडे धावला.

काहीशा घाईघाईतच जयराज भिल्ल वस्तीत पोचला. कशीतरी बुलेट स्टॅन्डला लावत तो अंगाराच्या खोपटाकडे धावला. धाडकन गवती पाल बाजूला करत तो आता शिरला आणि एकदम थबकलाच. अंगारा शांतपणे गुढघे पोटाशी घेऊन एका विचित्र आकाराच्या शीळेकडे एकटक पाहत बसला होता. अंगारा इतका गुंगला होता, की आजूबाजूच्या जगाचे त्याला काही भानच उरले नव्हते. सगळ्यात आधी जयराजने काय केले असेल तर त्या दगडावरती शेजारची फाटकी चादर टाकली आणि अंगाराला भानावरती आणले. दोन तांबे पाणी प्यायल्यावरती आणि थोडे आजूबाजूचे भान आल्यावरती त्याला अंगाराकडून जे काही कळले ते विस्मयचकित करणारे होते.

औषधी मुळ्या आणि पाला शोधता शोधता अंगारा ह्यावेळी जरा जास्तीच खोल जंगलात शिरला होता. पर्वताच्या ह्या बाजूला तो पहिल्यांदाच आला होता. निर्मनुष्य अशा त्या भागात काहीतरी खोदण्याचा आवाज आला आणि अंगारा आश्चर्याने तिकडे धावला. दाट झाडी बाजूला करत जेव्हा तो आत शिरला तेव्हा त्याने जे काही पाहिले ते अविश्वसनीयच होते. दहा बारा फुटाचा आणि धड मनुष्य नाही धड प्राणी नाही असा एकजण त्या विचित्र आकाराच्या दगडाला खोदून बाहेर काढत होता. त्या प्राण्याला अचानक भवतेक कोणीतरी आजूबाजूला असल्याची जाणीव झाली आणि क्षणात त्याने स्वत:ला आक्रसून घेतले आणि एखाद्या तान्ह्या बळाचा आकार घेत तो त्या दगडातच लुप्त झाला. समोरचे दृश्य बघून क्षणभर अंगाराला भोवळच आली. रानावनात वाढलेला आणि नाही नाही त्या संकटांना सामोरा गेलेला अंगारा देखील ह्या प्रसंगाने चांगलाच घाबरला होता. भानावरती आल्यावर मात्र त्याला त्या विचित्र दगडाचे महत्त्व जाणवले आणि तो त्या दगडाला बाहेर काढून खोपटात घेऊन आला.

दगड त्याने आणला खरा, मात्र तो आणल्यापासून वस्तीतले वातावरणच बदलले होते. दोन दिवसांपासून वस्तीतली सगळी कुत्री अचानक नाहीशी झाली होती. गेल्या चार दिवसात वस्तीतल्या अनेकांना चित्र विचित्र अनुभवांना सामोरे जायला लागले होते. गज्याच्या म्हातार्याला अचानक जिकडे तिकडे साप दिसायला लागले होते, तर वेण्णाकाला सतत कोणी एक बुटका मनुष्य वस्तीत जिकडे तिकडे हिंडताना दिसायला लागला होता. अंगाराला तर जणू त्या दगडाचे वेडच लागले होते. काम धामं सोडून तो सतत त्या दगडाकडेच पाहत बसलेला असायचा. एकुणातच वस्तीतले वातावरण काहीसे भयग्रस्त झाले होते खरे.

अंगाराची कशी तरी समजूत घालून जयराज तो दगड घेऊन निघाला. दगड वस्तीबाहेर जातोय म्हणाल्यावर वस्तीतल्या जाणत्यांनी पण जयराजची बाजू घेत अंगाराला चार गोष्टी समजावल्या. जयराज घरी पोचला आणि बराच वेळ दाबून धरलेली उत्कंठा बाहेर पडली. स्वत:च्या बनवलेल्या छोट्याश्या संग्रहालयात जयराजने तो दगड आणून ठेवला आणि त्यावरची ती फाटकी चादर बाजूला केली. अंगाराची अवस्था आणि त्यानंतरची धावपळ ह्यामध्ये त्याला दगडाचे नीट निरीक्षणच करता आले नव्हते. जयराजने अत्यंत हळुवारपणे त्या दगडावरची माती साफ करायला सुरुवात केली. दगड तसा आकाराने थोडा विचित्रच होता; पण ह्या दगडात कोणी माणूस (?) गडप झाला असेल हे विश्वास बसायला थोडेसे अवघडच होते. दगडाला कधीतरी घडीव कामासाठी उपयोगात आणल्यासारखे जाणवत होते. काही विचित्र नक्षी, अक्षरे मानव सदृश भासणार्या दोन चार आकृत्या त्यावरती चितारल्या होत्या. सर्वांचाच आकार काहीसा बेढब आणि भेसूर जाणवत होता. बर्याच वेळ निरीक्षण करून झाल्यावरती जयराजने पुन्हा तीच जुनी चादर त्यावरती झाकली आणि खोलीबाहेर पडला.

पुढचे दोन तीन दिवस फारच गडबडीत गेले. पतसंस्थेच्या निवडणुकांची धामधूम सुरू झाली होती. कामातून थोडा मोकळा वेळ मिळाला आणि जयराजने आज खूप दिवसांनी शांतपणे अंथरुणाला पाठ टेकली. मध्यरात्रीच्या सुमाराला अचानक जयराजला जाग आली. संपूर्ण अंग घामाने भिजले होते. खोली देखील तापल्यासारखी वाटत होती, बहुदा वीज गेली होती. पण आपल्याला जाग काहीतरी वेगळ्याचा कारणाने आली असावी असे त्याला राहून राहून वाटत होते. तेवढ्यात त्याला पलीकडच्या खोलीत खुडबूड ऐकायला आली आणि तो सावध झाला. शेजारच्या ड्रॉवरमधली बॅटरी काढून तो बाहेर पडला. आवाज नक्कीच त्याच्या त्या संग्रहालयातल्या खोलीतून येत होता. सावध पावले टाकत जयराज खोलीकडे निघाला. आत जो कोणी असेल, मग तो चोर असेल वा अजून कोणी त्याला बहुदा जयराजची चाहूल लागली नसावी. तो आपल्या कामात दंगच होता. जयराज सावकाशपणे दाराजवळ पोचला आणि एका झटक्यात त्याने दाराला धक्का दिला. विजेरीचा प्रकाश आतमध्ये सर्वत्र भिरभिरला आणि जयराजला आपण जे बघितले ते खरे होते का आभास हेच लक्षात येईना. बॅटरीच्या प्रकाशात त्याला एक अत्यंत छोटी आकृती घाईघाईने टेबलवरून खाली पडलेल्या दगडाकडे पळताना दिसली आणि त्याचक्षणी दचकून त्याच्या हातातली बॅटरी खाली पडली आणि बंद झाली.

स्वत:ला सावरायला जयराजला काही क्षण लागले. दरवाज्याचा आधार घेत तो काही क्षण तसाच डोळे बंद करून उभा राहिला आणि घडलेल्या प्रसंगाचे आकलन करायला लागला. जयराजने बर्याच अद्भुत गोष्टी अनेकदा वाचल्या होत्या, कधी ऐकल्या होत्या पण हा स्वानुभव मात्र भयचकित करणारा होता. जयराजचे सगळे अंग घामाने पुन्हा एकदा थबथबले आणि त्याने कसातरी भिंतीचा आधार घेत आपली खोली गाठली. सकाळपर्यंतचा वेळ त्याने कसा काढला ते त्याचे त्यालाच माहीत. सकाळ झाल्या झाल्या त्याने संग्रहालयाची खोली गाठली आणि पुन्हा एकदा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. रात्री टेबलाखालती असलेला दगड आता पुन्हा टेबलावरती व्यवस्थित ठेवलेला होता. घरात जयराज आणि नोकर सदा शिवाय कोणीच असायचे नाही. राजाराम तर सतत मळ्यावरच. जयराजची सक्त ताकीद असल्याने नोकर-चाकर तर काय राजारामची देखील ह्या खोलीकडे फिरकायची हिंमत होणे शक्यच नव्हते. मग आपण काल बघितले ते काय? ते खरंच सत्य होते, का आपल्याला पडलेले स्वप्न?

रात्रीच्या अनुभवानंतर जयराजचे लक्षच थार्यावरती नव्हते. तशाच अवस्थेत तो बाहेर दिवाणखान्यात येऊन बसला. सवयीने सदा चहाचा पेला घेऊन आला, मात्र जयराजचे त्याच्याकडे लक्षच नव्हते. शेवटी सदाने दोन वेळा आवाज दिला तसा तो भानावरती आला. चहाचा पेला देऊन सदा नेहमीसारखा माघारी न जाता तिथेच उभा राहिलेला पाहून जयराजने प्रश्नार्थक चेहर्याने त्याच्याकडे पाहिले. बोलावे का न बोलावे असा विचार करत शेवटी सदाने धाडस केलेच.

"दादा, मी अडाणी माणूस.. पण चांगले काय वाईट काय ह्यातले थोडेसे मला देखील कळते. दादा, तो दगड....तो दगड परत देऊन टाका दादा. तो दगड आपल्या घरात नको. घरातच काय तो दगड कोणालाच मिळणार नाही असा नाहीसा करायला हवा. तो दगड वाईट शक्तींनी भारलाय दादा...फार वाईट!'

सदाच्या बोलण्याने जयराज चमकलाच. म्हणजे काल त्याने जे काही अनुभवले, त्याच प्रकारातला काही अनुभव सदाला देखील आला होता हे नक्की. जयराजने त्याला धीर देत समजावले आणि नीट चौकशी केली. निवडणूकीच्या धामधुमीत जयराजला बंगल्यावरती यायला वेळ मिळालाच नव्हता. कधी डाकबंगला तर कधी फार्महाउस. जोडीला सगळी व्यवस्था बघायला राजाराम असायचाच. अशावेळी सदा एकटाच घरात होता. पहिल्या दिवशी विशेष असे काहीच घडले नाही, मात्र पुढच्या दोन रात्री सदासाठी फारच भितीदायक होत्या. रात्री बारानंतर जाणवणारी कुजबूज, काहीतरी खणल्यासारखे येणारे आवाज, सतत आजूबाजूला कोणीतरी वावरतंय असा होणारा आभास आणि ती विचीत्र बुटकी आकृती..

सदा तसा भरवशाचा होता, बाहेर त्याने अवाक्षर काढले नाही; पण गावात मात्र कुजबूज वाढायला लागली होती. सदा आणि जयराजला दिसलेली आकृती गावातल्या एक दोघांना देखील रात्रीची जयराजच्या बंगल्याभोवती वावरताना दिसली होती. जयराजने भिल्ल वस्तीतून आणलेल्या दगडाची बातमी गावात पोचलीच होती, त्यात ही नवी भर पडली. आता मात्र ह्या गोष्टीचा काय तो सोक्ष मोक्ष लावायचाच असा जयराजने निश्चय केला. तालमीतल्या दोन मित्रांना घेऊन त्याने दोन ते तीन रात्री निव्वळ त्या दगडाच्या खोलीत अंधारात घालवल्या. घडले काहीच नाही, मात्र गावात जयराजच्या वेडाची चर्चा मात्र नव्याने रंगायला लागली. 'जयराज झपाटलाय' असे शपथेवर सांगत गावातले म्हातारे फिरू लागले……

सकाळी गावात सूर्य उगवला तो जयराजच्या मृत्यूची बातमी घेऊनच. हातातली कामे टाकून लोकांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. पोलिस आधीच दाखल झाले होते. सदा रडत रडत माहिती देत होता, तर एका कोपर्यात राजाराम सुन्न बसून राहिला होता. रात्रीच्या कोणत्यातरी एका क्षणी जयराजने त्या दगडाच्या खोलीतच स्वत:च्या डोक्यात गोळी मारून घेतली होती. पंचनामा, जबान्या सगळे सोपस्कार उरकले. जयराजच्या आत्महत्येची बातमी चांगलीच गाजली. अती ताण म्हणा किंवा वेडाच्या भरात म्हणा जयराजने स्वत:ला गोळी मारून घेतली होती. दरवाजा आतून बंद होता आणि बंदुकीवरती देखील त्याच्याच बोटाचे ठसे सापडल्याने एकुणात पोलिसांना देखील तपासात फार कष्ट घ्यावे लागले नाहीत. जयराजच्या घरातला दगड पोलिसांनी जप्त करून पुढील तपासणीसाठी शहरात पाठवला आणि गावाने निःश्वास टाकला.

आठवड्याभरात गावातले वातावरण हळूहळू निवळू लागले. जयराजच्या जागी सन्मानाने त्याच्या सर्वच पदांवरती राजारामला बसवायचे आमदार साहेबांनी बोलावलेल्या बैठकीत ठरले. गावाने देखील हीच जयराजला खरी श्रद्धांजली असेल असे मानले. एकदा तेरावा उरकला की राजारामची गाठ घेऊन वडिलधारी मंडळी त्याच्याशी बोलतील असे ठरले आणि गावासाठी जयराजचा विषय बाजूला पडला. जयराजची सर्व कार्ये उरकली. घरात जमलेले पै पाहुणे देखील आपापल्या घराकडे परतले. त्या मोकळ्या घरात राजारामला श्वास देखील जड वाटू लागला. शेवटी सदाला सांगून तो मळ्यांतल्या घराकडे झोपायला गेला. तसेही तिकडे जाणे आज गरजेचे होते. भिल्ल वस्तीवरच्या मित्रांना विशेषत: अंगाराला हिरव्या नोटांचे भरभरून आभार जे भेट करायचे होते. आणि हो, तालुक्यात नवीन आलेल्या सर्कशीचा जोकर, टू बाय टू.. त्याला विसरून कसे चालेल?

(समाप्त)

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा