बुधवार, ११ ऑक्टोबर, २०१७

सहज

इन्सपेक्टर ध्रुव नाईकनवरे केबिनमध्ये शिरला आणि कमिशनर साहेबांच्या चेहर्‍यावरचा ताण थोडा हलका झाला. गेल्या तीन महिन्यात जवळ जवळ अकरा अपहरणांनी शहर हादरले होते. आधी ह्या केस कोणी नवीन अपहरण करणारी टोळी शहरात कार्यरत झाली आहे ह्या गृहीतावरच तपासल्या जात होत्या, मात्र दोनच दिवसांपूर्वी अपहरण झालेल्या मिसेस रसिका शहांचे प्रेत मिळाले आणि सगळे चित्रच बदलून गेले. सर्वच बाजूंनी पोलीसदलावरती प्रचंड दबाव वाढला आणि कमिशनर साहेबांना ठोस पावले उचलणे भाग पडले. त्यांनी पहिले काम केले असेल तर ते म्हणजे ध्रुवची ह्या केसेसवरती नेमणूक करून टाकली. वर्षभरापूर्वीच भरती झालेला हा उमदा तरुण त्यांच्या विशेष मर्जीतला होता. ध्रुवच्या वडिलांनी देखील सब इन्स्पेक्टर पदावर असताना खात्याचा विशेष दबदबा तयार केला होता. आता ते निवृत्त झाले असले तरी अपहरण, खंडणी अशा केसेसचे ते तज्ज्ञ ऑफिसर समजले जायचे.

"ध्रुव तुझ्या मागच्या केसेसमध्ये तू अतिशय उत्तम कामगिरी पाडली आहेस, त्यामुळे मी तुला ह्या केसेसवरती विशेष नेमले आहे. तुला ह्या शहराची चांगली माहिती आहे, इथेच लहानाचा मोठा झालायस तू. इथल्या गुन्हेगारांची, गुन्हेगारीची तुला चांगली माहिती आहे. मला खात्री आहे तू लवकरच मला काही चांगली बातमी देशील."

"ह्या विश्वासाबद्दल मनापासून आभारी आहे सर. सर, दोन दिवसांपासून मी ह्या पाची अपहरणाच्या केस चांगल्याच स्टडी केल्या आहेत. ह्या खुनाची केस देखील मी बारकाईने हाताळतो आहेच. मी माझे काही खबरी कामाला लावले आहेत आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती फारच गोंधळात टाकणारी आहे सर." प्रतिसाद म्हणून कमिशनर साहेबांनी फक्त एक हुंकार काढला.

"सर अपहरणाचे अकरा नाही तर तेवीस गुन्हे घडलेले आहेत." 

"ध्रुव?? तू काय बोलतोयस तुला कळतंय का?"

 "अगदी व्यवस्थित सर! सर, ह्यातले बारा गुन्हे नोंदवलेच गेले नाहीयेत कारण त्याची तक्रार द्यायलाच कोणी आलेले नाही. ह्या अपहरणांमागे जो कोणी आहे, तो अतिशय हुशार आणि मानवी मनाचा चांगला अभ्यास करणारा आहे. ह्या तेवीस अपहरणांकडे आपण जर नीट पाहिलेत, तर अपहरण झालेले सर्वच हे एकतर कोट्यधीश, लक्षाधीश आहेत किंवा तशा कुटुंबातले सदस्य आहेत. अगदी पाच पाच कोटीची रक्कम देखील द्यायची ज्यांची ऐपत आहे, अशा लोकांना देखील तीस लाख-चाळीस लाख अशा किरकोळ पैशांच्या मोबदल्यात सोडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे बर्‍याच जणांनी 'जीव वाचला हेच खूप' असा विचार करत पोलिसात जाणेच टाळले."

 "आणि तक्रार नोंदवणार्‍यांचे काय ध्रुव?"

 "सर एकतर त्यांचा कायद्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि झालेल्या अन्यायाची दाद मागण्याची वृत्ती आहे. त्यामुळे पैसे जास्ती मोजावे लागतायत का कमी ह्याची पर्वा न करता त्यांनी पोलिसात तक्रारी दाखल केल्या आहेत. तक्रारी दाखल झाल्यावरती ह्यातल्या सर्व अपहरण झालेल्या नातेवाइकांना सोडून देण्यात आले आहे. एकाने पुन्हा आलेल्या धमकीला घाबरून पैसे देऊन मुलीची सुटका करून घेतली आहे आणि शेवटची केस अर्थात महत्त्वाची.. मिसेस रसिका शहा ह्यांचा मात्र खून करण्यात आला आहे."

ध्रुवचा एकूणच झपाटा, त्याने ज्या वेगाने ह्या केसला हाताळायला सुरुवात केली आहे ते पाहून कमिशनर साहेब बेहद्द खूश झाले. ज्या विश्वासाने त्यांनी ध्रुवला ह्या केसेसवर नेमले होते तो नक्कीच त्या विश्वासाला खरा उतरणार होता. "पुढे काय करायचा विचार आहे आता तुझा?"

"सर, खात्याकडून सुरक्षिततेच्या सूचना महत्त्वाच्या लोकांना दिल्या गेल्या आहेतच, गस्त देखील वाढवण्यात आली आहे. शाळांवरती विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर आपल्या खात्याला कायमच मदत करणारे गुन्हेगारी मानसशास्त्राचे अभ्यासक डॉक्टर करमरकरांची देखील मदत घ्यायला सुरुवात करतो आहेच."

"वाह! सुरेख. ध्रुव, तुझी जर हरकत नसेल तर तुझ्या वडलांचा देखील सल्ला जरूर घे. मी तर म्हणजे आपण त्यांना ऑफिशियलीच ह्या केसेसवरती मदतीसाठी खात्यातर्फे विचारणा करू."
--------


"मे आय..."

"ओ हो हो!! या या नाईकनवरे. निवृत्त झालात तरी आम्ही काय तुम्हाला असे तसे सोडणार नाही. तुमचे मार्गदर्शन खात्याला हवेच हवे!"

"साहेब, मी तर कायमच त्यासाठी तयार आहे. कालच ध्रुवनी मला तुमच्या प्रस्तावा विषयी सांगितले. मग मीच त्याला म्हणालो, येवढे सगळे कशाला? मीच येऊन सरळ भेटतो कमिशनर साहेबांना."

"त्यासाठी तुमचे विशेष आभार नाईकनवरे. काय घेणार? चहा.. कॉफी? घेता घेताच चर्चा करू."

चहा आला आणि निवृत्त सबइन्सपेक्टर केशव नाईकनवरेंनी बोलायला सुरुवात केली. "साहेब, ध्रुवनी मला ह्या सर्वच केसेसच्या डिटेल्स दिल्या, त्या मी अभ्यासल्या. पेपरमध्ये येणार्‍या बातम्यांमधून देखील मी काही अडाखे बांधलेले आहेतच. मला वाटते आहे, की ही संघटित टोळी नसावी. कोणी एखादा माणूसच भाडोत्री गुंड वेळोवेळी राबवून हे काम करून घेत असावा. माणूस मोठा बुद्धिवान आहे हे नक्की! त्याची भूक देखील फार नाही. तो कोंबडीपेक्षा सोन्याचे अंडे महत्त्वाचे हे जाणून आहे."

"एखादा जुना अपराधी? किंवा एखाद्या राजकीय आशीर्वादाने हे चालले असेल?''

"नाही साहेब, मला नाही तसे वाटत. हा माणूस सावध आहे आणि शक्यतो एकट्याच्या जबाबदारीवरती काम करणारा आहे. त्याने लोकांची रक्कम बेकायदा लुबाडली आहे; पण ती पण अशा पद्धतीने की बरेचसे लोकं तक्रार करायला देखील प्रवृत्त झाले नाहीत. उलट जे लुबाडले गेले तेच त्याच्या विषयी चांगले मत नोंदवत आहेत. ह्या लोकांना अपहरण झाल्यावरती देखील चांगुलपणाने वागवले गेले. जेवणाची, तब्येतीची काळजी घेतली गेली. नेहरू रोड सोसायटीतून अपहरण झालेल्या जिरगाळेंच्या बायकोकडे चाळीस लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र मिस्टर जिरगाळेंकडून त्यांच्या बायकोला कॅन्सर आहे कळल्यावरती आणि त्या खर्चासंबंधी ऐकल्यावरती अवघ्या पंचवीस लाखात त्यांना सोडून दिले. ह्याच्यामागे जो कोणी आहे तो घातकी किंवा नीच मनोवृत्तीचा वाटत नाही असे माझे आणि डॉक्टर करमरकरांचे देखील मत पडले आहे."

"आपण त्याच्यापर्यंत कधीपर्यंत पोचू शकू? आणि जर तो अशा मनोवृत्तीचा नाही, तर मग अचानक हा खून?" 

"साहेब, मी देखील थोडासा इथेच चक्रावलोय. अचानक येवढा मोठा गुन्हा त्याने का केला असावा? ह्या खुनाच्या आधीच्या, फक्त अपहरणाच्या केसेस आपण पाहिल्या, तर मी ठामपणे सांगू शकतो, की ह्या माणसाची हाव मोठी नाही. हा जसा उगवलाय तसाच नाहीसा होणार आणि हे गुन्हे आपोआप थंडावणार. मागे कुठलाही पुरावा नाही, ही टोळी आहे, का भाडोत्री माणसे राबवली जात आहेत ह्याची पक्की खबर नाही. एखादी अंधुकशी दिशादेखील आपल्या दृष्टिपथात नाही. पण... पण सर हे सगळे विचार येऊन थांबतात ते खुनापाशी. मिसेस रसीका शहा म्हणजे अतिशय चंचल व्यक्तिमत्त्व. खरे सांगायचे तर बाईंच्या चारित्र्याविषयी फारसे चांगले बोलले जात नाही. दहा वर्षापूर्वी मिस्टर शहांवरती हल्ला झाला होता, त्यावेळी अनेकदा चौकशीसाठी त्यांच्या घरी जाण्याचा योग आला होता. त्यावेळी मला देखील त्यांचे बेफिकीर वागणे चांगलेच खटकले होते. एकवेळ तर अशी होती, की मी मिसेस शहांना देखील संशयित मानून चौकशी केली होती."

"नाईकनवरे, असे तर नसेल की ह्या अपहरणाच्या बातम्यांचा फायदा घेत दुसर्‍याच कोणीतरी..."

"शक्यता नाकारता येत नाही साहेब. पण मिसेस शहा नाहीश्या झाल्यानंतर मिस्टर शहांना आलेले फोन, पैशाची केलेली मागणी ही अगदी ह्या माळेतल्या इतर अपहरणांसारखीच आहे. अतिशय सभ्यपणे मिस्टर शहांशी बोलले गेले, त्यांनी जेव्हा एक कोटी देण्यास स्पष्टपणे नकार दिला तेव्हा देखील एखाद्या मुरब्बी जाणकाराप्रमाणे त्यांच्याशी बोलून, वेळेला 'उद्या मिसेसच्या जागी तुम्ही असू शकता' असे अडून आडून धमकावत अपहरणकर्त्याने साठ लाख पदरात पाडून घेतलेच."

"पण पैसे मिळाल्यावरती देखील खून करण्याचे कारण काय? मला तरी राहून राहून हा खून तिसर्‍याच कोणा व्यक्तीने केलाय आणि आपण मात्र अपहरणकर्त्याला दोषी धरून चुकीच्या दिशेने चाललो आहोत असे वाटते आहे."
केशव नाईकनवरेंशी झालेली चर्चा, डॉक्टर करमरकरांचे मत आणि खात्यातील इतर अधिकार्‍यांशी झालेली चर्चा, सकृतीदर्शक पुरावे ह्यांवरून कमिशनरसाहेब आणि खात्याचे देखील स्पष्ट मन बनले, की खुनी आणि अपहरणकर्ता हे दोन्ही भिन्न व्यक्ती असून ह्या केसेसचा विचार आणि तपास एकत्र करून गुंता वाढवता कामा नये. इन्सपेक्टर ध्रुवला त्याप्रमाणे आदेश देखील देण्यात आले. इन्सपेक्टर ध्रुव देखील आता फक्त अपहरण हे एकच टार्गेट धरून कामाला लागला.

कमिशनर साहेब शांतपणे असिस्टंट कमिशनर मोगरेंचे भाषण ऐकत होते. मोगरे नाईक नवरे बाप-बेट्याचे अगदी मनापासून कौतुक करत होते. ध्रुवनी अत्यंत झपाट्याने आणि हुशारीने काम करत अपहरणकर्त्याला चांगलेच वेढले होते. अगदी कुठल्याही क्षणी त्याच्या भोवती फास आवळला जाईल अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र केशवराव म्हणाले तसा गुन्हेगार खरंच मोठा बुद्धिवान असावा. कारण ह्या आपल्या भोवतीच्या फासाची शंका येताच त्याने आपला कारभार आटोपता घेतला होता. गेल्या तीन महिन्यात एकाही नव्या अपहरणाची नोंद झाली नव्हती किंवा अपहरण झाले पण गुन्हा नोंदवायला कोणी आले नाही असे देखील घडलेले नव्हते. शहराने सुटकेचा श्वास सोडला होता. अधिकृतरीत्या नाही; पण आता अनाधिकृतरीत्या ह्या अपहरणाच्या केसेसची फाइल बंद झाली म्हणायला हरकत नव्हती.

मिसेस शहांच्या खुनाची केस मात्र अजून रेंगाळली होती. मिस्टर शहांपासून ते कारच्या ड्रायव्हरपर्यंत सगळ्यांच्या दहादहा वेळ चौकश्या करून झाल्या, वेळेला थर्ड डिग्री वापरून झाली पण म्हणावे असे यश काही हाताला लागतच नव्हते.
-----


"केशव नाईकनवरेंचे काम खरोखरच अचाट होते पण खात्यात त्यांना यश मिळाले पण म्हणावी तशी संधी मिळू शकली नाही..." मोगरे साहेब म्हणाले.

(खरे बोललात साहेब. कल्पना, योजना अनेक होत्या पण एकट्याने राबवू शकलो नाही. विश्वास ठेवावा असा साथीदार मिळालाच नाही. आता पोरगा मोठा झाला, ह्याच शहरात बदलून आला आणि पुन्हा एकदा जुनी स्वप्ने, कल्पनांना पंख फुटले. येवढे राब-राब राबलो खात्यासाठी पण पहिल्या पंधरात निवडल्या गेलेल्या मुलाच्या भरतीसाठी पण पस्तीस लाखाच्या वर खर्च करायला लागला. बाकीच्यांचे खिसे भरावे लागले ते वेगळेच. पण असो... ध्रुव माझ्या खांद्याला खांदा लावून उभा राहिला हे महत्त्वाचे. तशीही माझी भूक पार मोठी कधी नव्हतीच... मी काय म्हणतोय लक्षात येतंय का साहेब तुमच्या? नाही येणार.. मी ही कबुली फक्त मनातल्या मनात जी देतोय. साधे-सोपे-सहज.. किती आरामात घडत होते सगळे; पण त्या रसिकाने घात केला. दहा वर्षांनी देखील माझ्या दोन बोटातला तीळ विसरली नव्हती ती! सरळ नाव घेऊनच हाक मारली तिने मला. मग पर्यायच उरला नाही...)

समाप्त

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा