बुधवार, ३ जून, २००९

अदभुत

"प्रसाद?" कॅफेच्या बाहेरुन एक आजोबा विचारत होते.

"या ना, मीच प्रसाद" मी त्यांना आदराने आत बोलावत म्हणालो.

आजोबा आत येउन बसले, "मी शरद कारखानीस, नानांनी तुमच्याकडे पाठवले होते."

नानांचे नाव निघताच मी थोडा चमकलो. भुतकाळातील अनेक नको असलेल्या आठवणींची भुते माझ्याभोवती पिंगा घालु लागली. माझ्या अंगावर सरसरुन शहारा आला.

जास्ती नाही आठ एक महिने झाले असतील ह्या गोष्टीला, मी जयराज, वहिनी आणी त्यांची दोन गोजीरवाणी पाखरे जयराजच्या त्या कोकणातल्या जुन्या घरी ४ दिवसांच्या सुट्टीसाठी म्हणुन दाखल झालो होतो. खरेतर हे जयराजच्या आत्याचे घर , तिच्या मृत्युनंतर जयराज एकदाच काय तो इकडे येउन गेला होता. त्यानंतर घराची साफसफाई वगैरे सगळे कुळांच्या भरोशावरच होते.

आम्ही येणार म्हणुन घर कसे मस्त झाडुन, पुसुन सारवुन घेतलेले दिसत होते. रोहित आणी रसीका तर घराबाहेर येव्हडा मोठा मोकळ भाग बघुन बॅगा टाकल्यापासुनच हुंदडायला लागली होती. दुरवर नजर जाईल तोवर मोकळा माळ, काहि खुरटी आणी अध्ये मध्ये पोफळीची झाडे आणी नजरेच्या शेवटच्या टप्प्यात एकदम समुद्रम आणी त्याच्या लाटांचा तो धिरगंभीर आवाज. १०/१५ घरांचीच ती छोटीशी वाडी मला फार आवडुन गेली.

नाचणीची भाकरी, फणसाची भाजी, खर्डा असे भरभक्कम जेवण करुन मी आणी जय समुद्रावर एक चक्कर टाकुन आलो. येता येता दुसर्‍या दिवशीच्या 'बैठकीची' जागा पण ठरवुन झाली होती. वाडीवर विज नावापुरतीच आली होती, ती असायची कमी आणी नसायचीच जास्त. कंदीलाच्या टिमटिमत्या उजेडात वस्ती कशी एखाद्या चित्रासारखी दिसत होती.

आम्ही येइपर्यंत पोर झोपुनच गेली होती, दोन बाजा टाकुन मी आणी जयने पण बाहेर अंगणात ताणुन दिली. रात्रीचे साधारण किती वाजले असतील काहि अंदाज नाही पण अचानक मला जाग आली, कोणीतरी छातीवर बसल्यासारखा माझा श्वास गुदमरला होता. चारी बाजुंनी साकोळलेला काळोख आणी समुद्राचा गंभीर आवाज त्यात अजुनच भितीची भर घालत होता. मनाची कशीतरी समजुत घालत मी पुन्हा आडवा झालो, डोळे मात्र मिटायलाच तयार न्हवते. काहि वेळातच कोणीतरी घुसमटुन किंचाळल्यासारखा आवाज कानावर पडला, मी धडपडुन उठुन कंदीलाची वात मोठी केली. जय, हो जयच कण्हत होता आणी तो आपल्या शरीरापासुन कोणाला तरी दुर करण्याचा प्रयत्न करत होता. मी धावत त्याल हाका मारत त्याच्या दिशेने धावलो, ज्या वेगाने मी त्याच्याकडे धावलो त्याच्या दुप्पट वेगाने मी पुन्हा मागे फेकला गेलो. हे काहितरी विचीत्र आहे, अमानवी आहे हे माझ्या तेंव्हाच लक्षात आले. जयचे नशीब चांगले असावे कारण काही वेळातच त्याची धडपड थांबली व तो डोळे उघडुन आजुबाजुचा वेध घ्यायला लागला.

"जय यु ओके मॅन ?" मी कसाबसा ठेचकाळलेले अंग सावरत उठत म्हणालो.

जयची मान हळुहळु माझ्या दिशेला वळली आणी मी अंतर्बाह्य थरारुन उठलो. परमेश्वरा ! एखाद्या हिंस्त्र श्वापदा सारखी ती नजर माझा वेध घेत होती. मी पटकन दोन पावले मागे सरकलो. जयच्या तोंडातुन काहितरी गुरगुरल्यासारखे विचित्र ध्वनी निघत होते.'धोका धोका' इथे थांबण्यात धोका आहे , माझे मन मला आतुन सावध करत होते. पण मी पळुन पळुन जाणार तरी कुठे होतो ? एकतर ह्या भागाची माहिती नाही, त्यात जय, वहिनी आणी त्या २ गोजीरवाण्या जिवांना असे संकटात टाकुन पळुन जाणे मला खचीतच जमले नसते. जे काय होईल त्याचा सामना करायचा असे मनाशी ठरवुन मी हळुहळु घराच्या दाराकडे सरकु लागलो. नेमके त्याचवेळी....

अचानक ध्यानी मनी नसताना जयनी ती वेगवान हालचाल केली, घराच्या खिडकीतुन एखाद्या मांजरीने उडी मारुन आत शिरावे त्या सहजगत्या तो आत शिरला. आता मात्र वेळ घालवणे धोक्याचे होते, कसलाही विचार न करता मी त्याच्या मागोमाग आत शिरलो. आतला देखावा खरच भयानक होता, २ कंदिलांच्या उजेडात वहिनी दोन्ही गुडगे छातीशी दुमडुन त्या दोन लेकरांच्या मध्ये बसल्या होत्या आणी त्यांची नजर मात्र जयच्या डोळ्यात एकवटलेली होती.

"वहिनी वहिनी.. मी जोरात ओरडलो." दुसर्‍याच क्षणी सर्रकन वळुन जयनी माझ्या अंगावर झेप घेतली. एका क्षणात माझा गळा त्याच्या पंज्यात आवळला गेला आणी त्याची ती हिंस्त्र नजर माझ्या नजरेत सामावली गेली. काही क्षणासाठी मी काळ, वेळा सार्‍याचे भान विसरलो, मेंदुवर एक काळसर थर साचायला सुरुवात झाली, अचानक कुठुन प्रेरणा आली कळले नाही पण मी एका हातानी जयच्या नाकावर जोरदार ठोसा मारला, काही क्षण गडबडलेल्या जयच्या अवस्थेचा फादा करुन घेत मी त्याच्या दोन्ही पायात एक जोरदार लाथ मारत स्वत:ची सुटका करुन घेतली. मिणमीणत्या उजेडात जयचा तो रक्ताळलेला चेहरा भेसुर दिसत होता. पण एक तर नक्की झाले होते की त्या अमानवी शक्तीला कुठेतरी जयच्या शरीराची मर्यादा होती.

"बाबा" अचानक रसिकाच्या हाकेनी मी भानावर आलो. काहितरी केलेच पाहिजे होते नाहितर सुटका अशक्य होती. वहिनींनी दोन्ही मुलांना आपल्या कुशीत लपवुन तोंडानी मात्र 'अहो,अहो भानावर या' चा जाप लावला होता. आणी त्याचवेळी अचानक माझ्या कल्पना कीती बालीश होत्या याचे प्रत्यंतर देण्यासाठीच जणु जयनी आपला आकार हळुहळु बदलायला सुरुवात केली होती, विरळ विरळ होत जात त्याचे शरीर आता धुसर दिसायला लागले होते, एका झाडासारख्या आकारानी छतापर्यंतचा भाग व्यापला होता. हळुहळु तो विषारी आकार त्या घरभर पसरणार होता, काहि करता आले तर त्यातच, नाहितर सुटका अशक्य. वहिनी तर जवळ जवळ मुर्छीत अवस्थेतच पोचल्या होत्या.

मनाला येइल ते मंत्र, श्लोक, रामरक्षा यांचा जप चालुच होता, मी त्याच्या बरोबरीने घरभर काही मदतीसाठी उपयोगात येउ शकते का ते बघत होतो. पण त्या मोकळ्या, वापर नसलेल्या घरात असे होतेच काय ? नाही म्हणायला एक सरस्वती, गणपती आणी लक्ष्मीचा एकत्र फोटो खिळ्यावर लटकत होता. मी ताबडतोब त्या दिशेने धाव घेतली. लटपटत्या हातानी मे तो फोटु काढुन घेत असतानाच तो आकार ता तिघांवर झेपावला होता.

"सोड त्यांना" असे ओरडतच मी त्या धुक्यात प्रवेश केला, क्षणभर अक्षरश: मेंदुतल्या नसान नसा उलट्या पालट्या फिरल्याचा अनुभव आला. छातीशी तो फोटो गच्च पकडुन मी मनातल्या मनात देवाचा धवा चालु केला. शरीराची नुसती आग होत होती, मेंदुची नसन नस आक्रसली जात होती, आणी .. आणी त्याच क्षणी ते घडल, फोटोतुन बाहेर पडलेली एक तेजपुंज रेषा माझ्या शरीरात प्रवेशकर्ती झाली. काहि क्षणांसाठीच माझे शरीर अक्षरश: झगमगुन उठले, शरीर आणी मेंदुवरील बंधने तुटत असल्याची जाणीव होत असतानाचा मी शुद्ध हरपुन खाली कोसळलो.

जाग आली तेंव्हा जय, वहिनी आणी दोन्ही पाखर माझ्या आजुबाजुला बसलेली दिसली. मला डोळे उघडताना बघुन जयचा खुललेला चेहरा मला अजुन आठवतोय. खरच त्या रात्री काय 'जागले' होते अथवा 'जागवले' गेले होते ह्याची मला कल्पना नाही, पण जे घडले ते खरच अकल्पीत आणी भयंकर होते. त्या विषयाची जमेल तेव्हडी चर्चा टाळतच आम्ही कोकणाचा निरोप घेतला.

आयुष्यात आलेली एक काळरात्र येव्हडीच आपल्याला तिची आठवण राहिल आणी मग हळुहळु तीही धुरकट होत जाईल असे मला वाटत होते, पण दैवयोग काहि विचीत्रच होता. नियतीचे फासे काही वेगळेच पडले होते.

ह्या घटनेच्या साधारण २ महिन्यानंतर अचानक ध्यानी मानी नसताना ते घडले.....
शामराव, माझ्या काकांचे दोस्त.. अचानक रस्त्यात गाठ पडले. कुठेतरी घाइघाईत निघालेल्या शामरावांना मी हाक मारली.खरेतर मी तसा माणुसघाणा माणुस, कोणाला हाक वगैरे मारुन गप्पा मारणे अशक्यच. पण काहितरी विचित्र घडत होते. "शामकाका, अती घाई संकटात जाई, वाट बघा.शेवटी कापुसच मदतीला धावणार. विश्वास ठेवा." माझ्या तोंडातुन अचानक शब्द बाहेर पडले. मी काय बोलतोय हे माझे मलाच कळेना, अरे ते शामराव थांबतात काय, मी वेड्यासारखे काही बरळतो काय ? मला कशाचा अर्थच लागेना.

दुसर्‍या दिवशी दुपारी शामराव माझ्या कॅफेत हजर झाले. मी काही बोलायच्या आतच त्यांनी माझ्या पायाला हात लावला, "लेकरा वाचवलेस रे संकटातुन." शामराव म्हणाले.मला काही अर्थबोधच होईना. नंतर शामरावांच्या तोंडुन कळाले की कर्जाचे तिनही हप्ते थकलेले, ह्यावेळीही कापसाने हात दिला नाही, अशा अवस्थेत शामराव आत्महत्या करायला निघाले होते. मला भेटले तेंव्हा ते टिक-२० खरेदी करुनच निघाले होते. मला भेटले, मी अचानक काहितरी बरळलो आणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे का कोणास ठाउक माझ्या शब्दांवर त्यांचा इतका विश्वास बसला की त्यांनी खरेदी केलेली बाटली सुद्धा फेकुन दिली, आणी आज सकाळीच गुजरातचा व्यापारी येउन कापसासाठी सौदा करुन गेला होता.

मी सुन्नच झालो.....

क्रमश: