मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

अल्लाह के बंदे

बरेच दिवस मित्रांकडून 'अल्लाह के बंदे' ह्या चित्रपटाविषयी ऐकत होतो. "नसिरुद्दिन शहा आणि अतुल कुलकर्णीनी काय बाप काम केलंय राव" पासून "भिकार पिक्चर आहे, नसिरुद्दिन शहाला वाया घालवलंय" पर्यंतच्या कॉमेंट्स अधे मध्ये कानावर येतच होत्या, पण 'स्वतः बघायचा आणि मगच मत ठरवायचे' हा आमचा दंडक असल्याने शेवटी काल अल्लाह च्या बंद्यांचे दर्शन घ्यायचे निश्चित केले.



नसिरुद्दिन शहा, अतुल कुलकर्णी, सुहासिनी मुळे, विक्रम गोखले, झाकीर हुसेन अशी रंगमंचावर आणि पडद्यावर बाप असलेली स्टारकास्ट आणि त्यांच्या जोडीला शर्मन जोशी, रुखसार, सक्षम देशपांडे आणि स्वतः फारुक कबीर अशी फौज. चित्रपटाकडून अपेक्षा नक्कीच वाढलेल्या होत्या. ह्या चित्रपटात हिरोच्या भूमिकेत चमकण्याबरोबरच फारुक कबीर ह्याने ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केलेले आहे.

मोठ्या अपेक्षेने चित्रपट बघायला बसलो खरा पण खरे सांगायचे तर पदरात (का शर्टात? ) निराशाच पडली. अतुल कुलकर्णीचा आणि थोडाफार झाकीर हुसेनचा अपवाद सोडल्यास इतर दिग्गजांना अक्षरशः वाया घालवलेले आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळे सारख्या ताकदीच्या कलाकारांची भूमिका तुकड्यातुकड्याने जोडली तरी ५ मिनिटांच्या वर भरणार नाही. सक्षम कुलकर्णीला देखील म्हणावे तसा वाव नाही. सगळ्यात वाईट वाटले ते नसिरुद्दिन शहा ह्यांना बालसुधार गृहाच्या जेलरच्या भूमिकेत बघून. एकही धड आणि पूर्णं दोन वाक्यांचा संवाद नाही, बोलका चेहरा हे त्यांचे जे प्रभावी अस्त्र आहे त्याचा कणभर देखील वापर करून घेतलेला नाही आणि सगळ्यात संतापाचे म्हणजे त्यांना दिलेला गेट अप आणि त्यांना भूमिका साकारताना एका पायाने लंगडत चालत असल्याचे दाखवणे. नसिर ह्यांची हि भूमिका अगदी तंतोतंत 'दिवार' ह्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटातील पाकिस्तान तुरुंगाच्या जेलर असलेल्या 'के के' ह्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे. मिळतीजुळती कसली? आपण 'के के' लाच पाहत आहोत असे वाटत राहते.



असो...

तर आता मूळ कथेकडे वळू. विजय आणि याकुब हे मुंबईच्या सगळ्यात मोठ्या 'भुलभुलय्या' झोपडपट्टीत राहणारे दोघे अगदी जवळचे मित्र, सख्खे भाऊच म्हणाना. आई वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर अनाथ याकुबला शेजारच्या सुहासिनी मुळेने वाढवलेले असते. तिचाच मुलगा म्हणजे विजय. शाळेच्या नावाखाली घराबाहेर पडणे आणि चरस विकून पैसा कमावणे हे ह्यांचे काम. बालगुन्हेगारी आणि झोपडपट्टीतले दारिद्र्य हा विषय ह्या चित्रपटाचा अग्रभागी असताना देखील हे दोन्ही विषय म्हणावे तसे प्रेक्षकांच्या समोर येत नाहीत. रादर ह्या प्रश्नांच्या नेमक्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात हा चित्रपट अपयशी ठरला आहे. एका मिनिटासाठी दाखवलेले पायरेटेड सिडी, विषारी दारू, चरस, लोकांची विक्री हे धंदे म्हणजे झोपडपट्टीचे गुन्हेगारी विश्व नाही आणि 'भाई इसने अपुनका माल लिया वापस नही देता' म्हणणारी पोरे दाखवणे म्हणजे बालगुन्हेगारी न्हवे.

तर ह्या दोघा जय-विरुची आई सुहासिनी मुळे फारच आजारी पडते तिच्या उपचारांवरचा खर्च वाढतच असतो. अशातच पैसा म्हणजेच ह्या भुलभुलय्यातील ताकद आहे हा साक्षाक्तार झालेले विजय आणि याकुब आता मोठा हात मारायचा ठरवतात. त्यासाठी ते भुलभुलय्याच्या दादाचे सहहाय घेतात. आपल्याच वयाच्या चार/पाच मुलांना घेऊन हे दोघेही भरदुपारी एका सोनाराचे दुकान लुटतात आणि मोठा डल्ला मारतात. वचन दिल्याप्रमाणे दादा आपला हिस्सा न देत सगळाच माल घशात घालतोय हे पाहून दोघांचे रक्त खवळते, त्यातच दादा याकुबवर हात उचलतो आणि संतापाच्या भरात दादाच्याच बंदुकीतून विजय दादावर गोळी झाडतो. जखमी दादाला रस्त्यात सोडून दोघेही मालासकट पळ काढतात. इकडे दादाची जागा घ्यायचे स्वप्ने पाहणारा त्याचा उजवा हात ह्या संधीचा फायदा घेऊन दादाची हत्या करतो आणि आळ विजय आणि याकुबवर ढकलतो.



चोरी, खून, हाफ मर्डर अशा अनेक गुन्ह्यांची एकत्र शिक्षा म्हणून त्या दोघांनाही बाल सुधारगृहात पाठवले जाते. बाल सुधारगृहात फक्त १७ वर्षापर्यंतचे गुन्हेगार राहू शकत असताना इथे मात्र चक्क २०-२२ वर्षाची मुले आरामात राहतं असतात आणि 'के टी' नावाच्या एका त्यांच्याच वयाच्या बायल्याच्या हाताखाली टोळी देखील चालवत असतात. जी सुधारगृहात चरस विकून मुबलक पैसा कमावत असते. ह्या सगळ्याला आशीर्वाद असतो तो सुधारगृहाच्या वॉर्डनचा म्हणजेच नसिरुद्दिन शहाचा.

भुलभुलय्याच्या तालमीत तयार झालेले याकुब आणि विजय सुधारगृहात स्वस्तात चरस विकायला सुरुवात करतात आणि इथेच संघर्षाची ठिणगी पेटते. केलेल्या कृत्याचे फळ म्हणून इतर मोठ्या मुलांकडून मार तर मिळतोच वर नसिरुद्दिनच्या आशीर्वादाने त्यांना अनैसर्गिक अत्याचाराला देखील सामोरे जावे लागते. ह्यातच सुहासिनी मुळे मरण पावते. एकमेकांना सावरत दिवस ढकलणारे याकुब आणि विजय योग्य संधी मिळताच त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या 'के टी' चा खून करतात. खुनामुळे खळबळ माजल्याने एक कमिशन नियुक्त केले जाते, ज्यात खुनी कोण आहे हे कळत नाही पण इतर अवैध धंदे उघड झाल्याने वॉर्डनं नसिरुद्दिन शहाची मात्र हकालपट्टी होते. एक दिवशी सुधारगृहातून बाहेर पडून भुलभुलय्याचे बेताज बादशहा बनण्याचे स्वप्न पाहणारे याकुब आणि विजय आता सुधारगृहाचे भाई बनतात.



काही वर्षात (म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी) दोघेही सुधारगॄहातून बाहेर पडतात आणि उराशी जपलेले स्वप्न साकारायला पुन्हा भुलभुलय्यात हजर होतात. जुना मित्र रमेश (झाकीर हुसेन) च्या सहहायाने ते भुलभुलय्यामधील लहानग्या मुलांची एक टोळी तयार करतात आणि आपल्या काळ्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवतात. घरी दोन वेळ जेवणाचे वांदे असणाऱ्या पण हातात चित्रकलेची जादू असलेल्या सक्षम देशपांडे सारख्या कोवळ्या मुलांच्या ह्या टोळीत समावेश असतो. ह्या सर्वाची माहिती मिळाल्यावर भुलभुलय्यामध्ये एक छोटीशी शाळा चालवणारा आदर्श शिक्षक अश्विन परांजपे (अतुल कुलकर्णी) ह्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला म्हणावे तसे यश येत नाही. अतुल कुलकर्णीच्या पत्नीच्या भूमिकेत बऱ्याच दिवसांनंतर होणारे रुखसारचे दर्शन मन प्रसन्न करणारे. इथून पुढे सुरू होतो तो भुलभुलय्याच्या काळ्या साम्राज्यावर पकड घेण्याचा खेळ... आणि एका तद्दन गल्लाभरू चित्रपटाच्या दृष्टीने चित्रपटाची वाटचाल सुरू होते.



ह्यानंतर विजयच्या आयुष्यात संध्या (अंजना सुखानी) चे आगमन, हल्ल्याला प्रत्युत्तर देताना विजयच्याच गोळीमुळे सक्षम देशपांडेचा मृत्यू आणि त्यामुळे अंतर्बाह्य पालटलेला विजय अशा नेहमीच्या रस्त्याने गाडी निघते. चित्रपटाचा शेवट तर निव्वळ बकवास!!



विजय च्या भूमिकेत शर्मन जोशी बराच चांगला अभिनय करून गेला आहे. कमावलेले शरीर बरे दिसत असले तरी सतत गंजीफ्रॉकावर वावरायचे नसते हे कळले असते तर अजून बरे झाले असते. चित्रपटाच्या शेवटी शेवटी काही दृश्यात त्याची खोटी दाढी इतकी विनोदी दिसते की फिस्सकन हसून फुटते. याकुबच्या भूमिकेत स्वतः दिग्दर्शक फारुक कबीर आहे. हा याकुब, हा याकुब कमी आणि येडा याकुब जास्ती वाटतो. गँगस्टर म्हणजे केस वेडे वाकडे वाढवलेला, विकृत हसणारा, बंदूक तिरकी तुरकी करत गोळ्या मारणारा नसतो हे ह्यांना कधी कळणार? चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि त्या जोडीचे समूहगान तर असह्य ह्या सदरात मोडणारे. अक्षरशः विनाकारण जागोजागी ह्या कानठळ्या बसवणाऱ्या संगीताचा वापर का केला आहे ते लक्षात येत नाही.

तात्पर्य काय तर 'दिखावेपे मत जाओ अपनी अकल लगाओ. '



बुधवार, ८ डिसेंबर, २०१०

कॅटवूमन



स्पायडरमॅन, सुपरमॅन अगदी गेला बाजार शक्तिमान देखील आपल्याला भुरळ पाडून गेले. जादुई, साहसी जगातल्या ह्यांच्या पराक्रमाने, साहसाने आपण थक्क होत आलो आहोत. पण ह्या नायकांच्या साहस जगात नायिका तशा दुर्मिळच आणि त्यामुळेच कॅटवूमन अनेकांना भुरळ घालते ह्यात नवल नाही. कॉमिक्स मधून भेटिला येणारी कमनीय, देखणी मांजराप्रमाणेच धूर्त असलेली कॅटवूमन थेट पडद्यावर अवतरली ती २००४ साली वॉर्नर ब्रदर्सच्या 'कॅटवूमन' चित्रपटातून. कॅटवूमनच्या जन्माची कहाणी सांगणारा हा एक सुंदर चित्रपट. टायटल्स पासून बघण्यालायक जे काही मोजके चित्रपट असतात त्यातलाच हा एक चित्रपट.

चित्रपट काही फार भव्य, साहसाने ठासून भरलेला असा नाही, पण एका सामान्य तरुणीचा कॅटवूमन पर्यंत होणारा प्रवास अतिशय छान चित्रित केलेला आहे. हेली बेरी, शेरॉन स्टोन, बेंजामिन ब्रॅट ह्या सारख्या कलाकारांनी अभिनयाची बाजू अतिशय सुंदर सांभाळलेली आहे. पेशन्स फिलिप्स (हेली बेरी) हि सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या एका कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असते. लाजऱ्या बुजऱ्या पेशन्स फिलिप्सवर ह्यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या कंपनीच्या नवीन लाँच होणाऱ्या प्रॉडक्टची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते. पेशन्स देखील ह्या संधीचे सोने करण्याचा तयारीने काम करत असते.

अशाच एका रात्री पेशन्सला आपल्या खिडकीखाली पहिल्यांदाच एका मांजरीचे दर्शन होते. सकाळी पुन्हा ती मांजर पेशन्सच्या खिडकीत हजर होते, ह्यावेळी मात्र ती खिडकीतून दर्शन देऊन सरळ वरच्या कठड्यावर चढते. इकडे मांजर बहुदा त्या उंच ठिकाणी अडकली असावी असे समजून पेशन्स तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नात स्वतःचा जीव धोक्यात घालते. खिडकीच्या कडेला लटकलेल्या पेशन्सला बघून रस्त्यावरून जाणाऱ्या डीटेक्टिव टॉम लोनचा (बेंजामिन ब्रॅट) ती आत्महत्या करत आहे असा गैरसमज होतो. मात्र शेवटी तो तिला वाचवतो आणि त्याला सत्य देखील उमगते. पहिल्याच भेटीत तो ह्या साध्या सरळ मुलीकडे आकर्षित होतो.



एके रात्री उशीरापर्यंत काम पूर्णं केल्यावर पेशन्स स्वतःच आपली डिझाइन्स पोचवण्यासाठी गेलेली असताना तिला कंपनीच्या मालकाचे व इतर लोकांचे बोलणे कानावर पडते. नवीन लाँच होणाऱ्या प्रॉडक्ट मध्ये विषारी द्रव्ये असून ते त्वचेला हानिकारक व प्रचंड घातक असल्याचे तिला समजते. आता हे बोलणे कानावर पडलेली पेशन्स जिवंत राहणे हे कंपनीच्या फायद्यासाठी नुकसानकारक आहे हे ओघाने आलेच. त्यामुळे मालकाचे हस्तक कंपनीतून थेट समुद्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या पाइपमध्ये अडकवून पेशन्सचा जीव घेतात.

पेशन्सचे प्रेत वाहत वाहत समुद्राच्या कडेच्या गाळात येऊन अडकते आणि इथेच चित्रपटाला वेगळे वळण लागते. पेशन्सच्या घराभोवती घुटमळणारे मांजर आता आपल्या बरोबर अजून काही मांजरे घेऊन तिथे हजर होते. सर्व मांजरे पेशन्सच्या प्रेताला घेरतात. पेशन्सच्या शरीरावर उभे राहून ते मांजर जणू पेशन्सच्या शरीरात पुन्हा प्राणच फुंकते... आणि खरंच पेशन्स पुन्हा जिवंत होते. हा पेशन्सचा कॅटवूमनच्या रूपातला पुनर्जन्म होतो. जिवंत झालेली पेशन्स डोळे उघडून आजूबाजूला पाहते आणि आपल्याबरोबर नक्की काय घडले होते ते आठवण्याचा प्रयत्न करू लागते, मात्र तिला काहीच आठवत नाही. जिवंत झाल्यानंतरची पेशन्सची पहिली हालचाल हि अगदी मांजरीसारखीचं दाखवली आहे, तर तिला दिसणारी आजूबाजुची दृश्ये, जमिनीखालील जाणवणारी हालचाल हे दृश्य अतिशय सुंदररीत्या पडद्यावर दाखवले आहे.



आपल्यात काहीतरी बदल घडला आहे हे पेशन्सला जाणवत असते, मात्र तो नक्की काय आहे हे तिच्या लक्षात येत नाही. सकाळी पुन्हा एकदा त्या रहस्यमय मांजरीचे पेशन्सकडे आगमन होते. आता मात्र पेशन्स तिच्या गळ्यातील बेल्ट मधून तीच्या मालकाचा पत्ता शोधून काढते व मांजर परत देण्यासाठी निघते. मिळालेल्या पत्त्यावर तिची भेट एका खूपश्या मांजरी पाळणाऱ्या आणि जुन्या इतिहासाच्या अभ्यासाचे वेड असणाऱ्या प्राध्यापिकेशी होते. तिच्याकडूनच ह्या रहस्यमय मांजराचे नाव 'मिडनाईट' असल्याचे समजते. प्राध्यापिका पेशन्सला मांजरांची इजिप्तमधील दैवत असलेली गॉडेस, तिची प्रतिरुपे आणि कॅटवूमन ह्या सर्वाबद्दल माहिती देते. ति पेशन्सला तिचा एक कॅटवूमन म्हणून पुनर्जन्म झाल्याचे सांगते आणि त्या रात्री घडलेल्या घटनांची आठवण करून देते. पेशन्स मात्र हे सत्य स्वीकारायला नकार देते.



साधी सरळ पेशन्स आणि कावेबाज कॅटवूमन ह्या दोन रूपांचे द्वंद आता पेशन्समध्ये सुरू होते. साहसाची, मुक्ततेची आवड असणारी कॅटवूमन पेशन्सला बेधुंद आयुष्याकडे ओढत असते तर दुसऱ्या बाजूला अल्लड पेशन्स डिटेक्टिव टॉम लोनकडे आकर्षली जात असते. कॅटवूमन ह्या प्रकाराबद्दल आता पेशन्स इंटरनेटवरून शक्य ती सर्व माहिती गोळा करते आणि वाचते. हळूहळू आता कॅटवूमन म्हणूनच जगण्याचे तिचे आकर्षण वाढत जाते. त्यातच एका रात्री बेदरकारपणे हिंडताना ते कॅटवूमनच्या रूपात एका सोन्याचे दुकान लुटणाऱ्या टोळीला बुकलून काढते. आता तर तिच्या आत्मविश्वासात दुपटीने वाढ होते. आपल्या खुनाचा बदला घेण्याचा निश्चय आता कॅटवूमन करते आणि एकेका खलनायकाच्या मागावर निघते.



शेवटी शेवटी ह्या सर्व प्रकरणामागे तिच्या कंपनीच्या मालकाच्या बायकोचा लॉरेलचा (शेरॉन स्टोन) हात असल्याचे उघड होते. मात्र कावेबाज लॉरेल स्वतः आपल्या पतीचा खून करते व त्याचा आळ कॅटवूमनवर आणते. इकडे पेशन्सची एकूण वागणूक, तिच्या स्वभावात होणारे बदल ह्यांनी अस्वस्थ असलेल्या टॉम लोनच्या त्रासात ह्यामुळे वाढच होते. आणि एका अनपेक्षित क्षणी तो पुराव्यानिशी पेशन्सला कॅटवूमन म्हणून अटक करतो. पुढे काय होते हे पडद्यावरच बघण्यात खरी गंमत आहे.



हेली बेरीच्या सुंदर अभिनयाने आणि शेरॉन स्टोनच्या सौंदर्याने लक्षात राहणारा हा चित्रपट. अल्लड, थोडा आत्मविश्वासाचा अभाव असणारी पेशन्स ते बेदरकार, रंगेल कॅटवूमन हा विविध शेडने रंगलेला प्रवास हेली बेरी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने मोठा छान पार पाडते. कपटी आणि कावेबाज लॉरेलच्या भूमिकेत शेरॉन स्टोन भाव खाऊनं गेली आहे हे सांगायला नकोच. एकूण काय तर वयाचा विसर पाडून मनमुराद आनंद लुटावा असा हा चित्रपट तुम्ही पाहायलाच हवा.

मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०



देशद्रोही ह्या अशक्यप्राय चित्रपटावर चार ओळी लिहून मी मिपावर लेखक म्हणून पदार्पण केले. त्यावर बऱ्याच गंमती गमतीच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. बिहारी-मराठी वाद पेटलेला असतानाच खास बिहारींचे महत्त्व आणि त्यांचे औदार्य वगैरे पटवून देणारा चित्रपट अशी हवा करत हा चित्रपट तेव्हा आपल्यावर येऊन आदळला होता. स्वत:ला 'के आर के' म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खान ह्या महामानवाचे हे पाप!

पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो 'कॅम कॉपी' होता. त्यामुळे बराचसा चित्रपट हा अंधार, संवाद नीट ऐकू न येणे आणि आजूबाजूचा आमच्या ज्ञानी मित्रांच्या कॉमेंट्स ह्यामुळे विशेष एन्जॉय करता आला न्हवता. थेटरला आपण जात नाही आणि हा चित्रपट दाखवायचे धाडस कोणी वाहिनी करेनात त्यामुळे डोक्यातून पार पुसला गेला होता. अशातच काल घरी मी एकटा जीव सदाशिव, जोडीला रॉयल स्टॅग आणि मॅक्स वर देशद्रोही असा मणिकंचन योग जुळून आला आणि आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. स्वत: खुद्द महानायक 'के आर के', जोडीला (बहुदा भोजपुरी चित्रपटाचा) अभिनयसम्राट मनोज तिवारी, रुपसुंदर आणि (शरीराने + दारूने) मीनाकुमारीच्या तोडीस तोड बनत चाललेली ग्रेसी सिंग, अभिनयसम्राज्ञी रिषीता भट आणि द यंग, डॅशिंग झुल्फी सैय्यद अशा रथी महारथींनी भरलेली स्टार कास्ट आणि त्याच्या जोडीला तोंडी लावायला यशपाल शर्मा, अमन वर्मा, रझा मुराद, रणजित इ. इ. ह्या चित्रपटात काम करण्या बरोबरच यातील अजरामर संवाद लिहिण्याची जबाबदारी देखील 'के आर के' साहेबांनी पार पाडलेली आहे.




हान तर आता आपण चित्रपटाकडे वळू. चित्रपटाचा ओपनिंग शॉट... महानायक 'के आर के' वाऱ्याच्या वेगाने धावताना आपल्याला दिसतो. मागे ते 'अच्छा सिला दिया', 'आती हे रात ओढे हुए.. ' टाईप एक गाणे आणि संगीत. हा कमाल खान इतक्या जोरात धावत असतो की दिलवाले दुल्हनीया मधली शेवटच्या शॉटला पळत जाणारी काजोल देखील ह्याला हरवेल असे वाटून जाते. हा धावतो.. धावतो.. धावतो.. आणि कपाळावर एक जखम, मळलेला, रक्त लागलेला शर्ट अशा अवस्थेत एकदाचा एका रेल्वेगाडीत शिरतो. पुढच्याच शॉटला एका एकदम मुंबईच्या रस्त्यावर. चणे खात खात हा एका बनारसी पान वाल्याच्या टपरीपाशी येऊन उभा राहतो. आता तिथेच का उभा राहतो? तर कथेची मागणी म्हणून. हान तर इथे आपला पानवाला एक तरुण मुलीबरोबर आणि मुलाबरोबर तुळशीबागेत ते 'ए लॉटे सेले.. लॉटे सेले' ज्या आवाजात ओरडतात त्या आवाजात गर्द आणि त्याचा पुरवठा ह्यावर गप्पा मारत असतो. ते जोडपे देखील आपण सध्या गर्दची नशा कशी पसरवत आहोत ह्याचे तावातावाने वर्णन करत असते. येवढ्यात काही गुंड हप्तावसुलीला हजर होतात. आता त्यांचाच गर्द विकणाऱ्या पानवाल्याला ते हप्त्यासाठी का मारतात हे मला कळले नाही.

पानवाला आपला मार खात असतो, लोक बघत असतात.. इतक्यात एका टिनपाट बाइकवर ग्रेसी सिंग तिथे पोचते. जाने माने भाई लोगोंको ती कापूस पिंजावा तसे पिंजून धोपटून काढते. आल्या आल्या ती हातातले हेल्मेट एका जाडसर गुंडाच्या अंगावर फेकते. त्यांबरोबर तो गुंड आणि आजूबाजूचे ४/५ गुंड सगळेच चार हात मागे जाऊन पडतात म्हणजे बाईची पावर काय असेल बघा.

तर आता सर्व गुंडाचा नायनाट करून झाल्यावर हिचे हात खराब होतात, मग ती खिशातून एक रुमाल काढते आणि हात पुसून परत खिशात ठेवायला जाते, तर तो तीच्या नकळत खाली पडतो. महानायक लगेच उचलायला हजर! मुळात पुढच्या खिशातून काढलेला रुमाल, ती मागच्या खिशात का ठेवायला जात असावी? असो... भारावलेले महानायक तो रुमाल उचलतात आणि म्हणतात "लगताहे जैसे इतिहास के पन्नो से राणी लक्ष्मीबाई निकलके आ गयी हे! " पुढच्या क्षणाला हि लक्ष्मीबाई बेंबीखाली चार बोटे साडी नेऊन आणि दंड उघडे टाकून कंबर हलवायाला सुरुवात करते. अजून एका अवीट गोडीच्या गाण्याला सुरुवात होते...



मुळात चित्रपटाची टायटल्स चालू असतानाच, संगीत :- निखिल (निखिल - विनेय की जोडीसे) असले भीषण हिंदी दाखवून दिग्दर्शकाने आपल्या मनाची कितीही तयारी करून घेतली असली तरी काही काही प्रसंग खरंच धक्का देऊन जातात. हा नवजवान कमाल खान म्हणे कॉलेजात शिकत असतो, त्याच्या जोडीला त्याच्यावर दिलो-जानसे प्रेम करणारी रिषिता भट दाखवली आहे. गाणी म्हणत नाचणे आणि जाता येता आपल्या सायकलने ह्या महानायकाच्या सायकलला धडका मारणे ह्याशिवाय भट कन्येला ह्यात काही काम नाही. मुळात हि बाई जेंटस सायकल घेऊन सायकल का शिकत असते? प्रश्न.. प्रश्न... प्रश्न... आणि येवढ्या मोठ्या गावात हिला फक्त हा कमाल खानच आवडावा? च्यायला ह्या प्रेमाला आंधळे + मुके + बहिरेच म्हणाले पाहिजे. मी खरंच सांगतो माझ्या आजवरच्या आयुष्यात त्या कमाल खानच्या चेहऱ्यावर जसे दिसतातना तसे मतिमंद भाव कुठेही बघितलेले नाहीत. प्रदीप कुमार आणि भारत भूषणं देखील ह्या कमाल खानच्या अभिनया समोर नसिरुद्दीन शहा आणि अनुपम खेर भासतील.

आता महानायक इकडे आपला मित्र शेखरला शोधायला सुरुवात करतो. इथे बळच एक रहिम चाच्या धर्तीवर कादरखानचे पात्र घुसडले आहे. तर ह्या बिहारीला मुंबईतली पहिली लाथ घालण्यासाठी मामा काणे नावाचे मराठी पात्र बळच २ मिनिटांसाठी आणले आहे. तर ह्या आपल्या महानायकाला एकदाचा त्याचा मित्र शेखर भेटतो. हा शेखर म्हणजे मनोज तिवारी. हा माणूस दिसायला बरा आहे, चार आठ आण्याचा अभिनय पण करतो, पण ह्याचा आवाज अगदी ते संस्कार, आस्था वर प्रवचनकार असतातना त्यांच्या आवाजा सारखा आहे. डोक्यात जातो.



तर आता मित्र इकडे वॉचमन म्हणून काम करत असतो पण गावात स्वत:ला उगाच श्रीमंत भासवत असतो. त्याने 'के आर के' कडे "मुंबईला कसे काय (कशाला तिज्यायला) येणे केले? " अशी विचारणा केल्याबरोबर फ्लॅश बॅक चालू...

महानायक कालीजात जाणार, त्याला जाता येता शिव्या देणारा आणि मार मार मारणारा बाप रणजित, नातवाला एकदिवशी दुनिया सलाम करेल अशी खात्री असणारा आजोबा अवतार गील हे एकेक करत समोर यायला लागतात. जाता येता कमाल खानला हाणणारा आणि शिव्या देणारा बाप आपल्याला आवडून जातो. "तू पैदा होते ही मर क्यू नही गया? " असा तमाम प्रेक्षकांना पडलेला प्रश्न देखील तो एका प्रसंगात नायकाला विचारून प्रेक्षकांचा अजून लाडका बनला आहे. पण मला कीव वाटली ती अवतार गील ह्या आजोबाची. नाही म्हणजे आपला पोरगा आपले नाव वगैरे रोशन करेल, काही नाही निदान चार दमड्या कमावून आणेल असे प्रत्येक आई बापाला वाटणे साहजिक आहे. आमच्या आई बापाला पण वाटायचे, पण लवकरच मी त्यांचा गैरसमज दूर केला हा भाग वेगळा. पण २४/२५ वर्षे ह्या दिवट्याची वागणूक बघूनही ह्याच्या आजोबाच्या विश्वासाला तडा कसा जात नाही? ह्या घोड्याला साधे पिठाचे आणि खताचे पोते पण सायकवरून आणता येत नसते. शेवटी ह्याचा आजोबा (एकदाचा) मरतो आणि बापाच्या हातचा मार खाऊन हा महानायक मुंबईला पळून येतो हा साक्षात्कार आपल्याला होतो आणि फ्लॅश बॅक संपतो. ह्यानंतर मग गरिबी, बेरोजगारी, शिक्षणाची शून्य किंमत ह्यावर मनोजमहाराज तिवारी ह्यांचे प्रवचन होते आणि त्यावर "आजोबाचे स्वप्न पूर्णं करीनच" अशा बाणेदार उत्तराची तोफ डागून महानायक मित्राची साथ सोडतात.

महानायकासाठी नोकरी, भां** नोकरी कसली? धंद्यात मुनाफा घेऊन लगेच रहिम चाचा उर्फ अब्दुल अका कादरखान फळवाले हजर. ह्याला सगळी फळे त्याचे भाव ह्याची अक्कल आहे हे अंतर्ज्ञानाने जाणून कादरखान ह्याच्या जीवावर फळांचा स्टॉल सोडून दुसऱ्या कामाला जातात. त्यांची पाठ वळल्या वळल्या हप्ता वसुली वाले हजर... हप्ता वसुलीवाल्यांच्या पाठोपाठ जणू वास काढत आल्यासारखी लक्ष्मीबाई पण हजर! भीड तेज्यायला!!

इथे अडचणीत सापडलेल्या ग्रेसी सिंगचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आपल्या साध्या + भोळ्या + भाबड्या (+ भोसडीच्या असे लिहायचा खरंच फार मोह होत आहे) नायकाच्या आतला एंग्री यंग देशभक्त जागा होतो आणि त्याच्या हातून त्या गुंडाचा खून होतो. ह्या दृश्यातली हाणामारी तर स्टॅलोन, अर्नॉल्ड, अंडरटेकरला तोंडात पाची बोटे घालायला लावणारी.



आता महानायकाचा पोलिसांपासून, ज्याची हत्या केली त्याच्या डॉन भावापासून वाचण्यासाठी धडपड आणि पळापळ चालू. त्याला साथ ग्रेसी सिंगची. ह्या धावपळीत एक अतिशय हृदयद्रावक प्रसंग दाखवला आहे. ग्रेसी सिंगला एक मुका भाऊ आहे हे कळत असतानाच अचानक महानायकाच्या एनकाऊंटरची ऑर्डर निघाल्याचे त्यांना समजते. मग हे तिघे पळत सुटतात पण पोलिस अधिकारी ह्यांना पकडतोच. त्याने महानायकावर गोळी चालवल्या बरोब्बर हा मुका भाऊ लगेच मध्ये येतो! अरे काय संबंध? बरं लगेच त्या इन्स्पेक्टरला आणि (विनाकारण ) चार निःशस्त्र हवालदारांना मारून महानायक आणि ग्रेसी सिंग तिच्या भावाचे प्रेत रस्त्यात टाकून तिच्या मावशीच्या घरी आसऱ्याला धावतात. तिची मावशी ह्या दोघांना लगेच प्रेमी वगैरे समजून मोकळी. ग्रेसी सिंगच्या थोबाडावर भाऊ मेल्याचे २ पैशाचे देखील दु:ख नाही. उलट ह्या मावशीच्या समजुतीवर हे दोघे खी खी खी करून खिदळतात आणि लगेच जोडीला अजून एक अवीट सुरांचे गाणे चालू... आणि कहर म्हणजे मावशीचे घर घाईघाईत सोडून जाताना ग्रेसी सिंगच्या जोडीने हा डांबरटपण मावशीला मिठी मारून घेतो.

मग राजकारण्यांचे हातचे बाहुले बनलेला नायक, त्याचा शार्पशुटर बनलेला पण नंतर हृदय परिवर्तन होणारा मित्र आणि नायकाचा सूडाचा प्रवास असा नेहमीच्या वळणाने चित्रपट अंताकडे निघतो. अधे मध्ये बळच मराठी माणसाकडून मुंबईत बिहारी लोकांवर होणारे अत्याचार दाखवणारे घुसडलेले २/३ प्रसंग आणि ते कमी की काय म्हणून ह्या महानायकाचे महासंवाद. "मै तेरा खून पी जाउंगा, आंखे निकाल लुंगा तेरी" किंवा "कभी युपी बिहार आके देखो.. मेहमान को भगवान मानते हे" वगैरे संवादाबद्दल तर बोलायलाच नको. पुन्हा प्रत्येकाचा खून करताना जोरात "अSSSय तू खल्लास" असे ओरडणे जोडीला आहेच. मुळात कमाल रशीद खान हा मनुष्य चित्रपटाची पहिली पाच रीळ दिलीप कुमारच्या अभिनयाची आणि संवादाची नक्कल करण्याचा प्रयत्न करताना दिसतो तर उरलेली रील राजकुमारची. त्याला बहुदा पाच सहा रिळानंतर आपण कुठल्याश्या एका बाजूने राजकुमारासारखे दिसतो असा शोध लागला असावा.



जाता जाता पडलेले काही प्रश्न :-

१) अंगावरच्या कपड्यानिशी गावाकडून पळून आलेला कमाल खान रोज नवनवीन इस्त्री केलेले शर्ट कुठून आणतो?

२) त्याचा बाप त्याला विनाकारण रोज का शिव्या देत असतो?

३) वॉचमनची २५००/- रुपयांची नोकरी करणारा शेखर फळांची बाग कशी काय विकत घेतो?

४) "ये सब मै अपने भाई के लीये कर रही हूं" असे म्हणणारी ग्रेसी सिंग नक्की भावासाठी काय करत असते?

५)एक उपमुख्यमंत्री एका सब इन्स्पेक्टरला कर्फ्यू लावायची ऑर्डर काढायला कसे सांगू शकतो?

इत्यादी इत्यादी.... आणि हो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न :- भरलेली माझी बाटली कोणी रिकामी केली?

असो.. चित्रपटातील अविस्मरणीय दृश्यांची आणि संवादाची ओळख तुम्हाला थोड्या प्रमाणात व्हिडोंवरून आली असेलच. तर असा हा हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात प्लॅटिनमच्या अक्षरांनी कोरून ठेवावा असा चित्रपट आपण सर्वांनी पाहायलाच हवा.



शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०१०

फुल्ल टू दबंग

काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो. अशी छानशी पूर्वतयारी झाल्यानंतर मी दबंग बघायला सज्ज झालो हे तुम्ही ओळखले असेलच.



नुकताच येऊन गेलेला सलमान 'वाँटेड' पाहिल्यापासून सलमान आणि दबंग दोघांनी माझ्या अपेक्षा फारच उंचावून ठेवल्या होत्या. तसा मी काही फार जाणकार परीक्षक किंवा एखाद्या कलाकाराला पारखू शकेन असा कसबी वगैरे नाही, पण सलमानचा वाँटेड पाहिल्यापासून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे सलमानने आता स्वतःला आणि स्वतःच्या वकुबाला पूर्ण ओळखले आहे. मुख्य म्हणजे सलमान काय करू शकतो आणि तो काय करताना हिट होऊ शकतो हे कळणारे कसबी दिग्दर्शक त्याच्या हाताला लागू लागले आहेत. अरे वाटत आहे की सलमानने आता आपण कितपत अभिनय करू शकतो हे व्यवस्थित लक्षात घेऊन त्या टाईपच्या भूमिका करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सलमानला बघणे आणि सहन करणे आता सुसह्य व्हायला लागले आहे. अभिनय, मेलोड्रामा, डोळ्यांची भाषा वगैरे आपल्याकडून पब्लिकला अपेक्षीत नाही आणि ते आपल्याला जमणार नाही हे त्याच्या पक्के लक्षात आले आहे, त्यामुळे ओन्ली रफ अँड टफ अका रावडी सलमान दबंग पूर्ण खाऊन जातो आणि मुख्य म्हणजे डोक्यात न जाता डोक्यावर जातो.



दबंग म्हणजे निर्भय. हि गोष्ट आहे उत्तरप्रदेश मधल्या लालगंज भागातील एका निर्भय पण चालू पोलिस ऑफिसर रॉबिनहूड उर्फ चुलबुल पांडेची. कंजूष सावत्र वडील विनोदखन्ना आणि आई डिंपल कपाडिया ह्यांच्या सोबतच त्याला साथ आहे ती सावत्र भाऊ मख्खी उर्फ मंदबुद्धी आरबाज खानची. लहानपणापासूनच वडील आणि सावत्र भावाशी चुलबुल उर्फ सलमानचे सख्य असे नसतेच. त्यांना जाता येता त्रास देणे, ताठपणे बोलणे हेच काय ते त्याचे काम. हा लहान चुलबुल आता एक धाडसी पोलिस ऑफिसर बनलेला आहे जो लुटारूंना वगैरे पकडून वर त्यांचा माल लुटून त्यांना पळून जायला देखील मदत करत असतो.

चित्रपटाच्या सुरुवातीलाच सलमानच्या एंट्रीचा जो शॉट आहे तिथेच माझ्या मनात थोडीशी शंकेची पाल चुकचुकायला लागली होती. हि सलमानची एंट्री अगदी थेट 'वाँटेड' चित्रपटाप्रमाणेच आहे. अगदी तो त्या सिनेमात ज्या गोडाउन मध्ये मारामारी करतो तसेच हुबेहूब गोडाउन इथे दबंग मध्ये उभे केल्यासारखे स्पष्ट जाणवते. एंट्रीचा शॉट संपल्या संपल्या लगेच 'दबंग दबंग' हे गाणे सुरू होते. गाणे आणि संगीत थेट 'ओंकारा' च्या वळणावर जाणारे. आता भवतेक चित्रपट बघून डोक्याला शॉट लागणार असे वाटायला लागते... मात्र नंतर जी काही धमाल सुरू होते की क्या कहने...

दबंग सलमानची झडप आता लालगंजचा युवा नेता छेदी सिंग बरोबर होते. छेदी सिंगचा रोल सोनू सूद ने केला आहे. अप्रतिम शरीरयष्टी आणि सहज अभिनय ह्यामुळे ह्या भूमिकेत तो भाव खाऊन गेला आहे हे नक्की. ह्या छेदी सिंगच्या डोक्यावर हात आहे तो मंत्री अनुपम खेरचा आणि त्याला सोबत आहे ती होणाऱ्या इन्स्पेक्टर सासऱ्याची ओम पुरीची. लूटमार, देशी दारूच्या भट्ट्या हे सगळे सांभाळून राजकारण करणे आणि आगामी निवडणुकीसाठी तिकिटाच्या मागे लागणे हे ह्या छेदी सिंगचे काम. त्याच्या माणसाने लुटलेला माल त्याच्या माणसांकडून सलमान पळवतो आणि इथे त्यांच्या संघर्षाला सुरुवात होते. पुढे अनुपम खेर देखील सलमानच्या मदतीने छेदी सिंगला शह देऊ पाहतो आणि हे युद्ध अजूनच भडकते.



मधल्या वेळात सलमानची हिरवणी म्हणून सोनाक्षी सिंगची नेमणूक केलेली आहे. तसेही आजकाल हिरवणींकडून फारशी अभिनयाची अपेक्षा नसतेच. सोनाक्षी दिसली आहे सुंदरच आणि 'थप्पडसे नही प्यारसे डर लगता है साब' वगैरे डायलॉग मारत काही संवादात भाव देखील खाऊन गेली आहे. एकूणच सोनाक्षीचे पदार्पण झक्कास म्हणायला हरकत नाही. तिच्या जोडीलाच उल्लेख करायला हवा तो आरबाज खानचा. ह्या माणूस देखील फारसा अभिनय कुशल वगैरे नाही, पण मर्यादेत राहिला तर छान काम करून जातो. (उदा. गर्व) ह्या चित्रपटात देखील त्याच्या वाटेचे काम त्याने चोख केले आहे. स्वतः दिग्दर्शक असूनही तो कुठे भरकटलेला नाही आणि मुख्य म्हणजे त्याने सलमानला देखील भरकटू दिलेले नाही.



सलमान आणि आरबाजच ह्या चित्रपटातील मिशीवाला लुक एकदम शॉल्लेट आणि त्यांना शोभतोही. हा लुक म्हणे सलमानला सोनाक्षीनी सुचवला. खरेतर ह्या चित्रपटात खान कँप कडून गोविंदाच्या कन्येला लाँच केले जाणार असल्याची बातमी होती, पण ऐनवेळी बाजी मारली ती शत्रुघ्न सिन्हांची कन्या सोनाक्षीने. जाडजूड सोनाक्षील ६ महिने जीम मध्ये राबवून सलमानने अगदी फिट केल्याचे दिसते.



हान.. तर आता इकडे चुलबुल आणि सलमान मधला संघर्ष चांगलाच पेट घेतो तर तिकडे दुसऱ्या आघाडीवर आईच्या मृत्यूनंतर सलमान आणि त्याच्या वडील आणि भावातला संघर्ष देखील पेटून उठतो. सलमानच्या वडील आणि भावाची मदत घेऊन छेदी सिंह सलमानला शह देऊ पाहतो मात्र त्यात अयशस्वी ठरल्याने तो त्यांच्या फॅक्टरीला आग लावून देतो. त्या धक्क्याने सलमानचे वडील हॉस्पिटलामध्ये ऍडमिट होतात. वडिलांच्या इलाजासाठी पैशाची गरज असलेला आरबाज पुन्हा छेदी सिंहच्या जाळ्यात सापडतो आणि नको ती कामे करायला लागतो. शेवटी भावाचाच खून करायची गळ त्याला छेदी सिंह घालतो तेव्हा मात्र तो जाऊन सलमानला मिळतो आणि मग दुष्टांचा नाश ठरलेलाच.


अशा साध्या सरळ आणि टिपीकल रावडी कथेला उत्तम साथ लाभली आहे ति संगीताची आणि ऍक्शन दृश्यांची. संगीताच्या आघाडीवर साजिद-वाजिद ह्यांनी खरोखर श्रवणीय आणि अप्रतिम कामगिरी केलेली आहे. चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत. उडत्या चालीच्या (आणि ढापलेल्या) 'मुन्नी बदनाम हुई' बरोबरच 'तेरे मस्त मस्त दो नैन' हे राहत फतेह अली खानच्या आवाजातील हळुवार गाणे म्हणजे मेजवानी आहे.

Get this widget | Track details | eSnips Social DNA

एस. विजयन ह्यांची ऍक्शन दृश्ये भन्नाटच आणि टिपीकल सलमान खान फॅन्सची मागणी पूर्ण करणारी. त्याच्या जोडीला खटकेबाज संवादाची चटपटीत भेळ आहेच. मात्र हे सगळे असताना देखील विनोद खन्ना, अनुपम खेर आणि ओम पुरी सारख्या कलाकारांना इतक्या किरकोळ भूमिका देऊन वाया का घालवले अशी रुखरुख राहून जाते. कदाचित 'खान कँप'ला नाही म्हणणे जड गेले असल्याने त्यांनी ह्या भूमिका स्वीकारल्या असाव्यात. तुलनेने तेवढ्याच छोट्या भूमिका असून देखील महेश मांजरेकर आणि डिंपल मात्र आपल्या अभिनयाची छाप सोडून जातात.

जाताजाता अरबाजच्या दिग्दर्शनाला सलाम ठोकावेसे वाटतात असे २ प्रसंग :-

१) मंत्री असलेल्या अनुपम खेरच्या बंगल्यात येवढ्या सिक्युरिटी मधून अरबाज आरामात आंब्याच्य पेटीतून बाँब घेउन जातो.


२) अंतिम मारामारीत सलमानच्या अंगावरुन टराटरा फाटून चिंध्या होउन वार्‍यावर उडालेला शर्ट सलमान खलनायकाला मारुन ट्रॅक्टरमधून परत येताना तोच शर्ट त्याच्या अंगावर असतो.

एकूण काय तर दबंग सलमानसाठी, झटकेबाज सोनाक्षीसाठी आणि 'तेरे मस्त मस्त दो नैन' साठी हा १००% टैमपास करणार दबंग बघणे मस्टच आहे.



गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०१०

50 First Dates आणि गोजिरी

काल दुपारी मस्त '१४०८' हा भयपट पहात बसलेलो असतानाच एक मैत्रिण आली. भयपटाची तिला बिलकुलच आवड नसल्याने आणि मुख्य म्हणजे ती २/२.३० तास मुक्काम ठोकण्याच्या इराद्यानेच आलेली असल्याने मग 'एखादा मराठी पिक्चर लाव रे !' अशी फर्माईश आलीच. मग इकडे तिकडे शोध घेत असतानाच अचानक कधितरी कॉपी करुन ठेवलेला 'गोजिरी' चित्रपट हाताला लागला. (भवतेक मकीच्या कडुन मिळाला असावा. खात्री नाही)


चित्रपट सुरु झाला आणि काही वेळातच मैत्रिण पटकन ओरडली अरे हा असाच चित्रपट आधी कुठेतरी पाहिला आहे. "अग बावळट 'गोजिरी' म्हणजे '50 First Dates' ह्या नितांत सुंदर चित्रपटाचे मराठीकरण आहे." मी लगेच ज्ञान पाजळून घेतले. "अय्या ! खरच की." म्हणत मैत्रिणीने डोक्याला हात मारला.


50 First Dates हा एक नितांत सुंदर अनुभव देणारा चित्रपट आहे. त्याला मराठीत आणताना 'गोजिरी'चे दिग्दर्शक विजु माने कुठेही कमी पडलेले नाहीत. जेवढा सुंदर अनुभव इंग्रजी चित्रपट देतो तेवढाच झकास अनुभव 'गोजिरी' देखील देतो. पण मग मुळात माझ्यासमोर प्रश्न आल की नक्की ओळख कोणत्या चित्रपटाची करुन द्यावी ? इंग्रजी का मराठी ? मग ठरवले दोन्ही चित्रपटांना हातात हात घालुन समोर उभे करु.

50 First Dates आला २००४ मध्ये तर गोजिरी आला होता २००७ मध्ये. इंग्रजी चित्रपटात अ‍ॅडम सँडलर आणि ड्र्यु बॅरिमॉर ह्यांनी वठवलेल्या भुमिका मराठीत अनुक्रमे सुनिल बर्वे आणि मधुरा वेलणकर ह्यांनी वठवलेल्या आहेत. 50 First Dates नायकाकडे एक झकास अ‍ॅक्वेरिअम आहे तर मराठी चित्रपटात ती कमतरता कोकणचा किनारा भरुन काढतो.

मी येवढे कौतुक करत असलेल्या ह्या चित्रपटांची कहाणी अशी आहे तरी काय ? कहाणी म्हणाव तर अगदी साधी, म्हणाव तर जिवाला चटका लावणारी. खुशालचेंडु नायकाला नायीकेचे भेटणे आणि थोड्याश्या वादावादीनंतर त्याला 'हिच ती' असा साक्षाक्तार होउन खर्‍या प्रेमाची ओळख पटणे. इथपर्यंत कहाणी अगदी टिपिकल फिल्मी वगैरे आहे. पण आदल्या दिवशी नायकाला भेटलेली, एकेमेकांचे विचार जुळल्याने नायकाच्या बर्‍याच जवळ आलेली आणि त्याला कुठेतरी ती आपल्या प्रेमात पडत आहे असा विश्वास बसत असतानाचा अचानक दुसर्‍या दिवशी नायकाला ओळखही न दाखवणारी नायीका समोर येते आणि इथे चित्रपट एक वेगळेच वळण घेतो. काही वेळासाठी तर नायक (पक्षी :- अ‍ॅडम सँडलर किंवा सुनिल बर्वे) देखील चक्रावुन जातो. आणि मग नायकाला खरे रहस्य कळते के नायिकेला 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' आहे. आज जे काही घडेल ते सर्व ती उद्या पुन्हा विसरुन जात असते.




मराठी चित्रपटात सुनिल बर्वेला हे रहस्य तो जेंव्हा मधुरा वेलणकरला मागणी घालायला तीच्या घरी जातो तेंव्हा तिच्या आजोबांकडून (अरुण नलावडे) कळते असे दाखवले आहे. मग सुरु होतो तो नायकानी रोज सकाळी नायिकेला एका वेगळ्या रुपात भेटण्याचा आणि तिला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करण्याचा एक अनोखा खेळ. त्याला खेळ तरी कसे म्हणावे ? पण रोज नव नव्या युक्त्या योजुन नायिकेला भेटणे आणि तिचा विश्वास संपादन करत जाणे हे अ‍ॅडम सॅंडलर असो वा सुनिल बर्वे ह्या दोघांनिही इतके अप्रति उभे केले आहे की जणु ते ति भुमिका जगले आहेत असेच वाटते. मधुरा वेलणकर मात्र ड्र्यु बॅरिमोरच्या तुलनेते साफ फिक्की पडली आहे असे आपले माझे मत ! हि भुमिका करताना मधुरा वेलणकर काहीशी अवघडलेली वाटते.

मराठी चित्रपटात सुनिल बर्वेला हे रहस्य तो जेंव्हा मधुरा वेलणकरला मागणी घालायला तीच्या घरी जातो तेंव्हा तिच्या आजोबांकडून (अरुण नलावडे) कळते असे दाखवले आहे. मग सुरु होतो तो नायकानी रोज सकाळी नायिकेला एका वेगळ्या रुपात भेटण्याचा आणि तिला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करण्याचा एक अनोखा खेळ. त्याला खेळ तरी कसे म्हणावे ? पण रोज नव नव्या युक्त्या योजुन नायिकेला भेटणे आणि तिचा विश्वास संपादन करत जाणे हे अ‍ॅडम सॅंडलर असो वा सुनिल बर्वे ह्या दोघांनिही इतके अप्रति उभे केले आहे की जणु ते ति भुमिका जगले आहेत असेच वाटते. मधुरा वेलणकर मात्र ड्र्यु बॅरिमोरच्या तुलनेते साफ फिक्की पडली आहे असे आपले माझे मत ! हि भुमिका करताना मधुरा वेलणकर काहीशी अवघडलेली वाटते.


आयुष्यात फक्त रोज एकच दिवस जगणारी 50 First Dates चि नायिका रोज आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा करत असते तर 'गोजिरी' मध्ये मधुरा वेलणकर रोज आपल्या लहान बहिणीचा. आधी गंमत वाटणारा हा प्रसंग नंतर नंतर नायिकेच्या हतबलतेची आणि मुख्य म्हणजे तिला त्याची जाणीवच नाहिये हे कळल्यानंतर अंगावर काटा उभा करायला लागतो. अभिनयाच्या बाबतीत बॅरिओरला १०/१० मार्क्स. आणि हो सौंदर्याच्या बाबतीत देखील १०/१०. 50 First Dates मध्ये उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये अ‍ॅडमिट केल्यानंतर बॅरिमोरची भेट एका फक्त १० सेकंद स्मरणशक्ती टिकुन राहत असलेल्या रुग्णाशी होते, त्यावेळी तिने केलेला अभिनय आणि तिचा बरच काही बोलुन जाणारा चेहरा ह्या साठी मी कमित कमी ३ वेळा 50 First Dates पाहिला असेल.


चित्रपटाचा शेवट सांगून तुमचा रसभंग नक्कीच करणार नाही, पण एकाच कथेवर बेतलेले असले तरी हे दोन्ही चित्रपट एकदा तरी आवश्य पहाच अशी शिफारस मात्र नक्की करीन. गोजिरील मिलिंद इंगळेने दिलेले संगित देखील सुंदर, त्याच बरोबरीने एक वेगळाच कोकण किनारा देखील आपल्या इथे भेटिला येतो हे विशेष. हे दोन्ही चित्रपट तु-नळी वर ११/१२ भागात उपलब्ध आहेत.

.