शनिवार, १९ डिसेंबर, २००९

डॅम इट !

"अरे नगमा, दिपीका सारख्यांपासुन तो कोण तो बिहारी नट, त्यांच्या नावाचा तिकिटासाठी विचार होतो आणी मराठीतील एका कलाकरालाच्या नावाची अफवा सुद्धा उठत नाही म्हणजे काय ?" महेश कोठारे तावातावाने बोलत होता. काहि वेळाने धाप लागल्यावर परत एकदा 'डॅम इट' म्हणुन तो खाली बसला.

"अरे बाबा त्यांच्या नावाला ग्लॅमर असत रे ! कळतय का तुला ?" स्मिता तळवळकर महेशला समजावत्या झाल्या.

"का ? माझ्या श्वास चित्रपटाला ग्लॅमर न्हवते ? ऑस्कर पर्यंत वारु दौडला की त्याचा !" संदिप सावंतानी हिरिरिने आपला मुद्दा मांडला.

"डॅम इट ! घरघर लागायची वेळ आलीये आता. काहितरी केलेच पाहिजे. ह्या राजकिय अभिसरणाच्या प्रक्रियेत आपणही उतरलेच पाहिजे." जोग सरांच्या चिरंजीवांसाठी चित्रपट काढल्यापासुन महेशराव फारच अगम्य बोलायला लाग्ले आहेत.

"तसा मला नगरपाल पदाचा राजकीय अनुभव आहेच. काय म्हणता ?" किरण शांताराम अंदाज घेत म्हणाले.

"अहो तुम्हाला आता कशाला उद्याची बात चे रिमिक्स सहन होत नाही, तुम्ही स्वत:चे रिमिक्स कसे सहन करणार राजकारणात ?" देशाला मराठी नेतृत्व कसे खंबीर हवे ! आमच्या अजिंक्य सारखे. काय देखणा आणी करारी दिसलाय तो 'वासुदेव बळवंत' मध्ये." इती रमेश देव.

"आमचा सुशांतसुद्धा देखणा आणी करारीच आहे म्हणले" किरणरावांचा संयम आता सुटायला लागला होता.

अचानक जोरात टेबल ठोकल्याचा आवाज झाला. सर्वांनी बघितले तर जयश्रीताई हातानी सगळ्यांना गप्प बसायला सांगत होत्या. गंमत काय झाली होती, की त्या गेले अर्धा तास बोलण्यासाठी तोंड उघडत होत्या पण त्यांच्या तोंडातुन शब्द बाहेर पडेपर्यंत त्या जांभई देत आहेत समजुन दुसराच कोणीतरी बोलायला सुरुवात करत होता.

"अशी असावी सासु नंतर एका मुत्सद्दी आणी खंबीर स्त्री ची प्रतिमा बनली आहे माझी." एकदाचा त्यांचा आवाज बाहेर आला.

"बाई अहो मग असे असेल तर आम्ही तुमच्या चार काय चारशे पावले पुढे हाये म्हणायचे की तिच्यामायला." कोपर्‍यातुन निळुभाउ म्हणाले.

"माझ्या मते आपण एक भक्कम पाठींबा असलेल्या आणी सामान्य जनतेच्या मनापर्यंत पोचलेल्या स्त्रीला निवडणुकीला उभे करावे. मी आणी तळवळकर जीम ह्यासाठी सर्व तर्‍हेचे प्रयत्न करु. संजय सुरकर साथीला असेलच." स्मिताताई म्हणाल्या.

"पण स्त्रीच का ? एखादा पुरुष सुद्धा ह्या किंवा ह्यापेक्षा जास्ती गुणांनी युक्त असु शकतो. आणी आधार म्हणाल तर आज मी एकट्याच्या जिवावर अख्खा सिनेमा ओढुन नेतोय." एकदाचे अनासपुरे रेकले.

"ह्या सगळ्या गुणांनी आम्हे सुद्धा युक्त आहोत." भरत जाधव.

"च्यायला श्रीखंडाची जाहिरात एकल्या सारखे वाटले." निळुभाउ.

"हे बघा, जनतेच्या हिताचे आणी योग्य निर्णय राबवु शकेल असा माणुस तिकडे गेला पाहिजे. जेष्ठ असेल तर अजुनच उत्तम" श्रीराम लागु म्हणाले.

"निवडणुक लढवायची आहे 'काचेचा चंद्र' पुन्हा रंगभुमीवर आणायचे नाहिये डॉक्टर." जयश्रीताई पुन्हा बोलत्या झाल्या.

" मी काय म्हणतो..." महेश.

"काहि म्हणु नका. आधीच तो जबरदस्त काढुन डोक्याला त्रास दिला आहेत तेव्हडा बास नाहिये का ?" स्मिताताई.

'कॉलेजच्या गोष्टी' काढण्यापेक्षा ते बरे नाही का ? महेश.

"विमानाच्या तिकिटाशिवाय उदघाटनाला यायला जमणार नाही म्हणणारे आता जनतेची सेवा करणार म्हणे." किरण शांताराम.

वैयक्तीक आरोप प्रत्यारोप चालु असतानाच अचानक हॉल मध्ये शांतता पसरली. १० मिनिटांनी आम्ही आत डॉकावुन पाहिले तो हॉल रिकामा ! सेवकाकडे विचारणा करता असे कळाले की 'नाना' येतोय म्हणुन फोन आला होता म्हणे.

संदर्भ :- काहि काळापुर्वी शिरीष कणेकर ह्यांनी मराठी निर्माते 'टायटॅनीक' वरुन मराठी चित्रपट काढण्याचे ठरवतात असा एक छोटेखानी विनोदी लेख लिहिला होता. त्या लेखाच्या आधारे हा निवडणुक तिकिटाचा प्रसंग रंगवण्याचा प्रयत्न केला आहे.

पॉंटिंग पॉंटिंग

पॉंटिंग नावाच्या वाचाळ प्राण्याने सुनिल गवासकर ह्यांच्या वर केलेल्या टिकेविषयी आपण वाचले असेलच. बर्‍याच मान्यवरांनी ह्या विषयावर भाष्य टाळले. परंतु काहि माजी भारतीय कर्णधारांच्या दैनंदिनीत मात्र ह्या विषयी बरेच लिहिलेले आढळले. ह्या काहि निवडक प्रतीक्रिया.

बिशन सिंग बेदी :-

ओये होये मुंडे मे बडा दम हैगा ! बर्‍याच वर्षानी का होइना पण कोणीतरी त्याला आरसा दाखवल बरे झाले. देवदूत कसला असुर आहे तो ! ह्याला येव्हडे सावरुन घेतले पण शेवटि काय ? ह्यांच्या हाथाखाली आम्हाला खेळायला लावले. माझा सल्ला तरी घ्यायचा होता त्या रिकी नि, मग एका रणजी सामन्यात डाव्या हातानी फलंदाजी करण्यापर्यंत ह्यांची मजल कशी गेली होती ते पण त्याला सांगीतले असते मी. उघड पणे नाही पण रात्री हळुच २ 'पतियाळा' जास्त मारुन मी सेलिब्रेट केलेच.
हो मै बेदी रब रब कर दि हो मै बेदी.

सचिन तेंडुलकर :-

आयला ! खरे बोलला रिक्या अगदी. देवदूत असे नसतातच. सामना चालु व्हायच्या ४ दिवस आधीपासुनच जे मिडीया , जुने खेळाडु ह्यांच्या मदतीने समोरच्या टिम च्या विकेट काढायला सुरुवात करतात, दिवसभर दारुच्या गुत्त्यात हिंडत असल्यासारखे वागत आणी बडबडत असतात, षटकातला शेवटचा चेंडु सरपटी टाकुन प्रतिस्पर्धी संघाला नेस्तनाबुत करतात, ते देवदूत असतात. समोरच्या संघातील सर्वात चांगल्या गोलंदाजाला जे 'चकर' म्हणतात, त्याच्यावर वांशीक टिपणी करतात, जे त्याला अंडी फेकुन मारतात, ते देवदूत असतात. समोरच्या संघातील खेळाडुला जे अतीरेकी म्हणतात ते देवदूत असतात. आणी खरे सांगायचे तर देवदूत फक्त ऑस्ट्रेलीयात जन्माला येतात.

सौरव गांगुली :-

उडी बाबा कि बोल छे. 'गिरे तो भी नाक उपर' असे आहे ह्या ऑस्ट्रेलीया वाल्यांचे. येव्हडा सपाटुन मार दिला तरी माज उतरेना ह्यांचा. हाता पायानी काही करु शकले नाहित आता तोंडानी उजेड पाडत आहेत. त्या लॉर्डस वर कसा शर्ट काढुन फिरवला होता तसा गरा गरा फिरवावेसे वाटत आहे ह्याला. तो माझ्यावर जो जोक फार फ़ेमस झाला होता ना, तो नक्की ह्या ऑस्ट्रेलीया वाल्यांच्या मीडीया मधुन आला असणार. काय तर म्हणे, एकदा ड्रेसिंगरूम मध्ये माझ्या बायकोचा डोना चा फोन येतो, तिला तो थेरडा सांगतो कि सौरव आताच फलंदाजी करायला गेलाय, तर डोना म्हणते "ठिक आहे मी होल्ड करते २ मिनीट." नालायक माणसे, चांगले खडसावले सुनील सरांनी ते बरेच केले. चला आता बास, आज टि.व्हि. वर जुना कार्यक्रम दाखवणार आहेत डोना चा. ( निरखुन पाहिले असता तिथे 'नगमा' खोडुन 'डोना' केलेले आढळले.)


शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

गोष्ट छोटी डोंगरा एवढी



"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या".

कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'.

ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ? सात बार्‍यावरच्या कर्जाच्या नोंदी, सर्कारी बियाणे वाटपाची खरी परिस्थीती, शेतकर्‍यासाठी म्हणुन मिळणारे कर्ज आणी ते मिळवताना येणार्‍या अडचणी, संबंधीत लोकांनी केलेली अडवणुक सगळे अगदी काळजाला हात घालणारे.

शेतकर्‍याच्या प्रश्नाला वाचा फोडणारे म्हणुन बरेच चित्रपट येउन गेले आणी येतील, पण बळीराजाच्या खर्‍या प्रश्नांची आपल्यासमोर मांडणी करणारा चित्रपट म्हणुन 'गोष्ट छोटी डोंगरा एवढीची' दखल निश्चीतच घ्यावी लागेल.

कथेची उत्कृष्ट मांडणी आणी त्याला कलाकारांच्या अभिनयाची तेव्हडीच मिळालेली अप्रतिम साथ हे ह्या चित्रपटाचे वैशीष्ठ्य म्हणता येईल. भरत जाधव आणी मकरंद अनासपुरेचा चित्रपट म्हणले की आजकाल पळुनच जावेसे वाटत होते, अशावेळी मकरंद अनासपुरेचा ह्या चित्रपटातील संयत अनुभव अत्यंत सुखावुन जातो. मकरंदनी नेहमीप्रमाणेच अतिशय समजुन उमजुन हि भुमीका केली आहे. कारकिर्दीत त्याला मिळालेली एक आव्हानात्मक भुमीका असा हिचा उल्लेख करायला हरकत नाही.



नागेश भोसले हा असाच अजुन एक ताकदीचा अभिनेता. देहबोली आणी आवाजाचा पुरेपुर फायदा कसा उठवावा हे ह्या अभिनेत्याकडुन शिकुन घ्यावे. ह्या चित्रपटात त्यानी मकरंदच्या गरीब शेतकरी मित्राची भुमीका साकारली आहे. कुटुंबासाठी धडपडणारा, पैशाची कायमच अडचण असतानाही शहरातुन आपला मित्र मकरंद आलेला बघुन त्याच्यासाठी श्रिखंड आणणारा, कर्जाच्या डोंगराखाली बैल विकावा लागल्यावर स्वत:ला नांगराला जुंपणारा नागेश भोसले काळजात घर करुन जातो.

शेवटी हालाखीच्या परिस्थीतीमुळे आणी कर्जाच्या डोंगराखाली हा नागेश भोसले किटकनाशक पिउन आत्महत्या करतो तो प्रसंग तर डोळ्यात पाणी आणणारा. रात्री उशीरा अडखळत परत आला म्हणुन बायकोची आणी मित्राची बोलणी खाताखाता, "दारु पिउन आला का?" विचारल्यावार नागेश भोसले म्हणतो "दारु नाही, किटकनाशक प्यायलोय..." बास, संपुर्ण थेटरच आपल्या डोळ्याभोवती गरकन फिरल्यासारखे वाटते.



शेतकर्‍याला कर्जासाठी, सरकारकडुन होणार्‍या बियाणे पुरवण्यासाठी वेळोवेळी कसे नाडले जाते, प्रत्येक ठिकाणी टेबलाखालच्या पैशासाठी कशी अडवणुक होते, पावसाचा लहरीपणा, २२/२२ तास गायब असणारी विज ह्या सगळ्याचे विदारक चित्र दिग्दर्शकाने साकारले आहे. चिकुच्या मिळालेल्या ५/- रुपायाच्या सरकारी चेकसाठी ५००/- पेक्षा जास्त पैसे भरुन बॅंकेत शेतकर्‍याला खाते उघडावे लागते हि माहिती ऐकुन तर डोक्याला हात लावायची पाळी येते.

शेवटी जेंव्हा मकरंद अनासपुरे "एक माणुस म्हणून तरी शेतकर्‍याचे अस्तीत्व मान्य करा" असे कळवळुन म्हणतोना तेंव्हा कुठेतरी आपल्याला आपणच गुन्हेगार असल्यासारखे वाटायला लागते.



मकरंद अनासपुरे, कै. निळुभाउ फुले, नागेश भोसले, सयाजी शिंदे, माधवी जुवेकर, मधु कांबीकर अशा उत्तमोत्तम ताकदीच्या कलाकारांचा सुंदर अभिनय ह्या चित्रपटाची जमेची बाजु आहे. चित्रपटात अधुन मधुन वाजणारे शिर्षक गीत मात्र डोक्यात जाते येव्हडाच काय तो चंद्रावर डाग म्हणायचा. आधी हा उपदव्याप अजय - अतुल ह्या संगितकारांचा(?) असावा असे वाटत होते पण नंतर तो शैलेंद्र बर्वे ह्या संगीतकाराचा आहे असे जालावर शोध घेता कळाले.

एकुणच बळीराजाचे खरे वास्तव जाणुन घेण्यासाठी हा चित्रपट निश्चीतच पहा.