सोमवार, २१ नोव्हेंबर, २०११

शटर

1

मध्ये सपाट्याने काही हॉरर चित्रपट बघितले होते. त्यातील 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अ‍ॅकेशिआ' ची ओळख ह्या आधी करून दिलीच आहे. ह्याच यादीतला आणखी एक चित्रपट म्हणजे 'शटर'. 'अ टेल ऑफ टू सिस्टर्स' आणि 'अ‍ॅकेशिआ' हे काहीसे गडद गडद अंधारात घडणारे , मानसिक आंदोलने दाखवणारे चित्रपट होते, मात्र शटर ह्यापेक्षा पूर्णपणे भिन्न आणि सतत तुमच्या मनावर एक दडपण ठेवून असणारा चित्रपट. ह्या चित्रपटात देखील रक्तपात, हिडीस चेहरे ह्याचा समावेश नाही, मात्र चित्रपटाची फ्रेम अन फ्रेम आपल्याला खिळवून ठेवते.



टन हा एक प्रोफेशनल फोटोग्राफर असतो. तो आणि त्याची गर्लफ्रेंड जेन एकदा पार्टीवरून परत येत असताना, जेनच्या हातून एक अपघात घडतो. ती आपल्या गाडीने एका तरुण मुलीला उडवते. गाडीबाहेर जाऊन तिला मदत करण्याच्या विचारात असलेल्या जेनला टन थांबवतो आणि त्या तरुणीला तसेच रस्त्यात सोडून दोघे निघून जातात. इथून खर्‍या अर्थाने चित्रपटाला सुरुवात होते.

2

ह्या प्रसंगानंतर एकाएकी अनेक चमत्कारिक घटना घडू लागतात. सतत आपल्या भोवती कोणीतरी वावरत आहे असे दोघांना वाटत असते. त्यातच टनने काढलेल्या प्रत्येक फोटो मध्ये एक धुरकट आकृती दिसायला लागते. कधी धुरकट सावलीच्या रूपात, तर कधी चेहर्‍याचा रूपात. प्रथमतः टनला हा कॅमेर्‍याचा प्रॉब्लेम वाटतो, मात्र तसे काहीच निष्पन्न होत नाही. इकडे जेन मात्र आपण ज्या मुलीला उडवले त्या मुलीचा आत्माच हे सगळे करत आहे ह्या निष्कर्षावर पोहोचते. टनला मात्र हे सगळे अमान्य असते.

3

टनच्या मित्रांना देखील आता विचित्र अनुभव यायला लागतात. टनला देखील अचानक मानदुखीचा त्रास सुरू झालेला असतो, त्याचे वजनकाटा देखील त्याचे वजन विचित्र दाखवायला लागलेला असतो. शेवटी जेन त्या अपघातग्रस्त तरुणीचा शोध सुरू करते. तपासात जेनला त्या मुलीचे नाव नात्रे असल्याचे आणि ती आणि टन व त्याच्या मित्रांचा ग्रुप कधीकाळी एकाच कॉलेजात शिकत असल्याचे समोर येते. आता मात्र टनला सत्य सांगण्याशिवाय पर्याय उरत नाही. कधी काळी त्याचे आणि नात्रेचे प्रेमसंबंध होते, मात्र त्याने नाते तोडल्यावर ते दु:ख सहन न होऊन नात्रेने आत्महत्या केल्याचे टन कबूल करतो. इकडे टनचा एक मित्र नात्रेच्या आत्म्याच्या भितीने आत्महत्या करतो. आता पुढचा नंबर आपलाच असल्याची त्याची खात्री पटते.

ह्या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावायच्या इराद्यानेच आता जेन आणि टन दोघेही नात्रेच्या आईला जाऊन भेटता. तिथे गेल्यावर नात्रेने कशी आत्महत्या केली हे त्यांना कळते, मात्र नात्रेची आई तिचा मृत्यू मान्य करायलाच तयार नसते. तिने आपल्या मुलीचे प्रेत अर्थात सांगाडा तिच्या बेडरूम मध्ये जतन करून ठेवलेला असतो. त्याच रात्री हॉटेलात उतरलेल्या टन आणी जेनवरती नत्रेचा आत्मा हल्ला करतो, ज्यात टन जखमी होतो. अथक प्रयत्नांनी दोघेही तिच्या आईला समजवतात आणि शेवटी नात्रेची विधिपूर्वक विल्हेवाट लावली जाते.

4

आता सर्व काही सुरळीत होईल ह्या आशेनं परतलेल्या जेनला काही फोटो मिळतात, जे नात्रेचे टनच्या फ्लॅट मधील अस्तित्व दाखवत असतात. फोटोंचा माग घेत असतानाच एका जेनच्या हातात एका बुकशेल्फ मध्ये लपवलेल्या काही जुन्या निगेटिव्ह्ज लागतात. त्या डेव्हलप केल्यानंतर एक भयानक रहस्यच जेनच्या समोर येते आणि चित्रपटाला वेगळेच वळण लागते. हे रहस्य काय असते ? टन आणि त्याच्या मित्रांच्या जीवावर नात्रेचा आत्मा का उठलेला असतो ? हे सगळे शोधायचे तर शटर पाहण्याशिवाय पर्याय नाही. आणि हो हे सर्व सोडाच पण 'टनला नक्की मानदुखीचा त्रास कशाने होत असतो' ह्या एकमेव प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी तरी शटर पाहाच पहा.

5

शटरचा त्याच नावाने २००८ साली अमेरिकन रीमेक देखील आलेला आहे, तर हिंदीत तो क्लिक नावाने आला होता. मी तरी तुम्हाला 'ओरिगिनल' शटरच बघण्याचा सल्ला देईन. अर्थात जालावर त्याचे सबटायटल्स सहजपणे उपलब्ध आहेतच. एका वेगळ्या प्रकारचा हॉरर चित्रपट बघायची इच्छा असेल आणि मिनिटा मिनिटाला नवनवे धक्के बसणे आवडत असेल तर शटरला पर्याय नाही.

हा संपूर्ण चित्रपट आंतरजालावर फुकट उपलब्ध आहे.

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

!! मोरया !!



बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्‍यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या. किरकोळ बदल सोडता अवधूत गुप्ते ह्यांनी झेंडाचीच टीम इथे उतरवलेली आहे.

कथा-पटकथा-संवाद अशी तिहेरी जबाबदारी सचिन दरेकर ह्यांनी सांभाळलेली असून, अतुल कांबळे आणि अवधूत गुप्ते ह्यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळलेली आहे. दिग्दर्शन म्हणून पुन्हा एकदा अवधूत गुप्तेच आहेत. चित्रपटात दिलीप प्रभावळकर, स्पृहा जोशी, चिन्मय मांडलेकर, परी तेलंग, संतोष जुवेकर, मेघना एरंडे, धनश्री कोरेगावकर अशी तरुण आणि अभिनयसंपन्न स्टारकास्ट आहे. अर्थात ह्यातील परी तेलंग व मेघना एरंडे ह्यांच्या भूमिका प्रमुख भूमिका म्हणून का गणल्या गेल्या आहेत हा मोठा प्रश्नच आहे.


गणेशोत्सव, त्याचे पावित्र्य, गणेशाच्या उत्सवात शिरकाव करून बसलेल्या वाईट प्रथा, गणेशोत्सवाच्या आधारे चालवले जाणारे राजकारण आणि एकूण राजकारण्यांची प्रवृत्ती अशा सगळ्या गोष्टींवर प्रकाश टाकायचा प्रयत्न म्हणजे 'मोरया' हा चित्रपट. कथेच्या जोडीला चाळीचे बिल्डिंगमध्ये रुपांतर, दोन चाळींमधला आपलाच गणपती कसा मोठा ह्यासाठी होणारा संघर्ष, तरुणाईची सध्याची तगमग असल्या पटकथांची देखील जोड आहे. मुळात कथाच दमदार नसल्याने ह्या पटकथा देखील तिला टेकू देऊ शकलेल्या नाहीत. ना भरभक्कम कथा, ना पटकथा, त्यातच संवादात देखेल फारसा दम नसल्याने अनेक गुणी कलाकार असूनही हा मोरया काही सुखकर्ता ठरत नाही.

समोरासमोर परंतु एकाच जागेत असलेल्या गणेश चाळ व खटाव चाळ ह्या दोन चाळी. दोन्ही चाळींचे गणपती वेगळे, इतर सणवारही वेगवेगळे साजरे होणारे. लवकरच तिथे विकसन होणार असल्याने, बिल्डरने एकाच गणपतीसाठी मंदिराची सोय करण्याचे कबूल केले आहे. आता एकाच गणपतीची स्थापना ह्यापुढे दरवर्षी करायचे चाळकरी ठरवतात. दोन्ही चाळीतल्या तरुणांना मात्र हे मान्य नाही. एका चाळीच्या तरुणांचा नेता आहे चिन्मय मांडलेकर तर दुसर्‍या चाळीचा अर्थातच संतोष जुवेकर. ह्या दोन्ही चाळीतला शहाणा मनुष्य म्हणजे दिलीप प्रभावळकर. अर्थात दोन्ही गट त्यांच्या शब्दाबाहेर नाहीत. शेवटी ह्या वर्षी ज्या गटाचा गणपती जास्ती गर्दी खेचेल, जास्ती प्रसिद्धी मिळवेल तो टिकेल असा ठराव होतो आणि दोन्ही गट जीव तोडून मेहनतीला लागतात.




आता आपलाच गणपती टिकला पाहिजे ह्या ईर्ष्येने दोन्ही गट पेटून उठल्याने मग मोठ्या प्रमाणावर वर्गणी गोला करण्याची चढाओढ सुरू होते. वेळेप्रसंगी मग त्यासाठी एका गटाकडून राजकारण्यांचा आसरा घेतला जातो तर एका गटाकडून चक्क मुसलमान मालक असलेल्या यात्रा कंपनीचे पोस्टर मांडवाबाहेर झळकवले जाते. गणपती बाप्पाची स्थापना झाल्यानंतर तर एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी नाही नाही त्या मार्गांचे अवलंब करायला दोन्ही गट सुरुवात करतात. मग आपला गणपती नवसाला पावतो अशी संतोष जुवेकरच्या गटाने चॅनेलवरती खोटी जाहीरात करताच, चिन्मय मांडलेकरच्या गटाकडून त्यांनी लावलेले मुसलमानी पोस्टर आणि त्यांचा गणेशोत्सव कसा सर्वधर्म समभाव निर्माण करणारा आहे ह्याची जाहिरातबाजी केली जाते. त्याच वेळी चिन्मय मांडलेकर हा खरा मुसलमान, मात्र सच्चा गणेशभक्त असल्याचे दाखवून अवधूत गुप्ते आपल्याला छान चक्कर आणतो. डोक्याला हात मारून पुढे काय घडते ते बघण्याशिवाय आपल्या हातात काही नसते.



मग उरलेल्या काळात बाप्पासाठी कार्यकर्ते कशी जीवतोड मेहनत घेतात, संतोष जुवेकर सारखे तडफदार [?] तरुण रजा मिळाली नाही तर नोकरी वरती लाथ कशी मारतात, दहा दिवस कार्यकर्ते बाप्पासाठी दारूचा त्याग कसा करतात इ. इ. आपण नेहमी वाचत असलेले आणि बघत असलेले प्रसंगच साकार होतात. त्यामुळे मधल्या वेळात थोडीशी डुलकी घेतली तरी चालेल.

हान तरा आता सरळ मार्गाने पुरेसे यश काही मिळत नाही म्हणल्यावरती दोन्ही गटाकडून गैरमार्गाचा वापर केला जातो. अर्थात त्याला पाठिंबा असतो तो राजकारण्यांचाच. एका गटाकडून दुसर्‍या गटाच्या मांडवामागे दारूच्या बाटल्यांचा ढीग ठेवला जातो आणि त्याचे चित्रीकरण करून चॅनेलवरती दाखवले जाते. अर्थात मग दुसर्‍या गटाकडून विरुद्ध गटाच्या मांडवाबाहेर लावलेल्या हिरव्या पोस्टरचे नुकसान केले जाते. ही घटना घडते आणि ताबडतोब शहरात दंगली उसळतात. मग दोन्ही धर्माचे राजकारणी त्याचा येणार्‍या निवडणूकीत कसा वापर करता येईल त्याच्या हिकमती लढवायला लागतात. शेवटी काय होते ? खरा गुन्हेगार सापडतो ? दोन्ही गटांना आपली चूक लक्षात येते ? आणि शेवटी गणपती कुठल्या गटाचा राहतो ? ह्या प्रश्नांची उत्तरे हवी असतील तर 'मोरया' दर्शाना शिवाय पर्याय नाही. अर्थात आजकालच्या तुम्हा जाणकार मंडळींना असे प्रश्न पडतील असे वाटत नाही. ह्याची उत्तरे चित्रपट न बघताच तुम्हाला कळले देखील असतील.



बरं आता चित्रपटाचे येवढे पोस्टमार्टेम केल्यावर, चित्रपटात काही चांगले आढळलेच नाही का ? नक्की आढळले. स्पृहा जोशी, चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर ह्या तरुणांचा अभिनय, त्यांचे लुक्स, त्यांची संवादफेक, कॅमेर्‍याचे ज्ञान सगळे सगळे आवडले. चित्रपटाचे चित्रीकरण, वापरलेले लोकेशन्स देखील झकास. शीर्षक गीत, दहीहंडी नृत्य देखील झकास जमले आहे. मात्र दिलीप प्रभावळकर ह्यांना अशी आगा पिच्छा नसलेली आणि जणूकाही समोपदेशकाच्या थाटाची भूमिका देऊन वाया का घालवले आहे ते कळत नाही. परी तेलंग, मेघना एरंडे ह्या देखील चॅनेल्सच्या निवेदकांच्या भूमिकेत छाप पाडू शकलेल्या नाहीत. अर्थात भूमिका मध्येच काही दम नसल्याने त्यांना दोष का द्यावा ? मुळात ह्या दोन चाळीतल्या गणेशोत्सवा शिवाय जगात काही घडतच नाहीये अशा ठाम मानसिकतेने ही चॅनेल्स चाळीतच ठाण मांडून का बसलेली असतात ते बाप्पालाच ठाऊक.



राकारण्याच्या भूमिकेत इथे पुन्हा एकदा ३/४ प्रसंगात पुष्कर श्रोत्री दर्शन देतो. त्याची भूमिकाच उद्धव ठाकरे टाईप लिहिली आहे, का तो अजून झेंडाच्या मानसिकतेतून बाहेरच पडू शकलेला नाही ते कळत नाही. चित्रपटात मध्येच एक मुसलमान नेता कम बिझनेसमनचे पात्र घुसडलेले आहे. कुठल्याच पात्राला एक ठाम अशी विचारधारा किंवा ज्याला ग्राउंड म्हणावे ते पुरवले गेलेले नाही. कुठलेच पात्र ठसठशीत झालेले नाही. स्पृहा जोशी फक्त गायला मिळते, गळ्याचा कस वगैरे लागतो म्हणून डान्सबार मध्ये गात असते हे तर पटता पटत नाही. चिन्मय मांडलेकर, संतोष जुवेकर हे पोटापाण्यासाठी, रोज रात्री दारू पिण्यासाठी पैसे कुठून आणतात हा प्रश्न प्रत्येकाने आपापल्या बुद्धिसामर्थ्यावर सोडवावा.
एकुणात काय तर एकाच चित्रपटात सगळेच काही दाखवण्याचा अवधूत गुप्तेंचा प्रयत्न पूर्णपणे फसला आहे.

शनिवार, ५ नोव्हेंबर, २०११

Acacia (कोरिअन चित्रपट)



हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये कोरिअन चित्रपट हे कायमच स्वतःचा असा एक वेगळा दर्जा टिकवून राहिलेले आहेत. ह्या चित्रपटांच्या यादीतलाच एक अप्रतिम चित्रपट म्हणजे अकॅशिआ. अकॅशिआ म्हणजे छोटी छोटी पिवळी फुले येणारा एक वृक्ष.



डॉक्टर किम आणि त्यांची पत्नी मी-सूक हे विनापत्य दांपत्य. आपल्या वडिलांच्या मदतीने शेवटी एकदा डॉक्टर किम आपल्या पत्नीला मूल दत्तक घेण्यासाठी राजी करतो आणि ह्या चित्रपटाला सुरुवात होते. कलेची आवड असणारी मी-सूक जिन्साँग ह्या सतत चित्रे काढण्याची आवड असणार्‍या अनाथ मुलाला दत्तक घेण्याचा निर्णय घेते. जिन्साँगच्या घरी येण्याने ह्या कुटुंबाच्या एका नव्याच आयुष्याला सुरुवात होते.



अतिशय अबोल आणि सतत झाडांचीच चित्रे काढण्यात मग्न असणारा जिन्सॉंग आपल्या सभोवताली कायमच एक गूढ वलय बाळगून असतो. काही दिवसातच जिन्साँग समोरच्या घरात राहणार्‍या मिन्जी ह्या लहान मुलीकडे आणि त्याच्या घराच्या बागेत असलेल्या एका वठलेल्या अ‍ॅकेशिआ वृक्षाकडे आकर्षित होतो. ते झाड म्हणजे आपली मेलेली आई असल्याचे जिन्सॉंगचे ठाम मत असते. मिन्जीच्या संगतीत काहीसा अबोल असणारा जिन्साँग थोडाफार बोलका तर बनतोच पण काहीसा दुराग्रही आणि हट्टी देखील बनायला लागतो. त्यातच मी-सूक ला दिवस जातात आणि सगळे चित्रच बदलते.



आपली आई आता नव्या बाळाची आई होणार ह्या कल्पनेने आधीच हट्टी असलेला जिन्साँग फारच दुराग्रही बनून जातो. त्यातच मुलीच्या प्रेग्नन्सीची बातमी ऐकून हजर झालेली मी-सूक ची आई तिला जिन्साँगला परत अनाथाश्रमात पाठवायचा सल्ला देते. मी-सूक मात्र त्याला तयार होत नाही. बाळाच्या जन्मानंतर मात्र जिन्साँगचे वागणे एकदमच खुनशी होऊन जाते आणि सगळे कुटुंबच दचकते. जिन्साँगला सतत समजून घेण्याचा प्रयत्न करणारी मी-सूक देखील आता त्याच्याशी प्रेमाने वागेनाशी होते. अशा काजळलेल्या वातावरणात एका पावसाळी रात्री जिन्साँग अचानक नाहीसा होतो आणि संपूर्ण कथेला एक वेगळेच वळण लागते.



जिन्साँगच्या जाण्याने एकटी पटलेली छोटी मिन्जी आता सतत आपला वेळ त्या वठलेल्या अकॅशिआ वृक्षाच्या सानिध्यातच घालवायला लागते. त्या झाडातून जिन्साँग तिच्याशी बोलतो असे ती सांगायला लागते आणि सगळे दचकतात. त्यातच अचानक जिन्साँग नाहीसा झाल्याच्या दुसर्‍या दिवसापासून त्या वठलेल्या वृक्षाला पालवी फुटायला सुरुवात होते. काही दिवसातच तो वृक्ष चांगलाच बहरतो आणि एकेदिवशी त्या वृक्षाकडून त्याच्या परिघात येणार्‍या जिन्साँगच्या दत्तक कुटुंबावर फांद्या आणि मुंग्यांच्या साहाय्याने जीवघेणे हल्ले सुरू होतात. ह्या अचानक घडू लागलेल्या अनैसर्गिक घटनांनी संपूर्ण कुटुंबच थरारून उठते. आणि मग एक दिवशी अचानक सगळ्या रहस्यावरचा पडदा उघडतो आणि आपण प्रेक्षक सुन्न होऊन जातो.



जिन्साँगच्या बाबतीत नेमके काय घडलेले असते ? तो परत येतो ? अ‍कॅशिआ आणि जिन्साँगचे नक्की नाते काय असते ? मिन्जी जे सांगत असते ते खरे असते का ? ह्या अशा रहस्यमयी प्रश्नांनी सोडवणूक आणि तो सुटतानाचा थरार पडद्यावर बघण्यातच खरी मजा आहे. चित्रपट कोरिअन असला तरी इंग्रजी सबटायटल्स सकट तो उपलब्ध असल्याने निराशा होण्याचे कारण नाही. कुठेही रक्तपात, माणसे कापाकापीची दृश्ये, ओंगळावाणी भुते, विचित्र आणि कर्कश संगीत ह्याची जोड न घेता देखील तुम्हाला रहस्यमयी वातावरणात कसे खिळवून ठेवले जाते ह्याचा अनुभव घेण्यासाठी तरी हा चित्रपट पाहायलाच हवा. अनेक दृश्यात संवाद कमी आणि कॅमेर्‍याचा वापर जास्ती करून दिग्दर्शक आपल्याला अक्षरशः खिळवून ठेवतो. दिग्दर्शन, कथा आणि अभिनय सर्वच अंगाने सुरेख असलेला हा चित्रपट पाहायलाच हवा.

शुक्रवार, ४ नोव्हेंबर, २०११