गुरुवार, १६ जुलै, २००९

अदभुत ४

"आई ग ! येव्हडे चालत जायचे आता ? देवांचे वगैरे बरे होते राव, हे असे डोळे बंद करुन 'रुम बाहेर' असे म्हणाले असते तर डोळे उघडले की रुम बाहेर उभे दिसले असते, मी मनात म्हणालो आणी मगाशी गमतीने मिटलेले डोळे उघडले आणी.... फक्त चक्कर येउन पडायचा बाकी राहिलो... मी आमच्या रुमबाहेर उभा होतो.
--------------------------------------------------------------------

माझ्यातल्या न जागलेल्या बर्‍याचशा शक्ती आता हळुहळु जागृत होत आहेत ह्याची जाणीव मला त्या क्षणी झाली.

सकाळी लवकर उरकुन नानांच्या भेटीला धावलो. मी पोचलो तेंव्हा नानांची पुजा चालु होती, रामरक्षा म्हणता म्हणता माला एका हातानी बसायची खुण करत नाना पुन्हा पुजेत मग्न झाले. नानांच्या बरोबरीने न कळत मीही खड्या आवाजात रामरक्षा म्हणत त्यांना साथ द्यायला सुरुवात केली. काही वेळाने मला जणु काही ती खोलीच त्या आवजाने भरुन गेली आहे असे वाटायले लागले. रामरक्षा म्हणणारे फक्त आपल्या दोघांचेच आवाज नाहीयेत ,खुप जणांचे आवजही त्यात सामील आहेत असे राहुन राहुन वाटत होते, ह्या खोलीत आपल्या शिवाय सुद्धा अजुन कोणीतरी आहे अशी एक विचित्र भावना मनात दाटुन येत होती.

"करायची सुरुवात ?" नानांनी माझ्याकडे बघुन विचारले.

काय ? कसली ? ह्या कसल्याही चौकशा न करता मी आज्ञाधारकपणे मान हलवली. आणी तेथुन सुरु झाला माझ्या खडतर साधनेचा काळ......

"अपरांतक्षा, या आधी सुद्धा आपण बर्‍याचदा विनाशक शक्तींशी मुकाबला केला आहे, कधी तुझ्या नेतृत्वाखाली तर कधी अन्य कोणाच्या. ह्या प्रत्येक संघर्षाची, त्यात वापरल्या गेलेल्या साधनांची, विरुद्ध शक्तीच्या ताकदीची आणी मुख्य म्हणजे आपले मित्र कोण आणी शत्रु कोण ह्याची जाणीव तुला पुन्हा प्राप्त होणे हे सर्वात महत्वाचे आहे.

"होय गुरुदेव" मी पुटपुटलो. माझ्या संबोधनात पडलेला फरक बघुन नाना अस्पष्टसे हसले.

"अपरांतक्षा मला तुझे सहकार्य अपेक्षीत आहे, मी आता तुझ्या जुन्या जाणीवा अजुन स्पष्ट अजुन ठळक करण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या प्रवासात तुला वेगवेगळे अनुभव येतील, वेगवेगळी दृष्ये दिसतील पण तु फक्त एक मुकदर्शक आहेस हे लक्षात ठेव. तु फक्त भुतकाळ पाहणार आहेस, त्यात हस्तक्षेप करायचा तुला अधीकार नाही" नाना काहिशा करारी स्वरात म्हणाले.

मी आज्ञाधारकपणे मान डोलावली. नानांनी रामनामाचा गजर करत माझ्या डोक्यावर आपला हात टेकवला. काही क्षणातच मी समाधी अवस्थेत पोचलो, माझ्या डोळ्यासमोरुन अनेक घटना, कालचक्रे धावायला लागली.

सर्वात आधी मला दिसले एक नयनरम्य पर्वतशीखर आणी तेथेच एका वृक्षाखाली बसलेलो मी, माझ्या भोवताली पसरलेला अगम्य, गुढ प्रकाश आणी त्याच वेळी मनात उमटलेला तो दिव्य आवाज "भद्रशुला ते येत आहेत. अमोघ शक्ती, अमोघ ज्ञान भांडार तुझ्यावर रीक्त करायला ते येत आहेत." त्यानंतर दुरुन भगव्या छाटीत दमदार पावले टाकत येणारे नाना मला दिसले.

"गुरुदेव" मी त्यांच्या पायावर लोटांगण घातले. अत्यंत प्रेमानी मला आपल्या छातीशी लावुन धरत गुरुदेवांनी मला बसते केले. "

तुझी परिक्षा पुर्ण झाली भद्रा, ह्या अमोघ ज्ञान भांडारासाठी तु आता मानसीक आणी शारीरीकरीत्या उत्तम प्रकारे तयार झाल आहेस." गुरुदेव म्हणाले.

त्यानंतरचा तो साधनेचा आणी शक्तीग्रहणाचा खडतर प्रवास, गुरुदेवांनी पुन्हापुन्हा मला म्हणायला लावुन , घोकुन घेउन मला दिलेले ते अमोघ मंत्र, अनेक विविध शक्ती, त्यांची पुजा, त्या शक्तींचा वापर त्यांचे संवर्धन, ह्यासर्वासाठी घेतलेले अविरत कष्ट.... सगळे सगळे काही माझ्या डोळ्यासमोर एखाद्या चलचित्रा सारखे दिसत होते.

अशाप्रकारे अनेक खडतर दिवसांनतर एकदिवशी गुरुदेवांनी मला जवळ बसवुन घेतले आणी म्हणाले "भद्रा, तु आता माझ्या येव्हडाच ज्ञानी आणी शक्तीशाली झाला आहेस, परिपुर्ण मी म्हणणार नाही कारण त्या साठी अजुन बराच अवधी आहे. माझे कार्य आता संपले, मी आता पुर्वेकडे कुच करीन. भद्रा भगवंताच्या इच्छेनुसार तु आता सागर किनारी प्रस्थान करावेस"

आणी मग काही काळासाठी तो एकांत समुद्रकीनाराच माझ्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनुन गेला. मी आणी माझी साधना, तपश्चर्या बस. परंतु कालचक्रात बदल हे घडतच असतात. हळुहळु माझ्या किनार्‍यावर कोळ्यांची वस्ती वाढली, मग छोटासा बाजार उभा राहिला , मग त्यांच्या पुज्यनीय शक्तींची मंदीरे आली, हळुहळु एक वस्तीच उभी राहिली. मी मात्र ह्या सर्वापासुन निर्विकार होतो, माझा त्यांना व त्यांना माझा कधीच त्रास झाला नाही. उलट मदतच व्हायची.

आणी एक दिवस अचानक काहितरी चुकले, समुद्राने नुसते थैमान मांडले, चारी दिशा काळोखुन आल्या आणी आयुष्यात पहिल्यांदाच मला अतिशय अस्वस्थ, अभद्र जाणीवा व्हायला लागल्या... वाईट शक्तीच्या वावराच्या खुणा जाणवायल लागल्या. त्या रात्री मला माझी कामगीरी बहाल करण्यात आली, त्या अगाध शक्तीकडुन, भगवंताकडुन मला आदेश प्राप्त झाला होता, "भद्रा ह्या क्षणापासुन मी सृष्टीपालक, ह्या पृथ्वीबिंदुचा रक्षक म्हणुन तुला अधीकार प्रदान करतोय. ह्या पुढे ह्या कक्षेतुन तुझ्या आज्ञेशीवाय देव,दानव,मर्त्य, जलचर, उभयचर कोणत्याही शक्तीला प्रवेश नाही. ह्या पुढे हय नियमाचे उल्लंघन करणार्‍याला सर्वशक्तीनीशी दंडीत करण्याचे पुर्ण अधीकार मी तुला प्रदान करतोय भद्रा. ह्या पुढे ह्या अपरांत भुमीच एकमेव रक्षक तु आहेस, तु अपरांतक्ष आहेस. यशस्वी भव."

कहितरी गुढ, अगम्य, अमानवी ह्या जगात प्रवेश करायचा प्रयन्त करत होते आणी त्याच्यापुढे खंबीर आव्हान म्हणुन मला उभे राहायचे होते. इतक्या वर्षाची साधना, ज्ञानप्राप्ती ह्या संघर्षासाठीच होती.

त्यानंतर घडलेला तो संघर्ष... कधी मानसीक तर कधी शारीरीक पातळीवर लढल्या गेलेल्या लढाया, ती मानसीक आंदोलने, त्रिमितिच्या कक्षा भेदुन झालेला पाठलाग आणी शेवटी मला मिळालेले यश. सगळे सगळे मला अगदी लख्ख दिसत होते. त्यानंतर कित्येकदा कालचक्र फिरले , कित्येकदा त्या बिंदुवरुन अभद्रानी प्रवेशाचा प्रयत्न केला आणी प्रत्येकदा मी त्याला रोखत राहिलो. आज त्या जाणीवा पुन्हा जागृत झाल्या, मला स्वत:ची ओळख पटली.

मी शांतपणे डोळे उघडुन नानांकडे पाहिले, उभा राहुन आधी देवघरासमोर आणी मग नानांना साष्टांग दंडवत घातले.

"मी जागृत झालोय गुरुदेव, माझ्या जाणीवा जेणीवा, माझे ज्ञान माझ्या सर्व शक्तींसह मी तयार आहे संघर्षासाठी." मी वदलो.

"अपेक्षेपेक्षा फार लवकर जागृत झालास अपरांतक्षा. मोठे सामाधान वाटले. आता तु तुझ्या नेहमीच्या आयुष्याकडे वळ, योग्य वेळ येताच तुला आपोआप त्याची जाणीव होईल" नाना स्मितहास्य करत म्हणाले.

त्यानंतरचे काही दिवस हे अतिशय समाधानाचे व असीम शांततेचे होते. माझ्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा मृदुपणा आला होता. हा कालखंड कधी संपुच नये असे वाटत होते, पण मनाचा एक कोपरा मात्र कायम सावध होता. माझ्या रोजच्या साधना, प्रार्थना मी बिनबोभाटपणे पुर्ण करत होतो. माझ्या इतक्या दिवसांच्या सुप्त पडुन राहिलेल्या शक्ती आत जागृत झाल्या होत्या, त्यांना साधनेची धार चढवुन पुन्हा लखलखीत करणे फार आवश्यक होते.

मेंदु सतत त्या येणार्‍या संघर्षाच्या विचारत गर्क असायचा, गुरुदेवांनी सांगीतलेली वेळ कधी येणार ह्याची मलाही उत्कंठा लागलेली होती. आणी ध्यानी मनी नसतानाच नानांचे नाव घेत अचानक आज हे कारखानीस माझ्यापर्यंत पोचले होते.

"मी शरद कारखानीस, जयराज माझा जावई" कारखानीसांनी स्वत:ची ओळख करुन दिली.

"मी प्रसाद, जयराजचा मित्र. पण तुम्ही नानांच्या ओळखीनी आलात ना?" मी विचारले.

"हो , म्हणजे त्याचे काय आहे नाना मला गुरुंच्या जागी. अनेक कौटुंबीक अडी अडचणीच्या वेळी मी त्यांचाच सल्ला घेतो.पण ह्यावेळी मात्र त्यांनी मला तुमच्याकडे जाण्याचा सल्ला दिला." कारखानीसांनी स्पष्टीकरण दिले.

"मला पुर्ण माहिती द्याल का ? " मी विचारले.

कारखानीसांनी आधी रुमाला कढुन स्वत:चा चेहरा पुसला. ते कुठल्यातरी घटनेमुळे खुपच अस्वस्थ, घाबरलेले दिसत होते. मी शांतपणे रामरायाचे नाव घेत त्यांच्या हातावर हात ठेवुन त्यांना दिलासा दिला.

"शरदराव ह्या जगात अनेक गुढ, अगम्य गोष्टी घडत असतात, बर्‍याचशा घटनांचे मानवीय पातळीवर स्पष्टीकरण सुद्धा करणे शक्य नसते. माझा तुमच्या बोलण्यावर पुर्ण विश्वास आहे, बोला तुम्ही." मी त्यांना आधार दिला.

माझा हात तसाच हातात दाबुन ठेवत कारखानीसांनी सांगायला सुरुवात केली.
"जयराजच्या वागण्या बोलण्यात आजकाल फार फरक पडलाय हो. मध्ये ६ महिन्यांसाठी त्याची गुजरातला बदली झाली होती त्यामुळे माझी मुलगी आणी नातवंडे माझ्याकडेच राहात होती. मागच्या आठवड्यात जयराज अचानक रात्री परत आला तो मद्याच्या अंमलाखाली चुर होउनच.

"तो जास्ती काही बोलायला उत्सुक नसतोच, बाल्कनीत खुर्ची टाकुन एकटक कुठेतरी बघत बसलेला असतो. खाण्यापिण्याची शुद्ध नाही. मध्येच एकदम उठतो आणी बायको, पोरांना मारहाण सुरु करतो. पुन्हा पुन्हा कोकणात जायचा हट्ट धरुन बसतो. का कळत नाही पण मला कायम त्याच्या आजुबाजुला काहितरी वावरते आहे, तो एकटा नाहिये असे जाणवत राहते. आणी परवा तर ...."

कारखानीसांनी पुन्हा एकदा रुमाल काढुन आपला घाम टिपला.

"परवा रात्री मला कसली तरी चाहुल लागली म्हणुन मी उठुन हॉल मध्ये आलो. जयराजच्या रुममध्ये डोकावलो तर आत जयराज न्हवता पण त्याच्या बेडवर जे काही होते ... विश्वास ठेवा ते खरच काहितरी अभद्र होते. एखाद्या मोठ्या सरड्याच्या कींवा मगरीच्या आकाराचे असे काहितरी तिथे रांगत होते." मी कसातरी मनावर ताबा ठेवुन माझ्या रुमकडे पळालो. सकाळी दिशा उजाडल्या उजाडल्या मी आधी नानांना फोन लावला.

"काय म्हणाले ते?" इतक्या वेळ पुर्ण घटनेचा आढाव घेणारा मी म्हणालो.

"ते म्हणाले, ती वेळ आली तर ! कारखानीस मी देतोय त्या पत्त्यावर ताबडतोब संपर्क साधा." कारखानीसांनी उत्तर दिले.

"मला तुमचा पत्ता देउन ठेवा कारखानीस, मी रात्री तुम्हाला भेटायला येतोय" मी म्हणालो.

संघर्षाच्या नुसते कल्पनेनीच मला स्फुरण चढले होते. त्या रात्री मला तसा थोडासा उशीरच झाला, साधारण १० वाजता मी कारखानीसांच्या घराची बेल दाबली.......

क्रमशः

अदभुत ३

"अरेच्या, बाजारात शामरावांना हाक मार, पाचव्या मजल्यापर्यंत धावत जा, कुत्र्याच्या पिल्लाला वाचव हे सगळे प्रसाद वाटणेच की लेका." नाना उदगारले.
मी त्यांच्याकडे पाहातच बसलो, मला काही सुचेचनात. कोणे हा माणुस ? ह्याला सगळे कसे कळाले ? हा खरच इथे राहतो का हा माझ्या पाळतीवर वगैरे आहे ? हा नक्की माणुसच आहे ना ? एकाच वेळी अनेक प्रश्न माझ्या मनात उमटले.
------------------------------------------

माणुसच आहे रे बाबा, अगदी तुझ्यासारखा हाडामाडासाचा" नाना डोळे मिचकावत म्हणाले.
मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहातच राहिलो.

"चल जरा माझ्या खोलीत बसु" नाना म्हणाले. मी त्यांच्या मागोमाग आज्ञाधारकपणे निघालो.

नाना मला समाधीला फेरा घालुन, मागच्या बाजुला असलेल्या बैठ्या खोल्यांकडे घेउन गेले. नानांची खोली एकच होती पण चांगली प्रशस्त होती, तिची उंची विशेषत: नजरेत भरत होती.

"बसा स्वामी" नाना गमतीने म्हणाले.

मी काहीसा लाजतच नानांच्या बाजुला बसलो. समोर देव्हार्‍यात राम,लक्ष्मण आणी सिता यांची मुर्ती होती, पायापाशी मारुतीराया बसले होते, बाजुलाच पद्मासन लावुन बसलेली रामदास स्वामींची प्रसन्न मुर्ती होती आणी सगळ्यात मागे दत्त दिगंबर शांत चित्ताने उभे होते. त्या दर्शनानेच चित्तवृती प्रफुल्लीत होउन गेल्या माझ्या.

नानांची किंचीत हसत माझ्याकडे बघितले आणी समईतला दिवा थोडासा मोठा करत रामरायाला हात जोडले... "रामराया घेउन आलो रे तुझ्या लेकराला, आता तुच ताकद दे त्याला" नाना म्हणाले.

मला तर काहीच उमगत न्हवते.

"प्रसाद, तुला गेले काही दिवस बरेच विचीत्र अनुभव येतातय ना ?" नानांनी प्रेमळपणे विचारले.

"होय नाना, मला खरच काही कळत नाहीये, विचार करुन करुन डोके फुटायची वेळ आली आहे" मी म्हणालो.

"खरे आहे, भांडे पुर्ण भरले की दुध थोडे हिंदकळणारच, मी जरा आधीच सावध व्हायला पाहिजे होते" नान काहीशा खेदाने म्हणाले.

"तुम्ही काय म्हणता मला काहीच कळत नाहिये नाना" मी म्हणालो.

"प्रसाद, नवनाथांचा अवतार का झाला माहितिये तुला ? नानांची विचारले.

"हो, कलीला रोकण्यासाठी !" मी फाडकन उत्तर दिले.

"अगदी बरोबर, काळ्या शक्तीच्या प्रत्येक अनुयायाला, त्या शक्तीच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी भगवंताकडुन कोणाना कोणाची नेमणुक झालेली आहे प्रसाद. सागर जिथे परशुरामांना वंदन करुन मागे हटलाय त्या पृथ्वीबिंदुचा, त्या अपरांत भुमीचा तु रक्षक आहेस प्रसाद, तु अपरांतक्ष आहेस प्रसाद..... तुझ्या परवानगीशिवाय त्या बिंदुवरुन कोणालाही आत प्रवेश नाहिये, त्या बिंदुशी संबंधीत स्थल, काल, अवकाश ह्यांचा रक्षणकर्ता म्हणुन तुझी नेमणुक आहे अपरांतक्षा, जागा हो.. आठव स्वत:ला" येव्हडे बोलता बोलता नानांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला.

त्या क्षणी मी माझा असा उरलोच नाही, त्या अनुभुतीचे वर्णन तरी कसे करावे ? क्षणार्धात अनेक फुलांचा सुवास माझे मन, मेंदु भरुन गेला, मी जणु काही एखाद्या समुद्रात लाकडी ओंडक्यासारखा तरंगतोय असा भास झाला, काहि क्षणच हे सुख टिकले आणी मग...

मी कुठेतरी खोल खोल काळगर्तेत खेचला जायला लागलो, अनेक जुन्या पुरातन गोष्टी, घटना डोळ्यासमोरुन जायला लागल्या. काय काय न्हवते त्यात ? पुरात रुढी परंपरा, वेगवेगळ्या पिढ्यांचे मानव, प्राणी, राक्षस, भुते, पिशाच्च.. त्यांच्या रुढी, संकल्पना, अस्तीत्वासाठीच्या लढाया, ते जागवले गेलेले दुष्टात्मे, त्यांच्या बरोबर अनेकदा घडलेले प्राचीन संघर्ष.. सर्व सर्व माझ्या डोळ्यासमोरुन सरसरा पुढे सरकत होते आणी अचानक.. हो तो प्रसंग तोच होता, तोच होता अगदी, कोकणात घडलेला, माझ्या आणी जयराजच्या आयुष्यात वादळ घेउन आलेला.

त्याचा इथे काय संबंध ? तो का दिसावा ? हे काय गुढ आहे ?

"जागा हो , जागा हो प्रसाद" नाना हाक मारत होते. मी सावकाश डोळे उघडले, मैलोन मैल प्रवास केल्यासारखे शरीर आणी मन थकले होते.

नानांनी समोर केलेला दुधाचा प्याला मी आधाशा सारखा संपवुन टाकला.

"खुप ताण आलाय ना मनावर ? मी समजु शकतो. पण हे होणे गरजेचे होते, तुझ्या जाणीवा, सुप्त शक्ती जागृत होणे गरजेचे होते अपरांतक्षा" नाना धिरगंभीरपणे म्हणाले.

"पण नाना मला ह्या कालक्रमणेत कोकणातला प्रसंग दिसायचे कारण काय ?" मी मनात खदखदत असलेला प्रश्न विचारुन मोकळा झालो.

"तुझ्या अजुन लक्षात येत नाहिये ? 'तो' परत आलाय, तुझ्या आज्ञेशिवाय त्यानी आत प्रवेश करायचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी ठरला, त्यवेळी त्याला रोकणारा तुच होतास आणी आता 'तो' पुन्हा रेषा उल्लंघायला सज्ज झालाय अपरांतक्षा, आणी ते ही पुर्ण ताकदीने. तुझ्या शक्तीला, अधीकाराला हे आव्हान आहे, जा त्याचा बंदोबस्त कर. त्याला शासन करायचा अधिकार फक्त तुला आणी तुलाच आहे अपरांतक्षा. पण ह्या संघर्षात तुला पुर्ण ताकदीने उतरावे लागणार होते त्यासाठी रघुरायाच्या आदेशाने मी तुझ्या जाणीवा, शक्ती परत मिळवुन दिल्या आहेत." नाना आत्मीयतेने सांगत होते.

"कधी नाना ? कधी होणार संघर्ष ? आणी कोणत्या पातळीवर ? माझ्या शक्ती जागृत झाल्या आहेत म्हणजे काय झाले आहे ? मी काय करायचे आहे नाना ? मी प्रश्नांचा भडीमार केला.

"लवकरच ती वेळ येणार आहे, खुप कमी वेळ उरलाय आपल्याकडे. आणी जो उरलाय त्यात जमेल तेव्हडी साधना तुला उरकुन घ्यायची आहे प्रसाद. बाकीच्या प्रश्नांची उत्तरे तुला योग्य वेळी मिळत जातीलच, त्यांची चिंता करण्यात वेळ घालवु नकोस. आणी मुख्य म्हणजे भिउ नकोस. 'आम्ही' सदैव तुझ्या बरोबर आहोतच" नाना हे सांगत असताना एका वेगळ्याच तेजाने त्यांचा चेहरा तळपत होता.

दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा नानांची भेट घ्यायचे आश्वासन देउन मी नानांच्या रुमबाहेर पडलो. जे काही घडुन गेले होते त्यावर
माझा अजुनही विश्वास बसत न्हवता, खरेतर माला अजुन कशाचे पुर्ण आकलनच झाले न्हवते.

"आई ग ! येव्हडे चालत जायचे आता ? देवांचे वगैरे बरे होते राव, हे असे डोळे बंद करुन 'रुम बाहेर' असे म्हणाले असते तर डोळे उघडले की रुम बाहेर उभे दिसले असते, मी मनात म्हणालो आणी मगाशी गमतीने मिटलेले डोळे उघडले आणी.... फक्त चक्कर येउन पडायचा बाकी राहिलो... मी आमच्या रुमबाहेर उभा होतो.

क्रमशः

(ह्यातील 'रक्षक'हि संकल्पना मला प्रदिप दळवी ह्यांच्या 'कालांकीत' ह्या कादंबरीवरुन सुचली ह्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे.)


अदभुत २

शामराव, माझ्या काकांचे दोस्त.. अचानक रस्त्यात गाठ पडले. कुठेतरी घाइघाईत निघालेल्या शामरावांना मी हाक मारली.
खरेतर मी तसा माणुसघाणा माणुस, कोणाला हाक वगैरे मारुन गप्पा मारणे अशक्यच. पण काहितरी विचित्र घडत होते. "शामकाका, अती घाई संकटात जाई, वाट बघा.शेवटी कापुसच मदतीला धावणार. विश्वास ठेवा." माझ्या तोंडातुन अचानक शब्द बाहेर पडले. मी काय बोलतोय हे माझे मलाच कळेना, अरे ते शामराव थांबतात काय, मी वेड्यासारखे काही बरळतो काय ? मला कशाचा अर्थच लागेना.

दुसर्‍या दिवशी दुपारी शामराव माझ्या कॅफेत हजर झाले. मी काही बोलायच्या आतच त्यांनी माझ्या पायाला हात लावला, "लेकरा वाचवलेस रे संकटातुन." शामराव म्हणाले.
मला काही अर्थबोधच होईना. नंतर शामरावांच्या तोंडुन कळाले की कर्जाचे तिनही हप्ते थकलेले, ह्यावेळीही कापसाने हात दिला नाही, अशा अवस्थेत शामराव आत्महत्या करायला निघाले होते. मला भेटले तेंव्हा ते टिक-२० खरेदी करुनच निघाले होते. मला भेटले, मी अचानक काहितरी बरळलो आणी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे का कोणास ठाउक माझ्या शब्दांवर त्यांचा इतका विश्वास बसला की त्यांनी खरेदी केलेली बाटली सुद्धा फेकुन दिली, आणी आज सकाळीच गुजरातचा व्यापारी येउन कापसासाठी सौदा करुन गेला होता.

मी सुन्नच झालो.....
---------------------------------------------------------------------------------------------

हे सुन्न होणे येव्हड्यावरच थांबणार नाहिये हे माझ्या लक्षात यायला वेळ लागला. त्याच पंधरवड्यात अजुन दोन विस्मयकारक घटना माझ्या बाबतीत घडल्या. एकदा मला पार्कींग मध्ये असताना राजपाठक काकुंच्या घरच्या उघड्या राहिलेल्या गॅसचा वास आला, काकु राहतात ५ व्या मजल्यावार. बर हा वास कुठुन येतोय काय येतोय असले काहि फालतु विचार डोक्यात नाहीत, गॅसचा वास येतोय आणी तो राजपाठकांच्या घरातुन येतोय येव्हड्या स्वच्छ विचारांनी डोक्यात उगम घेतला आणी त्याक्षणी मी ५ व्या मजल्यावर धावलो.

"अरे मला तर काहिच कळाले नाही, बरे झाले तु आलास बाबा" काकुंच्या ह्या वाक्यावर कसनुसे हसत मी दाराबाहेर पडलो आणी शांतपणे जिन्यात बसुन राहिलो.

या घटनेला आठवडा उलटत नाही तोच एकदा रस्त्यानी जाताना मी अचानक सायकल थांबवली, रस्ता क्रॉस करुन पलिकडे गेलो आणी फुटपाथवर झोपलेल्या एका कुत्र्याच्या पिल्लाला या बाजुला घेउन आलो. मी सायकलपाशी पोचतोय न पोचतोय तोवर पलिकडच्या फुटपाथवर लाईटच्या खांबावारची तार कोसळली.

मी भानावर आलो तेंव्हा रस्त्यावरुन जाणारी लोक थबकुन माझ्याकडे बघत होती, मी पटकन तिथुन काढता पाय घेतला. मला खरच काही सुचत न्हवते, हे सगळे जे घडत होते ते माझ्या बुद्धीच्या आवाक्या बाहेरचे होते. बर सल्ला तरी कोणाचा घेणार ?

शेवटी मीच त्रयस्थपणे ह्या घटनांचा अर्थ लावायला सुरुवात केली. हळुहळु लक्षात न आलेल्या बर्‍याच गोष्टी माझ्या ध्यानात येउ लागल्या. तसा मी देवभोळा वगैरे नाही पण रोज आंघोळ झाली की अंग पुसता पुसता अथर्वशीर्ष म्हणायचे हा माझा रिवाज , पण आजकाल मी अथर्वशिर्षाच्या जोडीने रामरक्षा आणी भिमरुपी सुद्धा म्हणायला लागलो होतो, फावल्या वेळात हळुच सविता भाभीवर वगैरे चक्कर मारणारा मी आजकाल नारदपुराण, स्कंदपुराणाचे दाखले संगणकावर शोधत होतो, आठवड्यातुन एकदा का होईना दोन घोट मारणारा मी आजकाल जवळजवळ निर्व्यसनी या समुहात मोडायला लागलो होतो. परमेश्वरा, हा येव्हडा बदल झालाय माझ्यात ? पुन्हा एकदा सुन्न झालोच झालो.

मी ह्या मनस्थीतीत असतानाच आमच्या गल्लीतल्या ग्रुपनी शनीवार रविवार सज्जन्गडावर जायची कल्पना काढली. हो नाही करत मी सुद्धा तयार झालो. खरतर मलाही थोडासा चेंज हवा होता. या सहलीत काही विचित्र माझ्या हातुन घडु नये येव्हडीच काय ती काळजी मनाला ग्रासुन होती. पण गंमत म्हणजे जस जसे सज्जन्गडाच्या जवळ जवळ पोचत होतो माझे मन एका अनामीक शांतीने भरुन जात होते, हि हि काहितरी एक वेगळीच अनुभुती होती, या आधी कधीही न अनुभवलेली. एखाद्या कल्पवृक्षाकडे आपण निघालो आहोत अशी काहिशी एक भावना मनात राहुन राहुन येत होती.

संध्याकाळच्या सुमारास गडावर पोचलो, हातपाय धुवुन व्यवस्थीत दर्शन घेतले. त्यानंतर प्रसादाच लाभ घेउन आम्ही आमच्या भक्त निवासातील खोलीवर परतलो. सगळ्यांनीच पत्ते खेळायची टुम काढली. मी मात्र आलो जर पाय मोकळे करुन म्हणुन पुन्हा खाली आलो. पुन्हा तोच प्रकार मनात नसताना शब्द बाहेर आले होते. आता खाली आलोच आहोत तर निदान गडाच्या दरवाजा पर्यंत तरी जाउन येउ असा विचार करुन मी निघालो.

"प्रसाद" मागुन एक अनोळखी हाक आली.
मी भांबावुन मागे बघितले, ३५/३६ वर्षाचे भगवी वस्त्रे परिधान केलेले एक स्वामी मला हाताने थांबायची खुण करत माझ्यापाशी पोचले.

"तुम्हाला थोडा वेळ असेल तर नानाजींनी तुम्हाला भेटायला बोलावलय" स्वामी म्हणाले.

"कोण नाना ? आणी तुम्हाला माझे नाव कसे काय कळाले ?" मी अडखळत बोललो.

"तुम्हाला बघुन मला नाना म्हणाने तो बघ तो बावळट प्रसाद कसा हिंडतोय ते, जा त्याला बोलावुन घेउन ये वेळ असेल तर" स्वामींनी उत्तर दिले.

आता मात्र मला खरच आश्चर्य वाटायला लागले, येव्हडे नावानीशी आपल्याला ओळखणारे सज्जनगडावर आहे तरी कोण हे बघायला मी स्वामींबरोबर निघालो.

"बार वगैरे मध्ये ठिक आहे हो, पण माझ्या सारख्याला सज्जन्गडावर नावनीशी ओळखणारे हे नाना कोण बुवा ?" मी प्रश्न केला.

"त्यांनाच का विचारत नाही हे तुम्ही?" स्वामीजी मिस्कीलपणे म्हणाले.
मग मात्र मी शांतपणे चालायला लागलो.

एका दुकानाच्या ओसरीवर पांढराशुभ्र सैलसर कुर्ता पायजमा घालुन एक साठीचे गृहस्थ बसले होते. का कोणास ठाउक पण त्यांच्यात काहितरी खास काहितरी वेगळेपण आहे हे मला राहुन राहुन जाणवत होते.

"नारायणा तु गेलास तरी चालेल हो" नाना म्हणाले. मी अवघडुन तसाच उभा होतो.

"काय प्रसादा झाला का सगळ्यांना प्रसाद वाटुन ? दमला नाहीस ना ?" नानांनी मिस्किलपणे हसत विचारले.

"प्रसाद ? मी नाही वाटला कोणाला" मी पटकन उत्तरलो.

"अरेच्या, बाजारात शामरावांना हाक मार, पाचव्या मजल्यापर्यंत धावत जा, कुत्र्याच्या पिल्लाला वाचव हे सगळे प्रसाद वाटणेच की लेका." नाना उदगारले.

मी त्यांच्याकडे पाहातच बसलो, मला काही सुचेचनात. कोणे हा माणुस ? ह्याला सगळे कसे कळाले ? हा खरच इथे राहतो का हा माझ्या पाळतीवर वगैरे आहे ? हा नक्की माणुसच आहे ना ? एकाच वेळी अनेक प्रश्न माझ्या मनात उमटले.

क्रमशः