शुक्रवार, १८ डिसेंबर, २००९

गोष्ट छोटी डोंगरा एवढी



"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या".

कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'.

ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ? सात बार्‍यावरच्या कर्जाच्या नोंदी, सर्कारी बियाणे वाटपाची खरी परिस्थीती, शेतकर्‍यासाठी म्हणुन मिळणारे कर्ज आणी ते मिळवताना येणार्‍या अडचणी, संबंधीत लोकांनी केलेली अडवणुक सगळे अगदी काळजाला हात घालणारे.

शेतकर्‍याच्या प्रश्नाला वाचा फोडणारे म्हणुन बरेच चित्रपट येउन गेले आणी येतील, पण बळीराजाच्या खर्‍या प्रश्नांची आपल्यासमोर मांडणी करणारा चित्रपट म्हणुन 'गोष्ट छोटी डोंगरा एवढीची' दखल निश्चीतच घ्यावी लागेल.

कथेची उत्कृष्ट मांडणी आणी त्याला कलाकारांच्या अभिनयाची तेव्हडीच मिळालेली अप्रतिम साथ हे ह्या चित्रपटाचे वैशीष्ठ्य म्हणता येईल. भरत जाधव आणी मकरंद अनासपुरेचा चित्रपट म्हणले की आजकाल पळुनच जावेसे वाटत होते, अशावेळी मकरंद अनासपुरेचा ह्या चित्रपटातील संयत अनुभव अत्यंत सुखावुन जातो. मकरंदनी नेहमीप्रमाणेच अतिशय समजुन उमजुन हि भुमीका केली आहे. कारकिर्दीत त्याला मिळालेली एक आव्हानात्मक भुमीका असा हिचा उल्लेख करायला हरकत नाही.



नागेश भोसले हा असाच अजुन एक ताकदीचा अभिनेता. देहबोली आणी आवाजाचा पुरेपुर फायदा कसा उठवावा हे ह्या अभिनेत्याकडुन शिकुन घ्यावे. ह्या चित्रपटात त्यानी मकरंदच्या गरीब शेतकरी मित्राची भुमीका साकारली आहे. कुटुंबासाठी धडपडणारा, पैशाची कायमच अडचण असतानाही शहरातुन आपला मित्र मकरंद आलेला बघुन त्याच्यासाठी श्रिखंड आणणारा, कर्जाच्या डोंगराखाली बैल विकावा लागल्यावर स्वत:ला नांगराला जुंपणारा नागेश भोसले काळजात घर करुन जातो.

शेवटी हालाखीच्या परिस्थीतीमुळे आणी कर्जाच्या डोंगराखाली हा नागेश भोसले किटकनाशक पिउन आत्महत्या करतो तो प्रसंग तर डोळ्यात पाणी आणणारा. रात्री उशीरा अडखळत परत आला म्हणुन बायकोची आणी मित्राची बोलणी खाताखाता, "दारु पिउन आला का?" विचारल्यावार नागेश भोसले म्हणतो "दारु नाही, किटकनाशक प्यायलोय..." बास, संपुर्ण थेटरच आपल्या डोळ्याभोवती गरकन फिरल्यासारखे वाटते.



शेतकर्‍याला कर्जासाठी, सरकारकडुन होणार्‍या बियाणे पुरवण्यासाठी वेळोवेळी कसे नाडले जाते, प्रत्येक ठिकाणी टेबलाखालच्या पैशासाठी कशी अडवणुक होते, पावसाचा लहरीपणा, २२/२२ तास गायब असणारी विज ह्या सगळ्याचे विदारक चित्र दिग्दर्शकाने साकारले आहे. चिकुच्या मिळालेल्या ५/- रुपायाच्या सरकारी चेकसाठी ५००/- पेक्षा जास्त पैसे भरुन बॅंकेत शेतकर्‍याला खाते उघडावे लागते हि माहिती ऐकुन तर डोक्याला हात लावायची पाळी येते.

शेवटी जेंव्हा मकरंद अनासपुरे "एक माणुस म्हणून तरी शेतकर्‍याचे अस्तीत्व मान्य करा" असे कळवळुन म्हणतोना तेंव्हा कुठेतरी आपल्याला आपणच गुन्हेगार असल्यासारखे वाटायला लागते.



मकरंद अनासपुरे, कै. निळुभाउ फुले, नागेश भोसले, सयाजी शिंदे, माधवी जुवेकर, मधु कांबीकर अशा उत्तमोत्तम ताकदीच्या कलाकारांचा सुंदर अभिनय ह्या चित्रपटाची जमेची बाजु आहे. चित्रपटात अधुन मधुन वाजणारे शिर्षक गीत मात्र डोक्यात जाते येव्हडाच काय तो चंद्रावर डाग म्हणायचा. आधी हा उपदव्याप अजय - अतुल ह्या संगितकारांचा(?) असावा असे वाटत होते पण नंतर तो शैलेंद्र बर्वे ह्या संगीतकाराचा आहे असे जालावर शोध घेता कळाले.

एकुणच बळीराजाचे खरे वास्तव जाणुन घेण्यासाठी हा चित्रपट निश्चीतच पहा.




3 टिप्पणी(ण्या):

Ajay Sonawane म्हणाले...

हा सिनेमा मी पाहिलेला आहे, अतिशय तरलतेना हाताळलेला हा विषय आहे. निळु फुले अगदी २-३ मिनीटामध्ये ही भाव खाऊन जातात. त्यांचा तो लाख रुपयांचा डायलॉग डोळ्यात पाणी आणतो. बाकी सिनेमा खुप आवडला.

Abhi म्हणाले...

jabardast

Supriya Mane म्हणाले...

This film is very fantastic and grateful

टिप्पणी पोस्ट करा