शनिवार, ३ एप्रिल, २०१०

सव्यसाचि - पुस्तक

"पॅपिलॉन" ह्या हॅकरची एक थरारक कथा

सव्यसाचि - पुस्तक


सव्यसाचि (अंतिम)

"कमॉन एग. येवढी चांगली ऑफर तुमच्या रशीयाला कधी वर्ल्ड बँकेनी देखील दिली नसेल ! एकाच वेळी "यु एस, चायना आणी आखाती देशांच्या ऑईल कंपन्यांचा संपुर्ण डाटाबेस घर बसल्या मिळतोय तुम्हाला ! वर एलिट आणी अनटचेबल्स सारख्या ग्रुपसना संपवल्याचे फुकटचे पुण्य वेगळेच; आणी त्याबदल्यात मला फक्त हवय ते रशियन नागरीकत्व, 'केजीबी'ची मदत आणी एफ बी आय पासून संरक्षण....."
---------

चारच दिवसात मी बोस्टनला रवाना झालो. आता खरी लढाई सुरु होणार होती. सगळ्या मोहरा आपापल्या जागी उभ्या होत्या आणी मी फक्त योग्य वेळेची प्रतिक्षा करत होतो.

"डायना मला कॅथ्रीनची गरज आहे, एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी."

"असे कोणते काम आहे जे फक्त तीच करु शकेल??"

"आपले पहिले टार्गेट आहे चायनीज कंपनी 'कोनाट' , आणी तीचा बोस्टन हेड हा सेक्सचा अत्यंत भुकेला माणूस आहे. दिवसातले ६/६ तास डेटिंग साईटवर पोरी शोधणे हा त्याचा आवडता उद्योग आहे. त्याला गळाला लावण्यासाठी कॅथ्रीन सारखी विश्वासु मासळी अजुन कुठे मिळणार ??"

"त्याला जाळ्यात फसवुन आपला काय फायदा पॅपिलॉन ??"

"मला त्याची गरज नाहिये डायना ! मला हवाय त्याचा लॅपटॉप. अलिबाबाची गुहा."

"हे सगळे जमुन आले तरी पण तो तिला भेटायला लॅपटॉप घेउनच येईल ह्याचा भरवसा काय?"

"नाही आला तर जागा फक्त बदलेल. हॉटेल रुमच्या ऐवजी त्याच्या घरातुन लॅपटॉपमधल्या डेटाची चोरी होईल. मी सगळी तयारी ठेवली आहे."

"जिनियस !"

"धन्यावाद. शेवटी चेला...."

अपेक्षेप्रमाणे पाचच दिवसाच्या आत बोस्टन हेड आमच्या गळाला लागला. आणी त्या दिवसापासुन 'कोनाट' आणी तीच्या उपकंपन्यांच्या प्रत्येक आत येणार्‍या आणी बाहेर जाणार्‍या इ-मेल्स, डेटा ह्यावर अनटचेबल्सची अदृष्य नजर रोखली गेली. पहिल्याच झटक्यात मोठे यश मी पदरात पाडून घेतले. आता अधिक वेळ घालवून उपयोग न्हवता...
--------------------

"वॉल्टर मी बोलतोय"

"काय सेवा करु ??"

"सेवा तर मी तुमची करायला फोन केलाय सर."

"ती तर तुला करावीच लागणार आहे, त्यासाठी तर तुला येवढी रक्कम मोजली आहे मी पॅपिलॉन!"

"माझ्या लक्षात आहे सर. पण आज तुम्हाला मी वेगळ्याच कारणासाठी फोन केला होता. तुमच्यासाठी माझ्याकडे एक पार्सल आहे, उम्म्म्म्म अनमोल आहे."

"मला शब्दांचे खेळ आवडत नाहीत पॅपिलॉन !"

"डायना ! हवीये??"

"तु शुद्धीत आहेस ?"

"चांगलाच ! आणी मला बेशुद्ध करेल अशी रक्कम तुम्ही मला ऑफर करत असाल तर तुम्ही बोस्टनमध्ये पाय ठेवल्यापासून ४ तासात मी डायनाला तुमच्या हवाली करायला तयार आहे."

"मी तुझ्यावर का विश्वास ठेवावा पॅपिलॉन ??"

"तुमचा मेल बॉक्स चेक करा, काही छान फोटो पाठवलेत मी. वाट बघतोय....."

काही क्षणाच्या शांततेनंतर अचानक वॉल्टरचा आतुर झालेला स्वर माझ्या कानात शिरला..

"पैसे कुठे पोचवायचे पॅपिलॉन"

"तुमचा एकेकाळचा परम मित्र आणी तत्कालीन मार्क-रॉबिन्सनचा मॅनेजर डेव्हिडच्या खात्यावर"

"यु आर सच बास्टर्ड पॅपिलॉन !! त्याचा तुझा काय संबंध ??"

"माझी सर्वात सुरक्षीत तिजोरी आहे ती. असो... आमच्याकडे एक छान म्हण आहे, "फळ खा, झाडे मोजत बसु नका !"

"मी ज्या कंपन्यांसाठी काम करतोय त्यांना माझ्यासाठी व्हिसा वगैरेची सोय करण्यात निदान २४ तास तरी नक्की लागतील ! साधारण परवा मी बोस्टनमध्ये असेन. येताना मी ब्रुसला देखील नक्की घेउन येईन. माझी अनोखी भेट त्याला नक्की आवडेल."

"मी वाट बघीन वॉल्टर....आणी हो, तु केनच्या संपर्कात आहेस हे आता उघड करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते..."

"गो अहेड !!"
----------

"आज सुट्टीच्या दिवशी अशी अचानक मिटींग बोलावण्याचे कारण ?"

"आपल्यात कोणीतरी एक फितुर असावा अशी डायनाला शंका आहे केन !"

"तु गप्प बसशील ? डायनाला काय ते बोलु दे ."

"केन तु वॉल्टरला कसा काय ओळखतोस??"

"STFU पॅपिलॉन "

"त्याच्यावर ओरडून तुझा गुन्हा लपणार आहे केन ? हि तुझ्या मोबाईलची कॉल हिस्टरी, तुला रोज कमीत कमी दोन वेळा वॉल्टरचे फोन येतात, आणी तेही रात्रीच्या वेळी. कशासाठी सांगु शकशील ?? "

"......."

"तुझा आणी वॉल्टरचा ज्यावेळी दुसर्‍यांदा फोन झाला त्याच्या दुसर्‍याच दिवशी बोस्टन हेडनी त्याचा पासवर्ड चेंज केला. ह्याला योगायोग म्हणायचे का? उत्तर दे केन..."

"ह्या पुढे आपल्याला केनची गरज आहे असे मला वाटत नाही" डायना शांतपणे म्हणाली आणी खोलीतुन बाहेर पडली.

केनचे प्रेत बागेत पुरुन सर्व व्यवस्था निट लावून झोपायला जायला मला आणी डग्लसला रात्रीचे दोन वाजले.
-----------------

"डायना.... सेव्ह मी, प्लिज..."

"कॅथ्रीन.. बेबी काय झालय ? तुझा आवाज असा का येतो आहे ?"

"वॉल्टर आणी ब्रुस बोस्टन मध्ये आलेत ताई. सध्या मी त्यांच्या ताब्यात आहे."

"...."

"हॅलो ब्युटीफुल ! तुझा जुना मित्र ब्रुस बोलतोय."

"कॅथ्रीनला सोडा. तीचा ह्या सगळ्याशी काही संबंध नाहिये."

"नक्की सोडणार ! तु आम्हाला 'युएस' सर्व्हर मध्ये घुसण्याचा रस्ता दाखवलास की आम्ही तीला लगेच सोडणार आहोत. 'हॉटेल हयात' रुम नंबर २८७. 'एकटीच ये' वगैरे सूचना तुला द्यायची गरज नाही, नाही का?"
-----------

"गुड आफ्टरनून ऑफीसर "

"मि. पॅपिलॉन, गुड मॉर्नींग. तुम्ही पाठवलेली भेट माझ्या बायकोला फार आवडली."

"हि तर सुरुवात आहे ऑफीसर माईक. तुम्ही अशीच मैत्री ठेवा, मी तुम्हाला मालामाल करुन टाकीन."

"खरच सांगतो मि. पॅपिलॉन मी ह्या नोकरीला अगदी कंटाळलो आहे. मला ह्या पोलिस दलातून सुटका हवी आहे."

"काळजी करु नका मि. माईक. तुम्हाला लवकरच राजेशाही नोकरी मिळेल असे वचन देतो मी तुम्हाला."

"धन्यवाद पॅपिलॉन. आज संध्याकाळी गुड न्युज देणार्‍या माझ्या फोनची वाट बघा."

"नक्कीच माईक. तुम्ही माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला मी नक्कीच तडा जाऊ देणार नाही."

"गुड बाय पॅपिलॉन"

"गुड बाय माईक. डाव्या दंडात एक गोळी.... विसरणार नाहीस ना?"
-----------------------

"चिअर्स ! ह्या अनपेक्षीत यशासाठी."

"आणी चिअर्स ह्या यशातील माझी निम्मी भागीदार कॅथ्रीनसाठी देखील."

"आय लव्ह यु पॅपिलॉन, लव्ह यु सो मच. ह्या येणार्‍या पैशात आपण जगातले कुठलेही सुख विकत घेउ शकु."
---------------

"मिस्टर डग्लस.."

"हुकुम करा मालक, एकाच शहरात असुन मला कॉलींग कार्ड वरुन फोन ?"

"सावधगिरी हा प्रत्येक यशाचा पाया असतो हे तुम्हीच शिकवलेत मला मि. डग्लस. माझी प्रवासाची व्यवस्था झाली ?"

"येस सर ! उद्याची संध्याकाळ तुम्ही आणी कॅथ्रीन मॅडम एका नविन भुमीत साजरी करत असाल."

"कॅथ्रीनला मी आधीच वरच्या प्रवासाला पाठवून दिलय."

"कायsss?"

"पैशासाठी जी स्वतःच्या बहिणीला धोका देते, तिच्यावर मी विश्वास ठेवावा असा सल्ला तुम्ही देखील मला दिला नसतात, नाही का गुरुजी?"

"ठरलेल्या ठिकाणी गाडी तुझी वाट बघत असेल पॅपिलॉन. हॅपी जर्नी."

"पार्सल तुमच्या घरी पाठवायची व्यवस्था केलेली आहे. हातात आलेला दोन्ही कडचा डेटाबेस विरुद्ध कंपन्यांना कसा विकायचा हे तुम्ही जाणताच मि. डग्लस. आलेल्या पैशाची तुम्ही योग्य गुंतवणुक कराल अशी मी आशा करतो."
----------------

"प्रत्येक मोठ्या आणी अचानक मिळालेल्या यशामागे एक गुन्हा लपलेला असतो" असे मी कुठल्याश्या कादंबरीत वाचले होते. असेल बॉ... मल तरी काही अनुभव नाही.

सध्या मी दुबईतल्या एका छोट्याश्या कृत्रीम बेटावर छानसा बंगला घेतलाय. माझा सगळा दिवस तिथेच जातो. तिथेच बसुन मी चार देशात केलेल्या माझ्या गुंतवणुकीवर लक्ष ठेवुन असतो. मि.डग्लस माझे प्रतिनिधी आणी कायदेशीर सल्लागार म्हणुन काम बघतात. ऑफिसर माईकला मध्ये एका झटापटीत गोळी लागली. त्यानंतर त्याने पोलिसाच्या नोकरीला कायमचाच रामराम ठोकला. सध्या तो माझ्याकडेच काम करतो, माझ्या सिक्युरीटीचा चिफ आहे तो.

तुम्हाला माझा मित्र डेनीस 'द एग' आठवतोय ? त्यानी आता एक छोटीशी सॉफ्टवेअर कंपनी रशियात चालू केली आहे. खुप सुखात आहे तो. पॅपिलॉन नाही पण निदान पॅपिलॉनच्या आई वडीलांना रशियात सुरक्षीत ठेवल्याचे बक्षिस दिलय मी त्याला कंपनीच्या रुपाने.

अरे हो जाता-जाता तुमच्याशी दोन महिन्यापुर्वी पेपरात आलेली एक गंमतीदार बातमी शेअर करीन म्हणतो.

दिनांक १९ मे :- आज शहरातील प्रसिद्ध अशा दोन हॉटेलमध्ये खूनाच्या घटना घडल्या. 'हॉटेल हयात' मधून दोन व्यक्तींचा खून करुन पळून जायच्या प्रयत्नात असलेल्या एका स्त्रीला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता तीने पोलिसांवरच गोळीबार केला, उलट गोळीबारात हि महिला ठार झाली. मृत झालेल्या तिनहि व्यक्ती ह्या एकेकाळी गाजलेल्या 'एलिट' ह्या हॅकर ग्रुपच्या सर्वेसर्वा असल्याच संशय व्यक्त केला जात आहे.

ह्या हॉटेलपासून जवळच असलेल्या हॉटेल किंग मध्ये एका तरुण महिलेचे प्रेत सापडले असून तिचा विष पाजून खुन करण्यात आला आहे. सदर तरुणीच्या सामानाची व लॅपटॉपची तपासणी केली असता हि तरुणी 'पॅपिलॉन' ह्या नावाने हॅकिंग विश्वात प्रसिद्ध होती असे निदर्शनास आले आहे. वरिल दोन्ही घटनांचा काही परस्परसंबंध आहे का ह्याची शहर पोलिस तपासणी करत आहेत.

(समाप्त)

------------------------------------------------------------------

{पुस्तक
www.mimarathi.net ह्या संस्थळातर्फे माझी हि कथा आता पुस्तकरुपात उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इच्छुकांना हि कथा http://www.mimarathi.net/pustak ह्या ठिकाणाहुन डाऊनलोड करुन घेता येईल.
.
सर्व वाचकांच्या प्रेमामुळेच हे सर्व शक्य झाले. तुम्हा सर्वांचे मनःपुर्वक धन्यवाद.}


गुरुवार, १ एप्रिल, २०१०

सव्यसाचि (भाग -७)

"वेलकम वेलकम दोस्त. गेले दोन दिवस आम्ही तुमची वाट बघत आहोत. कुठे गायब कुठे झाला होतात मि. पॅपिलॉन??"

" हॅलो मि. वॉल्टर ! मी जरा 'अनटचेबल्स'चा पाहुणचार घेण्यात व्यग्र होतो !"

"स्मार्ट ! म्हणजे आता मला अ ब क पासून नक्कीच सुरुवात करावी लागणार नाही तर."

"नक्कीच नाही मि. वॉल्टर. एलिटला काय माझ्याकडून काय हवय आणी कस हवय ते मला आता माहिती आहेच; तेंव्हा आपण आता सरळ मुद्याकडे वळुयात का?"

"चालेल, मलाही लवकरात लवकर काम सुरु करायचेच आहे पॅपिलॉन."

"तुमची ऑफर ?? आणी मुख्य म्हणजे माझी सुरक्षितता ?"

"वेल पॅपिलॉन सुरक्षेची खात्री मी तुला आमच्याकडून १००% देउ शकतो ! उद्या तुझे नाव फुटलेच तरी तुला एखाद्या दुसर्‍या देशात संपुर्ण नविन कागदपत्रांसह, नविन ओळखीसह सेटल करणे हे आमचे वचन ! तु कुठल्याही सरकारी चौकशीत अडकणार देखील नाहिस, मात्र तु 'यु.एस' च्या हातला लागलास तर मात्र आम्ही काहिच करु शकणार नाही. शेवटी येवढा पैसा मिळवायचा तर रिस्क घ्यावीच लागणार !"

"हम्म्म ! प्रश्न पैशाचा नाही मि. वॉल्टर. तुमच्या ऑफरच्या १० पट ऑफर मला ऑलरेडी कबुल झाली आहे अनटचेबल्स कडून."

"इंट्रेस्टिंग ! आणी तुझी सुरक्षीतता ??"

"संपुर्ण सुरक्षीतता, ति देखिल सरकारी खात्याकडून."

"डबल क्रॉस ??"

"कधिच नाही. मला थेट अनटचेबल्स जॉईन करायची ऑफर आहे ! डबलक्रॉस करुन पैसे मिळवायची मला गरजही नाही आणी आवड त्याहुन नाही."

"अनटचेबल्स साठी तुला काय वर्क करायचे आहे पॅपिलॉन ?? आणी मुख्य म्हणजे कोणत्या सरकारसाठी ?"

"मला नक्की खात्री नाहिये मि. वॉल्टर, पण भवतेक मला गल्फ कंट्रिजच्या स्वतः स्थापन केलेल्या काही ऑइल्स कंपनीच्या डेटाबेसवर लक्ष केंद्रित करावे लागेल असे वाटते."

"यु शुअर अजुन काही वेगळे आणी धोकादायक काम तुला सांगणार नाहित ??"

"मी अजुन माझा निर्णय कळवला नाहिये मि. वॉल्टर ! पण जर एलिट मला चांगली ऑफर देत असेल तर मी अनटचेबल्सचा विचार तरी का करावा ??"

"तुला काय अपेक्षीत आहे पॅपिलॉन ??"

"उम्म्म्म्मम माझ्या मते इंडीयन करंसी मध्ये २ कोटी पुष्कळ होतील माझ्यासाठी... आणी हो, अजुन २ कोटी मिळणार असतील तर मी माझा अभिमान बाजुला ठेवुन अनटचेबल्सला डबलक्रॉस करायला देखिल तयार आहे."

"तु अत्यंत विश्वासघातकी आणी निच माणूस आहेस पॅपिलॉन !"

"धन्यवाद मि. वॉल्टर. बाकी अनटचेबल्सच्या पार्टनर्सपैकी एक असलेला 'केन' मला बरबाद करण्यासाठी तुझी मदत करायला एका पायवर तयार होईल असे मला वाटते."

"कुल ! दोनच दिवसात तु शत्रु देखिल तयार करुन आलास तर."

"नाह, शत्रु नाही. मी फक्त माझ्यामागे परतिचे दार बंद होणार नाही ह्याची काळजी घेतलीये."

"तुला भेटायला बोलावुन मी माझ्याच पायावर धोंडा पाडून घेतला आहे असे मला आता वाटायला लागलय पॅपिलॉन." वॉल्टर खदखदून हसत म्हणाला.

"एट युवर सर्विस सर बाकी अनटचेबल्सला नेस्तनाबुत करायला तुम्हाला नक्किच आवडेल नाही का ?? अनटचेबल्सकडचा कामाचा ओघही आपसुकच एलिटकडे वळेल."

"निश्चीतच तसे होईल पॅपिलॉन. पण हे वाटते तेवढे सोपे नाही , फार फार धोका आहे त्यात."

"डोंट वरी मि. वॉल्टर, तुम्ही फक्त माझे डिल कबुल करा. पुढचे माझ्याकडे सोपवा."

"आणी तुझ्यासारख्या विश्वासघातक्याला कोणाकडे सोपवायचे?"

"आमच्याकडे पैशाचा देवीला लक्ष्मी म्हणतात ; तिच्याकडे द्या मला सोपवुन."

"हा हा हा.... केन बद्दल अजुन काही माहिती ?"

"पैसे कधी पर्यंत जमा होतील मि. वॉल्टर ?"

"हरामखोर आहेस तु !! वेट, मला एक फोन करु देत, तु सांगितलेल्या खात्यात ३० मिनिटात पैसे ट्रान्सफर होतील."

"धन्यवाद मि. वॉल्टर. मी तर फक्त तुमचे मन बघत होतो. पैसे मल हवेच आहेत, पण ते इथे नकोत. अजुन ४ दिवसांनी मला बोस्टन मध्ये ते मिळतील अशी व्यवस्था करा."

वॉल्टर तोंडाचा आ वासून माझ्याकडे बघतच राहिला.

"रिलॅक्स सर. बोस्टनमध्ये बसुन, अनटचेबल्सच्या सेट अप वरुन एलिटचे काम करता करता अनटचेबल्सला संपवायला किती मजा येईल ना??" मी मस्तपैकी डोळा मारत म्हणालो.

"तुला हे येवढे सोपे वाटते ??"

"जगात अवघड काहिच नाही मि. वॉल्टर ! फक्त तुम्ही योग्य दिशेने प्रयत्न चालु ठेवले पाहिजेत."

"चार दिवसात तुला पैसे मिळतील. उद्यापर्यंत बोस्टनमध्ये असलेले आपले कॉन्टेक्टस, त्यांच्याशी संपर्क कसा साधायचा हे सगळे तुला कळवण्यात येईल. अनटचेबल्स कडून सुटलास आणी जगला वाचलास तर पुन्हा भेटुच पॅपिलॉन.

(मुर्ख माणूस ! अनटचेबल्सचा हिसका कोणाला सांगत होता; तर मलाच. अरे मुर्ख माणसा, कालच अनटचेबल्सचा नविन बॉस म्हणुन पार्टी साजरी करुन आलोय मी !)

वॉल्टरचा निरोप घेउन मी बाहेर पडलो. फोन चालु करताच मिस्ड कॉल अ‍ॅलर्टनी १४ मिस्ड कॉल्सची यादी समोर फेकली. सारेच्या सारे
कॉलिंग कार्डसचे नंबर होते. मी काही वेळ शांत बसून राहिलो. मग मी माझ्या फोन मध्ये दुबईच्या कॉलिंग कार्ड वरुन डायनाचा नंबर डायल करायला सुरुवात केली.

"हाय स्विटी"

"जिझस ! कुठे होतास तु ? मी कधी पासून तुला ट्राय करत होते."

"तुझ्या आजुबाजुला आत्ता कोणी आहे ? असेल तर थोडे बाजुला एकांतत ये, मला काही महत्वाचे बोलायचे आहे."

"बेलाशक बोल मी आत्ता टेरेसवर एकटीच आहे."

"डायना मी अनटचेबल्सला भेटायला आलो होतो हि बातमी एलिटपर्यंत पोचली होती ! मी विमानतळाबाहेर पडताच अतिशय सभ्यपणे माझे अपहरण करण्यात आले."

"ओह्ह गॉड ! तु ठिक आहेस ना? त्यांनी तुला काहि केले तर नाही ना?"

"मी सुखरुप आहे आणी आता घरीच निघालो आहे. पण माझ्या जीवाला इथे धोका आहे. दोन दिवसात मला इथुन बोस्टनाला न्यायचा मार्ग काढ, तिकडे आलो की सविस्तर बोलणे होईलच."

"तु काळजी करु नकोस पॅपिलॉन. मी आजच सगळी व्यवस्था करते."

"नाही आजच नको ! मला दोन दिवस दे. हे प्रकरण कधी आणी कोणते वळण घेईल ह्याची शाश्वती नाही. मी दोन दिवसात आई वडीलांना आधी सुरक्षीत जागी हलवतो."

"गुड. ते योग्यच ठरेल."

"ठेवतो आता, बाय. आणी हो मला चुकीचे समजू नकोस डायना, पण केनच्या हालचालींवर पाळत ठेव आणी प्लिज येवढ्यात त्याला कुठल्याही महत्वाचा गोष्टीची माहिती देउ नकोस."

"पॅपिलॉन......"

"सॉरी डायना पण माझ्याकडे तसे पुरावे आहेत !"

"ओके ... मी काळजी घेईन. पण तु प्लिज लवकर ये, तुला बघितल्याशिवात आता मला चैन पडणार नाही."

डायनाला धिर देउन मी माझा कॉल संपवला आणी त्याचवेळी माझ्या दुसर्‍या मोबाईलनी कोकलायला सुरुवात केली....

"पॅपिलॉन ??"

"बोलतोय..."

"सर मार्क बोलतोय. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मार्क-रॉबिन्सनच्या मॅनेजरची भेट घेतली. जर एलिट ग्रुप नामशेष होणार असेल तर लागेल ती मदत करायला तो एका पायावर तयार आहे. फारच मनाला लावून घेतलाय त्यानी नोकरी वरुन हाकलले जाणे."

"छान बातमी दिलीस मार्क, धन्यवाद. तु त्या मॅनेजरच्या संपर्कात रहा. मी ४/५ दिवसात बोस्टनला पोचलो की तुला कॉन्टेक्ट करीनच. चलो बाय."

आता दुसर्‍या कॉलींग कार्डवरुन मी माझ्या प्रिय हॅकर मित्राचा डेनिसचा नंबर फिरवला, डेनिस आजकाल त्याच्या सरकारसाठी इथिकल हॅकींगची कामे करायचा.

"हॅलो एग"

"कोण बोलतय ??"

"तुला एग नावानी हाक मारणारा अजुन कोण असु शकेल ? पॅपिलॉन बोलतोय"

"डॅम ! तु अजुन जिवंत आहेस का? मला वाटले एलिट आणी अनटचेबल्सच्या साठमारीत आपले जीवन कधिच संपले असेल."

"यु विश ! माझ्या कामाचे काय झाले?"

"मी पुर्ण प्रयत्न करतोय. पण अजुनही काही प्रमुख अधिकारी नाना शंका उपस्थीत करत आहेत."

"कमॉन एग. येवढी चांगली ऑफर तुमच्या रशीयाला कधी वर्ल्ड बँकेनी देखील दिली नसेल ! एकाच वेळी "यु एस, चायना आणी आखाती देशांच्या ऑईल कंपन्यांचा संपुर्ण डाटाबेस घर बसल्या मिळतोय तुम्हाला ! वर एलिट आणी अनटचेबल्स सारख्या ग्रुपसना संपवल्याचे फुकटचे पुण्य वेगळेच; आणी त्याबदल्यात मला फक्त हवय ते रशियन नागरीकत्व, 'केजीबी'ची मदत आणी एफ बी आय पासून संरक्षण....."

(क्रमशः)