बुधवार, १० डिसेंबर, २००८
२/३ दिवस घरी काही कारणामुळे लवकर जात होतो रात्रीचा, त्यामुळे टि.व्हि. नावाच्या आचरट प्राण्याचा असह्य त्रास हि सहन करावा लागला हो ! परमेश्वरा, अरे काय अर्थहीन आणी महामुर्ख मालीका असतात हो ह्या टि.व्हि. वर.
एक मुलगा अपंग, एका मुलाची बायको माहेरच्या श्रीमंतीचा प्रचंड माज असलेली आणी त्याला कायम चुकीचे सल्ले देणारी, मुलगी वेडी आणी हरवलेली, वडिलांना अर्धांगवायुचा झटका आलेला आहे आणी ते कमी कि काय म्हणुन ते तुरुंगवारी सुद्धा करुन आले आहेत येव्हड्यातच. आणी मालीकेचे नाव काय तर म्हणे 'ह्या गोजिरवाण्या घरात'. डोंबलाचे गोजिरवाणे ? मालिकेचे नाव सोडले तर सगळे लाजिरवाणेच आहे !
तुम्हाला सांगतो, आपल्याकडे कशी रोगाची साथ पसरते ना तशी ह्या मालिकात कथाकथनाची साथ पसरते, म्हणजे 'ह्या' मालिकेतल्या नायिकेचा छोटा मुलगा पळवला गेला कि 'त्या' मालीकेतल्या नायिकेचा पण पळवला गेलाच. हिच्या नवर्याला अपघात झाला कि तिकडे तिच्या नवर्यानी छातीवर हात दाबलाच म्हणुन समजा !
मला तर कधी कधीना हे निर्माता दिग्दर्शक विक्रुत असतात का काय अशी शंका येते ! तुम्हि बघा हि लोक बाईला व्यवस्थीत बाळंत म्हणुन होउन देत नाहित. कुठलीही मालिका बघा, बाईला दिवस गेले रे गेले कि ६ महीन्यात ती जिन्यावरुन पडलीच पाहिजे, नाहितर कोणाला तरी अपघातातुन वाचवताना पोटावर तरी पडली पाहिजे. एक तरी नायिका सुखरूप आणी आजुबाजुला सासु, नवरा काळजी घ्यायला खंबीर असताना बाळंत झालेली दाखवली तर टि. आर. पी. कमी होतो का ? हिला (जर जिना, अपघात, विषप्रयोग ह्यातुन वाचली तर) बाळंत पणाला डॉक्टरनी ऑपरेशन थेटर मध्ये घेतले रे घेतले की तिकडे कोणीतरी गचकलेच म्हणुन समजा. नाविन आत्मा जन्माला आलाच नाहि पाहिजे ! इकडे आत्मा मुक्त झाल्याबरोबर तिकडे "ट्यॅहॅ ट्यॅहॅ " चा आवाज चालु ! तो स्रुष्टिकर्ता सुध्दा हाताची ५ बोट तोंडात घालुन बसत असेल आश्चर्यानी.
मी मध्ये एक मालिका बघत होतो साधारण २ महिन्यापुर्वी ची गोष्ट आहे, त्या दुखी:यारी नयिकेचा नवरा अपेयपान करुन गाडी चालवत असताना अपघातग्रस्त होउन, दवखान्यात आता जातो का मग जातो (जा बाबा एकदाचा) अशा अवस्थेत पडलेला असतो. ह्याचा बापुस डॉक्टरला हुकुम सोडतो "पैसे कि चिंता मत करो लेकिन मुझे मेरा बेटा जिंदा चाहिये."
खरे सांगु का, संपुर्ण भागात ह्या एकाच शॉट चे आम्हाला कौतुक वाटले, अशा अवस्थेतही त्या बापानी डॉक्टरच्या चेहर्यावरील पैशाची काळजी ओळखली. प्रचंड हसर्या चेहर्याने डॉक्टर सांगतो "मुझे पता है ठाकुर साहाब, और दुनीया के सबसे बडे डॉक्टर इस वक्त यही मौजुद है."
ह्याला म्हणतात नशीब ! आम्ही साधी कधीतरी भेळ खायला म्हणुन प्लॅनींग करुन गेलो कि हमखास आमच्या नशीबात कुलुप ! आणी च्या आईला इकडे लगेच दुनिया का सबसे बडा डॉक्टर मौजुद. बडा डॉक्टर आहे म्हणजे तो ह्रुदया पासुन मुळव्याधी पर्यंत सगळ्याचा इलाज करत असणार अशी आम्ही मनाची समजुत घालुन घेतली.
हान तर हा सबसे डॉक्टर मग ह्या हिरोला ऑपरेशन थेटर मध्ये घेतो, बाहेर हिरो कि मॉ आणी बायको भगवान श्रीक्रिष्ण की चरणोमे पडलेल्या. कॅमेरा एकदा थेटर वरच्या लाल दिव्यावर मग एकदम ECG मशीन वर आणी मग एकदम उड्डाण करुन क्रुष्णा च्या हसर्या आणी आश्वासक चेहर्यावर.
ECG मशीनची लाइन आमच्या आठवी नववी इयत्तेमधल्या आलेखा सारखी वाकडी तिकडी खालती वरती नाचायला लागते, डॉक्टर लोग जमतील तेव्हडे मुर्ख भाव आणुन एकमेकांकडे बघायला लागतात, जणु आन्खो के सामने हे असले काहि पहिल्यांदाच घडत आहे. आणी अचानक भयप्रद संगीत वाजायला लागते आणी ECG ची रेषा गप्प होते. येकदम फ्लॅट !
"आय.एम.सॉरी" दुनिया का सबसे बडा डॉक्टर म्हणतो आणी ताडताड दरवाजा उघडुन निघुन जातो ! श्रीक्रुष्णा समोर फडफडणारी ज्योत शांत होते. माता अर्धांगीनी एकत्र किंचळतात "नह्हि !!" ज्यु. डॉक्टर बाहेर येउन सांगतात "बहोत कोशीश कि हमने, लेकीन ऑपरेशन के वक्त हि उन्हे जोर से हार्ट एटॅक आ गया और हार्ट बंद पड गया. हम उन्हे नही बचा पाये."
अर्धांगीनी धावत धावत अर्धांगाच्या रुम कडे धावतात. (येव्हड्या कमी वेळात त्याचे शरीर टाके घालुन परत रुम मध्ये आणुन ठेवणार्या वॉर्डबॉय आणी डॉक्टरांना आमचा मानाचा मुजरा) अर्धांगीनी वेळ न घालवता अर्धांगाच्या शरीरावर पडुन त्याला "ऐसे कैसे मुझे अकेला छोर के चले गये ? भूल गये जिवनभर साथ निभाने का वादा किया था आपने ? आब मै किसके सहारे जिउंगी ?" असे प्रश्न विचारु लागते, मग काहि काळ नशिब व देव ह्यांना कोसले जाते. आणी मग संताप आणी रागाच्या भरात ती आपले दोन्ही हाथ नवर्याच्या छातीवर आपटुन बांगड्या फोडते, देवा महाराजा ऐका सती सावित्रीची पुण्याई, बांगड्या छातीवर आपटताच ECG मशीनची लाईन परत उड्या मारु लागी, उड्या मारु लागी हो, जी जी जी जी. .....
लेबल: प्रहसन
मंगळवार, २५ नोव्हेंबर, २००८
खरेच आज कोण सुखी आहे ह्या जगात ? कितीही मोठी, उच्च पदावरील व्यक्ती असो, दुख: , चिंता काय पाठ सोडायला तयार नसतात. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. त्यामुळेच आज श्री. सत्य आईबाबा ह्यांचे शहरात आगमन होणार आहे हे कळताच, मोठ मोठ्या लोकांची दर्शनाला नुसती झुंबड उडाली होती.
आम्ही सुद्धा मोठ्या हिकमतीने खास दरबारात प्रवेश मिळवला. (पेशव्यांचे रक्त खेळतय नसा नसात) हे वाक्य एकदा आम्ही एकाला ऐकवले होते, त्याने आम्हाला "मग तुम्हाला 'पेशवाई' मध्ये सगळे फ्री असेल ना?" असे विचारुन तप्त डांबरी रस्त्यावर चितपट केले होते.
असो,खास दरबारामध्ये फक्त खास खास लोकांच्या स्वार्या विराजमान झाल्या होत्या. शेतीतज्ञ, क्रिकेट शिरोमणी, संरक्षण पंडित श्री. शरदजी चंद्रजी पवारजी, त्यांचे आज्ञाधारक जलतंत्रज्ञ पुतणे श्री. अजीतजी पवारजी, कोकण भुषण, तडफ़दार, भ्रष्टाचारावर सतत 'प्रहार' करणारे नारायणजी राणेजी, गुणग्राहक, शेती माहितीगार, सांस्क्रुतीक आघाडी सांभाळणारे गोपीनाथजी मुंढेजी, विदर्भाचे वाघ नितीनजी गडकरीजी, दलित समाजाचा भक्कम आधार, दलित मार्गदर्शक रामदासजी आठवलेजी, हिंदु ह्रुदय राजकुमार (सम्राटांचे चिरंजीव) उध्दवजी ठाकरेजी, मराठी ह्रुदय सम्राट राजजी ठाकरेजी, मागासवर्गीयांचे आशास्थान छगनजी भुजबळजी, यवन ह्रुदय सम्राट (स्वयंघोषीत) अबुजी आझमीजी दरबाराची शोभा वाढवत होते.
नारायण राणे :- 'भुकंपग्रस्त' दिसत नाहियेत कुठे ..
रामदासजी :- अल्वा मॅडम कशाला येतिल इकडे ?(नारायण राणे कपाळावर हात मारुन घेतात)
राणे :- अहो, 'लातुर' वाल्यांविषयी विचारतोय मी. समजुन घ्या जरा.
आठवले :- आजवर 'आम्हाला' कोणी कधी समजुन घेतले आहे का ? दरवेळी आमच्याकडुन काहि ना काहि अपेक्षा असतेच तुम्हा लोकांची.
गोपीनाथजी :- ऐका ना, म्हणुनच सांगतोय ह्या वेळी आमच्या बरोबर चला, आमची तुमच्या कडुन काहि अपेक्षा नाही.
छगनराव :- हो ! आणी तुम्ही पण काहि अपेक्षा ठेवु नका त्यांच्याकडुन रामदासजी. मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडायला लागली आहेत आजकाल बर्याच जणांना ! (उध्दवजींकडे, राणेंकडे बघतात) येव्हड्यात विलासराव प्रवेश करतात.
राणे :- थिंक ऑफ डेव्हिड ......
उद्धव :- डेव्हिल म्हणतात त्याला .... का लोक आपल्या अक्कलेची दिवाळखोरी दाखवतात काय माहिती ?
राणे :- हो ना ! दाखवतात नाहि तर काय, राज्याच्या उस प्रश्नासाठी राज्यपालांना भेटायला जातात . हि हि हि हि हि
गोपीनाथजी :- काय राजे यायला उशीर केलात फार ?
राणे :- रोज मुंबई - दिल्ली अपडाउन करणे म्हणजे काय सोपे काम आहे का ? होणारच जरा उशीर ...
विलासराव :- महत्वाच्या माणसांना कामे असतात मुंढे साहेब, बिनकामाची लोक बसतात स्वत:च्याच पायावर 'प्रहार' करीत.
अजीतजी :- ते मुख्यमंत्री पदाचे बोलणे अर्धवटच राहिले की हो..
राज :- मुख्यमंत्रीपदाची काळजी नंतर करा, आधी एखाद्या 'सुप्रिय' व्यक्ती पायी तुमचा नारायणराव पेशवा होणार नाही ह्याची काळजी घ्या !
शरदराव :- अजीत कानात साठवुन ठेव हे बोल, अनुभवाचे बोल आजकाल फार कमी ऐकायला मिळतात महाराजा.
उद्धव :- नारायणराव फार भित्रे होते म्हणे !
छगनजी :- तेव्हा त्या काळच्या देशमुख आणी पाटलांनी नसेल साथ दिली त्यांना. चालायचेच ....
राज :- असते एकेकाचे नशीब. कोणाच्या नशिबात काय आहे कोणास कळणार ?
नितीन गडकरी :- बरोबर बोलुन राहिले तुम्ही भौ. कोणाच्या नशिबात भुखंडाची जमीन तर कोणाच्या नशीबात गिरणीची. ख्यॉं ख्यॉं ख्यॉं
राज :- कोल्ह्याला द्राक्षे आंबट !!येव्हड्यात घाई घाईने आबा पाटिल येतात.
छगनराव :- या !! कुठे गोळ्या गोळ्या खेळत बसला होतात ??
आबा :- (शरदरावांकडे बघतात) साहेब...
शरदराव :- मंत्रीमंडळ विस्ताराचे घोंगडे अजुन किती दिवस भिजत पडणार आहे ?
रामदासजी :- हो ना, सरकार पडायच्या आत काहितरी करा बुव्वा.
अजीतदादा :- काकांसारखे खंबीर नेत्रुत्व असताना सरकार पडेलच कसे ?
उद्धव :- भरल्या घरचे पोकळ वासे !
गडकरी :- 'वडाभाताचा' वास येउन राहिलाय बे कुठुनतरी !!
मुंढे :- अहो किति खा खा करता हो ??
गडकरी :- तुम्ही तर 'सुरेखा सुरेखा' करत असता की ! आम्ही कधी काय बोलुन राहिलो का तुम्हाला भौ ?
मुंढे :- (रागानी) ते वेगळे हे वेगळे , उगाच ह्याच्या पारंब्या काढुन त्याला लावु नका !
छगनराव :- पारंब्या न्हवेत साली.
रामदासजी :- हि हि हि सुरपारंब्या म्हणालात तरी चालेल.
शरदजी :- आठवले काहितरी कोट्या करु नका उगाच, राज्यात येव्हडे मोठ मोठे प्रश्न आ वासुन उभे आहेत , सुरपारंब्या कसल्या खेळताय ? तशाही दर निवडणुकीत तुम्ही त्या खेळतच असता आणी तुमचे प्राविण्य हि सर्वांना माहित आहे ..(तेव्हड्यात उर्जामंत्री वळसे पाटिल येतात)
मुंढे :- आलाच बघा एक मोठा प्रश्न ! काय काहि उपाय सापडतोय का विजटंचाई वर ?
वळसे - पाटील :- सापडेल लवकरच, नतद्रष्टांनी समुद्रात बुडवलेली कंपनीच धावेल मदतीला असे वाटत आहे.
उद्धव :- वाटायला तुम्हाला बरेच काहि वाटते, 'दत्तगुरु महाराज' मदतीला धावतिल असे वाटल्याने विक्रम गोखल्यांना विज मंडळाचे 'दूत' सुध्दा बनवुन झाले कि तुमचे. कुठे काय उजेड पडला ?
गडकरी :- ह्यांच्या घरात पडुन राहिला न उजेड भौ, दिड दिड लाखाचा !
राज :- भौ भौ करु नका हो ! भय्या भय्या केल्या सारखे वाटते. माजलेत सगळे भय्या लोक.
उध्दव :- आणी ते ए.टि.एस. वाले सुध्दा !(हे ऐकल्या बरोब्बर इतक्या वेळ गप्प पडलेले आझमी खडबडुन उभे राहतात) (पवार, देशमुख, भुजबळ लगेच खिशातुन रुमाल काढुन डोक्यावर पांघरतात)
राज :- काय 'पोचवायला' निघालात का काय सगळ्या भय्यांना ?
आझमी :- अल्लाह ! हे काय भलतेच ?
पवार :- नाही ते तुम्ही लगबगिने उठला ना, आम्हाला वाटले नमाजाची वेळ झाली !
आझमी :- सुभान अल्लाह , काय हा आदर परधर्माविषयी. म्हणुनच तुम्ही आम्हाला कधी परके वाटत नाहि !
उध्दव :- हिंदुना 'पोरके' करणारे सगळे तुम्हाला आपलेच वाटणार.
विलासराव :- आमचा पक्ष निधर्मी आहे. सर्व जण आम्हाला समान आहेत. मुस्लिम भावांच्या सुरक्षेसाठी छातीचे कोट करु !!
रामदास :- साहेब, कोटाच्या गुंड्या वर खाली लागल्यात !! हि हि हि
राज :- त्यांना 'मुका' आणी आम्हाला 'मोका' !!
उद्धव :- हज ला अनुदान आणी अमरनाथ ला टॅक्स.
पवार :- अशा ठिकाणी तरी वाद - विवाद नकोत क्रुपया. श्री. सत्य आईबाबांपुढे कोण काय मागणे मागणार आहे त्यावर चिंतन करत शांत बसुयात आता.
राज :- एकदा संपुर्ण मराठी जनतेलाचा शांत करा तुम्ही कायमचे, म्हणजे 'सुटलात.'
आझमी :- महाराष्ट्र सगळ्यांचा आहे, कुणा एकाची मक्तेदारी नाहि त्यावर !
पवार :- शांत व्हा ! उगिच धार्मिक वाद नकोत ! सगळे धर्म श्रेष्ठ.
मुंढे :- आणी काही लोकांसाठी पैसा हाच धर्म.
राणे :- नोंद आहे आमच्याकडे कोणी किती पैसा खाल्ला त्याची, समजले काय ?
रामदास :- मग आता कशाच्या मोबदल्यात नोंदि बाहेर काढणार आहात ते पण सांगुन टाका.
मुंढे :- तिकिटच हवे तर आम्ही देउ की पण निलेशला देउ तुम्ही फक्त मागे उभे रहा आणी पेपरवर बसा.
राणे :- काय बोलताय काय ?
मुंढे :- पेपरचा व्याप सांभाळत बसा असे म्हणायचे होते.
उद्धव :- तिकिट वाटपाचा निर्णय युतीच्या सभेतच घेतला गेलेला बरा, आणी त्यात कोकण आमचे राखीव कुरण आहे !
राणे :- अरे ह्याट, एकट्याच्या जिवावर निवडुन आणीन सगळ्या सिट, मग मागे कुठला पक्ष असो व नसो.
राज :- अशी नवनिर्माणाची ओढ पाहिजे.
आझमी :- सरकारी बसेस फोडुन, जाळुन आणी गरीब टॅक्सी वाल्यांना मारुन कसले नवनिर्माण होते म्हणे ?
उद्धव :- नवनिर्माण तरी निदान स्वता:च्या 'सामुग्रीने' करावे, चोरलेल्या नको.
राज :- चोरले नाहि उलट चढलेला गंज साफ करुन अडगळीत पडलेली आणी कधिकाळी जिनी सत्ता दाखवली ति सामुग्री वापरात आणतोय आम्ही !
गडकरी :- बाबा कधी येणार ? भुक लागुन रहिली ना भौ.
विलासराव :- मला सुद्धा रितेश च्या नव्या 'शो' ला जायचे आहे 'आम्ही मराठि, पुढे गेली जगरहाटी.'
राणे :- निलेशच्या नविन बांधकामाचे उदघाटन आहे हो आज.
रामदासजी :- आज मलापण जायचे आहे मासिकाच्या उदघाटनाला, 'निळ्या कोब्र्याचा डंख आणी मुंगीला फुटले पंख.'
मुंढे :- ऐका ना, पुण्यात खाजगी 'सत्कार सोहळा' आहे आमचा, चुकवुन चालणार नाही.
अजितदादा :- मला धरणाची भिंत बघायला जायचे आहे.(हॉल मध्ये हास्याचा गडगडाट आणी आपले काय चुकले ते न कळाल्याने अजीत दादांच्या चेहर्यावर गोंधळलेले भाव)
शरदजी :- भुजबळ तुम्ही पण सामिल झालात हसण्यात ? अहो घरचा छकुला चुकला तर आपणच सांभाळुन घ्यायचे असते. शब्दांत खूप काहि दडले आहे माझ्या, ते लक्षात घ्या.
आबा :- (लगेच टोला मारुन घेतात) नाहि साहेब तुम्ही ते छकुला छकुला करत बसता मग अती लाडवतो तो, आमचा पण मान सन्मान काय हाये का नाहि ?
शरदजी :- (आबा आणी छगनजींनकडे आलटुन पालटुन बघत) तुमचा मान , सन्मान आणी 'अपेक्षा' मी चांगलाच ओळखून आहे ! केंद्रात १० वेळा माझा 'यशवंतराव' झाला असला तरी जिवात जीव असे पर्यंत महाराष्ट्रात होणार नाही हे निश्चित !!
तेव्हड्यात बाहेर धर्मराव अत्राम बाबांसाठी वाघाचे कातडे घेउन आल्याचा गोंगाट झाला आणी ते बघण्यासाठी सर्वांबरोबर आम्ही हि 'सभात्याग' केला.
लेबल: प्रहसन
शुक्रवार, २१ नोव्हेंबर, २००८
धाडसी गुप्तहेराचा नमस्कार __/\__
पॉंटिंग नावाच्या वाचाळ प्राण्याने सुनिल गवासकर ह्यांच्या वर केलेल्या टिकेविषयी आपण वाचले असेलच. बर्याच मान्यवरांनी ह्या विषयावर भाष्य टाळले. परंतु काहि माजी भारतीय कर्णधारांच्या दैनंदिनीत मात्र ह्या विषयी बरेच लिहिलेले आढळले. ह्या काहि निवडक प्रतीक्रिया..
बिशन सिंग बेदी :-ओये होये मुंडे मे बडा दम हैगा ! बर्याच वर्षानी का होइना पण कोणीतरी त्याला आरसा दाखवल बरे झाले. देवदूत कसला असुर आहे तो ! ह्याला येव्हडे सावरुन घेतले पण शेवटि काय ? ह्यांच्या हाथाखाली आम्हाला खेळायला लावले. माझा सल्ला तरी घ्यायचा होता त्या रिकी नि, मग एका रणजी सामन्यात डाव्या हातानी फलंदाजी करण्यापर्यंत ह्यांची मजल कशी गेली होती ते पण त्याला सांगीतले असते मी. उघड पणे नाही पण रात्री हळुच २ 'पतियाळा' जास्त मारुन मी सेलिब्रेट केलेच.हो मै बेदी रब रब कर दि हो मै बेदी.
सचिन तेंडुलकर :-आयला ! खरे बोलला रिक्या अगदी. देवदूत असे नसतातच. सामना चालु व्हायच्या ४ दिवस आधीपासुनच जे मिडीया , जुने खेळाडु ह्यांच्या मदतीने समोरच्या टिम च्या विकेट काढायला सुरुवात करतात, दिवसभर दारुच्या गुत्त्यात हिंडत असल्यासारखे वागत आणी बडबडत असतात, षटकातला शेवटचा चेंडु सरपटी टाकुन प्रतिस्पर्धी संघाला नेस्तनाबुत करतात, ते देवदूत असतात. समोरच्या संघातील सर्वात चांगल्या गोलंदाजाला जे 'चकर' म्हणतात, त्याच्यावर वांशीक टिपणी करतात, जे त्याला अंडी फेकुन मारतात, ते देवदूत असतात. समोरच्या संघातील खेळाडुला जे अतीरेकी म्हणतात ते देवदूत असतात. आणी खरे सांगायचे तर देवदूत फक्त ऑस्ट्रेलीयात जन्माला येतात.
लेबल: प्रहसन
बुधवार, १९ नोव्हेंबर, २००८
फॉर्म्युला वन आणी किंगफिशर ची चढाओढ ह्यातुन कहिसे बाहेर पडल्या नंतर प्रसिद्ध उद्योजक, फॉर्म्युला वन सारख्या ठिकाणी संघ उभे करणारे एकमेव भारतीय विजय मल्ल्या हे थोडेसे रिलॅक्स होण्यासाठी 'सखी मदिरा' पार्टि चे आयोजन करत आहेत, हे ऐकल्या बरोब्बर आमची कळी खुलली.
विजय मल्ल्यांची पार्टि म्हणजे झाडुन सगळे पेज ३ वाले मान्यवर, क्रिकेटर्स, मायानगरी मधिल तारे, राजकारणी हजेरी लावणार, आणी आम्हाला सभासदांना खमंग काहितरी वाचायल देता येणार ह्याचा आनंद आम्हाला सर्वाधिक झाला. त्या आनंदाच्या भरात आम्ही विजय मल्ल्यांच्या संपत्ती मध्ये त्या रात्री रोजच्या पेक्षा जरा जास्तच भर टाकली.
पार्टि साठी आम्ही स्वयंघोषीत पत्रकार व UB च्या भरभराटी मध्ये खारीचा वाटा उचलणारे अशा दुहेरी अधिकाराने वर्णी लावली.गेल्या गेल्या आधी विजय मल्ल्यां भोवतीच्या गराड्यात शिरुन त्यांना अभिवादन केले व सध्या नविन येणार्या वर्षाचे खास 'किंगफिशर कॅलेंडर' बुक करुन टाकले.
आ हा हा पार्टिचा थाट काय वर्णावा महाराजा ? पेशवाई दफ्तरातील मेजवानीची वर्णने थिटी पडावीत असा प्रसंग होता. मोठ मोठ्या लोकांच्या उपस्थीतीमुळे चॅनेल वाल्यांचीही गडबड व लुड्बुड वाढली होती.एका कोचावर विलासराव, शिंदे सरकार, आर. आर. आबा, गोपीनाथ मुंढे अशी मैफिल सजली होती. तर त्यांच्या पासुन काही अंतरावर राणे, छगन भुजबळ, मनोहर जोशी यांची गप्पाष्टके चालु होती.सलमान, शाहरुख, जॉन, प्रियांका, ऐश्वर्या ईत्यादी तार्यांची रोशणाई तर विचारुच नका. खुद्द आपले धरम दादा व अजय देवगण येणार्या प्रत्येकाचे " खुब जमेगा रंग जब मिल बैठेंगे ३ यार, आप हम और हि हि हि हि सोडा" असे म्हणुन स्वागत करत होते.एका घोळक्यात खुद्द भरत जाधव, अविनाश नारकर (हा माणुस आपले नाव बदलुन विक्रम गोखले (जु.) असे क ठेवत नाही कोणास ठाउक) त्यांची कोणत्याही प्रसंगात उगिचच कॅमेर्याकडे बघत हसणारी अर्धांगीनी ऐश्वर्या, मकरंद अनासपुरे अशी हि मंडळी बघुन आम्हाला न पिताच हलकिशी किक बसली.
विलासराव :- काय चक्कर आली का काय ?
आम्ही :- साहेब अहो ह्या अशा ठिकाणी ह्या लोकांना बघुन आणी काय येणार ?विलासराव :- सवय लावुन घ्या आता ह्याची, 'सगळ्या' ठिकाणी मराठी माणसाला ८०% आरक्षण मिळालेच पाहिजे असा कायदाच काढतोय आम्ही.
गोपीनाथराव :- सुरेखा सुरेखा ! (विलासराव जराशे खाकरतात)
गोपीनाथराव :- सुरेख, सुरेख कायदा आहे असे म्हणालो मी.
(शिंदे सरकार नेहमी सारखे गोजीरवाणे हसतात.)
"महागाई आणी बेकारीच्या झळा सुद्धा सगळ्यात जास्त अगदी ८०% पेक्षा ही जास्त, मराठी माणसालाच मिळायला पाहिजेत हा उपक्रम आपण राबवत आहातच की !!" पाठीमागच्या कोचावरुन राणे सहेबांचा टोला.
विलासराव :- कोकणातील व पुण्यातील आपली 'उलाढाल' बघुन मराठी माणसाची प्रगतीच जाणवते. (विलासरावंची कोपरख़ळी)
'उलाढाल' शब्द ऐकल्या बरोब्बर भरत जाधव आणी मकरंद कोचाकडे धावले.
शिंदे सरकार :- कोण कोणास काय देतय ?
विलासराव :- जाधव अहो येव्हडे गुणी कलाकार तुम्ही, मुख्यमंत्र्याची भुमीका साकारलीत, वाण नाही पण गुण तरी लागायला पाहिजे होता की हो !
विलासराव :- अहो ज्या सिनेमा मध्ये करमणुक नसते त्यांनाच फक्त करमणुक करात सवलत मिळते जाधव.
विलासराव :- म्हणजे ?
भरत :- आपण निघुयात का ? जाधव निघाले.......
गोपीनाथ राव :- आमच्या 'पनवेल, मुंबई ला तर 'खाणी' होत्या रत्नांच्या, पण त्या तुम्ही बंद पाडल्यात.
तापलेले वातावरण बघुन आम्ही हळुच काढता पाय घेतला. थोडे पुढे गेलो तर एक कोचावर तोंडाच 'आ' करुन अमोल पालेकर बसलेले दिसले. ज्या सरकारी चित्रपट संस्थेबरोबर त्यांनी 'बनगरवाडी' बनवला, त्या संस्थेतील अधिकारीच तिचा उल्लेख 'भंगारवाडी' करतात हे ऐकल्या पासुन पार खचुन गेले आहेत बिचारे.
एका विशिष्ठ कोपर्यापासुन लोक बरेच दूर दूर जातना बघुन आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला, आमचा अंदाज खरा ठरला, हिमेस भाई ने मनोज वाजपेयी साथ साथ तिकडे बसले होते. एकाला नासीक गायनामुळे तर एकाला त्रासिक अभिनयामुळे जनतेनी नाकारले असावे भवतेक.
मनोज :- जय महाराष्ट्र ! हे बघा आपण मला भिकु म्हात्रे मुंबईचा दादा ह्याच भुमिकेत कायम लक्षात ठेवावे हि विनंती.
आम्ही :- (लबाड चेहर्याने) 'राज' की बात कह दू तो , जाने मेहेफील मे फ़िर क्या हो.....
हिमेसभाई :- वांह वांह ... आइये नयी चिझ सुनाता हू आपको.
आम्ही :- कान मे सर्दि के कारण अडचण है, नंतर आता हू.
हिमेसभाई :- अरे हमारा गाना सुनोगे तो सब चला जायेगा.
आम्ही :- (लगबगीने काढता पाय घेत) वोच भिती है के कहि जिवच ना चला जाये.
समोर बराच मोठा घोळका जमला होता, आम्ही हि धक्का बुक्की करुन घुसलो आत. समोरच एका कोचावर मल्लिका शेरावत आणी तनुश्री दत्ता बसलेल्या दिसल्या.
तनुश्री :- गॉड काय उकडतय !
मल्लिका :- हो ना, यु नो व्हॉट... एडम एंड इव्ह व्हॉज रिअली लकी हांन.
तनुश्री :- यह ! प्लस तेंव्हा नो प्रदुषण एंड ऑल. मी तर आजकाल सकाळी उठुन व्यायाम चालु केला आहे. तु सकाळी उठल्या उठल्या काय करतेस ?
मल्लिका :- सगळ्यात आधी मी माझ्या घरी जाते. मग ऑल अदर थिंग्स.
खरच कानाला सर्दी का झाली नाही, ह विचार करत आम्ही गर्दितुन बाहेर आलो, समोर बघतो तर खुद्द नरेन कार्तिकेयन उभा.
ह्या माणसा विषयी मला प्रचंड प्रचंड कौतुक होते, जेव्हा जेव्हा मी वाचायचो कि भारताचा नरेन शर्यती मध्ये १२ वा आला, १४ वा आला तेव्हा उर कसे भरुन यायचे, मग आम्हाला कळाले कि हा १५ स्पर्धकांमध्ये १२ किंवा १४ वा येतो. असो .....
दिपिका :- वुई आर जस्ट गुड फ्रेन्डस !
युवराज :- कोण काय लिहिते त्याची मी काळजी करत नाहि. सध्या मी माझ्या कारकिर्दिवर लक्ष केंद्रित केले आहे.
धोनी :- दादा आणी सचिन ह्यांच्यामुळेच मी आज येथे पोचलो आहे. मी त्यांच्या विषयी असे बोलीनच कसे ?
हरभजन :- शेवटि आपले पुर्वज 'मंकीच' होते ना ? येव्हडा गदारोळ कशाला उगीच ?
श्रिसंथ :- मी खरच नाही हो लेट नाईट पार्टी केली ! आणी ती कुंडी वार्यामुळे खाली पडली त्या रात्री !
डोक्याला हात लावत आणी मिळालेल्या उत्तरांचे प्रश्न शोधत आम्ही घराचा मार्ग धरला !
लेबल: प्रहसन
शनिवार, १५ नोव्हेंबर, २००८
स्थळ :- पंतप्रधानांच्या बंगल्यातील मिटींग हॉल
विषय :- हिंदु दहशतवाद
पात्रे :- (हिरव्या कोचावर) अबु आझमी, शबाना आझमी (हिरव्या साडीमध्ये), जावेद अख्तर, अमर सिंह, मुल्लायम सिंह यादव, दिलिप कुमार.
(भगव्या कोचावर) लालक्रुष्ण अडवाणी, शत्रुघ्न सिन्हा, नरेन्द्र मोदी, सुषमा स्वराज, उद्धव ठाकरे.
(समोर इटलीहुन मागवलेल्या कोचावर मनमोहन सिंह, सोनीया गांधी, राहुल गांधी, विलास राव देशमुख, शरद पवार, आर. आर. पाटिल)
शबाना दिदी :- (ईकडे तिकडे बघत ) हुश्श....
दिलीप कुमार :- उमममम क्या हुआ मोहतरमा ??
शबाना दिदी :- या अल्लाह ते रामदास आठवले , मी पण येतो म्हणुन मागे लागले होते, कसे तरी त्यांना चुकवुन आले.
जावेद अख्तर :- देश है तो मुश्किले है, मुश्किले है तो कठिनाईयां है, ये है तो वो है और सब है तो रास्ते भी है.
अमरसिंह :- वाह वाह..
लालक्रुष्णजी :- (हळुच शत्रुघ्न सिन्हाच्या कानात) आपण अटलजींना आणायला हवे होते, मग कळाले असते ह्या अख्तरांना कविता काय असते ते.
अमरसिंह :- सगळ्यात आधी तरुणपणातला हसरा आणी रुबाबदार फोटो सर्व वर्तमानपत्रात छापुन आल्या बद्दल पंतप्रधानांचे अभिनंदन हॅ हॅ हॅ..
(मुलायम त्यांना कोटाला धरुन खाली बसवतात)
मुलायम :- (हळु आवाजात ) क्रुपा करुन आज तरी शहाण्यासारखे बोला, तो हरभजनसिंह चा फोटो आहे.
(भगव्या कोचावर थोडीशी खस खस )
मनमोहनजी :- आपण सगळे वेळात वेळ काढुन माझ्या बोलवण्यावरुन येथे आलात त्या बद्दल आभार.
(नाहितर आजपर्यंत लोकांनी बोलवायचे आणी आम्हि हातातली कामे (?) टाकुन पळायचे हिच आम्हाल सवय.) (मनातल्या मनात)
देश आज फ़ार मोठ्या संकटात सापडला आहे, सांप्रदायी शक्ती हावी होत आहेत, प्रांता प्रांतात भाषिक दंगली चालु आहेत, आम्ही ह्याचा तिव्र निषेध करतो, आणी लवकरात लवकर ठोस पावले उचलायचे आश्वासन देतो. ( हे वाक्य बोलताना ते आलटुन पालटुन उद्धव, विलसराव आणी आबांकडे बघतात.)
(उद्धव दालनातल्या फोटोंचे परिक्षण करत आहेत, विलासरावांना डुलकी लागली आहे आणी आबा डाव्या हाताच्या ५ बोटां मध्ये उजव्या हाताचे एक बोट घालुन स्क्रु पिळल्यासरखे काहितरी करत आहेत.)
आज देशाला गरज आहे ती सामजिक एकतेची, सर्व धर्म समभावाची, एकमेकांवर विश्वास ठेवण्याची.
राहुल :- (हळु आवाजात) मॉम लेट मी गो ना, आज मन्नु अंकल जरा जास्तच बोर करत आहेत.
सोनीया :- सिट क्वाएट, हे सगळे बघुन आणी शिकुन घे, तुला आता ह्याची सवय व्हायला हवी, भावी पंतप्रधान आहेस तु ह्या देशाचा !
शबाना दिदी :- हे सगळे बोलायला ठिक आहे मनमोहनजी, पण आज खरी परिस्थीती हि आहे कि एक मुसलमान म्हणुन मला मुंबईत राहायला घर मिळत नाहिये.
अमरसिंह :- शेम शेम शेम शेम
मुलायम :- श्शु ओरडु नका, हि काय संसद वाटली का तुम्हाला ?
उद्धव :- हे बघा हे बघा आधि तुमचे शब्द मागे घ्या ! काय वाटेल ते बोलायला आणी करायला हा काहि दिपा मेहताचा सेट नाहीये.
जावेद अख्तर :- चुप्प तुम रहो चुप्प हम रहे....
मुलायम :- हेच ते हेच ते, आरडा ओरडी आणी गोंधळ करायचा, समोरच्याला धमक्या द्यायच्या, आणी समोरचा अल्पसंख्यांक असला कि ह्यांच्या आवाजाला अजुन धार चढते.
शत्रुघ्नजी :- खामोश !! काय सारखे अल्पसंख्यांक अल्पसंख्यांक म्हणुन गळे काढता ? काहि झाले कि अल्पसंख्यांक समाजावर अन्याय म्हणुन आरडा ओरडी करता ? पाकीस्ताना पेक्षा जास्त मुसलमान ह्या देशात आहेत आणी तिथल्या पेक्षा जास्ती सुरक्षित आहेत ! ह्हान !!
विलासराव :- (मनातल्या मनात) च्या आईला असा आवाज लावता यायला पाहिजे, आमचे ध्यान रितेश हे कधी शिकणार काय माहित...
अमरसिंह :- आता तर हिंदु दहशतवाद सुरु झाला आहे, निष्पाप मुस्लिमांवर हल्ले होत आहेत, त्यांना कोणी वाली उरला नाहिये.
लालक्रुष्णजी :- वाली हा रामाचा शत्रु होता, राम आमचा आदर्श आहे, हम मंदिर वही बनायेंगे, जय श्रिराम !!
सोनीयाजी :- हे बघा आपण ईथे भांडायला नाहि जमला, आपण एक व्हायला पाहिजे आणी देशाच्या शत्रुला नामकरण केले पाहीजे. देशाला वाचवने कि जिम्मेदारी आता बहुसंख्यांक समाजाची आहे.
विलासराव :- नामकरण नाही मॅडम, नामोहरम.
सोनीयाजी :- हो हो तेच काय ते, जे सध्या राणेंनी तुम्हाला केले आहे.
सुषमाजी :- आता ह्या देशाला वाचवण्यासाठी काय करायचे हे बाहेरुन आलेल्यांकडुन का शिकावे लागणार आम्हाला ?
शबाना दिदी :- हेच ते, आपले -परके, आतले-बाहेरचे हे भेदभाव बंद करा, सुखानी जगु द्या अल्पसंख्यकांना.
मोदी :- इस देश मे रहना होगा, तो खुद को हिंदु कहना होगा. म्हणे निष्पाप ! अहो सगळे मुस्लिम अतिरेकी नसतात पण सगळे अतिरेकी मुस्लिम असतात त्याचे काय ? इतकी वर्षे आमचा समाज जे सोसत आलाय ते तुमच्या बाबतीत एकदा घडल्या बरोब्बर संताप झाला की तुमचा. आणी हे नाकर्ते सरकार धावले लगेच हिंदु साधु साध्वी आणी सैनिकांना पकडुन तुम्हाला खुश करायला.
लालजी :- शांत गदाधारी भिम शांत !
मनमोहनजी :- केंद्र सरकारवर आरोप करणे चुकीचे आहे, ह्या सर्व अटक आणी गुन्ह्याची तपासणी राज्याकडे दिली आहे. (विलासरावांना डोळ्याने खुणावतात)
विलासराव :- आताच आबा पाटलांनी सांगीतल्याप्रमाणे ..
आबा :- मी कधी काय सांगीतले ? उगाच त्या चॅनेल वाल्यांसारखे वागु नका. साहेब, तुम्ही काहितरी बोला ना.
शरदराव :- आपण एक कमिटि स्थापन करुन आपदग्रस्तांना सह्हाय केले पाहिजे, त्यांची कर्जे माफ़ केली पाहिजेत आणी त्याना आर्थिक सह्हाय केले पाहिजे. मी ह्या कमिटि चा अध्यक्ष व्हायला तयार आहे.
राहुल गांधी :- पण आता आम्ही तुम्हाला पैसे खायची संधी द्यायला तयार नाहिये. हो कि नाहि ग मॉम ?
(सोनीयाजी अल्वा मॅडम चा एस.एम.एस. वाचण्यात मग्न आहेत.)
अबु आझमी :- आतापर्यंत झालेल्या सगळ्या बॉंबब्लास्टची परत चौकशी झाली पाहीजे, अफ़जल गुरु सारख्या निरपराध माणसांना सोडुन द्या. हे सगळे स्फोट संघ परिवार, भाजप, बजरंग दल, विश्व हिंदु परिषद आणी बाळासाहेबांनी केले आहेत.
उध्दव :- तोंड सांभाळ रे ए आबु ! बाळासाहेबांचा अपमान म्हणजे संपुर्ण हिंदु समाजाचा अपमान. पाय ठेवु द्यायचो नाहि तुला मुंबईत !
राहुल :- मॉम, बाळासाहेब म्हणजे ते देशाची घटना लिहिणारे ना ?
सोनीया :- हुह्ह ! अरे ते आबासाहेब, बालासाहाब म्हणजे देशातील मुलींची पहिली शाळा काढणारे.
(वरिल ज्ञान ऐकुन इटलीहुन मागवलेल्या कोचावर स्मशान शांतता)
अबु :- इतनाच कर सकते तुम लोगा, सच्ची बातां बहोत कडवी लगती.
मोदि :- ए कडु अरे बस्स खाली !
मनमोहनजी :- काहि वेळा तपासकामात एका विशिष्ठ समाजाला लक्श्य केले गेले हे खरे आहे, मी त्यांची माफ़ी मागतो. पण त्या समाजानेही पुढे येउन हे थांबवायचे प्रयत्न केले पाहिजेत.
उद्धव :- कुरवाळा अजुन त्यांच्या दाढ्या.
जावेद अख्तर :- मनमोहनजी, हे ब्लास्ट म्हणजे इतकी वर्षे तळागाळात राहिलेल्या आणी सतत अपमानीत केल्या गेलेल्या समाजाच्या अस्वस्थपणाचे, वेदनेचे हुंकार आहेत.
राहुल :- म्हणजे नक्की काय आहेत ग मॉम ?
सोनीयाजी :- म्हणजे काय ते आता त्यांना पण सांगता येइल का नाही काय माहित ?
मोदि :- तुमच्या असंख्य हुंकारा नंतर हिंदुंनी एक भुभु:कार केला तर काय बिघडले मग त्यात ?
अमरसिंह :- अन्याय अन्याय .. साला अन्याय करता है, आंय ! अग्नीपथ अग्नीपथ ...
लालक्रुष्णजी :- (मोदिंकडे बघत) आता येणार्या निवडणुकीत जनताच याचे उत्तर देइल. समजले ? मग पंतप्रधान मीच आहे म्हटले. (मोदि आणी उद्धव एकमेकांकडे बघुन अर्थपुर्ण हसतात.)
विलासराव :- आम्ही छातीचे कोट करुन सर्वांचे रक्षण करु, सर्व प्रकारची मदत पुरवु.
राहुल :- येव्हडे सगळे करता येणे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही विजेचे बिल का भरत नाहि बुवा ?
(ह्या वेळी हिरव्या व भगव्या दोन्ही कोचावर खस खस)
मनमोहनजी :- आपण सर्वांनी एक होउन समजुतीने ह्यातुन मार्ग काढुया आणी हाथात हाथ घालुन पुढे जाउयात. आता आपण जेवणासाठी थोडी विश्रांती घेउयात. जयहिंद, जय जवान
शरदराव :- जय किसान !
लेबल: प्रहसन
बुधवार, १२ नोव्हेंबर, २००८
आपण कुठल्या ना कुठल्या कामात असताना ह्या क्रेडिट कार्ड वाल्यांचा फोन येत नाही असे होत नाही. आधि मला सुध्दा संताप यायचा पण मग आता आम्ही ह्याचा आनंद घ्यायला शिकलो आहे, आणी आता तर आमची खात्रीच झाली आहे कि हे फोन आम्हाला तणावमुक्त करण्यासाठीच येतात. आपल्यालाहि ह्यातुन काही फायदा व्हावा ह्या सदहेतुने आमचे संभाषण येथे देत आहोत. (ह्यात कोणालाहि दुखवायचा हेतु नाही.)
वेळ :- दुपारी २.१५ (गरगरित जेवण करुन नुकतेच आडवे झालो आहोत)
कन्या :- गुड आफ्टरनून सर, आय एम कॉलींग फ्रॉम दरोडा बॅंक.
आम्ही :- जय महाराष्ट्र ! (पहिल्याच चेंडुवर षटकार)
कन्या :- नमस्ते सर, मी दरोडा बॅंकेमधुन बोलतीये, आम्ही एक नविन क्रेडिट कार्ड लॉंच करतोय त्या विषयी माहिति द्यायला हा फोन केला होता सर. तुम्ही इंट्रेस्टेड आहात का सर ?
आम्ही :- कोणाच्यात ?
कन्या :- सर कार्डमध्ये हो
आम्ही :- ओह्ह अच्छा , काय आहे ना कि आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी येवढ्या गोड आवाजात इंट्रेस्टेड आहात का ? असे विचारले हो, त्यामुळे जरा गोंधळ उडाला बघा.
कन्या :- (मनातल्या मनात खुश झाली असावी) मग सर तुम्हाला कधि वेळ आहे ?
आम्ही :- अहो तुमच्या साठी वेळच वेळ आहे आमच्याकडे !
कन्या :- तसे नाही सर, ह्या कार्ड विषयी माहिती देण्यासाठी.
आम्ही :- अहो असे मला गोंधळवु नका हो, एक तर सुंदर मुलीशी बोलायचे म्हणजे आमची आधिच वाचा बसते. मला सांगा तुमच्याच कार्डची माहिती मी तुम्हाला कशी आणी का द्यायची ?
कन्या :- (डबल खुश होत ) अय्या अहो सर म्हणजे तुम्हाला कधी वेळ आहे ? आमचा प्रतिनिधी येउन तुम्हाला पुर्ण माहिती देइल.
आम्ही :- एक प्रश्न विचारतो रागवु नका, तुमचे नाव मंजिरी आहे का हो ? आणी तुम्ही अहिल्यादेवी शाळेत होता का ?
कन्या :- नाही ! आपण कार्ड विषयी बोलुयात का ?
आम्ही :- बघा रागवलात ना तुम्ही ? आहो एक खुप चांगली मैत्रिण होती हो माझी ह्या नावाची, अगदी असाच गोड आवाज आणी असेच जड जड मराठी शब्द वापरायची सवय होती हो तिला. तुमचा आवाज ऐकला आणी तिच आठवली बघा पटकन, माफ़ करा मला. म्हणतात ना आपली दुख: हि लोकासाठी विनोद असतात तेच खरे.
कन्या :- (भावुक स्वरात) नाही रागावले नाही सर. कुठे असतात त्या आता ? त्या पण बॅंकेत असतात का ?
आम्ही :- नाही हो, लहानपणीचा ताटातुट झाली आमची, कुठे आहे काय करते ... काही काही माहीत नाही हो. (आम्ही जमेल तेव्हड्या दु:खी सुरात)
कन्या :- (चिकाटी न सोडता) ओह, सो सॉरी सर. आज वेळ काढु शकाल का सर तुम्ही ?
आम्ही :- हो जरूर, तुम्हाला भेटुन आनंदच होइल मला. पुन्हा त्या जुन्या आठवणी ताज्या होतील आणी मग आज तरी निदान दारू ची गरज लागणार नाही मला... (फुल्ल टु देवदास इस्टायील)
कन्या :- सर, मला भेटुन ? आमचा त्या भागातला एजंट येउन भेटेल सर तुम्हाला. मी नाही. (हळु हळु कन्या त्रासीक स्वरात बोलायला लागली आहे.)
आम्ही :- अरे असे कसे ? फोन करणार तुम्ही, वेळ देणार आम्ही तुम्हाला, आणी तो का भेटायला येणार ? मेहनत करे मुर्गा आपले मुर्गी आणी अंडा खाये फकीर ?
कन्या :- (प्रचंड नाराजीने) सर, आम्ही फक्त कॉल सेंटर साठी काम करतो. लोकांना भेटण्यासाठी वेगळी माणसे नेमली आहेत.
आम्ही :- अच्छा म्हणजे फोनवर टोप्या घालणारी आणी प्रत्यक्षात टोप्या घालणारी वेगवेगळी माणसे आहेत तर !!
कन्या :- पार्डन सर ?? (आतुन संतापाचे स्फोट होत असावेत त्यामुळे कन्या परत इंग्लिश वर घसरली आहे)
आम्ही :- नाही म्हणजे तुमच्या भेटिचा योग नाहीच म्हणा की, काये मन कसे वेडे असते बघा, लगेच तुमच्या भेटीची स्वप्न रंगवुन तय्यार. लबाड कुठले !
कन्या :- सर सध्या तुम्ही कुठले कार्ड वापरत आहात ?
आम्ही :- नेटवाला.कॉम चे. पण ४ वर्ष झाली अजुन कसे आणी कुठे वापरायचे ते कळाले नाहिये.
कन्या :- सर, मी क्रेडिट कार्ड बद्दल बोलत आहे.
आम्ही :- हो, ते तुम्ही फोन उचलल्या उचलल्या सांगीतलेत की !
कन्या :- सर, आय मिन सध्या तुम्ही कुठले क्रेडिट कार्ड वापरता ?
आम्ही :- अहो रेशन कार्ड नाहिये माझ्याकडे अजुन, क्रेडिट कार्ड बद्दल काय विचारताय ? पण खरच आपण नाहि का हो भेटु शकणार ? अगदी तुमच्या सोयीच्या वेळी.
कन्या :- सर तुम्हाला कार्ड हवे आहे का ? मला बाकीच्या ग्राहकांना सुध्दा फोन करायचे आहेत. प्लिज कार्ड विषयी बोला.
आम्ही :- तुम्ही तुमचे काम उरकुन घ्या ना निवांत. माझा नंबर तर आहेच तुमच्याकडे, संध्याकाळी तुम्ही मोकळ्या झाल्यात की मग एक मिस कॉल द्या, मी करतो तुम्हाला फोन.
(पलिकडुन असभ्य काहितरी पुटपुटल्याचे ऐकु येउन खाडकन फोन आदळला जातो.)
लेबल: प्रहसन
शुक्रवार, ७ नोव्हेंबर, २००८
चित्रपटाचा ट्रेलर :- http://in.youtube.com/watch?v=bhWatrG4WTI
दिग्दर्शक :- जगदिश शर्मा
प्रदर्शन :- २१ ओक्ट. २००८
-------------------------------------
कलाकार :-
क्रिश्णा अभिषेक, ह्रुषीता भट्ट, प्रेम चोप्रा, शक्ति कपूर,कादर खान, कमाल रशिद खान, रवि किशन, रज़ा मुराद, चंकी पांडे, निर्मल पांडे, रणजीत, शिवा रिंदानी, किम शर्मा, यशपाल शर्मा, ग्रेसी सिंग, मनोज तिवारी, मुकेश तिवारी.
तुफान विनोदि आहे हा विचित्रपट. अतिभव्या असे सेट, तगडी स्टारकास्ट, उच्च दर्जाचे छायाचित्रण सगळे कसे अगदी वाह वाह आहे.
ह्या विचित्रपटातिल हिरो ला बघताना आपल्याला एकाच वेळी राजकुमारचा आवाज आणी दिलिप कुमारचा अभिनय असा दुहेरी आनंद मिळतो. ह्या वयातला आमचा देव आनंद सुद्धा ह्या विचित्रपटातिल हिरो पेक्षा कितितरी देखणा आणी चपळ वाटतो हा भाग निराळा. असो, इतर कलाकारांविषयी आनंदच आहे, बरेचशे आपण ह्याना पाहिलेत का ह्या सदरात मोडतात, उरलेले काहि यादव वंशिय आडनाव लावत असल्याने ह्या विचित्रपटात घेतले असावेत, काहि नाव परिचीत आहेत, त्या पैकी काहिनि म्हशीची व काहिनि ह्या विचित्रपटात कळशीची पाहुणी भुमिका केली आहे असे आमचा खास सुत्रधार सागंतो.
सर्वच कलाकार ज्या सहजतेने गोठ्यात वावरतात त्या सहजतेने विचित्रपट भर वावरले आहेत. पानाला ज्या सहजतेनी चुना लावताता ( आजकाल हे लोक महाराष्ट्राला चुना लावत आहेत असे आमचा एक खोचक साथिदार निर्माता म्हणाला व लवकरच ह्या विषयावर आपण 'भाग भय्या राज आया' ह्या नावाचा सिनेमा काढत आहोत असे त्यानी आमच्या कर्णेंद्रियावर घातले.) त्या सहजतेने प्रत्येकानी अभिनय केला आहे. आपल्या अभिनयाच्या रतिबाने पुर्णवेळ प्रेक्षकांना खुर्चित बांधुन ठेवण्याची जादु ह्या विचित्रपटात आहे. (काहि दुष्टबुद्धि लोक प्रेक्षक पहिल्या सिन लाच बेशुद्ध पडतात अशी बदनामी करत आहेत, देव त्यांना म्हशीच्या पायाखाली चिरडो.) ह्या विचित्रपटाला मोठ्या प्रमाणात गर्दि करुन आपदग्रस्तांना सहकार्य करावे.
फॉलोअर
Translation
Save as PDF
सदस्यत्व घ्या
Labels
- इंग्रजी चित्रपट (10)
- कथा (29)
- चित्रपट (20)
- तेलगु (1)
- पुस्तक प्रकाशन (3)
- प्रहसन (12)
- भयपट (4)
- मराठी (8)
- स्तंभलेखन (1)
- हिंदी (12)