मंगळवार, १४ डिसेंबर, २०१०

अल्लाह के बंदे

बरेच दिवस मित्रांकडून 'अल्लाह के बंदे' ह्या चित्रपटाविषयी ऐकत होतो. "नसिरुद्दिन शहा आणि अतुल कुलकर्णीनी काय बाप काम केलंय राव" पासून "भिकार पिक्चर आहे, नसिरुद्दिन शहाला वाया घालवलंय" पर्यंतच्या कॉमेंट्स अधे मध्ये कानावर येतच होत्या, पण 'स्वतः बघायचा आणि मगच मत ठरवायचे' हा आमचा दंडक असल्याने शेवटी काल अल्लाह च्या बंद्यांचे दर्शन घ्यायचे निश्चित केले.नसिरुद्दिन शहा, अतुल कुलकर्णी, सुहासिनी मुळे, विक्रम गोखले, झाकीर हुसेन अशी रंगमंचावर आणि पडद्यावर बाप असलेली स्टारकास्ट आणि त्यांच्या जोडीला शर्मन जोशी, रुखसार, सक्षम देशपांडे आणि स्वतः फारुक कबीर अशी फौज. चित्रपटाकडून अपेक्षा नक्कीच वाढलेल्या होत्या. ह्या चित्रपटात हिरोच्या भूमिकेत चमकण्याबरोबरच फारुक कबीर ह्याने ह्या चित्रपटाचे दिग्दर्शन सुद्धा केलेले आहे.

मोठ्या अपेक्षेने चित्रपट बघायला बसलो खरा पण खरे सांगायचे तर पदरात (का शर्टात? ) निराशाच पडली. अतुल कुलकर्णीचा आणि थोडाफार झाकीर हुसेनचा अपवाद सोडल्यास इतर दिग्गजांना अक्षरशः वाया घालवलेले आहे. विक्रम गोखले आणि सुहासिनी मुळे सारख्या ताकदीच्या कलाकारांची भूमिका तुकड्यातुकड्याने जोडली तरी ५ मिनिटांच्या वर भरणार नाही. सक्षम कुलकर्णीला देखील म्हणावे तसा वाव नाही. सगळ्यात वाईट वाटले ते नसिरुद्दिन शहा ह्यांना बालसुधार गृहाच्या जेलरच्या भूमिकेत बघून. एकही धड आणि पूर्णं दोन वाक्यांचा संवाद नाही, बोलका चेहरा हे त्यांचे जे प्रभावी अस्त्र आहे त्याचा कणभर देखील वापर करून घेतलेला नाही आणि सगळ्यात संतापाचे म्हणजे त्यांना दिलेला गेट अप आणि त्यांना भूमिका साकारताना एका पायाने लंगडत चालत असल्याचे दाखवणे. नसिर ह्यांची हि भूमिका अगदी तंतोतंत 'दिवार' ह्या अमिताभ बच्चन आणि अक्षय कुमारच्या चित्रपटातील पाकिस्तान तुरुंगाच्या जेलर असलेल्या 'के के' ह्या भूमिकेशी मिळतीजुळती आहे. मिळतीजुळती कसली? आपण 'के के' लाच पाहत आहोत असे वाटत राहते.असो...

तर आता मूळ कथेकडे वळू. विजय आणि याकुब हे मुंबईच्या सगळ्यात मोठ्या 'भुलभुलय्या' झोपडपट्टीत राहणारे दोघे अगदी जवळचे मित्र, सख्खे भाऊच म्हणाना. आई वडिलांच्या अपघाती मृत्यूनंतर अनाथ याकुबला शेजारच्या सुहासिनी मुळेने वाढवलेले असते. तिचाच मुलगा म्हणजे विजय. शाळेच्या नावाखाली घराबाहेर पडणे आणि चरस विकून पैसा कमावणे हे ह्यांचे काम. बालगुन्हेगारी आणि झोपडपट्टीतले दारिद्र्य हा विषय ह्या चित्रपटाचा अग्रभागी असताना देखील हे दोन्ही विषय म्हणावे तसे प्रेक्षकांच्या समोर येत नाहीत. रादर ह्या प्रश्नांच्या नेमक्या गाभ्यापर्यंत घेऊन जाण्यात हा चित्रपट अपयशी ठरला आहे. एका मिनिटासाठी दाखवलेले पायरेटेड सिडी, विषारी दारू, चरस, लोकांची विक्री हे धंदे म्हणजे झोपडपट्टीचे गुन्हेगारी विश्व नाही आणि 'भाई इसने अपुनका माल लिया वापस नही देता' म्हणणारी पोरे दाखवणे म्हणजे बालगुन्हेगारी न्हवे.

तर ह्या दोघा जय-विरुची आई सुहासिनी मुळे फारच आजारी पडते तिच्या उपचारांवरचा खर्च वाढतच असतो. अशातच पैसा म्हणजेच ह्या भुलभुलय्यातील ताकद आहे हा साक्षाक्तार झालेले विजय आणि याकुब आता मोठा हात मारायचा ठरवतात. त्यासाठी ते भुलभुलय्याच्या दादाचे सहहाय घेतात. आपल्याच वयाच्या चार/पाच मुलांना घेऊन हे दोघेही भरदुपारी एका सोनाराचे दुकान लुटतात आणि मोठा डल्ला मारतात. वचन दिल्याप्रमाणे दादा आपला हिस्सा न देत सगळाच माल घशात घालतोय हे पाहून दोघांचे रक्त खवळते, त्यातच दादा याकुबवर हात उचलतो आणि संतापाच्या भरात दादाच्याच बंदुकीतून विजय दादावर गोळी झाडतो. जखमी दादाला रस्त्यात सोडून दोघेही मालासकट पळ काढतात. इकडे दादाची जागा घ्यायचे स्वप्ने पाहणारा त्याचा उजवा हात ह्या संधीचा फायदा घेऊन दादाची हत्या करतो आणि आळ विजय आणि याकुबवर ढकलतो.चोरी, खून, हाफ मर्डर अशा अनेक गुन्ह्यांची एकत्र शिक्षा म्हणून त्या दोघांनाही बाल सुधारगृहात पाठवले जाते. बाल सुधारगृहात फक्त १७ वर्षापर्यंतचे गुन्हेगार राहू शकत असताना इथे मात्र चक्क २०-२२ वर्षाची मुले आरामात राहतं असतात आणि 'के टी' नावाच्या एका त्यांच्याच वयाच्या बायल्याच्या हाताखाली टोळी देखील चालवत असतात. जी सुधारगृहात चरस विकून मुबलक पैसा कमावत असते. ह्या सगळ्याला आशीर्वाद असतो तो सुधारगृहाच्या वॉर्डनचा म्हणजेच नसिरुद्दिन शहाचा.

भुलभुलय्याच्या तालमीत तयार झालेले याकुब आणि विजय सुधारगृहात स्वस्तात चरस विकायला सुरुवात करतात आणि इथेच संघर्षाची ठिणगी पेटते. केलेल्या कृत्याचे फळ म्हणून इतर मोठ्या मुलांकडून मार तर मिळतोच वर नसिरुद्दिनच्या आशीर्वादाने त्यांना अनैसर्गिक अत्याचाराला देखील सामोरे जावे लागते. ह्यातच सुहासिनी मुळे मरण पावते. एकमेकांना सावरत दिवस ढकलणारे याकुब आणि विजय योग्य संधी मिळताच त्यांच्यावर अत्याचार करणाऱ्या 'के टी' चा खून करतात. खुनामुळे खळबळ माजल्याने एक कमिशन नियुक्त केले जाते, ज्यात खुनी कोण आहे हे कळत नाही पण इतर अवैध धंदे उघड झाल्याने वॉर्डनं नसिरुद्दिन शहाची मात्र हकालपट्टी होते. एक दिवशी सुधारगृहातून बाहेर पडून भुलभुलय्याचे बेताज बादशहा बनण्याचे स्वप्न पाहणारे याकुब आणि विजय आता सुधारगृहाचे भाई बनतात.काही वर्षात (म्हणजे वयाच्या २४ व्या वर्षी) दोघेही सुधारगॄहातून बाहेर पडतात आणि उराशी जपलेले स्वप्न साकारायला पुन्हा भुलभुलय्यात हजर होतात. जुना मित्र रमेश (झाकीर हुसेन) च्या सहहायाने ते भुलभुलय्यामधील लहानग्या मुलांची एक टोळी तयार करतात आणि आपल्या काळ्या साम्राज्याची मुहूर्तमेढ रोवतात. घरी दोन वेळ जेवणाचे वांदे असणाऱ्या पण हातात चित्रकलेची जादू असलेल्या सक्षम देशपांडे सारख्या कोवळ्या मुलांच्या ह्या टोळीत समावेश असतो. ह्या सर्वाची माहिती मिळाल्यावर भुलभुलय्यामध्ये एक छोटीशी शाळा चालवणारा आदर्श शिक्षक अश्विन परांजपे (अतुल कुलकर्णी) ह्याच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला म्हणावे तसे यश येत नाही. अतुल कुलकर्णीच्या पत्नीच्या भूमिकेत बऱ्याच दिवसांनंतर होणारे रुखसारचे दर्शन मन प्रसन्न करणारे. इथून पुढे सुरू होतो तो भुलभुलय्याच्या काळ्या साम्राज्यावर पकड घेण्याचा खेळ... आणि एका तद्दन गल्लाभरू चित्रपटाच्या दृष्टीने चित्रपटाची वाटचाल सुरू होते.ह्यानंतर विजयच्या आयुष्यात संध्या (अंजना सुखानी) चे आगमन, हल्ल्याला प्रत्युत्तर देताना विजयच्याच गोळीमुळे सक्षम देशपांडेचा मृत्यू आणि त्यामुळे अंतर्बाह्य पालटलेला विजय अशा नेहमीच्या रस्त्याने गाडी निघते. चित्रपटाचा शेवट तर निव्वळ बकवास!!विजय च्या भूमिकेत शर्मन जोशी बराच चांगला अभिनय करून गेला आहे. कमावलेले शरीर बरे दिसत असले तरी सतत गंजीफ्रॉकावर वावरायचे नसते हे कळले असते तर अजून बरे झाले असते. चित्रपटाच्या शेवटी शेवटी काही दृश्यात त्याची खोटी दाढी इतकी विनोदी दिसते की फिस्सकन हसून फुटते. याकुबच्या भूमिकेत स्वतः दिग्दर्शक फारुक कबीर आहे. हा याकुब, हा याकुब कमी आणि येडा याकुब जास्ती वाटतो. गँगस्टर म्हणजे केस वेडे वाकडे वाढवलेला, विकृत हसणारा, बंदूक तिरकी तुरकी करत गोळ्या मारणारा नसतो हे ह्यांना कधी कळणार? चित्रपटाचे पार्श्वसंगीत आणि त्या जोडीचे समूहगान तर असह्य ह्या सदरात मोडणारे. अक्षरशः विनाकारण जागोजागी ह्या कानठळ्या बसवणाऱ्या संगीताचा वापर का केला आहे ते लक्षात येत नाही.

तात्पर्य काय तर 'दिखावेपे मत जाओ अपनी अकल लगाओ. 'बुधवार, ८ डिसेंबर, २०१०

कॅटवूमनस्पायडरमॅन, सुपरमॅन अगदी गेला बाजार शक्तिमान देखील आपल्याला भुरळ पाडून गेले. जादुई, साहसी जगातल्या ह्यांच्या पराक्रमाने, साहसाने आपण थक्क होत आलो आहोत. पण ह्या नायकांच्या साहस जगात नायिका तशा दुर्मिळच आणि त्यामुळेच कॅटवूमन अनेकांना भुरळ घालते ह्यात नवल नाही. कॉमिक्स मधून भेटिला येणारी कमनीय, देखणी मांजराप्रमाणेच धूर्त असलेली कॅटवूमन थेट पडद्यावर अवतरली ती २००४ साली वॉर्नर ब्रदर्सच्या 'कॅटवूमन' चित्रपटातून. कॅटवूमनच्या जन्माची कहाणी सांगणारा हा एक सुंदर चित्रपट. टायटल्स पासून बघण्यालायक जे काही मोजके चित्रपट असतात त्यातलाच हा एक चित्रपट.

चित्रपट काही फार भव्य, साहसाने ठासून भरलेला असा नाही, पण एका सामान्य तरुणीचा कॅटवूमन पर्यंत होणारा प्रवास अतिशय छान चित्रित केलेला आहे. हेली बेरी, शेरॉन स्टोन, बेंजामिन ब्रॅट ह्या सारख्या कलाकारांनी अभिनयाची बाजू अतिशय सुंदर सांभाळलेली आहे. पेशन्स फिलिप्स (हेली बेरी) हि सौंदर्य प्रसाधने बनवणाऱ्या एका कंपनीत ग्राफिक डिझायनर म्हणून काम करत असते. लाजऱ्या बुजऱ्या पेशन्स फिलिप्सवर ह्यावेळी पहिल्यांदाच त्यांच्या कंपनीच्या नवीन लाँच होणाऱ्या प्रॉडक्टची जबाबदारी सोपवण्यात आलेली असते. पेशन्स देखील ह्या संधीचे सोने करण्याचा तयारीने काम करत असते.

अशाच एका रात्री पेशन्सला आपल्या खिडकीखाली पहिल्यांदाच एका मांजरीचे दर्शन होते. सकाळी पुन्हा ती मांजर पेशन्सच्या खिडकीत हजर होते, ह्यावेळी मात्र ती खिडकीतून दर्शन देऊन सरळ वरच्या कठड्यावर चढते. इकडे मांजर बहुदा त्या उंच ठिकाणी अडकली असावी असे समजून पेशन्स तिला वाचवण्यासाठी प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नात स्वतःचा जीव धोक्यात घालते. खिडकीच्या कडेला लटकलेल्या पेशन्सला बघून रस्त्यावरून जाणाऱ्या डीटेक्टिव टॉम लोनचा (बेंजामिन ब्रॅट) ती आत्महत्या करत आहे असा गैरसमज होतो. मात्र शेवटी तो तिला वाचवतो आणि त्याला सत्य देखील उमगते. पहिल्याच भेटीत तो ह्या साध्या सरळ मुलीकडे आकर्षित होतो.एके रात्री उशीरापर्यंत काम पूर्णं केल्यावर पेशन्स स्वतःच आपली डिझाइन्स पोचवण्यासाठी गेलेली असताना तिला कंपनीच्या मालकाचे व इतर लोकांचे बोलणे कानावर पडते. नवीन लाँच होणाऱ्या प्रॉडक्ट मध्ये विषारी द्रव्ये असून ते त्वचेला हानिकारक व प्रचंड घातक असल्याचे तिला समजते. आता हे बोलणे कानावर पडलेली पेशन्स जिवंत राहणे हे कंपनीच्या फायद्यासाठी नुकसानकारक आहे हे ओघाने आलेच. त्यामुळे मालकाचे हस्तक कंपनीतून थेट समुद्रात सोडल्या जाणाऱ्या पाण्याच्या पाइपमध्ये अडकवून पेशन्सचा जीव घेतात.

पेशन्सचे प्रेत वाहत वाहत समुद्राच्या कडेच्या गाळात येऊन अडकते आणि इथेच चित्रपटाला वेगळे वळण लागते. पेशन्सच्या घराभोवती घुटमळणारे मांजर आता आपल्या बरोबर अजून काही मांजरे घेऊन तिथे हजर होते. सर्व मांजरे पेशन्सच्या प्रेताला घेरतात. पेशन्सच्या शरीरावर उभे राहून ते मांजर जणू पेशन्सच्या शरीरात पुन्हा प्राणच फुंकते... आणि खरंच पेशन्स पुन्हा जिवंत होते. हा पेशन्सचा कॅटवूमनच्या रूपातला पुनर्जन्म होतो. जिवंत झालेली पेशन्स डोळे उघडून आजूबाजूला पाहते आणि आपल्याबरोबर नक्की काय घडले होते ते आठवण्याचा प्रयत्न करू लागते, मात्र तिला काहीच आठवत नाही. जिवंत झाल्यानंतरची पेशन्सची पहिली हालचाल हि अगदी मांजरीसारखीचं दाखवली आहे, तर तिला दिसणारी आजूबाजुची दृश्ये, जमिनीखालील जाणवणारी हालचाल हे दृश्य अतिशय सुंदररीत्या पडद्यावर दाखवले आहे.आपल्यात काहीतरी बदल घडला आहे हे पेशन्सला जाणवत असते, मात्र तो नक्की काय आहे हे तिच्या लक्षात येत नाही. सकाळी पुन्हा एकदा त्या रहस्यमय मांजरीचे पेशन्सकडे आगमन होते. आता मात्र पेशन्स तिच्या गळ्यातील बेल्ट मधून तीच्या मालकाचा पत्ता शोधून काढते व मांजर परत देण्यासाठी निघते. मिळालेल्या पत्त्यावर तिची भेट एका खूपश्या मांजरी पाळणाऱ्या आणि जुन्या इतिहासाच्या अभ्यासाचे वेड असणाऱ्या प्राध्यापिकेशी होते. तिच्याकडूनच ह्या रहस्यमय मांजराचे नाव 'मिडनाईट' असल्याचे समजते. प्राध्यापिका पेशन्सला मांजरांची इजिप्तमधील दैवत असलेली गॉडेस, तिची प्रतिरुपे आणि कॅटवूमन ह्या सर्वाबद्दल माहिती देते. ति पेशन्सला तिचा एक कॅटवूमन म्हणून पुनर्जन्म झाल्याचे सांगते आणि त्या रात्री घडलेल्या घटनांची आठवण करून देते. पेशन्स मात्र हे सत्य स्वीकारायला नकार देते.साधी सरळ पेशन्स आणि कावेबाज कॅटवूमन ह्या दोन रूपांचे द्वंद आता पेशन्समध्ये सुरू होते. साहसाची, मुक्ततेची आवड असणारी कॅटवूमन पेशन्सला बेधुंद आयुष्याकडे ओढत असते तर दुसऱ्या बाजूला अल्लड पेशन्स डिटेक्टिव टॉम लोनकडे आकर्षली जात असते. कॅटवूमन ह्या प्रकाराबद्दल आता पेशन्स इंटरनेटवरून शक्य ती सर्व माहिती गोळा करते आणि वाचते. हळूहळू आता कॅटवूमन म्हणूनच जगण्याचे तिचे आकर्षण वाढत जाते. त्यातच एका रात्री बेदरकारपणे हिंडताना ते कॅटवूमनच्या रूपात एका सोन्याचे दुकान लुटणाऱ्या टोळीला बुकलून काढते. आता तर तिच्या आत्मविश्वासात दुपटीने वाढ होते. आपल्या खुनाचा बदला घेण्याचा निश्चय आता कॅटवूमन करते आणि एकेका खलनायकाच्या मागावर निघते.शेवटी शेवटी ह्या सर्व प्रकरणामागे तिच्या कंपनीच्या मालकाच्या बायकोचा लॉरेलचा (शेरॉन स्टोन) हात असल्याचे उघड होते. मात्र कावेबाज लॉरेल स्वतः आपल्या पतीचा खून करते व त्याचा आळ कॅटवूमनवर आणते. इकडे पेशन्सची एकूण वागणूक, तिच्या स्वभावात होणारे बदल ह्यांनी अस्वस्थ असलेल्या टॉम लोनच्या त्रासात ह्यामुळे वाढच होते. आणि एका अनपेक्षित क्षणी तो पुराव्यानिशी पेशन्सला कॅटवूमन म्हणून अटक करतो. पुढे काय होते हे पडद्यावरच बघण्यात खरी गंमत आहे.हेली बेरीच्या सुंदर अभिनयाने आणि शेरॉन स्टोनच्या सौंदर्याने लक्षात राहणारा हा चित्रपट. अल्लड, थोडा आत्मविश्वासाचा अभाव असणारी पेशन्स ते बेदरकार, रंगेल कॅटवूमन हा विविध शेडने रंगलेला प्रवास हेली बेरी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने मोठा छान पार पाडते. कपटी आणि कावेबाज लॉरेलच्या भूमिकेत शेरॉन स्टोन भाव खाऊनं गेली आहे हे सांगायला नकोच. एकूण काय तर वयाचा विसर पाडून मनमुराद आनंद लुटावा असा हा चित्रपट तुम्ही पाहायलाच हवा.