मंगळवार, १७ जुलै, २०१२
मागल्या शनिवारी अर्थात ७ जुलैला आमचे नित्याचेच उद्योग चालू होते. त्यातच ऐन दुपारी मोबाइलने मान टाकली आणि तो दुरुस्तीला द्यावा लागला. रात्री मोबाइल ताब्यात घेतला आणि घराकडे कूच केली. साधारण रात्री १०.३० च्या सुमाराला मिस कॉल अॅलर्ट मिळाला की 'हे नराधमा तुला एकूण ३१ मिस कॉल येऊन गेलेले आहेत.' येवढी कोणा कोणाला बॉ माझी आस लागली आहे, असा विचार करून एकेका मिस कॉलला डायल करायला सुरुवात केली. पहिला फोन लावला तो आमचे मित्र कीर्तिकुमार ह्यांना मुंबईला. 'काय रे फोन करत होतास का ? माझा डब्बा दुरुस्तीला दिला होता, आत्ता चालू केला आहे.' "प्रसाद, अरे किती फोन लावायचे तुला? तुला उद्या मातोश्रीला जायचे आहे, तुझ्या प्रकाशनाच्या पुस्तकाचे बाळासाहेबांच्या हस्ते उद्घाटन आहे," पुढे तो काय काय बोलला हे मला अजूनही आठवत नाही. आ.श्री. दिवाकर रावते ह्यांच्या 'मी मंत्रालय बोलतोय..' ह्या पुस्तकाचा मी प्रकाशक असल्याने त्या पुस्तकाच्या उद्घाटनाला मी हजर राहायलाच हवे आहे येवढेच माझ्या डोक्यात शिरले. काही वेळाने डोके काम करायला लागल्यावरती पुन्हा एकदा फोना फोनी करून ही गंमत नसल्याची खातरजमा करून घेतली. अर्थात त्या क्षणानंतर जी धाकधूक आणि काहीशी विचित्र मन:स्थिती होती तिचे वर्णन करणे खरेतर अशक्यच आहे. सकाळी ११ च्या सुमाराला समारंभ असल्याने पहाटेच मुंबईला निघणे आवश्यक होते. मन अजूनही खात्री देत नव्हतेच. अशातच श्रावण मोडकांना फोन करून त्यांच्या कानावरती बातमी घातली आणि कौतुकाचे चार बोल ऐकून घेतले.
सकाळी शिवनेरीने थेट दादर गाठले. मातोश्री परिसरातला बंदोबस्त पाहून हबकलोच. अहो एक चिलखती गाडी देखील तिथे उभी होती. श्री. दिवाकर रावतेंनी आमची नावे आधीच देऊन ठेवली असल्याने, आणि स्वतः ते देखील उपस्थित असल्याने चौकशी टळली, मात्र सलग तीन ठिकाणी तपासणीला सामोरे जावेच लागले. एकेक तपासणी नाका पार करत एकदाचे मातोश्री मध्ये प्रवेशकर्ते झालो आणि पुन्हा एकदा मातोश्रीच्या अंगणात तपासणीला सामोरे जावे लागले. पायर्या चढून मातोश्रीत शिरलो आणि कसेतरी दाबून धरलेले दडपण पुन्हा एकदा उसळी मारून वरती आले. आजूबाजूचे काय बोलत आहेत, काय विचारत आहेत हे देखील पटकन कळत नव्हते. हॉल मधून आत शिरताच लक्ष वेधून घेते ते माँ साहेब आणि बाळासाहेबांचे फुलसाईझ भव्य चित्र. जणू दोघे समोरच उभे आहेत असा सतत भास होतो. काही वेळाने 'साहेब आले आहेत, वरती बोलावले आहे. पण फक्त पाच जणांनीच चला' असा निरोप आला आणि आम्ही लिफ्ट मधून वरच्या मजल्यावरती पोचलो. लिफ्टमधून बाहेर आलो तर समोरच्या जिन्यात साध्याश्या टीशर्ट आणि पँट मध्ये श्री. उद्धव ठाकरे उभे होते. त्यांना मी ओळखलेच नाही, इतक्या साधेपणाने ते तिथे वावरत होते. सगळ्यात पुढे श्री. दिवाकर रावते, त्यानंतर सामना, नवाकाळचे दोन पत्रकार, फोटोग्राफर आणि सगळ्यात मागे थांबलेलो मी. रावते साहेब आत गेले तेव्हा आम्ही बाहेरच थांबलो होतो. सगळ्यात शेवटी जावे आणि शक्यतो मागेच थांबावे अशा विचारता मी असतानाच आतून 'ताम्हनकर, या आत या' असा आवाज आला आणि आपोआप मोकळी झालेली वाट तुडवत मी साहेबांच्या बैठकीच्या खोलीत प्रवेश केला. आजवर फक्त न्यूज चॅनलमध्येच ही खोली पाहिली होती. खोली कसली, मस्त मोठा हॉल आहे तो. हॉल डाव्या हाताच्या भिंतीजवळ त्यांच्या नेहमीच्या खुर्ची वरती साहेब बसले होते. इतका मोठा हॉल तो, पण बाळासाहेबांच्या नुसत्या उपस्थितीनेच भरल्यासारखा वाटत होता. आत गेल्यानंतर काही वेळाने हा हॉल नुसता भरलेलाच नसून भारलेला देखील आहे हे जाणवले. आत शिरल्या शिरल्याच मा. बाळासाहेबांनी 'ए कोणी वाकून नमस्कार वगैरे करू नका बरं का. मला अजिबात आवडत नाही ते' असा खणखणीत आदेशच दिला. एका हाताच्या अंतरावरून त्या हिंदूहृदयसम्राटाला बघताना आणि तो गरजता आवाज ऐकताना असे काही रोमांच उभे राहिले म्हणून सांगू.. अंग चोरतच कसा तरी मी साहेबांच्या डाव्या हाताला उभा राहिलो. सोबत आणलेला पुष्पगुच्छ साहेबांच्या हातात देताना माझ्या हातांची थरथर मलाच जाणवच होती. साहेबांनी पुष्पगुच्छ हातात घेताच मी पटकन हात मागे घेतले. हो उगाच हाताची थरथर जाणवायला नको. "अहो थांबा, हात लावून ठेवा. फोटो काढतायत ते." पुन्हा एकदा आमचे हात पुष्पगुच्छाला चिकटले. फोटो काढून होताच पुष्पगुच्छ बाजूला ठेवण्यात आला आणि तीच संधी साधून मी साहेबांच्या पाया पडून घेतले. पाठीवरती हात आला आणि मी उभा राहिलो. साहेबांनी एकदा माझ्याकडे पाहिले आणि काहीतरी विचारायला रावते साहेबांकडे वळले. अचानक पुन्हा माझ्याकडे वळले आणि त्या भारून टाकणार्या आवाजात साहेबांनी विचारले "कानात काय घातले आहे हो तुम्ही ते?" झाले, आमची हवा गुल. कोरडे पडलेले ओठ आणि सुकलेला घसा ओला करत कसेतरी ' भि क बा ळी' हे शब्द तोंडात गोळा करत असतानाच साहेबच पुन्हा म्हणाले. "भिकबाळी आहे का हो ती? " "हो साहेब.." "खर्या भिकबाळीचे डिझाइन असे नसते, हे जरा वेगळे दिसते आहे. कोणाची युक्ती ही ?" "म म म.. माझीच साहेब." "छान दिसते आहे. मग पेशवे का तुम्ही ? ह्या प्रश्नावर काय बोलावे तेच सुचेना. तेवढ्यात बाजूला सामनाचे श्री. द्विवेदी साहेब उभे होते. ते पटकन म्हणाले "साहेब, अहो पुण्याचेच आहेत ते." साहेब पुन्हा माझ्याकडे बघून विचारते झाले, "पुण्याचे का? मग गाता का तुम्ही?" ह्या प्रश्नावरती आजूबाजूला छान हशा पिकला आणि आमचे 'त त प प..' पुन्हा वाढले. "नाही साहेब गात नाही." "मग काय करत ?" "साहेब प्रकाशन करतात ते" परस्पर कोणीतरी माहिती पुरवली. "फक्त प्रकाशन करता ? किती प्रकाशन केलीत आजवर?" साहेबांचा कळीचा प्रश्न आला. "अं.. भरपूर केलीत साहेब." काय पण उत्तर दिले मी. वाह ! पुन्हा एकदा आजूबाजूला छानशी खसखस पिकली. त्या परिस्थितीतून माझी सुटका करायला रावते साहेब अगदी देवासारखे धावले आणि त्यांनी साहेबांसाठी आणलेली शाल माझ्यापुढे केली. एकतर साहेब बाजूला उभे असल्याचे दडपण, त्यात त्यांच्या प्रश्नांनी उडालेली भंबेरी अशा अवस्थेत मला धड शालीची घडी देखील उलगडता येईना. शेजारी श्री. उद्धव ठाकरे छानशे माझी अवस्था बघून गालातल्या गालात हसत होते. शेवटी रावते साहेबांनीच शाल उघडून दिली आणि ती थरथरत्या हाताने मी बाळासाहेबांना पांघरली. मखमली कापडात गुंडाळलेल्या पुस्तकाच्या प्रती आल्या आणि मा. बाळासाहेब आणि श्री. उद्धव ठाकरे ह्यांच्या हस्ते 'मी मंत्रालय बोलतोय..' ह्या पुस्तकाचे प्रकाशन झाले. आता कधी एकदा इथून बाहेर पळतोय अशी माझी अवस्था झाली होती. प्रकाशन आटोपले आणि बाळासाहेब पुन्हा एकदा विचारते झाले, "हं कशावरती केले आहे पुस्तक ?" "साहेब, मंत्रालयाला जी आग लागली, त्या घटनेवरती केले आहे." रावते साहेबांनी माहिती दिली. "अरे ! येवढ्यात छापून देखील आले ?" येवढे बोलून साहेब माझ्याकडे वळले आणि म्हणाले, "तुम्हाला माहिती होते का आधी हे घडणारे म्हणून ? आधीच तयारीला लागला होतात का काय ?" हास्याची एक जोरदार लाट उसळली आणि त्या लाटेत मी आपले कसेतरी गुळमुळीत 'नाही नाही..' येवढेच बोलू शकलो. मग पुन्हा एकदा तोच प्रश्न रावते साहेबांना देखील विचारला गेला. साहेबांनी पुस्तक चाळले, त्याच्या किमतीची माहिती करून घेतली, त्यातील लेखांची माहिती घेतली, सामनातले कुठले कुठले लिखाण त्यात समाविष्ट केले आहे ते देखील आवर्जून जाणून घेतले. ते रूप, तो आवाज, तो करारीपण, प्रत्येक गोष्टीवरचे बारीक लक्ष पाहून क्षणभर वाटले की 'साहेबांच्या प्रकृतीची, ते भाषण करू शकतील का नाही' ह्याची सतत विनाकारण वांझोटी चिंता करणार्या काही सुमार पत्रकारांना ह्या क्षणी इथे बोलावावे आणि 'आता लिहा बरं तुमची बातमी' असे सांगावे. जाता जाता :- शक्यतो महिन्याभरातच माझ्या नवीन ग्रंथदालनाची सुरुवात करतो आहे. ह्या प्रसंगी मिपाकरांना खास सवलतीत पुस्तके देण्याचा मानस आहे. तरी ज्यांची खरेदीची इच्छा असेल त्यांनी व्यनी अथवा खरडीतून नोंदणी करावी अशी विनंती. पुस्तके तुमच्या हातात पडल्यावरतीच पैशाची देवाण घेवाण होणार आहे. ह्या व्यवहाराचा व मिपाचा काहीही संबंध नाही.लेबल: पुस्तक प्रकाशन
बुधवार, ११ जुलै, २०१२
तरी ह्या आनंदाच्या प्रसंगी सर्व मिपाकरांची उपस्थिती आवश्यकच आहे. तुम्हा वाचकांच्याच आशीर्वादाने, प्रेमाने आणि पाठिंब्याने आज हे यश मिळत आहे. तेव्हा सर्वांनी यायचेच आहे. प्रकाशन स्थळ :- उन्नती गार्डन मैदान, देवदया नगर, ठाणे (पश्चिम) कार्यक्रमाची वेळ :- संध्याकाळी ७.०० वाजता.* *माननीय श्री. राजसाहेब ठाकरे येणार असल्याने, होणारी गर्दी लक्षात घेता जागा मिळवण्यासाठी शक्यतो थोडे आधीच आल्यास उत्तम. प्रसाद ताम्हनकर ९७३०९५६३५६
======================
तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाने सोहळा उत्तम पार पडला. सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.
लेबल: पुस्तक प्रकाशन
बुधवार, ४ जुलै, २०१२
'अनुराग कश्यप डोक्यावर पडला आहे' इथपासून ते 'येवढा चित्रपट लोकांनी का नाकारला?' अशा दुसर्या टोकाच्या प्रतिक्रियेपर्यंतच्या गप्पा 'गँग्ज ऑफ वासेपुर' ह्या चित्रपटाबद्दल ऐकत होतो. स्वतः अनुराग कश्यप आणि ज्यांना चित्रपटातले नक्की कळते (आसे आम्हाला वाटते) अशा दोन चार समीक्षकांनी देखील वासेपुरचे कौतुक केल्याने, आता नक्की भानगड आहे तरी काय हे बघणे आलेच होते. काल मग एकदाचा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची कथा म्हणाल तर एका वाक्यात संपणारी आहे. 'वडिलांच्या खुनाचा बदला घेण्यास मुलगा उत्सुक'. झाली संपली कथा. खरे तर संपली नाही, अजून एक भाग यायचा आहे. ह्या चित्रपटाचे समीक्षण लिहिताना, समीक्षण म्हणण्यापेक्षा ह्या चित्रपटाविषयी तुम्हाला माहिती देताना आधी चित्रपटाबद्दल घेतले गेलेले आक्षेप आणि चित्रपटाच्या चांगल्या वाईट गोष्टींची दखल घेऊ. सगळ्यात मोठा आक्षेप होता तो म्हणजे 'हा चित्रपट दोन भागात काढायचे कारणच काय ?' हा आक्षेप घेणार्यांवरती खदखदून हसावे, का त्यांची कीव करावी हेच मला नक्की कळत नाहीये. मुळात हा चित्रपटच पाच तासाचा आहे , हे किती आक्षेप घेणार्यांना माहिती आहे ? ह्या चित्रपटाचे पहिले दर्शन 'Cannes Directors' Fortnight' ला करण्यात आले होते, त्यावेळी संपूर्ण लांबीचा चित्रपट दाखवण्यात आला. बॉलीवूड आणि हिंदी दर्शक ह्यांची मानसिकता लक्षात घेऊन मग तो दोन भागात प्रदर्शित करण्याचे ठरवण्यात आले. आक्षेप २ :- चित्रपटातील किळसवाणे, अश्लीलतेकडे झुकणारे संवाद आणि हिंसा. इथे मात्र अनुराग कश्यपला विचार करण्यास नक्की संधी आहे. सरदार खान (मनोज वाजपेयी, रामाधीर सिंह (तिग्मांशु धुलिया) किंवा अगदी एहसान कुरेशी (विपिन शर्मा) हे अडाणी, असंस्कारीत असले तरी ते ज्या प्रकारे टोळ्या सांभाळत असतात ते बघता त्यांची भाषा अक्षरशः एखाद्या देशी दारूच्या गुत्तेवाल्याच्या तोंडी शोभावी अशी देण्यात आली आहे. ते रांगड्या भाषेत जे शब्द बोलतात, तेच शब्द अगदी वेगळ्या प्रकारे ह्या आधी आपल्या कानावरती गेले आहेत, पण ते सुसह्य होते. कारण 'सूंघ के देख आज मंत्रीजी ने क्या खाया है' किंवा 'तेरी कह के लूंगा' सारखी वाक्ये आपण 'खाया पिया सबको पता चल जायेगा' , 'तुम दोनोने एक ही आयटम बजाया था' अशा बंबय्या गॅंग्जच्या भाषेत ऐकली होती. जी कधी ना कधी कानावरून गेली होती, किंवा नसली तरी असह्य वाटली नव्हती. इथे मात्र अनुरागचे गुण नक्की कमी होणार. राहिला मुद्दा हिंसेचा, तर हात मुख्य संघर्ष दाखवला आहे तो कुरेशी आणि खान ह्या दोन स्थानिकांमधला. कुरेशी जमात ही खाटीक, त्यामुळे त्यांच्याकडून दाखवलेला हिंसाचार हा अक्षरशः कसाई बकर्या कापतो तसाच अंगावर येणार दाखवणे गरजेचे. कुठेतरी प्राणी आणि माणसे ह्यात हे कुरेशी काहीच फरक जाणत नाहीत असे काहीसे दाखवण्याचा हा प्रयत्न म्हणता येईल. दुसर्या बाजूला वर्षानुवर्षे कुरेंशीच्या आधिपत्याखाली पिचणारे खान जेव्हा स्वतःच्या ताकदीवरती विश्वास ठेवायला लागतात, तेव्हा त्याच्याकडून आलेले प्रत्युत्तर देखील त्याच ताकदीचे दाखवणे गरजेचे होते. वर्षानुवर्षाचा राग, संताप, द्वेष, अन्यायाची चीड ही त्या हल्ल्यांमधून बाहेर पडत असताना दिसायला हवीच होती. हा हिंसाचार अंगावरती काटा आणतो हे नक्की, पण ह्याहून अधिक भयावह हिंसाचार आपण पाहिलेला आहे. अर्थात तो अॅटोमॅटिक रायफल्स, मशीनगन्स इत्यादींनी केलेला असल्याने आपल्या सरावाचा आहे. पण हा चित्रपट ज्या कालखंडात घडतो तो कालखंड पाहता त्या काळातल्या हत्यारांनीच हा हिंसाचार लडबडलेला असणे योग्यच नाही का ? खाटीक त्याच्या हातातल्या सुर्याने एखाद्याला मारेल, तेव्हा तो काय अगदी व्यवस्थित पोटात सुरा खुपसणे ह्या सारखे प्रकार करणार नाही. तो सरळ बकरा कापतो तसे खपाखप वार करणार आणि मोकळा होणार. आक्षेप ३ :- अनुराग कश्यप डायरेक्टर म्हणून कुठेच जाणवत नाही. बिहार देखील मनात ठसत नाही. हा आक्षेप घेणारी बहुतांश मंडळी ही 'प्रकाश झा, रामगोपाल वर्मा ' ने झपाटलेली असावीत असा मला संशय आहे. झा साहेबांनी आपल्या अनेक चित्रपटांमधून जो बिहार उभा केला, तो बिहारच आता दर्शकांची ओळख बनला आहे. बिहारचे राजकारणी, बाहुबली, तिथली घरे, पोलीस, तिथली भाषा ह्या सगळ्यांचा एक वेगळाच ठसा काही लोकांनी स्वतःवरती उमटवून घेतला आहे. मराठी माणूस म्हणजे हवालदार किंवा हीरोचा मूर्ख मित्र, किंवा गेला बाजार जोकर वाटावा असा राजकारणी अशी जी एक प्रतिमा काही काळापूर्वी बॉलीवूड मध्ये होती, तसेच काहीसे बिहारचे होत आहे. मुळात हा चित्रपट बिहारचा उत्कर्ष / अधःपतन / तिथल्या राजकारणाच्या खेळ्या, बाहुबलींचे राज्य, स्वातंत्र्याचे फायदे -तोटे हे ज्या काळात सुरू झाले, तो काळ दाखवतो हे आधी लक्षात घ्यायला हवे. ह्या चित्रपटाकडून तुम्ही एकदम मुरलेले राजकारणी, सहजपणे गळा चिरणारे आणि नामानिराळे राहणारे बाहुबली, कर्तव्यदक्ष / लाचखोर पोलीस बघण्याची अपेक्षाच करू शकत नाही. तसेच रामगोपाल वर्मा दाखवतात त्या काळातल्या गँगवॉरची आणि बिहारमधल्या चित्रपटात दाखवलेल्या काळाची तुलना देखील अशक्यच. आक्षेप ४ :- मनोज वाजयेपी एकटा चित्रपटा तारून नेऊ शकत नाही. तो वगळता इतर कोणी ओळखीचे पण नाही. ह्या आक्षेपावरती तर काय बोलावे तेच कळत नाही. अहो, हा चित्रपट आहे, प्राणिसंगहालय नाही. एका तिकिटात जंगलातले सगळे प्राणी बघता येतात, तसे तुम्हाला सगळे हीरो आणि हिरवण्या बघायच्या असतात का ? बरं ह्या चित्रपटात मोठी स्टारकास्ट घेतली असती, तर हेच लोक 'कथेत दम नाही म्हणून कलाकारांची फौज गोळा केली आहे' असे गळे काढत बसले असते. काही चित्रपट हे कथांसाठी नाही, तर सादरीकरणासाठी बघायचे असतात हे लक्षात कधी घेणार? ह्या चित्रपटात नीट लक्ष दिले तर मोठे मोठे सीन्स तुम्हाला कुठेच दिसणार नाहीत. लांब, पल्लेदार संवाद किंवा अभिनयाची जुगलबंदी इथे आणलेली देखील नाही. प्रत्येक भूमिकेला न्याय मात्र नक्की मिळालेला आहे. खरेतर ह्या चित्रपटातील सर्वच पात्रे ही एकमेकांना पूरक आहेत, आणि ह्या आधी कुठल्याही भूमिकेचा शिक्का बसलेला नसणे हीच ह्या पात्रांची खरी गरज होती. अनुरागने अतिशय चाणाक्षपणे हे हेरून नवोदितांना मोठ्या अपेक्षेने इथे संधी दिली आहे, आणि त्यांनी देखील त्याचे सोने केले आहे. आता चित्रपटाची कथा थोडी समजावून घेऊ. ब्रिटिश अमदानीत कुख्यात डाकू सुलतान ह्याची चांगलीच दहशत असते. ह्या सुलतान डाकूचे खोटे नाव घेत त्याच्या नावाने शाहीद खान हा ब्रिटिशांच्या ट्रेन्स लुटायला लागतो आणि चित्रपटाच्या मूळ कथानकाला सुरुवात होते. ही गोष्ट कळल्यावरती पिसाळलेला सुलतान डाकू खरेतर शाहीदच्या जीवावरच उठतो पण शेवटी सामंजस्य होऊन शाहीदला गावाबाहेर हाकलले जाते. गावाबाहेर पडलेला शाहीद आता थोड्या फार संघर्षानंतर रामाधीर सिंग ह्या कोळसा खाणीतील ठेकेदाराकडे 'पैलवान' अर्थात पाळलेला गुंड म्हणून काम करायला लागतो. शाहीदचा वाढता दबदबा बघून वेळीच पुढचा धोका ओळखून रामाधीर सिंह त्याला संपवतो. इकडे शाहीदचा मुलगा सरदार खान मात्र आपल्या काका बरोबर पळून जाण्यात यशस्वी होतो आणि त्याचा जीव वाचतो. आता सूडाने पेटून उठलेला सरदार खान रामाधीरचा बदला घ्यायला निश्चय करतो. ह्या बदल्याच्या ठिणगीचे आगीत होत जाणारे रूपांतर आणि ह्या आगीत जळणारी ओली सुकी लाकडे म्हणजे 'गँग्ज ऑफ वासेपुर' हा चित्रपट. काही चित्रपट हे कथांसाठी नाही, तर सादरीकरणासाठी बघायचे असतात असे मी वर म्हणलेच आहे. ह्या अपेक्षेत अनुराग उतरला आहे का ? म्हणले तर हो, म्हणले तर नाही. चित्रपटातला संघर्ष हा हळूहळू अनुरागने उत्तमपणे वाढवत नेलेला आहे. पण कोळशाच्या खाणींचे राजकारण, स्वातंत्र्यानंतर त्यांची बदललेली मालकी आणि ह्या पैसेवाल्या पण कोळसा खाणींचे ज्ञान नसलेल्या मालकांची धडपड, बाहुबलींचा उदय, कोळसा खाणींचा अस्त आणि त्यामुळे बदलत जाणारे समाजकारण ह्या गोष्टी आपल्यापर्यंत फक्त संवादा द्वारे पोचतात, त्यामुळे त्या म्हणाव्या तशा ठसत नाही. ह्या गोष्टी अधिक सुसंगत आणि नेमकेपणाने दाखवल्या असत्या तर चित्रपटाची रंगत अजून वाढली असती. सरदार खानच्या डोक्यातील बदल्याची आग दाखवतानाच, हा सरदार खान कसा स्त्री लंपट आहे, वेळेला मुलांवरती जीव टाकणारा आहे, वेळेला जमातीतील लोकांच्या अडचणीला उभा राहणारा आहे, हे कंगोरे दाखवत अनुराग त्याला सर्वसामान्य पातळीच्या वरती जाऊ न देण्याची जी दक्षता घेतो ती खरंच सुंदर आहे. ह्यामुळे हा संघर्ष फक्त एकट्या सरदार खानचा न उरता, एका समुदायाचा बनत जाण्यास मदत होते. चित्रपटाचे संगीत उत्तम आहे. 'इक बगल मे चांद होगा' आणि 'वुमनीया' ही गाणी तर अप्रतिमच. वेगवेगळ्या प्रसंगांना धार आणण्यासाठी पार्श्वसंगीत आणि गाणी ह्यांचा केलेला वापर वाखाणण्याजोगा. अभिनयाच्या बाबत म्हणाल तर मनोज वाजपेयी सोडता बरेचशे चेहरे हे नवोदित आहेत. मात्र आपल्या अभिनयात ते कुठेही नवखेपणा जाणवून देत नाहीत. उत्तम प्रकारे समजून उमजून अभिनय त्यांनी केलेला आहे. सरदार खान आता बाहुबली म्हणून प्रस्थापित झालेला आहे आणि त्याच्या हाताखाली त्याची दोन तरूण मुले देखील आली आहेत. अशातच सरदार खानवरती जीवघेणा हला होतो, आणि ह्या टप्प्यावरती चित्रपट संपतो. चित्रपट एकदा तरी पाहाच असा आग्रह करणार नाही, पण 'काहीसे वेगळे' चित्रपट बघण्याची आवड असल्यास हा चित्रपट बघायला नक्की हरकत नाही.
फॉलोअर
Translation
Save as PDF
सदस्यत्व घ्या
Labels
- इंग्रजी चित्रपट (10)
- कथा (29)
- चित्रपट (20)
- तेलगु (1)
- पुस्तक प्रकाशन (3)
- प्रहसन (12)
- भयपट (4)
- मराठी (8)
- स्तंभलेखन (1)
- हिंदी (12)