शुक्रवार, २९ ऑक्टोबर, २०१०
काल मध्यान्ह मुहूर्तावर मी छानसे देवाला आणि स्वतःला वंदन केले. त्यानंतर 'हे कसे शक्य आहे? ' 'असे कधी असते का? ' असे नको ते प्रश्न विचारणारा मेंदूचा भाग काढून बाजूला ठेवाल. त्यानंतर छानसा उजव्या हाताला रुमाल गुंडाळला आणि शर्टाचे वरचे बटण उघडे टाकून मी रिक्षावाल्यांच्या ईस्टाइलने खुर्चीत स्थानापन्नं झालो. अशी छानशी पूर्वतयारी झाल्यानंतर मी दबंग बघायला सज्ज झालो हे तुम्ही ओळखले असेलच.
नुकताच येऊन गेलेला सलमान 'वाँटेड' पाहिल्यापासून सलमान आणि दबंग दोघांनी माझ्या अपेक्षा फारच उंचावून ठेवल्या होत्या. तसा मी काही फार जाणकार परीक्षक किंवा एखाद्या कलाकाराला पारखू शकेन असा कसबी वगैरे नाही, पण सलमानचा वाँटेड पाहिल्यापासून एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात आली, ती म्हणजे सलमानने आता स्वतःला आणि स्वतःच्या वकुबाला पूर्ण ओळखले आहे. मुख्य म्हणजे सलमान काय करू शकतो आणि तो काय करताना हिट होऊ शकतो हे कळणारे कसबी दिग्दर्शक त्याच्या हाताला लागू लागले आहेत. अरे वाटत आहे की सलमानने आता आपण कितपत अभिनय करू शकतो हे व्यवस्थित लक्षात घेऊन त्या टाईपच्या भूमिका करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे सलमानला बघणे आणि सहन करणे आता सुसह्य व्हायला लागले आहे. अभिनय, मेलोड्रामा, डोळ्यांची भाषा वगैरे आपल्याकडून पब्लिकला अपेक्षीत नाही आणि ते आपल्याला जमणार नाही हे त्याच्या पक्के लक्षात आले आहे, त्यामुळे ओन्ली रफ अँड टफ अका रावडी सलमान दबंग पूर्ण खाऊन जातो आणि मुख्य म्हणजे डोक्यात न जाता डोक्यावर जातो.
दबंग म्हणजे निर्भय. हि गोष्ट आहे उत्तरप्रदेश मधल्या लालगंज भागातील एका निर्भय पण चालू पोलिस ऑफिसर रॉबिनहूड उर्फ चुलबुल पांडेची. कंजूष सावत्र वडील विनोदखन्ना आणि आई डिंपल कपाडिया ह्यांच्या सोबतच त्याला साथ आहे ती सावत्र भाऊ मख्खी उर्फ मंदबुद्धी आरबाज खानची. लहानपणापासूनच वडील आणि सावत्र भावाशी चुलबुल उर्फ सलमानचे सख्य असे नसतेच. त्यांना जाता येता त्रास देणे, ताठपणे बोलणे हेच काय ते त्याचे काम. हा लहान चुलबुल आता एक धाडसी पोलिस ऑफिसर बनलेला आहे जो लुटारूंना वगैरे पकडून वर त्यांचा माल लुटून त्यांना पळून जायला देखील मदत करत असतो.
चित्रपटाच्या सुरुवातीलाच सलमानच्या एंट्रीचा जो शॉट आहे तिथेच माझ्या मनात थोडीशी शंकेची पाल चुकचुकायला लागली होती. हि सलमानची एंट्री अगदी थेट 'वाँटेड' चित्रपटाप्रमाणेच आहे. अगदी तो त्या सिनेमात ज्या गोडाउन मध्ये मारामारी करतो तसेच हुबेहूब गोडाउन इथे दबंग मध्ये उभे केल्यासारखे स्पष्ट जाणवते. एंट्रीचा शॉट संपल्या संपल्या लगेच 'दबंग दबंग' हे गाणे सुरू होते. गाणे आणि संगीत थेट 'ओंकारा' च्या वळणावर जाणारे. आता भवतेक चित्रपट बघून डोक्याला शॉट लागणार असे वाटायला लागते... मात्र नंतर जी काही धमाल सुरू होते की क्या कहने...
दबंग सलमानची झडप आता लालगंजचा युवा नेता छेदी सिंग बरोबर होते. छेदी सिंगचा रोल सोनू सूद ने केला आहे. अप्रतिम शरीरयष्टी आणि सहज अभिनय ह्यामुळे ह्या भूमिकेत तो भाव खाऊन गेला आहे हे नक्की. ह्या छेदी सिंगच्या डोक्यावर हात आहे तो मंत्री अनुपम खेरचा आणि त्याला सोबत आहे ती होणाऱ्या इन्स्पेक्टर सासऱ्याची ओम पुरीची. लूटमार, देशी दारूच्या भट्ट्या हे सगळे सांभाळून राजकारण करणे आणि आगामी निवडणुकीसाठी तिकिटाच्या मागे लागणे हे ह्या छेदी सिंगचे काम. त्याच्या माणसाने लुटलेला माल त्याच्या माणसांकडून सलमान पळवतो आणि इथे त्यांच्या संघर्षाला सुरुवात होते. पुढे अनुपम खेर देखील सलमानच्या मदतीने छेदी सिंगला शह देऊ पाहतो आणि हे युद्ध अजूनच भडकते.
मधल्या वेळात सलमानची हिरवणी म्हणून सोनाक्षी सिंगची नेमणूक केलेली आहे. तसेही आजकाल हिरवणींकडून फारशी अभिनयाची अपेक्षा नसतेच. सोनाक्षी दिसली आहे सुंदरच आणि 'थप्पडसे नही प्यारसे डर लगता है साब' वगैरे डायलॉग मारत काही संवादात भाव देखील खाऊन गेली आहे. एकूणच सोनाक्षीचे पदार्पण झक्कास म्हणायला हरकत नाही. तिच्या जोडीलाच उल्लेख करायला हवा तो आरबाज खानचा. ह्या माणूस देखील फारसा अभिनय कुशल वगैरे नाही, पण मर्यादेत राहिला तर छान काम करून जातो. (उदा. गर्व) ह्या चित्रपटात देखील त्याच्या वाटेचे काम त्याने चोख केले आहे. स्वतः दिग्दर्शक असूनही तो कुठे भरकटलेला नाही आणि मुख्य म्हणजे त्याने सलमानला देखील भरकटू दिलेले नाही.
सलमान आणि आरबाजच ह्या चित्रपटातील मिशीवाला लुक एकदम शॉल्लेट आणि त्यांना शोभतोही. हा लुक म्हणे सलमानला सोनाक्षीनी सुचवला. खरेतर ह्या चित्रपटात खान कँप कडून गोविंदाच्या कन्येला लाँच केले जाणार असल्याची बातमी होती, पण ऐनवेळी बाजी मारली ती शत्रुघ्न सिन्हांची कन्या सोनाक्षीने. जाडजूड सोनाक्षील ६ महिने जीम मध्ये राबवून सलमानने अगदी फिट केल्याचे दिसते.
हान.. तर आता इकडे चुलबुल आणि सलमान मधला संघर्ष चांगलाच पेट घेतो तर तिकडे दुसऱ्या आघाडीवर आईच्या मृत्यूनंतर सलमान आणि त्याच्या वडील आणि भावातला संघर्ष देखील पेटून उठतो. सलमानच्या वडील आणि भावाची मदत घेऊन छेदी सिंह सलमानला शह देऊ पाहतो मात्र त्यात अयशस्वी ठरल्याने तो त्यांच्या फॅक्टरीला आग लावून देतो. त्या धक्क्याने सलमानचे वडील हॉस्पिटलामध्ये ऍडमिट होतात. वडिलांच्या इलाजासाठी पैशाची गरज असलेला आरबाज पुन्हा छेदी सिंहच्या जाळ्यात सापडतो आणि नको ती कामे करायला लागतो. शेवटी भावाचाच खून करायची गळ त्याला छेदी सिंह घालतो तेव्हा मात्र तो जाऊन सलमानला मिळतो आणि मग दुष्टांचा नाश ठरलेलाच.
अशा साध्या सरळ आणि टिपीकल रावडी कथेला उत्तम साथ लाभली आहे ति संगीताची आणि ऍक्शन दृश्यांची. संगीताच्या आघाडीवर साजिद-वाजिद ह्यांनी खरोखर श्रवणीय आणि अप्रतिम कामगिरी केलेली आहे. चित्रपटातील सर्वच गाणी सुंदर आहेत. उडत्या चालीच्या (आणि ढापलेल्या) 'मुन्नी बदनाम हुई' बरोबरच 'तेरे मस्त मस्त दो नैन' हे राहत फतेह अली खानच्या आवाजातील हळुवार गाणे म्हणजे मेजवानी आहे.
|
एस. विजयन ह्यांची ऍक्शन दृश्ये भन्नाटच आणि टिपीकल सलमान खान फॅन्सची मागणी पूर्ण करणारी. त्याच्या जोडीला खटकेबाज संवादाची चटपटीत भेळ आहेच. मात्र हे सगळे असताना देखील विनोद खन्ना, अनुपम खेर आणि ओम पुरी सारख्या कलाकारांना इतक्या किरकोळ भूमिका देऊन वाया का घालवले अशी रुखरुख राहून जाते. कदाचित 'खान कँप'ला नाही म्हणणे जड गेले असल्याने त्यांनी ह्या भूमिका स्वीकारल्या असाव्यात. तुलनेने तेवढ्याच छोट्या भूमिका असून देखील महेश मांजरेकर आणि डिंपल मात्र आपल्या अभिनयाची छाप सोडून जातात.
जाताजाता अरबाजच्या दिग्दर्शनाला सलाम ठोकावेसे वाटतात असे २ प्रसंग :-
१) मंत्री असलेल्या अनुपम खेरच्या बंगल्यात येवढ्या सिक्युरिटी मधून अरबाज आरामात आंब्याच्य पेटीतून बाँब घेउन जातो.
२) अंतिम मारामारीत सलमानच्या अंगावरुन टराटरा फाटून चिंध्या होउन वार्यावर उडालेला शर्ट सलमान खलनायकाला मारुन ट्रॅक्टरमधून परत येताना तोच शर्ट त्याच्या अंगावर असतो.
एकूण काय तर दबंग सलमानसाठी, झटकेबाज सोनाक्षीसाठी आणि 'तेरे मस्त मस्त दो नैन' साठी हा १००% टैमपास करणार दबंग बघणे मस्टच आहे.
गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०१०
काल दुपारी मस्त '१४०८' हा भयपट पहात बसलेलो असतानाच एक मैत्रिण आली. भयपटाची तिला बिलकुलच आवड नसल्याने आणि मुख्य म्हणजे ती २/२.३० तास मुक्काम ठोकण्याच्या इराद्यानेच आलेली असल्याने मग 'एखादा मराठी पिक्चर लाव रे !' अशी फर्माईश आलीच. मग इकडे तिकडे शोध घेत असतानाच अचानक कधितरी कॉपी करुन ठेवलेला 'गोजिरी' चित्रपट हाताला लागला. (भवतेक मकीच्या कडुन मिळाला असावा. खात्री नाही)
चित्रपट सुरु झाला आणि काही वेळातच मैत्रिण पटकन ओरडली अरे हा असाच चित्रपट आधी कुठेतरी पाहिला आहे. "अग बावळट 'गोजिरी' म्हणजे '50 First Dates' ह्या नितांत सुंदर चित्रपटाचे मराठीकरण आहे." मी लगेच ज्ञान पाजळून घेतले. "अय्या ! खरच की." म्हणत मैत्रिणीने डोक्याला हात मारला.
50 First Dates हा एक नितांत सुंदर अनुभव देणारा चित्रपट आहे. त्याला मराठीत आणताना 'गोजिरी'चे दिग्दर्शक विजु माने कुठेही कमी पडलेले नाहीत. जेवढा सुंदर अनुभव इंग्रजी चित्रपट देतो तेवढाच झकास अनुभव 'गोजिरी' देखील देतो. पण मग मुळात माझ्यासमोर प्रश्न आल की नक्की ओळख कोणत्या चित्रपटाची करुन द्यावी ? इंग्रजी का मराठी ? मग ठरवले दोन्ही चित्रपटांना हातात हात घालुन समोर उभे करु.
50 First Dates आला २००४ मध्ये तर गोजिरी आला होता २००७ मध्ये. इंग्रजी चित्रपटात अॅडम सँडलर आणि ड्र्यु बॅरिमॉर ह्यांनी वठवलेल्या भुमिका मराठीत अनुक्रमे सुनिल बर्वे आणि मधुरा वेलणकर ह्यांनी वठवलेल्या आहेत. 50 First Dates नायकाकडे एक झकास अॅक्वेरिअम आहे तर मराठी चित्रपटात ती कमतरता कोकणचा किनारा भरुन काढतो.
मी येवढे कौतुक करत असलेल्या ह्या चित्रपटांची कहाणी अशी आहे तरी काय ? कहाणी म्हणाव तर अगदी साधी, म्हणाव तर जिवाला चटका लावणारी. खुशालचेंडु नायकाला नायीकेचे भेटणे आणि थोड्याश्या वादावादीनंतर त्याला 'हिच ती' असा साक्षाक्तार होउन खर्या प्रेमाची ओळख पटणे. इथपर्यंत कहाणी अगदी टिपिकल फिल्मी वगैरे आहे. पण आदल्या दिवशी नायकाला भेटलेली, एकेमेकांचे विचार जुळल्याने नायकाच्या बर्याच जवळ आलेली आणि त्याला कुठेतरी ती आपल्या प्रेमात पडत आहे असा विश्वास बसत असतानाचा अचानक दुसर्या दिवशी नायकाला ओळखही न दाखवणारी नायीका समोर येते आणि इथे चित्रपट एक वेगळेच वळण घेतो. काही वेळासाठी तर नायक (पक्षी :- अॅडम सँडलर किंवा सुनिल बर्वे) देखील चक्रावुन जातो. आणि मग नायकाला खरे रहस्य कळते के नायिकेला 'शॉर्ट टर्म मेमरी लॉस' आहे. आज जे काही घडेल ते सर्व ती उद्या पुन्हा विसरुन जात असते.
मराठी चित्रपटात सुनिल बर्वेला हे रहस्य तो जेंव्हा मधुरा वेलणकरला मागणी घालायला तीच्या घरी जातो तेंव्हा तिच्या आजोबांकडून (अरुण नलावडे) कळते असे दाखवले आहे. मग सुरु होतो तो नायकानी रोज सकाळी नायिकेला एका वेगळ्या रुपात भेटण्याचा आणि तिला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करण्याचा एक अनोखा खेळ. त्याला खेळ तरी कसे म्हणावे ? पण रोज नव नव्या युक्त्या योजुन नायिकेला भेटणे आणि तिचा विश्वास संपादन करत जाणे हे अॅडम सॅंडलर असो वा सुनिल बर्वे ह्या दोघांनिही इतके अप्रति उभे केले आहे की जणु ते ति भुमिका जगले आहेत असेच वाटते. मधुरा वेलणकर मात्र ड्र्यु बॅरिमोरच्या तुलनेते साफ फिक्की पडली आहे असे आपले माझे मत ! हि भुमिका करताना मधुरा वेलणकर काहीशी अवघडलेली वाटते.
मराठी चित्रपटात सुनिल बर्वेला हे रहस्य तो जेंव्हा मधुरा वेलणकरला मागणी घालायला तीच्या घरी जातो तेंव्हा तिच्या आजोबांकडून (अरुण नलावडे) कळते असे दाखवले आहे. मग सुरु होतो तो नायकानी रोज सकाळी नायिकेला एका वेगळ्या रुपात भेटण्याचा आणि तिला आपल्या जवळ आणण्याचा प्रयत्न करण्याचा एक अनोखा खेळ. त्याला खेळ तरी कसे म्हणावे ? पण रोज नव नव्या युक्त्या योजुन नायिकेला भेटणे आणि तिचा विश्वास संपादन करत जाणे हे अॅडम सॅंडलर असो वा सुनिल बर्वे ह्या दोघांनिही इतके अप्रति उभे केले आहे की जणु ते ति भुमिका जगले आहेत असेच वाटते. मधुरा वेलणकर मात्र ड्र्यु बॅरिमोरच्या तुलनेते साफ फिक्की पडली आहे असे आपले माझे मत ! हि भुमिका करताना मधुरा वेलणकर काहीशी अवघडलेली वाटते.
आयुष्यात फक्त रोज एकच दिवस जगणारी 50 First Dates चि नायिका रोज आपल्या वडिलांचा वाढदिवस साजरा करत असते तर 'गोजिरी' मध्ये मधुरा वेलणकर रोज आपल्या लहान बहिणीचा. आधी गंमत वाटणारा हा प्रसंग नंतर नंतर नायिकेच्या हतबलतेची आणि मुख्य म्हणजे तिला त्याची जाणीवच नाहिये हे कळल्यानंतर अंगावर काटा उभा करायला लागतो. अभिनयाच्या बाबतीत बॅरिओरला १०/१० मार्क्स. आणि हो सौंदर्याच्या बाबतीत देखील १०/१०. 50 First Dates मध्ये उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये अॅडमिट केल्यानंतर बॅरिमोरची भेट एका फक्त १० सेकंद स्मरणशक्ती टिकुन राहत असलेल्या रुग्णाशी होते, त्यावेळी तिने केलेला अभिनय आणि तिचा बरच काही बोलुन जाणारा चेहरा ह्या साठी मी कमित कमी ३ वेळा 50 First Dates पाहिला असेल.
चित्रपटाचा शेवट सांगून तुमचा रसभंग नक्कीच करणार नाही, पण एकाच कथेवर बेतलेले असले तरी हे दोन्ही चित्रपट एकदा तरी आवश्य पहाच अशी शिफारस मात्र नक्की करीन. गोजिरील मिलिंद इंगळेने दिलेले संगित देखील सुंदर, त्याच बरोबरीने एक वेगळाच कोकण किनारा देखील आपल्या इथे भेटिला येतो हे विशेष. हे दोन्ही चित्रपट तु-नळी वर ११/१२ भागात उपलब्ध आहेत.
.
लेबल: इंग्रजी चित्रपट, मराठी
फॉलोअर
Translation
Save as PDF
सदस्यत्व घ्या
Labels
- इंग्रजी चित्रपट (10)
- कथा (29)
- चित्रपट (20)
- तेलगु (1)
- पुस्तक प्रकाशन (3)
- प्रहसन (12)
- भयपट (4)
- मराठी (8)
- स्तंभलेखन (1)
- हिंदी (12)