मंगळवार, ३० मार्च, २०१०

सव्यसाचि (भाग -६)

"तुला इथपर्यंत आणण्यासाठी तसे वागावे लागले पॅपिलॉन, पण माझी खात्री होती की एकदा मला भेटल्यावर तु कधिच नकार देणार नाहीस."

"हो? मला तुमच्या आत्मविश्वासाचे कौतुक वाटते मिस. डायना. पण तुम्हाला येवढी खात्री का आहे सांगाल का?"

"तु मला कधिच नकार देणार नाहीस पॅपिलॉन.. आपल्या शफीला तु नाही म्हणशील का रे ? सांगना...."

मी खुळ्यासारखा डायनाकडे पाहातच राहिलो.....

"मला माफ कर पॅपीलॉन, तु शफी म्हणुन ज्याला ओळखायचास ती मी होते, एक स्त्री."

"पण हे सगळे कशासाठी? आपली तर साधी ओळख देखील न्हवती."

"हे सगळे समजुन घेण्यासाठी तुला आधीचा सगळा इतिहास माहित असणे गरजेचे आहे पॅपिलॉन. एलिट ग्रुपने मारलेल्या ४ मिलियनच्या डल्ल्याबद्दल तर तु जाणतोसच. मात्र हे पैसे एलिट ग्रुप मध्ये फितुरीचे वादळ घेउन आले. ऐनवेळी वॉल्टर आणी ब्रुस ह्यांनी दगाबजी केली. केव्हिन आणी सॅबीची हत्या करुन त्यांनी सगळीच रक्कम लाटली आणी मग ते माझ्या मागावर निघाले. लहान बहिणीला घेउन मला ताबडतोब देश सोडावा लागला, पण जाताजाता मी 'एफ बी आय' ला ह्या सर्व कटाची माहिती देउन माझ्यापरीने केव्हिन आणी सॅबीचा बदला घेतला होता. पण दैवाच्या मनात काही वेगळेच होते. काही वकिल आणी पोलिस अधिकार्‍यांना पैसे चारुन वॉल्टर आणी ब्रुस ह्यातुन सही सलामत बाहेर पडले. आत मला लपुन राहण्याशिवाय गत्यंतरच न्हवते. कसेतरी एक वर्ष भारतात काढुन मी बहिणीला भारतातच होस्टेलमध्ये ठेवुन कॅनडाला पळ काढला. दोन वर्षात व्यवस्थीत बस्तान बसवुन मी पुन्हा हॅकर्स वर्ल्ड मध्ये दाखल झाले. पण आता मी माझे नाव आणी माहिती दोन्ही बदलायची खबरदारी घेतली होती. मी शफी नावाने एलिट ग्रुपच्या मागवर राहिले आणी जमेल तेवढे वार करुन मी एलिटला खिळखिळे करण्याचा प्रयत्न करत रहिले. मार्क-रॉबिन्सनच्या डल्ल्यात माझा मिळालेला सगळा शेअर मी ह्या एकाच कामासाठी पणाला लावला. आज हि सगळी संघटना, देशोदेशीच्या मंती, अधिकार्‍यांची साखळी उभी करायला मला प्रचंड कष्ट करावे लागले पॅपिलॉन.. आणी त्यातुनच मग हि संघटना उभी राहिली , 'अनटचेबल्स'....."

"ओह्ह्ह्ह ! पण अनटचेबल्स तर फक्त इथिकल हॅकर्सची संघटना म्हणुन ओळखली जाते."

"तो आम्ही धारण केलेला मुखवटा आहे पॅपिलॉन ! आमचा खरा उद्देश आहे अमेरिकी सरकार, अमेरिकन कंपन्यांसाठी माहिती गोळा करण, माहिती चोरणे आणी वेळेला इतर देशातील प्रतिस्पर्धी कंपन्यांच्या सर्वर्सवर हल्ले करणे, त्यांचा डेटा पळवणे.. आणी बरेच काही. तु आता आमच्यातला एक होणारच आहेस... कळेलच तुला."

"खर सांगु डायना, मी अजुनतरी तु शफी असल्याचय धक्य्यातुन सावरुच शकलो नहिये.. बाय द वे कॅथ्रीन तुझी बहिण आहे ना??"

डायनाच्या चेहर्‍यावरचे भाव क्षणात पालटले. आधी थोडे सावधगिरीचे, मग आश्चर्याचे आणी नंतर कौतुकाचे.... तीच्या चेहर्‍यावरचे हे क्षणाक्षणाला बदलत जाणारे भाव मी मोहुन बघत बसलो होतो.

"काँप्युटर बरोबर मनात शिरण्याची कला देखील कोणा दुसर्‍या शफीकडून शिकलास का काय ??" डायना खळखळून हसत म्हणाली.

"नाही ग तसे काही नाही. कॅथ्रीनचा आवज पहिल्यांदा ऐकला तेंव्हाच हा आवाज आधी कुठेतरी ऐकल्या सारखे मला वाटत होते. तु तुझ्या बहिणीचा उल्लेख केलास तेंव्हाच मला अचानक लक्षात आले की शफीच्या बहिणीशी मी फोनवर बोललो होतो, तो आवाज आणी कॅथ्रीनचा आवज सारखाच आहे."

"स्मार्ट बॉय .. हान."

"शेवटी चेला कुणाचा आहे....."

"बर बर ! आता कौतुक पुरे कर आणी मला तुझा निर्णय कळव. सकाळी मी तुझ्या निर्णायाची वाट बघत असेन." येवढे बोलुन डायना मला माझ्या रुममध्ये सोडायला आली.

रात्री मला झोपच लागत न्हवती. एकतर अपरिचीत जागा आणी त्यातुन हे एकावर एक बसलेले धक्के.... साधारण १ च्या सुमाराला माझ्या बेडरुम डोरवर हलकीशी टकटक झाली. मी नाईट लँप चालु करुन बेडरुमचे दार उघडले. दारात डायन उभी होती, ओठावर एक आव्हानात्मक हास्य घेउन...

"सकाळी तुझा निर्णय एकुनच परत जाईन..." डायना आपल्यामागे दार लावता लावता म्हणाली.
.......

"चिअर्स फॉर अवर न्यु पार्टनर, मी. पॅपिलॉन"

"चिअर्स" डायनाच्या सुरात सगळ्यांनी आपले सूर मिसळले.

"डायन तु पुर्ण विचार केलायस ?? एका पुर्णपणे अनोळखी माणसाला तु आपल्यात सामील करुन घेतलेच आहेस, वर येवढी मोठी अधिकाराची जागा ??"

"तो माझ्यासाठी कधिच अनोळखी न्हवता केन, आणी काल रात्रीपासून तर तो फारच विश्वासातला झालाय." डायना माझ्याकडे सुचक कटाक्ष टाकत म्हणाली.

"पण तु सगळ्यांशी ह्यावर एकदा चर्चा करयाला हवी होतीस !" केन अजुनही आपला हेका सोडायला तयार न्हवता. डायनाने शांतपणे आपली सिगारेट पेटवुन केनकडे पाहिले...

"ह्या संघटनेची सर्वेसर्वा मी आहे केन ! तुमच्या हिंमती, हुषारीला आणी प्रामाणीकपणाला दाद देउन मी तुम्हाला नफ्यातला हिस्सेदार बनवले आहे.. निर्णयातला नाही. लक्षात येतय ?? इथे माझा आणी माझाच शब्द अंतिम राहिल."

"आय एक सॉरी डायना. मी फक्त सावधगिरी म्हणुन माझ्या मनातले विचार बोलुन दाखवले." केननी शरणागती पत्करली होती. काही क्षणातच तो फोन आल्याचा बहाणा करुन बाहेर निघुन गेला.

"मि. डग्लस, पॅपिलॉनला आपल्या व्यवहार आणी कामाविषयी आवश्यक आणी महत्वाची माहिती करुन द्या. आपल्या ग्राहक कंपन्या, आपले महत्वाचे काँटॅक्ट्स, राजकारणी आणी अधिकारी व्यक्ती आणी त्यांच्याशी संपर्क साधण्याचे गुप्त शब्द सगळे त्याला ज्ञात करुन द्या."

"येस मॅडम. चार दिवसात मी त्याला पुर्णपणे तयार करुन तुमच्या ताब्यात देतो."

"दोन दिवस मि. डग्लस, फक्त दोन दिवस आहेत तुमच्याकडे ! परवा पॅपिलॉन पुन्हा भारताकडे रवान होईल. एलिटस त्याची वाट बघत असतील तिकडे" डायना डोळा मारत म्हणाली.

दोनच दिवसात मी सगळ्याच गोष्टीत पुर्ण तयार होउन डायनाचा निरोप घेतला आणी भारताकडे कूच केली. जाता जाता दोन गोष्टी मात्र मी माझ्या मेंदूत कायमच्या फिड करुन घेतल्या होत्या, एक म्हणजे डायनाच्या आयुष्यात एलिटला संपवणे हाच एकमेव उद्देश आहे आणी दुसरे म्हणजे ह्यापुढे प्रत्येक क्षणी मला केन पासून सावध रहायला हवे.

विमानाने आपली चाके खाली टेकवताच मी माझे डोळे उघडले. साला लोकांना आपल्या देशात परत आल्यावर 'वतन की मिट्टी' चा वास वगैरे येतो म्हणे. मला मात्र आजुबाजुच्या प्रवाशांनी एकत्र येउन उडवलेल्या संमिश्र सेंटच्या वासानी चक्कर यायची बाकी राहिली होती. लगेज गोळ करत असतानाच अजुन एक आश्चर्य माझ्या शेजारी येउन उभे राहिले. वय वर्षे ३३/३४, फिगर एकदम शॉल्लेड अगदी माझ्यासारख्याला मुंडी मुरगाळून वगैरे मारुन टाकेल अशी, चेहरा भयंकर उग्र.

"पाहुण्यांचे सामान आम्ही त्यांना उचलुन देत नाही, चला पुढे. मी घेतो सामान. तो लाल जॅकेट वाला माणुस चालल आहे ना, त्याच्या मागोमाग चला." गोड आवाजात मला हुकुम सोडला गेला.

गंमतच आहे. माझ्याच देशात, माझ्याच शहरात मला पाहुणा बनवुन कुठेतरी नेले जात होते. मी मात्र कुठलेही दडपण न घेता गाडीच्या मागच्या सिटवर मस्त ताणुन दिली होती. तुम्हाला स्वतःची किंमत कळायला फार वेळ लागतो, मात्र एकदा ती कळाली कि मग तुम्ही दुनियेला आपल्या तालावर नाचवायला सिद्ध होता.

"वेलकम वेलकम दोस्त. गेले दोन दिवस आम्ही तुमची वाट बघत आहोत. कुठे गायब कुठे झाला होतात मि. पॅपिलॉन??"

" हॅलो मि. वॉल्टर ! मी जरा 'अनटचेबल्स'चा पाहुणचार घेण्यात व्यग्र होतो !"

(क्रमशः)

सोमवार, २९ मार्च, २०१०

सव्यसाचि (भाग -५)

दोनच दिवसात माझ्या विमानाने बोस्टनच्या दिशेने उड्डाण केले आणी मी एका नव्या आयुष्याच्या दिशेने......

कॅथ्रीन माझी सहप्रवासी आणी मार्गदर्शक होती. वयाने २३/२४ वर्षाची असणारी कॅथ्रीन दिसायला अप्रतिमच होती, बोलायला देखील हुषार पण जमेल तेवढे कमी आणी कामापुरते बोलणारी. इतर कोणती वेळ असती तर मी नक्कीच थोडेफार फ्लर्ट वगैरे करण्याचा प्रयत्न केला असता हे नक्की. पण सध्यातरी माझी मनस्थिती फार वेगळी होती. मी कुठे चाललो आहे हे मला माहिती होते, पण का आणी कोणाला भेटायला ह्याची काहिच माहिती न्हवती. मी आपला मनातल्या मनात पुढचे आराखडे बांधत वेळ काढत होतो.

"सिट बेल्ट बांधुन घे" कॅथ्रिन खिडकीतुन बाहेर डोकावत म्हणाली. भवतेक विमान लॅंडीग करणार होते.

"आपण उतरुन कोठे जाणार आहोत ??" मी विचारले.

"मी तरी मस्त बार मध्ये जाणार आहे, तुझे माहित नाही" कॅथ्रीन शांतपणे म्हणाली.

"व्हॉट डु यु मीन ?" मी आश्चर्याने विचारले.

" ओरडू नकोस ! माझी ड्युटी तुला इथपर्यंत पोचवणे आणी कार्लोसच्या हवाली करणे येवढीच आहे. गॉट इट ??"

"कार्लोस कोण आहे?"

"बहुदा माझ्या सारखाच एक ट्रान्सपोर्टर" कॅथ्रीन शांतपणे उदगारली.
आपली गाठ कोण्या ऐर्‍या गैर्‍या गावगुंड टोळीशी नाही, हे आता माझ्या लक्षात आले होते.

विमानतळावरुन काळ्या ठेंगण्या कार्लोसने मला पिक-अप केले आणी काही न बोलता गाडीतुन मला शहरी गजबजाटापासून दुर असलेल्या एका फार्महाउस वर आणून सोडले. मी कार्लोसला बोलते करण्याचा खुप प्रयत्न करुन पाहीला पण त्याच्या एकुण चेहर्‍यावरुन त्याला इंग्रजी येत नसावे अथवा तो एक कसलेला अभिनेता असावा हेच दोन निष्कर्ष निघु शकत होते. फार्महाऊसच्या दारात मला सोडून कार्लोस झपकन निघुन सुद्धा गेला. ३ आडदांडा कुत्र्यांनी आधी माझा ताबा घेतला आणी त्यानंतर ४ लुकड्या सुकड्या गार्डनी. (हे गार्ड साले मार्शल आर्ट एक्सपर्ट आहेत हे मला पुढे कळले तेंव्हा माझा चेहरा बघण्या लायक झाला असणार हे नक्की)

"वेलकम टू द वर्ल्ड ऑफ एलिट मि. पॅपिलॉन" रुंद हसत एक डबल हाडा पेराचा माणूस हातात पाईप घेउन माझे स्वागत करायला अचानक दरवाजात उगवला. हि असली माणसे मी फक्त चित्रात आणी इंग्रजी सिनेमात बघितली होती. मी कसेनुसे हसत त्याच्या पंजात माझा पंजा दिला. त्या पंजात माझे हाताचे दोन्ही आणी एक पायाचा पंजा देखील मावेल असे मला वाटून गेले.

आम्ही आतल्या खोलीत प्रवेश केला. आत मध्ये एका मोठ्या कोचावर एक साधारण ३५ वर्षाची स्त्री आरामात बिअरचे घोट घेत ब्रिटनीचा नाच बघत होती. तिच्या शेजारीच एक मध्यमवीन माणूस घोड्यांच्या शर्यतीच्या पुस्तकात मुंडके खुपसून बसला होता. बाजुच्या दोन खुर्च्यात दोन साधारण २५/२६ वर्षाचे तरुण आजुबाजुच्या विश्वाचे भान विसरुन प्ले-स्टेशन मध्ये गुंगले होते.

मी आत प्रवेश करताच ती स्त्री लगबगीने उठली, अत्यंत आनंद झाल्यासारखे भाव चेहर्‍यावर आणत त्या स्त्रीने पुढे येउन मला मिठी मारली. रीत वगैरे असते ठिक आहे पण साला एखाद्या स्त्रीने अशी पटकन मिठी मारायची म्हणजे.. मी थोडासा भांबावुनच गेलो , मला काय करावे तेच पटकन सुचेना. तेवढ्यात त्या स्त्रीने माझ्या गालाचा एक किस देखील घेउन टाकला.

"थोडा धिर वगैरे आहे का नाही ?? आता तुझाच आहे तो." त्या स्त्री शेजारी बसलेला तरुण डोळा मारत म्हणाला. मी तर नुसता गोंधळून बघत राहिलो होतो. त्या स्त्रीने मोहक हसत मला हाताला धरुन आपल्या शेजारी बसवून घेतले. इथे प्रत्येकजण मला खुप चांगल्या प्रकारे ओळखत असल्या सारखेच वागत होता. त्या स्त्रीने अजुनही माझा हात घट्ट धरुन ठेवला होता. नाही म्हणले तरी मी थोडासा लाजतच होतो.

"लेट मी इंट्रो यु विथ ऑल" पाईपवाला बोलला. "द वन बिसाईड यु इज मिस्टर केन, आपले फायनान्सर. त्यांच्या डाव्या हाताचे दोघे माईक आणी विली, हे आपला संगणक विभाग सांभाळतात आणी मी मिस्टर डग्लस, तुम्हा लोकांचा लिगल अ‍ॅडव्हायजर."

"एक मुख्य ओळख करुन द्यायची राहिली, नाही का??" माझ्या शेजारी बसलेली ती मोहक व्यक्तिमत्वाची स्त्री बोलली.

"ती तुच करुन दिलेली जास्ती चांगली नाही का?" केन बोलला. त्याला बोलताना डोळा मारायची सवय असावी बहुतेक.

मी उत्कंठेने त्या स्त्री कडे बघु लागलो. तीने बिअरचा एक मोठा घोट घेउन शांतपणे माझ्याकडे नजर वळवली. तीच्या निळ्या डोळ्यात मी काही क्षण हरवुनच गेलो. तीने आपला नाजुक हात माझ्यापुढे केला...

"डायना...."

"पॅपिलॉन" मी भारावल्या सारखा तीच्या हातात हात देत म्हणालो.

तिच्या निळ्या डोळ्याची जादू भेदत काहीतरी मेंदूत थाडकन उसळले. काहितरी स्ट्राइक झाले.. पण.....

"डायना... यु मीन...." मी अडखळलो.

ती स्त्री खळखळून हसली, बाकीचे देखील हळूहळू त्यात सामील झाले. त्यांना तीने डोळ्यानेच दटावले.

"येस आय मीन डायना... वन ऑफ द एलिट फाउंडर" ती शांतपणे म्हणाली.

मी आणी डायना समोरा समोर बसलोय ?? हे मी कधी कल्पनेत देखील आणले न्हवते. माझी नक्की काय अवस्था होती तीचे वर्णन मी आजदेखील करु शकणार नाही.

"जा फ्रेश हो, मग खुप बोलायचे आहे !" केन हुकुमी आवाजात बोलला. काही दिवसात हाच केन माझी भेट घेण्यासाठी माझ्या रुम बाहेर तडफडत उभा राहायला लागला हा भाग वेगळा.

"व्हिस्की घेणार ? " मी फ्रेश होउन येताच डायना विचारती झाली.

"शुअर" मी मान हलवली.

"शिवास.. शिवासच घेतोसना ?" डायना हसत म्हणाली.

"एखादा माणुस विवक्षीत ठिकाणी पोचायच्या आधी त्याची किर्ती येउन पोचलेली असते, हे मात्र अगदी खरे" मी डोळे मिचकावत म्हणालो.

"हा हा हा, मी तुला म्हणाले होते डग्लस... पॅपीलॉन इज जेम. त्याच्या बोलण्याचे, ज्ञानाचे, हजरजबाबीपणाचे मला कायमच कौतुक वाटत आले आहे." डायना डग्लसकडे वळत म्हणाली. त्यानेही संमतीदर्शक मान हलवली.

"मला ह्या भेटी मागचा उद्देश कळेल का ? आणी हो ज्या पद्धतीने तुमचा सन्याल माझ्याशी वागला ते मला बिलकुल आवडलेले नाही" मी पहिल्यांदाच ठामपणे बोललो.

"त्याच्या वतीने मी माफी मागते पॅपीलॉन. त्याने फक्त त्याला नेमुन दिलेले काम केले."

"पण नक्की हे काम काम म्हणजे आहे तरी काय??" मी वैतागुन विचारले.

"एलिट ग्रुपला चायना सरकार कडून एक ऑफर आलीये पॅपिलॉन, चायना मधल्या जेवढ्या अमेरीकन कंपन्या आहेत त्यांचा डाटा, त्यांची प्रत्येक हालचाल आणी प्रत्येक माहितीची देवाण घेवाण ह्याची खडान खडा माहिती मिळवून सरकारला द्यायची. वेळेला त्यांचे सर्वर्स हॅक करायचे, त्यांच्या डाटाबेस मध्ये शिरायचे पण माहिती मिळवायचीच."

"मग ह्यात अवघड काय आहे? कोणी साधा सुधा हॅकर पण हे करु शकेल."

"मी अजुन पुर्ण माहिती दिली नाहिये पॅपीलॉन... जर हे करताना तुम्ही पकडले गेलात, तर सरकार आपले हात वर करुन मोकळे होणार ! पुढची जबाबदारी तुमची."

"ओह्ह्ह्ह आणी म्हणुनच एलिट नव-नवीन बकरे शोधत आहे तर !" मी डायनाच्या डोळ्यात डोळे रोखुन म्हणालो.

"अगदी बरोब्बर ! म्हणुनच तुला सावध करायला आम्ही तुला इकडे बोलावले."

"काय?? मला सावध करायला ? आणी त्यात तुमचा काय फायदा ??"

"आमच्याकडे तुझ्यासाठी एक फार छान ऑफर आहे पॅपिलॉन" डायना शांतपणे म्हणाली.

"वन सेकंद, वन सेकंद.. माझा काहीसा गोंधळ उडालाय. हे 'आम्ही, आमच्याकडे' म्हणजे काय? यु आर वन ऑफ द एलिट, राईट ??"

"आय व्हॉज ! आणी एलिटस साठी मी अजुनही बेपत्ता पार्टनर्स पैकी एक आहे."

"मला कळेल असे बोलणार का??" मी आता पुरता भंजाळलो होतो.

"एलिट ह्या कामासाठी तुला लाखात पैसे मोजायला तयार होतील, ते जे आकडा सांगतील त्याच्या पुढे २ शुन्य वाढवुन आमची ऑफर तयार असेल.. फक्त तुझ्यासाठी."

"आणी ती ऑफर आहे तरी काय?"

"जे काम तु चायना सरकारसाठी करणार आहेस तेच काम 'यु.एस' साठी करायचे आहे."

"व्हॉट ?????"

"आणी उद्या काही झाले तरी आम्ही हात वर करणार नाही हे नक्की ! यु विल गेट द प्रोटेक्शन ऑलवेज."

"आणी मी नकार दिला, तर आई किंवा वडिल ह्या पैकी एकाचे प्रेत मला भेट मिळणार.. बरोबर ना?" मी कडवटपणे म्हणालो.

क्षणभरच डायनाच्या डोळ्यात एक विषादाची छाया उतरुन गेल्याचे मला भासले. पण क्षणात तीन स्वत:ला सावरले आणी तीचे हसरे डोळे पुन्हा माझ्यावर खिळले.

"तुला इथपर्यंत आणण्यासाठी तसे वागावे लागले पॅपिलॉन, पण माझी खात्री होती की एकदा मला भेटल्यावर तु कधिच नकार देणार नाहीस."

"हो? मला तुमच्या आत्मविश्वासाचे कौतुक वाटते मिस. डायना. पण तुम्हाला येवढी खात्री का आहे सांगाल का?"

"तु मला कधिच नकार देणार नाहीस पॅपीलॉन.. आपल्या शफीला तु नाही म्हणशील का रे ? सांगना...."

(क्रमश:)


बुधवार, २४ मार्च, २०१०

सव्यसाचि (भाग -४)

"वेलकम टू एलीट क्लब...." पलिकडून उदगारले गेलेले हे चारच शब्द माझ्या हाता पायाला थरथर सुटण्यासाठी पुरेसे होते.....

रात्रभर माझ्या डोळ्याला डोळा लागला नाही. मी आणी 'एलिट मेंबर' ?? मी स्वप्नात तर नाही ना ? अनेक मोठे मोठे हॅकर्स ज्या ग्रुपशी कुठे न कुठे खोटे नाव तरी जोडले जावे म्हणुन तडफडत असतात, नाना युक्त्या लढवत असतात, त्या एलिट ग्रुप कडून मला बोलावणे आले आहे ? का ? कशासाठी ?? असा काय पराक्रम गाजवला आहे मी ? ह्या सगळ्यामागे शफीचा तर हात नाही ?? पण एलिट ग्रुपशी शफीचे नाव कधीच जोडले गेले न्हवते, इन्फॅक्ट एलिट ग्रुप मध्ये एशियामधला मेंबर सहसा सामील केला जात नाही अशीच वदंता होती.

हा एलिट ग्रुप म्हणजे नक्की काय प्रकरण तरी काय आहे ? हा प्रश्न पडला असेल ना तुम्हाला ?? एलिट ग्रुप म्हणजे साधारण ९४/९५ साली त्या काळच्या ५ मोठ्या हॅकर्सनी उभी केलेली संघटना. सॉफ्टवेअर क्रॅकिंग, वेबसाईट / सर्वर हॅकींग, इल्लिगल मनी ट्रान्सफर, डाटा थेफ्ट अशी कामे करणारी हि संघटना होती. 'केव्हिन, ब्रुस, वॉल्टर, डायना आणी सॅबी' हे ते पाच संस्थापक मास्टर्स. ह्यातील केव्हिन आणी सॅबी रहस्यमयरीत्या लंडनच्या 'प्रिन्स पॅलॅस' मध्ये मृतावस्थेत सापडले. तर डायना आश्चर्यकारकरीत्या गायब झाली. हे सर्व घडले साधारण २००२ च्या मध्यात. सध्या वॉल्टर आणी ब्रुस हे संघटना चालवतात असे मानले जाते.

ह्या सर्व रहस्यमय घटना घडल्यानंतर 'एफ बी आय' ने दिलेल्या माहिती नुसार 'एलिट ग्रुप' ने 'मार्क-रॉबिन्स ग्रुप' ह्या प्रसिद्ध ऑइल कंपनीच्या खात्यातुन ऑनलाईन मनी ट्रान्सफर प्रोसेस हॅक करुन तब्बल ४ मिलियन डॉलर्स लंपास केले होते. ह्या सगळ्या घडामोडींनंतर ब्रुस आणी वॉल्टरला तपासासाठी ताब्यात देखील घेण्यात आले, पण त्यातुन काहीच निष्पन्न होउ शकले नाही. खरे तर पोलीस 'एलिट ग्रुप' अस्तित्वात आहे हे देखील सिद्ध करु शकले नाहीत. अखेर दोघांनाही सोडून द्यावे लागले. त्यानंतर जवळ जवळ २ वर्षे 'एलिट ग्रुप'चे अस्तित्वच जणु नष्ट झाले होते. पण अचानक २००५ साली 'मार्क-रॉबिन्स'च्या जनरल मॅनेजरने निवृत्तीनंतर लिहिलेल्या पुस्तकात त्या काळच्या ऑनलाईन बॅंकींग व्यवस्थेवर केलेली टिका आणी ४ मिलियन डॉलर रहस्यमयरीत्या खात्यातुन गायब झाल्याची दिलेली कबुली ह्यामुळे 'एलिट ग्रुप' पुन्हा चर्चेत आला. त्याचवेळी ह्या पुस्तकासंदर्भात आपले मत व्यक्त करताना त्या वेळचे तपास अधिकारी असलेले 'थॉमस बार्क' ह्यांनी 'एलिट ग्रुप'नेच हे कृत्य केल्याचा व ह्या चोरी नंतर एलिट ग्रुप मध्ये फुट पडल्याचा संशय पुन्हा एकदा व्यक्त केला.

ह्या सर्व घडामोडींचा परिणाम म्हणा अथवा डिचवले गेल्याने म्हणा २००५ संपत असतानाच ३१ डीसेंबरला रात्री १२ वाजता 'एलिट व्हायरसने' संपुर्ण युरोपात आणी थोड्या प्रमाणात एशियात थैमान घातले. पुन्हा एकदा 'एलिट पर्वा'ला सुरुवात झाली होती....

रात्री फोनवर झालेल्या संभाषणानुसार 'रविंद्र सन्याल' असे एखाद्या गवय्याचे अथवा वादकाचे नाव वाटणारा माणूस मला 'एलिट एशिया'चा प्रतिनिधी म्हणुन भेटणार होता. मी सकाळपासून शफीला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करत होतो पण यश येत न्हवते. शेवटी अगदी आणीबाणी साठी म्हणुन शफीने मला दिलेला मोबाईल नंबर मी डायल केला. हा नंबर पेशावरच्या मध्यवर्ती भागात राहणार्‍या कोणा 'सज्जाद लक्कडवाला' ह्या गॅरेजवाल्याचा निघाला, त्यानी मला भारतातला एक नंबर देउन तिथे चौकशी करण्यासा सांगीतले. ह्या वेळी मिळालेला नंबर दिल्लीच्या साऊथ पार्क मधला निघाला, स्वत: शफीच्या बहिणीने तो उचलला. हि शफीची बहिण लहानपणीच त्याच्या मामाकडे दत्तक आलेली होती, तीच्याकडूनच मला शफी सध्या कुठल्याश्या चौकशीसाठी 'सि आय ए' च्या ताब्यात असल्याचे कळाले आणी माझ्या पाया खालची जमीनच हादरली.

शफीला अटक ? का ? कोणत्या गुन्ह्याखाली ? कसली चौकशी करतायत त्याच्याकडे ? माझ्या महितीप्रमाणे तरी शफी सध्या एक अत्यंत सभ्य असे नागरी जीवन जगत होता, मग हे असे अचानक घडले तरी काय ? अशा आणीबाणीच्या वेळी मी आता सल्ला कुणाचा घेऊ ? मुख्य म्हणजे शफीच्या अटकेशी माझा संबध तर जोडला जाणार नाही ना ??

प्रश्न प्रश्न प्रश्न... प्रश्नांचे एक मोठे भेंडोळे आणी थोडेसे भितीचे सावट मनावर घेउन मी ठरलेल्या ठिकाणी पोचलो. 'संन्याल बाबु' हार्डली ३५/३६ चा असेल, भेटताच क्षणी त्याच्या व्यक्तीमत्वाने मी भारावुन गेलो. अतिशय गोड आवाजातले हिंदी, अध्ये मध्ये इंग्रजी शब्दांची पेरणी आणी विशिष्ठ शब्दांवर जोर देण्याची पद्धत मला चांगलीच भुरळ पाडत होती. हवा-पाणी, शिक्षण अशी वळणे घेत घेत गाडी एकदाची एलिट ग्रुप पर्यंत पोचली. ह्यापुढचे संभाषण आम्ही भेटत असलेल्या हॉटेलच्या एका राखीव खोलीत करु असे संन्यालने सुचवले. मी लगेच होकार भरला.

२/२ पेग झाल्यानंतर संन्याल थोडासा खुलला, आता मी ही बर्‍यापैकी रिलॅक्स झालो होतो. संन्यालने एक मोठा घोट घेऊन बोलायला सुरुवात केली....

"एलिट ग्रुप बद्दल अनेक अफवा उठल्या आणी उठत राहतील. पण एलिट नक्की काय करतात हे कुणालाच माहित नाही. एलिटची कार्यपद्धती, एलिटसाठी काम करणारी माणसे हे जगासाठी एक गुढच आहे. कित्येकदा आपण एलिटसाठी काम करतोय, किंवा एलिटसाठी काम करुन चुकलोय हे देखिल कित्येकांना माहित नसते. यु आर लकी मि. पॅपीलॉन, तुम्हाला स्वत: एलिटने आमंत्रण दिले आहे."

मी आता बर्‍यापैकी सावरलो होतो. "एलिटला माझी का आणी कशासाठी गरज आहे ? आणी मीच का??"

"शफी" संन्यालने एकाच शब्दात हसून उत्तर दिले.

"शफीचा काय संबंध ?? आणी मुख्य म्हणजे तुम्हाला माझ्याकडून करवुन काय घ्यायचे आहे??" मी विचारले.

"वेल, मला सगळेच माहित असण्या येवढ्या मोठ्या पदावर मी नाही. पण नुकतेच एलिटला एक खुप मोठे आणी धाडसी काम मिळाले आहे, आणी त्यासाठी नविन भरतीची आवश्यकता आहे. भवतेक त्याचा आणी तुझा संबंध असु शकतो." संन्याल संथ स्वरात म्हणाला.

"काम रिस्की आहे ??" मी विचारले.

" यु आर गोईंग टू वर्क अगेंस्ट यु एस गव्हर्नमेंट" संन्याल खिदळला. "कदाचीत कामाची पुर्ण माहिती व्हायच्या आधी देखील मारला जाऊ शकशील."

"आणी मी नकार दिला तर??"

"पॅपीलॉन, तु मला आवडलास. तुला बघुन मला राहुन राहुन माझ्या लहान भावाची आठवण येत आहे म्हणुन सांगतोय, नकार द्यायचा मुर्खपणा करु नकोस ! आजवर मी एलिट ग्रुपच्या काही खाजगी कामांसाठी म्हणुन फक्त भारतात आलो आहे. ज्या ज्या वेळी मी भारतात आलो त्या त्या वेळी मी फक्त मिनिस्टर अथवा त्या पातळीवरच्या माणसांच्या भेटी घेणे आणी त्यांना हवे तसे वाकवणे हिच कामे केली आहेत. तुझ्या लक्षात येतय पॅपीलॉन ?? माझ्यासारखा माणूस एलिट जेंव्हा तुझ्याकडे पाठवतात तेंव्हा तुझे महत्व नक्कीच फार मोठे असणार आणी कुठल्याही परिस्थीतीत, आय रिपीट.. कुठल्याही परिस्थीतीत तु एलिट ग्रुपला हवा आहेस."

"पण माझ्यात येवढे काय आहे??" आणी शफीचा ह्या सगळ्याशी काय संबंध आहे?? मी वैतागुन विचारले.

"हि तुझी परवाची बोस्टनची तिकिटस. कॅथ्रीन नावाची मुलगी तुला एयरपोर्टला जॉइन होईल, पुढच्या सुचना ती देईलच." संन्याल जणु माझा प्रश्न न ऐकल्याच्या थाटात बोलला.

"मला जमणार नाही !!" मी ओरडलो.

"संध्याकाळी ७ ला फ्लाईट आहे, साधारण ६ पर्यंत विमानतळावर पोहोच" संन्याल.

"तुला ऐकायला येत नाही का? मला जमणार नाही !!"

"हरकत नाही, मग संध्याकाळी ८ ला येउन वडलांचे प्रेत नदी किनार्‍यावरुन घेउन जा मि. पॅपीलॉन"........

"यु बास्टर्ड...." मी चित्कारलो.

"आय टोल्ड यु... तु आम्हाला हवा आहेस ! कोणत्याही परिस्थीतीत."

दोनच दिवसात माझ्या विमानाने बोस्टनच्या दिशेने उड्डाण केले आणी मी एका नव्या आयुष्याच्या दिशेने......


(क्रमश:)

(कथा पुर्णतः काल्पनीक)


सोमवार, २२ मार्च, २०१०

कुंग फु पांडा

--

बरेच दिवस मित्रांनी "साल्या तु कुंग फु पांडा बघच !" असा घोषा लावला होता. काही दिवसांपुर्वी बिका आणी मकीच्या कृपेने हा अप्रतिम अ‍ॅनीमेशनपट पाहायाला मिळाला. साधी सरळ गोष्ट पण आयुष्याची छान छान सुत्रे शिकवुन जाणारी.

'पो' हा खरेतर पिस व्हॅली मध्ये राहणारा एक पांडा, पण तो आपल्या पालनकर्त्या वडलांबरोबर (गुज पक्षी) राहात असतो. पुढे जाउन पो ने आपले न्युडल्स शॉप समर्थपणे सांभाळावे हि त्याच्या वडिलांची अपेक्षा असते तर ह्याच्या अगदी उलट म्हणजे एक विख्यात कुंग फु मास्टर बनण्याचे पो चे स्वप्न असते. गंमत म्हणजे तो झोपेत देखील तो एक कुंग फु मास्टर बनल्याची स्वप्ने पाहात असतो.



पिस व्हॅलीचे संरक्षक आणी मास्टर शिफुचे पाच शिष्य 'मंकी, टायग्रेस, मांटीस, व्हायपर आणी क्रेन हे पो चे आदर्श असतात. त्यांच्यासारखेच मास्टर बनायचे हा पो चा ध्यास असतो.

.

टोर्टोइज मास्टर उग्वे ह्याला कधीकाळी मास्टर शिफुचा शिष्य असलेला पण आपल्या गुंड आणी विनाशक प्रवृत्तीमुळे सध्या बंदीवासात असलेला लिओपार्ड मास्टर 'ताय लंग' हा कधितरी स्वत:ची सुटका करुन घेउन पुन्हा एकदा पिस व्हॅलीची शांतता भंग करणार ह्याची खात्री असते, त्यामुळे त्याला रोकण्यासाठी तो ड्रॅगन वॉरीअर' ह्या सर्वोच्च मास्टरची निवड करण्याचे ठरवतो. 'फ्युरियस फाईव्ह' पैकी कोणीतरी एकजण ह्या पदाचा मानकरी ठरणार हे निश्चीतच असते. अशावेळी हि स्पर्धा आणी त्यात लढणार्‍या आपल्या आदर्शांना पाहण्याच्या प्रयत्नात पो स्वत: त्या आखाड्यात येउन पडतो. गंमतीचा भाग म्हणजे अचानक आकाशातुन पडलेल्या ह्या पो ला टोर्टोइज मास्टर नवा 'ड्रॅगन वॉरिअर' म्हणून घोषीत देखिल करुन टाकतो.

.

आता मात्र पो ची चांगलीच गंमत उडते. एका बाजुला खडतर प्रशिक्षण आणी दुसर्‍या बाजुला 'फ्युरिअस फाइव्ह' समोर आपण काहिच नसल्याची सतत होणारी जाणीव पो ला हताश करुन टाकते. एके रात्री टॉर्टोइज मास्टरची चार वाक्यातली शिकवणी पो ला बरेच मानसिक बळ देउन जाते. त्याचवेळी बातमी येते ती 'ताय लंग' तुरुंगातुन पळाल्याची आणी त्या बरोबरीने टोर्टोइज मास्टरनी' आपला अवतार संपवल्याची.

.

'ताय लंग' ला रोकण्यासाठी 'फ्युरीअस फाइव्ह' त्याच्यावर एकत्र चाल करुन जातात, मात्र ह्या सर्वांना निष्प्रभ ठरवत 'ताय लंग' पिस व्हॅली मध्ये येउन पोचतो. पो त्याच्या समोर धैर्याने उभा राहु शकतो ? मास्टर शिफुची शिकवणी पो ला खराखुरा 'ड्रॅगन वॉरियर' बनवु शकलेली असते? ज्या पवित्र ड्रॅगन स्क्रॉलसाठी हा लढा चालु असतो, त्यात नक्की असते काय ? पो आपल्या सर्वात मोठ्या कमकुवतापणाचे सर्वात मोठ्या ताकादित रुपांतर करण्यात यशस्वी होतो का? ह्या सगळ्याची उत्तरे प्रत्यक्ष हा चित्रपट पाहुन मिळवण्यातच जास्ती आनंद आहे.

.

'ताय लंग'ने स्वत:ची करुन घेतलेली सुटका, 'फ्युरीअस फाइव्ह' बरोबर त्याची झालेली लढत अथवा शिफुने अगदी सोप्या पद्धतीने पो ला दिलेले ट्रेनींग हि सर्व दृष्ये खरोखरच दाद देण्याजोगी. २००८ साली निर्माण झालेला ह चित्रपट तंत्रज्ञान आणी सफाईत कुठेही कमी पडलेला नाही. ह्या चित्रपटाचे संगीत देखील चित्रपटाच्या वातावरणाला अगदी साजेसे. पो आणी त्याच्या 'फ्युरीअस फाइव्ह' मित्रांच्या ह्या पिस व्हॅलीला भेट देणे प्रत्येक चित्रपट रसिकासाठी अत्यंत आवश्यकच म्हणाना.



गुरुवार, १८ मार्च, २०१०

सव्यसाचि (भाग-३)

K|nG786N :- हमारे दुनियामे आनेसे पहेले नाम / देश और धर्म दोनो छोडना पडता है ये बात १०० बार पहले अपने दिमाग मे टाईप करलो.. तो चलो मेरे चेले कल मिलेंगे और इसी बॅंक का सर्व्हर हॅक करके तुम्हारी पढाई-लिखाई चालु करेंगे

मी :- व्हॉट ????

मला तर रात्रभर झोपच लागली नाही. आता काय होईल ते होईल पण मागे हटायचे नाही असे ठरवुन दुपारी याहुला लॉग इन झालो. पण त्या दिवशी शफी साहेब आलेच नाही. माझी कोणी गंमत तर नसेल ना केली ? राहुन राहुन मला हाच प्रश्न सतावत होता. दुसर्‍या दिवशी कॉलेजला टांग मारुन आम्ही आमचा मुक्काम याहु रुम मध्येच हलवला. साधाराण दुपारी १ च्या सुमाराला शफी अवतरला.

"क्यु बे इंडियन कैसा है ? चल ये फाईल एक्सेप्ट कर और ठिकसे पढ इसको" आल्या आल्या साहेबांनी हुकुम केला.

साला फाईल एक्सेप्ट करावी का नको ? नक्की कसली फाईल असेल ? माझे विचारचक्र चालु झाले...

"अबे वर्ड फाईल हि है वो, दोस्त को दगा देने की रीत नही है हमारी."

झाले क्षणात माझ्याकडून एक्सेप्ट वर क्लिक केले गेले. डाउनलोड झाले ली फाईल मी उघडून वाचायला सुरुवात केली. साला हा शफी खरच भुत आहे की काय ?? मला चक्कर यायची फक्त बाकी होती....

फाईल मध्ये महाराष्ट्र माझा बॅंकेच्या सर्व्हरची इत्यंभुत माहिती नोंदवलेली होती. जणु बॅंकेची वेबसाईट ह्या शफीने बनवली असल्यागत सगळ्या नोंदी त्यात लिहिलेल्या होत्या. साला हे म्हणजे एकाने हरणाला पकडून ठेवल्यावर दुसर्‍याने त्याला बाण मारुन शिकार करण्यायेवढे सोपे काम होते आता.

पण धनुष्य बाण आणी नेम धरुन चालवायची पद्धत अजुन शिकायची बाकी होती ना !! पुन्हा आम्ही मसिहा शफी ह्यांच्या कृपेसाठी धाव घेतली. फाईल संपुर्ण वाचल्याचे सांगुन आता पुढील विद्या प्रदान करण्याची विनंती केली.

"साले तुम चोटीवाले झटसे सब सिख जाते हो अच्छा डि-डॉस के बारे मे पता है ? कभी किया है ??" शफी साहेब.

" IRC सर्व्हर्स पे किया था. लास्ट टाईम ब्रॉड-वे और थायलंड के ६ सर्व्हर्स क्रॅश हो गये थे उसमे मैने व्हिक्टर का साथ दिया था. मेरे बॉट नेट से मैने थायलंड के २ सर्व्हर्स क्रॅश किये थे" माझी स्व-स्तुती.

"चुत्या है वो व्हिक्टर ! आजकल अंदर है क्रेडीट कार्ड हॅकींग के जुर्म मे" शफी कडून माझ्या ज्ञानात भर आणी बरोबरीने व्हिक्टर (आणी माझे) मुल्यमापन.

"ये सब नही पता. मैने कभी क्रेडीट कार्ड के लोचे नहि किये." मी.

"कभी करना भी मत ! साला खाया पिया कुछ नाही... अच्छा तेरा बॉट नेट चालु है ना अभी ? मेरे आय आर सी चॅनेल पे जरा फ्लड करके बता" शफी म्हणाला.

काही वेळातच मी त्याला मस्त फ्लड करुन दाखवला, त्याच बरोबरीने त्याला माझे बॉटस आणी प्रॉक्सीज देखील दाखवल्या.

"एकदम बढीया. साले तु हिरा है, बस तेरे को थोडा चमकाना मांगता है !"

आणी पुढे अनेक दिवस शफी साहेब आम्हाला चमकावत होते. बाय द वे त्या दिवशी महाराष्ट्र माझा बॅंकेच्या सर्व्हरची जी दारुण अवस्था झाली त्याबद्दल खरे तर सर्व परिक्षार्थींची माफी मागतो बर का. जरा जोरातच धक्का मारला गेला माझ्याकडून, पुर्ण ४२ तास झोपला बघा सर्व्हर.

असो...

हळुहळु शफीच्या तालमीत मी चांगलाच तयार झालो होतो. त्याचा माझ्यावर येवढा का जीव होता मला आजही माहित नाही, पण आज मी शफीच्या देखील चार पावले पुढे आहे ते त्याच्याचमुळे.

सर्व्हर्स आणी वेबसाईटसचे गळे दाबायला शिकल्यानंतर आता पुढला टप्पा होता फिशींगचा . ह्या विषयात मात्र मी अगदी घोड्यासारखा जोरदार धावलो हे स्वस्तुतीचे आरोप सहन करुनही मला सांगीतलेच पाहिजे. फिशींग शिकायला सुरुवात केल्यापासुन बरोब्बर पाचव्या दिवशी मी ई-बे चे फिशींग पेज बनवुन शफीच्या खात्यात १२०० डॉलर्स आणी ४ क्रेडीट-कार्डचे नंबर गोळा करुन दाखवले. फिशींगमध्ये मी मास्टर असलो तरी माझ्या दृष्टीने ती एक भुरटी चोरीच होती, ज्यात मला कधिच रस वाटला नाही. पण ह्या फिशींग मधल्या प्रभुत्वानेच माझ्यासाठी एकदिवस अलीबाबाच्या गुहेचे दार उघडले.

ज्या दिवसाची प्रत्येक छोटा मोठा हॅकर स्वप्न बघत असतो आणी ती फक्त स्वप्नच राहणार हे मान्य करत असतो तो दिवस माझ्या आयुष्यात प्रत्यक्षात उजाडला.

ती शनिवारची रात्र मी कशी विसरणार ; साधारण रात्री ११ च्या सुमाराला मला याहु फोनवरुन कॉल आला. कॉलर अन-नोन होता पण आता त्याची सवय झाली असल्याने मी सहजपणे कॉल रिसीव्ह केला.

"पॅपीलॉन ??" पलिकडून विचारणा झाली.

"येस" मी सहजपणे उत्तर दिले.

"वेलकम टू एलीट क्लब...." पलिकडून उदगारले गेलेले हे चारच शब्द माझ्या हाता पायाला थरथर सुटण्यासाठी पुरेसे होते.....

(क्रमश:)

(कथा पुर्णतः काल्पनिक)

सव्यसाचि (भाग-२)

मी अवाकच झालो...

काय होतय हे ? माझ्या संगणकात कोणीतरी शिरले होते हे नक्की ! मी ताबडतोब नेट डिस्कनेक्ट केले. साला इन बिल्ट फायरवॉल / झोन-अर्लाम सारख्या माझ्या संरक्षकांना गुंगारा देउन हे आत शिरलय तरी कोण ? आणी कसे ?

काही वेळाने मी पुन्हा इंटरनेटशी कनेक्ट झालो, ह्यावेळी वेगळ्याच आयडीने याहु रुम मध्ये शिरण्याची मी खबरदारी घेतली होती. मॉडेम रिसेट केल्यामुळे आयपी देखील बदललेला असणारच होता. काही वेळ तिथे बागडलो आणी पुन्हा एकदा आमचे नोटपॅड ओपन झाले... "Welcome BACK KID". K|nG

च्यायला अरे हा कोण आहे कोण हा किंग ?? साला माणुस आहे का भुत ? मी पुन्हा एकदा नेट डिसकनेक्ट करुन स्वत:ची सुटका करुन घेतली. डोक्याला हात लावुन सुन्न अवस्थेत मी नोटपॅड वरचा मजकुर पुन्हा पुन्हा बघत होतो. अचानक काहितरी क्लिक झाले, काहितरी वेगळे विचित्र जाणवले. त्या नावात काहितरी वेगळे, काहितरी खास होते. मी मेंदूला ताण द्यायला सुरुवात केली...

युरेका युरेका ! मी पुन्हा एकदा K|nG चे स्पेलींग तपासुन पाहिले, "K|nG".. शंकाच नाही, हा तोच होता.. माझ्या मोजक्याच हॅकर आयडॉल्स पैकी एक असलेला, चीनच्या संरक्षण दलाच्या वेबसाईटला २ तास हॅक करुन ठेवणारा आणी भारताच्या खास खास वेबसाईटसना अध्ये मध्ये पाणी पाजणारा "शफी द किंग" !!

हि संधी गमावुन चालणारच न्हवती. 'किड' म्हणुन का होईना पण त्यानी माझ्याशी संवाद साधला होता, त्याला माझ्यात एखादा स्पार्क दिसला असेल ?? मी ताबडतोब याहु रुम मध्ये धाव घेतली. "Hay K|nG" येवढे दोनच शब्द भल्या मोठ्या लाल अक्षरात मेन्स वर टाकुन दिले. काही मिनिटातच माझी प्रायव्हेट चाट विंडो ओपन झाली. त्या दिवशी चाट विंडोच नाही तर माझ्या आयुष्याची नवि दिशाच ओपन झाली.

K|nG786N :- क्यु चिल्ला रहे हो बच्चा ??

मी :- आप शफी है ना ? शफी द किंग ??

K|nG786N :-

मी :- प्लीज बाताईये ना. आय एम ग्रेट फॅन ऑफ युवर्स सर !

K|nG786N :- हा हा अभि भी ? अब तो मै बुढ्ढा हो गया ! आय एम आऊट ऑफ एव्हरीथींग

मी :- बट स्टिल यु आर लेजंड

K|nG786N :- हा हा हा ! खुदा की मेहरबानी.

मी :- सर मुझे बहोत कुछ सिखना है आपसे.

K|nG786N :- क्युं ? पाकिस्तान इंटरनेट को बरबाद करना है ?

मी :- नही नही, ऐसा कुछ नही बस खुदको किसी मुकाम पे देखना चाहता हुं.

K|nG786N :- बाते अच्छी कर लेतो हो

मी :- सर, सिखायेंगे ना ?

K|nG786N :- लेकीन मै तो आपका जानता भी नही, ऐसे कैसे गले पडने दू ?

K|nG786N :- सर 'अपने दुनिया' का मेरा नाम पॅपीलॉन है.

K|nG786N :- ओ हो हो साला ! वो याहु बॉट वाला तु है क्या ?

मी :- जी सर !

K|nG786N :- हा हा मै खालिद को बोला भी था के ये लडका पक्का हिंदुस्तानी होगा. हमारा लडका होता तो और सफाईसे याहु वालोंकी निंद उडा देता.

(खरतर हि सरळ सरळ माझी चेष्टा होती, पण ती आत कुठेतरी मला देखील मान्य होती. चिकाटी सोडून उपयोग न्हवता)

मी :- वही सफाई तो सिखनी है सर आपसे

K|nG786N :- ये अभी मेन्स पे बॅंक की क्या बाते हो रही थी ??

मी :- वो सर महाराष्ट्र माझा बॅंक के एग्झाम्स है अगले हप्ते से. उसके ऑनलाईन फॉर्म की बाते हो रही थी.

K|nG786N :- महाराष्ट्र बोले तो तुम्हारा स्टेट क्या ?

मी :- जी सर जी.

K|nG786N :- हमारे दुनियामे आनेसे पहेले नाम / देश और धर्म दोनो छोडना पडता है ये बात १०० बार पहले अपने दिमाग मे टाईप करलो.. तो चलो मेरे चेले कल मिलेंगे और इसी बॅंक का सर्व्हर हॅक करके तुम्हारी पढाई-लिखाई चालु करेंगे

मी :- व्हॉट ????

(क्रमशः)

(कथा पुर्णतः काल्पनिक)

शुक्रवार, १२ मार्च, २०१०

सव्यसाचि

डॉन का इंतजार तो ११ मुल्को की पोलिस कर रही है, पर डॉन को पकडना मुष्कील हि नही नामुंकीन है !!

पडद्यावर शाहरुख खान घसा ताणुन बोलत होता आणी मी इकडे खदखदुन हसत होतो. च्यायला हसु नको तर काय करु ? निदान ११ मुल्कोकी पुलिसला आपण शाहरुखच्या मागे आहोत हे तरी माहिती होते .... इथे सी आय ए पासुन एफ बी आय आणी मोसाद पर्यंतच्या माणसांना 'लिट (l33t)' नक्की कोण आहे ह्याचा थांगपत्ता देखील न लागु देणारा मी, मस्तपैक्की शेरिफ रॉजर बरोबर शाहरुखच्या डब चित्रपटाचा अनंद घेत होतो.

येस... आय एम l33t. महाराष्ट्र बॅंकेच्या सर्वर हॅकींग पासून सुरुवात करुन फेडरल बॅंकेच्या सर्वर पर्यंत पोचलेला. एफ बि आय च्या स्पाय कॅमेर्‍यांना १८० डिग्रीमध्ये वळवुन बंद पाडणारा, नासाच्या लॅब मध्ये इमर्जन्सी सायरन वाजवणारा आणी कधीही केंव्हाही कुठेही बसुन कोणाच्या खात्यातले पैसे जादुने गायब करणारा सध्याचा बहुचर्चित हॅकर आणी डिस्ट्रॉयर. पापांची यादी करावी तेवढी कमी, लुटमारीचा हिशोब लावावा तेवढा थोडा. खरच गंमत वाटते सगळ्याची, अगदी "कोण होतास तु काय झालास तु.." अशीच कहाणी आहे माझी. एका साध्या मध्यमवर्गीय घरात माझा जन्म झाला. घरात आई-वडील दोघेही सुशिक्षीत, त्यांच्या काळत त्यांना जे जे मिळु शकले नाही ते ते मला द्यायचा त्यांनी प्रामाणीकपणे प्रयत्न केला. पुस्तक, वही, सायकल ह्या सारख्या गोष्टींसाठी कधिच हट्ट करावा लागला नाही, न मागताच (पण योग्य वेळी) सर्व काही मिळत गेले.

साधारण अकरावीला असतानाच मला संगणकाने झपाटुन टाकले. २ दिवसातुन एकदा तरी सायबर कॅफेत गेल्याशिवाय जीवाला चैन पडेनासे झाले. पॉर्न साईट्स आणी गेमस साठी कॅफेच्या वार्‍या करणारी पावले बारावीच्या मध्यापर्यंत इ-मेल, ट्युटोरीयल्स आणी कोडींग साठी कॅफे वार्‍या करायला लागली. बारावीच्या सुट्टीमध्ये जगात अनेक उपयोगी सॉफ्टवेअर्स उपल्ब्ध आहेत पण ती सर्व विकत घ्यावी लागतात ह्या माहितीची भर माझ्या ज्ञानात पडली. बारावीचा निकाल लागेपर्यंत हि विकतची सॉफ्टवेअर्स थोडे परिश्रम घेउन फुकटची बनवता येतात ह्या अमुल्य ज्ञानाची देखील भर पडली. बरोब्बर, मी सॉफ्टवेअर क्रॅकिंगबद्दलच बोलत आहे.

बारावीचा निकाल लागला आणी आमच्या इच्छेनुसार तिर्थरुपांनी इंजिनिअरींगला प्रवेश घ्यायचे परवानगी दिली. 'आंधळा मागतो एक' अशी अगदी अवस्था झाली माझी. अलिबाबाची गुहा आता ऑफिशियली माझ्यासाठी उघडी झाली होती. दिवसाचे १२/१२ तास आता मी अभ्यासाच्या नावाखाली संगणकावर घालवु लागलो. जावा, सी, सी प्लस प्लस च्या जोडीला हॅकींग , स्पॅमींग आणी कोडींगनी मला खुळावुन सोडले.

साधारण इंजिनिअरींगच्या पहिल्या वर्षाच्या मध्यापर्यंत प्रिन्स, अल्लादीन सारख्या गेमसचे कोडींग बदलणे, न खेळताच लेव्हल अप करणे आणी थोड्या वाढीव कष्टानी मेल फ्लड करण्यापर्यंत माझी प्रगती झाली. ह्याच काळात माझी IRC CHAT शी ओळख झाली आणी माझ्यासाठी डी-डॉस, बॉट नेट, सर्व्हर पिंगींग, प्रॉक्सी, प्रॉक्सी-फ्लड सारखी दालने खुली झाली. काय करु आणी काय नको असे होउन गेले होते. टप्प्याटप्प्यानी ह्या एकेका गोष्टीवर मी माझे प्रभुत्व मिळवायला सुरुवात केली. काम येवढे सोपे न्हवते पण मी जिद्दीला पेटलो होतो. हि जिद्द मी वाईट मार्गासाठी खर्च केली असे मला आजही वाटत नाही.

इंजिनिअरींगचे दुसरे वर्ष संपेतो मी एक फ्लडर म्हणुन बरीच प्रगती केली होती. चांगले चांगले चाट सर्वर झोपवण्यापर्यंत आता मजल जाउ लागली होती. ह्याच काळात मी माझा स्वत:चा पहिला याहु चाट बॉट बनवला. काही काळ ह्या माझ्या बॉटनी याहु रुम्स मध्ये चांगलाच हाहाकार माजवला होता. यथावकाश ह्या बॉटला बॅनचे तोंड पहावे लागले. पण ह्या सगळ्या काळात माझ्या बॉटला मिळालेली प्रसिद्धी, बॉटच्या निर्मात्या विषयी उठलेल्या अफवा माझी मस्त करमणुक करुन गेल्या. ह्या सगळ्याचा परिणाम म्हणजे मी आता वेबसाइट क्रॅश करणे, इ-मेल हॅकींग ह्याकडे आकृष्ट झालो.

१ एप्रिल २००३, हा दिवस मला आजही चांगला आठवतो. ह्याच दिवसानी माझ्या आयुष्याला एक वेगळेच वळण लावले. याहु रुम मध्ये 'एप्रिल व्हायरस' स्प्रेड करत असतानाच माझ्या संगणकावरचे नोटपॅड आपोआप ओपन झाले, आणी छान पैकी लिहुन आले "Stop Playing ARound KID". KING.

(क्रमशः)

(कथा पुर्णतः काल्पनिक)