शनिवार, २४ ऑक्टोबर, २००९

अदभुत (अंतीम)

कारखानीसांनी दरवाजा उघडला. समर्थांचे नामस्मरण करुन मी आत शिरलो. आत शिरल्या शिरल्याच आपण एखाद्या वेगळ्या जगात प्रवेश केला आहे हे जाणवले. छातीवर कसलेतरी ओझे वाटायला लागले, थोडेसे गुदमरल्या सारखेही वाटत होते. एक विचित्र काहीतरी सडल्यासारखा वास हॉल मध्ये पसरला आणी तयच क्षणी जयराजने हॉल मध्ये प्रवेश केला.

माझी त्याची नजरानजर होताच तो क्षणभर चरकलाच पण मग ह्या वेळेची जणु तो वाटच बघत असल्या सारखा निर्लज्ज हसला. आम्ही दोघेही एकमेकांच्या नजरेत रोखुन पाहु लागलो. माझी जयराजच्या आत जे काही होते त्याची ओळख पटवण्यासाठी धडपड सुरु झाली, त्याची सुद्धा भवतेक तीच धडपड चालु असावी. एका सावध क्षणी मला त्याची ओळख पटली, माझा शत्रु मी ओळखला.. तो कालसर्प होता. तोच तो खांडव वनात मारला गेलेला आणी मग पुन्हा पुन्हा या सृष्टीत प्रवेशासाठी आतुर झालेला.

कालसर्प हा खरेतर नागवंशी. इच्छाधारी सर्प आणी असुर कन्या ह्यांच्या मिलनातुन जन्माला आलेला एक घातकी जीव. आईकडुन आसुरी शक्ती आणी बापाकडुन हवे तेंव्हा सर्पात रुपांतर व्हायची शक्ती प्राप्त झालेला कालसर्प म्हणजे एक दुष्ट शक्तींचा एकत्र झालेला समुहच होता.

जस जसा तो मोठा होउ लागला तस तशा त्याच्या विध्वंसक कारवायाही वाढु लागल्या. अशा माणसाची योग्य ती किंमत ओळखुन जरासंधानी त्याला आपल्या गोटात सामील करुन घेतला. मथुरेवर स्वारीच्या वेळी ह्या कालसर्पाचा पुरेपुर उपयोग करुन घ्यायची त्याची इच्छा होती.

पण घडले भलतेच बलरामाकडुन दारुण पराभव पत्करुन कालसर्पाने पलायन केले. जखमी झालेल्या कालसर्पाने एका गुहेचा आश्रय घेतला. काही कालावधी नंतर मांस, मद्य, मैथुनाच्या आहारी गेलेल्या कालसर्पाने ह्या गोष्टींसाठी आजुबाजुच्या वन्य लोकांना त्रास देण्यास सुरुवात केली. शेवटी त्याचा उन्मत्तपणा येव्हडा वाढला की वनातुन प्रवास करणार्‍या जमदग्नी ऋषींना अडवुन त्यांच्यावर शस्त्र उगारण्यासही त्याने कमी केले नाही. संतापलेल्या जमदग्नींनी तु कायमचा अंध होउन सर्प रुपातच खांडववनात जाउन पडशील असा त्याला शाप दिला. जमदग्नींच्या शापाने ग्रस्त कालसर्प खांडव वनात जाउन पडला. तिथे त्याने कलीची आराधना सुरु केली. अमरत्व आणी जिवनभर आकंठ मद्य, मास, मैथुनाचा उपभोग हेच त्याचे ध्येय उरले.

अर्जुनाने खांडव वनाचे दहन केल्यावर कालसर्प आपले शरीर मरताना कलीला अर्पुन गेला. त्याच्या भक्तिने प्रसन्न होउन कलीने त्याला त्याच्या मालकीच्या युगात अनेक वरदान व युगाच्या अंतापर्यंत चिरतारुण्य बहाल केले. पण त्याच्या दुर्दैवाने पृथ्वी बिंदुच्या कुठल्याच सींमावरुन त्याला आत प्रवेश मिळत न्हवता. कित्येकदा त्याने आपल्या असुरी , घातकी शक्तीचा वापर करुन आत प्रवेशाचा प्रयत्न केला अथवा प्रवेश केला पण प्रत्येकवेळी तो दंडीत होउन कक्षेबाहेर फेकला गेला होता. शेवटी त्याच्या सारख्या दुरात्म्यांना ह्या जगात प्रवेश करण्यापासुन रोकणे आणी कलीला अजुन ताकद वाढवण्यापासुन थांबवणे हेच तर आमचे जिवितकार्य होते.

"बरे झाले आलास. मी उद्या कोकणात जावे म्हणतोय, येतोस बरोबर??" जयराजनी मला अचानक प्रश्न केला.

"मी आज रात्री कोल्हापुरला निघणार आहे. उद्या संध्याकाळि मी तुला तिथेच गाठतो. खुप महिन्यांच्या गप्पा पुर्‍न करुयात." मी हसत हसत म्हणालो.

जयराजच्या डोळ्यात क्षणभर खुनशी भाव चमकले आणी नाहिसे झाले. आश्चर्यचकीत कारखानीस मला सोडायला खालपर्यंत आले.

"तुम्ही दोघे खरच तिथे भेटणार आहात ?? ह्या सगळ्यात जयराजच्या जीवाला तर काही धोका नाही ना होणार ?" कारखानीसांनी काळजीने विचारले.

"बिलकुल चिंता करु नका, तुमचा जयराज पुर्णपणे बरा होउन लवकरच तुमच्या ताब्यात देतो." मी त्यांना आश्वासीत करत म्हणालो.


आता मला लवकरात लवकर कोकण गाठुन कालसर्पाच्या प्रवेशाचे दार शोधणे आवश्यक होते. ते दार बंद करुन इतर घातक शक्तींना आत येण्यापासुन रोकणे महत्वाचे होते. मी तातडीने रात्रीतच कोकणाकडे प्रयाण केले. पहाटे पहाटे मी जयराजच्या आत्याच्या वाडीत शिरलो. इथेच कुठेतरी आसपास तो प्रवेशबिंदु असणार होता. मी नामस्मरण करत अलख जागवला आणी तिथल्याच एका खडकावर समाधी लावली.

काही वेळातच मला तो प्रवेशबिंदु सापडला. प्रभु रामचंद्रांचा जयजयकार करत मी संरक्षक सुत्राने तो मार्ग बंदीस्त केला. एक काम तर झाले होते, खर्‍या कामाला मात्र आता रात्रीच सुरुवात होणार हे निश्चीत होते. सुर्यवंदना करुन मी आधी समुद्राय यतेच्छ डुंबुन घेतले. पोटातल्या कावळ्यांनी पुन्हा एकदा मला मर्त्य जिवनात ओढुन आणले.

पोटपुजा करुन आधी एक मंदीर शोधुन काढले. प्रभु कृपेने ते श्रीरामचंद्रांचेच मंदीर निघाले. आत भगवान परशुरामांचीही एक सुंदर मुर्ती प्रतिष्ठीत होती. पुजार्‍यांची परवानगी घेउन मी मंदीरातच ध्यान लावले.

अधिकाराचा वापर करण्याआधी जगनियंत्रकाची परवानगी घेणे मला महत्वाचे वाटत होते. माझा रामनामाचा घोष इच्छीत स्थळी पोचला असावा.

"अपरांतक्षा तुझ्या हाकेमागचे कारण मी जाणुन आहे. वत्सा ज्या कार्यासाठी तुला नेमले आहे ते तु पुर्ण करशील ह्याबद्दल शंकाच नाही. जा तुझ्या आज्ञेशीवाय ह्या पृथ्वीकक्षेत प्रवेश करणार्‍या उद्दाम कालसर्पास ठेचुन काढ. यशस्वी भव"

"प्रभु परंतु अनेकदा वेगवेगळ्या मितित भिरकाटुन दिलेला हा कालसर्प पुन्हा पुन्हा प्रयत्न करुन त्या मितितुन सुटका करुन घेत पृथ्वी प्रवेशाचे प्रयत्न करतच असतो. हे कुठवर चालणार प्रभो?"

"अपरांतक्षा अरे मिळालेले ज्ञान विसरलास ? शक्तीचा नाश संभव नाही. तसा प्रयत्नही करु नकोस. निसर्गनियमा विरुद्ध जाण्याचा अधिकार कोणालाच नाही. अगदी मलाही नाही ! जा तुझे नेमुन दिलेले कार्य निसंकोचपणे पुर्ण कर. यशस्वी भव !"

आज कित्येक वर्षांनंतर मी हा पवित्र आवाज ऐकला होता. माझ्या चित्तवृती एकदम प्रफुल्लीत झाल्या होत्या. मंदीरातही एक प्रकारचा पवित्र गंध पसरुन राहिला होता.

"जय शिराम" मी नामघोष केला. ह्यावेळी पुन्हा एकदा माल माझ्या बरोबरीने अनेक आवाज हा घोष करीत असल्याचा अनुभव आला. कानात खडावांचा ध्वनी उमटला आणी मी अत्यंत आदराने हात जोडत डोळे उघडले.

सुर्यदेव अस्ताला निघालेच होते. मी समुद्राकडे म्हणजेच त्या प्रवेश बिंदुकडे प्रयाण केले. तो इथेच भेटणार होता.. कालसर्प. त्यानी इथुन प्रवेश तर मिळवला होता पण ह्या बिंदुच्या विशीष्ठ परिघाबाहेर त्याच्या शक्ती क्षीण होत्या. त्याला संघर्षासाठी इथेच यावे लागणार होते हे मी जाणुन होतो. त्याचवेळी अचानक...

अचानक समोरुन कोणीतरी येताना दिसले. चंद्राच्या प्रकाशात व्यक्ती दुरुन तरी ओळखीची वाटत होती. ते नाना होते, होय नक्कीच. नाना इथे ? ह्यावेळी ? मी हा विचार करत असतानाच मी सरळ सरळ फेकलो गेलो आणी लांब रेतीत जाउन पडलो.

"पृथ्वीच्या रक्षकांचा प्रमुख अपरांतक्ष असा माती खात का पडलाय ?" नाना म्हणाले.

मी हसत हसत कपडे झटकत उभा राहिलो.

"अरे किती बालीश चाळे करशील रे कालसर्पा ?" मी फसीन , घाबरीन वगैरे गैरसमज तर करुन घेतला नाहियेसना ?" मी प्रत्युत्तर देत म्हणालो.

थोड्याशा सावध मुद्रेत असलेला नानांच्या रुपातील कालसर्प आता मुळ रुपात प्रकट झाला.

"ओह्ह ! ओळखलेस तर मला. हरकत नाही, मरण्या आधी कोणाकडुन मरणार आहे हे तर तुला कळले." कालसर्प दहाडला.

"कालसर्पा अजुनही वेळ गेली नाहिये. त्या सर्व शक्तीमान जगनियंत्याला शरण ये. मी तुला शेवटची संधी देत आहे."

"मुर्ख द्वारपाला ! ह्या युगाचा स्वामी माझा मालक 'कली' आहे. प्रचंड शक्तीचा स्वामी ! तुझ्या ह्या वल्गना बंद कर आणी तुच माझ्या स्वामी कलीला शरण ये. सुखात लोळशील." कलसर्प उदगारला.

दुसर्‍याच क्षणी मी प्रभुचे नाव घेत कालसर्पावर प्रहार केला. वादविवादाचा आता उपयोग न्हवता. शासन हाच आता अंतीम उपाय होता.

"बंद कर ह्या पुरातन शक्तीचे प्रदर्शन. असल्या वारांना पुरुन उरीन मी आता." कालसर्पाने दर्पोक्ती केली.

दुसर्‍याच क्षणी माझ्या डोळ्यापुढे अंधारी आली. कालसर्प मला एका वेगळ्याच मितीत ओढु पाहात होता, ज्याचे संपुर्ण स्वामीत्व त्याच्याकडे होते. तिथला अणु रेणु त्याच्या हुकुमाखाली होता. हे टाळायला हवे होते, त्या मितीत कालसर्प मला निश्चीतच जड गेला असता.

रामनामाचा जप करत मी बंधनपाश फेकुन कालसर्पाला माझ्यासह पुन्हा एकदा माझ्या कक्षेत ओढुन घेतले. संतापलेल्या काल्सर्पाने आता मात्र निर्णायक घावाची तयरी केली असावी. काही क्षण डोळे मिटुन तो काही मंत्राक्षरे पुटपुटला... दुसर्‍याच क्षणी आजुबाजुला काळ्या ढगांची गर्दी दाटली, काही क्षणातच कालसर्पाच्या हातात 'कालदंड' प्रकट झाला.

आता मात्र मी हतबद्ध झालो. कालसर्पाने हा अघोरी दंड कसा आणी कधी प्राप्त केला हेच मला कळेना. यमधर्माकडुन कठोर तपश्चर्या करुन कलीने हा प्राप्त केला होता. आणी आता तो त्याच्या निष्ठावंताच्या हातात होता.

कालदंडाचा पहिलाच प्रहार माझे सुरक्षा कवच भेदुन गेला. मी पुर्णपणे असुरक्षीत झालो... जीवनाची अखेर मला समोर दिसु लागली. खरेतर मृत्युपेक्षाही जास्ती वाईट आपण आपले कार्य पुर्ण करु शकलो नाही ह्याचे वाटत होते. शेवटचा प्रयत्न म्हणुन मी कठोर साधनेच्या वेळी प्रभु रामचंद्राकडुन मिळालेली 'तेजस्वीनी शक्ती' जागृत करायचा प्रयत्न करु लागलो... आणी त्याचवेळी माझ्यावर कालदंडाचा दुसरा आघात झाला.

हा आघात माझी मंत्रशक्ती अर्ध्याने कमी करुन गेला. आता तर मी येव्हडा दुर्बळ झालो की मला शक्तीचे जागरण करणेही अशक्य झाले.

"रामराया धाव रे प्रभु.... " मी मनातल्या मनात आकांत केला. त्याचवेळी तिसर्‍या आणी अंतीम वारासाठी कालदंड माझ्यावर झेपावला.

"जय श्रिराम" मी शेवटचे नाम:स्मरण केले. ह्यावेळी मला पुन्हा एकदा तोच अनुभव आला, माझ्या बरोबरीने अनेक आवाज आसमंतात घुमले. मात्र ह्यावेळची जाणीव अधीक ठळक होती. आणी आश्चर्य म्हणजे माझ्यावर झेपावलेला कालदंड एखाद्या संरक्षक कवचाला धडकल्यासारखा परत गेला होता. मी मान वळवुन मागे बघितले आणी आश्चर्याने पाहातच राहिलो. मागे 'ते उभे होते....

होय 'ते सर्व' आले होते. माझ्या रक्षणासाठी ह्या धरतीच्या रक्षणसाठी. माझे सखे सोबती .. ह्या पृथ्वीच्या प्रत्येक छेदन बिंदुचे रक्षक. त्यात एक नानाही होते.

"वाट कसली पाहतोयस अपरांतक्षा ? दंडीत कर ह्या उद्दाम कालसर्पास. ह्यावेळी त्याला अशी शिक्षा दे की तो पुन्हा असे धाडस करणार नाही." नाना गरजले.

ह्या पवित्र आत्म्यांच्या नुसत्या उपस्थीतीनेच माझे बळ चौपट वाढले होते. मी 'तेजस्वीनी शक्तीचे' आवाहन केले. काही क्षणातच अत्यंत तेजस्वी असे ते शस्त्र माझ्या हातात प्रकट झाले.

" हे अघोरी कालसर्पा, माझ्या परवानगीशिवाय ह्या छेदन बिंदुतुन अघोरी कृत्ये करण्याच्या इराद्याने आता शिरल्याबद्दल मी ह्या बिंदुचा रक्षक अपरांतक्ष तुला दंडीत करत आहे. मी तुला एकाचवेळी सात मितीत कैद करुन तुला काळाच्या मागील स्तरात बंदीवान करत आहे." येव्हडे उदगारुन मी ते पवित्र अस्त्र कालसर्पावर सोडले. काही क्षण सगळीकडे एक लखलखाट झाला, ते शस्त्र आणी दंडीत कालयवन दोघेही नाहिसे झाले.

प्रभुच्या अस्त्राने आपले कार्य चोख बजावले होते.


(समाप्त)

(ह्या भागात मी दिलेले जरासंध, जमदग्नी, यम इत्यादींचे सर्व संदर्भ हे काल्पनीक असुन ते फक्त कथेची रोचकता वाढवायला वापरले आहेत.)

गोष्ट छोटी डोंगरा एवढी

"अहो मरणार्‍या शेतकर्‍याला एक लाख देता, त्यापेक्षा शेतकर्‍याला जगण्यासाठी पंधरा - विस हजार द्या".

कसे वाटले वाक्य ? खरेतर हा आहे संवाद (डायलॉग) तो पण निळु फुलेंच्या तोंडी. चित्रपटाचे नाव 'गोष्ट छोटी डोंगरा एवढी'.


ह्या आणी अशा अनेक शेतकर्‍याची सत्य परिस्थीती विशद करुन सांगणार्‍या संवादांनी आणी प्रसंगांनी भरलेला हा चित्रपट. शेतकर्‍याच्या खर्‍या अडचणी काय आहेत ? शेतकर्‍यावर आत्महत्या करायची वेळ का येते ? सात बार्‍यावरच्या कर्जाच्या नोंदी, सर्कारी बियाणे वाटपाची खरी परिस्थीती, शेतकर्‍यासाठी म्हणुन मिळणारे कर्ज आणी ते मिळवताना येणार्‍या अडचणी, संबंधीत लोकांनी केलेली अडवणुक सगळे अगदी काळजाला हात घालणारे.


शेतकर्‍याच्या प्रश्नाला वाचा फोडणारे म्हणुन बरेच चित्रपट येउन गेले आणी येतील, पण बळीराजाच्या खर्‍या प्रश्नांची आपल्यासमोर मांडणी करणारा चित्रपट म्हणुन 'गोष्ट छोटी डोंगरा एवढीची' दखल निश्चीतच घ्यावी लागेल.

कथेची उत्कृष्ट मांडणी आणी त्याला कलाकारांच्या अभिनयाची तेव्हडीच मिळालेली अप्रतिम साथ हे ह्या चित्रपटाचे वैशीष्ठ्य म्हणता येईल. भरत जाधव आणी मकरंद अनासपुरेचा चित्रपट म्हणले की आजकाल पळुनच जावेसे वाटत होते, अशावेळी मकरंद अनासपुरेचा ह्या चित्रपटातील संयत अनुभव अत्यंत सुखावुन जातो. मकरंदनी नेहमीप्रमाणेच अतिशय समजुन उमजुन हि भुमीका केली आहे. कारकिर्दीत त्याला मिळालेली एक आव्हानात्मक भुमीका असा हिचा उल्लेख करायला हरकत नाही.


नागेश भोसले हा असाच अजुन एक ताकदीचा अभिनेता. देहबोली आणी आवाजाचा पुरेपुर फायदा कसा उठवावा हे ह्या अभिनेत्याकडुन शिकुन घ्यावे. ह्या चित्रपटात त्यानी मकरंदच्या गरीब शेतकरी मित्राची भुमीका साकारली आहे. कुटुंबासाठी धडपडणारा, पैशाची कायमच अडचण असतानाही शहरातुन आपला मित्र मकरंद आलेला बघुन त्याच्यासाठी श्रिखंड आणणारा, कर्जाच्या डोंगराखाली बैल विकावा लागल्यावर स्वत:ला नांगराला जुंपणारा नागेश भोसले काळजात घर करुन जातो.


शेवटी हालाखीच्या परिस्थीतीमुळे आणी कर्जाच्या डोंगराखाली हा नागेश भोसले किटकनाशक पिउन आत्महत्या करतो तो प्रसंग तर डोळ्यात पाणी आणणारा. रात्री उशीरा अडखळत परत आला म्हणुन बायकोची आणी मित्राची बोलणी खाताखाता, "दारु पिउन आला का?" विचारल्यावार नागेश भोसले म्हणतो "दारु नाही, किटकनाशक प्यायलोय..." बास, संपुर्ण थेटरच आपल्या डोळ्याभोवती गरकन फिरल्यासारखे वाटते.


शेतकर्‍याला कर्जासाठी, सरकारकडुन होणार्‍या बियाणे पुरवण्यासाठी वेळोवेळी कसे नाडले जाते, प्रत्येक ठिकाणी टेबलाखालच्या पैशासाठी कशी अडवणुक होते, पावसाचा लहरीपणा, २२/२२ तास गायब असणारी विज ह्या सगळ्याचे विदारक चित्र दिग्दर्शकाने साकारले आहे. चिकुच्या मिळालेल्या ५/- रुपायाच्या सरकारी चेकसाठी ५००/- पेक्षा जास्त पैसे भरुन बॅंकेत शेतकर्‍याला खाते उघडावे लागते हि माहिती ऐकुन तर डोक्याला हात लावायची पाळी येते.

शेवटी जेंव्हा मकरंद अनासपुरे "एक माणुस म्हणून तरी शेतकर्‍याचे अस्तीत्व मान्य करा" असे कळवळुन म्हणतोना तेंव्हा कुठेतरी आपल्याला आपणच गुन्हेगार असल्यासारखे वाटायला लागते.

मकरंद अनासपुरे, कै. निळुभाउ फुले, नागेश भोसले, सयाजी शिंदे, माधवी जुवेकर, मधु कांबीकर अशा उत्तमोत्तम ताकदीच्या कलाकारांचा सुंदर अभिनय ह्या चित्रपटाची जमेची बाजु आहे. चित्रपटात अधुन मधुन वाजणारे शिर्षक गीत मात्र डोक्यात जाते येव्हडाच काय तो चंद्रावर डाग म्हणायचा. आधी हा उपदव्याप अजय - अतुल ह्या संगितकारांचा(?) असावा असे वाटत होते पण नंतर तो शैलेंद्र बर्वे ह्या संगीतकाराचा आहे असे जालावर शोध घेता कळाले.

एकुणच बळीराजाचे खरे वास्तव जाणुन घेण्यासाठी हा चित्रपट निश्चीतच पहा.