सोमवार, १३ एप्रिल, २००९

ताई आणी दादा

दादा :- या या या , या ताई...

ताई :- नमस्कार दादा. कसा आहेस ?

दादा :- मी अगदी मनसे मजेत आहे, तु कशी आहेस ? आज अचानक इकडे कसे काय येणे केलेस ?

ताई :- अरे दादा, आज गुढीपाडवा, तुला आणी तुझ्या पक्षाला सुयश आणी किर्ती मिळो आणी तुझा पक्ष खुप मोठा होवो अशा शुभेच्छा द्यायला आलिये मी.

दादा :- खरच गहिवरुन आले बघ, तुमच्या सारख्यांचे पाठबळ खुप मोलाचे वाटते.

ताई :- अरे वरचेवर भेटत नसलो आणी तु आता घर सोडून गेलास म्हणुन काय झाले ? मी मनानी कायम तुझ्याच मागे उभे होते. बाबा तर कायम म्हणायचेच की तु असा दबुन राहाणारा नाहीस, तु नक्कीच काहितरी भरीव करुन दाखवणार.

दादा :- हो फार प्रेम होते त्यांचे माझ्यावर, आज असते तर त्यांचे मार्गदर्शन खुप कामाला आले असते.असो, तु सांग आज कसे काय येणे केलेस ?

ताई :- काय सांगु दादा, कल्याण मध्ये गोरगरीबांसाठी पुढिल ५ वर्ष एक समाजोपयोगी संस्था उघडावी असे खुप मनात आहे. त्या 'कमळ' बॅंके कडे कर्ज मागायला गेले होते, खरे तर बाबा एकेकाळी त्या बॅंकेचे एक संचालक पण मला बॅंकेनी वाटाण्याच्या अक्षता लावल्या. मामाचे पण त्या बॅंकेत मोठे बचत खाते आहे पण त्याचे सुद्धा काहि चालले नाही रे !

दादा :- नको ताई, अशा सणावारी नको डोळ्यातुन पाणी काढुस. मी आहे ना.

ताई :- हो रे, म्हणुनच तुझ्याकडे धावले, जेष्ठ लोक म्हणाले की 'रेल्वे इंजीन बॅंकेनी' ह्या सहामाहीत चांगलाच नफा दाखवला आहे आणी बॅंक तरुण उद्योजकांना प्रोत्साहनही देत आहे.

दादा :- हो ग ताई, तु काहि काळजी करु नकोस. आमची बॅंक तुझ्या मागे भक्कमपणे उभी राहिल. फक्त तुला इतर सगळे शेअर विकुन टाकुन फक्त आमच्या 'मराठी विकास' उद्योगाचे शेअर खरेदी करावे लागतील.

ताई :- आनंदाने करीन दादा. गरीबांच्या विकासासाठी आणी बाबांचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी मी सगळे करीन. त्यतुन त्या 'कमळ' बॅंकेतल्या जेष्ठांच्या बचत खात्यातली रक्कमही संपत चालली आहे तेंव्हा ते ही लवकरच आपल्या बॅंकेचे सभासद होउन आपल्याला मार्गदर्शन करतीलच.

दादा :- भले शाब्बास ! अग शर्मीला श्रीखंड आण ग, बघ तरी कोण आलय ते.

(वरील घटना हि पुर्णपणे काल्पनीक असुन, भावा बहिणीतील प्रेम दाखवणारी आहे. तिचे इतर कुठल्या घटनेशी साम्य अढळल्यास तो एक योगायोग समजावा.)

डॅम इट !

"डॅम इट !"
"अरे नगमा, दिपीका सारख्यांपासुन तो कोण तो बिहारी नट, त्यांच्या नावाचा तिकिटासाठी विचार होतो आणी मराठीतील एका कलाकरालाच्या नावाची अफवा सुद्धा उठत नाही म्हणजे काय ? महेश कोठारे तावातावाने बोलत होता. काहि वेळाने धाप लागल्यावर परत एकदा 'डॅम इट' म्हणुन तो खाली बसला.

"अरे बाबा त्यांच्या नावाला ग्लॅमर असत रे ! कळतय का तुला ?" स्मिता तळवळकर महेशला समजावत्या झाल्या.

"का ? माझ्या श्वास चित्रपटाला ग्लॅमर न्हवते ? ऑस्कर पर्यंत वारु दौडला की त्याचा !" संदिप सावंतानी हिरिरिने आपला मुद्दा मांडला.

"डॅम इट ! घरघर लागायची वेळ आलीये आता. काहितरी केलेच पाहिजे. ह्या राजकिय अभिसरणाच्या प्रक्रियेत आपणही उतरलेच पाहिजे." जोग सरांच्या चिरंजीवांसाठी चित्रपट काढल्यापासुन महेशराव फारच अगम्य बोलायला लाग्ले आहेत.

"तसा मला नगरपाल पदाचा राजकीय अनुभव आहेच. काय म्हणता ?" किरण शांताराम अंदाज घेत म्हणाले.

"अहो तुम्हाला आता कशाला उद्याची बात चे रिमिक्स सहन होत नाही, तुम्ही स्वत:चे रिमिक्स कसे सहन करणार राजकारणात ?" देशाला मराठी नेतृत्व कसे खंबीर हवे ! आमच्या अजिंक्य सारखे. काय देखणा आणी करारी दिसलाय तो 'वासुदेव बळवंत' मध्ये." इती रमेश देव.

"आमचा सुशांतसुद्धा देखणा आणी करारीच आहे म्हणले" किरणरावांचा संयम आता सुटायला लागला होता.

अचानक जोरात टेबल ठोकल्याचा आवाज झाला. सर्वांनी बघितले तर जयश्रीताई हातानी सगळ्यांना गप्प बसायला सांगत होत्या. गंमत काय झाली होती, की त्या गेले अर्धा तास बोलण्यासाठी तोंड उघडत होत्या पण त्यांच्या तोंडातुन शब्द बाहेर पडेपर्यंत त्या जांभई देत आहेत समजुन दुसराच कोणीतरी बोलायला सुरुवात करत होता.

"अशी असावी सासु नंतर एका मुत्सद्दी आणी खंबीर स्त्री ची प्रतिमा बनली आहे माझी." एकदाचा त्यांचा आवाज बाहेर आला.

"बाई अहो मग असे असेल तर आम्ही तुमच्या चार काय चारशे पावले पुढे हाये म्हणायचे की तिच्यामायला." कोपर्‍यातुन निळुभाउ म्हणाले.

"माझ्या मते आपण एक भक्कम पाठींबा असलेल्या आणी सामान्य जनतेच्या मनापर्यंत पोचलेल्या स्त्रीला निवडणुकीला उभे करावे. मी आणी तळवळकर जीम ह्यासाठी सर्व तर्‍हेचे प्रयत्न करु. संजय सुरकर साथीला असेलच." स्मिताताई म्हणाल्या.

"पण स्त्रीच का ? एखादा पुरुष सुद्धा ह्या किंवा ह्यापेक्षा जास्ती गुणांनी युक्त असु शकतो. आणी आधार म्हणाल तर आज मी एकट्याच्या जिवावर अख्खा सिनेमा ओढुन नेतोय." एकदाचे अनासपुरे रेकले.

"ह्या सगळ्या गुणांनी आम्हे सुद्धा युक्त आहोत." भरत जाधव.

"च्यायला श्रीखंडाची जाहिरात एकल्या सारखे वाटले." निळुभाउ.

"हे बघा, जनतेच्या हिताचे आणी योग्य निर्णय राबवु शकेल असा माणुस तिकडे गेला पाहिजे. जेष्ठ असेल तर अजुनच उत्तम" श्रीराम लागु म्हणाले.

"निवडणुक लढवायची आहे 'काचेचा चंद्र' पुन्हा रंगभुमीवर आणायचे नाहिये डॉक्टर." जयश्रीताई पुन्हा बोलत्या झाल्या.

" मी काय म्हणतो..." महेश.

"काहि म्हणु नका. आधीच तो जबरदस्त काढुन डोक्याला त्रास दिला आहेत तेव्हडा बास नाहिये का ?" स्मिताताई.

'कॉलेजच्या गोष्टी' काढण्यापेक्षा ते बरे नाही का ? महेश.

"विमानाच्या तिकिटाशिवाय उदघाटनाला यायला जमणार नाही म्हणणारे आता जनतेची सेवा करणार म्हणे." किरण शांताराम.

वैयक्तीक आरोप प्रत्यारोप चालु असतानाच अचानक हॉल मध्ये शांतता पसरली. १० मिनिटांनी आम्ही आत डोकावुन पाहिले तो हॉल रिकामा ! सेवकाकडे विचारणा करता असे कळाले की 'नाना' येतोय म्हणुन फोन आला होता म्हणे.
______________________________________________________
संदर्भ :- काहि काळापुर्वी शिरीष कणेकर ह्यांनी मराठी निर्माते 'टायटॅनीक' वरुन मराठी चित्रपट काढण्याचे ठरवतात असा एक छोटेखानी विनोदी लेख लिहिला होता. त्या लेखाच्या आधारे हा निवडणुक तिकिटाचा प्रसंग रंगवण्याचा प्रयत्न केला आहे.