शुक्रवार, २५ जून, २०१०
स्टेफनी मेयर ह्या लेखीकेच्या ट्वायलाईट सागा वर आधारीत पहिल्या चित्रपटाची ट्वायलाईटची ओळख आपण मागच्या भागात करुन घेतली. आज आपण ओळख करुन घेणार आहोत ह्याच्या पुढच्या भागाची 'न्यू मून'ची.
खरेतर पहिल्या भागात चित्रपटातील सर्व पात्रांची ओळख झाली असल्यास बर्याचदा दुसरा भाग थोडा संथ अथवा कंटाळवाणा वाटतो, पण 'न्यू मून' ह्याला निश्चीतच अपवाद ठरतो. आपण जणु काही पुढल्या भागापासुनच आत्ता बघायला सुरुवात करत आहोत असे वाटत राहते.
मानवी रक्तावर जगणार्या तिन व्हँपायर्सच्या टोळीतील (लॉरेंट-व्हिक्टोरीय-जेम्स) जेम्सच्या प्राणघातक हल्ल्यातुन वाचलेली बेला आता खुपच सावरलेली असते. ह्या सगळ्या ताणातुन थोडी मुक्ती मिळवायच्या दृष्टीने एडवर्डची बहिण आणी थोडक्या काळात बेलाची प्रेमळ मैत्रीण बनुन गेलेली अॅलीस, बेलाच्या अठराव्या वाढदिवसानिमित्त एका पार्टीचे आयोजन करते.
पार्टी रंगत असतानाच अचानक एका छोट्याश्या अपघाताने बेला आपला हात कापुन घेते. भळाभळ वाहणारे मानवी रक्त आणि त्या रक्ताचा आकृष्ट करणारा वास शाकाहारी कलिन्स फॅमीली मध्ये नविनच सामील झालेल्या जेस्परला बेला वर हल्ला करण्यास उद्युक्त करतो. एडवर्ड आणि इतर कलिन्स मोठ्या मुश्कीलीने बेलाला त्यातुन वाचवता आणि जेस्परला शांत करतात. ह्या बसलेल्या धक्क्यातुन शहाणपण आलेली कलिन्स फेमीली बेलाच्या जिवीताच्या सुरक्षीततेसाठी आणी एडवर्डच्या भल्यासाठी देखील फोर्क्स शहर सोडून जाण्याचा निर्णय घेतात.
एडवर्डच्या सोडुन जाण्याने बेला कोलमडून पडते. आधीच एकेकटी राहणारी बेला आता सर्वच गोष्टीपासून, मित्रांपासून अलिप्त होते. एडवर्डची बहिण अॅलीस हिच्याशी इ-मेल द्वारे चालु असलेला संवाद हाच काय तो आधार उरलेला असतो. अशाच निराश एकाकी अवस्थेत बेलाचा लहानपणापासूनचा मित्र जेकब बेलाला पुन्हा एकदा सावरतो आणि दोघे पहिल्यापेक्षा अधिक जवळ येतात.
बेला आपल्या एकाकी आणि दु:खी आयुष्यातुन स्वतःला जेकबच्या मदतीने सावरत असतानाच भुतकाळातील संकट लॉरेंटच्या रुपाने पुन्हा तिच्या आयुष्यात उभे ठाकते. ह्याचवेळी बेलाला जेकब हा एक वेअरवुल्फ असल्याचे कळुन येते आणि बेला चक्रावुन जाते. इकडे व्हिजन्सची देणगी लाभलेल्या आपल्या बहिणीकडून बेला आत्महत्या करणार असल्याची पुर्वसूचना मिळाल्याने खचलेला एडवर्ड आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतो. त्यासाठी तो इटलीतील व्हँपायर प्रमुख वोल्टुरीची मनधरणी करतो.
बेलाला वाचवण्यासाठी फोर्क्समध्ये परत आलेल्या अॅलिसला बेलाला जिवंत पाहुन खुप आनंद होतो. आपण आत्महत्येचा प्रयत्न केला नसुन आपण क्लिफ जंपीग करत होतो असा खुलासा बेला करते. अॅलिसकडुन एडवर्डने घेतलेल्या टोकाच्या निर्णयाची बातमी कळल्यावर बेला जेकबचा विरोध धुडकावुन अॅलीस बरोबर इटलील प्रयाण करते.
पुढे काय घडते हे प्रत्यक्ष चित्रपटात पाहण्यातच मजा असल्याने इथेच थांबतो. ट्वायलाईट सागा मधिल हा दुसरा भाग पहिल्या भागा येवढाच खिळवुन ठेवणारा आणी थरारक आहे. २००९ सालातील प्रेक्षकांना सर्वात जास्ती आवडून गेलेला चित्रपट म्हणुन ह्याची निवद करण्यात आली. एम टि. व्ही. च्या पुरस्कार सोहळ्यात ह्या चित्रपटाने चांगलीच बाजी मारली.
लेबल: इंग्रजी चित्रपट
फॉलोअर
Translation
Save as PDF
सदस्यत्व घ्या
Labels
- इंग्रजी चित्रपट (10)
- कथा (29)
- चित्रपट (20)
- तेलगु (1)
- पुस्तक प्रकाशन (3)
- प्रहसन (12)
- भयपट (4)
- मराठी (8)
- स्तंभलेखन (1)
- हिंदी (12)