बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

वंदे मातरम

"नमस्कार मै हु आभा शर्मा और आप देख रहे है 'न्युज चॅनेल' अब हम आपको ले जा रहा है 'ब्लु नाईल' हॉटल के बाहर जहांपर ४ टेरीरीस्ट अभीतक कब्जा जमाये बैठे है."

"आपण पाहात आहात 'चंद्र माझा' आणी आता आम्ही तुम्हाला दाखवतोय 'हॉटेल ब्लु नाईलच्या' ३ र्‍या मजल्याची आमच्या कॅमेरामन 'माधवानी' ह्यांनी टिपलेली दृष्ये."

"क्या वहा ४ ही टेरीरीस्ट है ? क्या क्या लाये है वो अपने साथ? क्या मुंबई बच पायेगी तबाहीसे ?"

न्युज चॅनेल्सवर नुसती दंगल उसळली होती. नक्की काय घडलय आणी काय घडतय हेच जनतेला कळत न्हवते. 'ब्लु नाईल' ह्या पंचतारांकीत हॉटेलच्या तिसर्‍या मजल्यावर काही अतिरेक्यांनी कब्जा केला आहे ह्या एकमेव खर्‍या वृत्ताशीवाय अजुन काहीच कल्पना येत न्हवती. प्रकरणाचा थांग सामान्य जनतेला लागत न्हवता. एका भिषण दडपणाखाली जो तो वावरत होता.

त्याचवेळी इकडे कमांडो युनीट मध्ये वेगळेच नाट्य घडत होते.....

"राजहंस आर यु शुअर?" युनीट प्रमुख वर्मांचा अजुन विश्वास बसत न्हवता.

अर्ध्या तासापुर्वी सुट्टी मंजुर झाल्याने घरी निघालेला राजहंस त्यांच्या समोर पुर्ण कमांडो पोषाखात शस्त्रसज्ज उभा होता.

"येस सर. अँड आय वॉंट टु कमांड धीस ऑपरेशन टु !" राजहंस मोठ्या तडफेने बोलला.

त्या तडफदार तरुणाकडे बघता बघता वर्मांना आपले तरुणपणीचे दिवस आठवले. तेही असेच देशप्रेमाने भारलेले न्हवते का ?

"मला अभिमान वाटतो तुझा राजहंस. असे कर्तुत्व गाजवा की ह्या मातृभुमीची मान अभिमानानी ताठ होउ दे. जयहिंद !!" वर्मांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवत उदगार काढले.

काही वेळातच कामांडोजना एयरबेसवर नेण्यात आले. एका खास हेलीक्रॉप्टरने राजहंस आणी त्याच्या नेत्रुत्वाखाली १० बेस्ट कमांडोज 'ब्लु नाईलच्या' दिशेने झेपावले.

"सर, ये साले न्युज चॅनेलवाले तो अबतक हमलोग टेरेसके उपर पोहोच चुके है, ये दिखा भी चुके होंगे" हमीद बोलला.

"आता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करा हमीद. काय घडले आणी काय घडणार आहे ह्याचा विचारही नको. काय घडवायचे आहे ते फक्त लक्षात ठेवा. भारत माता की... !"

"जय" त्या हेलीक्रॉप्टर मध्ये एक हळुवार आवाजात गर्जना निनादली आणी दुसर्‍याच क्षणी रोपच्या सह्हायानी राजहंसनी टेरेसच्या दिशेने खाली जायला सुरुवात केली.

एक एक करत ते ११ वीर टेरेसवर उतरले. हॉटेलच्या नकाशावरुन प्लॅन तयार झालाच होता, पण तो कागदावर... आता त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी करण्याची वेळ आली होती.

बिनबोभाट प्रत्येकानी आपल्या नेमुन दिलेल्या हालचालींना सुरुवात केली. राजहंस सगळ्यात आघाडीवर होता. चौथा मजल्यावरुन तिसर्‍या मजल्याकडे जाताना ते फारच सावध होते.

सुरक्षेच्या दृष्टीने हॉटेलचा विज पुरवठा बंद करण्यात आला असल्यामुळे बाहेरुन येणार्‍या प्रकाशावर आणी नकाशाच्या अभ्यासावरच विसंबुन रहावे लागत होते.

तिसर्‍या मजल्याच्या दिशेने पायर्‍या उतरत असतानाच राजहंसच्या सावध नजरांनी जिन्याच्या शेवटच्या पायरीपाशी झालेली मानवी सावलीची हालचाल टिपली होती. अत्यंत सावध हालचाली करत तो शेवटच्या पायरीच्या दोन पायरी अलीकडे थांबला. क्षणार्धात कमरेला लावलेल्या पट्ट्यातुन त्यानी मोठा सुरा बाहेर काढला आणी सप्पकन डाव्या हाताच्या कोपर्‍यात फेकुन मारला. एक अस्फुटशी कींकाळी कानावर आली. सावधपणे तो आणी अजुन एक सहकारी त्या कोपर्‍याच्या दिशेने सरकले. सहजपणे अनपेक्षीत यश पदरात पडले होते. एक अतिरेकी अगदी सहजपणे त्याच्या 'मसीहाला' भेटायला निघुन गेला होता.

ही दबकी किंकाळी त्याच्या सहकार्‍यांच्या कानावर गेलीच नसेल असे ठामपणे सांगता येत न्हवते, त्यामुळे आता हालचालींवर अजुनच बंधने आली होती. अतीरेकी ज्या सुट मध्ये लपल्याची शक्यता होती त्या सुट क्रमांक ३२७ च्या दिशेने आता कमांडो पथकाने हळुहळु सरकायला सुरुवात केली. एक एक दाराचा 'नॉब' हळुवार पणे चेक करत ते पुढे निघाले होते...

अचानक मागच्या बाजुने गोळ्यांची एक फैर झडली आणी सगळ्यांनी स्वत:ला जमीनीवर झोकुन दिले. डाव्या हाताची रुम उघडल्याने राजहंस आणी त्याच्या मागच्या ४ सहकार्‍यांनी स्वत:ला रुम मध्ये झोकुन दिले.

मागच्या बाजुच्या कमांडोजचा हालचालींचा वेध घ्यायचा अंदाज चुकला असावा. त्या कोपर्‍यात एक नाही तर दोन अतिरेकी लपलेले होते. सगळ्यात मागचे दोन कमांडोज गोळ्यांच्या वर्षावात न्हाउन निघाले होते. हमीदने केलेल्या पलटवारात आता मृत्युला सामोरे जाण्याची पाळी दुसर्‍या अतिरेक्याची होती. विनाकारण दोन कमांडोजचा बळी मात्र पडला होता.

आपल्या प्रमुखाला ह्या घटनेचे दडपण येउ नये ह्यासाठी सरकत रुम मध्ये प्रवेश केलेल्या हमिदने राजहंसच्या खांद्यावर मोठ्या विश्वासाने आपला हात ठेवला होता.

"दो ही भेडीये बचे है सर, चलो शिकार किया जाये" हमीद हसत हसत म्हणाला.

मोठ्या उत्साहाने उरलेले कमांडोज पुढे सरकले. आता ते सुट क्रमांक ३२७ च्या जवळ भिंतीच्या कडेकडेने येउन पोचले होते.

अचानक त्या मजल्यावरच्या मुख्य बाल्कनीच्या दिशेने झालेली हालचाल सगळ्यांनीच टिपली. क्षणात आडोसे शोधण्यासाठी नजरा फिरल्या. सुट क्रमांक ३२५ आणी ३२६ ची दार सताड उघडी होती. काही वेळातच पुढे सरकणार्‍या कमांडोजना दोन्ही खोल्यातील भिषण दृष्य बघावे लागले. कुटुंबच्या कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडले होते तर एका खोलीत परदेशी जोडप्याला रक्तात न्हाउ घालण्यात आले होते. संतापाने प्रत्येकाच्याच अंगातले रक्त उसळु लागले.

"सर, डाव्या बाजुचा कोपरा बघा." एका कमांडोने राजहंसचे लक्ष वेधुन घेतले.

खोलीच्या डाव्या कोपर्‍यात अजुनही एक प्रेत पडले होते. बहाद्दुर 'परदेशस्थाने' जाता जाता एका अतिरेक्याला ढगात पाठवलेले दिसत होते.

"आता एकच. पण तो नक्की जीवावर उदार झालेला असणार आहे, तेंव्हा सावध." राजहंसनी आज्ञा केली.

दबकत दबकत ३ गट पाडुन ते आता बाल्कनीच्या दिशेने निघाले.. एक गट ४ थ्या मजल्याच्या बाल्कनीवरुन खालची बाल्कनी 'कव्हर' करणार होता तर एक गट दुसर्‍या मजल्यावर तयारीत थांबणार होता.

तिसर्‍या मजल्यावर थांबलेले राजहंस, हमीद आणी त्यांचा साथीदार दबकत दबकत बाल्कनीच्या दिशेने निघाले.

"सर ब्लड स्पॉट्स.." हमीद पुटपुटला.

रक्ताचे थेंब खोली पासुन बाल्कनीच्या पर्यंत गेलेले होते.

"जखमी दिसतोय" चिराग म्हणाला.

जसजसे ते बाल्कनीच्या दिशेने निघाले तसे तसे ते अधीक सावध बनत चालले होते. अचानक बाल्कनीच्या डाव्या कोपर्‍यातुन बंदुकीची नळी पुढे आली आणी त्यांनी जमीनीवर लोळण घेतले... दुसर्‍याच क्षणी अधांधुंद गोळीबाराला सुरुवात झाली.

लपलेल्या अतिरेक्यानी जागा मात्र अगदी बेचक्यातली निवडली होती. वरुन आणी खालुन तो दिसणेही अशक्य होते. बर्‍याच वेळ दोन्ही बाजुंनी गोळीबार चालु होता. हमीदची टाच आणी राजहंसचा खांदा चांगलाच जखमी झाला होता.

"हमीद समबडी शुड टेक द रीस्क, मी पुढे होतोय मला कव्हर द्या" राजहंस हमीदला म्हणाला.

"सर तुम्ही थांबा हे काम मला करु द्या " हमीदनी विनंती केली.

"शट अप हमीद. तुला उभे राहणेही अशक्य आहे. मला कव्हर द्या बस. धीस इज एन ऑर्डर" वाक्य पुर्ण करता करता राजहंस पुढे सरकलाही होता.
-----------------------------------------------------------------------------

"नमस्कार. आत्ताच आलेल्या ताज्या बातमी नुसार भारतीय कमांडोजनी मुंबईतील "ब्लु नाईल" हॉटेलमधील अतिरीकेविरोधी कारवाई यशस्वीरीत्या पार पाडली असुन चारही अतिरेक्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत. राष्ट्रपती व पंतप्रधान ह्यांनी खास संदेश पाठवुन ह्या विरांचे अभिनंदन केले आहे."

बातमी झळकली आणी तमाम देशाचे उर अभिमानानी भरुन आले.

"माझ्या पोरांनी करुन दाखवले !" अत्यानंदाने वर्मा साहेब म्हणाले. यशस्वी विरांच्या स्वागताला ते स्वत: हॉटेलच्या लॉबीच्या दिशेने धावले.
--------------------------------------------------------------------------------------------

"हमीद, हंसा कुठे ? हमीद मी काय विचारतोय ? व्हेअर इज राजहंस ? डॅम ईट !!" वर्मा गदगदा हमीदचा खांदा हलवुन त्याल विचारत होते.

"आय एम सॉरी सर" गदगदलेल्या स्वरात हमीद म्हणाला.

-------------------------------------------------------------------------------------

"सर ह्या आधीही आपले बेस्ट कॅडेट काही वेळेला हौतात्म्य पावले आहेत पण आज राजहंसच्या हौतात्म्याची बातमी ऐकुन तुमची जी अवस्था झाली ती मी ह्या आधी कधीच बघितली न्हवती सर." वर्मांचा ज्युनीअर पंडीत आश्चर्याने वर्मांना विचारत होता.

"पंडीत अरे गावाकडे त्या पोराच्या बापाची चिता ह्यानी अग्नी द्यायची वाट बघतीये रे .... आणी हा मिळालेली रजा नाकारुन....."


शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

किस्से कॅफेतले

किस्सा १ :-

वेळ :- सकाळी ११.२५ साधारण

एक २२/२३ वर्षाची युवती आत डोकावुन बघते.

युवती :- एस्क्युजमी, तुमच्याकडे युनिव्हर्सिटिचा फॉर्म भरुन मिळेल का ?

मी :- एक्स्टर्नल ??

युवती :- हो ! किती पैसे होतील ?

मी :- तुम्ही बसुन भरणार असाल तर तासाप्रमाणे जे होतील ते, प्ल्स प्रिंट आउटसचे पैसे. मी लागली तर थोडीफार मदत करेन. आणी जर पुर्ण फॉर्मच आमच्याकडून भरुन हवा असेल, तर मग २५ /- रुपये प्लस प्रिंट आउटस.

युवती :- चालेल मग तुम्हीच भरुन द्या.

मी हातानेच तिला शेजारच्या खुर्चीत बसायची खुण करतो. युवती स्थानापन्न होते.

मी :- नाव ?

युवती :- कुमार अ ब क.

मी चमकुन बघतो.

युवती :- (हसुन) माझ्या भावाचा भरायचा आहे फॉर्म.

मी :- काय प्रॉब्लेम नाही. जन्मतारीख सांगा.

युवती :- फलाना फलाना....

मी :- पत्ता ??

युवती :- फलाना फलाना...

फॉर्मची पहिली ३ पाने भरुन होतात. आता विषय निवडायची वेळ येते.

मी :- विषय कोणते घ्यायचेत ?

युवती :- कोणतेपण ३ टाकाना चांगले.

मी :- अहो , तुमच्या भावाला अभ्यास करायचाय मला नाही. आणी कुठलेपण विषय कसे टाकणार ? त्याचे जे विषय राहिलेत तेच टाकावे लागतील ना?

(युवतीच्या चेहर्‍यावर मतिमंद भाव, मग फोन करुन भावाशी चर्चा.)

मग विषय सांगीतले जातात.

मी :- ह्या आधी तुम्ही युनिव्हर्सिटिला रजिस्ट्रेशन केले आहे का?

युवती :- नाही !!

मी :- शेवटची परिक्षा कधी दिली होती तो महिना आणी साल ?

युवती :- फलाना फलाना...

(अजुन ५ पाने भरली जाउन एकदाचे शेवटचे पान येते.)

मी :- माहिती व्यवस्थीत आहे ना एकदा चेक करुन घ्या म्हणजे प्रिंटच्या पेज वर जाता येईल.

युवती :- (निट वाचुन) हो सगळे बरोबर आहे.

(मी नेक्स्टवर क्लिक करतो... ताबडतोब एरर मेसेज येतो "युजर ऑलरेडी रजिस्टर्ड)

मी :- अहो तुमचा भाऊ ऑलरेडी रजिस्टर्ड आहे की हो.

युवती :- (थंडपणे) हो आहे की.

मी :- (हतबद्ध स्वरात) अहो मग मगाशी मी विचारले तर नाही का म्हणालात ?

युवती :- अय्या ! मला वाटले तुम्ही माझे रजिस्ट्रेशन आहे का नाही विचारत आहात म्हणून.....
-----------------------------------

किस्सा २ :-

वेळ दुपारी ३-३० ते ४-००

२७-२८ वर्षाची युवती तोंडावर जमेल तेवढे शिष्ठ आणी जगाला तुच्छ लेखणारे भाव दाखवत प्रवेश करते. कॅफे जवळ जवळ पुर्ण भरलेला.

युवती :- टर्मीनल फ्री आहे का?

मी :- येस.

युवती :- अं..... ए सी नाहिये ???

मी :- नाही, पण दोन्ही फॅन चालु आहेत ना.

युवती :- गॉश ! खुप हॉट वाटतय इकडे. जरा फॅन मोठा करा !

(मी आज्ञापालन करतो)

युवती :- (अतिशय तुच्छपणे) ह्या माऊसला काय प्रॉब्लेम आहे का ? हा वर्क करतच नाहिये.

(युवती माऊसपॅड बाजुला सारुन माऊस वापरत असले. माऊसपॅड लावुन दिल्यावर माऊस व्यवस्थीत काम करु लागतो)
पुन्हा काही वेळाने...

युवती :- हॅलो.... केवढा स्लो आहे हा पि सी. १० मिनिट झाली साईट सुद्धा उघडत नाहिये.

(मी पुन्हा धावतो. युवतीच्या संगणकावर ४ एक्सप्लोरर, २ फायफॉक्स, गुगल चाट आणी पॉवर पॉईंटचे प्रेझेंटेशन येवढा माल-मसाला उघडलेला असतो.)

मी :- मॅडम अहो येवढी अप्लीकेशन उघडल्यावर कुठला पण संगणक मान टाकणारच की. एकाच एक्स्प्लोअरर किंवा फायरफॉक्समध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या टॅब मध्ये सगळे उघडाना म्हणजे मेमरी थोडी कमी लागेल.

युवती :- कळतय मला ! आय अ‍ॅम अल्सो कॉम्प्युटर इंजीनियर !!

(आता नेहमीचे कस्टमर्स वैतागुन बघायला लागलेले असतात.)

युवती :- आमच्या ऑफीसमध्ये मी ह्याहुन जास्त प्रोग्रॅम्स ओपन करते, काही प्रॉब्लेम येत नाही. कळले ? आणी हा कि-बोर्ड पण किती हार्ड आहे.

मी :- (जमेल तेवढ्या नम्रपणे) मॅडम अहो रोज वेगवेगळे दहा कस्टमर्स तो कि-बोर्ड हाताळतात, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोच. आणी अहो तुमच्या ऑफीसमध्ये मेमरी वगैरे सगळे एकदम हाय-फाय असेल. इथे आम्ही कॅफे असल्याने नॉमीनल मेमरी वगैरे युज करत असतो.

युवती :- दॅटस युवर प्रॉब्लेम ! ओके ??

(मी गुपचुप जागेवर जाउन बसतो)

काही वेळाने पुन्हा एकदा..

युवती :- हॅलो.. काय चाललय काय ?? डॅम ईट !! तुमचा फ्लॉपी ड्राईव्ह देखील काम करत नाहिये.

(मी शांतपणे तिच्याकडे बघतो...जे काय दृष्य दिसते ते पाहुन माझा चेहरा माकडाच्या हातात कोलित दिल्याप्रमाणे फुलुन येतो..दॅटस ईट दॅटस ईट दॅटस ईट.. मी जमेल तेवढ्या मऊ आवाजात पण आजुबाजुच्या दुकानदारांना देखील ऐकु जाईल अशा आवाजात ओरडतो... "मॅडम अहो तुम्ही सिडी रॉम मध्ये फ्लॉपी घालत आहात !!!")

ढॅण टा ढॅण.........
--------------------------------

किस्सा ३ :-

वेळ संध्याकाळी ६-३० ते ७-००

एक एकदम 'यो' पोरगा आपल्या मैत्रिणीबरोबर प्रवेश करतो. मुलगा स्वत:ला हृतीक आणी मुलगी ऐश्वर्या समजत असल्यासारखे दोघांच्याही चेहर्‍यावर भाव.

'यो' :- मॅन एक पिसी पाहिजे !

मी :- आहे ना. तुमच्याकडे काही आय-डी प्रुफ वगैरे आहे ??

'यो' :- म्हणजे ?

मी :- कोणतेही फोटो आय-डी कार्ड. पॅनकार्ड, लायसन्स किंवा कॉलजचा आय-डी वगैरे.

'यो' :- "पि एम टी" चा पास आहे की.
------------------

किस्सा ४ :-

वेळ :- दुपारची

४/५ कन्यांचा घोळका दारात येउन थडकतो. सर्व कन्या साधारण १७/१८ वयोगटातल्या. " तु जा - मी जा " करत अखेर एकजण प्रवेश करते.

कन्या :- एस्क्युज मी , तुमचा रेट काय आहे ?

(इतर कन्या उत्सुकतेने दारातुन डोकावत आहेत)

मी :- मी "प्राइसलेस" आहे.

कन्या काही क्षण पुर्ण ब्लॅंक होते आणी मग एकदम "अय्या !!" असे ओरडते आणी पळुन जाते.
--------------------

किस्सा ५ :-

वेळ साधारण रात्री ८ ची.

एक २१/२२ ची तारुण्याने मुसमुसलेली वगैरे युवती प्रवेश करते. आय-डी प्रुफ वगैरेची देवाण घेवाण होते.

कन्या :- त्या कोपर्‍यातल्या पिसी वर बसले तर चालेल का ?

(गर्दी जवळ जवळ नसल्यानेच मी तत्परतेने कडेचा संगणक चालु करुन देतो.)

कन्या :- फास्ट आहे ना ? सगळ्या साईट वगैरे ओपन होतात ना ?

मी :- एकदम ! काहिच प्रॉब्लेम येणार नाही.

(थोड्यावेळाने डोळ्याच्या कोपर्‍यात मला हालचाल जाणवते. कन्या 'सिपीयु'वर वाकलेली असते.)

मी :- मॅडम पेन-ड्राईव्ह युज करायचा आहे का ? वरती कॉर्ड काढलेली आहे बघा.

कन्या :- नाही, पिसी हॅंग झालाय, रिस्टार्ट करतीये.

(काही वेळाने पुन्हा एकदा पिसी रिस्टार्ट केला जातो. जेंव्हा तिसर्‍यांदा पिसी रिस्टार्ट करायला कन्या वाकते माझा पेशन्स संपतो.)

मी :- मॅडम CTRL + ALT + DEL वापरुन बघा ना, सारखा सारखा डायरेक्ट रिस्टार्ट करु नका प्लिज.

कन्या :- (शांतपणे) किबोर्ड सुद्धा वर्क करत नाहिये. मग कसे करणार ?

मी :- (उद्वेगाने) अहो मॅडम पण ३/३ वेळा ??

कन्या :- चार वेगवेगळ्या साईट ट्राय केल्या, कुठलीपण सेक्स साईट उघडली तरी पिसी हॅंगच होतोय त्याला मी काय करु ?

(कॅफे मालक, पक्षी - मी घेरी येउन पडतो.)

=======================================

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१०

हुंकार वेदनांचे ...

"अरे किती भाजलय रे ? कुठे गेला होतास चटके खायला ? बेअक्कल! २/२ महिने घराबाहेर राहुन तुमच्यासाठी झिजायचे आणी घरी आले की हे भोगायचे.." बाबा माझ्या हाताला मलम लावता लावता बोलत होते.

मी केवीलवाण्या चेहर्‍याने ऐकत होतो. आईने बंबाच्या गरम राखेत हात कोंबला हे सांगायची भिती वाटली.... हो भितीच. मला सगळ्याची भितीच वाटते. आईची, घराच्या भिंतींची, शाळेची, शाळेतल्या मुलांची....

********************************

आज बाबा आणी शाळेचे पत्र एकत्रच घरी आले. 'एकदा समक्ष येउन भेटा' शाळेतुन पत्र आले होते.

"अहो तुमचा मुलगा पहिल्या पाचातला वगैरे नाही, पण हुषार आहे हो. पण महिना होत आला आजकाल तो काही बोलतच नाही, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पण देत नाही, नुसता खाली मान घालुन उभा राहतो. लक्ष द्या त्याच्याकडे हे वय नाजुक असते." वर्गशिक्षीका पोटतिकडीने सांगत होत्या आणी बाबा खाली मान घालुन ऐकत होते...

आईने जिभेला चटका दिलाय, बोलता येत नाहीये हे कसे सांगु बाबांना ? पण खरेतर बरेच झाले आजकाल काही बोलावेसेच वाटत नाही.

************************************

"प्रसाद किती सुंदर निबंध लिहिला आहेस रे. येव्हडे प्रेम करतोस तुमच्या कुत्र्यावर ? आजवर ह्या विषयावर किती निबंध वाचले पण हा अगदी खरा, जिवंत वाटतोय बघ. मी येउ एकदा तुमच्या कुत्र्याला भेटायला ?" बाई विचारत होत्या.

मी कसनुसा हसलो आणी वही घेउन जागेवर जाउन बसलो.

मी फक्त आमच्या मोत्याशीच बोलतो, त्यालाच मिठी मारुन रडतो आणी तो पण मला खुप समजावतो... त्याला मिठी मारलीना की अंगावरचे वळ दुखेनासे होतात.... बाईंना कसे कळणार ?

*********************************

"मुकुंदा मला तुझे प्रामाणीक मत हवे आहे." बाबा तावातावाने बोलत होते.

"हे बघ अवी, मी आधी तुझा जवळचा मित्र आहे आणि मग फॅमीली फिजीशीयन. प्रसादला मी लहानपणापासुन बघतोय, मला त्याच्यात वेडसरपणाची झाक किंवा खुनशीपणा कधीच आढळलेला नाहिये. हि इज ऍज नॉर्मल एज एनी अदर चाईल्ड." अत्रे काका म्हणाले.

"मुकुंदा अरे कसे सांगु तुला ? पोरगा आईच्या मायेला पोरका व्हायला नको म्हणुन केवळ दुसर्‍या लग्नाला तयार झालो. त्या माऊलीने देखील ह्याच्यासाठी काही करायचे कमी ठेवले नाही. पण हा तिच्याशी देखील पटवुन घेत नाही रे. शाळेत जाताना डब्यातील अन्न फेकुन देतो आणी डब्यात माती भरुन घेतो. शाळेत शिक्षक रागावले तर आईने दिली सांगतो. अरे आमचा मोत्या, येव्हडे गुणी जनावर, काल ह्यानी त्याच्या डोक्यात दगड घालुन ....." बाबा दोन्ही तळव्यात डोके गच्च आवळुन बसले होते.

"नाही हो, मी नाही मारले मोत्याला, आईची शपथ ! उलट मला खडे मारणार्‍या मुलांवर तो धावुन गेला म्हणुन त्यांनीच तो काळा मोठा दगड त्याच्या डोक्यात मारला....."

मी कितीतरी वेळ त्याला मिठी मारुन रडत बसलो होतो. केव्हडे तरी रक्त आले होते.. मोत्याला मिठी मारुन रडता रडता कधी डोळे मिटले गेले कळलेच नाही....

**********************************************

बाबा आजकाल त्यांच्या रुम मध्येच झोपुन असतात दिवसभर. त्यांना फिरायला एक चाकांची खुर्ची पण आणुन दिलीये अत्रे काकांनी. अत्रे काका आजकाल रोज आमच्या घरी येतात.. येताना मला कायम चॉकलेट आणतात.

आज दुपारीच मी खुप खुषीत होतो, गोष्टच तशी घडली होती. मी धावत धावत बाबांच्या रुम मध्ये गेलो. "बाबा नविन आई ना मला घाबरते !" मी बाबांच्या मिठीत शिरत म्हणालो.

"अरे वा ! आणि असे कोण म्हणाले ?" बाबांनी विचारले.

"आत्ता ना माझा बॉल शेजारच्या पार्वतीकाकुंच्या पत्र्यावर आपटला तर त्या म्हणाला की 'आई झोपते दुपारची डॉक्टरबरोबर आणी पोराची भीती म्हणुन त्याला सोडते घराबाहेर आमच्या छातीवर नाचायला...' बाबा आईला एकटे झोपायची भीती वाटती का हो माझ्यासारखी ?"

दुसर्‍याच क्षणी बाबांची पाच बोटे माझ्या गालावर आदळली, मी सुन्नच झालो. दुसर्‍याच क्षणी मला मिठी मारुन बाबा घळघळा रडायला लागले......

***************************************

(क्रमशः)


बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०

जबरदस्त

"पश्या रात्री माझ्याकडे झोपायला येतोस का आज?" नंदु अगदी अजीजीने विचारत होता मला.

"साल्या कोणी ऐकले तर काय म्हणेल ? खी खी खी" मी तेव्हड्यात नंद्याची खेचुन घेतली.

"आय एम सिरीयस यार. आई बाबा बालाजीला गेल्यापासुन ३ दिवस मी काढले कसे तरी पण एक तर नविन घर आणी त्यातुन आज अमावस्या...."

"बर बर चल दस्ती बंद कर आता, १०.०० पर्यंत येतो मी बाटली घेउन" मी नंद्याला डोळा मारत म्हणालो.

साधारण १०.३० च्या सुमारास मी नंद्याच्या घरी पोचलो.

"का रे येव्हडा उशीर झाला ?"

"यार नंद्या, तुमच्या सोसायटीच्या कॉर्नरला कोणीतरी माणुस अचानक रस्त्यातच मरुन पडलाय रे, भवतेक त्याला जोरदार हार्ट अ‍ॅटॅक आलेला दिसतोय. मी जवळ जाउन बघितले, एकदम पांढरा पडला होता भितीने आणी डोळे सुद्धा काहितरी भयानक, अमानवी बघितल्यासाखे विस्फारलेले होते रे." मी बाटली बाहेर काढत काढत नंद्याला पुर्ण हकिगत सांगीतली.

इकडे ऐकता ऐकता आमच्या नंद्याही पांढरा पडत चालला होता. "ए गप बाबा, मरु दे त्या मरणार्‍याला. त्या टिपॉय खाली ग्लास, पाणी, बर्फ सगळे आणुन ठेवलय बघ."

मग तो विषय दुर करुन आमची मैफल मस्त रंगली, ४/४ पेग मस्तपैकी मारुन आम्ही जेवणावर ताव मारुन टि व्ही चा आनंद लुटत बसलो.

"नंद्या चल बे १२.०० वाजायला आले झोपु आता" मी जांभई देत म्हणालो.

थोडी का कु करत शेवटी नंद्या एकदाचा झोपायला तयार झाला. वरच्या बेडरुम मधल्या डबलबेड वर आम्ही मस्तपैकी ताणुन दिली. एकतर अपरीचीत जागा असल्याने माल तशी पटकन झोपही लागेना पण ४ पेग आणी दाबुन झालेल्या जेवणामुळे डोळे मात्र चांगलेच जडावले होते.

काही वेळाने मी अर्धवट झोपेत आहे का जागा आहे ह्या संभ्रमीत अवस्थेत असतानाच मला बाजुला काही हालचाल जाणवली. च्यायला हा नंद्या लोळतो का काय ? मी मान वळवुन नंद्याकडे पाहायचा प्रयत्न केला, त्याच वेळी खोलीतला अंधार एकदम दाटुन आल्यासारखा झाला, अजुनच गडद झाला. कसल्याशा तिव्र सुगंधाने ती खोली भरुन गेली, बर्फाळ वार्‍याचे झोत अंगावर शहारे आणु लागले.

अत्यंत कष्टाने मी मान वळवुन नंदु कडे बघितले आणी अक्षरश: उडालोच.... माझ्यापासुन दोन हातावर नंदु शांत झोपला होता पण त्याचे मुंडकेच गायब होते. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना.

"घाबरला नाहीसना भावा?" अचानक उजव्या बाजुनी आवाज आला. बघतो तर नंद्याचे नुसते मुंडकेच हवेत तरंगत माझ्याशी बडबड करत होते.

"असे काय करतोयस ? घाबरलायस का तु? पाणी हवे का तुला? का दातखीळी बसलीये ?" नंद्याचे मुंडके आता खिदळत हसायला लागले.

"पश्या भावा तुझ्या हिंमतीची मात्र दिली पाहिजे हान ! भले भले फटकन प्राण सोडतात रे हे असले दृश्य बघुन. काहितर ठार वेडे होतात, तु मात्र त्या मानाने चांगलाच टिकलास की. तुला भिती नाही वाटते ?"

"भिती कसली रे नंद्या? उलट जो हुकुमी खेळ आपण कायम दाखवुन 'सावज' मिळवतो आज तोच खेळ कोणीतरी कल्पनेतही बसणार नाही असा दुसरा इतक्या सहजपणे दाखवतोय, हे बघुन असुया मात्र निश्चीतच वाटत आहे !" मी माझे मुंडके काढुन शेजारच्या टेबलावर ठेवता ठेवता म्हणालो.


शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०

द लायन किंग

काल डिस्नेचा 'लायन किंग स्पेशल एडीशन' चित्रपट मिळाला आणी मी अक्षरश: हातातले काम सोडुन त्यावर तुटुन पडलो.

लहानपणी बघितलेला तो सिंबा, नाला, टिमॉन, पुंबा, रफिकी सारे पुन्हा एकदा आजुबाजुला फेर धरुन नाचु लागले. आता काही वेळ का होईना लहानपण परत येणार ह्याचा मला जास्ती आनंद होता.खरतर ह्या अ‍ॅनीमेशनपटाची कथा आपल्या बॉलीवुड स्टाईलचीच म्हणता येईल. पण सादरीकरण मात्र अतिशय प्रभावी, उच्च आणी खिळवुन ठेवणारे. दिग्दर्शक रॉजर एलरला ह्या बद्दल अगदी पैकीच्या पैकी मार्कस. २ ऑस्करवर ह्या चित्रपटाने ताबा मिळवला ह्यात नवल नाही.

अफ्रिकेतील जंगलावर राज्य करणारा 'लायन किंग' मुफासा. त्याच्याकडे नव्या युवराजाच्या रुपाने 'सिंबा' चा जन्म होतो. सिंबाच्या जन्मामुळे मुफासाच्या नंतर सिंहासनाचा वारस होउ शकणारा सिंबाचा काका स्कार हताश होउन जातो. सतत वेगवेगळे कट रचणे, मुफासाचे वाईट चिंतणे आणी सिंहासनाची स्वप्ने पाहणे हा स्कारचा दिवसभराचा उद्योग असतो.आपल्या मुलाची जिवापाड काळजी घेणे, जंगलातल्या बर्‍या - वाईट सर्व गोष्टींची त्याला ओळख करुन देणे हे मुफासाचे रोजचे काम. सिंबा भविष्यातला राजा आहेस, ह्या दृष्टीने तो त्याला तयार करत असतो. एका दृष्यात सिंबाला जिवावरच्या संकटातुन सोडवुन आणत असताना तो काहिसा रागावुन सिंबाला चार गोष्टी सुनावत असतो, ह्या गोष्टी ऐकतानाच लहानग्या सिंबाचा पंजा वडीलांच्या उमटलेल्या मोठ्या पंजाच्या ठशावर पडतो. ह्या अप्रतीम दृष्यात सिंबाचा चेहरा आणी दिग्दर्शक खुप काही शिकवुन जातात.


तर इकडे दिवसभर समवयस्क मैत्रीण नाला बरोबर मनसोक्त हुंदडणे आणी झाझु ह्या वडीलांना नेमलेल्या पोपटाकडून जंगलाची माहिती मिळवत राहणे हे सिंबाचे छंद.ह्या स्कारचा तरसांवर भारी जीव. त्यांच्या मदतीने सिंबा आणी मुफासा ह्यांचा काटा काढुन जंगलाचा राजा बनण्याचे त्याचे स्वप्न असते. लवकरच स्कारच्या सैतानी मेंदुत असा एक कट शिजलाही जातो. आपल्या क्रुर आणी काहिशा विकृत तर्स मित्रांच्या सह्हायाने स्कार त्या कटाची जोरदार अंमलबजावणी करतो.स्कारच्या 'कृपेने' संकटात सापडलेल्या सिंबाला वाचवण्याच्या प्रयत्नात मुफासाला आपला जीव गमवावा लागतो. लहानग्या सिंबावर जणु आकाशच कोसळते. धरणीवर कोसळलेल्या आपल्या वडीलांना सिंबाचे उठवण्याचे प्रयत्न डोळ्याच्या कडा ओल्या करुन जातात. त्याच वेळी तिथे हजर झालेला स्कार, सिंबाला त्याच्या वडीलांच्या आणी पर्यायाने जंगलाच्या राजाच्या मृत्युला तो कसा जबाबदार आहे हे सुनावतो. आपण आपल्या वडीलांच्या मृत्युला कारणीभुत झालोय हे ऐकुन कोवळ्या सिंबाच्या डोक्यावर जणु आकाशच कोसळते. गोंधळलेल्या आणी घाबरलेल्या सिंबाला स्कार जंगल सोडुन लांब पळुन जायचा सल्ला देतो.. दुर खुप दुर निघुन जा असे तो सिंबाला सुनावतो.मानसीक धक्का बसलेला, बावरलेला सिंबा जंगलातुन पळ काढतो. बरेच अंतर काटल्यावर दमलेला छोटासा सिंबा टिमॉन आणी पुंबाच्या छत्रछायेखाली येतो, आणी मग सुरु होते सिंबाच्या एका वेगळ्याच आनंदी आयुष्याची सुरुवात. 'हाकुन मतात मीन्स नो वरीज' असे जीवनाचे तत्वज्ञान टिमॉन आणी पुंबा सिंबाला शिकवतात. आयुष्यात मागे काय घडले ते विसरायला लावुन त्याला नविन आयुष्य जगायला शिकवतात.

अशीच काही वर्षे उलटुन जातात आणी तरुण, रुबाबदार सिंबाची अचानक बालमैत्रीण नालाशी गाठ पडते. सिंबाला जिवंत पाहुन नाला आनंदाने बेभान होते. सिंबाच्या पलायनानंतर जंगलाय काय घडले हे ती सिंबाला सांगते. स्कार च्या राजा होण्याने त्याच्या तरस मित्रांची चंगळ आणी इतर प्राण्यांचे होत असलेले हाल, नाश पावत चाललेले जंगल, शिकारीची कमतरता आणी सिंबाच्या आईला आणी कळपातील इतर सदस्यांना शिकारीला पाठवुन स्वत: आरामत जगत असलेला स्कार हे सर्व वर्णन ती सिंबाला ऐकवते.स्वत:ला अजुनही गुन्हेगार मानत असलेला सिंबा परत येण्यास तयार नसतो पण नालाचे प्रेमही त्याला सोडवत नसते. अशातच एक दिवशी काहीशा ठाम निश्चयाने सिंबा आपल्या मातृभुमीत पाय ठेवतो आणी आपल्या राज्यावर हक्क सांगतो. स्कारवर विजय मिळवुन तो पुन्हा राजा बनतो आणी जंगलात पुन्हा नंदनवनही फुलवतो.साधी सोपी आणी सुंदर कहाणी. पण छोट्या छोट्या प्रसंगातुनही खुप काही शिकवुन जाणारी. प्राण्यांच्या भावविश्वाचा आणी आपल्या मनाचा ठाव घेणारी.

ह्या राजाला आणी त्याच्या मनमोहक राज्याला आवर्जुन भेट द्याच.चिल्ड्रन ऑफ हेवनजागतीक चित्रपटांमध्ये एक मानाचे स्थान पटकावुन असलेला हा इराणी चित्रपट. सुंदर ह्या शब्दाशिवाय अन्य उपमाच ह्याला शोभणार नाही.

बहिण भावाच्या प्रेमाची एक निर्व्याज कथा आणी त्याच्या आजुबाजुने येणारे भावनीक प्रसंग, त्या त्या काळचे सामाजीक संदर्भ हा ह्या चित्रपटाचा आत्मा. दिग्दर्शक माजिद माजीदी सारखा ताकदवान माणुस. चित्रपटाची भाषा पर्शीयन आहे पण खरे सांगायचे तर ह्या चित्रपटाला बघताना भाषेची गरजच जाणवत नाही इतकी प्रत्येक फ्रेम हृदयाचा ठाव घेते.

अली आणी झारा हे दोघे भाउ बहीण. अली ९ वर्षाचा तर धाकटी झार ७ वर्षाची.सुरुवातीच्या दृष्यातच अली आपल्या बहिणीचे दुरुस्तीला नेलेले बुट परत घेउन येत असताना दिसतो, बाजारात तो एका दुकानात काही सामान खरेदी करायला थांबतो. दुकाना बाहेर त्याने ठेवलेले बुट तो खरेदी करुन येइपर्यंत गायब झालेले असतात. तो खुप शोध घेतो पण हाती लागते शुन्य. हि बातमी कळल्यावर झारा रडवेली होते कारण तिच्यापाशी शाळेत जायला दुसरे बुटच नसतात. आई बाबांना काही सांगु नको मी शोधतो तुझे बुट असे सांगुन अली पुन्हा शोध मोहिम राबवतो.

ह्या प्रसंगात दोरीवरचे वाळत घातलेले कपडे घरात नेत असताना झाराला सगळ्यांचे बुट दिसतात पण त्यात आपले बुट नाहीत हे बघुन तिच्या चेहर्‍यावर जे भाव उमटतात ते त्या क्षणी आपल्याला तिच्या भुमीकेत शिरवतात, आता आपल्याला आपलेच बुट हरवल्यासारखे वाटायला लागते.

आपल्या गरीबीची जाणीव असलेला अली झाराला म्हणतो की "तुझे बुट हरवले हे आई बाबांना सांगु नको ते मला मारतील, खरतर मी माराला भिउन हे सांगत नाहिये पण ते खुप गरीब आहेत ग, त्यांच्याकडे नवीन बुट घ्यायला पैसे नाहीत हे तुझ्या लक्षात येतय का?" खरच सांगतो त्या ९ वर्षाच्या मुलाचा हा समजुतदारपणा खाडकन कुठेतरी माझ्या मुस्काडीत मारुन गेला. त्याच्या ह्या वाक्यानंतर संमती दर्शक भाव आणत गप्प बसलेल्या चेहर्‍याचा झाराचा क्लोज अप तर निव्वळ अ प्र ती म.

आता अली ह्या अडचणीवरही उपाय शोधुन काढतो, झाराची सकाळची शाळा आहे तर अलीची दुपारची. झाराने अलीचे बुट घालुन शाळेत जायचे, मग शाळा सुटल्या सुटल्या झाराने पळत पळत यायचे आणी गल्लीच्या तोंडापाशी तिची वाट बघत असलेल्या अलीने आपले बुट घालुन शाळेकडे निघायचे. आता आपणही त्यांच्यात येव्हडे रंगुन गेलेलो असतो की झाराबरोबर आपणही सुसाट धावत असतो. ती पळताना कुठे पडु नये, तो ही शाळेत वेळेत पोचावा अशी आपण प्रार्थना करायला सुरुवात करतो, अक्षरश: आपण त्या बहिण भावांबरोबर एकरुप होउन जातो. हेच आहे माजीदीच्या चित्रपटाचे खरे यश.

एका प्रसंगात तो फुटबॉल खेळुन दोन्ही बुट चिखलानी अगदी बरबटुन आणतो, ते बुट मग दोघेही स्वच्छ धुतात पाण्याचे फुगे करुन उडवतात तेंव्हा आपणही तो अनंद मनसोक्त लुटुन घेतो.


शाळेतल्या झाराच्या एका मैत्रीणीचे बुट तीला खुप आवडत असतात, आता ती मैत्रीण नवे बुट घेते, "जुन्या बुटाचे काय केले ग ?" ह्या झाराच्या प्रश्नावर ती मैत्रीण सहजपणे भंगारवाल्याला दिले असे सांगते, तेंव्हा ज्या रागारागात झारा "का?' असे विचारते ते दृष्य बघण्यासारखेच. मला का नाही दिले ते जुने बुट ? असा विचार भावाचे बुट घालुन धावणार्‍या झाराला नक्की पडला असणार.

शाळेच्या चाचणी परिक्षेत भावाला वेळ मिळावा म्हणुन वेळे आधीच पेपर देउन झारा घराकडे पळत सुटते, मात्र दुर्दैवाने तिच्या पायातला एक बुट ओढ्यात पडतो आणी त्याक्षणी आपले मन घाबरते, आता काय ??
ओढ्यात वाहणार्‍या बुटामागे झारा धावते आणी तिच्या मागे आपण. अडक बाबा कुठेतरी, नको तिचा अंत बघु ! आपण रागारागानी त्या बुटाला ठणकावतो. जणु आपले ऐकल्यासारखा तो बुट एका ठिकाणी अडकुन पडतो. आता मात्र झाराबाईंना रडु कोसळते. आपल्यामुळे भावाची परिक्षा बुडणार हे तीला अस्वस्थ करते. तेव्हड्यात तीचे रडे ऐकुन बाजुचा दुकानदार येउन तीला तो बुट काढुन देतो. कोण कुठला दुकानदार पण त्या क्षणी मी त्याला अगदी मनापासुन थॅंक्यु म्हणालो.

नंतरच्या एका प्रसंगात अली वडीलांबरोबर काम मिळवण्यासाठी शहरात जातो, मनासारखे कामही मिळते. सायकलवरुन येताना दोघेही पुढच्या खरेदीचे स्वप्न रंगवायला लगतात. त्यावेळीही "आपण सगळ्यात आधी झाराला नवीन बुट आणु" म्हणणारा अली पटकन डोळ्यातुन पाणी काढुन जातो.

आता अली एका धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतो. का ? तर त्या स्पर्धेचे तिसरे बक्षीस म्हणजे एक बुटांची जोडी असते. "पण तु तिसराच येशील कशावरुन?" ह्या झाराच्या प्रश्नाला तो "मला खात्री आहे म्हणुन" असे अगदी आत्मविश्वासाने उत्तर देतो.


शर्यत चालु होते... आपले बुट घालुन धावणारी, अडखळणारी झारा डोळ्यासमोर येते आणी अली अजुन जिवाच्या आकांताने धावत सुटतो. तो येव्हडा जोरात धावतो की पहिलाच येतो आणी अंतीम रेषेवर येउन कोसळतो. सगळे शिक्षक अलीला उचलुन घेतात, पण अलीला मात्र आपण तीसरा आलोय का नाही हे जाणुन घ्यायची उत्सुकता असते. आपण पहिले आलोय कळल्यावर तर त्याच्या दु:खाला पारावार राहात नाही. तो फोटोसाठी सुद्धा मान वर करत नाही.

दु:खी अली कसातरी घरी पोचतो, पायातले फाटलेले बुट तो फेकुन देतो. त्याच्या संपुर्ण पायावर फोड आले आहेत, रडत रडत तो ते पाय पाण्यात सोडुन बसतो. रडणार्‍या भावासाठी झारा त्याच्याकडे धावते.त्याच क्षणी कॅमेरा फिरतो आणी आपल्याला सायकलला बुटांचे दोन नविन जोड लावुन घराकडे परतणारे त्या दोघांचे वडील दिसतात.

ह्या इथेच चित्रपट संपतो.

खरेतर ह्या चित्रपटावर काय बोलु ? तुम्ही हा बघावा आणी एक नितांत सुंदर वेगळा अनुभव घ्यावात ही इच्छा.

अवांतर :- ह्या चित्रपटाचे सिंगापुरमध्ये "होम रन" नावाने केलेले रुपांतरही अप्रतीम.