गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०१०

हुंकार वेदनांचे ...

"अरे किती भाजलय रे ? कुठे गेला होतास चटके खायला ? बेअक्कल! २/२ महिने घराबाहेर राहुन तुमच्यासाठी झिजायचे आणी घरी आले की हे भोगायचे.." बाबा माझ्या हाताला मलम लावता लावता बोलत होते.

मी केवीलवाण्या चेहर्‍याने ऐकत होतो. आईने बंबाच्या गरम राखेत हात कोंबला हे सांगायची भिती वाटली.... हो भितीच. मला सगळ्याची भितीच वाटते. आईची, घराच्या भिंतींची, शाळेची, शाळेतल्या मुलांची....

********************************

आज बाबा आणी शाळेचे पत्र एकत्रच घरी आले. 'एकदा समक्ष येउन भेटा' शाळेतुन पत्र आले होते.

"अहो तुमचा मुलगा पहिल्या पाचातला वगैरे नाही, पण हुषार आहे हो. पण महिना होत आला आजकाल तो काही बोलतच नाही, विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे पण देत नाही, नुसता खाली मान घालुन उभा राहतो. लक्ष द्या त्याच्याकडे हे वय नाजुक असते." वर्गशिक्षीका पोटतिकडीने सांगत होत्या आणी बाबा खाली मान घालुन ऐकत होते...

आईने जिभेला चटका दिलाय, बोलता येत नाहीये हे कसे सांगु बाबांना ? पण खरेतर बरेच झाले आजकाल काही बोलावेसेच वाटत नाही.

************************************

"प्रसाद किती सुंदर निबंध लिहिला आहेस रे. येव्हडे प्रेम करतोस तुमच्या कुत्र्यावर ? आजवर ह्या विषयावर किती निबंध वाचले पण हा अगदी खरा, जिवंत वाटतोय बघ. मी येउ एकदा तुमच्या कुत्र्याला भेटायला ?" बाई विचारत होत्या.

मी कसनुसा हसलो आणी वही घेउन जागेवर जाउन बसलो.

मी फक्त आमच्या मोत्याशीच बोलतो, त्यालाच मिठी मारुन रडतो आणी तो पण मला खुप समजावतो... त्याला मिठी मारलीना की अंगावरचे वळ दुखेनासे होतात.... बाईंना कसे कळणार ?

*********************************

"मुकुंदा मला तुझे प्रामाणीक मत हवे आहे." बाबा तावातावाने बोलत होते.

"हे बघ अवी, मी आधी तुझा जवळचा मित्र आहे आणि मग फॅमीली फिजीशीयन. प्रसादला मी लहानपणापासुन बघतोय, मला त्याच्यात वेडसरपणाची झाक किंवा खुनशीपणा कधीच आढळलेला नाहिये. हि इज ऍज नॉर्मल एज एनी अदर चाईल्ड." अत्रे काका म्हणाले.

"मुकुंदा अरे कसे सांगु तुला ? पोरगा आईच्या मायेला पोरका व्हायला नको म्हणुन केवळ दुसर्‍या लग्नाला तयार झालो. त्या माऊलीने देखील ह्याच्यासाठी काही करायचे कमी ठेवले नाही. पण हा तिच्याशी देखील पटवुन घेत नाही रे. शाळेत जाताना डब्यातील अन्न फेकुन देतो आणी डब्यात माती भरुन घेतो. शाळेत शिक्षक रागावले तर आईने दिली सांगतो. अरे आमचा मोत्या, येव्हडे गुणी जनावर, काल ह्यानी त्याच्या डोक्यात दगड घालुन ....." बाबा दोन्ही तळव्यात डोके गच्च आवळुन बसले होते.

"नाही हो, मी नाही मारले मोत्याला, आईची शपथ ! उलट मला खडे मारणार्‍या मुलांवर तो धावुन गेला म्हणुन त्यांनीच तो काळा मोठा दगड त्याच्या डोक्यात मारला....."

मी कितीतरी वेळ त्याला मिठी मारुन रडत बसलो होतो. केव्हडे तरी रक्त आले होते.. मोत्याला मिठी मारुन रडता रडता कधी डोळे मिटले गेले कळलेच नाही....

**********************************************

बाबा आजकाल त्यांच्या रुम मध्येच झोपुन असतात दिवसभर. त्यांना फिरायला एक चाकांची खुर्ची पण आणुन दिलीये अत्रे काकांनी. अत्रे काका आजकाल रोज आमच्या घरी येतात.. येताना मला कायम चॉकलेट आणतात.

आज दुपारीच मी खुप खुषीत होतो, गोष्टच तशी घडली होती. मी धावत धावत बाबांच्या रुम मध्ये गेलो. "बाबा नविन आई ना मला घाबरते !" मी बाबांच्या मिठीत शिरत म्हणालो.

"अरे वा ! आणि असे कोण म्हणाले ?" बाबांनी विचारले.

"आत्ता ना माझा बॉल शेजारच्या पार्वतीकाकुंच्या पत्र्यावर आपटला तर त्या म्हणाला की 'आई झोपते दुपारची डॉक्टरबरोबर आणी पोराची भीती म्हणुन त्याला सोडते घराबाहेर आमच्या छातीवर नाचायला...' बाबा आईला एकटे झोपायची भीती वाटती का हो माझ्यासारखी ?"

दुसर्‍याच क्षणी बाबांची पाच बोटे माझ्या गालावर आदळली, मी सुन्नच झालो. दुसर्‍याच क्षणी मला मिठी मारुन बाबा घळघळा रडायला लागले......

***************************************

(क्रमशः)


2 टिप्पणी(ण्या):

हेरंब म्हणाले...

भयंकर..

सुमीत भातखंडे म्हणाले...

namaskaar,

yaa aadhihee ha lekh vaachalaa hota. Ithe parat vaachala. Punha nishabda zalo.

Pudhachaa bhaag liha ki lavakar.

Sumeet Bhatkhande

टिप्पणी पोस्ट करा