शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०
जागतीक चित्रपटांमध्ये एक मानाचे स्थान पटकावुन असलेला हा इराणी चित्रपट. सुंदर ह्या शब्दाशिवाय अन्य उपमाच ह्याला शोभणार नाही.
बहिण भावाच्या प्रेमाची एक निर्व्याज कथा आणी त्याच्या आजुबाजुने येणारे भावनीक प्रसंग, त्या त्या काळचे सामाजीक संदर्भ हा ह्या चित्रपटाचा आत्मा. दिग्दर्शक माजिद माजीदी सारखा ताकदवान माणुस. चित्रपटाची भाषा पर्शीयन आहे पण खरे सांगायचे तर ह्या चित्रपटाला बघताना भाषेची गरजच जाणवत नाही इतकी प्रत्येक फ्रेम हृदयाचा ठाव घेते.
अली आणी झारा हे दोघे भाउ बहीण. अली ९ वर्षाचा तर धाकटी झार ७ वर्षाची.
सुरुवातीच्या दृष्यातच अली आपल्या बहिणीचे दुरुस्तीला नेलेले बुट परत घेउन येत असताना दिसतो, बाजारात तो एका दुकानात काही सामान खरेदी करायला थांबतो. दुकाना बाहेर त्याने ठेवलेले बुट तो खरेदी करुन येइपर्यंत गायब झालेले असतात. तो खुप शोध घेतो पण हाती लागते शुन्य. हि बातमी कळल्यावर झारा रडवेली होते कारण तिच्यापाशी शाळेत जायला दुसरे बुटच नसतात. आई बाबांना काही सांगु नको मी शोधतो तुझे बुट असे सांगुन अली पुन्हा शोध मोहिम राबवतो.
ह्या प्रसंगात दोरीवरचे वाळत घातलेले कपडे घरात नेत असताना झाराला सगळ्यांचे बुट दिसतात पण त्यात आपले बुट नाहीत हे बघुन तिच्या चेहर्यावर जे भाव उमटतात ते त्या क्षणी आपल्याला तिच्या भुमीकेत शिरवतात, आता आपल्याला आपलेच बुट हरवल्यासारखे वाटायला लागते.
आपल्या गरीबीची जाणीव असलेला अली झाराला म्हणतो की "तुझे बुट हरवले हे आई बाबांना सांगु नको ते मला मारतील, खरतर मी माराला भिउन हे सांगत नाहिये पण ते खुप गरीब आहेत ग, त्यांच्याकडे नवीन बुट घ्यायला पैसे नाहीत हे तुझ्या लक्षात येतय का?" खरच सांगतो त्या ९ वर्षाच्या मुलाचा हा समजुतदारपणा खाडकन कुठेतरी माझ्या मुस्काडीत मारुन गेला. त्याच्या ह्या वाक्यानंतर संमती दर्शक भाव आणत गप्प बसलेल्या चेहर्याचा झाराचा क्लोज अप तर निव्वळ अ प्र ती म.
आता अली ह्या अडचणीवरही उपाय शोधुन काढतो, झाराची सकाळची शाळा आहे तर अलीची दुपारची. झाराने अलीचे बुट घालुन शाळेत जायचे, मग शाळा सुटल्या सुटल्या झाराने पळत पळत यायचे आणी गल्लीच्या तोंडापाशी तिची वाट बघत असलेल्या अलीने आपले बुट घालुन शाळेकडे निघायचे. आता आपणही त्यांच्यात येव्हडे रंगुन गेलेलो असतो की झाराबरोबर आपणही सुसाट धावत असतो. ती पळताना कुठे पडु नये, तो ही शाळेत वेळेत पोचावा अशी आपण प्रार्थना करायला सुरुवात करतो, अक्षरश: आपण त्या बहिण भावांबरोबर एकरुप होउन जातो. हेच आहे माजीदीच्या चित्रपटाचे खरे यश.
एका प्रसंगात तो फुटबॉल खेळुन दोन्ही बुट चिखलानी अगदी बरबटुन आणतो, ते बुट मग दोघेही स्वच्छ धुतात पाण्याचे फुगे करुन उडवतात तेंव्हा आपणही तो अनंद मनसोक्त लुटुन घेतो.
शाळेतल्या झाराच्या एका मैत्रीणीचे बुट तीला खुप आवडत असतात, आता ती मैत्रीण नवे बुट घेते, "जुन्या बुटाचे काय केले ग ?" ह्या झाराच्या प्रश्नावर ती मैत्रीण सहजपणे भंगारवाल्याला दिले असे सांगते, तेंव्हा ज्या रागारागात झारा "का?' असे विचारते ते दृष्य बघण्यासारखेच. मला का नाही दिले ते जुने बुट ? असा विचार भावाचे बुट घालुन धावणार्या झाराला नक्की पडला असणार.
शाळेच्या चाचणी परिक्षेत भावाला वेळ मिळावा म्हणुन वेळे आधीच पेपर देउन झारा घराकडे पळत सुटते, मात्र दुर्दैवाने तिच्या पायातला एक बुट ओढ्यात पडतो आणी त्याक्षणी आपले मन घाबरते, आता काय ??
ओढ्यात वाहणार्या बुटामागे झारा धावते आणी तिच्या मागे आपण. अडक बाबा कुठेतरी, नको तिचा अंत बघु ! आपण रागारागानी त्या बुटाला ठणकावतो. जणु आपले ऐकल्यासारखा तो बुट एका ठिकाणी अडकुन पडतो. आता मात्र झाराबाईंना रडु कोसळते. आपल्यामुळे भावाची परिक्षा बुडणार हे तीला अस्वस्थ करते. तेव्हड्यात तीचे रडे ऐकुन बाजुचा दुकानदार येउन तीला तो बुट काढुन देतो. कोण कुठला दुकानदार पण त्या क्षणी मी त्याला अगदी मनापासुन थॅंक्यु म्हणालो.
नंतरच्या एका प्रसंगात अली वडीलांबरोबर काम मिळवण्यासाठी शहरात जातो, मनासारखे कामही मिळते. सायकलवरुन येताना दोघेही पुढच्या खरेदीचे स्वप्न रंगवायला लगतात. त्यावेळीही "आपण सगळ्यात आधी झाराला नवीन बुट आणु" म्हणणारा अली पटकन डोळ्यातुन पाणी काढुन जातो.
आता अली एका धावण्याच्या स्पर्धेत भाग घेतो. का ? तर त्या स्पर्धेचे तिसरे बक्षीस म्हणजे एक बुटांची जोडी असते. "पण तु तिसराच येशील कशावरुन?" ह्या झाराच्या प्रश्नाला तो "मला खात्री आहे म्हणुन" असे अगदी आत्मविश्वासाने उत्तर देतो.
शर्यत चालु होते... आपले बुट घालुन धावणारी, अडखळणारी झारा डोळ्यासमोर येते आणी अली अजुन जिवाच्या आकांताने धावत सुटतो. तो येव्हडा जोरात धावतो की पहिलाच येतो आणी अंतीम रेषेवर येउन कोसळतो. सगळे शिक्षक अलीला उचलुन घेतात, पण अलीला मात्र आपण तीसरा आलोय का नाही हे जाणुन घ्यायची उत्सुकता असते. आपण पहिले आलोय कळल्यावर तर त्याच्या दु:खाला पारावार राहात नाही. तो फोटोसाठी सुद्धा मान वर करत नाही.
दु:खी अली कसातरी घरी पोचतो, पायातले फाटलेले बुट तो फेकुन देतो. त्याच्या संपुर्ण पायावर फोड आले आहेत, रडत रडत तो ते पाय पाण्यात सोडुन बसतो. रडणार्या भावासाठी झारा त्याच्याकडे धावते.
त्याच क्षणी कॅमेरा फिरतो आणी आपल्याला सायकलला बुटांचे दोन नविन जोड लावुन घराकडे परतणारे त्या दोघांचे वडील दिसतात.
ह्या इथेच चित्रपट संपतो.
खरेतर ह्या चित्रपटावर काय बोलु ? तुम्ही हा बघावा आणी एक नितांत सुंदर वेगळा अनुभव घ्यावात ही इच्छा.
अवांतर :- ह्या चित्रपटाचे सिंगापुरमध्ये "होम रन" नावाने केलेले रुपांतरही अप्रतीम.
लेबल: इंग्रजी चित्रपट
फॉलोअर
Translation
Save as PDF
सदस्यत्व घ्या
Labels
- इंग्रजी चित्रपट (10)
- कथा (29)
- चित्रपट (20)
- तेलगु (1)
- पुस्तक प्रकाशन (3)
- प्रहसन (12)
- भयपट (4)
- मराठी (8)
- स्तंभलेखन (1)
- हिंदी (12)
3 टिप्पणी(ण्या):
हा चित्रपट माझ्याजवळ् आहे. माझ्या मुलाने तो डाउनलोड करुन् मला दिला आहे. त्या शिवाय माजिदीचा 'बरन' नावाचा नितांत सुंदर चित्रपट सुद्धा त्याने दिला आहे. तो सुद्धा अप्रतिम आहे. जरुर पहा.
अगदी मनातल लिहील आहेस प्रसाद .. वा .
खरोखर चित्रपट गुंगवून टाकणारा व अंतर्मुख व्हायला लावणारा आहे. माझा सगळ्यात आवडता चित्रपट हा children of heaven (बच्चा ए आशेमान) आणि अजून एक आहे colors of paradise (रंगे खोदा) आहेत .. आता परत बघणार आहे तुझ्यामुळे .. लगेच !
veerendra.. he donahi chitrapat avarjun paha apratim ahet....
aani children of heaven varach adharit bumm bumm bole bollywood madhe ahe pan to titpat jamala ahe ki nahi thauk nahi ani tyala nakkich bollywood touch asnarach na....
aani ek ahe.. I am jumping on the puddles again .. apratim ahe... kunacha ahe exactle nahi athavat....milala tar sarvani jarur paha
टिप्पणी पोस्ट करा