शुक्रवार, ५ फेब्रुवारी, २०१०
काल डिस्नेचा 'लायन किंग स्पेशल एडीशन' चित्रपट मिळाला आणी मी अक्षरश: हातातले काम सोडुन त्यावर तुटुन पडलो.
लहानपणी बघितलेला तो सिंबा, नाला, टिमॉन, पुंबा, रफिकी सारे पुन्हा एकदा आजुबाजुला फेर धरुन नाचु लागले. आता काही वेळ का होईना लहानपण परत येणार ह्याचा मला जास्ती आनंद होता.
खरतर ह्या अॅनीमेशनपटाची कथा आपल्या बॉलीवुड स्टाईलचीच म्हणता येईल. पण सादरीकरण मात्र अतिशय प्रभावी, उच्च आणी खिळवुन ठेवणारे. दिग्दर्शक रॉजर एलरला ह्या बद्दल अगदी पैकीच्या पैकी मार्कस. २ ऑस्करवर ह्या चित्रपटाने ताबा मिळवला ह्यात नवल नाही.
अफ्रिकेतील जंगलावर राज्य करणारा 'लायन किंग' मुफासा. त्याच्याकडे नव्या युवराजाच्या रुपाने 'सिंबा' चा जन्म होतो. सिंबाच्या जन्मामुळे मुफासाच्या नंतर सिंहासनाचा वारस होउ शकणारा सिंबाचा काका स्कार हताश होउन जातो. सतत वेगवेगळे कट रचणे, मुफासाचे वाईट चिंतणे आणी सिंहासनाची स्वप्ने पाहणे हा स्कारचा दिवसभराचा उद्योग असतो.
आपल्या मुलाची जिवापाड काळजी घेणे, जंगलातल्या बर्या - वाईट सर्व गोष्टींची त्याला ओळख करुन देणे हे मुफासाचे रोजचे काम. सिंबा भविष्यातला राजा आहेस, ह्या दृष्टीने तो त्याला तयार करत असतो. एका दृष्यात सिंबाला जिवावरच्या संकटातुन सोडवुन आणत असताना तो काहिसा रागावुन सिंबाला चार गोष्टी सुनावत असतो, ह्या गोष्टी ऐकतानाच लहानग्या सिंबाचा पंजा वडीलांच्या उमटलेल्या मोठ्या पंजाच्या ठशावर पडतो. ह्या अप्रतीम दृष्यात सिंबाचा चेहरा आणी दिग्दर्शक खुप काही शिकवुन जातात.
तर इकडे दिवसभर समवयस्क मैत्रीण नाला बरोबर मनसोक्त हुंदडणे आणी झाझु ह्या वडीलांना नेमलेल्या पोपटाकडून जंगलाची माहिती मिळवत राहणे हे सिंबाचे छंद.
ह्या स्कारचा तरसांवर भारी जीव. त्यांच्या मदतीने सिंबा आणी मुफासा ह्यांचा काटा काढुन जंगलाचा राजा बनण्याचे त्याचे स्वप्न असते. लवकरच स्कारच्या सैतानी मेंदुत असा एक कट शिजलाही जातो. आपल्या क्रुर आणी काहिशा विकृत तर्स मित्रांच्या सह्हायाने स्कार त्या कटाची जोरदार अंमलबजावणी करतो.
स्कारच्या 'कृपेने' संकटात सापडलेल्या सिंबाला वाचवण्याच्या प्रयत्नात मुफासाला आपला जीव गमवावा लागतो. लहानग्या सिंबावर जणु आकाशच कोसळते. धरणीवर कोसळलेल्या आपल्या वडीलांना सिंबाचे उठवण्याचे प्रयत्न डोळ्याच्या कडा ओल्या करुन जातात. त्याच वेळी तिथे हजर झालेला स्कार, सिंबाला त्याच्या वडीलांच्या आणी पर्यायाने जंगलाच्या राजाच्या मृत्युला तो कसा जबाबदार आहे हे सुनावतो. आपण आपल्या वडीलांच्या मृत्युला कारणीभुत झालोय हे ऐकुन कोवळ्या सिंबाच्या डोक्यावर जणु आकाशच कोसळते. गोंधळलेल्या आणी घाबरलेल्या सिंबाला स्कार जंगल सोडुन लांब पळुन जायचा सल्ला देतो.. दुर खुप दुर निघुन जा असे तो सिंबाला सुनावतो.
मानसीक धक्का बसलेला, बावरलेला सिंबा जंगलातुन पळ काढतो. बरेच अंतर काटल्यावर दमलेला छोटासा सिंबा टिमॉन आणी पुंबाच्या छत्रछायेखाली येतो, आणी मग सुरु होते सिंबाच्या एका वेगळ्याच आनंदी आयुष्याची सुरुवात. 'हाकुन मतात मीन्स नो वरीज' असे जीवनाचे तत्वज्ञान टिमॉन आणी पुंबा सिंबाला शिकवतात. आयुष्यात मागे काय घडले ते विसरायला लावुन त्याला नविन आयुष्य जगायला शिकवतात.
अशीच काही वर्षे उलटुन जातात आणी तरुण, रुबाबदार सिंबाची अचानक बालमैत्रीण नालाशी गाठ पडते. सिंबाला जिवंत पाहुन नाला आनंदाने बेभान होते. सिंबाच्या पलायनानंतर जंगलाय काय घडले हे ती सिंबाला सांगते. स्कार च्या राजा होण्याने त्याच्या तरस मित्रांची चंगळ आणी इतर प्राण्यांचे होत असलेले हाल, नाश पावत चाललेले जंगल, शिकारीची कमतरता आणी सिंबाच्या आईला आणी कळपातील इतर सदस्यांना शिकारीला पाठवुन स्वत: आरामत जगत असलेला स्कार हे सर्व वर्णन ती सिंबाला ऐकवते.
स्वत:ला अजुनही गुन्हेगार मानत असलेला सिंबा परत येण्यास तयार नसतो पण नालाचे प्रेमही त्याला सोडवत नसते. अशातच एक दिवशी काहीशा ठाम निश्चयाने सिंबा आपल्या मातृभुमीत पाय ठेवतो आणी आपल्या राज्यावर हक्क सांगतो. स्कारवर विजय मिळवुन तो पुन्हा राजा बनतो आणी जंगलात पुन्हा नंदनवनही फुलवतो.
साधी सोपी आणी सुंदर कहाणी. पण छोट्या छोट्या प्रसंगातुनही खुप काही शिकवुन जाणारी. प्राण्यांच्या भावविश्वाचा आणी आपल्या मनाचा ठाव घेणारी.
ह्या राजाला आणी त्याच्या मनमोहक राज्याला आवर्जुन भेट द्याच.
लेबल: इंग्रजी चित्रपट
फॉलोअर
Translation
Save as PDF
सदस्यत्व घ्या
Labels
- इंग्रजी चित्रपट (10)
- कथा (29)
- चित्रपट (20)
- तेलगु (1)
- पुस्तक प्रकाशन (3)
- प्रहसन (12)
- भयपट (4)
- मराठी (8)
- स्तंभलेखन (1)
- हिंदी (12)
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा