सोमवार, २९ मार्च, २०१०

सव्यसाचि (भाग -५)

दोनच दिवसात माझ्या विमानाने बोस्टनच्या दिशेने उड्डाण केले आणी मी एका नव्या आयुष्याच्या दिशेने......

कॅथ्रीन माझी सहप्रवासी आणी मार्गदर्शक होती. वयाने २३/२४ वर्षाची असणारी कॅथ्रीन दिसायला अप्रतिमच होती, बोलायला देखील हुषार पण जमेल तेवढे कमी आणी कामापुरते बोलणारी. इतर कोणती वेळ असती तर मी नक्कीच थोडेफार फ्लर्ट वगैरे करण्याचा प्रयत्न केला असता हे नक्की. पण सध्यातरी माझी मनस्थिती फार वेगळी होती. मी कुठे चाललो आहे हे मला माहिती होते, पण का आणी कोणाला भेटायला ह्याची काहिच माहिती न्हवती. मी आपला मनातल्या मनात पुढचे आराखडे बांधत वेळ काढत होतो.

"सिट बेल्ट बांधुन घे" कॅथ्रिन खिडकीतुन बाहेर डोकावत म्हणाली. भवतेक विमान लॅंडीग करणार होते.

"आपण उतरुन कोठे जाणार आहोत ??" मी विचारले.

"मी तरी मस्त बार मध्ये जाणार आहे, तुझे माहित नाही" कॅथ्रीन शांतपणे म्हणाली.

"व्हॉट डु यु मीन ?" मी आश्चर्याने विचारले.

" ओरडू नकोस ! माझी ड्युटी तुला इथपर्यंत पोचवणे आणी कार्लोसच्या हवाली करणे येवढीच आहे. गॉट इट ??"

"कार्लोस कोण आहे?"

"बहुदा माझ्या सारखाच एक ट्रान्सपोर्टर" कॅथ्रीन शांतपणे उदगारली.
आपली गाठ कोण्या ऐर्‍या गैर्‍या गावगुंड टोळीशी नाही, हे आता माझ्या लक्षात आले होते.

विमानतळावरुन काळ्या ठेंगण्या कार्लोसने मला पिक-अप केले आणी काही न बोलता गाडीतुन मला शहरी गजबजाटापासून दुर असलेल्या एका फार्महाउस वर आणून सोडले. मी कार्लोसला बोलते करण्याचा खुप प्रयत्न करुन पाहीला पण त्याच्या एकुण चेहर्‍यावरुन त्याला इंग्रजी येत नसावे अथवा तो एक कसलेला अभिनेता असावा हेच दोन निष्कर्ष निघु शकत होते. फार्महाऊसच्या दारात मला सोडून कार्लोस झपकन निघुन सुद्धा गेला. ३ आडदांडा कुत्र्यांनी आधी माझा ताबा घेतला आणी त्यानंतर ४ लुकड्या सुकड्या गार्डनी. (हे गार्ड साले मार्शल आर्ट एक्सपर्ट आहेत हे मला पुढे कळले तेंव्हा माझा चेहरा बघण्या लायक झाला असणार हे नक्की)

"वेलकम टू द वर्ल्ड ऑफ एलिट मि. पॅपिलॉन" रुंद हसत एक डबल हाडा पेराचा माणूस हातात पाईप घेउन माझे स्वागत करायला अचानक दरवाजात उगवला. हि असली माणसे मी फक्त चित्रात आणी इंग्रजी सिनेमात बघितली होती. मी कसेनुसे हसत त्याच्या पंजात माझा पंजा दिला. त्या पंजात माझे हाताचे दोन्ही आणी एक पायाचा पंजा देखील मावेल असे मला वाटून गेले.

आम्ही आतल्या खोलीत प्रवेश केला. आत मध्ये एका मोठ्या कोचावर एक साधारण ३५ वर्षाची स्त्री आरामात बिअरचे घोट घेत ब्रिटनीचा नाच बघत होती. तिच्या शेजारीच एक मध्यमवीन माणूस घोड्यांच्या शर्यतीच्या पुस्तकात मुंडके खुपसून बसला होता. बाजुच्या दोन खुर्च्यात दोन साधारण २५/२६ वर्षाचे तरुण आजुबाजुच्या विश्वाचे भान विसरुन प्ले-स्टेशन मध्ये गुंगले होते.

मी आत प्रवेश करताच ती स्त्री लगबगीने उठली, अत्यंत आनंद झाल्यासारखे भाव चेहर्‍यावर आणत त्या स्त्रीने पुढे येउन मला मिठी मारली. रीत वगैरे असते ठिक आहे पण साला एखाद्या स्त्रीने अशी पटकन मिठी मारायची म्हणजे.. मी थोडासा भांबावुनच गेलो , मला काय करावे तेच पटकन सुचेना. तेवढ्यात त्या स्त्रीने माझ्या गालाचा एक किस देखील घेउन टाकला.

"थोडा धिर वगैरे आहे का नाही ?? आता तुझाच आहे तो." त्या स्त्री शेजारी बसलेला तरुण डोळा मारत म्हणाला. मी तर नुसता गोंधळून बघत राहिलो होतो. त्या स्त्रीने मोहक हसत मला हाताला धरुन आपल्या शेजारी बसवून घेतले. इथे प्रत्येकजण मला खुप चांगल्या प्रकारे ओळखत असल्या सारखेच वागत होता. त्या स्त्रीने अजुनही माझा हात घट्ट धरुन ठेवला होता. नाही म्हणले तरी मी थोडासा लाजतच होतो.

"लेट मी इंट्रो यु विथ ऑल" पाईपवाला बोलला. "द वन बिसाईड यु इज मिस्टर केन, आपले फायनान्सर. त्यांच्या डाव्या हाताचे दोघे माईक आणी विली, हे आपला संगणक विभाग सांभाळतात आणी मी मिस्टर डग्लस, तुम्हा लोकांचा लिगल अ‍ॅडव्हायजर."

"एक मुख्य ओळख करुन द्यायची राहिली, नाही का??" माझ्या शेजारी बसलेली ती मोहक व्यक्तिमत्वाची स्त्री बोलली.

"ती तुच करुन दिलेली जास्ती चांगली नाही का?" केन बोलला. त्याला बोलताना डोळा मारायची सवय असावी बहुतेक.

मी उत्कंठेने त्या स्त्री कडे बघु लागलो. तीने बिअरचा एक मोठा घोट घेउन शांतपणे माझ्याकडे नजर वळवली. तीच्या निळ्या डोळ्यात मी काही क्षण हरवुनच गेलो. तीने आपला नाजुक हात माझ्यापुढे केला...

"डायना...."

"पॅपिलॉन" मी भारावल्या सारखा तीच्या हातात हात देत म्हणालो.

तिच्या निळ्या डोळ्याची जादू भेदत काहीतरी मेंदूत थाडकन उसळले. काहितरी स्ट्राइक झाले.. पण.....

"डायना... यु मीन...." मी अडखळलो.

ती स्त्री खळखळून हसली, बाकीचे देखील हळूहळू त्यात सामील झाले. त्यांना तीने डोळ्यानेच दटावले.

"येस आय मीन डायना... वन ऑफ द एलिट फाउंडर" ती शांतपणे म्हणाली.

मी आणी डायना समोरा समोर बसलोय ?? हे मी कधी कल्पनेत देखील आणले न्हवते. माझी नक्की काय अवस्था होती तीचे वर्णन मी आजदेखील करु शकणार नाही.

"जा फ्रेश हो, मग खुप बोलायचे आहे !" केन हुकुमी आवाजात बोलला. काही दिवसात हाच केन माझी भेट घेण्यासाठी माझ्या रुम बाहेर तडफडत उभा राहायला लागला हा भाग वेगळा.

"व्हिस्की घेणार ? " मी फ्रेश होउन येताच डायना विचारती झाली.

"शुअर" मी मान हलवली.

"शिवास.. शिवासच घेतोसना ?" डायना हसत म्हणाली.

"एखादा माणुस विवक्षीत ठिकाणी पोचायच्या आधी त्याची किर्ती येउन पोचलेली असते, हे मात्र अगदी खरे" मी डोळे मिचकावत म्हणालो.

"हा हा हा, मी तुला म्हणाले होते डग्लस... पॅपीलॉन इज जेम. त्याच्या बोलण्याचे, ज्ञानाचे, हजरजबाबीपणाचे मला कायमच कौतुक वाटत आले आहे." डायना डग्लसकडे वळत म्हणाली. त्यानेही संमतीदर्शक मान हलवली.

"मला ह्या भेटी मागचा उद्देश कळेल का ? आणी हो ज्या पद्धतीने तुमचा सन्याल माझ्याशी वागला ते मला बिलकुल आवडलेले नाही" मी पहिल्यांदाच ठामपणे बोललो.

"त्याच्या वतीने मी माफी मागते पॅपीलॉन. त्याने फक्त त्याला नेमुन दिलेले काम केले."

"पण नक्की हे काम काम म्हणजे आहे तरी काय??" मी वैतागुन विचारले.

"एलिट ग्रुपला चायना सरकार कडून एक ऑफर आलीये पॅपिलॉन, चायना मधल्या जेवढ्या अमेरीकन कंपन्या आहेत त्यांचा डाटा, त्यांची प्रत्येक हालचाल आणी प्रत्येक माहितीची देवाण घेवाण ह्याची खडान खडा माहिती मिळवून सरकारला द्यायची. वेळेला त्यांचे सर्वर्स हॅक करायचे, त्यांच्या डाटाबेस मध्ये शिरायचे पण माहिती मिळवायचीच."

"मग ह्यात अवघड काय आहे? कोणी साधा सुधा हॅकर पण हे करु शकेल."

"मी अजुन पुर्ण माहिती दिली नाहिये पॅपीलॉन... जर हे करताना तुम्ही पकडले गेलात, तर सरकार आपले हात वर करुन मोकळे होणार ! पुढची जबाबदारी तुमची."

"ओह्ह्ह्ह आणी म्हणुनच एलिट नव-नवीन बकरे शोधत आहे तर !" मी डायनाच्या डोळ्यात डोळे रोखुन म्हणालो.

"अगदी बरोब्बर ! म्हणुनच तुला सावध करायला आम्ही तुला इकडे बोलावले."

"काय?? मला सावध करायला ? आणी त्यात तुमचा काय फायदा ??"

"आमच्याकडे तुझ्यासाठी एक फार छान ऑफर आहे पॅपिलॉन" डायना शांतपणे म्हणाली.

"वन सेकंद, वन सेकंद.. माझा काहीसा गोंधळ उडालाय. हे 'आम्ही, आमच्याकडे' म्हणजे काय? यु आर वन ऑफ द एलिट, राईट ??"

"आय व्हॉज ! आणी एलिटस साठी मी अजुनही बेपत्ता पार्टनर्स पैकी एक आहे."

"मला कळेल असे बोलणार का??" मी आता पुरता भंजाळलो होतो.

"एलिट ह्या कामासाठी तुला लाखात पैसे मोजायला तयार होतील, ते जे आकडा सांगतील त्याच्या पुढे २ शुन्य वाढवुन आमची ऑफर तयार असेल.. फक्त तुझ्यासाठी."

"आणी ती ऑफर आहे तरी काय?"

"जे काम तु चायना सरकारसाठी करणार आहेस तेच काम 'यु.एस' साठी करायचे आहे."

"व्हॉट ?????"

"आणी उद्या काही झाले तरी आम्ही हात वर करणार नाही हे नक्की ! यु विल गेट द प्रोटेक्शन ऑलवेज."

"आणी मी नकार दिला, तर आई किंवा वडिल ह्या पैकी एकाचे प्रेत मला भेट मिळणार.. बरोबर ना?" मी कडवटपणे म्हणालो.

क्षणभरच डायनाच्या डोळ्यात एक विषादाची छाया उतरुन गेल्याचे मला भासले. पण क्षणात तीन स्वत:ला सावरले आणी तीचे हसरे डोळे पुन्हा माझ्यावर खिळले.

"तुला इथपर्यंत आणण्यासाठी तसे वागावे लागले पॅपिलॉन, पण माझी खात्री होती की एकदा मला भेटल्यावर तु कधिच नकार देणार नाहीस."

"हो? मला तुमच्या आत्मविश्वासाचे कौतुक वाटते मिस. डायना. पण तुम्हाला येवढी खात्री का आहे सांगाल का?"

"तु मला कधिच नकार देणार नाहीस पॅपीलॉन.. आपल्या शफीला तु नाही म्हणशील का रे ? सांगना...."

(क्रमश:)


1 टिप्पणी(ण्या):

Shardul म्हणाले...

Too good....

Pudhacha bhag kadhi ?

टिप्पणी पोस्ट करा