मंगळवार, ८ फेब्रुवारी, २०११

जोगवा



बिका किंवा मकी ह्या दोघांपैकी कुणा एकाच्या कृपेने मध्ये 'जोगवा' हा चित्रपट मिळाला होता. चित्रपटाची जोरदार चर्चा चालू असल्याने लगेचच तो बघायला घेतला. काही कारणाने चित्रपट अर्ध्याच्या पुढे बघू शकलो नाही आणि राहिला तो राहूनच गेला. मात्र त्या अर्ध्या चित्रपटाने देखील प्रचंड हुरहुर लावून ठेवलेली होती. शेवटी परवा स्टार प्रवाहमुळे हा संपूर्ण चित्रपट बघण्याचा योग आला.



चित्रपटाची कथा खरेतर थोडी हटके सदरात मोडणारी. आपल्या आजूबाजूला दिसणार्‍या जोगतिणी आणि जोगत्यांच्या आयुष्याची हि कथा. ह्यातल्या जोगतिणी आपल्या बर्‍यापैकी परिचयाच्या पण जोगते सहसा शहरात तरी कमी आढळणारे. हा चित्रपट ह्या पंथाच्या रुढी, चालींवर प्रकाश टाकणारा, त्यांच्या वेदना समाजापुढे मांडणारा म्हणून मनावर ठसतो. दु:खांचे, वेदनांचे अवडंबर न माजवता, अनाठायी मेलोड्रामा न ओतता सहजसोपे पणाने सादर केलेले प्रसंग आपली छाप सोडून जातात. उपेंद्र लिमये, किशोर कदम, मुक्ता बर्वे, विनय आपटे, अदिती देशपांडे, प्रिया बेर्डे, चिन्मय मंडलेकर अशी तगडी स्टार कास्ट लाभलेला हा चित्रपट प्रत्येक अंगाने सुबक ठरला आहे. मग तो अभिनय असो, अजय अतुल ह्यांचे कौतुकास्पद आणि अनुरूप संगीत असो, श्रेया - हरिहरन ह्यांच्या आवाजाचा गोडवा असो किंवा राजीव पाटील ह्यांचे दिग्दर्शन असो.

कर्नाटकातल्या एका छोट्या गावातील हि कथा. डोक्यात जट सापडल्याने यल्लम्माआईची भक्त असलेली अक्कुबाई सुलु (मुक्ता बर्वे)ला देवी यल्लमाच्या पायावर वाहण्याचा सल्ला देते. अर्थात आता ती जोगतीण बनणार असते. तर इकडे लघवीतुन रक्त जात असणारा तायप्पा (उपेंद्र लिमये) अशाच अंधश्रद्धेमुळे जोगत्या बनवला जातो. खरेतर हि ह्या दोघांच्या आयुष्याची कहाणी, पण हि कहाणी ह्या दोघांबरोबरच हा पंथ, ह्या पंथात आलेल्या / ढकलले गेलेल्या लोकांच्या आयुष्याचा दुर्दैवी फेरा, त्यांचे जगणे ह्या सगळ्यावरच प्रकाश टाकतो.

ह्या चित्रपटाची कथा कथा खरेतर चार ओळीत मांडता येईल, पण तिला दिग्दर्शकाने लेखकाच्या मदतीने अतिशय छान फुलवून आपल्या समोर मांडली आहे. ह्यातील कित्येक प्रसंग अतिशय हळुवार पणे चित्रित केले आहेत त्याची दाद द्यायला हवीच. यल्लमाच्या डोंगरावर एका बाजूला सुलुचे आणि दुसर्‍या बाजूला तायप्पाचे लावले जात असणारे लग्न, मैत्रिणीच्या लग्नात तिला हळद लावली जात असताना आपण मात्र आता देवाच्या पायी वाहिली जाणार ह्या विचारात गुरफटलेली सुलु, जोगत्या बनल्यावर साडीच्या आत विजार घालून निदान स्वतःपुरते आपले पुरुषत्व जपण्याचा उपेंद्र लिमयेने केलेला प्रयत्न.. असे काही प्रसंग मनात घर करून बसतात.

जोगतीण बनलेली सुलु कायमची जोगत्यांच्या मेळ्यात राहायला जाते. अल्लड सुलु मेळ्यात नवीनंच दाखल झालेल्या झांजेवाल्याच्या प्रेमात गुरफटते तर इकडे तायप्पा सुलुत गुंतत जातो. ऐनवेळी सुलुच्या होणार्‍या बाळाचे पितॄत्व नाकारून तो पळून जातो आणि सुलु कोसळून पडते. सुलुचा गर्भ पाडला जातो. अशा अवस्थेत तायप्पा सुलुला आधार देतो. सुलु कोसळून पडलेली असताना इकडे तायप्पा देखील जीवनाची वेगळीच लढाई लढत असतो. त्याच्यावर लादले गेलेले स्त्रीत्व आणि त्यामुळे त्याच्या मनाचा होणार कोंडमारा तो कुठे मोकळा देखील करू शकत नसतो. अनेक वादाच्या प्रसंगात त्याचे उफाळून येणारे पुरुषीपण आणि त्यापासून त्याला मागे खेचत त्याच्या वडिलांपासून (विनय आपटे) सर्वांनीच त्याला आता त्याच्या जोगत्या होण्याची आणि पुरुषत्व सोडल्याची वेळोवेळी करून दिलेली जाणीव काळजाला घरे पाडते.





विशेष उल्लेख करावा लागेल तो किशोर कदम ह्यांनी साकारलेल्या यमन्या ह्या जोगत्याचा. सर्वांची काळजी घेणारा, सर्वांना सांभाळून घेणारा यमन्या आतून मात्र पूर्ण पोखरला गेलेला आहे. दारूच्या आहारी गेलेला आहे. पुरुषत्व सोडून जाणे म्हणजे काय हे यमन्याने पुरेपूर अनुभवलेले आहे. एका प्रसंगात तो नदीवर उघडा अंघोळ करत असतो आणि काही मुले त्याच्याकडे बघत असतात. त्यावेळी तो उपेंद्र लिमयेला म्हणतो "माझ्या उघड्या अंगाकडे पुरुषाने असे बघितले की मनाला कसे हळुवार वाटते" तेव्हा अंगावर सरसरून काटा येतो. जोगत्या झाल्याझाल्या आलेल्या अनुभवांची, पुरुषांकडून मिळालेल्या अनैसर्गिक वागणुकीची कथा जेव्हा यमन्या विझलेल्या डोळ्यांनी सांगतो तेव्हा आपण अंतर्बाह्य हादरतो. ह्या कथा आपण ह्याआधी ऐकलेल्या असतात देखील पण किशोर कदमकडुन ते ऐकताना जणू त्यांनी तो अनुभव प्रत्यक्षात घेतलाच आहे असे वाटत राहते आणि ते काळजाला अधिक भिडते.



पुढे सुलु आणि तायप्पा मनाने आणि शरीराने देखील एकमेकांच्या जवळ येतात. पंथातील काही गोष्टी त्यांना अविचारी वाटत असतानाच गावातले मास्तर ह्या पंथातील अंधश्रद्धा, रुढी ह्या विषयी आवाज उठवायला सुरुवात करतात. एकमेकांच्यात गुंतलेले सुलु आणि तायप्पा पंथ सोडण्याचा आणि संसार करण्याचा निर्णय घेतात आणि संपूर्ण गाव त्यांच्या विरोधात पेटून उठतो. पुढे काय होते ते पडद्यावरच अनुभवण्याजोगे...



उपेंद्र दाते, किशोर कदम, मुक्ता बर्वे ह्यांच्या जोडीलाच विनय आपटे, अदिती देशपांडे ह्यांची देखील अभिनयाची आघाडी उत्तम सांभाळली आहे. देवीवर नितांत श्रद्धा ठेवणारी, वेळेला मेळ्यातल्या जोगतिणींच्या हक्कासाठी पंचायती समोर उभी राहणारी पंथाच्या मेळ्याची प्रमुख अदिती देशपांडे ह्यांनी उत्तम साकारली आहे. तर जोगत्या झालेल्या पोराच्या बापाच्या भूमिकेत विनय आपटे त्यांच्या वाट्याला आलेले बरेच प्रसंग खाऊन जातात. स्वतःच्या घरी जोगवा मागायला आलेल्या उपेंद्र लिमयेला पाहून ते जेव्हा हातातली दोरी रागारागाने गुंडाळत त्याच्या नावाने शिव्या देतात तो प्रसंग तर एकदम खासच.

उपेंद्र दाते आणि मुक्ता बर्वे त्यांच्या भूमिका अक्षरशः जगले आहेत येवढे सांगितले तरी पुरे. ह्या सगळ्याला छानसे कोंदण लाभले आहे ते अजय अतुल ह्यांच्या संगीताचे आणि हरिहरन, श्रेया ह्यांच्या गोड गळ्याचे. 'जीव रंगला' आणि 'ललाटी भंडार' हि गाणी अविस्मरणीयच.




एकुणं काय तर पाच राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा जोगवा एकदा नक्की अनुभवण्याजोगा.


5 टिप्पणी(ण्या):

Unknown म्हणाले...

खुप छान परिक्षण

Unknown म्हणाले...

खुप छान परिक्षण

Unknown म्हणाले...

खुप छान परिक्षण

Unknown म्हणाले...

खुप छान परिक्षण

Unknown म्हणाले...

खुप छान परिक्षण

टिप्पणी पोस्ट करा