बुधवार, १९ नोव्हेंबर, २००८

सखी मदिरा

फॉर्म्युला वन आणी किंगफिशर ची चढाओढ ह्यातुन कहिसे बाहेर पडल्या नंतर प्रसिद्ध उद्योजक, फॉर्म्युला वन सारख्या ठिकाणी संघ उभे करणारे एकमेव भारतीय विजय मल्ल्या हे थोडेसे रिलॅक्स होण्यासाठी 'सखी मदिरा' पार्टि चे आयोजन करत आहेत, हे ऐकल्या बरोब्बर आमची कळी खुलली.

विजय मल्ल्यांची पार्टि म्हणजे झाडुन सगळे पेज ३ वाले मान्यवर, क्रिकेटर्स, मायानगरी मधिल तारे, राजकारणी हजेरी लावणार, आणी आम्हाला सभासदांना खमंग काहितरी वाचायल देता येणार ह्याचा आनंद आम्हाला सर्वाधिक झाला. त्या आनंदाच्या भरात आम्ही विजय मल्ल्यांच्या संपत्ती मध्ये त्या रात्री रोजच्या पेक्षा जरा जास्तच भर टाकली.

पार्टि साठी आम्ही  स्वयंघोषीत पत्रकार व UB च्या भरभराटी मध्ये खारीचा वाटा उचलणारे अशा दुहेरी अधिकाराने वर्णी लावली.गेल्या गेल्या आधी विजय मल्ल्यां भोवतीच्या गराड्यात शिरुन त्यांना अभिवादन केले व सध्या नविन येणार्‍या वर्षाचे खास 'किंगफिशर कॅलेंडर' बुक करुन टाकले.


आ हा हा पार्टिचा थाट काय वर्णावा महाराजा ? पेशवाई दफ्तरातील मेजवानीची वर्णने थिटी पडावीत असा प्रसंग होता. मोठ मोठ्या लोकांच्या उपस्थीतीमुळे चॅनेल वाल्यांचीही गडबड व लुड्बुड वाढली होती.एका कोचावर विलासराव, शिंदे सरकार, आर. आर. आबा, गोपीनाथ मुंढे अशी मैफिल सजली होती. तर त्यांच्या पासुन काही अंतरावर राणे, छगन भुजबळ, मनोहर जोशी यांची गप्पाष्टके चालु होती.सलमान, शाहरुख, जॉन, प्रियांका, ऐश्वर्‍या ईत्यादी तार्‍यांची रोशणाई तर विचारुच नका. खुद्द आपले धरम दादा व अजय देवगण येणार्‍या प्रत्येकाचे " खुब जमेगा रंग जब मिल बैठेंगे ३ यार, आप हम और हि हि हि हि सोडा" असे म्हणुन स्वागत करत होते.एका घोळक्यात खुद्द भरत जाधव, अविनाश नारकर (हा माणुस आपले नाव बदलुन विक्रम गोखले (जु.) असे क ठेवत नाही कोणास ठाउक) त्यांची कोणत्याही प्रसंगात उगिचच कॅमेर्‍याकडे बघत हसणारी अर्धांगीनी ऐश्वर्‍या, मकरंद अनासपुरे अशी हि मंडळी बघुन आम्हाला न पिताच हलकिशी किक बसली.

विलासराव :- काय चक्कर आली का काय ?

आम्ही :- साहेब अहो ह्या अशा ठिकाणी ह्या लोकांना बघुन आणी काय येणार ?विलासराव :- सवय लावुन घ्या आता ह्याची, 'सगळ्या' ठिकाणी मराठी माणसाला ८०% आरक्षण मिळालेच पाहिजे असा कायदाच काढतोय आम्ही.

गोपीनाथराव :- सुरेखा सुरेखा ! (विलासराव जराशे खाकरतात)

गोपीनाथराव :- सुरेख, सुरेख कायदा आहे असे म्हणालो मी.

(शिंदे सरकार नेहमी सारखे गोजीरवाणे हसतात.)

"महागाई आणी बेकारीच्या झळा सुद्धा सगळ्यात जास्त अगदी ८०% पेक्षा ही जास्त, मराठी माणसालाच मिळायला पाहिजेत हा उपक्रम आपण राबवत आहातच की !!" पाठीमागच्या कोचावरुन राणे सहेबांचा टोला.

विलासराव :- कोकणातील व पुण्यातील आपली 'उलाढाल' बघुन मराठी माणसाची प्रगतीच जाणवते. (विलासरावंची कोपरख़ळी)

'उलाढाल' शब्द ऐकल्या बरोब्बर भरत जाधव आणी मकरंद कोचाकडे धावले.

मकरंद :- तुम्ही का नाही साहेब फकस्त काय'द्याचे बोला ?

शिंदे सरकार :- कोण कोणास काय देतय ?

भरत जाधव :- करमणुक करात माफी द्या असे म्हणायचे आहे भवतेक त्याला.

विलासराव :- जाधव अहो येव्हडे गुणी कलाकार तुम्ही, मुख्यमंत्र्याची भुमीका साकारलीत, वाण नाही पण गुण तरी लागायला पाहिजे होता की हो !

भरत जाधव :- (टिपीकल चेहरा करुन) अह्हो... म्हणजे काय ?

विलासराव :- अहो ज्या सिनेमा मध्ये करमणुक नसते त्यांनाच फक्त करमणुक करात सवलत मिळते जाधव.

मकरंद :- ह्या ह्या ह्या नाहि ते कसे आहे ना साह्येब की आंधळा दळतो आन कुत्रा पिठ खातो अशी गत हाये हि.

विलासराव :- म्हणजे ?

मकरंद :- ब्लाईंड क्रशिंग एंड डॉग इटींग हो !

भरत :- आपण निघुयात का ? जाधव निघाले.......

आर. आर. आबा :- खरेच गुणी रत्ने आहेत.

गोपीनाथ राव :- आमच्या 'पनवेल, मुंबई ला तर 'खाणी' होत्या रत्नांच्या, पण त्या तुम्ही बंद पाडल्यात.

छगनराव :- त्यांना फक्त गोळीच्या बदली गोळी, आणी एक मळुन तयार केलेली ग़ोळी येवढेच आवडते.

तापलेले वातावरण बघुन आम्ही हळुच काढता पाय घेतला. थोडे पुढे गेलो तर एक कोचावर तोंडाच 'आ' करुन अमोल पालेकर बसलेले दिसले. ज्या सरकारी चित्रपट संस्थेबरोबर त्यांनी 'बनगरवाडी' बनवला, त्या संस्थेतील अधिकारीच तिचा उल्लेख 'भंगारवाडी' करतात हे ऐकल्या पासुन पार खचुन गेले आहेत बिचारे.

एका विशिष्ठ कोपर्‍यापासुन लोक बरेच दूर दूर जातना बघुन आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला, आमचा अंदाज खरा ठरला, हिमेस भाई ने मनोज वाजपेयी साथ साथ तिकडे बसले होते. एकाला नासीक गायनामुळे तर एकाला त्रासिक अभिनयामुळे जनतेनी नाकारले असावे भवतेक.

आम्ही :- और मनोजजी कैसे है आप ?
मनोज :- जय महाराष्ट्र ! हे बघा आपण मला भिकु म्हात्रे मुंबईचा दादा ह्याच भुमिकेत कायम लक्षात ठेवावे हि विनंती.
आम्ही :- (लबाड चेहर्‍याने) 'राज' की बात कह दू तो , जाने मेहेफील मे फ़िर क्या हो.....
हिमेसभाई :- वांह वांह ... आइये नयी चिझ सुनाता हू आपको.
आम्ही :- कान मे सर्दि के कारण अडचण है, नंतर आता हू.
हिमेसभाई :- अरे हमारा गाना सुनोगे तो सब चला जायेगा.
आम्ही :- (लगबगीने काढता पाय घेत) वोच भिती है के कहि जिवच ना चला जाये.

समोर बराच मोठा घोळका जमला होता, आम्ही हि धक्का बुक्की करुन घुसलो आत. समोरच एका कोचावर मल्लिका शेरावत आणी तनुश्री दत्ता बसलेल्या दिसल्या.

(येव्हड्या गोंधळात ऐकु आलेले काहि संवाद)
तनुश्री :- गॉड काय उकडतय !
मल्लिका :- हो ना, यु नो व्हॉट... एडम एंड इव्ह व्हॉज रिअली लकी हांन.
तनुश्री :- यह ! प्लस तेंव्हा नो प्रदुषण एंड ऑल. मी तर आजकाल सकाळी उठुन व्यायाम चालु केला आहे. तु सकाळी उठल्या उठल्या काय करतेस ?
मल्लिका :- सगळ्यात आधी मी माझ्या घरी जाते. मग ऑल अदर थिंग्स.

खरच कानाला सर्दी का झाली नाही, ह विचार करत आम्ही गर्दितुन बाहेर आलो, समोर बघतो तर खुद्द नरेन कार्तिकेयन उभा.

ह्या माणसा विषयी मला प्रचंड प्रचंड कौतुक होते, जेव्हा जेव्हा मी वाचायचो कि भारताचा नरेन शर्यती मध्ये १२ वा आला, १४ वा आला तेव्हा उर कसे भरुन यायचे, मग आम्हाला कळाले कि हा १५ स्पर्धकांमध्ये १२ किंवा १४ वा येतो. असो .....

पलिकडेच दिपिका पदुकोण उभी होती आणी तिच्या आजु बाजुला युवराज, धोनी, हरभजन, श्रिसंथ ह्या क्लोजींग फिल्डर्स चा गराडा पडला होता. आम्ही आमचा मोर्चा तिकडे वळवला, पण आम्ही काही विचारण्या आधिच आम्हाला काही उत्तरे मिळाली ती आम्हि खाली देत आहोत. काही संदर्भ लागल्यास आम्हाला हि कळवा.
दिपिका :- वुई आर जस्ट गुड फ्रेन्डस !
युवराज :- कोण काय लिहिते त्याची मी काळजी करत नाहि. सध्या मी माझ्या कारकिर्दिवर लक्ष केंद्रित केले आहे.
धोनी :- दादा आणी सचिन ह्यांच्यामुळेच मी आज येथे पोचलो आहे. मी त्यांच्या विषयी असे बोलीनच कसे ?
हरभजन :- शेवटि आपले पुर्वज 'मंकीच' होते ना ? येव्हडा गदारोळ कशाला उगीच ?

श्रिसंथ :- मी खरच नाही हो लेट नाईट पार्टी केली ! आणी ती कुंडी वार्‍यामुळे खाली पडली त्या रात्री !

डोक्याला हात लावत आणी मिळालेल्या उत्तरांचे प्रश्न शोधत आम्ही घराचा मार्ग धरला !




1 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

मल्लिका :- सगळ्यात आधी मी माझ्या घरी जाते. मग ऑल अदर थिंग्स. >> :D भन्नाट

टिप्पणी पोस्ट करा