मंगळवार, २५ नोव्हेंबर, २००८
खरेच आज कोण सुखी आहे ह्या जगात ? कितीही मोठी, उच्च पदावरील व्यक्ती असो, दुख: , चिंता काय पाठ सोडायला तयार नसतात. जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. त्यामुळेच आज श्री. सत्य आईबाबा ह्यांचे शहरात आगमन होणार आहे हे कळताच, मोठ मोठ्या लोकांची दर्शनाला नुसती झुंबड उडाली होती.
आम्ही सुद्धा मोठ्या हिकमतीने खास दरबारात प्रवेश मिळवला. (पेशव्यांचे रक्त खेळतय नसा नसात) हे वाक्य एकदा आम्ही एकाला ऐकवले होते, त्याने आम्हाला "मग तुम्हाला 'पेशवाई' मध्ये सगळे फ्री असेल ना?" असे विचारुन तप्त डांबरी रस्त्यावर चितपट केले होते.
असो,खास दरबारामध्ये फक्त खास खास लोकांच्या स्वार्या विराजमान झाल्या होत्या. शेतीतज्ञ, क्रिकेट शिरोमणी, संरक्षण पंडित श्री. शरदजी चंद्रजी पवारजी, त्यांचे आज्ञाधारक जलतंत्रज्ञ पुतणे श्री. अजीतजी पवारजी, कोकण भुषण, तडफ़दार, भ्रष्टाचारावर सतत 'प्रहार' करणारे नारायणजी राणेजी, गुणग्राहक, शेती माहितीगार, सांस्क्रुतीक आघाडी सांभाळणारे गोपीनाथजी मुंढेजी, विदर्भाचे वाघ नितीनजी गडकरीजी, दलित समाजाचा भक्कम आधार, दलित मार्गदर्शक रामदासजी आठवलेजी, हिंदु ह्रुदय राजकुमार (सम्राटांचे चिरंजीव) उध्दवजी ठाकरेजी, मराठी ह्रुदय सम्राट राजजी ठाकरेजी, मागासवर्गीयांचे आशास्थान छगनजी भुजबळजी, यवन ह्रुदय सम्राट (स्वयंघोषीत) अबुजी आझमीजी दरबाराची शोभा वाढवत होते.
नारायण राणे :- 'भुकंपग्रस्त' दिसत नाहियेत कुठे ..
रामदासजी :- अल्वा मॅडम कशाला येतिल इकडे ?(नारायण राणे कपाळावर हात मारुन घेतात)
राणे :- अहो, 'लातुर' वाल्यांविषयी विचारतोय मी. समजुन घ्या जरा.
आठवले :- आजवर 'आम्हाला' कोणी कधी समजुन घेतले आहे का ? दरवेळी आमच्याकडुन काहि ना काहि अपेक्षा असतेच तुम्हा लोकांची.
गोपीनाथजी :- ऐका ना, म्हणुनच सांगतोय ह्या वेळी आमच्या बरोबर चला, आमची तुमच्या कडुन काहि अपेक्षा नाही.
छगनराव :- हो ! आणी तुम्ही पण काहि अपेक्षा ठेवु नका त्यांच्याकडुन रामदासजी. मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडायला लागली आहेत आजकाल बर्याच जणांना ! (उध्दवजींकडे, राणेंकडे बघतात) येव्हड्यात विलासराव प्रवेश करतात.
राणे :- थिंक ऑफ डेव्हिड ......
उद्धव :- डेव्हिल म्हणतात त्याला .... का लोक आपल्या अक्कलेची दिवाळखोरी दाखवतात काय माहिती ?
राणे :- हो ना ! दाखवतात नाहि तर काय, राज्याच्या उस प्रश्नासाठी राज्यपालांना भेटायला जातात . हि हि हि हि हि
गोपीनाथजी :- काय राजे यायला उशीर केलात फार ?
राणे :- रोज मुंबई - दिल्ली अपडाउन करणे म्हणजे काय सोपे काम आहे का ? होणारच जरा उशीर ...
विलासराव :- महत्वाच्या माणसांना कामे असतात मुंढे साहेब, बिनकामाची लोक बसतात स्वत:च्याच पायावर 'प्रहार' करीत.
अजीतजी :- ते मुख्यमंत्री पदाचे बोलणे अर्धवटच राहिले की हो..
राज :- मुख्यमंत्रीपदाची काळजी नंतर करा, आधी एखाद्या 'सुप्रिय' व्यक्ती पायी तुमचा नारायणराव पेशवा होणार नाही ह्याची काळजी घ्या !
शरदराव :- अजीत कानात साठवुन ठेव हे बोल, अनुभवाचे बोल आजकाल फार कमी ऐकायला मिळतात महाराजा.
उद्धव :- नारायणराव फार भित्रे होते म्हणे !
छगनजी :- तेव्हा त्या काळच्या देशमुख आणी पाटलांनी नसेल साथ दिली त्यांना. चालायचेच ....
राज :- असते एकेकाचे नशीब. कोणाच्या नशिबात काय आहे कोणास कळणार ?
नितीन गडकरी :- बरोबर बोलुन राहिले तुम्ही भौ. कोणाच्या नशिबात भुखंडाची जमीन तर कोणाच्या नशीबात गिरणीची. ख्यॉं ख्यॉं ख्यॉं
राज :- कोल्ह्याला द्राक्षे आंबट !!येव्हड्यात घाई घाईने आबा पाटिल येतात.
छगनराव :- या !! कुठे गोळ्या गोळ्या खेळत बसला होतात ??
आबा :- (शरदरावांकडे बघतात) साहेब...
शरदराव :- मंत्रीमंडळ विस्ताराचे घोंगडे अजुन किती दिवस भिजत पडणार आहे ?
रामदासजी :- हो ना, सरकार पडायच्या आत काहितरी करा बुव्वा.
अजीतदादा :- काकांसारखे खंबीर नेत्रुत्व असताना सरकार पडेलच कसे ?
उद्धव :- भरल्या घरचे पोकळ वासे !
गडकरी :- 'वडाभाताचा' वास येउन राहिलाय बे कुठुनतरी !!
मुंढे :- अहो किति खा खा करता हो ??
गडकरी :- तुम्ही तर 'सुरेखा सुरेखा' करत असता की ! आम्ही कधी काय बोलुन राहिलो का तुम्हाला भौ ?
मुंढे :- (रागानी) ते वेगळे हे वेगळे , उगाच ह्याच्या पारंब्या काढुन त्याला लावु नका !
छगनराव :- पारंब्या न्हवेत साली.
रामदासजी :- हि हि हि सुरपारंब्या म्हणालात तरी चालेल.
शरदजी :- आठवले काहितरी कोट्या करु नका उगाच, राज्यात येव्हडे मोठ मोठे प्रश्न आ वासुन उभे आहेत , सुरपारंब्या कसल्या खेळताय ? तशाही दर निवडणुकीत तुम्ही त्या खेळतच असता आणी तुमचे प्राविण्य हि सर्वांना माहित आहे ..(तेव्हड्यात उर्जामंत्री वळसे पाटिल येतात)
मुंढे :- आलाच बघा एक मोठा प्रश्न ! काय काहि उपाय सापडतोय का विजटंचाई वर ?
वळसे - पाटील :- सापडेल लवकरच, नतद्रष्टांनी समुद्रात बुडवलेली कंपनीच धावेल मदतीला असे वाटत आहे.
उद्धव :- वाटायला तुम्हाला बरेच काहि वाटते, 'दत्तगुरु महाराज' मदतीला धावतिल असे वाटल्याने विक्रम गोखल्यांना विज मंडळाचे 'दूत' सुध्दा बनवुन झाले कि तुमचे. कुठे काय उजेड पडला ?
गडकरी :- ह्यांच्या घरात पडुन राहिला न उजेड भौ, दिड दिड लाखाचा !
राज :- भौ भौ करु नका हो ! भय्या भय्या केल्या सारखे वाटते. माजलेत सगळे भय्या लोक.
उध्दव :- आणी ते ए.टि.एस. वाले सुध्दा !(हे ऐकल्या बरोब्बर इतक्या वेळ गप्प पडलेले आझमी खडबडुन उभे राहतात) (पवार, देशमुख, भुजबळ लगेच खिशातुन रुमाल काढुन डोक्यावर पांघरतात)
राज :- काय 'पोचवायला' निघालात का काय सगळ्या भय्यांना ?
आझमी :- अल्लाह ! हे काय भलतेच ?
पवार :- नाही ते तुम्ही लगबगिने उठला ना, आम्हाला वाटले नमाजाची वेळ झाली !
आझमी :- सुभान अल्लाह , काय हा आदर परधर्माविषयी. म्हणुनच तुम्ही आम्हाला कधी परके वाटत नाहि !
उध्दव :- हिंदुना 'पोरके' करणारे सगळे तुम्हाला आपलेच वाटणार.
विलासराव :- आमचा पक्ष निधर्मी आहे. सर्व जण आम्हाला समान आहेत. मुस्लिम भावांच्या सुरक्षेसाठी छातीचे कोट करु !!
रामदास :- साहेब, कोटाच्या गुंड्या वर खाली लागल्यात !! हि हि हि
राज :- त्यांना 'मुका' आणी आम्हाला 'मोका' !!
उद्धव :- हज ला अनुदान आणी अमरनाथ ला टॅक्स.
पवार :- अशा ठिकाणी तरी वाद - विवाद नकोत क्रुपया. श्री. सत्य आईबाबांपुढे कोण काय मागणे मागणार आहे त्यावर चिंतन करत शांत बसुयात आता.
राज :- एकदा संपुर्ण मराठी जनतेलाचा शांत करा तुम्ही कायमचे, म्हणजे 'सुटलात.'
आझमी :- महाराष्ट्र सगळ्यांचा आहे, कुणा एकाची मक्तेदारी नाहि त्यावर !
पवार :- शांत व्हा ! उगिच धार्मिक वाद नकोत ! सगळे धर्म श्रेष्ठ.
मुंढे :- आणी काही लोकांसाठी पैसा हाच धर्म.
राणे :- नोंद आहे आमच्याकडे कोणी किती पैसा खाल्ला त्याची, समजले काय ?
रामदास :- मग आता कशाच्या मोबदल्यात नोंदि बाहेर काढणार आहात ते पण सांगुन टाका.
मुंढे :- तिकिटच हवे तर आम्ही देउ की पण निलेशला देउ तुम्ही फक्त मागे उभे रहा आणी पेपरवर बसा.
राणे :- काय बोलताय काय ?
मुंढे :- पेपरचा व्याप सांभाळत बसा असे म्हणायचे होते.
उद्धव :- तिकिट वाटपाचा निर्णय युतीच्या सभेतच घेतला गेलेला बरा, आणी त्यात कोकण आमचे राखीव कुरण आहे !
राणे :- अरे ह्याट, एकट्याच्या जिवावर निवडुन आणीन सगळ्या सिट, मग मागे कुठला पक्ष असो व नसो.
राज :- अशी नवनिर्माणाची ओढ पाहिजे.
आझमी :- सरकारी बसेस फोडुन, जाळुन आणी गरीब टॅक्सी वाल्यांना मारुन कसले नवनिर्माण होते म्हणे ?
उद्धव :- नवनिर्माण तरी निदान स्वता:च्या 'सामुग्रीने' करावे, चोरलेल्या नको.
राज :- चोरले नाहि उलट चढलेला गंज साफ करुन अडगळीत पडलेली आणी कधिकाळी जिनी सत्ता दाखवली ति सामुग्री वापरात आणतोय आम्ही !
गडकरी :- बाबा कधी येणार ? भुक लागुन रहिली ना भौ.
विलासराव :- मला सुद्धा रितेश च्या नव्या 'शो' ला जायचे आहे 'आम्ही मराठि, पुढे गेली जगरहाटी.'
राणे :- निलेशच्या नविन बांधकामाचे उदघाटन आहे हो आज.
रामदासजी :- आज मलापण जायचे आहे मासिकाच्या उदघाटनाला, 'निळ्या कोब्र्याचा डंख आणी मुंगीला फुटले पंख.'
मुंढे :- ऐका ना, पुण्यात खाजगी 'सत्कार सोहळा' आहे आमचा, चुकवुन चालणार नाही.
अजितदादा :- मला धरणाची भिंत बघायला जायचे आहे.(हॉल मध्ये हास्याचा गडगडाट आणी आपले काय चुकले ते न कळाल्याने अजीत दादांच्या चेहर्यावर गोंधळलेले भाव)
शरदजी :- भुजबळ तुम्ही पण सामिल झालात हसण्यात ? अहो घरचा छकुला चुकला तर आपणच सांभाळुन घ्यायचे असते. शब्दांत खूप काहि दडले आहे माझ्या, ते लक्षात घ्या.
आबा :- (लगेच टोला मारुन घेतात) नाहि साहेब तुम्ही ते छकुला छकुला करत बसता मग अती लाडवतो तो, आमचा पण मान सन्मान काय हाये का नाहि ?
शरदजी :- (आबा आणी छगनजींनकडे आलटुन पालटुन बघत) तुमचा मान , सन्मान आणी 'अपेक्षा' मी चांगलाच ओळखून आहे ! केंद्रात १० वेळा माझा 'यशवंतराव' झाला असला तरी जिवात जीव असे पर्यंत महाराष्ट्रात होणार नाही हे निश्चित !!
तेव्हड्यात बाहेर धर्मराव अत्राम बाबांसाठी वाघाचे कातडे घेउन आल्याचा गोंगाट झाला आणी ते बघण्यासाठी सर्वांबरोबर आम्ही हि 'सभात्याग' केला.
लेबल: प्रहसन
फॉलोअर
Translation
Save as PDF
सदस्यत्व घ्या
Labels
- इंग्रजी चित्रपट (10)
- कथा (29)
- चित्रपट (20)
- तेलगु (1)
- पुस्तक प्रकाशन (3)
- प्रहसन (12)
- भयपट (4)
- मराठी (8)
- स्तंभलेखन (1)
- हिंदी (12)
3 टिप्पणी(ण्या):
खूपच छान लिहिले आहे.
-अभी
हिंदु ह्रुदय राजकुमार :D
mast
टिप्पणी पोस्ट करा