गुरुवार, ५ मार्च, २००९

परिकथेतील राजकुमारा...

"आई आई ए आई अग बाहेर येना पटकन.. " दादा ओरडतच घरात शिरला. मी नेहमीसारखीच हॉलमध्ये बसले होते.

"अरे काय झाले असे ओरडायला एकदम?" आई विचारतच बाहेर आली.

"आई हा माझा मित्र .. अरे आत ये ना बाहेर का उभा आहेस असा?" दादा बाहेर डोकावत म्हणाला, दादाच्याच वयाचा एक देखणा रुबाबदार तरुण थोडासा लाजतच घरात शिरला.

"आई हा अभिमन्यु, माझ्याच कॉलेज मध्ये शिकतो, आज सकाळी फिरुन येताना माझी आणी एका रिक्षावाल्याची टक्कर झाली जोरात, ती लोक दादागीरी करायला लागले, पण तेव्हड्यात हा अभी आला म्हणुन सुटलो बघ मी."

"छोर ना यार" अभिमन्यु म्हणाला. बाप रे हा कोणी दुसर्‍या जातीतला आहे का काय ? काही असो पण आहे एकदम देखणा, कोणालाही पाहताक्षणी भुरळ घालेल असा. मी चोरुन चोरुन त्याच्याकडे पाहातच होते.

"पुण्याचेच का तुम्ही?" आईचा पेटंट प्रश्न.

"हो अगदी पक्का पुणेरी भामटा आहे मी." अभिमन्यु हसत हसत म्हणाला. "आणी हो प्लीज मला अहो जाहो करु नका, रादर तुम्ही सुद्धा मला फक्त अभी म्हणालात तरी चालेल." बोलता बोलता माझ्याकडे बघत तो मंद हसला.मी पण अगदी जेव्हडे म्हणुन मोहक वगैरे काय म्हणतात तेव्हडे हसण्याचा प्रयत्न केला.

"ही माझी बहिण आभा." "हाय" त्यानी अगदी टेचात म्हंटले, माझ्या छातीत मात्र उगाचच कारण नसताना धडधडायला लागले, जिभ कोरडी पडायला लागली..

"नमस्ते" मी कशी बशी म्हणाले.थोड्या वेळाने अभिमन्यु निघुन गेला आणी माझे विचारचक्र चालु झाले. शी काय बाई हे, तो येव्हडा रुबाबात हाय वगैरे बोलला आणी मी काय काकुबाई सारखे नमस्ते वगैरे म्हणाले.. स्वत:चाच इतका राग यायला लागला ना.

आज काय होतय काहि कळतच न्हवते, सारख्या सगळ्या कामात चुका होत होत्या, वाचनात लक्ष लागत न्हवते. का कोण जाणे सारखा सारखा अभिमन्युचा रुबाबदार चेहरा डोळ्यासमोर येत होता, त्याचे ते खर्जातले 'हाय' कानात गुंजत होते. 'अहो आभा बाई सांभाळा, फारच भरकटु नका !" अंतर्मनाचा नको नको वाटणारा सल्ला, आणी तो सल्ला धुडकावुन परत आपल्याच विचारार गुंतणारी मी असा खेळ चालु झाला.

हळु हळु अभिमन्युचे आमच्या घरात येणे जाणे वाढले, सहसा लोकांना टाळणारा, स्वत:च्या घरात सुद्धा जास्ती न रमणारा अभी आमच्या घरात मात्र छान रुळायचा, तो आला की घर कसे चैतन्याने भरुन जायचे. काय हो आ ..भा... बाई, काय म्हणते सकाळ ? हा प्रश्न कानावर पडला की आमच्या त्या दिवसाल मग काय काय पंख फुटायचे विचारु नका. हळु हळु माझ्या एकटिशी बसुन गप्पा मारण्यापर्यंत अभी धिट झाला होता, आणी मी 'या ना' पासुन 'ये रे अभी' पर्यंत. किती जुळत होत्या आमच्या आवडी निवडी, शेवग्याच्या आमटी पासुन ते लादेन पर्यंत, अभीला कुठल्याही विषयाचे वावडे न्हवते, वेळ त्याच्या बरोबर असताना कसा पाखरा सारखा उडुन जायचा.

खर तर मी हळु हळु अभीकडे प्रचंड वेगाने आकर्षीत होत होते.... तो मात्र अगदी सहज मनमोकळा कुठल्याही पाशात न गुंतलेला वाटायचा...आयुष्यातल्या त्या दिवसांना जणु स्वर्गसुखाचा साज चढला होता, अगदी 'बाई बाई मनमोराचा कसा पिसारा फुलला.." वगैरे वगैरे..त्या दिवशी मी अशीच हॉल मध्ये पुस्तक वाचत बसले होते आणी अचानक स्वयंपाक घरातुन जोरात भांडी पडल्याचा आवाज झाला.

"आई आई काय झाले ग?" माझ्या प्रश्नाला काहिच उत्तर मिळाले नाही, मी पटकन खुर्चीला रेटा दिला आणी स्वयंपाकघरात पोचले, अरे देवा ! आईला पुन्हा दम्याचा एटॅक आला होता, जमीनीवर आई पडली होती आणी तिला श्वास घ्यायला प्रचंड त्रास होत होता.

"काका, काकु अहो पटकन या, बघा ना आईला काय होतय ते" मी जोरात ओरडले. शेजारच्या घरातुन कुलकर्णी काकु आणी त्यांचे जावई धावतच आले, आपल्या गाडीत घालुन त्यांनी आईला दवाखान्यात पोचवले, सगळ्यांना फोन करुन बोलवुन घेतले. फटकळ फटकळ म्हणुन कीतीही नावे ठेवली तरी शेवटी आज कुलकर्णी काकु आणी त्यांचे जावईच देवा सारखे धावुन आले.

संध्याकाळी आईची तब्येत खुपच सुधारली आणी आम्हाला तिला भेटायची परवानगी मिळाली. आईने अडखळत्या आवाजात कुलकर्णी काकुंचे आभार मानले.

"अहो काय हे सुमित्रा बाई? अहो आम्ही शेजारी नाहितर कोण येणार हो धावुन मग ?" काकु बोलायला लागल्या, "नशिब थोर तुमचे म्हणुन आभाचे फक्त दोन्ही पायच अधु आहेत, वाचा ही अधु असती तर आमच्या नावानी हाकाही मारु शकली नसती हो पोरगी ..."



0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा