सोमवार, ३१ मे, २०१०

ट्वायलाईट : एक अजब प्रेमकहाणी



बरेच दिवस लिहिन लिहिन म्हणता म्हणता ह्या चित्रपटावर लिहायचा आज मुहुर्त उजाडला. शुक्रवारी काहीच काम धाम नसल्याने ट्वायालईट चौथ्यांदा बघितला, चित्रपटाचा फारच परिणाम पुन्हा एकदा मनावर झाल्याने शनिवारी देखील परत बघितला आणी काल चक्क रात्री जागुन पुन्हा एकदा स्टार मुव्हिजवर बघितला.

येवढे आहे तरी काय ह्या चित्रपटात ? ह्यात आहे एक अनोखी प्रेम कहाणी. चित्रपटातील एका दृष्यात म्हणल्याप्रमाणे जणु काही शेळी आणी सिंहाची प्रेमकाहाणी.



इसाबेला स्वान (पण हिला मात्र आपली ओळख फक्त बेला अशी करुन द्यायला आवडते) हि एक १७ वर्षाची अल्लड तरुणी. तीच्या वयाच्या इतर मुलींपेक्षा थोडीशी वेगळी, एकटे राहायला आवडणारी, थोडिशी अबोल, लाजरी-बुजरी, गर्दी टाळणारी तरुणी. फिनिक्स सारख्या स्वच्छ सुर्यप्रकाशातल्या शहरात आपल्या आईजवळ वाढलेली बेला, आईने वडिलांशी घटस्फोट घेउन एका बेसबॉल प्लेयरशी लग्न केल्यानंतर पुन्हा एकदा आपले वडिल चार्ली स्वान ह्यांच्याकडे वॉशींग्टनच्या फोर्क्स शहरात राहायला येते. फोर्क्स हे तसे लहानसे आणी पावसाळी शहर. बेलाचे वडील चार्ली हे तिथले पोलिस अधीकारी.

नविन शाळेतील मुले मुली ह्या अल्लड सुंदर बेलाशी दोती करण्यासाठी खुप उत्सुक आहेत पण बेला अजुनही आपल्याच एकट्या जगात गुरफटलेली आहे. नाही म्हणायला आल्या आल्या तीची गाठ फोर्क्स मधले जुने रहिवासी आणी वडिलांचे मित्र असलेल्या बिली आणी त्यांचा तीच्याच वयाचा मुलगा जेकब ह्यांच्याशी पुन्हा एकदा पडते. लहानपणी एकत्र घालवलेले दिवस दोघेही अजुन विसरलेले नाहीत.

हळुहळु शाळेतल्या एका छोट्याश्या ग्रुपमध्ये बेल रमुन जाते. तीचे मित्र देखील तिच्यासारखेच सरळमार्गी. ह्या मित्रांबरोबर एकदा कँटीनमध्ये बसलेली असताना बेलाची नजर एडवर्ड कलिन आणी त्याच्या कुटुंबातील इतर मुलांवर जाते. कलिन कुटुंबिय हे सतत एकत्र राहणारे व इतर विद्यार्थांपासून कायम चार हात दुर राहणारे आहे हि नविन माहिती तीला मित्र मैत्रीणींकडून समजते. एडवर्ड कलिन ह्या देखण्या आणी रुबबदार तरुणाकडे ती पाहाताचक्षणी आकर्षीत होते.



शास्त्राच्या पहिल्याच तासाला बेलाची जागा एडवर्डच्या शेजारीच येते. एडवर्ड मात्र बेलाला पाहिल्याबरोब्बर अस्वस्थ वाटायला लागतो. काही वेळातच तो एखादी दुर्गंधी येत असल्यासारखा चेहरा आणी नाक आक्रसायला लागतो. तास संपता संपता तो पटकन उठुन बाहेर देखील पडतो, इकडे बेला मात्र स्वतःच त्या दुर्गंधीचे मुळ असल्यासारखी अस्वस्थ होते. वर्गाबाहेर पडताना बेलाला एडवर्ड आपला क्लास चेंज करता येईल का ह्याची चौकशी करताना दिसतो आणी तीच्या रागात अजुनच भर पडते.

एडवर्ड येवढ्या कटुपणाने वागुन देखील बेला मात्र त्याच्याच विचारत अजुनच गुरफटली जायला लागते. त्यांतर काही दिवस बेलाला एडवर्डचे दर्शनच घडत नाही आणी एक दिवस तो अचानक वर्गात तिच्या आधी उपस्थीत असतो. ह्यावेळी मात्र एडवर्ड स्वतःहुन आपली ओळख करुन देतो आणी अगदी छान वागतो. पण त्या छान वागणुकीतही बेलाला एक गुढ डूब जाणवतच राहते. एक दिवशी बर्‍याच दुर उभा रहुन बेलाचे निरिक्षण करणार्‍या एडवर्डकडे बेला टक लावुन पाहात असतानच तिच्या मित्राचा गाडीवरचा ताबा सुटतो आणी त्याची गाडी भरधाव वेगाने बेलाच्या दिशेने यायला लागते. त्याची गाडी आणी स्वतःच्या गाडी मध्ये बेला चिरडणार येवढ्यात अचानक एडवर्ड क्षणार्धात तीथे अवतरतो आणी एका हाताने तो गाडी थांबवुन बेलाच जिव वाचवतो. त्याचा वेग आणी ताकद बघुन बेला आश्चर्यचकीतच होते.



एडवर्डकडून अर्थातच ह्या सगळ्याचा काहीच खुलासा तीला मिळत नाही. पण आता एडवर्ड कायम संकटात सापडलेल्या बेलाच्या सुटकेसाठी क्षणार्धात हजर व्हायला सुरुवात होते. कलिन्स कुटुंबाविषयी नाना अफवा कानावर पडतच असतात आणी कायम थंडगार शरीर असलेल्या, आपोआप डोळ्याचा रंग बदल जाणार्‍या एडवर्ड विषयीचे गुढ वाढतच असते. पुस्तके आणी इंटरनेटच्या मध्यमातुन कलिन्स कुटुंबीय, एडवर्डच्या शारीरीक अवस्था, सवयी ह्याची माहिती काढण्याचा बेला प्रयत्न करते. बेलाच्या प्रयत्नांना यश येते पण मिळालेल्या यशाने आनंद होण्याऐवजी बेलाला धक्काच बसतो. एडवर्ड हा कोणी सामान्य तरुण नसुन तो एक व्हँपायर आहे हे बेलाच्या लक्षात येते.

बेलाने मिळवलेल्या माहितीला एडवर्ड दुजोराच देतो आणी पहिल्यांदाच बेलाला आपले खरे स्वरुप दाखवतो. एडवर्ड आणी त्याचे कुटुंब हे काहीशे वेगळ्या प्रकारचे व्हँपायर्स असतत. मानवां ऐवजी जंगली जनावरांच्या रक्तावर ते आपली तहान भागवत असतात. एडवर्ड स्वतःची ओळख शाकाहारी व्हँपायर अशी करुन देतो. येवढे सगळे कळुनही बेला घाबरली नसुन उलट आपल्या अधिक जवळ आलेली बघुन एडवर्ड आश्चर्यचकीत होतो. तो तीला आपल्यापासून दुर राहण्याचा सल्ला देतो. तीच्या मानवी गंधापासून तो स्वतःला दूर ठेवण्याच्या प्रयत्नात असतो. बेला मात्र आपल्या प्रेमावर ठाम असते. शेवटी एडवर्डला तीच्या प्रेमाचा स्विकार करायलाच लागतो.



एडवर्ड आता बेलाची आपल्या कुटुंबीयांशी देखील ओळख करुन देतो. त्याचे कुटुंबीय देखील बेलाचा आनंदाने स्विकार करतात. पण त्याच बरोबरीने त्यांचे सत्य उघड झाले तर काय हल्लकल्लोळ माजेल ह्याची देखील बेलाला जाणीव करुन देतात. बेलाच्या जीवनात पुन्हा एकदा आनंद भरुन जातो.



एक दिवशी एडवर्ड बेलाला आपल्या कुटुंबीयांसमावेत बेसबॉल खेलण्यासाठीघेउन जातो आणे तिथेच ह्या दोघांच्या जीवनाला एक अनपेक्षीत वळण लागते. त्या ठिकाणी त्यांची गाठ एका मानवी रक्ताने तहान भागवणार्‍या दुसर्‍या व्हँपायर कुटुंबाशी पडते. ह्या कुटुंबातील जेम्स आता बेलाच्या मानवी गंधाने वेडापीसा होतो आणी तीच्या रक्तासाठी तिच्या जीवावर उठतो.



कुटुंबातल्याच एक मानलेल्या बेलाच्या जीवाची जबाबदारी आता संपुर्ण कलिन्स कुटुंब उचलते आणी जेम्सला संपवायचा निर्णय घेते. पुढे जे काय घडते त्याचा अनुभव प्रत्यक्षात घेण्यातच खरी मजा आणी उत्कंठा आहे.


एकुणच अजब म्हणावी अशी हि प्रेमकाहाणी प्रत्येकाने एकदा तरी अनुभवायलाच हवी.

स्टेफनी मेयर ह्या लेकीखेच्या कादंबरीवर आधारलेला हा चित्रपट. ह्याच कथाकथानचे पुढचे भाग तीने 'न्यू मून', 'एक्लिप्स' आणि 'ब्रेकिंग डॉन' ह्या नावानी लिहिले आहेत. ह्यातील 'न्यू मून' हय पुढील भागावरील चित्रपट अर्थातच 'ट्वायलाईट भाग २ न्यू मून' देखील प्रदर्शीत झाला आहे. बेल आणी एडवर्डच्या जीवनात आलेले नविन वादळ त्यात चित्रीत करण्यात आले आहे. ह्या भगाविषयी लवकरच लिहितो.



3 टिप्पणी(ण्या):

Amolkumar म्हणाले...

Best Movie

HAREKRISHNAJI म्हणाले...

फार सुंदर सिनेमा. मी आत्ताच पाहिला, पण अर्धवटच, परत सुरवात चुकली.

अनिकेत म्हणाले...

ho.. mi pan aatta donhi weles star movies ver zala tenva pahila saturday aani yesterday. Nice movie.

By any chance, have you read the book. Do read i feel it is better than the movie. Also do read Vampire Diaries excellent love story of vampires

Aniket

टिप्पणी पोस्ट करा