मंगळवार, १६ नोव्हेंबर, २०१०

मी, बाटली आणि देशद्रोहीदेशद्रोही ह्या अशक्यप्राय चित्रपटावर चार ओळी लिहून मी मिपावर लेखक म्हणून पदार्पण केले. त्यावर बऱ्याच गंमती गमतीच्या प्रतिक्रिया देखील आल्या होत्या. बिहारी-मराठी वाद पेटलेला असतानाच खास बिहारींचे महत्त्व आणि त्यांचे औदार्य वगैरे पटवून देणारा चित्रपट अशी हवा करत हा चित्रपट तेव्हा आपल्यावर येऊन आदळला होता. स्वत:ला 'के आर के' म्हणवून घेणाऱ्या कमाल रशीद खान ह्या महामानवाचे हे पाप!

पहिल्यांदा हा चित्रपट पाहिला तो 'कॅम कॉपी' होता. त्यामुळे बराचसा चित्रपट हा अंधार, संवाद नीट ऐकू न येणे आणि आजूबाजूचा आमच्या ज्ञानी मित्रांच्या कॉमेंट्स ह्यामुळे विशेष एन्जॉय करता आला न्हवता. थेटरला आपण जात नाही आणि हा चित्रपट दाखवायचे धाडस कोणी वाहिनी करेनात त्यामुळे डोक्यातून पार पुसला गेला होता. अशातच काल घरी मी एकटा जीव सदाशिव, जोडीला रॉयल स्टॅग आणि मॅक्स वर देशद्रोही असा मणिकंचन योग जुळून आला आणि आमच्या आनंदाला पारावार उरला नाही. स्वत: खुद्द महानायक 'के आर के', जोडीला (बहुदा भोजपुरी चित्रपटाचा) अभिनयसम्राट मनोज तिवारी, रुपसुंदर आणि (शरीराने + दारूने) मीनाकुमारीच्या तोडीस तोड बनत चाललेली ग्रेसी सिंग, अभिनयसम्राज्ञी रिषीता भट आणि द यंग, डॅशिंग झुल्फी सैय्यद अशा रथी महारथींनी भरलेली स्टार कास्ट आणि त्याच्या जोडीला तोंडी लावायला यशपाल शर्मा, अमन वर्मा, रझा मुराद, रणजित इ. इ. ह्या चित्रपटात काम करण्या बरोबरच यातील अजरामर संवाद लिहिण्याची जबाबदारी देखील 'के आर के' साहेबांनी पार पाडलेली आहे.
हान तर आता आपण चित्रपटाकडे वळू. चित्रपटाचा ओपनिंग शॉट... महानायक 'के आर के' वाऱ्याच्या वेगाने धावताना आपल्याला दिसतो. मागे ते 'अच्छा सिला दिया', 'आती हे रात ओढे हुए.. ' टाईप एक गाणे आणि संगीत. हा कमाल खान इतक्या जोरात धावत असतो की दिलवाले दुल्हनीया मधली शेवटच्या शॉटला पळत जाणारी काजोल देखील ह्याला हरवेल असे वाटून जाते. हा धावतो.. धावतो.. धावतो.. आणि कपाळावर एक जखम, मळलेला, रक्त लागलेला शर्ट अशा अवस्थेत एकदाचा एका रेल्वेगाडीत शिरतो. पुढच्याच शॉटला एका एकदम मुंबईच्या रस्त्यावर. चणे खात खात हा एका बनारसी पान वाल्याच्या टपरीपाशी येऊन उभा राहतो. आता तिथेच का उभा राहतो? तर कथेची मागणी म्हणून. हान तर इथे आपला पानवाला एक तरुण मुलीबरोबर आणि मुलाबरोबर तुळशीबागेत ते 'ए लॉटे सेले.. लॉटे सेले' ज्या आवाजात ओरडतात त्या आवाजात गर्द आणि त्याचा पुरवठा ह्यावर गप्पा मारत असतो. ते जोडपे देखील आपण सध्या गर्दची नशा कशी पसरवत आहोत ह्याचे तावातावाने वर्णन करत असते. येवढ्यात काही गुंड हप्तावसुलीला हजर होतात. आता त्यांचाच गर्द विकणाऱ्या पानवाल्याला ते हप्त्यासाठी का मारतात हे मला कळले नाही.

पानवाला आपला मार खात असतो, लोक बघत असतात.. इतक्यात एका टिनपाट बाइकवर ग्रेसी सिंग तिथे पोचते. जाने माने भाई लोगोंको ती कापूस पिंजावा तसे पिंजून धोपटून काढते. आल्या आल्या ती हातातले हेल्मेट एका जाडसर गुंडाच्या अंगावर फेकते. त्यांबरोबर तो गुंड आणि आजूबाजूचे ४/५ गुंड सगळेच चार हात मागे जाऊन पडतात म्हणजे बाईची पावर काय असेल बघा.

तर आता सर्व गुंडाचा नायनाट करून झाल्यावर हिचे हात खराब होतात, मग ती खिशातून एक रुमाल काढते आणि हात पुसून परत खिशात ठेवायला जाते, तर तो तीच्या नकळत खाली पडतो. महानायक लगेच उचलायला हजर! मुळात पुढच्या खिशातून काढलेला रुमाल, ती मागच्या खिशात का ठेवायला जात असावी? असो... भारावलेले महानायक तो रुमाल उचलतात आणि म्हणतात "लगताहे जैसे इतिहास के पन्नो से राणी लक्ष्मीबाई निकलके आ गयी हे! " पुढच्या क्षणाला हि लक्ष्मीबाई बेंबीखाली चार बोटे साडी नेऊन आणि दंड उघडे टाकून कंबर हलवायाला सुरुवात करते. अजून एका अवीट गोडीच्या गाण्याला सुरुवात होते...मुळात चित्रपटाची टायटल्स चालू असतानाच, संगीत :- निखिल (निखिल - विनेय की जोडीसे) असले भीषण हिंदी दाखवून दिग्दर्शकाने आपल्या मनाची कितीही तयारी करून घेतली असली तरी काही काही प्रसंग खरंच धक्का देऊन जातात. हा नवजवान कमाल खान म्हणे कॉलेजात शिकत असतो, त्याच्या जोडीला त्याच्यावर दिलो-जानसे प्रेम करणारी रिषिता भट दाखवली आहे. गाणी म्हणत नाचणे आणि जाता येता आपल्या सायकलने ह्या महानायकाच्या सायकलला धडका मारणे ह्याशिवाय भट कन्येला ह्यात काही काम नाही. मुळात हि बाई जेंटस सायकल घेऊन सायकल का शिकत असते? प्रश्न.. प्रश्न... प्रश्न... आणि येवढ्या मोठ्या गावात हिला फक्त हा कमाल खानच आवडावा? च्यायला ह्या प्रेमाला आंधळे + मुके + बहिरेच म्हणाले पाहिजे. मी खरंच सांगतो माझ्या आजवरच्या आयुष्यात त्या कमाल खानच्या चेहऱ्यावर जसे दिसतातना तसे मतिमंद भाव कुठेही बघितलेले नाहीत. प्रदीप कुमार आणि भारत भूषणं देखील ह्या कमाल खानच्या अभिनया समोर नसिरुद्दीन शहा आणि अनुपम खेर भासतील.

आता महानायक इकडे आपला मित्र शेखरला शोधायला सुरुवात करतो. इथे बळच एक रहिम चाच्या धर्तीवर कादरखानचे पात्र घुसडले आहे. तर ह्या बिहारीला मुंबईतली पहिली लाथ घालण्यासाठी मामा काणे नावाचे मराठी पात्र बळच २ मिनिटांसाठी आणले आहे. तर ह्या आपल्या महानायकाला एकदाचा त्याचा मित्र शेखर भेटतो. हा शेखर म्हणजे मनोज तिवारी. हा माणूस दिसायला बरा आहे, चार आठ आण्याचा अभिनय पण करतो, पण ह्याचा आवाज अगदी ते संस्कार, आस्था वर प्रवचनकार असतातना त्यांच्या आवाजा सारखा आहे. डोक्यात जातो.तर आता मित्र इकडे वॉचमन म्हणून काम करत असतो पण गावात स्वत:ला उगाच श्रीमंत भासवत असतो. त्याने 'के आर के' कडे "मुंबईला कसे काय (कशाला तिज्यायला) येणे केले? " अशी विचारणा केल्याबरोबर फ्लॅश बॅक चालू...

महानायक कालीजात जाणार, त्याला जाता येता शिव्या देणारा आणि मार मार मारणारा बाप रणजित, नातवाला एकदिवशी दुनिया सलाम करेल अशी खात्री असणारा आजोबा अवतार गील हे एकेक करत समोर यायला लागतात. जाता येता कमाल खानला हाणणारा आणि शिव्या देणारा बाप आपल्याला आवडून जातो. "तू पैदा होते ही मर क्यू नही गया? " असा तमाम प्रेक्षकांना पडलेला प्रश्न देखील तो एका प्रसंगात नायकाला विचारून प्रेक्षकांचा अजून लाडका बनला आहे. पण मला कीव वाटली ती अवतार गील ह्या आजोबाची. नाही म्हणजे आपला पोरगा आपले नाव वगैरे रोशन करेल, काही नाही निदान चार दमड्या कमावून आणेल असे प्रत्येक आई बापाला वाटणे साहजिक आहे. आमच्या आई बापाला पण वाटायचे, पण लवकरच मी त्यांचा गैरसमज दूर केला हा भाग वेगळा. पण २४/२५ वर्षे ह्या दिवट्याची वागणूक बघूनही ह्याच्या आजोबाच्या विश्वासाला तडा कसा जात नाही? ह्या घोड्याला साधे पिठाचे आणि खताचे पोते पण सायकवरून आणता येत नसते. शेवटी ह्याचा आजोबा (एकदाचा) मरतो आणि बापाच्या हातचा मार खाऊन हा महानायक मुंबईला पळून येतो हा साक्षात्कार आपल्याला होतो आणि फ्लॅश बॅक संपतो. ह्यानंतर मग गरिबी, बेरोजगारी, शिक्षणाची शून्य किंमत ह्यावर मनोजमहाराज तिवारी ह्यांचे प्रवचन होते आणि त्यावर "आजोबाचे स्वप्न पूर्णं करीनच" अशा बाणेदार उत्तराची तोफ डागून महानायक मित्राची साथ सोडतात.

महानायकासाठी नोकरी, भां** नोकरी कसली? धंद्यात मुनाफा घेऊन लगेच रहिम चाचा उर्फ अब्दुल अका कादरखान फळवाले हजर. ह्याला सगळी फळे त्याचे भाव ह्याची अक्कल आहे हे अंतर्ज्ञानाने जाणून कादरखान ह्याच्या जीवावर फळांचा स्टॉल सोडून दुसऱ्या कामाला जातात. त्यांची पाठ वळल्या वळल्या हप्ता वसुली वाले हजर... हप्ता वसुलीवाल्यांच्या पाठोपाठ जणू वास काढत आल्यासारखी लक्ष्मीबाई पण हजर! भीड तेज्यायला!!

इथे अडचणीत सापडलेल्या ग्रेसी सिंगचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात आपल्या साध्या + भोळ्या + भाबड्या (+ भोसडीच्या असे लिहायचा खरंच फार मोह होत आहे) नायकाच्या आतला एंग्री यंग देशभक्त जागा होतो आणि त्याच्या हातून त्या गुंडाचा खून होतो. ह्या दृश्यातली हाणामारी तर स्टॅलोन, अर्नॉल्ड, अंडरटेकरला तोंडात पाची बोटे घालायला लावणारी.आता महानायकाचा पोलिसांपासून, ज्याची हत्या केली त्याच्या डॉन भावापासून वाचण्यासाठी धडपड आणि पळापळ चालू. त्याला साथ ग्रेसी सिंगची. ह्या धावपळीत एक अतिशय हृदयद्रावक प्रसंग दाखवला आहे. ग्रेसी सिंगला एक मुका भाऊ आहे हे कळत असतानाच अचानक महानायकाच्या एनकाऊंटरची ऑर्डर निघाल्याचे त्यांना समजते. मग हे तिघे पळत सुटतात पण पोलिस अधिकारी ह्यांना पकडतोच. त्याने महानायकावर गोळी चालवल्या बरोब्बर हा मुका भाऊ लगेच मध्ये येतो! अरे काय संबंध? बरं लगेच त्या इन्स्पेक्टरला आणि (विनाकारण ) चार निःशस्त्र हवालदारांना मारून महानायक आणि ग्रेसी सिंग तिच्या भावाचे प्रेत रस्त्यात टाकून तिच्या मावशीच्या घरी आसऱ्याला धावतात. तिची मावशी ह्या दोघांना लगेच प्रेमी वगैरे समजून मोकळी. ग्रेसी सिंगच्या थोबाडावर भाऊ मेल्याचे २ पैशाचे देखील दु:ख नाही. उलट ह्या मावशीच्या समजुतीवर हे दोघे खी खी खी करून खिदळतात आणि लगेच जोडीला अजून एक अवीट सुरांचे गाणे चालू... आणि कहर म्हणजे मावशीचे घर घाईघाईत सोडून जाताना ग्रेसी सिंगच्या जोडीने हा डांबरटपण मावशीला मिठी मारून घेतो.

मग राजकारण्यांचे हातचे बाहुले बनलेला नायक, त्याचा शार्पशुटर बनलेला पण नंतर हृदय परिवर्तन होणारा मित्र आणि नायकाचा सूडाचा प्रवास असा नेहमीच्या वळणाने चित्रपट अंताकडे निघतो. अधे मध्ये बळच मराठी माणसाकडून मुंबईत बिहारी लोकांवर होणारे अत्याचार दाखवणारे घुसडलेले २/३ प्रसंग आणि ते कमी की काय म्हणून ह्या महानायकाचे महासंवाद. "मै तेरा खून पी जाउंगा, आंखे निकाल लुंगा तेरी" किंवा "कभी युपी बिहार आके देखो.. मेहमान को भगवान मानते हे" वगैरे संवादाबद्दल तर बोलायलाच नको. पुन्हा प्रत्येकाचा खून करताना जोरात "अSSSय तू खल्लास" असे ओरडणे जोडीला आहेच. मुळात कमाल रशीद खान हा मनुष्य चित्रपटाची पहिली पाच रीळ दिलीप कुमारच्या अभिनयाची आणि संवादाची नक्कल करण्याचा प्रयत्न करताना दिसतो तर उरलेली रील राजकुमारची. त्याला बहुदा पाच सहा रिळानंतर आपण कुठल्याश्या एका बाजूने राजकुमारासारखे दिसतो असा शोध लागला असावा.जाता जाता पडलेले काही प्रश्न :-

१) अंगावरच्या कपड्यानिशी गावाकडून पळून आलेला कमाल खान रोज नवनवीन इस्त्री केलेले शर्ट कुठून आणतो?

२) त्याचा बाप त्याला विनाकारण रोज का शिव्या देत असतो?

३) वॉचमनची २५००/- रुपयांची नोकरी करणारा शेखर फळांची बाग कशी काय विकत घेतो?

४) "ये सब मै अपने भाई के लीये कर रही हूं" असे म्हणणारी ग्रेसी सिंग नक्की भावासाठी काय करत असते?

५)एक उपमुख्यमंत्री एका सब इन्स्पेक्टरला कर्फ्यू लावायची ऑर्डर काढायला कसे सांगू शकतो?

इत्यादी इत्यादी.... आणि हो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न :- भरलेली माझी बाटली कोणी रिकामी केली?

असो.. चित्रपटातील अविस्मरणीय दृश्यांची आणि संवादाची ओळख तुम्हाला थोड्या प्रमाणात व्हिडोंवरून आली असेलच. तर असा हा हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात प्लॅटिनमच्या अक्षरांनी कोरून ठेवावा असा चित्रपट आपण सर्वांनी पाहायलाच हवा.5 टिप्पणी(ण्या):

अभिजीत म्हणाले...

दर्जेदार चित्रपट आणि तेवढेच दर्जेदार परीक्षण !

हा चित्रपट माझ्या आवडत्या चित्रपटांपैकी एक आहे. :P मध्यंतरी KRK ने देशद्रोही-२ ची घोषणा केली होती. तो प्रदर्शित होण्याची मी वाट बघत आहे.

Major Amol म्हणाले...

mi pan ya sunday la ha picture awarjun + wel kadhun + aathavanine baghitla.
Dhanya jhalo.
Ha movie jyane baghitla tyala mithun, chanki pandey yanche 80' 90' madhle movie baghaichi garaj nahi.
mala padlele aankhi kahi prashn:
1. KRK ha wanted mhanun news madhe aale aste tari tyala ministerchya gharchi security olkhat kase nahi?
2. Plaster madhe banduk lapavli tar ti metal detectorla sapdat nahi ha navinch shodh hotha.
3. Extra shots je break madhe lagaiche tyamadhe kRK movie la pratek wakyat super hit kase kai mhanat hotha?

Unknown म्हणाले...

अशक्य भारी पोस्ट.. मी परवा बघत होतो पण पुर्ण नाही बघता आला, आत्ताच एक बाटली घेऊन येतो आणि बसतो बघायला..

Anand Kale म्हणाले...

हहपुवा...
मी असल्या सिनेमांच्या वाट्यालाच जात नाही... (याचं मला खुप सद्या दु:ख होत आहे...)
मी खुप मोठ्या मनोरंजनापासुन मुकलेलो आहे असं मला वाटू लागले आहे

अनामित म्हणाले...

we are weighting for hackers underground part 5

टिप्पणी पोस्ट करा