गुरुवार, ३० जून, २०११
काल 'रागिणी MMS' हा बहुचर्चित (?) यशस्वी वैग्रे विशेषणे लागलेला आणि सेक्स थ्रिलर अशी जाहिरात झालेला चित्रपट पाहण्यात आला. यशस्वी थ्रिलर चित्रपटात जे काही असावे लागते ते ह्यात सगळे असूनही हा चित्रपट मनाची पकड घेत नाही. चित्रपटाला अगदीच टुकार म्हणता येणार नाही पण एकदा बघून पश्चात्ताप होणार नाही असे म्हणता येईल. हा खरेतर एक भयपट आहे कारण ह्यात भुताचा वावर आहे. भूत आहे, हिंसा आहे, खून आहे, झपाटणे आहे, भिती आहे आणि.... आणि सेक्स देखील आहे. खरे सांगायचे तर चित्रपट सुरु झाल्यापासून हळूहळू आता हा सॉफ्ट पॉर्न कडे झुकतो का काय? असाच प्रश्न निर्माण व्हायला सुरुवात होते आणि मध्यांतरानंतर तर चित्रपटाला ताण ताण ताणले आहे आणी तिथेच सगळी मजा निघून जाते.
रागिणीचा (कैनाझ मोतीवाला) मित्र उदय (राजकुमार यादव) तीला विकेंडसाठी शहराबाहेरच्या एका फार्महाऊस वरती घेऊन जातो. हे फार्महाऊस जंगलात असते. रागिणी आनंदात असते मात्र उदयच्या मनात काही वेगळेच विचार असतात. ऍक्टर व्हायची स्वप्ने बघणारा उदय आपल्या मित्र पंडित ह्याच्या साहाय्याने त्या फार्महाऊस मध्ये रागिणीची सेक्सटेप चित्रित करणार असतो. रागिणी मात्र ह्या सगळ्यापासून अनभिज्ञ असते.
इकडे बंगल्यात शिरल्या शिरल्याच आधी लाइट नसल्याचे कळते मग उदय एका अडगळीच्या आणि अंधार्या बोळातल्या खोलीत जाऊन स्विच शोधतो. त्याच खोलीत त्याला मॉनिटरवरती त्याच्या मित्राने संपूर्ण फार्महाऊसमध्ये विविध ठिकाणी लपवलेले कॅमेरे दिसतात. आनंदलेला उदय हॉल मध्ये येतो आणि ताबडतोब त्याच्या प्रेमचाळ्यांना ऊत येतो. रागिणी मात्र 'भूक लागलीये म्हणून ओरडत असते.' मग पॅक करून आणलेला डबा बाहेर काढला जातो ज्यात अचानक आळ्या निघतात. (हे राम !) मग शेवटी ते अन्न फेकून देण्यात येते. तोवर बरीच रात्र झालेली असल्याने आता दोघेही वरच्या मजल्यावरच्या बेडरूम कडे मोर्चा वळवतात. (इथे प्रेक्षकही सावरून बसतात)
बाथरुम मध्ये रागिणी फ्रेश होईपर्यंत इकडे उदय टीव्ही मध्ये लपवलेल्या कॅमेर्याची सेटिंग वैग्रे अॅडजेस्ट करून घेतो. रागिणी बाहेर आल्यावर पुन्हा प्रेमचाळ्याना ऊत येतो... पण ह्या वेळी बंगल्याच्या दारावर थापा ऐकायला येऊन लागतात आणि पुन्हा आपल्या आणि उदयच्या रंग मे भंग होतो. हिलस्टेशनला निघालेले रागिणीचे मित्र पिया आणि उदय जाता जाता तिला भेटायला आलेले असतात. नुसते आलेले नसतात तर बिअर वैग्रे घेऊन पार्टिच्या तयारीनेच आलेले असतात. आता उदयची चिडचिड चालू होते, मात्र रागिणी त्याची समजूत काढते. पार्टी ऐन रंगात आलेली असतानाच उदयला बंगल्याच काहीतरी विचित्र जाणवते, आसपास कोणीतरी वावरत आहे असे वाटायला लागते. त्याच्या मानेवर अचानक वार देखील होतो. गावात कोणीतरी सांगितलेली त्या बंगल्यातल्या लोकांनी त्यांच्या कुटुंबातल्या बाईला चेटकीण म्हणून मारल्याची आणि तिच इथे वावरत असल्याची गोष्ट त्याला आठवते. ती गोष्ट तो सगळ्यांना सांगून पियाला घेऊन तिथून पळ काढतो.
आता सगळी आवरा आवर करून पुन्हा उदय आणि रागिणी बेडरूम मध्ये (पुन्हा प्रेक्षकांच्या आशा पल्लवित) जातात. पुन्हा त्यांच्या प्रेमप्रदर्शनाला उत येतो. ह्यावेळी उदय रागिणीचे हात बेड्यांनी बेडला बांधतो आणि प्रेमाचा नवाच आविष्कार दाखवतो. त्यांचे प्रेम रंगात आलेले असतानाच उदयचे केस धरून त्याल कोणीतरी ओढते आणि दोघांचा थरकाप उडतो. त्या दोघांशिवाय अजून कोणीतरी आणि ते ही अमानवीय अस्तित्व आजूबाजूला वावरत आहे ह्याची त्यांना जाणीव होते. ह्यासर्वात बेड्यांची किल्ली हरवते, मोबाईलची बॅटरी संपते आणि शेवटी उदय झपाटला जातो आणि आत्महत्या करतो. आता उरते ते बेड्यांमध्ये हात अडकलेली असाहाय्य रागिणी आणि ते अस्तित्व...
पुढे काय होते ते चित्रपटातच बघण्यात खरी रंगत आहे. आता ती प्रत्येकालाच रंगत वाटेल असा माझा दावा नाही. चित्रपटातले अमानवीय अस्तित्व हे एका सो कॉल्ड चेटकिणीचे दाखवले असून ते मराठी भाषिक दाखवली आहे हे रहस्य उघड करायला हरकत नाही. तीचे 'मी चेटकीण नाही... मी माझ्या मुलांना मारले नाही..' चे पालुपद मात्र असह्य. खरे सांगायचे तर कैनाझचा एकूण मादक लुक आणि बोल्ड दृश्यात देखील तिने न लाजता दिलेली साथ ह्यासाठी सुद्धा हा चित्रपट बघायला हरकत नाही. हो..उगा ताकाला जाऊन भांडे का लपवा ? ती दिसली आहे मादक आणि अभिनय देखील बराच चांगला केला आहे. राजकुमार यादव देखील ठीकठाकच, मात्र त्याची घाबरल्याचा जो अभिनय केला आहे ना तो का कुणास ठावुक खदखदून हसवून जातो आपल्याला.
तर सांगायचा मुद्दा काय तर थरारपटाची म्हणून फार मोठी अपेक्ष न ठेवता नव्या चेहर्यांचा टैमपास चित्रपट म्हणून हा बघायला नक्कीच हरकत नाही.
लेबल: भयपट
फॉलोअर
Translation
Save as PDF
सदस्यत्व घ्या
Labels
- इंग्रजी चित्रपट (10)
- कथा (29)
- चित्रपट (20)
- तेलगु (1)
- पुस्तक प्रकाशन (3)
- प्रहसन (12)
- भयपट (4)
- मराठी (8)
- स्तंभलेखन (1)
- हिंदी (12)
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा