अभिमन्यु राजाध्यक्ष
चला आमचा सोनुला उशिरा का होइना पण सुखरुप पोचला एकदाच घरी. अभ्राचा काळजीने ग्रासलेला चेहरा बघवत न्हवता. मन चिंती ते वैरी हि ना चिंती उगाच म्हणत नाहीत. राजस परत येइपर्यंत तिला कसे सांभाळले हे माझे मला माहीत. सगळ्या मुलांना आणायला एक वेगळी बस पाठवली होती म्हणे , तिला रॉंग साइडनी कशी बशी मुलांपर्यंत पोहोचवुन मुलांना परत आणले इकडे. राजसला आणायला शाळेत गेलो तेंव्हा कोणी शिक्षक काही बोलायलाच तयार न्हवते, राजसच्या ग्रुप बरोबर गेलेली टिम सुद्धा कुठे दिसत न्हवती. काय झालय कळायला काहिच मार्ग न्हवता.
"राजाध्यक्ष साहेब, बराच उशीर झालाय त्याबद्दल मी दिलगीरी व्यक्त करतो. आणी हो उद्या पासुन २ दिवस शाळेला सुट्टी आहे." डायस सांगत होते. माझे लक्ष मात्र काहि तासातच एकदम प्रौढ वाटायला लागलेल्या राजसच्या चेहर्यावर खिळले होते. घरी परत येइपर्यंत स्वारी एकदम शांत होती. अंधारातुन गाडिबाहेर दिसणार्या प्रत्येक गोष्टिकडे पाहात असताना मात्र तो त्या पहिल्यांदाच बघत असल्या सारख्या भावना चेहर्यावर दिसात होत्या.
"मिस्टर राजाध्यक्ष इफ पॉसिबल, राजसला त्याच्या आईकडे सोपवुन तुम्ही परत शाळेत येउ शकाल का ? तुमच्याशी काहि महत्वाचे बोलायचे आहे." अगदि निघताना शेवटच्या क्षणी डायस सरांनी हळु आवाजात केलेली विनवणी का कोण जाणे मनाला कुठल्यातरी अगम्य धोक्याची जाणीव करुन देत होती.
"राजकुमार कशी झाली म्हणे सहल ? आणी जोराचा पाऊस आल्यावर तुम्ही घाबरला नाही ना ?" स्वत:च्या विचारातुन सुटका म्हणुन मी शेवटी राजसशी बोलायला सुरुवात केली.
"आधी घाबरलो होतो, पण मग तो येउन बसला माझ्या शेजारी. मग नाही वाटली भिती." राजस निरागसपणे म्हणाला.
"तो कोण रे ? ध्रुव ? का तेजस ? " मी आपली आठवतिल त्या राजसच्या मित्रांची नावे घेतली.
"छ्या तो काय आमच्या शाळेत नाहिये काही. तो तिथच राहतो सिंव्हाच्या गुहेत." राजसनी त्या लेण्यांना सिंव्हाची गुहा असे नावही देउन टाकले होते तर. अर्धे लक्ष रस्त्यावर ठेवुन असलेल्या माझ्या मेंदुला तो काय म्हणाला हे निटसे कळलेच नाही. खरे सांगायचे तर काय घडले आहे आणी काय घडणार आहे हेच कोणाला कळाले न्हवते हेच खरे.
अभ्राची कशीतरी समजुत घालुन राजसला तिच्या ताब्यात देउन मी शाळेकडे निघालो.
चंदु
आ गा गा गा !! पांडुरंगाची क्रिपा म्हणुन वाचलो त्या सगळ्यातुन. येक तास जी दातखीळी बसलिया ते आत्ता आत्ता कुठ बोलाया याय लागलया. लै वंगाळ झाल बघा. त्या पिरती मॅडम गुहेकड जाताना म्या बघितल पन लै येळ झाला तरी परतनात की,ज्याला बघाया गेल्ती त्यो पोर्गा भि कवाच युन्शान बसला होता बसमंधी. बाकिचे शिक्षुक भी कालवा कराया लागले म्हुन ड्रियायव्हरची ब्याटरी घेउन त्यांस्नी शोधाया गेलो.
पांडुरंगा !! आत शिरुन बघतो त काय , ह्ये श्ये दोनश्ये पावलावर त्या पिरती म्याडम पडलेल्या, ह्ये कासिम कापतुया कोंबडिची मुंडी तशी म्याडम ची मुंडी भी येका सायडला पडलेली, कापड रक्तानी पार लाल. माझ्या तर हाता पायतली ताकदच गेली जनु, वरडाया भी सुधरना, हाका मारल्या तर घशातुन आवाज भी न्हाय येउन राहायला.
तेव्ड्यात अंधारामधी दोन लाल डोळ चमकल आणी कुत्र्यावानी गुर्गुर भि एकाया आली. माला तर वाटल मरतुया मी आज ! पांडुरंगाच न्हाव घेतला आनी जे सगली ताकद लावुन बाहेर पळाया सुरुवात केली कि बस. देवा बाहेर युन गुव्हेकड हात दावतोय तेव्हड्यात ह्यी असली झाडाची फांदी वरुन डोक्याकडे आली, सगळ्यांनी वरडा आरडी केली म्हुन येळेत बाजुला झालो न्हायतर पार लगदा झाल्ता न्हव. त्या वक्ताला जी वाचा बसली त्यी येकदम पुलिस आल्यावरच चालु झाली.
अभिमन्यु राजाध्यक्ष
छे ! आज झोप लागणे शक्यच नाहिये. डायस सरांनी जे सांगितले ते ऐकुन मी सुन्नच झालोय. येव्हडा सगळा भिषण प्रकार घडला तिकडे ? आणी तो कोण तो मुर्ख इन्स्पेक्टर म्हणे तुमच्या राजसला ह्यातली काही महिती असावी. का तर म्हणे अनुप्रिता मॅडम ह्याला शोधयला गेल्या होत्या, त्या आत गेल्यानंतर काहि वेळाने हा एकटाच त्या गुहेतुन बाहेर येउन बसच्या मागच्या दाराने आत येउन बसला. विचारले तर काय बोलायलाच तयार नाही. झोप आलिये म्हणुन चक्क झोपुनच गेला.
खरच राजसला ह्यातली काही माहिती असेल ? पण मला तर तो अगदी नोर्मल वाटला. हा चेहरा थोडा ओढल्या सारखा दिसत होता पण आज ताण ही किती पडला होता त्याच्यावर. आणी हे असले काहीतरी भिषण बघुन तो येव्हडा शांत राहुच कसा शकला असता ? बरे झाले ह्यातले काही अभ्रापाशी बोललो नाहिये, त्या बिचारीला उगाच काळजी.
मी असा विचार करतोय तोवर अचानक एक कुबट असा वास मला बेडरुम मध्ये यायला लागला, एकाएकी गरम हवेचे झोत अंगावर येतायत असे वाटायला लागले. संपुर्ण घरच एखाद्या पोकळीत शिरतय अशे विचित्र जाणिव व्हायला लागली. अभ्राकडे बघितले तर तिची सुद्धा चुळबुळ चालु झाली होती, म्हणजे हा भास न्हवता तर.
"बाबु... नक्क्क्क्को ना " राजसची किंचाळी कानात शिरली आणी मी ताडकन अंगावरचे पांघरुण फेकुन त्याच्या रुमकडे घाव घेतली. जस जसे त्याच्य रुमच्या जवळ जात होतो तस तसे कुबट वासाचे प्रमाण वाढत चलले होते, अक्षरश: एखाद्या गरम भट्टीमध्ये शिरल्यासारखे वाटत होते. मी धाडकन राजसचा दरवाजा उघडुन आत शिरलो. सगळी खोली अस्ताव्यस्त झाली होती. आणी राजस एखाद्या भित्र्या सश्यासारखा दिवाण आणी कपाटाच्या बेचक्यात अंग चोरुन बसला होता.
देवा गजानना !! त्याच्या चेहर्यावरचे ते भाव मी आयुष्यात कधी विसरु शकणार नाही. जगातली सगळी असह्हायता, वेदना त्याच्या चिमुकल्या डोळ्यात साठली होती, चेहरा भितिने पांढरा पडतो म्हणजे काय होते हे त्या चेहर्याकडे बघुन मला पहिल्यांदा उमजले ! मी भानावर यायच्या आधीच अभ्रा भानावर आली होती, तिने पळत जाउन राजसला आपल्या मिठीत घेतले. आईच्या मिठीत शिरल्या बरोबर तो निरागस जीव कळवळुन रडायला लागला.
"मला नाही जायचे त्याच्या बरोबर... मी नाही तुम्हाला सोडुन जाणार. तो घाणेरडा आहे आणी त्याच्या अंगाला यक्क यक्क वास पण येतो."
"नाही हं सोन्या, कुठे कुठे जाउन देणार नाही मी माझ्या सोन्याला. हाथ्ह रे ! कोन माझ्या सोन्याला त्रस देते ते ?" अभ्रा राजसला समजावत होती. आणी मी सुन्न होउन मगाशी जे दृश्य दिसले त्याच्या भास आभासावर विश्वास ठेवायचा प्रयत्न करत होतो.
मला राजसच्या रुम मध्ये शिरल्या शिरल्या जे दृश्य दिसले ते खरे असेल ? का मनाचा खेळ ? राजसच्या अंगावर भयंकर सुळे काढुन ओणवा झालेला जो लांडगा सदृश्य प्राणी मी बघितला तो खरा होता ? का माझ्या मनाचे खेळ ? खरच काहि सुचायला तयार न्हवते.
अभ्रा राजाध्यक्ष
हे नक्की माझ्या पासुन काहितरी लपवत आहेत हे मला ते राज च्या शाळेतुन आल्यापासुन जाणवत होते. कहितरी कुठेतरी चुकलय हे कळत होते, पण त्याला विचारायची भीती वाटत होती, वाटत होते थोडे थांबावे आजपर्यंत त्यानी काहि लपवले नाहीये, तो आपणहुन मनमोकळे करेपर्यंत वाट पहावी. आणी अचानक रात्री घडलेली ति घटना मला मुळापासुन हलवुन गेली. काय होते ते सगळे ?
राजसला त्या रात्री झोप म्हणुन लागली नाही, कधीहि बघावे तेंव्हा हा टक्क डोळे उघडे ठेवुन जागाच. गोष्ट सांगुन झाली, गाणी लावुन झाली पण परिनाम शुन्य. शेवटी त्याला मध्ये घेउन मी आणी अभीने संपुर्ण रात्र काढली.
शेवटी मला कळायचे ते कळालेच ! अभी कितिही गप्प बसला तरी सकाळी आलेल्या वर्तमानपत्राने अगदी छायाचित्रांसकट माझ्या डोक्यावर घाला घातलाच. आणी मग सुरु झाले ते दुष्टचक्र ... रात्री बेरात्री राजसचे किंचाळुन उठणे, रात्र रात्र न झोपणे, रोज ती पोलिस चौकशी , कधी मी तर कधी ह्यांनी त्याला चौकीत घेउन जाणे किंवा घरी आलेल्या पोलिसांना तोंड देणे.
दिवसेंदिवस राजस वाळत चालला होता.शहरातले सगळे चाईल्ड स्पेशालीस्ट पालथे घालुन झाले, अगदी शेवटचा उपाय म्हणुन मानसोपचार तज्ञ सुद्धा झाले पण सगळ्यांनी 'नोर्मल' हा एकच रिपोर्ट दिला. आणी एका रात्री तो आमच्या डोळ्यासमोरच फरफटत दाराकडे ओढला गेला तेंव्हा मात्र माझा प्राण कंठाशी आला आणी हे काहीतरी वेगळे आहे ह्याची मला जाणिव झाली. आयुष्यात घेतलेल्या अनेक योग्य निर्णयांपैकी एक मी तेंव्हा लगेच घेतला. मी फोन करुन दादा आणी मामींना बोलावुन घेतले. माझे सासु सासरे पण आई वडिलांपेक्षा निराळे नसणारे. मामींनी आल्या आल्या राजसचा आणी घराचा ताबा घेउन टाकला, दादा घरात शिरल्यापासुनच थोडे अस्वस्थ वाटत होते. भवतेक त्यांना न कळवल्यामुळे चिडले असतील असे मला वाटत होते.
"आभा त्याला ऑफिस मधुन फोन करुन बोलवुन घेतेस का ग ?" दादा म्हणाले. मी जरा चमकलेच पण ताबडतोब फोन करुन ह्यांना बोलावुन घेतले. हे आल्या बरोब्बर दादा त्यांना घेउन गच्चीत निघुन गेले.
अभिमन्यु राजाध्यक्ष
येव्हडे काय महत्वाचे बोलायचे असेल दादांना ? ते पण एकांतात ? मला गच्चीचे जिने चढताना प्रश्न पडला. खरेतर त्य दिवशी राजस एखाद्या गवताच्या काडीसारखा फरफरा दाराकडे ओढला जात असताना बघुन मी अंतर्बाह्य हादरलो होतो, जे घडतय ते अमानवीय आहे हे कळत होते, काय करावे काहीच सुचत न्हवते. एका हातानी राजसचा हात आणी एका हातानी मी दिवाणाला गच्च पकडुन ठेवले होते. अभ्रा तर बेशुद्धच पडायची बाकी होती. त्याचवेळी खोलीत एक अलौकिक सुगंध दरवळला, "सोड त्याला" एक धिरगंभीर हुकुम खोलीत घुमला आणी क्षणार्धात आमच्या खोलीत घोंघावणारे ते वादळ शांत झाले. कोणी हुकुम सोडला का सोडला माहित नाही पण जो कोणी देवा सारखा धावुन आला त्याला मी मनोमन दंडवत घातला.
दादांपाशी मी हे सगळे सांगत असताना त्यांच्या चेहर्यावर एक अविश्वसनीय असे भाव दाटुन आले होते.
"भार्गव, भार्गव नाव आहे त्या सत्पुरुषाचे." दादा आकाशाकडे हाथ जोडत म्हणाले, आणी मी त्यांच्या तोंडाकडे बघत बसलो.
भार्गव
भार्गव म्हणा पिर म्हणा फादर म्हणा नाहितर देवदुत म्हणा, ह्या नरदेहास तुम्ही कोणत्याही नावानी ओळखु शकता. माझी ना नाही.
गेले काही दिवस सतत अस्वस्थ वाटत होते, चराचरार भरुन राहिलेल्या ह्या शक्तिवर कुठेतरी आघात होतोय, निसर्ग नियमाच्या विरुद्ध काहितरी घडतय असे सतत जाणवत होते. पण गुरुच्या आज्ञेवीन त्याचा तपास लावणे चुक होते. आज मात्र सकाळपासुन काहितरी घडणार काहितरी घडणार असे वाटत होते, सकाळच्या व्यायम करुन पुन्हा श्रीरामचंद्राच्या मुर्तीपुढे नमस्काराला गेलो आणी तो धिरगंभीर आवाज कानात घुमला, "भार्गवा, तो सुटलाय बर का. आता त्याला आवरायची जबाबदारी तुझी आहे. असे शासन कर त्याला की पुन्हा तो निसर्गाच्या चक्राला भेदायचा विचार सुद्धा करणार नाही. भार्गवा आज तुझ्या आणी माझ्या दोघांच्याही परिक्षेची वेळ आहे. ती वेळ आलिये भार्गवा लढाई साठी तय्यार हो." गुरुदेवांचा आवाज कितीतरी वेळ कानात निनादत होता.
कोण होतो कुठुन आलो माहित नाही, कळायला लागल्या पासुन मी गुरुदेवांबरोबरच आहे. एक एक गोष्टी शिकत गेलो आणी ह्या सगळ्या मागे काही खास कारण आहे हे उमजायला लागले. गुरुदेवांनी हळुहळु सर्व निसर्गचक्र मला उघडे करुन दाखवले, चराचर म्हणजे काय आणी त्याचे संगोपन कसे होते कोण करते ते समजावले. आणी एक दिवशी लक्षात आले की हो मी संरक्षक आहे, ह्या प्रकाशाचा मी संरक्षक आहे.
होय भार्गवा ह्या चारी दिशांचा, तेजाचा ह्या चराचराचा संरक्षक म्हणुन तुझा जन्म झाला आहे. जेंव्हा कधी ह्या काळ्या शक्ती निसर्गनियमा विरुद्ध वागतील तेंव्हा त्याना रोकण्यासाठी, त्यांना शासन करण्यासाठी तुझा जन्म झाला आहे. गुरुदेवांनी माझ्या आकलन शक्तीवर शिक्कामोर्तब केले. तेंव्हापासुन ते गुरुजींनी समाधी घेइपर्यंत मी अज्ञातवासातच होतो. गुरुदेवांच्या समाधी नंतर त्यांच्याच आज्ञेने मी सामान्य लोकांच्यात मिसळुन गेलो.
काही महिन्यापुर्वीच ज्या काल लेण्यात नाथांनी "कल्वाला", कलीच्या हस्तकाला बांधुन ठेवले होते त्या लेण्या उत्खननात सापडल्याची बातमी वाचली आणी आगामी अशुभाच्या चाहुलीने मन चिंताग्रस्त बनले. आता हातात फक्त वाट पहाणे उरले होते.. तो मुक्त झाला असेल काय ?
अभिमन्यु राजाध्यक्ष
असा काय वेड्यासारखा बघतोयस ? अरे राजसला बघितल्यापासुनच मला हि शंका सतावत होती त्यामुळे मी आल्या आल्या आधी माझ्या अध्यात्मिक गुरुंना फोन लावला, तेंव्हा हे भार्गव तिथेच बसले होते, त्यांना ह्या प्रकारा विषयी कळाल्याबरोब्बर त्यांनी तिथुनच मला फोन केला आणी सगळी माहिती विचारुन घेतली. आता काहि वेळात ते येतीलच इकडे. दादा म्हणाले.
देवा कुठल्याही रुपात का होइना पण ये आणी सोडव रे ह्या सगळ्यातुन एकदा.
काहि वेळातच भार्गवांचे आमच्या कडे आगमन झाले. ४४/४५ वय असेल पण तब्येत मात्र एखाद्या २५ शी च्या तरुणाला लाजवेल अशी धिप्पाड, भव्य कपाळ त्यावर अष्टगंधाचा नाम, साधेसे कपडे घातलेले भार्गव आत आले आणी २ दिवसांपुर्वी नुसत्या त्या हुकुमी आवाजावर राजसचा जिव वाचवणारे ते हेच हि खात्री पटायला वेळ लागला नाही. त्यांच्याकडे बघितल्या बरोबर मनात एक आदराची भावना निर्माण झाली होती.
"नमस्कार, मी येइअपर्यंत माझ्याबद्दलची योग्य ती माहिती तुमच्या पर्यंत आलिच असेल, तेंव्हा आता वेळ न घालवता मी राजसला भेटु शकतो का ?
भार्गव
अच्छा तर ह्या कोवळ्या जिवाचा वापर केला गेला होता तर ह्यावेळी ! किती निरागस आणी सुकुमार सौंदर्य असावे ह्या जिवाचे पण आता मात्र एखाद्या उसाच्या चिप्पाडा सारखी अवस्था झाली होती.
"राजस, या असे इकडे या बरे जरा." त्यावेळी काय घडले ह्याची त्याला कल्पना नसणारच त्यामुळे त्याला प्रश्न विचारुन उपयोग न्हवता. तो अजुन पुर्णपणे 'कल्वाच्या' अंमलाखाली आला न्हवता, त्याच्या आतच काही करणे गरजेचे होते. मी राजसच्या डोक्यावर हाथ ठेवला आणी माझी एक एक कुंडलीनी जागृत करायला सुरुवात केली, आणी तो क्षण आला.. आता मी राजसचा मेंदु पुर्णपणे वाचु शकत होतो.
त्या बसमधल्या गमती जमती, गाणी सगळे सगले मी अनुभवु शकत होतो. आणी तो क्षण आला जेंव्हा लेण्यात फिरता फिरता अचानक बाजुच्या डोंगरावरची दरड कोसळली आणी तो दरवाजा किंचीत उघडा झाला. लेण्यांमध्ये फिरता फिरता अचानक भुकंपा सारखे सगळे हलायला लागले, सर्वजण सैरा वैरा पळत सुटले आणी राजस त्या उघडल्या गेलेल्या दगडी दरवाजातुन आत शिरला. हाच तो क्षण जेंव्हा 'त्यांनी' निसर्ग नियमाच्या विरुद्ध जाउन ह्या कोवळ्या जिवाला खेळवायला सुरुवात केली.
दगडात अडकलेले ते गोजिरवाणे मांजराचे पिल्लु बघुन राजसचा जिव तळमळला आणी त्यानी त्या मांजराला स्पर्श केला आणी...
अचानक एखादा विजेचा झटका बसावा तसा मी भानावर आलो. 'तो' आला होता. तो इथेच कुठेतरी आजुबाजुला होता.
माझ्याप्रमाणेच त्यालाही माझ्या अस्तित्वाची जाणीव झाली असावी.
मी घाईघाईने राजसला घेउन बाहेर आलो. "हे बघा माझ्यावर विश्वास ठेवा, राजसला काही होणार नाही. तुम्ही फक्त आजची रात्र मला आणी राजसला ह्या घरात एकटे सोडा." कसेतरी राजसच्या घरच्यांची समजुत घालुन मी आधी ती वास्तु मोकळी करुन घेतली. राजसला हाताला धरुन देवघरात नेताना माझ्या मनाला काय वेदना होत होत्या मलाच माहीत, ह्या कोवळ्या जिवाला असे एखाद्या अमीषा सारखे वापरणे मलाही पटत न्हवते, पण दुसरा मार्गच न्हवता.
मी राजसचे दोन्ही हात हळुवारपणे माझ्या हातात घेतले आणी संरक्षक कवच म्हणण्यास सुरुवात केली. हळुहळु बाहेर अंधार दाटला आणी 'त्याचे' अस्तित्व अजुन ठळक व्हायला लागले.
"तुला नेमलाय वाटत आता रक्षक म्हणुन ? हा हा हा आधिच्या रक्षकाला मी कसे मारले होते ठाउक आहे का तुला ? जा निघुन जा इथुन, माझ्या शक्तीपुढे तु फारच तोकडा आहेस, एखाद्या गवताच्या काडी सारखा भिरकावुन देइन मी तुला." हो ! त्याचाच चिरका आवाज होता तो, कल्वाचा !!
"समर्थाचीया सेवका वक्र पाहे असा सर्व भुमंडळी कोण आहे ? निच कल्वा तु निसर्गाचा नियम मोडला आहेस तेंव्हा मी ह्या चार दिशांचा रक्षक तुला हुकुम सोडतोय की जा, आपल्या नेमुन दिलेल्या जागी तु परत जा !!" मी कल्वाला आज्ञा केली.
आणी अचानक छातीवर जोरदार प्रहार झाला. "मुर्खा अजुन वेळ गेली नाहिये, सोड माझ्या सावजाला आणी पळुन जा पळुन जा !!" कल्वाचा भिषण चित्कार त्या देवघरात घुमला ! आता मात्र कल्वाला धडा शिकवणे भागच होते.
मी मनातल्या मनात सर्व तेज शक्तींचे स्मरण केले आणी तेजाचा एक लोळ कल्वाच्या दिशेने फ़ेकला, त्या दणक्यानी तो कळवळला, काहि वेळा पुरता भांबावुन गेला आणी तेव्ह्ड्यात मी अजुन एक आघात केला. काहि वेळसाठी तो एकदम मागे सरला त्याचे अस्तित्व त्यानी गुंडाळुन घेतले. मी मात्र कोणत्याही प्रकारे होणार्या आघातासाठी सज्ज होतो.
अचानक एक जोरदार भोवरा आला आणी मी त्यात खेचलो गेलो, काही क्षण काय करावे तेच सुचेना मी पुरता गडबडुन गेलो, "सावध भार्गवा सावध !!" गुरुदेवांचे शब्द घुमले आणी मी भानावर आलो. बघितले तर कल्व मला त्याच्या जगात ओढुन घेउन आल होता. माझ्या आजुबाजुला हजारो कल्व विकट हास्य करत उभे होते. त्रिमितीच्या बाहेरच्या त्या जगातील प्रत्येक कणाकणावर त्याची हुकुमत होती. आता मात्र मी स्वत:ला पुर्णपणे सावरले आणी अखेरच्या संग्रामासाठी तयार केले.
अचानक मी हजारो कालसर्पांनी वेढलो गेलो त्यांचे ते जिवघेणे फुत्कार त्यांची शरिरावरची पक्कड मला मृत्युस्पर्शाची जाणीव करुन देत होती.पुन्हा एकदा माझ्या सर्व शक्ती पणाला लावुन मी ती बंधने तोडली. एखाद्या अभेद्य शक्ती सारखा मी कल्वापुढे उभा राहीलो. शेवटचा प्रयत्न म्हणुन कल्वाने माझ्या बरोबरच ओढल्या गेलेल्या राजसकडे झेप घेतली, मग मात्र मी वेळ न घालवता अमोघ असा बंधन मंत्र जपत त्या तेजाच्या स्वामी कडून प्राप्त झालेला बंध कल्वाच्या दिशेने फ़ेकला आणी त्याला बंधमुक्त केले.
किती कालासाठी कोणास ठाउक ? पण माझे कर्तव्य मी निभावु शकलो ह्याचा मात्र प्रचंड आनंद झाला.
चला आता निघाले पाहिजे, राजसला त्याच्या घरी सोपवुन ह्या कल्वाला बंधक म्हणुन ठेवण्यासाठी 'योग्य' जागा शोधली पाहिजे. तो पुन्हा बाहेर येणार नाही ह्याचा पक्का बंदोबस्त केला पाहिजे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा