गुरुवार, २९ जानेवारी, २००९

राझ - द डोकेदुखी कंटीन्युज...

काल कुठुन अवदसा आठवली आणी तो राझ नावाचा शिनिमा बघितला असे झाले आहे ! हा राझ नक्की हॉरर आहे, मर्डर मिस्ट्री आहे का सस्पेन्स थ्रिलर आहे हे शेवट पर्यंत राझच राहाते. भट आणी सुरी द्वयी ला नक्की काय दाखवायचे आहे तेच कळत नाही. अतिशय बाष्फळ आणी मुर्ख प्रसंगांची मालिका म्हणजे राझ असे वर्णन करता येईल.

सुरुवात एकदम मुंग्या आणणारी (डोक्याला नाही तर हाता पायांना), कोणीतरी एक मरणासन्न माणुस एका गोर्‍या परदेशी माणसाला सांगत असतो की आता सगळे मरणार, 'तो' कोणालाही सोडणार नाही. मग त्या गोर्‍या माणसाला तो हे ही सांगतो की 'तुम अशुद्ध हो , अंदरसे सड चुके हो.' आणी येथेच आपल्याला आता आपल्या डोक्याची मंडई होणार ह्याची पुसटशी जाणीव व्हायला सुरुवात होते.

नंदिता (कंगना राणावत) हि एक फॅशन मॉडेल आणी यश (अध्ययन सुमन) 'अंधविश्वास' ह्या रिएलीटी शो च्या डायरेक्टर / सादरकर्त्याची प्रेयसी. पृथ्वी (इम्रान हाश्मी) हा एका मेलेल्या सैनिकाचा मुलगा आणी चित्रकार. ह्या तिघांभोवती फिरणारी हि कथा आहे. कंगना राणावतने स्टेज पेक्षाही लहान लहान कपडे घालुन घरात / दारात / रस्त्यावर हिंडणे हे तिचे आवडिचे आणी झेपणारे काम 'सफाईदारपणे' केले आहे. इम्रान हाश्मी हा एक तर आधी मानवच वाटत नाही, त्यात त्याला बघुन का कुणास ठाउक पण मला आपण उंची वाढवलेल्या राजपाल यादवला पाहात आहोत असे वाटते. तर आता हा माणुस चित्रकार वाटला पाहिजे ह्यासाठी ती कसली 'फ्रेंच' का काय म्हणतात तसली दाढी ठेवुन पुर्ण चित्रपटभर वावरला आहे. बर त्यामुळे तो चित्रकार तर वाटतच नाही उलट ते पाव / बिस्किट वगैरे विकणारे डोक्यावर पेटी घेउन येतातना, त्यांच्यापैकी एक वाटतो. अध्ययनरांवा विषयी काहि न बोलणेच उत्तम. तो एक फारच वेगळा अध्ययनाचा विषय होइल.

असो, तर ह्या नंदिताचा एक दिवस अचानक पृथ्वीकडुन पाठलाग सुरु होतो, मग तिचे घाबरणे , दचकणे ह्या सगळ्याला तिच्या प्रियकराने अगदी सहजपणे घेणे हे नेहमीचे प्रसंग घडतात. बर मधल्या काळात शिकली सवरलेली आणी यशासाठी कोणताही मार्ग वाईट नाही असे समजणार्‍या ह्या नंदिताला लग्नाआधी एकत्र राहुन यश पासुन दिवस गेले आहेत ह्या एका राझवरचा पडदा दुर हटतो.

मग एक दिवस खुप प्रयत्न (?) करुन पृथ्वी तिला गाठतोच आणी आपली काहि चित्रे तिला दाखवतो. मग आपल्याला उलगडा होतो की, ह्या पृथ्वी रावांना रोज घराच्या गच्चीत उलटे पडुन दारु ढोसायची सवय असते, मग अचानक त्यांच्या डोळ्यासमोर काहि वाईट/ खुनशी प्रसंग येत असतात ज्यांना ते कागदावर उतरवर असतात. हे सगळे प्रसंग नंदिताशी संबधित असतात.नेहमी प्रमाणेच ती ह्यावर विश्वास ठेवत नाही, मग अचानक रहस्यमय प्रसंग घडायला सुरुवात होते, आंघोळ करत असताना (ह्या दृष्यात कंगनाकडुन ज्या काही 'खास' अपेक्षा होत्या त्यात ती पुर्णपणे नापास झाली आहे) तिला अचानक दोन हात येउन टबात ओढतात मग तिचा हाताची नस कापली जाते आणी ती बेशुद्ध पडते.नंदिताला काहि ना काहि होणारच अशी खात्री असलेला पृथ्वी लगेच तिच्या घरात तोडफोड करुन घुसतो आणी तिला दवाखान्यात घेउन जाउन तीचे प्राण वाचवतो. ह्या गडबडीत 'खून बहोत बहेने की वजाहसे' वगैरे डॉक्टर तिच्या मुलाला वाचवु शकत नाहीत.

त्यानंतर मग अशा प्रसंगांची एक मालिकाच चालु होते, पृथ्वीनी चित्र काढायचे आणी तसेच घडायचे 'सोहळे' चालु होतात. 'तुम अशुद्ध हो, सड चुके हो' चा मंत्रजागर सतत चालु असतोच. प्रियकाराकडुन काहिच मदत होत नसल्याने मग नंदिता शेवटी पृथ्वीच्या आश्रयाला जाते, तोवर तमाम पोलिस खात्याला जी माहिती काढता आलेली नसते जे दुवे जोडता आलेले नसतात , ती सगळी माहिती मिळवुन ते सगळे दुवे जोडुन पुथ्वी साहेब नंदिताची वाटच बघत असतात. मग ह्या सगळ्या घटनांचा आणी त्या दोघांचा संबंध काय याचा ते शोध सुरु करतात. मग एका छोट्याश्या गावत घडलेल्या खुनापसुन सुरु झालेला हा थरार (?) उलगडत उलगडत शेवटी शिनीमा शेवटाकडे जातो.

आता काहितरी तरी राझ रहावे म्हणुन सगळा चित्रपट इकडे उलगडून सांगत नाहिये. तरी काहि प्रश्न मनाला टोचत राहतात,

१) नंदिताच्या शरीरात आत बाहेर करणार हा 'पवित्र' प्रेतात्मा एका फॅशन शो च्या वेळी आलेल्या कुठल्याश्या मठाधीपतीला झोपडपट्टितील लोक लाजतील इतक्या 'उच्च' दर्जाच्या शिव्या का देतो ?

२) सतत अंधश्रद्धे विरुद्ध लढणारा यश ह्या 'ढोंगी' बाबाला कार्यक्रमाचा प्रमुख पाहुणा म्हणुन स्विकार कसा काय करतो ?

३) चित्रपटाच्या शेवटी शेवटी यशवर हि हल्ला सुरु करणारा (पक्षी : ATM मधील प्रसंग) प्रेतात्मा आधी पासुन नंदितावर का हल्ले करत असतो ? पार तिला आत्महत्या करायाचा प्रयत्न करायला भाग पाडेपर्यंत ?

४) कधीकाळी ज्या गोर्‍या माणसाबरोबर आपण त्याला लोकांसमोर उघडे न पाडण्याचा सौदा केला होता त्याच गोर्‍या माणसाचे तांत्रिक मांत्रिकांबरोबर 'लाइव्ह' शुटिंग करणारा यश त्याला ओळखत कसा नाही ?

हे आणी असे बरेच प्रश्न मागे ठेवुन शिनीमा संपतो आणी आपल्याला आपण किती सहनशील आहोत ह्याची जाणीव करुन देतो.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा