गुरुवार, १६ जुलै, २००९

अदभुत ३

"अरेच्या, बाजारात शामरावांना हाक मार, पाचव्या मजल्यापर्यंत धावत जा, कुत्र्याच्या पिल्लाला वाचव हे सगळे प्रसाद वाटणेच की लेका." नाना उदगारले.
मी त्यांच्याकडे पाहातच बसलो, मला काही सुचेचनात. कोणे हा माणुस ? ह्याला सगळे कसे कळाले ? हा खरच इथे राहतो का हा माझ्या पाळतीवर वगैरे आहे ? हा नक्की माणुसच आहे ना ? एकाच वेळी अनेक प्रश्न माझ्या मनात उमटले.
------------------------------------------

माणुसच आहे रे बाबा, अगदी तुझ्यासारखा हाडामाडासाचा" नाना डोळे मिचकावत म्हणाले.
मी त्यांच्याकडे आश्चर्याने पाहातच राहिलो.

"चल जरा माझ्या खोलीत बसु" नाना म्हणाले. मी त्यांच्या मागोमाग आज्ञाधारकपणे निघालो.

नाना मला समाधीला फेरा घालुन, मागच्या बाजुला असलेल्या बैठ्या खोल्यांकडे घेउन गेले. नानांची खोली एकच होती पण चांगली प्रशस्त होती, तिची उंची विशेषत: नजरेत भरत होती.

"बसा स्वामी" नाना गमतीने म्हणाले.

मी काहीसा लाजतच नानांच्या बाजुला बसलो. समोर देव्हार्‍यात राम,लक्ष्मण आणी सिता यांची मुर्ती होती, पायापाशी मारुतीराया बसले होते, बाजुलाच पद्मासन लावुन बसलेली रामदास स्वामींची प्रसन्न मुर्ती होती आणी सगळ्यात मागे दत्त दिगंबर शांत चित्ताने उभे होते. त्या दर्शनानेच चित्तवृती प्रफुल्लीत होउन गेल्या माझ्या.

नानांची किंचीत हसत माझ्याकडे बघितले आणी समईतला दिवा थोडासा मोठा करत रामरायाला हात जोडले... "रामराया घेउन आलो रे तुझ्या लेकराला, आता तुच ताकद दे त्याला" नाना म्हणाले.

मला तर काहीच उमगत न्हवते.

"प्रसाद, तुला गेले काही दिवस बरेच विचीत्र अनुभव येतातय ना ?" नानांनी प्रेमळपणे विचारले.

"होय नाना, मला खरच काही कळत नाहीये, विचार करुन करुन डोके फुटायची वेळ आली आहे" मी म्हणालो.

"खरे आहे, भांडे पुर्ण भरले की दुध थोडे हिंदकळणारच, मी जरा आधीच सावध व्हायला पाहिजे होते" नान काहीशा खेदाने म्हणाले.

"तुम्ही काय म्हणता मला काहीच कळत नाहिये नाना" मी म्हणालो.

"प्रसाद, नवनाथांचा अवतार का झाला माहितिये तुला ? नानांची विचारले.

"हो, कलीला रोकण्यासाठी !" मी फाडकन उत्तर दिले.

"अगदी बरोबर, काळ्या शक्तीच्या प्रत्येक अनुयायाला, त्या शक्तीच्या हल्ल्याला तोंड देण्यासाठी भगवंताकडुन कोणाना कोणाची नेमणुक झालेली आहे प्रसाद. सागर जिथे परशुरामांना वंदन करुन मागे हटलाय त्या पृथ्वीबिंदुचा, त्या अपरांत भुमीचा तु रक्षक आहेस प्रसाद, तु अपरांतक्ष आहेस प्रसाद..... तुझ्या परवानगीशिवाय त्या बिंदुवरुन कोणालाही आत प्रवेश नाहिये, त्या बिंदुशी संबंधीत स्थल, काल, अवकाश ह्यांचा रक्षणकर्ता म्हणुन तुझी नेमणुक आहे अपरांतक्षा, जागा हो.. आठव स्वत:ला" येव्हडे बोलता बोलता नानांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला.

त्या क्षणी मी माझा असा उरलोच नाही, त्या अनुभुतीचे वर्णन तरी कसे करावे ? क्षणार्धात अनेक फुलांचा सुवास माझे मन, मेंदु भरुन गेला, मी जणु काही एखाद्या समुद्रात लाकडी ओंडक्यासारखा तरंगतोय असा भास झाला, काहि क्षणच हे सुख टिकले आणी मग...

मी कुठेतरी खोल खोल काळगर्तेत खेचला जायला लागलो, अनेक जुन्या पुरातन गोष्टी, घटना डोळ्यासमोरुन जायला लागल्या. काय काय न्हवते त्यात ? पुरात रुढी परंपरा, वेगवेगळ्या पिढ्यांचे मानव, प्राणी, राक्षस, भुते, पिशाच्च.. त्यांच्या रुढी, संकल्पना, अस्तीत्वासाठीच्या लढाया, ते जागवले गेलेले दुष्टात्मे, त्यांच्या बरोबर अनेकदा घडलेले प्राचीन संघर्ष.. सर्व सर्व माझ्या डोळ्यासमोरुन सरसरा पुढे सरकत होते आणी अचानक.. हो तो प्रसंग तोच होता, तोच होता अगदी, कोकणात घडलेला, माझ्या आणी जयराजच्या आयुष्यात वादळ घेउन आलेला.

त्याचा इथे काय संबंध ? तो का दिसावा ? हे काय गुढ आहे ?

"जागा हो , जागा हो प्रसाद" नाना हाक मारत होते. मी सावकाश डोळे उघडले, मैलोन मैल प्रवास केल्यासारखे शरीर आणी मन थकले होते.

नानांनी समोर केलेला दुधाचा प्याला मी आधाशा सारखा संपवुन टाकला.

"खुप ताण आलाय ना मनावर ? मी समजु शकतो. पण हे होणे गरजेचे होते, तुझ्या जाणीवा, सुप्त शक्ती जागृत होणे गरजेचे होते अपरांतक्षा" नाना धिरगंभीरपणे म्हणाले.

"पण नाना मला ह्या कालक्रमणेत कोकणातला प्रसंग दिसायचे कारण काय ?" मी मनात खदखदत असलेला प्रश्न विचारुन मोकळा झालो.

"तुझ्या अजुन लक्षात येत नाहिये ? 'तो' परत आलाय, तुझ्या आज्ञेशिवाय त्यानी आत प्रवेश करायचा प्रयत्न केला होता पण तो अयशस्वी ठरला, त्यवेळी त्याला रोकणारा तुच होतास आणी आता 'तो' पुन्हा रेषा उल्लंघायला सज्ज झालाय अपरांतक्षा, आणी ते ही पुर्ण ताकदीने. तुझ्या शक्तीला, अधीकाराला हे आव्हान आहे, जा त्याचा बंदोबस्त कर. त्याला शासन करायचा अधिकार फक्त तुला आणी तुलाच आहे अपरांतक्षा. पण ह्या संघर्षात तुला पुर्ण ताकदीने उतरावे लागणार होते त्यासाठी रघुरायाच्या आदेशाने मी तुझ्या जाणीवा, शक्ती परत मिळवुन दिल्या आहेत." नाना आत्मीयतेने सांगत होते.

"कधी नाना ? कधी होणार संघर्ष ? आणी कोणत्या पातळीवर ? माझ्या शक्ती जागृत झाल्या आहेत म्हणजे काय झाले आहे ? मी काय करायचे आहे नाना ? मी प्रश्नांचा भडीमार केला.

"लवकरच ती वेळ येणार आहे, खुप कमी वेळ उरलाय आपल्याकडे. आणी जो उरलाय त्यात जमेल तेव्हडी साधना तुला उरकुन घ्यायची आहे प्रसाद. बाकीच्या प्रश्नांची उत्तरे तुला योग्य वेळी मिळत जातीलच, त्यांची चिंता करण्यात वेळ घालवु नकोस. आणी मुख्य म्हणजे भिउ नकोस. 'आम्ही' सदैव तुझ्या बरोबर आहोतच" नाना हे सांगत असताना एका वेगळ्याच तेजाने त्यांचा चेहरा तळपत होता.

दुसर्‍या दिवशी सकाळी पुन्हा नानांची भेट घ्यायचे आश्वासन देउन मी नानांच्या रुमबाहेर पडलो. जे काही घडुन गेले होते त्यावर
माझा अजुनही विश्वास बसत न्हवता, खरेतर माला अजुन कशाचे पुर्ण आकलनच झाले न्हवते.

"आई ग ! येव्हडे चालत जायचे आता ? देवांचे वगैरे बरे होते राव, हे असे डोळे बंद करुन 'रुम बाहेर' असे म्हणाले असते तर डोळे उघडले की रुम बाहेर उभे दिसले असते, मी मनात म्हणालो आणी मगाशी गमतीने मिटलेले डोळे उघडले आणी.... फक्त चक्कर येउन पडायचा बाकी राहिलो... मी आमच्या रुमबाहेर उभा होतो.

क्रमशः

(ह्यातील 'रक्षक'हि संकल्पना मला प्रदिप दळवी ह्यांच्या 'कालांकीत' ह्या कादंबरीवरुन सुचली ह्याचा उल्लेख करणे आवश्यक आहे.)


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा