गुरुवार, १२ ऑगस्ट, २०१०

हॅकर्स अंडरग्राउंड

आजवर लोकांनी बर्‍याच ठिकाणी सागरी जगाची, आकाशातल्या जगाची आणि अगदी गुन्हेगारांच्या, माफियांच्या जगाची देखील ओळख कुठेना कुठे वाचलेली असेल. अगदी थरारक, श्वास रोखुन वगैरे धरणारी घटनाक्रमांची मालीका चित्रपटाद्वारे देखील पाहिलेली असेल. पण आज मी तुम्हाला ओळख करुन देणार आहे ती एका अनोख्या विश्वाची, ज्याचे नाव आहे 'हॅकर्स वर्ल्ड' आणि त्यातल्या वर्चस्वासाठी खेळल्या गेलेल्या अविश्वसनीत लढायांची.

जसजशी संगणकाची ओळख वाढायला लागते तसतशी सगळ्यात आधी धास्ती वाटायला लागते ती व्हायरस नामक प्रकाराची. मग ओळख होते अँटीव्हायरसची. हळुहळु एकेक पायर्‍या चढत गेलो की मग फायरवॉल वगैरेची ओळख वाढते आणि त्याचवेळी आपल्या मनावर आणि मेंदूवर दहशत माजवणार्‍या आणखी एका घटकाची ओळख होते आणि तो घटक म्हणजे हॅकर.

खरेतर 'हॅकर्स पॅरेडाईज'शी माझी कधीना कधी ओळख होणार हे मी जाणुनच होतो. खरेतर आत्मस्तुती वाटेल पण हॅकर्स पॅरेडाईजला कधी ना कधी माझी गरज लागणार हे मी ओळखुनच होतो असे म्हणणे जास्ती योग्य ठरेल. तशी अजुन मी ग्रे-हॅट हॅकरची पातळी ओलांडली न्हवती, पण जे काही उद्योग मी केले होते ते माझी ख्याती योग्य त्या ठिकाणी पोहोचवायला समर्थ होते. असे गोंधळु नका, ग्रे-हॅट हॅकर हा हॅकरचा एक प्रकार आहे. इतर दोन प्रकार आहे व्हाईट-हॅट हॅकर आणि ब्लॅक-हॅट हॅकर्स. नावावरुन कोण काय करते हे तुमच्या लक्षात आले असेलच ना ?

ग्रे-हॅट हॅकर्सशी आपला संबंध सगळ्यात जास्ती वेळ आलेला असतो. तो बर्‍याचदा आपल्या लक्षात देखील येत नाही हा भाग वेगळा. पासवर्ड हॅक करणे, तुमच्या बँक खात्यात शिरणे, तुमची वेबसाईट-ब्लॉग उलटापालटा करुन टाकणे, तुमच्या संगणकात अनावश्यक प्रोग्रॅम्स भरुन ठेवणे असले उद्योग हे ग्रे हॅकर्स करत असतात. पैसा अथवा लुटमार हा ह्यांचा उद्देश कधीच नसतो. फक्त स्वतःच्या ज्ञानाचे प्रदर्शन अथवा अहंगंड कुरवाळणे म्हणा ना.

ब्लॅक-हॅट हॅकर्स म्हणजे ह्या जगाची सगळ्यात काळी बाजू. बँक अकाउंट हॅक करुन पैसे लांबवणे, इ-मेल अकाउंट हॅक करणे, संगणकातुन माहिती पळवणे, सोशल कम्युनिटीजची अकाउंटस हॅक करुन ती विकणे, क्रेडीट कार्डस नंबर विकणे हे ह्यांचे धंदे.

अगदी उलट बाजु म्हणजे व्हाईट-हॅट हॅकर्स. ह्यांना आपण इथिकल हॅकर्स म्हणुन देखील ओळखतो. मोठमोठ्या कंपन्यांच्या सुरक्षा यंत्रणांची काळजी घेणे, वेळोवेळी इतर कपन्यांना मदत करणे, सरकारला सह्हाय करणे हि सगळी पापभिरु कामे करण्यात हे हॅकर्स आघाडीवर असतात.

आणि ह्यातल्याच काही चांगल्या वाईट हॅकर्सची मोट बांधुन त्यांची एक स्वतंत्र संघटना कार्यरत आहे, जीचे नाव 'हॅकर्स पॅरेडाईज'. हि संघटना नक्की कधी अस्तीत्वात आली ह्याची खात्रीशीर माहिती कोणालाच नाही. पण अमेरीकेच्या 'स्कार्फ' आणि 'माऊस' ह्या दोन हॅकर्सनी हि संघटना सगळ्यात आधी चालु केली असे मानले जाते. आज जगातील छोटे मोठे १५०० हॅकर्स ह्या संघटनेसाठी कार्यरत आहेत. इतर गुन्हेगारी क्षेत्रात असते तेवढी रिस्क ह्या क्षेत्रात नक्कीच नाही. मुळात संगणकाशी निगडीतच सर्व गुन्हे असल्याने फक्त सुशिक्षीत लोकांचाच वावर इथे आढळतो. मालाची देवाण घेवाण वगैरे प्रकार नसल्याने एकमेकांची थोबाडे बघण्याची देखील गरज पडत नाही. फक्त मुखवटे आणि त्या मुखवट्यांची तेवढीच फसवी नावे.

साधारण २००५ पर्यंत हॅकर्स पॅरेडाईजचे काम व्यवस्थीत चालले होते. नवनव्या कंपन्या आणि त्यांच्यातील चढाओढ ह्यामुळे कधी न्हवे येवढा फायदा संघटना कमावत होती. मात्र प्रामाणीकपणाची कास न सोडणे ह्याच्याशी कटिबद्ध राहूनच. सर्व आलबेल असतानाच अचानक ठिणगी पडली, आणि ती ही प्रत्यक्ष संघटनेच्या मालकांच्यातच. कारण ? एकच.. अमाप पैसा आणि सुरक्षीततेची हमी.

रशियन्स लॉबीला अमेरीकन अवकाश कार्यक्रमाची माहिती पुरवणे हा हॅकर्स पॅरेडाईजला मिळालेला सध्याचा सर्वात मोठा आणि प्रचंड पैशाची रास ओतणार उद्योग. हे काम व्यवस्थीत चालु असतानाच अचानक एक दिवस 'माऊस'ची गाठ सिनेटर चार्ल हॉक्स बरोबर पडली आणि चित्रच पालटले. आजवर हॅकर्स अंडरग्राउंडनी कल्पनाही केली नसेल येवढी रक्कम आणि पुढच्या आयुष्याच्या सुरक्षीततेची हमी त्यांना देण्यात आली. आणि काम अतिशय सोपे होते... फक्त रशियन्सना डबलक्रॉस करणे.

'स्कार्फ' अर्थातच ह्याला तयार झाला नाही. अर्थातच परिणाम व्हायचा तोच झाला, संघटनेत उभी फूट पडली. एकमेकांची व्यावसायीक गुपीते जपण्याच्या शपथा घेउन 'स्कार्फ' आणि 'माऊस' वेगवेगळे झाले. ह्याचा परिणाम अर्थातच संघटनेवर देखील झाला आणि दोन्ही बाजुंना सगळ्यात मोठी अडचण निर्माण झाली ती प्रशिक्षीत हॅकर्सची. दोन्ही कडुन मोठ्या प्रमाणावर भरती चालू झाली, आणी अशाच एका लॉट मधुन मी 'माऊस'च्या संघटनेत प्रवेशकर्ता झालो. नव्या संघटनेचे नाव होते 'हॅकर्स अंडरग्राउंड'.

आता सायबर विश्वातील एका सगळ्यात मोठ्या आणि सगळ्यात घातक खेळाला सुरुवात होणार होती. दोन्ही शत्रु एकमेकांना ओळखुन होते, समोरच्याची शक्तीस्थाने आणि विकपॉईंटस देखील जाणुन होते. त्यामुळे आता सगळी मदार होती ती नविन भरती झालेल्या लॉटवर आणि त्यांच्या कर्तबगारीवरच. आता यशस्वी कोण ठरणार ह्यावर दोन संघटनांचेच नहितर दोन देशांच्या 'सॅटेलाईट्-डिस्ट्रॉयर' मिसाईलचे भवितव्य अवलंबुन होते.

(क्रमशः)7 टिप्पणी(ण्या):

सुshant म्हणाले...

पुढच्या भागाची वाट पहात आहे,पण हे सर्व आता चालु आहे की झालेले आहे?

अनामित म्हणाले...

pudhachya post chi vat pahatoty

अनामित म्हणाले...

व्वा ! इंटरेस्ट्रिंग आहे ...

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

vachat aahe donhikade ;)

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

Mastach vachat aahe donhikade ;)

Abhi म्हणाले...

hi katha aahe ka swanubhav aahe.

PrAsI म्हणाले...

कथा आहे मालक.

टिप्पणी पोस्ट करा