गुरुवार, २६ ऑगस्ट, २०१०

हॅकर्स अंडरग्राउंड - २

मी 'हॅकर्स अंडरग्राऊंड' मध्ये भरती झालो तेंव्हा हि संघटना नुकतीच कुठे रांगायला लागली होती. एका सिनेटरकडुन मिळालेल्या नुसत्या आश्वासनाच्या जोरावर आपण फार मोठे पाऊल उचललेले आहे ह्याची बहुदा माऊसला व्यवस्थीत जाणीव असावी; त्यामुळेच इतरही काही धंद्यात त्यानी आता हळू हळू पाय रोवायला सुरुवात केली होती. हॅकर्स पॅरेडाइज पासून फुटुन अंडरग्राऊंड वेगळी झाली खरी, परंतु जवळजवळ ७०% कस्टमर्सनी आपला विश्वास पॅरेडाइजच्या पाठिशीच उभा ठेवला होता. उरलेल्या ३०% कस्टमर्सपैकी बरेचशे हे क्रेडिड कार्डचा काळा व्यापार करणारे, सोर्स कोड संबंधित व्यवहार करणारे, पायरसीवाले अथवा होममेड ब्लु-फिल्म्स बनवुन बाजारात उतरवणारे होते. त्यातील बरेचशे सरळ उठुन माऊसच्या मागे उभे राहिले, तर काही हुषार व्यावसायीकांनी दोन्ही पारड्यात आपली कामे टाकली.

भरती झाल्या झाल्या माझी पहिली रवानगी झाली ती शॉर्ट-सेक्स क्लिप्स तयार करुन अपलोड करणार्‍या विभागात. इथे अक्षरशः वाट्टेल ते करावे लागले मला. चाट रुममध्ये कधी स्वतःला गे तर कधी लेस्बीयन भासवायचे, समोरच्याचा विश्वास संपादन करुन त्याला त्याच्या वेब-कॅमवर बोलवायचे, वेळेला आपला वेब-कॅम म्हणुन फेक वेब-कॅम उभा करायचा आणि मग पुढे सगळे संभाषण चातुर्य पणाला लावुन त्याला वेब-कॅमसमोर आपल्याला हवे ते सगळे चाळे करायला भाग पाडायचे आणि मग त्याचे शुटिंग रेकॉर्ड करायचे. ह्या सर्व कामाचा मला लवकरच विट आला. ज्या उद्देशाने , ज्या भवितव्यासाठी म्हणुन मी इथे शिरलो होतो ते हे नक्कीच न्हवते. आणि मला हव्या असण्याच्या यशाचा-किर्तीचा-पैशाचा मार्ग जर अशा रस्त्यांवरुन जाणारा असला तर मात्र खरच अवघड होते. ह्या विभागात काम करुन मला त्यातला एक फायदा झाला तो म्हणजे फेक वेब-कॅमशी माझा जास्तीत जास्त संबंध आला आणि त्यातले परिपुर्ण असे ज्ञान मला प्राप्त झाले. मुख्य म्हणजे माझे संभाषण चातुर्य चांगलेच वाढले.

दोनेक आठवड्यातच ह्या सगळ्या वैतागातुन सुटका करणारा दिवस आला आणि आता मी 'व्हायरस रायटिंग' च्या विभागात दाखल झालो. लहानपणापासूनच 'किडे करणे' हा आवडता उद्योग असल्याने आणि तसेही व्हायरस रायटींग आणि बगींग हा माझा जिव्हाळ्याचा विषय असल्याने ह्या विभागात मी अगदी सर्वस्व ओतुन कामाला लागलो. माझ्या मेहनीतचे फळही मला लवकरच मिळणार अशी चीन्हे दिसु लागली होती, माझ्या बँक बॅलेंस मध्ये दुपटीने वाढ तर होत होतीच पण मी केलेल्या प्रत्येक प्रोजेक्टसाठी कौतुकाचा वर्षाव देखील होतच होता. ह्याच विभागात असताना मी हॅकर्स अंडरग्राऊंडच्या इतिहासातील पहिली मोठी मोहिम यशस्वी पार पाडली. मी आणि हंगेरीचा स्कॉर्पीअन दोघांनी मिळुन वॉल्टमोर बँकेला ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये ५ मिलियन पौंडांचा चुना लावला. केवळ दोन हॅकर्स (मी आणि स्कॉर्पिअन) आणि एका 'बग' च्या जोरावर आम्ही हे करुन दाखवले. अर्थातच त्याचा योग्य तो मोबदला आर्थिक स्वरुपात मिळालाच पण सर्वात महत्वाचे म्हणजे मला तातडीने मुंबईला जाऊन ' द विच' ची गाठ घेण्याचा निरोपही मिळाला.

'द विच' म्हणजे आपल्या टोपणनावाला खर्‍या अर्थाने सिद्ध करणार्‍यांपैकी एक ! ह्या पोरीने (खरेतर हि एक तरुण पोरगी आहे हे मला पुढे मुंबईत पोचल्यावर कळाले) फक्त एक वर्ष सहा महिन्यात आपल्या नावाचा असा काही दरारा हॅकिंग क्षेत्रात निर्माण करुन ठेवला होता की बस. FBI ची सप्टेंबर मध्ये एकाच दिवसात ३ वेळा हॅक झालेली यंत्रणा असो अथवा भारतातल्या संरक्षण खात्यातील चोरीला गेलेली महत्वाची माहिती असो, प्रत्येकवेळी सगळ्यात आधी संशयीत म्हणुन पुढे आलेले नाव हे हिचेच होते. FBI ने तर त्यांची यंत्रणा हॅक करणार्‍या ३ जणांना पकडून आरोप देखील सिद्ध केले; मात्र एकुण आरोपींची संख्या चार होती आणि त्यातली चौथी आरोपी हि महामाया होती हे सिद्ध करण्यात मात्र त्यांना अपयशच आले. तर अशा ह्या पाताळयंत्री 'द विच' कडे मी निघालो होतो.

'सॅटेलाईट डीस्ट्रॉयर' च्या माहितीची चोरी करणे आणि त्या संबंधात जे काही आणि ज्या कोणत्या मार्गाने हाती लागेल ते मिळवणे ह्यासाठी आता माऊसने कंबर कसली होती. जगात सध्या फक्त चीनने हि डिस्ट्रॉयर यशस्वी चाचणीसह सिद्ध केली होती; आणि रशिया त्या यशाच्या आसपास घुमटळत आहे अशी कुणकुण पोचलेली होतीच. ह्या दोन ठिकाणाहून हि सर्व तांत्रिक माहिती गोळा करणे हा ह्या मोहिमेचा मुख्य भाग होता. ह्या मोहिमेतील महत्वाचा टप्पा होता तो म्हणजे एक असा बग अथवा प्रोग्रॅम विकसीत करणे जो ह्या डिस्ट्रॉयरच्या शोधाशी संबंधित चीनी अथवा रशियन संगणकात स्थापीत करता येऊ शकेल. निदान ह्या प्रकल्पाशी संबंधित लोकांपर्यंत तरी हा बग पोचलाच पाहिजे होता. एकदा बग तयार झाला की मग तो बग योग्य त्या ठिकाणी फिड करण्याचे महत्वाचे कार्य हातात घ्यावे लागणार होते. खरेतर ह्या सगळ्या पुढल्या गोष्टी होत्या, आत्ता तरी माझी नेमणु़क ट्रेनी म्हणुन मुंबईला 'द विच'च्या हाताखाली झाली होती.

सकाळी सकाळी १०-१०.३० च्या सुमाराला आमची स्वारी मुंबईत दिलेल्या पत्त्यावर हजर झाली. हा खरेतर एका अपार्टमेंटचा पत्ता होता. एक ट्विन फ्लॅट एका महिन्याच्या भाडेतत्वावर घेतला गेला होता, जिथे 'अ‍ॅडम्स अ‍ॅडव्हायजींग फर्म'चे चार सहकारी मुक्कामाला राहणार होते. त्यातले तिन म्हणजे मी, स्कॉर्पिअन, अमेरिकेचा बुलडॉग तर हजर झाले होते, आता प्रतिक्षा होती ती चौथ्या सहकार्‍याची आणि 'द विच' च्या भेटीची....

(क्रमशः)

1 टिप्पणी(ण्या):

विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

vah farach chan

lavkar lavkare yeu dyat saheb

टिप्पणी पोस्ट करा