गुरुवार, २३ सप्टेंबर, २०१०
"आली साली रांड !" केतन 'किव्हाजच्या' दाराकडे बघत फाडकन म्हणाला आणी माझी मान पण आपसुकच दाराकडे वळली. दारातुन २४/२५ वर्षाची मुलगी सुहास्य वदनाने आत येत होती. अगदी अप्रतिम सौंदर्यवती वगैरे म्हणता येणार नाही पण आकर्षक नक्कीच होती मुख्य म्हणजे मस्त 'फॉर्म' राखुन होती.
केत्या भाड्या, एखादी मुलगी जोवर सिंगल असते तोवर तुझ्यासाठी ती अप्सरा असते. एकदा ती दुसर्या कोणाला पटली किंवा तुला अप्राप्य आहे हे तुला कळले की तुझ्यासाठी ती लगेच वेश्या कॅटेगरीत मोडायला सुरुवात होते, नाही ? मी वैतागुन म्हणालो.
"हाड बे ! तसले काही नाही. हि साली पोरगी 'तसलीच' आहे. रात्रीला ५०००/- घेते मोजुन. "
"काय बोलतो ? मग तुला काय कमी आहे साल्या ? जा की घेउन तिला, निदान तुझे हे असले शब्द तरी आम्हाला चार लोकात ऐकावे लागणार नाहीत." मी एक फुकटचा सल्ला देउन मोकळा झालो.
"गेलो असतो रे घेउन सालीला. पण साली आहे तर वेश्या, पण माज किती. मला म्हणते जो मला आवडतो त्यालाच मी 'हो' म्हणते. "
मी खदखदुन हसलो. "च्यायला केत्या काही पण फेकत जाउ नकोस भाड्या."
"परी, अरे खरच सांगतोय साल्या. कधितरी विश्वास ठेवा आमच्यावर." केतन येवढे बोलत असतानाच ती पोरगी आमच्या टेबलाजवळ येउन उभी राहिली.
"हॅलो" केतन अगदी जमेल तेवढ्या गोड आवाजात म्हणाला.
"हाय केतन. अरे ॠत्विकला बघितलेस का रे कुठे ? मला इथे ये म्हणाला आणि कुठे गायबलाय काय माहित ?" ती पोरगी गोड आवाजात म्हणाली.
"नाही ग, मला येउन अर्धा तास झाला. मला तरी दिसला नाही कुठेच. तु बस की तो येईपर्यंत." ती पण सहजपणे आम्हाला जॉईन झाली.
"हा माझा मित्र परी, म्हणजे प्रसाद पण आम्ही सगळे त्याला गेल्या महिन्यापासून परीच म्हणायलो लागलोय. आणि हि मनस्वी."
"स्त्री पर्या खुप बघितल्या होत्या, आज पुरुष परी पण बघायला मिळाली" असे म्हणत मनस्वी खळखळुन हसली.
काही वेळातच आमच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. मला तरी गप्पा मारताना किंवा एकुणच तिच्या वागण्या बोलण्यावरुन ती 'त्या' टायपातली असेल असे चुकुन पण वाटले नाही. पण केतननी डोक्यात सोडलेला भुंगा पण हलता हलत न्हवता.
"तुझा सायबर कॅफे आहे हे ऐकुन भारी गंमत वाटली. आज बर्याच दिवसांनी कुठल्यातरी वेगळ्या धंद्यातल्या माणसाशी ओळख झाली. नाहीतर माझे बरेचशे मित्र मैत्रिणी म्हणजे आयटी नाहितर दुसरी कुठलतरी नोकरी पण नोकरदारच, नाहितर मग वडिलोपार्जीत व्यवसाय" मनस्वी सहजपणे म्हणाली, पण बहुदा हा आपल्याला मारलेल टोमणा आहे असे वाटुन केतन ताडकन उभा राहिला. "मी आलोच जरा एक फोन करुन" येवढे बोलुन बाहेर देखील पडला.
"परी, तु फक्त कॅफेच बघतोस का अजुन काही सर्विसींग वगैरेपण करतोस ?"
"मी हार्डवेअर, सॉफ्टवेअर सपोर्ट सुद्धा देतो. जुन्या किंवा नविन पीसी मध्ये सुद्धा डिल करतो."
"ग्रेट ! मला तुझे कार्ड मिळेल का ? भवतेक ह्या १०/१२ दिवसात माझा नविन लॅपटॉप घ्यायचा प्लॅन आहे."
"कार्ड वगैरे नाही छापलेली पण माझा नंबर देतो, नोट डाउन करुन घेणार ?" मी सहजपणे विचारले. ह्यावर मनस्वीने माझ्याकडे ज्या नजरेने पाहिले ती मी आयुष्यात विसरु शकणार नाही.
"काय झाले ?" मी पटकन विचारले.
"नाही.. तु केतनचा मित्र, म्हणजे मी कोण आहे काय करते हे तुझ्यापर्यंत नक्कीच आले असणार. असे असताना तु चक्क मला नंबर नोटडाउन करायला सांगतोयस ? मला वाटले होते तु माझा नंबर विचारशील आणि मिसकॉल देतो म्हणशील" मनस्वी डोळा मारत म्हणाली.
आता खदखदुन हसायची पाळी माझी होती. "च्यायला ! तुला जे सुचले, ते मला का नाही सुचले ग ?"
तेवढ्यात एका हँडसम तरुणानी टेबलापाशी धाव घेतली आणि गडबडीने माझा नंबर लिहुन घेउन मनस्वी त्याच्याबरोबर पसार झाली. काही वेळातच आमच्या केतनरावांचे आगमन झाले.
"गेली का रांड ? एकदा 'येती का' म्हणुन काय विचारले तर लगेच चान्स मिळाल्यावर साली टोमणे मारायला लागली !"
"सोड ना केत्या. उलट तुझ्याशी किती चांगली वागली ती. आपल्या टेबलाला जॉईन झाली. आणि खरे सांगु मला तरी ती मुलगी 'तसली' वाटली नाही बॉस. उलट वागण्या बोलण्यावरुन तर चांगल्या सुसंस्कृत घरातलीच वाटली."
"वाटली म्हणजे ? अबे बम्मन, तुमची जातवालीच आहे ती. बाप चांगला बँकेत ऑफिसर आहे तीचा आणि बहिण फर्स्ट इयरला आहे. हि स्वतः इथे पुण्यात फॅशन डिझायनींगचा कोर्स करत आहे."
"काय बोलतो ? अरे येवढे सगळे चांगले आहे, मग असे कशाला करेल ती ?"
"खाज ! एकच शब्द. वर पैसे मिळतात आणि बाकीचा खर्च परस्पर निघतो तो वेगळाच. डहाणुकर सारख्या एरियात पोरगी फ्लॅट घेउन एकटी राहते, आता बोल."
मी आपली नुसती मान डोलावली आणि गप्प बसुन राहिलो....
पुढचे चार दिवस कधीही फोनची रींग वाजली कि मला तो मनस्वीचा फोन आहे असेच वाटायचे. काय असेल ते असो त्या पोरीने मला भुरळ पाडली होती हे नक्की. चार पाच दिवस विविध कल्पनात रमण्यात गेले पण फोन काही आला नाही. हळुहळु मग तो विषय मागे पडत गेला. अध्ये मध्ये कधितरी मनस्वी आठवुन जायची पण तेवढ्यापुरतीच. एक दिवशी अचानक सकाळी फोन वाजला. अनक्नोन नंबर असल्याने मी पण बहुदा एयरटेलवाल्यांचा असणार ह्या वैतागानेच 'हॅलो' केले.
"हाय परी" पलिकडून एकदम उत्साहाने खळखळणारा आवाज आला.
"कोण बोलतय?" च्यायला मला परी म्हणुन हाक मारणारी कोण मुलगी आहे ? का मिपावरुन कोणाचा फोन आहे ? मी जरा गोंधळलो.
"अरे मी बोलतीये मनस्वी. विसरलास ?"
"नाही नाही. एकदम नंबर अनोळखी असल्याने गडबडलो होतो. बोला ना.. काय म्हणताय ?"
"मी एकटीच बोलतीये रे. त्यामुळे 'बोल' 'काय म्हणतीयेस' असे म्हणलास तर अजुन ऐकायला बरे वाटेल."
"हा हा हा.. ओक्के ग बोल काय म्हणतेस ?"
"अरे तुला युनीपुणे च्या साईटवरुन एक्स्टर्नल अॅडमीशनच्या फॉर्मची प्रिंट कशी काढायची माहिती आहे का ? मी आले तिकडे तर काढुन देउ शकशील का ?"
"हो जमेल की, फक्त दुसर्या कोणाचा फॉर्म असेल तर त्याचा आयडी आणि पासवर्ड घेउन ये. किंवा PNR नंबर."
"चालेल, मी येते थोड्या वेळात."
तेच लोभसवाणे हास्य चेहर्यावर घेउन साधारण चारच्या सुमारास मनस्वी हजर झाली. तीचे काम करुन देत असताना इकडच्या तिकडच्या चार गोष्टी झाल्यावर मनस्वी पटकन म्हणाली "मध्ये मला पण ऑर्कुट, फेसबुकवर बसायची सवय लागली होती. मस्त रंगुन जायचे मी पण. पण भवतेक नशीबत त्याचे सुख जास्ती दिवस न्हवते."
"का ग ? हॅक वगैरे झाले का काय अकाउंट?" मी गमतीने विचारले.
"नाही रे ! काही मित्र मैत्रिणी अॅड केले होते. खरे तर मित्रच जास्ती होते. काही दिवसांनी स्क्रॅपबुक आणि वॉलवर सरळ माझ्यासाठी रात्रीच्या चौकशा चालु झाल्या. मागचे संदर्भ द्यायला सुरुवात झाली. माझे मनच उडाले. सरळ दोन्ही अकाउंट उडवुन मोकळी झाले. फेक नाव आणि फोटो टाकुन बसणे मला तर कधीच जमणार नाही.
मला काय बोलावे तेच पटकन कळेना. मी नुसताच तिच्याकडे पाहात राहिलो.
"चल रे पळते मी आता. नजर लावशील नाहीतर मला" मनस्वी गंमतीने म्हणाली आणि पैसे चुकते करुन गेली सुद्धा. पुढे काही दिवस ही भेट मला आठवणी काढत राहायला पुरुन उरली. महिन्यानंतर अचानक एक दिवशी मनस्वी एका मैत्रीणीला घेउन कॅफेत हजर.
"मालक आहेत कॅफेचे?"
"या या. अलभ्य लाभ. आज इकडे कशी काय वाट चुकलात ?"
"अर्रे वा रे ! तु कधी मला बोलावलेस का आग्रहानी कॅफेत ? मग आमंत्रणाशीवाय कसे यायचे ? बर ते जाउ दे, हि माझी मैत्रीण सुमित्रा, आणि सुमित्रा हा आमचा परी. तुझ्या फोर्मचे प्रिंट आउटस काढायला ह्यानीच मदत केली होती."
"थॅन्क्स हा. मला जरा हॉस्पीटलची गडबड होती, त्यामुळे काय करावे कळत न्हवते. मनस्वी म्हणाली तुमच्याकडे भवतेक काम होईल. मग तीनेच सगळे जमवले."
थोड्यावेळ गप्पा मारुन दोघी जायला निघाल्या. ह्यावेळी मात्र मी धाडस करायचे ठरवले. "थांबा की जरावेळ अजुन. महत्वाचे काम नाही ना काही ?"
"मला तरी नाहिये, पण सुमीला हॉस्पीटलला जायचे आहे."
"तु थांब की मग, मी जाते. नाहितरी मी रिक्षाने एकटीच जाणार होते." सुमित्रा म्हणाली.
"नको एकटी नको जाउन बाई. परी मी हिला पूना हॉस्पीटलाला सोडून परत येते रे" येवढे वाक्य घाईघाईत पुर्ण करत मनस्वी मैत्रिणीला घेउन बाहेर सुद्धा पडली आणि अर्ध्या तासात पुन्हा कॅफेत हजर सुद्धा झाली."
"काय ग बाहेर बसुयात का ? म्हणजे कस्टमरला त्रास नको. मी खुर्ची घेतो थांब."
"गप्प रे ! मी काया राणी व्हिक्टोरीया आहे का ? बसु की मस्त बाहेर पायर्यांवर. "
"मनस्वी, तु आणि मी असे माझ्या कॅफेच्या पायर्यांवर बसुन गप्पा वगैरे मारु असे मला कधीच वाटले न्हवते बघ."
"मलापण न्हवते वाटले. मला गप्पा मारायला म्हणुन कोणी कधीच आमंत्रण देत नाही परी." मनस्वी थंडपणे म्हणाली. तिचा तो स्वर मला कुठेतरी आतमध्ये कच्चकन टोचला.
"पण हा रस्ता तुच निवडलास ना ? मग आता तक्रार कसली ?"
"छे रे ! तक्रार नाही. एक आपले फक्त मनात आले ते तुझ्यापाशी बोलले येवढेच. का बोलले माहित नाही. पण काय रे परी, मला पहिल्यांदा बघितल्यावर तुझ्या भावना काय होत्या ?"
"खरे सांगु ? तुला बघायच्या आधीच तुझ्या विषयीची माहिती मला मिळाली होती, त्यानंतर मी मान वळवुन तुझ्याकडे बघितले. पण तु जेंव्हा माझ्या शेजारच्या खुर्चीवर येउन बसलीसना तेंव्हा मला अगदी एखादी इच्छाधारी मांजर वगैरे शेजारी येउन बसल्यासारखे वाटले. तुझे घारे डोळे, छोटी नाक, गोल चेहरा..."
मनस्वी पुन्हा एकदा खळखळुन हसली आणि ह्यावेळी तीने चक्क माझ्या खांद्यावर डोके देखील आपटले. मनस्वी अशी खळखळुन हसलीना की तीचे मोत्यासारखे दात खुप छान दिसायचे.
त्या दिवशी मी आणि मनस्वीनी अगदी दोन तीन तास मनमुराद गप्पा मारल्या. अगदी राज ठाकरे, मराठीच आवड इथपासून ते कधीकाळी एका रात्रीसाठी तिच्या आयुष्यात येउन गेलेल्या नमुन्यांपर्यंत. ह्या भेटीनंतर मनस्वी मला अधिकच भावली, आवडली..आपलीशी वाटली.
मनस्वीला फोन करावा, खुप गप्पा माराव्यात. तिच्याविषयी अधिक जाणुन घ्यावे असे खुप वाटत होते, पण धिर झाला नाही हेच खरे. खरे तर मला उगाच कोणाच्या खाजगी आयुष्यात नाक खुपसायला आवडत नाही, आणि कोणी माझ्या आयुष्यात खुपसलेले आवडत नाही. त्यामुळे देखील असेल पण मी पुढे पाऊल टाकले नाही येवढे मात्र खरे. आणि ती जे काही करत होती ते तिच्या मनानी, अक्कल हुषारीने करत होती. त्या विषयी काही बोलायचा, ते योग्य-अयोग्य ठरवयाचा मला काय अधिकार ? आणि मुख्य म्हणजे ती जे काही करत आहे, ते योग्य का अयोग्य हे ठरवायची माझी पात्रता होती का ? कधीतरी मनस्वीच्या बेडरुम मध्ये मी स्वतःला कल्पिले न्हवते का ? मनोरथे रचली न्हवती का ?
पुढच्याच आठवड्यात सकाळी सकाळी मला मनस्वीचा फोन आला. "काय रे कुठे आहेस? आज काय कॅफे उघडायचा नाही का ?"
"अग कॅफेतच निघालोय, एका मित्राकडे दुरुस्ती करत बसलो होतो. आलोच १५/२० मिनिटात."
"लवकर ये माकडा, मी गेली १० मिनिटे तुझ्या कॅफे बाहेर उभी आहे. आता तु येईपर्यंत मी समोर बसते पार्लरमध्ये. ते बिल तु फाड."
थोड्याच वेळात कॅफेत पोचलो तर हि बया मस्तपैकी पाय वगैरे पसरुन पायर्यांवर बसलेली. "कसली आळशी लोकं आहात रे तुम्ही ? एक दुकान उघडे नाही तुमच्या सोसायटीतले."
"आता आलोय ना बये ? उघडतो, थांब."
"नाही नाही, थांब जरा. मला एक सांग, तुझा कॅफे एक दिवसासाठी भाड्याने घ्यायचा असेल तर किती खर्च येईल ? आणि मी सिरीयसली विचारते आहे."
"एकदम सगळा कॅफे ? मी ह्या एम. आर. लोकांना वगैरे हवा असेल १२ ते ५ तर सरळ ६ पीसीचे ६००/- रुपये लावुन मोकळा होतो बघ. आता तु आहेस म्हणुन ५००/- दे."
"आणि कॅफेचा मालक पण हवा असेल तर ?"
"तो कॅफे बरोबर फ्री येतो" मी डोळा मरत म्हणालो.
"डन तर मग ! हे पाचशे घे, आणि सायकल लावुन ये. आपल्याला बाहेर जायचे आहे दिवसभरासाठी."
"माझे आई, धंद्याला काडी लावुन तुझ्याबरोबर हिंडु ?"
"कॅफे मी आज भाड्याने घेतला आहे, त्यामुळे तो बंद ठेवावा का चालु हे मी ठरवणार आहे परी. मालकाचे काय करायचे हे पण मीच ठवणार. तेंव्हा सायकल लावुन या आणि चला . तुला माझ्याबरोबर फिरायची लाज नाही ना वाटणार ?"
"मला का लाज वाटावी ? पण तु तुझे बघ, नाहितर उद्या लोक म्हणायचे आजकाल मनस्वीला काही चॉईसच उरला नाहिये."
"अरे आई-बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे परवा. म्हणुन उद्या मिरजला जायचे म्हणतीये. त्यांच्यासाठी काहितरी खरेदी करावीशी वाटली. आणि खरे सांगु का मी आधी सुमीलाच फोन केला होता पण ती येउ शकत नाही म्हणल्यावर मला सगळ्यात आधी तुझीच आठवण झाली, मग सरळ तुझ्याकडे आले."
मी एक समजुतदार स्माईल देउन मोकळा झालो. त्या दिवशी मनस्वी माझ्याबरोबर अगदी मनमुराद भटकली. तिच्या स्वभावाचे वेगवेगळे पैलु मला बघायला अनुभवायला मिळाले. परफेक्ट वुमन.. माझ्या दृष्टीने तरी.
रात्रीचे जेवण केल्यावर मनस्वीने मला मोकळे केले. रात्रही बरीच झाली होती त्यामुळे मी सहजपणे 'घरी सोडु का ?' म्हणुन विचारुन गेलो. आणि अचानक मला त्या प्रश्नातला दुसरा अर्थ समजला आणि मी चपापलो. मनस्वी मात्र नेहमीप्रमाणेच हसर्या चेहर्यानी माझ्याकडे बघायला लागली.
"येतोस सोडायला ? आणि मी थांब म्हणाले तर ?" डोळे मिचकावत मनस्वी विचारत होती.
"थांबीन सुद्धा.. काय सांगता येत नाही."
"आणि काय करणार थांबुन ?"
"खरच माहीत नाही. प्रामाणीकपणे सांगायचे तर स्वतःचीच खात्री नाही. तुला पहिल्यांदा बघितले आणि तुझ्याविषयी कळले त्यानंतर तुझे, खरेतर तुझ्या शरीरीचे मला आकर्षण नक्की वाटत होते. आत्ता देखील वाटते, नाही असे नाही. पण आता कुठेतरी मला शरीरामागची मनस्वी देखील थोडीफार कळाली आहे. आणि मला ती जास्त आवडायला लागली आहे."
"परी साला तु एकदम चालु माणूस आहेस रे ! एखाद दिवशी ह्या अशा तुझ्या गोड वागण्याने तु माझे पाच हजार बूडवणार बघ" येवढे बोलुन मनस्वीचे ते खळखळुन हास्य पुन्हा बाहेर पडले. त्या रात्री मी तीला खरच घरी सोडले. तीने अगदी उत्साहाने फिरुन तीचा फ्लॅट मला दाखवला. बेडरुम दाखवायला ती विसरली आणि 'कुठे आहे' विचारायला मी विसरलो. निघताना मनस्वी मला खाली रिक्षास्टॅंडपर्यंत सोडायल आली. "मनस्वी, मी आज जर थांबतो म्हणालो असतो तर ?"
"परी, तु मध्ये ट्वायलाईटचे परिक्षण लिहिणार होतास ना रे ? काय झाले त्याचे ?" मनस्वीची विषय बदलायची पद्धत नकळत माझ्या चेहर्यावर लहानसे हास्य आणुन गेली असावी. काही काही प्रश्न अनुत्तरीत राहिलेलेच कदाचीत जास्त समाधान देउन जातात.
त्यानंतर अध्ये मध्ये मनस्वीचा फोन यायचा आम्ही खुप गप्पा देखील मारायचो, कधीतरी कॅफेत येउन भेटुन देखील जायची. आणि मग एक दिवस अचानक ती गयब झाली. दोन महिने उलटुन गेले तरी फोन नाही, भेट नाही. शेवटी कधी नाही ते मीच तिला फोन लावला. 'नंबर नॉट इन सर्विस' ऐकुन कान तृप्त करुन घेतले. एकदा धिर करुन तीच्या फ्लॅटवर पण चक्कर मारुन आलो पण विशेष काही माहिती मिळाली नाही. फक्त दोन महिन्यांपुर्वी ती अचानक जागा सोडून निघुन गेली येवढेच कळाले.
पुढे अनेक दिवस मनस्वी ह्या एकाच विषायाने माझे दिवसभरातले विचार व्यापलेले असायचे. हळुहळु ते देखील मागे पडत गेले.. धुसर होत गेले. परव अचानक फोन वाजला, अनक्नोन नंबर बघुन मी नेहमीच्याच अनुत्साहाने 'हॅलो' म्हणालो आणि पलिकडून कोणाचे तरी 'म्यॉव' कानावर पडले. "कोण बोलतय ?" मी प्रचंड वैतागुन म्हणालो.
"आता तुला 'म्यॉव' कोण म्हणुन दाखवणार आहे माकडा ? मी बोलतीये इच्छाधारी मांजर" आणि पाठोपाठ तोच खळखळुन हसण्याचा आवाज...मला क्षणभर कानावर विश्वासच बसेना.
"अग कुठे आहेस कुठे बै तु ?"
"बॅक टू पुणे. बर एक सांग आता आईची तब्येत कशी आहे ?"
"अग तुला कसे कळाले ? आईची तब्येत बरी आहे आता. भवतेक दोन-चार दिवसात सोडतील घरी."
"अरे कॅफेवर आले होते, तिथे समजले. बर ऐक मी तुझ्या खात्यात ५०,०००/- भरले आहेत. आणि ते मी माझ्या आईला गरज लागली तर म्हणुन देउन ठेवले आहेत. तु 'ऐसे पाप की कमाई नही चाहिये' वगैरे डायलॉग मारणास नाहीस ह्याची गॅरेंटी आहेच म्हणा. आणि माजोरडेपणाने ते वापरले नाहीस तर तर आई घरी आली की माझ्या पैशात १११/- रुपये अजुन घालुन परत माझ्या खात्यात जमा करुन टाक."
"मनस्वी.. अग हे सगळे कशासाठी ?"
"काय रे परी, तु शेवटी 'द अंग्रेज' वर लिहिलेस का नाही ?"
(समाप्त)
लेबल: कथा
फॉलोअर
Translation
Save as PDF
सदस्यत्व घ्या
Labels
- इंग्रजी चित्रपट (10)
- कथा (29)
- चित्रपट (20)
- तेलगु (1)
- पुस्तक प्रकाशन (3)
- प्रहसन (12)
- भयपट (4)
- मराठी (8)
- स्तंभलेखन (1)
- हिंदी (12)
5 टिप्पणी(ण्या):
खुपच अप्रतिम लिहल आहे.सुरुवातीपासुन शेवटपर्यंत खिळवुन ठेवलस.शेवटही सुंदर...माझ्याही नजरेसमोर घुटमळत राहीली ती मनस्वी...
chhhhan
तेच तेच विषयावर गोष्टी वाचून कंटाळा आला होता.... एकदम Refreshing कथा आहे...दुसरा भाग पण लिहावे...:)
खालील दोन वाक्ये अफलातून आहेत..!!!
"काही काही प्रश्न अनुत्तरीत राहिलेलेच कदाचीत जास्त समाधान देउन जातात."
"काय रे परी, तु शेवटी 'द अंग्रेज' वर लिहिलेस का नाही ?"
अप्रतिम लिहल आहेस ..
मनस्वी डोळ्यासमोर उभी राहिली ...
निव्वळ अप्रतिम !!!
टिप्पणी पोस्ट करा