मंगळवार, ११ जानेवारी, २०११

क्षणभर विश्रांती

परवा 'क्षणभर विश्रांती' हा एक सुंदर मराठी चित्रपट बघण्यात आला. चित्रपटाला खरेतर खूप आकर्षक कथा वगैरे आहे अशातला भाग नाही, उलट ह्या चित्रपटाची कथा साधी सरळ आणि सहज उलगडत जाणारी आहे. मात्र कमरेखाली न जाणारे विनोद, अतिभावनाप्रधान फुलपाखरी अश्रुपाताला घातलेला आवर, दिग्दर्शकाच्या ताब्यात राहिलेला भरत जाधव आणि फ्रेश आणि तरुण चेहर्‍यांना मिळालेली सुंदर संधी ह्यामुळे चित्रपट आवडून गेला.चित्रपटाचे तांत्रिक स्वरूप आणि स्टारकास्ट सुद्धा सचित पाटील, हेमंत ढोमे आणि मौलिक भट ह्यांनी व्यापून टाकलेली आहे. ह्या चित्रपटात अभिनय करण्याबरोबर सचित पाटील (दिग्दर्शक आणि कथा), मौलिक भट (प्रोड्युसर), हेमंत ढोमे (संवाद) अशा जबाबदार्‍या सुद्धा लिलया पेलून गेलेले आहेत. तरुणाईचा प्रयत्न म्हणून ह्या चित्रपटाकडे पाहिल्यास हा नक्की आवडून जाईल. चित्रपटात हेमंत ढोमे आणि मौलिक भट ह्यांच्या बरोबरच कादंबरी कदम, मनवा नाईक आणि पुजा सावंत ह्या नवीनं चेहर्‍यांच्या तरुणींना देखील संधी मिळाली आहे. त्या दिसल्या आहेत छान आणि अभिनयात देखील कमी पडत नाहीत हे विशेष. खरेतर चित्रपटाची कथाच इतकी साधी सरळ आहे की ह्या लोकांना फार अभिनय करायची गरजच पडली नाहीये.

हृषिकेश कामेरकर ह्या गुणी गायक आणि संगीतकाराला मिळालेली संधी हे ह्या चित्रपटाचे अजून एक वैशिष्ट्य, त्याने ह्या संधीचे सोने केले आहे. संगीताच्या आणि गाण्याच्या बाबतीत चित्रपट सरसच.काय आहे ह्या चित्रपटाची कथा ? कथा एकदम सरळ.. सचित पाटील हा अमेरिकेत नोकरी करणारा सॉफ्टवेअर इंजिनिअर बर्‍याच वर्षांनी मुंबईत परत आला आहे आणि आता त्याला आपल्या जीवाभावाच्या मित्रांना भेटायचे वेध लागलेले आहेत. हे मित्र म्हणजे भुर्जीपावची गाडी लावणार सिद्धार्थ जाधव, कवी असणारा पण एका मेडिकलच्या दुकानात नोकरी करणार हेमंत ढोमे आणि समांतर रंगभूमीवर नट म्हणून नशीब अजमावत असलेला मौलिक भट. सचित देखील खरेतर एक छानसा गायक असतो पण आयुष्यात जेव्हा निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा तो गाण्याला रामराम ठोकून नोकरीसाठी अमेरिका गाठतो. आता निदान आपले मित्र तरी त्यांना हव्या त्या क्षेत्रात काम करत आहेत का नाही हे त्याला जाणून घ्यायचे असते. सचितचे एकूणच सगळे सुरळीत चाललेले बघून हे सर्व मित्र त्याच्याशी खोटेच बोलतात. सिद्धार्थ आपले मोठे हॉटेल असल्याचे सांगतो, हेमंत आपला कविता संग्रह छापला गेल्याचे तर मौलिक आपण यशस्वी नट असल्याचे भासवतो. मित्रांच्या यशाने आनंदित सचित पाटील त्यांना आता अलिबागला जाण्याचा प्लॅन सांगतो. सचितच्या अमेरिकेतील कमाईतून वडिलांनी तिथे एक बंगला घेतलेला असतो. त्या बंगल्याला एक भेट आणि त्यानिमित्ताने पिकनिक असा बेत ठरवून सर्वजण अलिबागला कुच करतात.इकडे अलिबागच्या बंगल्यात वेगळेच नाटक रंगलेले असते. बर्‍याच वर्षे कोणी न फिरकलेल्या त्या बंगल्यात आता बंगल्याचा केअर टेकर असलेल्या भरत जाधवने (आप्पा) खानावळ आणि लॉज उघडलेले असते. ह्या सगळ्यात अचानक सचित येत असल्याचा त्याच्या वडिलांचा फोन आल्यावर भरतची तारांबळ उडते. जेवणार्‍या लोकांना ताटावरून उठवण्यापासून ते खोलीत राहणार्‍यांना आहे त्या कपड्यानिशी बाहेर काढण्यापर्यंतची कामे तो १० मिनिटात उरकतो. मधल्या काळात नोकराकडून बंगल्याबाहेर लावलेला 'क्षणभर विश्रांती' हॉटेलचा बोर्ड देखील काढून घेतो. बंगल्यात शिरत असताना दारातच येवढी गर्दी बघून सचित चौकशी करतोच, मात्र बंगला बघायला पर्यटक येत असतात असले कारण सांगून भरत वेळ मारून नेतो.

बहीण शुभांगी गोखले (जिजी ) , नोकर आणि मुंबईत शिकणारी भाची ह्या सर्वांशी खोटे बोलून हॉटेल चालवणार्‍या भरतची आता मात्र तारांबळ उडते. त्यातच त्याची मुंबईला शिकणारी भाची आपल्या तीन मैत्रिणींना घेऊन ट्रीपला आलेली असते आणि बंगल्यातच राहत असते. नेहमीप्रमाणेच सचित, सिद्धार्थ, हेमंत आणि मौलिक हे त्या चार जणींच्या प्रेमात पडतात आणि कथा नेहमीच्या वळणाने जायला लागते. मात्र अचानक एक दिवशी भरतचे बिंग फुटते. बहिणीच्या आजारपणासाठी आणि भाचीच्या शिक्षणासाठी हे सर्व केल्याचे भरत सांगतो आणि सचितची क्षमा मागतो. मोठ्या मनाने सचित त्याला माफ करतो आणि इथे असे पर्यंत भरतला बहीण आणि भाची समोर खोटे न पाडण्याची जबाबदारी घेतो. त्यानंतर ह्या चौघा जणांच्यात थोड्याश्या नेहमीच्या रुसव्या फुगव्यानंतर प्रेमाचे अंकुर फुटायला सुरुवात होते आणि अचानक एक दिवशी सचित आपण हा बंगला विकणार असल्याचे जाहीर करतो.
ह्यानंतर कथा नेहमीचेच वळण घेते का अजून काही अनपेक्षित घडते ? हे चित्रपटातच बघण्यात मजा आहे.
अभिनयाच्या आघाडीवर भरत जाधव, सिद्धार्थ, सचित पाटील अप्रतिमच. जिजिच्या भूमिकेत शुभांगी गोखले नेहमीप्रमाणेच यशस्वी खेळी खेळून गेल्या आहेत. हेमंत ढोमे, मैलिक भट, कादंबरी कदम, पुजा जाधव आणि मनवा नाईक आपापली कामे व्यवस्थित पार पाडतात. मुख्य म्हणजे कुठेही लाउड अभिनय जाणवत नाही. भरत जाधवने त्याच्या वाटेला आलेले हळवे प्रसंग अतिशय सुरेख उभे केले आहेत, त्याबद्दल त्याला विशेष दाद द्यायला लागेल. सोनाली कुलकर्णी दिसली आहे छान आणि अभिनयात देखील उत्तम. चित्रपटात खटकलेली एकमेव गोष्ट म्हणजे अलिबागच्या निसर्गसौंदर्याचा १०% सुद्धा वापर चित्रपटात करण्यात आलेला नाही.


तर मग कधी घेताय 'क्षणभर विश्रांती' ?

3 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

namaskar,
hi samiksha post kelya baddal dhanywad. Mi jevha ha chitrapat pahila tevha suddha majhe agadi hech mhanane hote ki halakaphulka ani karmanuk pradhan chitrapat ahe.

kharech Kshanbhar Vishranti ahe ha chitrapat

Introspection म्हणाले...

Mitra lihit raha. Sarswati ugachach konalahi ashirwaad det nahi. Tuzi Manswi katha wachun galbalalo. Khup motha ho. Sarswatat khup mokalik aahe. Chitrapat samikshan tar tuzyasaarkhe konich karat naahi pan lekhanache itar prant hi shod. Tu katha far chan lihito. Kadambarihi lih shakshil. Mazyapeksha lahan asalyas aashirwaad, motha asalyas shubhechchaa. Tuzya likhanani jo anand mala milala tyabaddal dhanyawaad.

अनामित म्हणाले...

sundar....

टिप्पणी पोस्ट करा