मंगळवार, १६ ऑगस्ट, २०११
द ग्रज पाहिल्यानंतर जापनीज आणि कोरिअन हॉरर चित्रपटांविषयी कायमच उत्सुकता वाटू लागली होती. भयपट बघायचे तर जापनीज किंवा कोरिअनच असे जणू ठरवून टाकले आहे. ह्याच चित्रपटांच्या रांगेत परवा अचानक 'ए टेल ऑफ टू सिस्टर्स' हा कोरिअन चित्रपट हाताला लागला आणि कधी एकदा पाहून संपवतो असे झाले. हॉरर चित्रपटांची आवड असणार्या लोकांसाठी हा चित्रपट म्हणजे पर्वणी आहेच पण सायकोलॉजीकल थ्रिलरची विशेष आवड असणार्या रसिकांना हा चित्रपट एक वेगळाच अनुभव देऊन जातो. चित्रपट पाहून काही काळ आपण खरेच सुन्न होऊन जातो. ह्यातले काही काही शॉट किंवा अचानक कथेला कलाटणी देणारे क्षण आपण बर्याच हिंदी, इंग्रजी चित्रपटात नक्की पाहिले असतील. मात्र हे सगळे शॉट आणि ही वळणे एकाच चित्रपटात पाहण्याची मजाच वेगळी.
सू-मी ह्या मुलीला एका मानसोपचार तज्ज्ञासमोर आणले जाते इथून पुढे तिच्याकडून तिची स्वतःची, तिच्या कुटुंबाची आणि एकूणच चित्रपटाची एक रहस्यरंजक आणि खुर्चीला खिळवून ठेवणारी कहाणी उलगडत जाते.
सू-मी आपल्या सू-येओन* ह्या लहान बहिणीसमवेत आपल्या घरी परत आलेली असते. ह्यावेळी तिच्या स्वागताला तिचे वडील आणि नवीन सावत्र आई दोघेही हजर असतात. सावत्र आई विषयी दोन्ही मुलींच्या मनात अढी असतेच त्यात आता आपली सावत्र आई काहीतरी विचित्र आणि गूढ वागते आहे ह्या अनुभवाने तिच्याविषयी अधिकच संताप दाटू लागतो. आल्या दिवशी पहिल्याच रात्री सू-येओनला आपल्या खोलीत कोणीतरी अदृश्य शक्ती वावरत आहे असा भास होतो आणि ती घाबरून आपल्या बहिणीच्या खोलीत जाऊन झोपते. आपल्या लहान बहिणीला असे घाबरवण्यामागे आपल्या सावत्र आईचाच हात आहे ह्याबद्दल सू-मी ला मात्र शंका नसते.
दोन्ही मुली घरी परत येतात आणि अचानक बर्याच चित्रविचित्र घटना घडायला लागतात. त्याच रात्री सू-मी ला देखील एका भयानक स्वप्नाला सामोरे जावे लागते ज्यात तीच्या खर्या आईसारखी दिसणारी एक विचित्र भितीदायक स्त्री तिच्या बेडवर रांगत रांगत चढते. घाबरलेली सू-मी दचकून जागी होते आणि ह्या घरात नक्की काहीतरी विचित्र चालले आहे ह्याची तिला खात्री पटते. सावत्र आईच्या पाहुण्या येणार्या भावाबरोबर आणि त्याच्या बायकोबरोबर जेवण करायला दोघीही नकार देतात आणि सावत्र आईच्या रागात अजूनच भर पडते. जेवता जेवता सावत्र आईच्या वहिनीला अचानक फिट येते. फिट येऊन ती वळवळत असतानाच अचानक पडल्या पडल्या तिचे लक्ष सिंक च्या खाली जाते आणि भितीने थरारुन उठते. परत जाताना आपल्या नवर्याला ती आपण सिंक खाली एक जळालेली मुलगी पाहिल्याचे सांगते.
इकडे सावत्र आईला आपल्या आवडत्या पक्षांपैकी एक मेलेला आढळतो तर दुसरा मेलेला पक्षी सू-येओन च्या बिछान्यात सापडतो आणि तिच्या रागाचा स्फोट होतो. ती रागारागाने तिला अंधार्या कपाटात बंद करून ठेवते. इकडे अचानक काही आवाजाने जाग आलेली सू-मी आपल्या बहिणीच्या खोलीत येते. तिथे बहिणीला नसलेले पाहून ती काळजीत पडते, पण शेवटी ते आपल्या बहिणीला शोधून काढतेच. दोघी एकमेकींना मिठ्या मारून अश्रूंना वाट करून देतात. काही वेळाने दूसर्या पक्षाला व्यवस्थित पुरून त्यांचे वडील परत येतात तेव्हा सू-मी आपला सगळा संताप त्यांच्या समोर व्यक्त करते. शेवटी चिडलेले वडील सू-मी वर खेकसतात आणि "हे सगळे प्रकार तू कधी बंद करणार आहेस ? तुला बरी व्हायचे नाही आहे का?" असे विचारतात. सू-मी त्यावर आपली सावत्र आई लहान बहिणीवर सतत कसे अत्याचार करत असते ह्याचा पाढाच वाचते. आता मात्र संतापलेले वडील सू-मी वार खेकसतात आणि म्हणतात "ह्या सगळ्यातून बाहेर ये, प्लीज. सू-येओन मेलीये. ती कधीच मेली आहे, आत तरी ह्या सत्याचा स्वीकारा कर." हा शॉट संपतो आणि कथा एक वेगळेच वळण घेऊन आपल्याला गुंगवून टाकते.
दुसर्या दिवशी आपली बहीण पुन्हा नाहिशी झाल्याचे सू-मी च्या लक्षात येते आणि आपण राहून राहून आपल्या आईला एक रक्ताळलेले पोते ओढून नेताना पाहिल्याचे तिला आठवत राहते. आपल्या बहिणीची सुटका करण्यासाठी ती धावते मात्र पुन्हा सावत्र आई मध्ये पडते आणि त्यांच्यात जोरदार झटापट होते. थोड्या वेळाने तिचे वडील परत येतात मात्र तोवर सगळे अस्ताव्यस्त घर अगदी व्यवस्थित दिसत असते. मग नक्की त्या घरात घडलेले तरी काय असते आणि घडत तरी काय असते ?
कथा ह्यापुढे अनेक वळणे आणि फ्लॅशबॅक घेत जाते आणि आपल्याला थक्क करून सोडते. दोन्ही बहिणींचा सावत्र आई ही त्यांच्या वडिलांची एकेकाळची सहकारी असते आणि त्यांच्या आजारी आईची देखभाल करण्यासाठी घरी राहतं असते हे सत्य फ्लॅशबॅक मधून समोर येते. आणि त्याच वेळी त्यांची खरी आई आणि लहान बहिणीबद्दल काय घडले हे देखील सामोरे येते.
सू-मी खरंच वेडी असते, आणि ह्या सगळ्या कल्पना रचत असते ? का खरंच त्यांच्या सावत्र आईने लहान बहिणीची हत्या केलेली असते ? सिंक खाली जळालेली आणि रांगत हिंडणारी मुलगी नक्की कोण असते ? सू-मी ची खरी आई भूत होऊन त्यांच्या घरात वावरत असते का ? का ह्या सगळ्या भूमिका एकटी सू-मी स्वतःच जगत असते ? ह्या आणि अशा अनेक गूढ प्रश्नांची उत्तरे कशी मिळत जातात ते चित्रपटातच बघण्यात खरी मजा आहे.
चित्रपट सगळ्याच अंगांनी सुंदर बनवलेला आहे. विशेष उल्लेख करावा लागेल तो सतत धक्के देणारी कथा आणि कॅमेर्याच्या अतिशय सुरेख केलेला वापर. चित्रपटाबरोबर उपलब्ध असणारी सबटायटल्स देखील उत्तम. अर्थात सबटायटल्स शिवाय हा चित्रपट कळण्याची सुतराम शक्यता नाही हे मात्र खरे. भयानक चेहरे, कर्णकर्कश्य संगीत आणि उगाच अंधारी दृश्ये ह्या शिवाय देखील एक अतिशय थरारक चित्रपट आपल्या मनात भिती कशी उत्पन्न करू शकतो ह्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हा चित्रपट पाहायलाच हवा.
लेबल: भयपट
फॉलोअर
Translation
Save as PDF
सदस्यत्व घ्या
Labels
- इंग्रजी चित्रपट (10)
- कथा (29)
- चित्रपट (20)
- तेलगु (1)
- पुस्तक प्रकाशन (3)
- प्रहसन (12)
- भयपट (4)
- मराठी (8)
- स्तंभलेखन (1)
- हिंदी (12)
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा