सोमवार, ५ सप्टेंबर, २०११
आज सकाळी नेहमीप्रमाणेच मोकळा असल्याने शनिवारी अर्धवट राहिलेला Fast Five हा चित्रपट पाहून संपवला. The Fast and the Furious सिरीज मधला हा पाचवा चित्रपट. पहिल्या दोन भागांनंतर बाहेर गेलेले विन डिझेल आणि पॉल वॉकर ह्या भागाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आलेले आहेत, आणि त्यांना साथ मिळाली आहे WWF स्टार 'द रॉक' ची. येवढी तगडी स्टारकास्ट आणि जोडीला The Fast and the Furious ची भन्नाट कार ड्रायव्हिंग, जबरदस्त संवाद आणि तोंडावर कमी आणि बंदुकांवर जास्त विश्वास ठेवणारे खलनायक अशी सर्व वैशिष्ट्ये घेऊन हा चित्रपट हजर झाला आहे.
विन डीजलला (डॉमनिक) पूर्वाश्रमीच्या गुन्ह्यांसाठी २५ वर्षाची शिक्षा दिली जाते, अर्थात शिक्षेमध्ये पॅरोलची संभावना देखील नसतेच. कायद्याचा रक्षक डॉमचा मित्र आणि डॉमच्या बहिणीचा मियाचा प्रियकर पॉल वॉकर ( ब्रायन ओ कॉनर) आता आपली बाजू बदलून डॉमला वाचवायचे ठरवतो आणि इथे चित्रपटाला सुरुवात होते. अर्थात नेहमीप्रमाणेच अचाट कार ड्रायव्हिंग स्किल्स आणि अचूक टायमिंगच्या जोरावर ब्रायन आणि मिया मिळून डॉमला आणि इतर कैद्यांना घेऊन जाणारी बस उलटवण्यात यशस्वी होतात आणि डॉम पळून जाण्यात.
आता तिघांचे लक्ष असते ते रिओ गाठणे. डॉमनिकची वाट बघत ब्रायन व मिया तात्पुरते त्यांच्या जुन्या मित्राच्या विन्सी च्या आश्रयाला येतात. इथेच मियाला आपण आई होणार असल्याचे कळते. डॉमच्या आगमनाच्या मधल्या काळात विन्सीकडे नेहमीप्रमाणे एक जॉब चालून येतो आणि ब्रायन आणि मिया त्याला जॉईन होतात. जॉब असतो नेहमीप्रमाणेच चोरीचा. ह्यावेळी धावत्या ट्रेनमधून काही कार्स पळवण्याचा जॉब आलेला असतो. जॉब पूर्ण करत असतानाच ज्या गाड्यांच्या चोरीचा हा जॉब आहे त्या गाड्या 'सिझ' केलेल्या आहेत आणि गाड्यांबरोबरच फेडरल एजंटस देखील ट्रेनमध्ये असल्याचे मिया आणि ब्रायनच्या लक्षात येते. त्याचवेळी इतर ग्रुप बरोबर डॉम देखील जॉब पूर्ण करायला हजेरी लावतो. ज्या ग्रुपसाठी ते हा जॉब पूर्ण करात असतात, त्या ग्रुपला इतर कार्स सोडून फक्त आणि फक्त एकाच कार मध्ये (Ford GT4() इंटरेस्ट असल्याचे आता ह्या तिघांच्या लक्षात येते. त्यामुळे नेमकी तिच कार घेऊन डॉम मियाला पळवून लावतो. इकडे चिडलेल्या ग्रुपमध्ये आणि डॉम, ब्रायन मध्ये झालेल्या मारामारीत ग्रुपमधील झिझी नावाच्या माणसाच्या हातून काही फेडरल एजंटस मारले जातात. ब्रायन आणि डॉम पळून जाण्याच्या प्रयत्नात ह्या सगळ्या जॉब मागे असलेल्या एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या बिझनेसमनच्या रे च्या हातात सापडतात. अर्थात त्याच्या गुंडांच्या तावडीतून देखील ते पळून जाण्यात यशस्वी होतात.
आता शोध सुरू होतो की ह्या कारमध्ये नक्की असे काय आहे की ज्यासाठी हा पूर्णं प्लॅन रचला गेला होता. इकडे परत येऊन मिळालेला विन्सी त्या कारमधून एक कॉम्प्युटर चीप चोरताना त्यांच्या ताब्यात सापडतो. विन्सीला हाकलल्यावर आता त्या चीप मध्ये नक्की काय आहे ह्याची माहिती घ्यायला सुरुवात होते. त्या चीप मध्ये रे च्या संपूर्ण काळ्या साम्राज्याची माहिती आणि त्याने ठिकठिकाणी लपवलेल्या एकूण १०० मिलियन डॉलर्सची माहिती देखील असते.
इकडे ट्रेनमध्ये झालेल्या खुनांचा आळ डॉम आणि ब्रायन वरती येतो आणि ते मोस्ट वाँटेडच्या यादीत अग्रभागी विराजमान होतात. आपल्या एजंट्सच्या हत्येने पिसाळून उठलेला ल्यूक हॉब्ज (द रॉक) आता ह्या दुक्कलीला पकडण्यासाठी ब्राझील मध्ये दाखल होतो. डॉमच्या ठिकाणाचा पत्ता लागल्याने रे चे गुंड त्यांच्यावरती हल्ला करतात. पोलिस आणि रे अशा कचाट्यात सापडलेला डॉम आपण वेगळे होऊ आणि लवकरात लवकर रिओ सोडू असे सुचवतो. मात्र तेव्हाच मिया आपण प्रेग्नंट असल्याचे सांगते आणि परिस्थिती बदलते. शेवटचा जॉब म्हणून रे चे १०० मिलियन्स चोरायचे आणि ह्या सगळ्याला कायमचा राम राम ठोकून नवे आयुष्य सुरू करायची कल्पना डॉम सुचवतो. आणि मग सुरू होतो शोध ह्या शेवटच्या जॉबसाठी मदतनिसांचा. विन्सी देखील पुन्हा येऊन मिळतो.
मदतनीस मिळतात, जॉबची आखणी देखील होते मात्र पहिली टीम जॉबसाठी बाहेर पडते आणि इकडे डॉम आणि साथीदारांना ल्यूक अटक करतो. आता अटक केलेल्या सर्वांची अमेरिकेला रवानगी करण्यासाठी ल्यूक त्यांना गाडीतून घेऊन निघतो आणि त्या गाडीवरच रे च्या माणसांकडून हल्ला होतो. जवळ जवळ सर्वच साथीदार मारले गेल्यावरती डॉम व मंडळी कशीतरी ल्यूकची सुटका करतात आणि त्याला आपल्या ठिकाण्यावर घेऊन येतात. आता बदललेला ल्यूक देखील ह्या जॉब मध्ये सामील होतो आणि एकच भन्नाट वेग कथेला मिळतो.
शेवटी चोरी होते का? चोरीच्या पैशाचे नक्की काय आणि कसे होते, रॉक नक्की जॉब मध्ये सामील होतो ? का त्याचा सतःचा काही वेगळा अजेंडा असतो ? ह्या प्रश्नांची उत्तरे चित्रपटाकडूनच मिळवण्यात मजा आहे.
विन डिजेलची थंड नजर, द रॉकचे सुसाट संवाद, पॉल वॉकरची गजब बुद्धिमत्ता आणि धुमशान मारामार्या, जबरदस्त कार स्टंटस, चोरीसाठी वापरलेल्या युक्त्या एकूणच धमाल ही धमाल. ह्या सर्व फटाक्यांची आतषबाजी एकत्र पाहण्याची मजा खरंच काही और आहे.
लेबल: इंग्रजी चित्रपट
फॉलोअर
Translation
Save as PDF
सदस्यत्व घ्या
Labels
- इंग्रजी चित्रपट (10)
- कथा (29)
- चित्रपट (20)
- तेलगु (1)
- पुस्तक प्रकाशन (3)
- प्रहसन (12)
- भयपट (4)
- मराठी (8)
- स्तंभलेखन (1)
- हिंदी (12)
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा