सोमवार, २६ डिसेंबर, २०११
काजल अगरवाल हिच्यावरती आजकाल आमचा भारी जीव. तिच्यावरती चित्रित केलेले मगधीरा मधील ' धीर धीर..' हे आमचे अत्यंत आवडते असे गाणे. ह्या मगधीरा चित्रपटाबद्दल खूप ऐकले होते, खरेतर हा एकदा पाहिला देखील होता. मात्र सबटायटल्स नसल्याने शष्प काही कळले नव्हते. चार दिवसांपूर्वी सबटायटल्स सकट ह्या चित्रपटाची प्रिंट मिळाली आणि दिल एकदम गार्डन गार्डन झाले. ह्या एका नितांत सुंदर चित्रपटाची ही ओळख.
मगधीरा म्हणजे शूर, धैर्यवान. हा चित्रपट फ्लॅशबॅक आणि वर्तमान अशा दोन्ही काळात वावरणारा असला तरी दोन्ही काळांचा सुंदर संगम साधलेला असल्याने इतर फ्लॅशबॅक चित्रपटांसारखा कंटाळवाणा होत नाही. चित्रपटाची कथा सुरू होते ४०० वर्षापूर्वीच्या काळापासून. चित्रपटाच्या सुरुवातीलाच कड्यांवरून पडून जखमी काजल अगरवाल मृत्युमुखी पडताना दिसते, मृत्यूपूर्वी तिने कोणा भैरवाकडे (राम चरण तेजा) प्रेमाची मागितलेली कबुली आणि तिच्या मागोमाग त्याने देखील मारलेली उडी अशा दृश्याने चित्रपटाची सुरुवात होते. ह्या दोघांच्या मृत्यूनंतर त्याच कड्यांवरती शेरखान (श्री हरी रघुमुंद्री) भैरव परत जन्म घेणार आणि आपले ह्या जन्मात अपुरे राहिलेले प्रेम प्राप्त करणार अशी गर्जना करताना दिसतो आणि आपल्याला पुढचा अंदाज यायला लागतो.
आता एकदम वर्तमानाकडे चित्रपट वळतो. पूर्वजन्मीचा भैरव आता हर्षा म्हणून जन्माला आलेला असतो. बाइक रेसींग, स्टंट हे त्याच्या उपजीविकेचे साधन. तर पूर्वीची युवराज्ञी मित्रविंदा अर्थात काजल अगरवालने इंदू म्हणून जन्म घेतलेला आहे. एका पावसाळी दिवशी रिक्षाने जात असताना हर्षाचा स्पर्श इंदूच्या हाताला होतो आणि त्याला गतजन्मीच्या काही गोष्टी दिसतात. ह्या धक्क्याने हादरलेला हर्षा आता इंदूचा शोध घ्यायला रिक्षा सोडून धावतो. काजल अगरवाल त्याच्या शोधामागचे नक्की सत्य काय आहे ते जाणून घेण्यासाठी त्याला आपण इंदूची मैत्रीण असल्याचे खोटेच सांगते आणि त्यांची गाठ घालून देण्याचे वचन देते. इकडे चालबाज हर्षा देखील आपण इंदूला ओळखतो, तिचे आणि आपले प्रेम आहे मात्र तिचा बाप ह्याच्या विरुद्ध आहे असे खोटेच सांगतो. आता सुरू होतो तो इंदूला भेटवण्याचा आणि दर वेळी तो फसण्याचा खेळ.
इंदूचे वडील इकडे आपल्या पूर्वजांच्या उदयगढ ह्या प्रॉपर्टीसाठी न्यायालयीन लढा देत असतात, ज्यावर त्यांच्या मेव्हण्याने कब्जा केलेला असतो. ह्या मेव्हण्याचा मुलगा रघुवीर (देव गील) इंदूला पाहताच तिच्या प्रेमात पडतो आणि तिच्या प्राप्तीसाठी वेळेला स्वतःचा वडलांचा देखील खून करायला मागे पुढे पाहतं नाही. आता इंदू आणि प्रॉपर्टी दोन्ही मिळवायचा तो निश्चय करतो. त्याचा गुरु घोरा मात्र त्याला सावध करतो, की जोवर हर्षा जिवंत आहे तोवर तो इंदूला कधीच मिळवू शकणार नाही. त्यानंतर घोरा त्याला त्याच्या पूर्वजन्मीची हकिगत सांगतो. इकडे इंदू मात्र हर्षाच्या प्रेमात बुडलेली असते. आता तो इंदू आणि तिच्या वडलांची क्षमा मागून त्यांना आपल्याकडे घेऊन येतो. हर्षाच्या प्रेमात बुडलेल्या इंदूच्या प्रेमाला आधी तिचे वडील विरोध करतात, मात्र नंतर त्याला मान्यता देण्याचा निश्चय करतात. त्यांचा हा बदलता निर्णय पाहून रघुवीर त्यांचा खून करतो आणि आळ हर्षावरती आणतो. परिस्थिती देखील अशी येते की हर्षाच खुनी असल्याचा इंदूचा ठाम विश्वास बसतो.
रघुवीर आता इंदूला आपल्याबरोबर उदयगढला नेण्याचा निर्णय घेतो, त्याचवेळी हर्षा आपले निर्दोषत्व सांगायला तिथे पोचतो. बर्याच हाणामारीनंतर हेलीक्रॉप्टरला लटकलेल्या हर्षाला इंदूचा पुन्हा स्पर्श होतो आणि एक झटका बसून तो थेट खाली तळ्यात कोसळतो.
आता ह्यावेळी आपला संपूर्ण पुनर्जन्म त्याला आठवतो. आता चित्रपट थेट ४०० वर्षे मागे १६०० सालात जाऊन पोचतो. उदयगढ च्या राज्याची मित्रविंदा (वर्तमानातली इंदू) ही एकुलती एक कन्या. तिचा भावी पती म्हणून रणदेव भिल्ल (अर्थात वर्तमानातला रघुवीर) कडे पाहिले जात असते. मित्रविंदा मात्र मनातल्या मनात भैरव (वर्तमानातील हर्षा) वरती प्रेम करत असते. ह्या भैरवाच्या अनेक पिढ्यांनी उदयगढ साठी आपले प्राण त्यागलेले असतात. त्याच्या वंशातील योद्ध्यांना एक शाप असतो, १०० शत्रू मारल्याशिवाय ते रणांगणात देह ठेवणार नाहीत आणि ३० वर्षाच्या वरती कोणी जगणार नाही.
मित्रविंदाच्या प्राप्तीसाठी ठेवलेल्या पणात रणदेव भिल्ल आणि भैरव दोघेही भाग घेतात. रणदेवाच्या वर्तणुकीने आधीच चिडलेली मित्रविंदा ह्या पणात जो हरेल त्याला बहिष्कृत करून राज्याबाहेर काढले जाईल असेही सुनावते. राज्याच्या आणि मित्रविंदेच्या लालसेने पछाडलेला रणदेव अनेक कॢप्त्या करतो मात्र शेवटी भैरवच जिंकतो. अर्थातच रणदेवाला राज्याबाहेर हाकलले जाते. भैरवच्या वंशाला असलेल्या शापाची माहिती असल्याने राजा भैरवला मित्रविंदाच्या प्राप्तीचा ध्यास सोडण्याची आणि प्रेमाचे त्याग करण्याची विनंती करतो, जी जड मनाने भैरव स्वीकारतो. मित्रविंदा मात्र कोसळून पडते.
इकडे राज्यावरती शेरखान ह्या हिंदुस्थान प्राप्तीच्या ध्येयाने पछाडलेल्या योद्ध्याचे सावट आदळते. त्यातच अपमानित झालेला रणदेव भिल्ल शेरखानशी हात मिळवतो आणि राजाचा खून करून राज्य ताब्यात घेतो. शंकराच्या पूजेसाठी गेलेले मित्रविंदा आणि भैरव मात्र बचावतात. आता शेरखानच्या फौजेसह रणदेव त्यांच्यावरती चाल करून जातो. भैरवाच्या शौर्याचे किस्से ऐकलेला शेरखान त्याला आव्हान देतो आणि १०० सैनिकांची तुकडी त्याच्या एकट्यावरती हल्ला करायला पाठवतो. भैरव त्या सर्व सैनिकांना कंठस्नान घालतो. त्याच्या पराक्रमाने स्तब्ध झालेला शेरखानदेखील त्याच्यापुढे आदराने झुकतो. रणदेव मात्र ह्यासर्वाला तयार नसतो. शेवटी त्याचा व भैरवच्या अंतिम युद्धात भैरव त्याला ठार मारतो, मात्र मरता मरता रणदेव मित्रविंदाला चाकूने प्राणघातक जखम करूनच प्राण सोडतो.
चित्रपट पुन्हा वर्तमानकाळाकडे वळतो. पाण्यात बुडलेल्या हर्षाला आता पूर्वजन्मीचा शेरखान आणि ह्या जन्मीचा सोलोमन हा कोळी वाचवतो. त्याच्या मदतीनेच आता इंदू अर्थात मित्रविंदाला मिळवण्यासाठी हर्षा सज्ज होतो. मग जे काय टिपिकल साऊथ स्टाइल घडत जाते ते पडद्यावरच पाहण्यात गंमत आहे.
कुठेही उगाच भावनांना हात घालण्याचा न केलेला प्रयत्न, अप्रतिम संगीत, भव्य आणि अप्रतिम सेट्स, सुंदर लोकेशन्स, झकास गाणी आणि कोरीओग्राफी, प्रत्येक फ्रेम मध्ये दिग्दर्शकाबरोबरच जाणवणारे कॅमेरामनचे टीम वर्क, आणि त्याला लाभलेली सर्वच कलाकारांच्या जबरदस्त अभिनयाची साथ ह्या सगळ्याचा जुळून आलेला योग म्हणजे मगधीरा. २००९ साली प्रदर्शित झालेल्या ह्या चित्रपटाने अनेक अॅवॉर्डस मिळवले. लक्ष्मी आणि सरस्वती अशा दोघींचा वरदहस्त ह्या चित्रपटाला लाभला. लवकरच ह्या चित्रपटाचा हिंदी रीमेक देखील येणार असल्याची चर्चा आहे.
फॉलोअर
Translation
Save as PDF
सदस्यत्व घ्या
Labels
- इंग्रजी चित्रपट (10)
- कथा (29)
- चित्रपट (20)
- तेलगु (1)
- पुस्तक प्रकाशन (3)
- प्रहसन (12)
- भयपट (4)
- मराठी (8)
- स्तंभलेखन (1)
- हिंदी (12)
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा