बुधवार, २५ जानेवारी, २०१२

शाळा : प्रत्येकाच्या मनातलीमिलिंद बोकील ह्यांच्या शाळा कादंबरीने एका वाचक वर्गाला खरेच प्रेमात पाडले होते. 'शाळा' कादंबरी म्हणजे अजूनही जीव का प्राण अशी त्यांची अवस्था असते. ह्या वर्गाला सोडून इतर देखील अनेकांनी ही कादंबरी वाचली असणार हे नक्की. बर्‍याच वाचकांनी ती पसंतीला उतरल्याचे देखील मान्य केले असणारच. ह्या अशाच नितांत सुंदर कादंबरीवरती आधारित शाळा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मिपावरती ह्याचे परीक्षण आले देखील आहे. आज ह्या चित्रपटाचे परीक्षण ब्लॉगवरती टाकणारच होतो, म्हणून लगे हाथ मिपावरती देखील टाकत आहे. एकाच विषयावरती दुसरा धागा चालू करत असल्याने आधीच क्षमस्व.

शाळा चित्रपटाची आतुरतेने वाट बघणे गेली दोन वर्षे सुरूच होते. पुणे चित्रपट फेस्टिवलला हा सगळ्यात आधी पुण्यात आला. मात्र एकाच चित्रपटाचे तिकिट मिळत नसल्याने आणि संपूर्ण सीझन तिकिटच घ्यायच्या सक्तीने तेव्हा हा चित्रपट पाहता आलाच नाही. शेवटी एकदाचा चित्रपट प्रदर्शित झाला आणि परवा तो बघण्याच्या सुवर्णक्षण आम्हाला मिळाला. रात्री ८.३० वाजताच्या शो ला साधारण ८.१५ वाजताच पोचलो, तर चित्रपट ८.४० ला असल्याचे कळले. स्क्रीन पाशी पोचलो तर एका आई वडील त्यांची कन्या आणि लांब उभ्या असलेल्या एक काकू येवढा प्रचंड प्रेक्षकवर्ग शाळा बघायला आल्याचे लक्षात आले. ८.४० वाजेपर्यंत संख्या वाढून साधारण १०-१२ लोक दाराबाहेर प्रतीक्षा करताना दिसले. ८.४० वाजल्यानंतर देखील दरवाजे उघडेनात तेव्हा आज बहुदा कोरम अभावी शो रद्द होतो का काय अशी शंका मनात आली. शेवटी ८.४५ ला दारे उघडली आणि आम्ही आत शिरकाव केला. नेहमीप्रमाणेच आधी चुकीच्या रो मध्ये, मग हक्काच्या रो मध्ये असे करत स्थानापन्न झालो आणि तेवढ्यात चित्रपटाला सुरुवात झालीच."वर्ग आहेत,बाकं आहेत, पोरंपोरी आहेत,सर आहेत,गणित आहे, भूगोल आहे,नागरिकशास्त्रसुद्धा; पण आपण त्यात कशातच नाही. आपण त्या गायींच्या पाठीवर बसणार्‍या पांढर्‍या पक्ष्यांसारखे मुक्त आहोत.त्यांच्या शाळेत बसलेलो असलो तरी आपल्या मनात एक वेगळीच शाळा भरते.खास एकट्याचीच . त्या शाळेला वर्ग नाहीत,भिंती नाहीत,फळा नाही,शिक्षक नाहीत; पण त्यातलं शिकणं फार सुंदर आहे." शाळाचा हा ब्लुर बरेच काही सांगून जाणारा आणि बर्‍याच आठवणींचा ठेवा गवसून देणारा. १९७० च्या सुमारास एका छोट्याश्या गावात घडणारी ही एक तरल प्रेम कथा. तिला थोडीफार जोड आहे ती आणीबाणी आणि पौगंडावस्थेतल्या मुलांच्या भावभावनांच्या पार्श्वभूमीची.सुर्‍या, फावड्या, चित्र्या आणि जोशी हे नववीत शिकणारे वर्गमित्र. ह्यातला जोश्या अर्थात मुकुंद जोशी हा आपल्या ह्या कथेचा नायक आहे. सुर्‍याच्या वडलांच्या परवानगीने त्यांच्या बांधकाम चालू असलेल्या एका इमारतीत अभ्यासासाठी एकत्र जमणे हे ह्या पोरांचे रोजचे काम. अर्थात शाळा भरण्या आधी तिथे एकत्र जमून मग लपून छपून येणार्‍या जाणार्‍या शाळेतल्या मुलींची आणि शिक्षकांची टिंगल करणे, त्यांना आवाज देणे हे ह्यांचे मुख्य काम. ह्यातल्या सुर्‍याचे वर्गातील गुप्तेवरती प्रेम बसलेले आहे. सुर्‍याने तिला केवडा हे नाव देखील बहाल करून टाकलेले आहे. खिडकीत उभा राहून तिला जाता येता बघणे आणि उसासे टाकणे ह्या खेरीज सुर्‍या काही करू शकत नसतो. चित्र्या नेहमीच अभ्यासात आणि संशोधनात मग्न. अर्थात कादंबरीतले चित्रेचे पात्र आणि चित्रपटातील चित्रे ह्यांचा फारसा मेळ जुळत नाही. फावड्या हा सुर्‍या सारखाच अभ्यासत कच्चा. फावल्या वेळात घरचा भाजीचा गाळा सांभाळणे हे ह्याचे काम. जोशी मात्र हरहुन्नरी. अभ्यासात ठीकठाक, वेळच्या वेळी गृहपाठ करणारा, बुद्धिबळात चमक दाखवणारा आणि मुख्य म्हणजे चित्रपट ओळखण्याच्या भेंड्यांत वर्गातील समस्त मुलींना पुरून उरणारा. ह्या जोश्याची लाइन अर्थात त्याच्या मनात बसलेली असते ती वर्गातली शिरोडकर.ह्या सर्वांचा गुरु म्हणजे चित्र्या आणि चित्र्याचा गुरु म्हणजे त्याचा नरुमाम. हे नरुमामाचे कॅरेक्टर जितेंद्र जोशीने मस्त साकारले आहे. वर्गातल्या वयाने मोठ्या आणि महेश नावाच्या पोरावरती बिनधास्त प्रेम करणार्‍या गीताला जेव्हा मुकुंदा वर्गात खूप त्रास देतो असे कळते तेव्हा नरुमामा अशा मुलीला आपण खरेतर मदत केली पाहिजे असा सल्ला मुकुंदाला देतो तो शॉट मस्तच. जोश्या आता आपल्या लाइनीचा अर्थात शिरोडकरचा पत्ता मिळवण्याच्या मागे लागतो, मग त्यासाठी तो तिच्या घराच्या आसपास राहणार्‍या मिसाळला इंग्रजी शिकवण्याचे गाजर दाखवतो. एक अगदी सहजपणे त्याच्याकडून तिचा पत्ता देखील काढून घेतो. पुढे शाळा बदललेल्या एका मित्राकडून शिरोडकरने त्याचाच क्लास लावला असल्याची बातमी कळते आणि जोश्या लगेच त्या क्लासला ऍडमिशन घेऊन मोकळा होतो. मग हमखास गल्लीतल्या गाठी भेटी सुरू होतात. त्यातून कळत नकळत फुलत जाणारी एक वेगळीच भावना चित्रपटात अतिशय छान खुलवली आहे.

जोश्याच्या भूमिकेत अंशुमन जोशी आणि शिरोडकरच्या भूमिकेत केतकी माटेगावकर अक्षरशः 'छा गये है.' चित्रपट एका निरागसतेने पुढे पुढे सरकत जातो. ही निरागसता प्रत्येक पात्राच्या अभिनयात आणि दिग्दर्शनात देखील सतत जाणवत राहते. प्रेम म्हणजे नक्की काय आहे, आपल्या शिरोडकर आवडते म्हणजे नक्की काय होते ह्याची नीटशी जाणीव देखील नसलेला जोश्या तिला "आपण पुढे काय करायचे?" असे विचारतो तेव्हा आपल्याला खदखदून हसायला येतेच मात्र त्या शब्दांमागची निरागसता काळजाचा ठाव देखील घेते. चित्रपटाला आणीबाणीची पार्श्वभूमी देखील आहे, मात्र एक दोन ठळक प्रसंग सोडता ती कुठे फारशी जाणवत नाही. शिरोडकला बेंद्रे बाईंनी रडवल्याने पेटून उठलेला जोश्या त्यांच्या पुढच्या तासाच्या आधी फळ्यावरती 'अनुशासन पर्व' लिहितो तो प्रसंग खासच. सुजय डहाके ह्यांनी खरेतर अप्रतिम अशा तुकड्या तुकड्यांनी जोडलेल्या प्रसंगातून ही कथा मस्त फुलवत नेली आहे. जोश्याने पकडल्यावरती अक्षर ओळखत येऊ नये म्हणून शिरोडकरला डाव्या हाताने चिठ्ठी लिहिणे, फावड्याच्या भाजीच्या गाळ्यावरती समोर एकदम शिरोडकरला आपल्याशी बोलताना पाहून जोश्याची उडालेली भंबेरी, काँन्व्हेंट मधून थेट ह्या मराठी शाळेत आलेली आणि बिनधास्त मुलांशी बोलणारी आंबेकर सुर्‍याकडे लाँड्रीवाल्या मुलाची तक्रार करते, सुर्‍या केवड्याला 'आपल्याला लाईन देते का?' असे विचारतो असे काही प्रसंग छान चितारलेले आहेत.'कोवळ्या वयातील प्रेमकथा' ह्या टॅग लाइन खाली आपण आजकाल अनेक अत्याचार सहन केले आहेत. मात्र शाळा ह्याला नक्की अपवाद आहे. केतकी माटेगावकरने उभी केलेली शिरोडकर ही अक्षरशः कादंबरीतूनच बाहेर आल्यासारखी वाटते. तिचे दिसणे तर मोहक आहेच पण अभिनय आणि कॅमेर्‍याची जाण देखील अतिशय सुरेख. कोवळ्या वयात जाणवणार्‍या भावना, एखाद्या मुलाशी घराजवळ उभे राहून बोलताना होणारी कुचंबणा, भिती तिने अतिशय सहजपणे अभिनयातून साकार केली आहे. जोश्याने 'भेटणार का?' विचारल्यावरती तिचे 'छे बॉ. आपल्याला नाही जमायचे तसले काही' म्हणणे तर एकदम कलिजा खलास करणारे. अंशुमन जोशीने देखील अतिशय उत्तम आणि समंजस अभिनयाने आपल्या कॅरेक्टर मध्ये रंग भरले आहेत. केवड्याच्या वडलांच्या भूमिकेत आनंद इंगळे, मुख्याध्यापकाच्या भूमिकेत दिलीप प्रभावळकर छोट्या प्रसंगातही आपली छाप सोडून जातात. इतिहास भूगोल ह्यावरती अतिशय प्रेम करणारे आणि इतर विषयांना तुच्छ समजणारे मांजरेकर सर संतोष जुवेकरनी अप्रतिम साकारले आहेत.

कादंबरी जशीच्या तशी पडद्यावर उतरली असेल अशा समजुतीने जाल तर हा चित्रपट तुमची नक्कीच निराशा करेल. अर्थात कादंबरी मुख्य कथानकासह पडद्यावर आणण्याच्या सुजय डहाके ह्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आहे हे नक्की. शाळा न वाचलेल्यांनी तर ती वाचल्याशिवाय ह्या चित्रपटाला जाऊच नये, अन्यथा काही प्रसंग डोक्यावरून जाणार हे निश्चित. चित्रपटात काही उणीवा देखील निश्चित राहिल्या आहेत. वैभव मांगले, अमृता खानवीलकर ह्यांच्या भूमिकांची इतकी काटछाट झालेली आहे, की त्या भूमिकांना काही आगा पिछाच राहिलेला नाही. त्यामुळे त्या मनावरती ठसत नाहीत आणि उगाच घुसडल्यासारख्या वाटतात. आणीबाणी आणि तिच्याशी निगडित काही प्रसंगांचा कादंबरीत इतका सुरेख उपयोग करून घेतलेला असताना चित्रपटात मात्र त्याची उणीव जाणवते. जोश्या आणि शिरोडकर ह्यांच्यातले प्रसंग चित्रपटात छानच फुलवले आहेत, मात्र अधे मध्ये ते उरकून टाकल्यासारखे वाटतात. शिरोडकरचे घर कळल्यावरती जोश्याने तिथे चालू केलेल्या फेर्‍या, तिच्या गल्लीच्या कोपर्‍यावरील सार्वजनीक वाचनालयाचा वाढत्या फेर्‍या हे सगळे चित्रपटात अजिबात दाखवलेले नाही. जोश्याचे वर्गातल्या मुलींना चिमण्या म्हणणे, चित्र्याचे संशोधक प्रयोग, त्याच्या घरच्या परिस्थितीने त्याचे कोवळ्या वयात होणारे हाल, फावड्याची परिस्थिती हे देखील कुठेच समोर येत नाही. त्यामुळे सुर्‍या, फावड्या, चित्र्या ही पात्रे काहीशी दुर्लक्षित आणि विनोद निर्मिती पुरतीच उरून बसतात.अर्थात उणीवा बाजूला सरून एकदा तरी हा चित्रपट अनुभवावा हे निश्चित. जाता जाता दखल घेण्याजोगे म्हणजे चित्रपटासाठी केलेली गावाची निवड आणि गावाचे घडणारे रम्य दर्शन गणपतीचे देऊळ, नदीचा काठ.. सगळेच अप्रतिम. निव्वळ ह्यासाठी ह्या चित्रपटाला मी ४ गुण नक्की देईन.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा