गुरुवार, १६ जुलै, २००९
"आई ग ! येव्हडे चालत जायचे आता ? देवांचे वगैरे बरे होते राव, हे असे डोळे बंद करुन 'रुम बाहेर' असे म्हणाले असते तर डोळे उघडले की रुम बाहेर उभे दिसले असते, मी मनात म्हणालो आणी मगाशी गमतीने मिटलेले डोळे उघडले आणी.... फक्त चक्कर येउन पडायचा बाकी राहिलो... मी आमच्या रुमबाहेर उभा होतो.
--------------------------------------------------------------------
माझ्यातल्या न जागलेल्या बर्याचशा शक्ती आता हळुहळु जागृत होत आहेत ह्याची जाणीव मला त्या क्षणी झाली.
सकाळी लवकर उरकुन नानांच्या भेटीला धावलो. मी पोचलो तेंव्हा नानांची पुजा चालु होती, रामरक्षा म्हणता म्हणता माला एका हातानी बसायची खुण करत नाना पुन्हा पुजेत मग्न झाले. नानांच्या बरोबरीने न कळत मीही खड्या आवाजात रामरक्षा म्हणत त्यांना साथ द्यायला सुरुवात केली. काही वेळाने मला जणु काही ती खोलीच त्या आवजाने भरुन गेली आहे असे वाटायले लागले. रामरक्षा म्हणणारे फक्त आपल्या दोघांचेच आवाज नाहीयेत ,खुप जणांचे आवजही त्यात सामील आहेत असे राहुन राहुन वाटत होते, ह्या खोलीत आपल्या शिवाय सुद्धा अजुन कोणीतरी आहे अशी एक विचित्र भावना मनात दाटुन येत होती.
"करायची सुरुवात ?" नानांनी माझ्याकडे बघुन विचारले.
काय ? कसली ? ह्या कसल्याही चौकशा न करता मी आज्ञाधारकपणे मान हलवली. आणी तेथुन सुरु झाला माझ्या खडतर साधनेचा काळ......
"अपरांतक्षा, या आधी सुद्धा आपण बर्याचदा विनाशक शक्तींशी मुकाबला केला आहे, कधी तुझ्या नेतृत्वाखाली तर कधी अन्य कोणाच्या. ह्या प्रत्येक संघर्षाची, त्यात वापरल्या गेलेल्या साधनांची, विरुद्ध शक्तीच्या ताकदीची आणी मुख्य म्हणजे आपले मित्र कोण आणी शत्रु कोण ह्याची जाणीव तुला पुन्हा प्राप्त होणे हे सर्वात महत्वाचे आहे.
"होय गुरुदेव" मी पुटपुटलो. माझ्या संबोधनात पडलेला फरक बघुन नाना अस्पष्टसे हसले.
"अपरांतक्षा मला तुझे सहकार्य अपेक्षीत आहे, मी आता तुझ्या जुन्या जाणीवा अजुन स्पष्ट अजुन ठळक करण्याचा प्रयत्न करणार आहे. ह्या प्रवासात तुला वेगवेगळे अनुभव येतील, वेगवेगळी दृष्ये दिसतील पण तु फक्त एक मुकदर्शक आहेस हे लक्षात ठेव. तु फक्त भुतकाळ पाहणार आहेस, त्यात हस्तक्षेप करायचा तुला अधीकार नाही" नाना काहिशा करारी स्वरात म्हणाले.
मी आज्ञाधारकपणे मान डोलावली. नानांनी रामनामाचा गजर करत माझ्या डोक्यावर आपला हात टेकवला. काही क्षणातच मी समाधी अवस्थेत पोचलो, माझ्या डोळ्यासमोरुन अनेक घटना, कालचक्रे धावायला लागली.
सर्वात आधी मला दिसले एक नयनरम्य पर्वतशीखर आणी तेथेच एका वृक्षाखाली बसलेलो मी, माझ्या भोवताली पसरलेला अगम्य, गुढ प्रकाश आणी त्याच वेळी मनात उमटलेला तो दिव्य आवाज "भद्रशुला ते येत आहेत. अमोघ शक्ती, अमोघ ज्ञान भांडार तुझ्यावर रीक्त करायला ते येत आहेत." त्यानंतर दुरुन भगव्या छाटीत दमदार पावले टाकत येणारे नाना मला दिसले.
"गुरुदेव" मी त्यांच्या पायावर लोटांगण घातले. अत्यंत प्रेमानी मला आपल्या छातीशी लावुन धरत गुरुदेवांनी मला बसते केले. "
तुझी परिक्षा पुर्ण झाली भद्रा, ह्या अमोघ ज्ञान भांडारासाठी तु आता मानसीक आणी शारीरीकरीत्या उत्तम प्रकारे तयार झाल आहेस." गुरुदेव म्हणाले.
त्यानंतरचा तो साधनेचा आणी शक्तीग्रहणाचा खडतर प्रवास, गुरुदेवांनी पुन्हापुन्हा मला म्हणायला लावुन , घोकुन घेउन मला दिलेले ते अमोघ मंत्र, अनेक विविध शक्ती, त्यांची पुजा, त्या शक्तींचा वापर त्यांचे संवर्धन, ह्यासर्वासाठी घेतलेले अविरत कष्ट.... सगळे सगळे काही माझ्या डोळ्यासमोर एखाद्या चलचित्रा सारखे दिसत होते.
अशाप्रकारे अनेक खडतर दिवसांनतर एकदिवशी गुरुदेवांनी मला जवळ बसवुन घेतले आणी म्हणाले "भद्रा, तु आता माझ्या येव्हडाच ज्ञानी आणी शक्तीशाली झाला आहेस, परिपुर्ण मी म्हणणार नाही कारण त्या साठी अजुन बराच अवधी आहे. माझे कार्य आता संपले, मी आता पुर्वेकडे कुच करीन. भद्रा भगवंताच्या इच्छेनुसार तु आता सागर किनारी प्रस्थान करावेस"
आणी मग काही काळासाठी तो एकांत समुद्रकीनाराच माझ्या आयुष्याचा अविभाज्य अंग बनुन गेला. मी आणी माझी साधना, तपश्चर्या बस. परंतु कालचक्रात बदल हे घडतच असतात. हळुहळु माझ्या किनार्यावर कोळ्यांची वस्ती वाढली, मग छोटासा बाजार उभा राहिला , मग त्यांच्या पुज्यनीय शक्तींची मंदीरे आली, हळुहळु एक वस्तीच उभी राहिली. मी मात्र ह्या सर्वापासुन निर्विकार होतो, माझा त्यांना व त्यांना माझा कधीच त्रास झाला नाही. उलट मदतच व्हायची.
आणी एक दिवस अचानक काहितरी चुकले, समुद्राने नुसते थैमान मांडले, चारी दिशा काळोखुन आल्या आणी आयुष्यात पहिल्यांदाच मला अतिशय अस्वस्थ, अभद्र जाणीवा व्हायला लागल्या... वाईट शक्तीच्या वावराच्या खुणा जाणवायल लागल्या. त्या रात्री मला माझी कामगीरी बहाल करण्यात आली, त्या अगाध शक्तीकडुन, भगवंताकडुन मला आदेश प्राप्त झाला होता, "भद्रा ह्या क्षणापासुन मी सृष्टीपालक, ह्या पृथ्वीबिंदुचा रक्षक म्हणुन तुला अधीकार प्रदान करतोय. ह्या पुढे ह्या कक्षेतुन तुझ्या आज्ञेशीवाय देव,दानव,मर्त्य, जलचर, उभयचर कोणत्याही शक्तीला प्रवेश नाही. ह्या पुढे हय नियमाचे उल्लंघन करणार्याला सर्वशक्तीनीशी दंडीत करण्याचे पुर्ण अधीकार मी तुला प्रदान करतोय भद्रा. ह्या पुढे ह्या अपरांत भुमीच एकमेव रक्षक तु आहेस, तु अपरांतक्ष आहेस. यशस्वी भव."
कहितरी गुढ, अगम्य, अमानवी ह्या जगात प्रवेश करायचा प्रयन्त करत होते आणी त्याच्यापुढे खंबीर आव्हान म्हणुन मला उभे राहायचे होते. इतक्या वर्षाची साधना, ज्ञानप्राप्ती ह्या संघर्षासाठीच होती.
त्यानंतर घडलेला तो संघर्ष... कधी मानसीक तर कधी शारीरीक पातळीवर लढल्या गेलेल्या लढाया, ती मानसीक आंदोलने, त्रिमितिच्या कक्षा भेदुन झालेला पाठलाग आणी शेवटी मला मिळालेले यश. सगळे सगळे मला अगदी लख्ख दिसत होते. त्यानंतर कित्येकदा कालचक्र फिरले , कित्येकदा त्या बिंदुवरुन अभद्रानी प्रवेशाचा प्रयत्न केला आणी प्रत्येकदा मी त्याला रोखत राहिलो. आज त्या जाणीवा पुन्हा जागृत झाल्या, मला स्वत:ची ओळख पटली.
मी शांतपणे डोळे उघडुन नानांकडे पाहिले, उभा राहुन आधी देवघरासमोर आणी मग नानांना साष्टांग दंडवत घातले.
"मी जागृत झालोय गुरुदेव, माझ्या जाणीवा जेणीवा, माझे ज्ञान माझ्या सर्व शक्तींसह मी तयार आहे संघर्षासाठी." मी वदलो.
"अपेक्षेपेक्षा फार लवकर जागृत झालास अपरांतक्षा. मोठे सामाधान वाटले. आता तु तुझ्या नेहमीच्या आयुष्याकडे वळ, योग्य वेळ येताच तुला आपोआप त्याची जाणीव होईल" नाना स्मितहास्य करत म्हणाले.
त्यानंतरचे काही दिवस हे अतिशय समाधानाचे व असीम शांततेचे होते. माझ्या वागण्या बोलण्यात एक प्रकारचा मृदुपणा आला होता. हा कालखंड कधी संपुच नये असे वाटत होते, पण मनाचा एक कोपरा मात्र कायम सावध होता. माझ्या रोजच्या साधना, प्रार्थना मी बिनबोभाटपणे पुर्ण करत होतो. माझ्या इतक्या दिवसांच्या सुप्त पडुन राहिलेल्या शक्ती आत जागृत झाल्या होत्या, त्यांना साधनेची धार चढवुन पुन्हा लखलखीत करणे फार आवश्यक होते.
मेंदु सतत त्या येणार्या संघर्षाच्या विचारत गर्क असायचा, गुरुदेवांनी सांगीतलेली वेळ कधी येणार ह्याची मलाही उत्कंठा लागलेली होती. आणी ध्यानी मनी नसतानाच नानांचे नाव घेत अचानक आज हे कारखानीस माझ्यापर्यंत पोचले होते.
"मी शरद कारखानीस, जयराज माझा जावई" कारखानीसांनी स्वत:ची ओळख करुन दिली.
"मी प्रसाद, जयराजचा मित्र. पण तुम्ही नानांच्या ओळखीनी आलात ना?" मी विचारले.
"हो , म्हणजे त्याचे काय आहे नाना मला गुरुंच्या जागी. अनेक कौटुंबीक अडी अडचणीच्या वेळी मी त्यांचाच सल्ला घेतो.पण ह्यावेळी मात्र त्यांनी मला तुमच्याकडे जाण्याचा सल्ला दिला." कारखानीसांनी स्पष्टीकरण दिले.
"मला पुर्ण माहिती द्याल का ? " मी विचारले.
कारखानीसांनी आधी रुमाला कढुन स्वत:चा चेहरा पुसला. ते कुठल्यातरी घटनेमुळे खुपच अस्वस्थ, घाबरलेले दिसत होते. मी शांतपणे रामरायाचे नाव घेत त्यांच्या हातावर हात ठेवुन त्यांना दिलासा दिला.
"शरदराव ह्या जगात अनेक गुढ, अगम्य गोष्टी घडत असतात, बर्याचशा घटनांचे मानवीय पातळीवर स्पष्टीकरण सुद्धा करणे शक्य नसते. माझा तुमच्या बोलण्यावर पुर्ण विश्वास आहे, बोला तुम्ही." मी त्यांना आधार दिला.
माझा हात तसाच हातात दाबुन ठेवत कारखानीसांनी सांगायला सुरुवात केली.
"जयराजच्या वागण्या बोलण्यात आजकाल फार फरक पडलाय हो. मध्ये ६ महिन्यांसाठी त्याची गुजरातला बदली झाली होती त्यामुळे माझी मुलगी आणी नातवंडे माझ्याकडेच राहात होती. मागच्या आठवड्यात जयराज अचानक रात्री परत आला तो मद्याच्या अंमलाखाली चुर होउनच.
"तो जास्ती काही बोलायला उत्सुक नसतोच, बाल्कनीत खुर्ची टाकुन एकटक कुठेतरी बघत बसलेला असतो. खाण्यापिण्याची शुद्ध नाही. मध्येच एकदम उठतो आणी बायको, पोरांना मारहाण सुरु करतो. पुन्हा पुन्हा कोकणात जायचा हट्ट धरुन बसतो. का कळत नाही पण मला कायम त्याच्या आजुबाजुला काहितरी वावरते आहे, तो एकटा नाहिये असे जाणवत राहते. आणी परवा तर ...."
कारखानीसांनी पुन्हा एकदा रुमाल काढुन आपला घाम टिपला.
"परवा रात्री मला कसली तरी चाहुल लागली म्हणुन मी उठुन हॉल मध्ये आलो. जयराजच्या रुममध्ये डोकावलो तर आत जयराज न्हवता पण त्याच्या बेडवर जे काही होते ... विश्वास ठेवा ते खरच काहितरी अभद्र होते. एखाद्या मोठ्या सरड्याच्या कींवा मगरीच्या आकाराचे असे काहितरी तिथे रांगत होते." मी कसातरी मनावर ताबा ठेवुन माझ्या रुमकडे पळालो. सकाळी दिशा उजाडल्या उजाडल्या मी आधी नानांना फोन लावला.
"काय म्हणाले ते?" इतक्या वेळ पुर्ण घटनेचा आढाव घेणारा मी म्हणालो.
"ते म्हणाले, ती वेळ आली तर ! कारखानीस मी देतोय त्या पत्त्यावर ताबडतोब संपर्क साधा." कारखानीसांनी उत्तर दिले.
"मला तुमचा पत्ता देउन ठेवा कारखानीस, मी रात्री तुम्हाला भेटायला येतोय" मी म्हणालो.
संघर्षाच्या नुसते कल्पनेनीच मला स्फुरण चढले होते. त्या रात्री मला तसा थोडासा उशीरच झाला, साधारण १० वाजता मी कारखानीसांच्या घराची बेल दाबली.......
लेबल: कथा
फॉलोअर
Translation
Save as PDF
सदस्यत्व घ्या
Labels
- इंग्रजी चित्रपट (10)
- कथा (29)
- चित्रपट (20)
- तेलगु (1)
- पुस्तक प्रकाशन (3)
- प्रहसन (12)
- भयपट (4)
- मराठी (8)
- स्तंभलेखन (1)
- हिंदी (12)
2 टिप्पणी(ण्या):
पुढे लिहा की हो!
khupach chan... kasa kay suchata tula??? :P
टिप्पणी पोस्ट करा