गुरुवार, ७ जून, २०१२
रावडी राठोड ह्या चित्रपटाच्या नावातच फक्त दम आहे. हे येवढे वाक्य सांगून खरेतर चित्रपटाचे परीक्षण मांडता येईल इतका हा चित्रपट डोक्याला शॉट आहे. सध्या आपल्याकडे साऊथच्या चित्रपटांच्या रिमेकची एक लाटच आली आहे, त्यातले काही चित्रपट चांगला पैसा मिळवण्यात यशस्वी देखील झाले आहेत. ह्याच वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचा प्रभुदेवा आणि संजय लीला भन्साळीचा प्रयत्न म्हणजे रावडी राठोड. हा चित्रपट रवी तेजा च्या गाजलेल्या विक्रमार्कूडू चा हिंदी रीमेक आहे. आपल्याकडे साऊथचे जे गाजलेले रीमेक झाले मग ते अॅक्शन असो वा कॉमेडी त्या मध्ये संगीत, अॅक्शन, कथा इ. माल मसाला भलेही साऊथ मधला उचललेला असला तरी हीरो, हिरॉईन, नाच, संवाद ह्यांना एक टिपीकल बॉलीवूड टच होता. जो आपला वाटला आणि ही भेळ लोकांनी उचलून घेतली. रावडी राठोड मध्ये मात्र फ्रेम टू फ्रेम पासून ते अक्षय कुमारच्या रंगीबेरंगी कपड्यांपर्यंत सगळीच उचलेगिरी केलेली असल्याने ती असह्य होते. रवी तेजाचा चित्रपट हा चंबळ- हैदराबाद असा फिरतो, तर अक्षयचा रावडी पटणा - मुंबई असा फिरतो. चित्रपटात अक्षयची दुहेरी भूमिका असल्याने अंमळ त्रास देखील दुहेरी सहन करावा लागतो. शिवा (अक्षयकुमार) हा एक नाना उचापत्या करत चोर्या करणारा मनुष्य. त्याच्या जोडीला विनोदासाठी २जी (परेश गणात्रा) हे अजून एक पात्र दिलेले आहे. ह्या शिवाचे पहिल्याच नजरेत पारो (सोनाक्षी सिन्हा) प्रेम बसते. मग तिचे देखील अगदी टिपीकल मसालापटा प्रमाणे ह्याच्यावरती भेटल्या भेटल्या प्रेम बसते. हा तिला प्रामाणिकपणे आपण चोर आहोत असे सांगतो आणि तिच्या विनंतीवरून वाईट रस्ता सोडायचे देखील कबूल करतो. अर्थात त्या आधी एक मोठा हात मारून लाईफ सेटल करायचे असे ही मित्रांची जोडी ठरवते आणि मग खर्या अर्थाने चित्रपटाला सुरुवात होते. मी चित्रपटाला सुरुवात होते असे म्हणतोय खरे, पण तोवर ४३ मिनिटे, असंख्य भिकार विनोदी दृश्ये आणि २ गाणी होऊन गेल्याने आपण जागे नसल्यास खरा चित्रपट सुरू झाला आहे हे देखील लक्षात येणे अवघड. मोठा हात मारण्याच्या नादात ही जोडगोळी रेल्वे स्टेशनवरून एका धनवान स्त्री ची (गुरदीप कोहली) मोठी पेटी पळवून आणतात. ह्या पेटीत एका इन्सपेक्टरच्या (यशपाल शर्मा) छोटी मुलगीच निघते आणि ती 'पापा' म्हणत अक्षयच्या गळ्यालाच मिठी मारते. आता इन्स्पेक्टर समोर ती आपलीच मुलगी आहे हे कबूल केल्याने अर्थातच तिची जबाबदारी पत्करणे अक्षयला भाग पडते. त्याच ट्रंकेत अक्षयला आपल्या सारख्याच दिसणार्या एका माणसाबरोबरचा त्या मुलीचा चिंकीचा फोटो पाहून त्याला धक्काच बसतो. चिंकीच्या वडलांचा शोध तो सुरू करतो आणि अचानक त्याच्यावरती हल्ले व्हायला सुरुवात होतात. गोंधळलेल्या अक्षयवरच्या अशाच एका हल्ल्याच्या वेळेस त्याला वाचवण्यासाठी इन्स्पेक्टर, ती धनवान स्त्री, एक लंगडा माणूस आणि स्वतः अक्षय सारखाच दिसणारा तो इसम असे सगळे हजर होतात आणि अक्षय अजूनच गोंधळून जातो. ह्या हल्यातून अक्षयला वाचवताना दुसरा अक्षय अर्थात ए. एस. पी. विक्रम राठोड गंभीररीत्या जखमी होतो. त्याला हॉस्पिटलात हालवले जाते आणि मग तिथेच इन्सपेक्टर शर्मा आणि ती धनवान स्त्री अर्थात इन्सपेक्टर रजीया खान ह्यांच्याकडून शिवाला विक्रम राठोडचा भूतकाळ, त्याची हुशारी, ताकद, अन्याया विरुद्धची चीड, त्याचे फेमस डॉयलॉग असे सर्व सर्व समजते. हे सगळे त्याला समजल्यावरती विक्रम राठोड समजूतदारपणे मरून जातो आणि मग त्याची जागा शिवा घेतो. आता तो आपल्या परीने विक्रम राठोडचे राहिलेले कार्य पूर्ण करायची प्रतिज्ञा करतो. तो ते कसे करतो हे पाहायचे असेल तर (पाहायचे आहेच का?) चित्रपट पाहण्या शिवाय पर्याय नाही. चित्रपटात त्रुटी बघायला गेलो तर भरपूर आहेत. मुळात चित्रपटाची सुरुवात अतिशय संथ आहे. चित्रपटाची कथा सुरू होण्या आधीच घुसडलेले काही प्रसंग वात आणतात. संगीत, नृत्य, गाणी ह्या सगळ्या पातळीवरच चित्रपट साफ झोपला आहे. अक्षय कुठल्या प्रसंगात काय चेहरा करावा हेच समजत नसल्या सारखा वावरला आहे. कधीकाळी अॅक्शन दृश्ये सुंदरतेने साकारणारा अक्षय आजकाल प्रत्येक अॅक्शन दृश्यात उगाच विनोदी चेहरे अथवा हावभाव करून जॅकी चॅन होण्याचा प्रयत्न का करतो हे एक न उलगडणारे कोडे आहे. सोनाक्षी सिन्हा ही आमच्या आवडत्या स्त्रियांपैकी एक असली, तरी ह्या चित्रपटात ती 'जादू' ज्या मख्ख चेहर्याचे 'कोयी मिल गया' मध्ये वावरला आहे अगदी तशी वावरली आहे. अनंत जोग ह्यांची मिनिस्टरची भूमिका तर 'सिंघम' मधून कापून इथे चिकटवल्यासारखी वाटते. बाकी कलाकार 'चित्रपटात आहेत' ह्या दोन शब्दातच त्यांचे कौतुक पूर्ण होण्यासारखे आहे. खास करून ज्या स्टंट्स साठी हे रीमेक बघितले जातात ते तर इतके बालिश घेतले आहेत, की छोटा चेतन आणि अलीबाबा हे चित्रपट त्या समोर टायटॅनिक वाटतात. एकुणात काय तर अगदीच काही टाईमपास नसेल आणि २/२.१५ तास हालती चित्रच बघण्याचा अट्टहास असेल तर मग रावडीला हजेरी लावावी. मात्र मेंदू, भावना, आशा, अपेक्षा हे जाताना घरी सोडून जावे.
फॉलोअर
Translation
Save as PDF
सदस्यत्व घ्या
Labels
- इंग्रजी चित्रपट (10)
- कथा (29)
- चित्रपट (20)
- तेलगु (1)
- पुस्तक प्रकाशन (3)
- प्रहसन (12)
- भयपट (4)
- मराठी (8)
- स्तंभलेखन (1)
- हिंदी (12)
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा