सोमवार, ११ जून, २०१२

तुकाराम... हे राम !

तुकारामांची बेअब्रू झाली किंवा नालस्ती झाली तर आपल्याला केस गुदरता येते का हो ? का तुकोबांचे नातेवाईक असणे कंपल्सरी आहे ? तुकोबांच्या बाबतीत मानवी हक्क संघटना मदत करू शकेल काय ? बराच गाजावाजा झालेला आणि चालू असलेला तुकारामा हा चंद्रकांत कुलकर्णी ह्यांचा चित्रपट पाहून (खरेतर पहिल्या ४ मिनिटातच) पडलेले हे काही प्रश्न. खरंच सांगतो, एक..फक्त एक थप्पड किंवा बुक्का तुकारामांना कोणालातरी मारताना दाखवले असतेना तर हा चित्रपट सौथ स्टाइल म्हणून आरामात खपवता आला असता. सुट्टी चालू आहे तर लहान मुले हट्ट धरायला हवीत म्हणून बाल हनुमान, बाल गणेश तसा बाल तुकाराम, त्याच्या लीला, गाणी दाखवणे, बायकांच्या आडियन्सला रडवायला मेलोड्रामा, गेला बाजार गावाकडचे पब्लिक आकर्षीत करायला दुष्काळ, विवक्षित पब्लिकला खेचायला नाकात बोलणार्‍या बामणांचे प्रताप हे सगळे सगळे सोपस्कार पार पाडताना कुलकर्णी आणि कंपनीची जी काय ससेहोलपट (खरेतर हसेहोलपट) झाली आहे, ती बघवत नाही. अक्षरशः २.४५ मिनिटे अत्याचारा वरती अत्याचारा सहन करावा लागतो. 'साहस टाळा' असे रविवारचे राशी भविष्य सकाळी सकाळी वाचत असतानाच डाण्रावांचा फोन आला आणि संध्याकाळ म्हणता म्हणता दुपारच्या शो चा प्लॅन पक्का केला आणि तुकाराम चित्रपटाला हजेरी लावली. तुकोबांना विठ्ठलाचा ध्यास लागला होता आणी आम्हाला तुकोबांचा. अन्न पाणी काही ग्रहण करण्याची संधी देखील मिळाली नाही पण आम्हाला त्याचा खेद वाटला नाही. तर आधी आपण पात्रांचा परिचय करून घेऊ. पात्रं म्हणजे एकेक पात्रंच आहेत म्हणा. बोल्होबा अंबीले (तुकारामांचे वडील) = शरद पोंक्षे अर्थात मराठी चित्रपट सृष्टीतील बाबा महाराज सातारकर. हा माणूस कुठलाही संवाद निरूपण केल्याच्या थाटातच बोलतो. बाबा महाराजांसारखीच दर चार मिनिटांनी डोळे मिचकावण्याची देखील सवय. डोक्यात अजूनही नथुराम घुसलेला आहे, त्यामुळे बर्‍याचदा संवादाच्या शेवटी शेवटी आवाज भयानक चिरका होतो. पात्र बरेचशे सुसह्य. कनकाई (तुकारामांची आई) :- प्रतीक्षा लोणकर. दामिनी दामिनी दामिनी.... अभिनय समजून उमजून करण्यात यशस्वी. फारशे भावनिक प्रसंग वाट्याला न आल्याने भूमिका उत्तम वठवली आहे. पात्र सुसह्य. सावजी (तुकारामांचे वडील बंधू) :- वृशसेन दाभोळकर. चित्रपटात मोजून चार ते पाच वाक्ये बोलण्याची गरज पडल्याने माणूस कामगिरी निभावून नेतो. बराचसा अभिनय हा शारीरिक करावा लागला असता तरी त्यात छाप पाडून जातो. संसार सोडून मोक्षप्राप्तीसाठी परागंदा झाल्यावरती आलेले शहाणपण मोजक्या शब्दात पण छान मांडतो. पात्र सुसह्य. मंजुळा (सावजींची पत्नी) :- स्मिता तांबे. संन्यासी वृत्तीचा आणि कधीही पतीधर्म न निभावणारा माणूस आयुष्याच्या दावणीला बांधला गेल्यावरती झालेली घुसमट छान व्यक्त करते. सासू मेल्या नंतरच्या प्रसंगात मात्र तिने केलेला अभिनय (नवर्‍यावरती दाखवलेला त्रागा) अतिशय बालिश आणि नाटकी. खरेतर हा प्रसंगच पूर्णतः अनावश्यक. ह्या प्रसंगात आई गेल्यामुळे कोसळलेला, निराधार झालेला सावजी निव्वळ शारीरिक अभिनयातून आपल्या मनाला त्याची तडफड जाणवून देत असतानाच, ह्या प्रसंगात अचानक येऊन स्मिता तांबेचे किंचाळणे, बोंबलणे आणि पाठोपाठ मख्ख आणि शांत चेहरा करून तुकारामाने बाहेर येऊन "काय झाले वहिनी" विचारणे खरंच संताप आणते. रखमा (तुकारामांची पहिली पत्नी) :- विणा जामकर. आपण विद्या बालन नाही हे ह्या बाईला कळेल तो दिवस तिच्यासाठी आणि आपल्यासाठी सुदिन. ह्यासाठी तिने ज्यू. मेहमूदची वाताहात डोळ्यासमोर ठेवली तरी प्रगती निश्चित. आवली (तुकारामांची दुसरी पत्नी) :- राधिका आपटे. 'मात्र रात्र, रक्तचरित्र मधली राधिका ती हिच का' असा प्रश्न पडण्या येवढा भिकार अभिनय. त्याला अभिनय तरी कसे म्हणावे ? फारतर चित्रपटातला वावर असे म्हणू. ही आवली अक्षरशः कॉमीक वाटते हो. अत्यंत नाटकी अभिनय, 'कर्कशा' असे तुकारामबुवांनी आपल्या अभंगात केलेले वर्णन फिक्के पाडणारी प्रत्येक संवाद किंचाळून आणि हेल काढून बोलण्याची लकब ह्यामुळे आवली हे पात्र अक्षरशः डोक्यात जाते. ना धड तिचा त्रागा समोर येतो, ना धड तुकारामांवरचे प्रेम. पुर्णत: फसलेले आणि असह्य पात्र. मठाधिपती (रवींद्र मंकणी ):- फक्त एका दृश्यापुरता वावर. सिंव्हासनावरती बसण्याची ऐट आणी संवादाची फेक अप्रतिम. ह्या माणसाला त्या सिंव्हासनावरती असे झोकात बसलेले पाहिले आणि वाटले असेच उचलून ह्यांना शनिवारवाड्यावरती नेऊन ठेवावे. हे रूप, ही ऐट, हा माणूस बघून तो शनिवार वाडा देखील पुन्हा गर्वाने उभा राहील, ती कारंजी पुन्हा ताल धरतील, ते रेशमी पडदे सळसळतील, आमची मस्तानी नाजूक आदाब करत उभी राहील आणि कुठूनतरी ललकारी उमटेल "बाअदब बामुलाहिजा..." मंबाजी (यतीन कार्येकर) :- संपूर्णतः दिग्दर्शक म्हणेल त्याला मान डोलवून केलेला अभिनय. पात्र पूर्णतः फसलेले. त्याचा तुकारामांवरचा राग, धर्माचा दांभिक अभिमान, स्वतःच्या बुद्धीचा गर्व, ब्राह्मण्याचा माज काही काही म्हणून मनावरती ठसत नाही. दोन लहान मुलांमध्ये चाललेली भांडणे देखील अधिक प्रभावशाली वाटतील. कार्येकरांनी पाटी टाकली आले असे खेदाने म्हणावे लागेल. पात्र मनालाच पटत नसल्याने असह्य. तुकाराम (जितेंद्र जोशी) :- 'कुठे आहेत तुकाराम ?' असे शेवटापर्यंत वाटायला लावणार अभिनय. प्रत्येक दृश्यात प्रत्येक फ्रेम मध्ये हा जितेंद्र जोशी आहे हेच जाणवत राहते. कुठल्याच क्षणी आपण त्या पात्राशी तुकाराम आहेत म्हणून एकरूप होऊ शकत नाही. अतिशय मख्ख चेहर्‍याने वावर. मध्येच बापुडवाणा चेहरा करून इकडे तिकडे बघणे म्हणजे तुकाराम उभा करणे नव्हे. अतिशय संथ संवाद फेक. तुकाराम व्यवहारी, रोमँटीक, समाजसुधारक इ. इ. सर्व काही गुणयुक्त दाखवण्याच्या प्रयत्नात स्वतः दिग्दर्शकच आपटल्याने जोशी साहेब त्याच्या जोडीने पडल्याचे आश्चर्य वाटत नाही. नो सर ! हे तुकाराम आमचे नाहीत, रादर आमच्या ध्यानी मनी देखील असे तुकाराम कधीच नव्हते. बाल तुकाराम (पद्मनाभ गायकवाड) :- विठ्ठलाला एकदा मिठी मारून भक्तीचा पूर आणि विठ्ठलप्रेम दाखवणे ह्यापुरती गरज असताना निव्वळ बालचमूच्या गर्दीसाठी ताण ताण ताणलेले पात्र. ह्याच्या बाललीला तर काय वर्णाव्यात... पात्र मात्र बरेच सुसह्य. भारत गणेशपुरे, प्रशांत तपस्वी आणि हो विक्रम गायकवाड हे देखील चित्रपटात आहेत. हो.. हो.. तेच आपले विक्रम गायकवाड फकिराचा रोल करताना दिसतात. माझी खात्री नाही, पण ह्या चित्रपटात ३ प्रसंगात (एकदा बाल तुकाराम बाललीला दाखवत सवंगड्यांबरोबर गाणे गात खेळत असताना दोन हात आकाशाकडे करत कबीराचा कुठलासा दोहा गात कॅमेर्‍यासमोरून इकडून तिकडे वाटचाल, एकदा तोच दोहा म्हणत तुकारामांच्या वाड्यावरती झोळी पसरत येणे आणि शेवटी दुष्काळात मरून जाणे) जे दिसतात ते गायकवडच असावेत असे वाटते. येवढा हट्टा कट्टा माणूस दुष्काळात मेलेला पाहून हळूच खुदकन हसायला येते हो. तर आता चित्रपटाच्या कहाणीकडे वळू. माफ करा, कहाणी नाही... ऐतिहासिक सत्य. हान तर सुरुवात होते बाललीलांपासून. बाल तुकारामाचे सवंगडी त्याला शोधत आहेत आणि तो सापडत नाहीये. मग त्याला शोधणारा 'तुक्या कधीच सापडत नाही' अशी तक्रार करतो आणि शेवटी मग सगळे सवंगडी त्याला देवळात शोधून काढतात. बाल तुकाराम विठ्ठलाच्या मूर्तीला मिठी मारून ब्रह्मानंदी टाळी लावून रममाण झालेले असतात. ह्या दृश्यावरून आपण सुजाण प्रेक्षकांनी 'तुक्या कधीच सापडत नाही' कारण तो कायम ह्या देवळातच रममाण झालेला असतो, ह्या बालवयात त्याच्या अंतरात्म्यात भक्तीची ज्योत प्रज्वलित झालेली आहे येवढे सगळे अर्थ समजून घ्यायचे. ही ज्योत पुढे १४ रिळे कुठे गायब होते हे मात्र विचारायचे नाही. नाहीतर मग आम्ही तुम्हाला नव्या बदलाला नाक मुरडणारे प्रेक्षक म्हणू. कुलकर्णींनी ह्या चित्रपटात प्रेक्षकांच्या डोक्याला खूप खाद्य पुरवले आहे बरे. अनेक दृश्ये तुम्हाला काही सांगून, सुचवून जातात. मात्र ते समजण्याची तुमची पात्रता पाहिजे. आर्ट फिल्म मध्ये बघा, हीरोच्या कायम मळकट रंगाच्या शर्टाच्या जागी गुलाबी, हिरवा शर्ट दिसायला लागला, त्याच्या रेडिओवरती गंधर्वांच्या जागी रफी गायला लागला, कुंडीत गुलाब उगवला की त्या हीरोचे आयुष्य पालटले आहे, तो प्रेमात पडला आहे हे आपण जसे समजून घ्यायचे असते, तसेच इस्त्रीच्या स्वच्छ अंगरख्यामधून तुकाराम चुरगाळलेल्या अंगरख्यात आले, जप्ती - मसाले - मेथीची भाजी हे शब्द सोडून संदीप खरे सारखे एकदम (गाडी सुटली, रुमाल हालले.. च्या थाटात) 'कुठून फुटला हा कोंब, कुठे मिळाले जीवन जगण्याचे बळ त्याला..' असे म्हणायला लागले म्हणजे विरक्त झाले, विठ्ठलाच्या ध्यासाला लागले हे समजून घ्यायचे. किती सोपे आहे का नाही ? तर आपण कुठे होतो ? हान.. तर तुकारामांच्या बाललीला चालू असतानाच एकेक पात्रे आपल्या परिचयाची होत जातात. वडील बंधू सावजी हे देवधर्माच्या नादाने पुर्णतः एकलकोंडे आणि जगाच्या पार पोचलेले असतात. चार गाढवे सांभाळणे आणि मसाला पोचवणे हे कार्य देखील त्यांना जमत नसते. अर्थातच मग लहानग्या तुकोबांची वर्णी वडलांच्या हाताखाली लागते. देवाचा आशीर्वाद घ्यायला वाकलेले बाल तुकाराम एकदम लग्न झालेले तरणेबांड तुकाराम होऊनच उभे राहतात. बाललीला संपल्या म्हणून लगेच निःश्वास टाकायचा नाही. आता एकदम व्यवहारी, मिश्किल, न्याय - अन्यायाची चाड असणारे आणि रॉमेंटीक तुकाराम आपल्या समोर सादर होतात. हे धक्के एका मागोमाग एक पचवत असतानाच एकदम दुष्काळ दाखल होतो. आधी वडील, मग आई असे लोक एका मागोमाग एक गमवायची वेळ तुकारामांवरती येते. दामाजीपंतांची गोष्ट ऐकून तुकाराम आपल्या घराची धान्य कोठारे खुली करतात आणि भणंग होतात. सावजी परागंदा होतात, भुकेपोटी खणून आणलेली कंदमुळे विषारी निघतात आणि लहानग्या सकट अजून काही मृत्यू घरावर हल्ला करतात. हे सर्व बघता बघता आपण पण मरून जाणार असे वाटत असतानाच तुकोबांना भेगाळलेल्या भुईमध्ये एक कोंब उगवलेला दिसतो आणि त्यांना एकदम अभंगाची स्फूर्ती येते. त्यांना इकडे साक्षात्कार होतो आणि तिकडे ताबडतोब पाऊस सुरू होतो. पावसाला जीवनदायी, स्फूर्तीदायी का म्हणतात ते मला तेव्हा कळले, कारण पाऊस चालू झाल्या झाल्या इंटरव्हल झाले. इंटरव्हल नंतर जी-टॉक, फेसबुक ह्यांचा आसरा घेतल्याशिवाय आता टाईमपास करणे अशक्य आहे असे डाण्राव आणि प्रिमोने जाहीर केल्याने आमचा मोर्चा पुढच्या मोकळ्या पडलेल्या खुर्च्यांकडे वळला. आम्ही तिकडे वळलो आणि तुकाराम अध्यात्माकडे वळले. गेले दीड पावणे दोन तास हरवलेली त्यांची विठ्ठलभक्ती अचानक उफाळून आली आणि ते पांडुरंगाला वदले 'लोकं म्हणतात मला तुझं वेड लागलंय'. त्यांचे माहिती नाही, पण येवढ्या वेळात प्रेक्षकांना मात्र नक्की वेड लागलेले असते. आता विठ्ठलमय झालेले तुकाराम सावकारी सोडतात, लोकांचे त्यांच्याकडे गहाण पडलेले सर्व मुक्त करतात आणि अभंग रचनेला सुरुवात करतात. काम धाम सोडून चार चार दिवस डोंगरावरती जाऊन भक्तीत लीन व्हायला लागतात. इकडे मग ते आवली जे काही अभिनयात सूट सूट सुटते, की तुकारामांना 'तुमच्या ऐवजी मी शेतात राबतो पण ह्या बाईला आवरा' असे सांगावेसे वाटायला लागते. काय भिकार अभिनय करते हो ही बया. हिच्या नाटकी आणि कर्कश्य अभिनयापुढे मुनमुनसेनच्या कन्या देखील फिक्या पडतील. मग ह्या आवलीच्या किंचाळण्याने तुकाराम पुन्हा ताळ्यावरती येतात आणि शेती करायला लागतात. पुढच्याच दृश्यात ते एकदम शेत वगैरे पिकवून धान्याची रासच ओतताना दाखवले आहेत. मग एकदा रास ओतली की पुन्हा एकदा 'ये रे माझ्या मागल्या'. मधल्या काळात त्यांनी आपल्या वडिलोपार्जित विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार केलेला असल्याने त्यांचे अभंग रचणे, कीर्तन करणे आणि विठ्ठलात गुंतणे एकदम जोमाने चालू होते. आता तुकाराम संसारातून पूर्ण अंग काढल्यासारखेच वागायला लागतात. त्यांची संत म्हणून कीर्ती वाढत जाते आणि लगेच गावातला दुसरा सावकार, नाकात बोलणारे ब्राह्मण ह्यांचा पोटशूळ वाढत जातो. ब्राह्मण, मग ते अगदी शिवाजीराजांच्या काळातले असोत किंवा आजच्या पुण्यातले असोत, कायम नाकातच बोलताना का दाखवतात हे मला अजून कळलेले नाही. तर मग हे पोटशूळ वाले मंबाजी गोसावी ह्यांना पाचारण करतात वगैरे वगैरे नेहमीचे काड्यासारु धंदे चालू करतात. ह्या काळात तुकारामबुवा समाज जागृतीचे आणि सुधारणेचे कार्य करतात असे दिग्दर्शक सुचवू पाहतो. 'लांडग्यांना मारून त्यांचा शेपट्या दाखवल्यास शिवाजी राजे इनाम देतात' हे तरुणांना सांगणे आणि 'पाईक म्हणजे सैनिक. स्वराज्यासाठी लढा' असे सांगून लोकांना राजांच्या सैन्यात भरती होण्यास सांगणे म्हणजे तुकारामांचे समाज जागृतीचे कार्य होय असे जर दिग्दर्शकाला वाटत असेल तर त्याला आमचा मानाचा मुजरा. अहो तुम्हाला तुकारामच कळलेले नाहीत, तर त्यांचे कार्य काय बोडक्याचे कळणार म्हणा. मग आता हे मंबाजी गोसावी ह्यांचे आगमन झाल्यावरती तुकारामांच्या आयुष्यात उलथा पालथा होणारच. ते नक्की काय होते आणि त्यातून ते कसे बाहेर पडतात हे समजून घ्यायचे असेल तर 'तुकाराम' बघणे क्रमप्राप्त. म्हणजे बघाच असे नाही, परीक्षणानंतर हे वाक्य लिहायची सहसा पद्धत आहे म्हणून आपले लिहिले आहे झाले. जाता जाता एका प्रसंगाचा उल्लेख आणि दिग्दर्शकाचे कौतुक मात्र करायलाच हवे. 'बुडालेल्या गाथा आणि त्या वर येणे' हा तुकोबांच्या अद्भुत चरित्रातला प्रसंग कुठलेही वाद विवाद निर्माण न होण्याची काळजी घेत कुलकर्णी साहेबांनी ज्या खुबीने साकारला आहे त्याबद्दल हॅटस ऑफ. ह्या परीक्षणाच्या निमित्ताने हे बोलणे योग्य आहे का नाही माहिती नाही, पण असे वाटते की 'गाथा पुन्हा वर येणे' , ' शिवचरित्रावरील मालिकेत दादोजी, रामदास स्वामी' ही पात्रेच न दाखवणे हे योग्य आहे का ? कुठेतरी 'वाद नकोत' अशी भूमिका घेताना आपण एका विशिष्टं विचारसरणीच्या समूहासमोर मान तर तुकवत नाहीये ना ? हे देखील विचारात घेतले जाणे गरजेचे आहे. विठ्ठल विठ्ठल...

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा