बुधवार, १३ जून, २०१२

शांघाय

विकांताला मेंदूला झालेला त्रास बघता ह्या वेळी मेंदूचा वापरच करावा लागणार नाही असा एखादा मसालापट बघायचे ठरवले आणि पावले चालली 'शांघाय'ची वाट. 'पोलिटिकल थ्रिलर' असा गाजावाजा झालेला हा चित्रपट ना पोलिटिकल थ्रिलरच्या अपेक्षा पूर्ण करतो ना नुसत्या थ्रिलरच्या. हा काही काही प्रसंगात थिल्लर वाटण्यात मात्र तो यशस्वी झाला आहे हे नक्की. भडक अभिनय, अभिनय संपन्न पात्रांचा न करता आलेला वापर, उत्कर्ष बिंदू पर्यंत पोचतोय असे वाटत असतानाच टिपीकल मसाला वळण घेणारा संघर्ष ह्या सर्वांमुळे चित्रपट आपल्याला फार काही गवसून देत नाही. मग चित्रपटात बघण्यासारखे काहीच नाही का ? आहे ! अभय देओलचा सुरेख अभिनय आणि बर्‍याच कालावधी नंतर फारुख शेखचा सहज सुंदर वावर ह्यासाठी एकदा तरी चित्रपट बघायला नक्की हरकत नाही. अर्थात फारशा अपेक्षा ठेवायच्या नाहीत हे ओघाने आलेच. व्हॅसिलीसच्या 'Z' ह्या नॉव्हेलवरती आधारीत ह्या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत दिबाकर बॅनर्जी. खोसला का घोसला, ओये लकी लकी ओये, लव्ह सेक्स धोका असे थोड्या हटके थीमचे चित्रपट बनवणारा दिबाकर बॅनर्जी ह्या चित्रपटात देखील वेगळे काही देण्याचा प्रयत्न नक्की करतो पण कुठेतरी प्रयत्नात कमी पडल्याचे नक्की जाणवत राहते. चित्रपटात अभय देओल, फारुख शेख, कल्की कोचलीन, प्रोसेनजीत चटर्जी अशी तगडी स्टारकास्ट आहे. चक्क चक्क आपला चिन्मय मांडलेकर देखील आहे. तुकड्या तुकड्यांनी आलेल्या प्रसंगात एकदम भाव खाऊन गेला आहे बेटा. ह्या चित्रपटाची कथा ऊर्मी जुवेकर ह्या मराठी मुलीचीच आहे हे एक विशेष. भारतनगर मध्ये सत्ताधारी पक्षाच्या पाठिंब्यावरती येऊ घातलेले एक मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट आणि त्यावरून सुरू झालेला राजकीय काटा काटीचा खेळ हे ह्या चित्रपटाचे कथासूत्र. प्रोजेक्टला पाठिंबा देणारे आले म्हणजेच विरोध करणारे देखील येणारच. डॉ. अहमदी (प्रसेनजीत) हे असेच हाय प्रोफाइल सामाजिक कार्यकर्ते ह्या प्रोजेक्टच्या विरोधात दंड थोपटतात. कल्की अर्थात शालिनी ही एकेकाळची त्यांची विद्यार्थिनी आणि त्यांच्या प्रेमात पडलेली मुलगी. हिचे स्वतःचे वडील सैन्यात अधिकारी असतात आणि सध्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात शिक्षा भोगत असतात. तर ह्या शालिनीला डॉ. अहमदी शहरात आल्यास त्यांच्या जीवाला धोका असल्याचे आपल्या मोलकरणीकडून कळते आणि ती त्यांना सावध करण्याचा प्रयत्न करते. मात्र 'आखरी सांस तक लढना हे!' हा मंत्र जपणारे अहमदी शहरात हजर होतातच. नेहमीप्रमाणेच अशा लोकांची जी गळचेपी चालू होते ती त्यांना देखील अनुभवायला मिळते. पोलिसांची कुमक नाही म्हणून सभेला संरक्षण पुरवता येणार नाही, आणि त्यामुळे मग सभेला परवानगीच नाही असे त्यांना कळवण्यात येते. अहमदी मात्र सभा होणारच ह्या जिद्दीला पेटतात. त्यांना विरोध करायला सत्ताधारी पार्टीचे कार्यकर्ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित असतातच. ह्या कार्यकर्त्यांच्या हुल्लडबाजी समोर पोलीस नुसते बघ्याची भूमिका घेऊन उभे असतात. छोटीशी दगडफेक, अहमदींच्या काही कार्यकर्त्यांना मारहाण असे प्रसंग घडत जातात आणि सभा संपवून परत येत असताना चौकातच एक टेंपो सरळ अहमदींना उडवून निघून जातो आणि चित्रपट संघर्षाच्या एका टोकावरती येऊन पोचतो. कोमात गेलेल्या अहमदींना अपघात झाला नसून तो खूनच आहे अशी शालिनीची पूर्णं खात्री असते. मग न्यायासाठी धडपड करण्याची ती तयारी सुरू करते. अशातच अहमदींची एकेकाळची विद्यार्थिनी आणि आताची बायको हजर होते आणि चित्रपट वेग पकडू लागतो. लग्नानंतर देखील अहमदींच्या कार्याने भारावलेली त्यांची बायको आता मात्र हताश आणि निराश झालेली आहे आणि अशा आंदोलनाला काहीच फळ नसल्याच्या जाणिवेने ह्या सगळ्यातून बाहेर देखील पडली आहे. आता मात्र ती नवर्‍याला न्याय मिळावा म्हणून धाडसाने उभी राहिली आहे. प्रकरण चांगलेच जोर धरू लागले आहे हे बघून मुख्यमंत्री मॅडम (सुप्रिया पाठक) चौकशीसाठी क्रिष्णन अर्थात अभय देओलची एक सदस्यीय समिती नेमतात. ह्या अभयला रिपोर्ट करायचा असतो तो आपल्या बॉसला फारुख शेखला. मुरलेला राजकारणी, कसबी आणि व्यवहारी मनुष्य असे विविध कंगोरे फारुख शेखने आपल्या ह्या भूमिकेद्वारे दाखवले आहेत. तर दुसर्‍या बाजूला प्रामाणिक, सामाजिक अशांततेने अस्वस्थ होणारा, अधिकार असून देखील बजावता येत नसल्याने हतबद्ध झालेला आणि मोक्याच्या क्षणी सगळी बुद्धी पणाला लावत डावात रंगत आणणारा व्हा‌इस चेहरमन अभय देओलने झकास साकारला आहे. संयत अभिनय, कुठेही आक्रस्ताळेपणा नाही असा कृष्णन त्याने निव्वळ काही शब्दांचे टिपीकल मद्रासी उच्चार आणि मद्रासी लहेजावाली हिंदी ह्या जोरावरती उभा केलेला आहे. कृष्णनला नेहमीप्रमाणेच गुन्ह्याच्या दिवसाची पोलीस स्टेशनमधली डायरी न मिळणे, खात्यांतर्गतची माहिती देता येणे शक्य नाही ह्या कारणाने पोलीस खात्याकडून माहिती द्यायला टाळाटाळ, मुख्य पोलीस अधिकारी (चिन्मय मांडलेकर)चे असहकाराचे धोरण आणि गुन्ह्यांवरती पांघरूण घालण्याचे प्रयत्न असे अनुभव यायला सुरुवात होते. ह्या सर्वातून कृष्णन हळूहळू पण ठाम मार्गाने पुढे सरकतच असतो. अशातच जोगींदर शर्मा (इम्रान हाश्मी) हा पॉर्न फिल्म मेकर + राजकीय सभांमधला फोटोग्राफर आपल्याकडे अहमदींच्या अपघाता विषयी काही ठोस पुरावे असल्याचा दावा करतो आणि कथेला वेगळेच वळण लागते. शालिनी आता जोगींदरच्या साहाय्याने ह्या प्रकरणाचा गुंता सोडवायला सुरुवात करते. अपेक्षेप्रमाणेच त्यांना गुंड कार्यकर्त्यांच्या हल्ल्यांना सामोरे जावेच लागते. अशातच जोगींदरच्या हाताला असा एक भक्कम पुरावा लागतो जो सरकारला सुरुंग लावण्या येवढा स्फोटक असतो. जीवावरती उदार होऊन ते हा पुरावा कृष्णनकडे घेऊन हजर होतात, पण त्या आधीच 'क्यूं ना ते बीना दातवाला आयोग बंद कर के, CBI को इसकी छान बीन करने दी जाये' असे म्हणत मुख्यमंत्री मॅडम आयोग बंद करण्याचा निर्णय घेऊन मोकळ्या झालेल्या असतात. आता हा पुरावा अभय देओल कसा आणि कुठे वापरतो, ह्या पुराव्याचा खरंच काही उपयोग होतो, का तोच स्वतः अडचणीत सापडतो, नक्की राजकारण काय वळण घेते हे प्रश्न सोडवायचे असतीत तर मग शांघायची सहल करणे गरजेचे. अभिनयात अभय देओल आणि फारुख शेखने बाजी मारलेली आहे. थोडासा आक्रस्ताळेपणा सहन करता आला तर कल्की देखील बरीचशी सुसह्य आहे. लगाम व्यवस्थित घातला तर इम्रान हाश्मी देखील सुसह्य वाटू शकतो हे जन्नत २ नंतर पुन्हा एकदा ह्या चित्रपटात अनुभवता येते. चित्रपटात बर्‍याच खटकणार्‍या गोष्टी मात्र जागोजागी दिसतात. भ्रष्टाचार विरोधातील एक प्रमुख कार्यकर्ती, डॉ. अहमदींच्या अगदी जवळची असलेली कल्की. ह्या कल्कीच्या वडिलांना भ्रष्टाचाराच्या आरोपात शिक्षा झालेली आहे, असे असताना कुठलाच मिडिया ह्याची दखल कशी घेत नाही ? 'डॉ. अहमदींचे समर्थकच भ्रष्टाचाराशी जोडले गेलेले आहेत' हे ठामपणे जनतेसमोर आणणे शक्य असताना, सरळ त्यांच्यावरती हल्ला का केला जातो हे कोडे उलगडत नाही. त्यांच्या अपघाताच्या वेळी तिथे हजर नसलेला जोगींदर पुढे त्या टेंपोच्या ड्रायव्हरला (अनंत जोग) कसे काय ओळखतो ?, राजकीय कार्यकर्ते हे सहजपणे खून, जाळपोळ करून कसे वावरू शकतात? ते कार्यकर्ते कमी आणि सुपारी घेऊन थंड डोक्याने खून करणारे जास्ती शोभतात. असे काही खटकणारे प्रश्न सोडले, तर एकुणात चित्रपटाला 'बरा आहे' असे म्हणायला हरकत नाही.

1 टिप्पणी(ण्या):

हेरंब म्हणाले...

मूळ चित्रपट 'झी' कैच्याकै ग्रेट आहे यापेक्षा !

टिप्पणी पोस्ट करा