बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०

जबरदस्त

"पश्या रात्री माझ्याकडे झोपायला येतोस का आज?" नंदु अगदी अजीजीने विचारत होता मला.

"साल्या कोणी ऐकले तर काय म्हणेल ? खी खी खी" मी तेव्हड्यात नंद्याची खेचुन घेतली.

"आय एम सिरीयस यार. आई बाबा बालाजीला गेल्यापासुन ३ दिवस मी काढले कसे तरी पण एक तर नविन घर आणी त्यातुन आज अमावस्या...."

"बर बर चल दस्ती बंद कर आता, १०.०० पर्यंत येतो मी बाटली घेउन" मी नंद्याला डोळा मारत म्हणालो.

साधारण १०.३० च्या सुमारास मी नंद्याच्या घरी पोचलो.

"का रे येव्हडा उशीर झाला ?"

"यार नंद्या, तुमच्या सोसायटीच्या कॉर्नरला कोणीतरी माणुस अचानक रस्त्यातच मरुन पडलाय रे, भवतेक त्याला जोरदार हार्ट अ‍ॅटॅक आलेला दिसतोय. मी जवळ जाउन बघितले, एकदम पांढरा पडला होता भितीने आणी डोळे सुद्धा काहितरी भयानक, अमानवी बघितल्यासाखे विस्फारलेले होते रे." मी बाटली बाहेर काढत काढत नंद्याला पुर्ण हकिगत सांगीतली.

इकडे ऐकता ऐकता आमच्या नंद्याही पांढरा पडत चालला होता. "ए गप बाबा, मरु दे त्या मरणार्‍याला. त्या टिपॉय खाली ग्लास, पाणी, बर्फ सगळे आणुन ठेवलय बघ."

मग तो विषय दुर करुन आमची मैफल मस्त रंगली, ४/४ पेग मस्तपैकी मारुन आम्ही जेवणावर ताव मारुन टि व्ही चा आनंद लुटत बसलो.

"नंद्या चल बे १२.०० वाजायला आले झोपु आता" मी जांभई देत म्हणालो.

थोडी का कु करत शेवटी नंद्या एकदाचा झोपायला तयार झाला. वरच्या बेडरुम मधल्या डबलबेड वर आम्ही मस्तपैकी ताणुन दिली. एकतर अपरीचीत जागा असल्याने माल तशी पटकन झोपही लागेना पण ४ पेग आणी दाबुन झालेल्या जेवणामुळे डोळे मात्र चांगलेच जडावले होते.

काही वेळाने मी अर्धवट झोपेत आहे का जागा आहे ह्या संभ्रमीत अवस्थेत असतानाच मला बाजुला काही हालचाल जाणवली. च्यायला हा नंद्या लोळतो का काय ? मी मान वळवुन नंद्याकडे पाहायचा प्रयत्न केला, त्याच वेळी खोलीतला अंधार एकदम दाटुन आल्यासारखा झाला, अजुनच गडद झाला. कसल्याशा तिव्र सुगंधाने ती खोली भरुन गेली, बर्फाळ वार्‍याचे झोत अंगावर शहारे आणु लागले.

अत्यंत कष्टाने मी मान वळवुन नंदु कडे बघितले आणी अक्षरश: उडालोच.... माझ्यापासुन दोन हातावर नंदु शांत झोपला होता पण त्याचे मुंडकेच गायब होते. माझा माझ्या डोळ्यावर विश्वासच बसेना.

"घाबरला नाहीसना भावा?" अचानक उजव्या बाजुनी आवाज आला. बघतो तर नंद्याचे नुसते मुंडकेच हवेत तरंगत माझ्याशी बडबड करत होते.

"असे काय करतोयस ? घाबरलायस का तु? पाणी हवे का तुला? का दातखीळी बसलीये ?" नंद्याचे मुंडके आता खिदळत हसायला लागले.

"पश्या भावा तुझ्या हिंमतीची मात्र दिली पाहिजे हान ! भले भले फटकन प्राण सोडतात रे हे असले दृश्य बघुन. काहितर ठार वेडे होतात, तु मात्र त्या मानाने चांगलाच टिकलास की. तुला भिती नाही वाटते ?"

"भिती कसली रे नंद्या? उलट जो हुकुमी खेळ आपण कायम दाखवुन 'सावज' मिळवतो आज तोच खेळ कोणीतरी कल्पनेतही बसणार नाही असा दुसरा इतक्या सहजपणे दाखवतोय, हे बघुन असुया मात्र निश्चीतच वाटत आहे !" मी माझे मुंडके काढुन शेजारच्या टेबलावर ठेवता ठेवता म्हणालो.


3 टिप्पणी(ण्या):

अनामित म्हणाले...

sahi!! darana mana hai sarakhach ahe he.

हेरंब म्हणाले...

हा हा हा.. लय भारी... !!

Harshal म्हणाले...

massst lihilay. asech lihit raha.

टिप्पणी पोस्ट करा