शनिवार, २० फेब्रुवारी, २०१०

किस्से कॅफेतले

किस्सा १ :-

वेळ :- सकाळी ११.२५ साधारण

एक २२/२३ वर्षाची युवती आत डोकावुन बघते.

युवती :- एस्क्युजमी, तुमच्याकडे युनिव्हर्सिटिचा फॉर्म भरुन मिळेल का ?

मी :- एक्स्टर्नल ??

युवती :- हो ! किती पैसे होतील ?

मी :- तुम्ही बसुन भरणार असाल तर तासाप्रमाणे जे होतील ते, प्ल्स प्रिंट आउटसचे पैसे. मी लागली तर थोडीफार मदत करेन. आणी जर पुर्ण फॉर्मच आमच्याकडून भरुन हवा असेल, तर मग २५ /- रुपये प्लस प्रिंट आउटस.

युवती :- चालेल मग तुम्हीच भरुन द्या.

मी हातानेच तिला शेजारच्या खुर्चीत बसायची खुण करतो. युवती स्थानापन्न होते.

मी :- नाव ?

युवती :- कुमार अ ब क.

मी चमकुन बघतो.

युवती :- (हसुन) माझ्या भावाचा भरायचा आहे फॉर्म.

मी :- काय प्रॉब्लेम नाही. जन्मतारीख सांगा.

युवती :- फलाना फलाना....

मी :- पत्ता ??

युवती :- फलाना फलाना...

फॉर्मची पहिली ३ पाने भरुन होतात. आता विषय निवडायची वेळ येते.

मी :- विषय कोणते घ्यायचेत ?

युवती :- कोणतेपण ३ टाकाना चांगले.

मी :- अहो , तुमच्या भावाला अभ्यास करायचाय मला नाही. आणी कुठलेपण विषय कसे टाकणार ? त्याचे जे विषय राहिलेत तेच टाकावे लागतील ना?

(युवतीच्या चेहर्‍यावर मतिमंद भाव, मग फोन करुन भावाशी चर्चा.)

मग विषय सांगीतले जातात.

मी :- ह्या आधी तुम्ही युनिव्हर्सिटिला रजिस्ट्रेशन केले आहे का?

युवती :- नाही !!

मी :- शेवटची परिक्षा कधी दिली होती तो महिना आणी साल ?

युवती :- फलाना फलाना...

(अजुन ५ पाने भरली जाउन एकदाचे शेवटचे पान येते.)

मी :- माहिती व्यवस्थीत आहे ना एकदा चेक करुन घ्या म्हणजे प्रिंटच्या पेज वर जाता येईल.

युवती :- (निट वाचुन) हो सगळे बरोबर आहे.

(मी नेक्स्टवर क्लिक करतो... ताबडतोब एरर मेसेज येतो "युजर ऑलरेडी रजिस्टर्ड)

मी :- अहो तुमचा भाऊ ऑलरेडी रजिस्टर्ड आहे की हो.

युवती :- (थंडपणे) हो आहे की.

मी :- (हतबद्ध स्वरात) अहो मग मगाशी मी विचारले तर नाही का म्हणालात ?

युवती :- अय्या ! मला वाटले तुम्ही माझे रजिस्ट्रेशन आहे का नाही विचारत आहात म्हणून.....
-----------------------------------

किस्सा २ :-

वेळ दुपारी ३-३० ते ४-००

२७-२८ वर्षाची युवती तोंडावर जमेल तेवढे शिष्ठ आणी जगाला तुच्छ लेखणारे भाव दाखवत प्रवेश करते. कॅफे जवळ जवळ पुर्ण भरलेला.

युवती :- टर्मीनल फ्री आहे का?

मी :- येस.

युवती :- अं..... ए सी नाहिये ???

मी :- नाही, पण दोन्ही फॅन चालु आहेत ना.

युवती :- गॉश ! खुप हॉट वाटतय इकडे. जरा फॅन मोठा करा !

(मी आज्ञापालन करतो)

युवती :- (अतिशय तुच्छपणे) ह्या माऊसला काय प्रॉब्लेम आहे का ? हा वर्क करतच नाहिये.

(युवती माऊसपॅड बाजुला सारुन माऊस वापरत असले. माऊसपॅड लावुन दिल्यावर माऊस व्यवस्थीत काम करु लागतो)
पुन्हा काही वेळाने...

युवती :- हॅलो.... केवढा स्लो आहे हा पि सी. १० मिनिट झाली साईट सुद्धा उघडत नाहिये.

(मी पुन्हा धावतो. युवतीच्या संगणकावर ४ एक्सप्लोरर, २ फायफॉक्स, गुगल चाट आणी पॉवर पॉईंटचे प्रेझेंटेशन येवढा माल-मसाला उघडलेला असतो.)

मी :- मॅडम अहो येवढी अप्लीकेशन उघडल्यावर कुठला पण संगणक मान टाकणारच की. एकाच एक्स्प्लोअरर किंवा फायरफॉक्समध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या टॅब मध्ये सगळे उघडाना म्हणजे मेमरी थोडी कमी लागेल.

युवती :- कळतय मला ! आय अ‍ॅम अल्सो कॉम्प्युटर इंजीनियर !!

(आता नेहमीचे कस्टमर्स वैतागुन बघायला लागलेले असतात.)

युवती :- आमच्या ऑफीसमध्ये मी ह्याहुन जास्त प्रोग्रॅम्स ओपन करते, काही प्रॉब्लेम येत नाही. कळले ? आणी हा कि-बोर्ड पण किती हार्ड आहे.

मी :- (जमेल तेवढ्या नम्रपणे) मॅडम अहो रोज वेगवेगळे दहा कस्टमर्स तो कि-बोर्ड हाताळतात, त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतोच. आणी अहो तुमच्या ऑफीसमध्ये मेमरी वगैरे सगळे एकदम हाय-फाय असेल. इथे आम्ही कॅफे असल्याने नॉमीनल मेमरी वगैरे युज करत असतो.

युवती :- दॅटस युवर प्रॉब्लेम ! ओके ??

(मी गुपचुप जागेवर जाउन बसतो)

काही वेळाने पुन्हा एकदा..

युवती :- हॅलो.. काय चाललय काय ?? डॅम ईट !! तुमचा फ्लॉपी ड्राईव्ह देखील काम करत नाहिये.

(मी शांतपणे तिच्याकडे बघतो...जे काय दृष्य दिसते ते पाहुन माझा चेहरा माकडाच्या हातात कोलित दिल्याप्रमाणे फुलुन येतो..दॅटस ईट दॅटस ईट दॅटस ईट.. मी जमेल तेवढ्या मऊ आवाजात पण आजुबाजुच्या दुकानदारांना देखील ऐकु जाईल अशा आवाजात ओरडतो... "मॅडम अहो तुम्ही सिडी रॉम मध्ये फ्लॉपी घालत आहात !!!")

ढॅण टा ढॅण.........
--------------------------------

किस्सा ३ :-

वेळ संध्याकाळी ६-३० ते ७-००

एक एकदम 'यो' पोरगा आपल्या मैत्रिणीबरोबर प्रवेश करतो. मुलगा स्वत:ला हृतीक आणी मुलगी ऐश्वर्या समजत असल्यासारखे दोघांच्याही चेहर्‍यावर भाव.

'यो' :- मॅन एक पिसी पाहिजे !

मी :- आहे ना. तुमच्याकडे काही आय-डी प्रुफ वगैरे आहे ??

'यो' :- म्हणजे ?

मी :- कोणतेही फोटो आय-डी कार्ड. पॅनकार्ड, लायसन्स किंवा कॉलजचा आय-डी वगैरे.

'यो' :- "पि एम टी" चा पास आहे की.
------------------

किस्सा ४ :-

वेळ :- दुपारची

४/५ कन्यांचा घोळका दारात येउन थडकतो. सर्व कन्या साधारण १७/१८ वयोगटातल्या. " तु जा - मी जा " करत अखेर एकजण प्रवेश करते.

कन्या :- एस्क्युज मी , तुमचा रेट काय आहे ?

(इतर कन्या उत्सुकतेने दारातुन डोकावत आहेत)

मी :- मी "प्राइसलेस" आहे.

कन्या काही क्षण पुर्ण ब्लॅंक होते आणी मग एकदम "अय्या !!" असे ओरडते आणी पळुन जाते.
--------------------

किस्सा ५ :-

वेळ साधारण रात्री ८ ची.

एक २१/२२ ची तारुण्याने मुसमुसलेली वगैरे युवती प्रवेश करते. आय-डी प्रुफ वगैरेची देवाण घेवाण होते.

कन्या :- त्या कोपर्‍यातल्या पिसी वर बसले तर चालेल का ?

(गर्दी जवळ जवळ नसल्यानेच मी तत्परतेने कडेचा संगणक चालु करुन देतो.)

कन्या :- फास्ट आहे ना ? सगळ्या साईट वगैरे ओपन होतात ना ?

मी :- एकदम ! काहिच प्रॉब्लेम येणार नाही.

(थोड्यावेळाने डोळ्याच्या कोपर्‍यात मला हालचाल जाणवते. कन्या 'सिपीयु'वर वाकलेली असते.)

मी :- मॅडम पेन-ड्राईव्ह युज करायचा आहे का ? वरती कॉर्ड काढलेली आहे बघा.

कन्या :- नाही, पिसी हॅंग झालाय, रिस्टार्ट करतीये.

(काही वेळाने पुन्हा एकदा पिसी रिस्टार्ट केला जातो. जेंव्हा तिसर्‍यांदा पिसी रिस्टार्ट करायला कन्या वाकते माझा पेशन्स संपतो.)

मी :- मॅडम CTRL + ALT + DEL वापरुन बघा ना, सारखा सारखा डायरेक्ट रिस्टार्ट करु नका प्लिज.

कन्या :- (शांतपणे) किबोर्ड सुद्धा वर्क करत नाहिये. मग कसे करणार ?

मी :- (उद्वेगाने) अहो मॅडम पण ३/३ वेळा ??

कन्या :- चार वेगवेगळ्या साईट ट्राय केल्या, कुठलीपण सेक्स साईट उघडली तरी पिसी हॅंगच होतोय त्याला मी काय करु ?

(कॅफे मालक, पक्षी - मी घेरी येउन पडतो.)

=======================================





6 टिप्पणी(ण्या):

Voice Artist Vikas Shukla विकासवाणी यूट्यूब चॅनल म्हणाले...

मस्त लिहिले आहे. मी स्वत: कॅफे चालवतो गेल्या ३ वर्षांपासून. त्यामुळे मला तर खूपच भावले लिखाण् आणि जवळचे वाटले.
विकास शुक्ल, चाळीसगाव

सागर म्हणाले...

Bharich....

हेरंब म्हणाले...

हा हा हा हा.. जब-या..!!

VIJAY म्हणाले...

hahahahaha........

अपर्णा म्हणाले...

ढॅण टा ढॅण.........हा हा हा हा....:)

PrAsI म्हणाले...

धन्यवाद दोस्तांनो __/\__

टिप्पणी पोस्ट करा